आयुष्यात प्रत्येकाने कधी ना कधी कोणावर प्रेम केलेलं असते. भले यशस्वी होवो अथवा न होवो त्यासाठी आपल्या हृदयात एक कायम हळवा कोपरा राखीव असतो. तुमचं प्रेम यशस्वी असलं तर क्या बात असते, नाहीतर ती कायम कुरवाळत ठेवावी अशी हवीहवीशी जखम असते. प्रेमाला जसं जातपात, भाषा, धर्म यांचं बंधन नसते तसंच चित्रपटाचं सुद्धा असतं. एखादा चित्रपट समजण्यासाठी शब्द महत्वाचे नसतात तर महत्वाच्या असतात त्यात व्यक्त केलेल्या भावना, त्या जर तुम्हांला आपल्याशा वाटल्या तो चित्रपट सुद्धा आपला वाटतो. सध्या महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला भुरळ घालणारा 'प्रेमम' सुद्धा असाच आहे, अगदी मोरपिसारखा मनाला अलगद स्पर्श करून जुन्या आठवणी जागवतो आणि आपण सुद्धा त्यात स्वतःला नकळत कनेक्ट करतो.Alphonse Puthren दिग्दर्शित २०१५ मध्ये आलेला प्रेमम हा खरंतर सगळ्यांच्या प्रेमाची सरधोपट कथा, पण त्यातल्या संगीत, छायाचित्रण आणि दिग्दर्शकाचा स्वतःच एक वेगळा टच यामुळे प्रेमाचे तीन टप्पे दाखवणारा 'प्रेमम' काई च्या कै भारी झाला आहे.
टिनेज लव्ह : शाळेत प्रत्येकाला त्याला ती किँवा तिला तो असं कोणीतरी आवडत असतं. त्याला आपण क्रश, हार्मोनल चेंजेस मुळे होणारी मनाची अवस्था किंवा निरागस प्रेम काहीही म्हणू शकतो. शाळेतल्या जॉर्जच पहिलं प्रेम असते 'मेरी'. आपलं प्रेम तिला कळावं त्यासाठी जॉर्ज तिच्या घरासमोरून चकरा मारणे, घरी जातांना तिच्या मागे मागे जाणं, तिला जाणवेल अश्या पद्धतीनं गप्पा मारणं. असे सगळे टिनेजर जे उपदव्याप करतात तो हि करतो. पण आपलं प्रेम व्यक्त करू शकत नाही. मग पुढे चांगल्या झाडावर माकडं चढतात या डायलॉगप्रमाणे तिला कोणीतरी दुसराच आवडतं आणि जॉर्जच्या शाळेतल्या प्रेमाची नाव डुबते.
कट टू कॉलेज लव्ह: कॉलेज गॅदरिंग सुरु असतांना स्टेज खाली गावठी बॉम्ब लावून मिशीवर ताव देत लुंगी साऊथ स्टाईल स्टाईलने कमरेला गुंडाळत दाढीवाल्या राऊडी जॉर्ज ची पुन्हा एंट्री होते. पण आता हा पूर्वीचा मिसरूड न फुटलेला, घाबरणारा जॉर्ज न रहाता कॉलेज मध्ये मारामारी करत रस्टीकेट होणारा तरुण बनतो. एकदा कॉलेजात रॅगिंग घेतांना जॉर्ज ची 'मलर' सोबत ओळख होते आणि सख्त जॉर्ज इथे विरघळतो आणि तिच्या साधेपणावर भाळून टिचरच्याच प्रेमात पडतो. ( ट्रिव्हिया : मलरच्या या साधेपणावर फक्त जॉर्जच नाही तर महाराष्ट्रातली तमाम तरुणाई पण फिदा आहे बरं का !) आणि मग गाणं येतं दोघांच हळूहळू फुलत जाणार प्रेम दाखवणारं 'मलरे' गाणं. यातले एकापेक्षा एक लोकेशन्स, तेवढंच भारी संगीत आणि विजय येसूदास चा आवाज. हे गाणं म्हणजे शब्दांत व्यक्त न करता येण्यासारखं आहे तुम्ही न चुकता ऐका अन पहाच कारण कानाला आणि डोळ्याला ट्रीट आहे हे. आता जॉर्ज ला प्रेम भेटलंय, रासवट असणाऱ्या जॉर्जला मलर माणसात आणते आहे. असं सगळं काही सुरळीत असतांना कहानी मे पुन्हा एकदा ट्विस्ट येतो आणि काय होतं ते मी काही सांगत नाही कारण मग सगळी मज्जा निघून जाईल ते पडद्यावरच पहा.
कट टू लाईफ : आता जॉर्जच कॉलेज संपलेलं असतं सगळे सगळे राडे करून झालेलं असतात, मग जॉर्ज टिपिकल बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे 'मै उडना चाहता हूँ, मै दौडना चाहता हूँ" असं न करता भारतातल्या सगळ्या सर्वसामान्य तरुणांप्रमाणे कामधंद्याला लागतो आणि एक कॅफे उघडतो. त्याचं नाव असते 'Cafe Agape'. तिथे त्याला त्याचं तिसरं प्रेम मिळतं 'सेलीन' ,कॅफे बंद होत असतांना केक घ्यायला आलेली सेलीन त्याला आवडते. मग त्याला कळते कि हिच्या सोबत तर आपलं नातं खूप जुनं आहे. थोडासा फ्लॅशबॅक आणि जॉर्ज तिला प्रपोज करायचं ठरवतो पण त्याला कळतं उद्या सेलीन चा साखरपुडा आहे. हे कळल्यानंतर तुटलेल्याजॉर्जच काय होतं ? जॉर्जला सेलीन भेटते का ? उत्तराची कहाणी यावेळेस तरी सुफळ होते का हे कळण्यासाठी चित्रपट पहाच.
हि तर स्टोरी सांगून झाली पण प्रेमम कशासाठी पहावा तर कुरळ्या केसांच्या मेरी च्या 'अनुपमा परमेश्वरन' साठी, मलर मुळे दुर्लक्ष झालेली पण गालावर सुंदर खळी पडणाऱ्या सेलीन म्हणजे 'मॅडोना सेबॅस्टियन' साठी साधेपणात हि प्रेम असतं हे आमच्या तरुणांना नव्याने शिकवणाऱ्या मलर अर्थात 'साई पल्लवी' साठी आणि तिन्ही भूमिकात वेगळेपण जपणाऱ्या जॉर्ज म्हणजेच 'निवीन पॉली' साठी. यातला आयुष्याच्या तिनही फेज मधला जॉर्ज आपल्याला कुठे ना कुठे कनेक्ट होते कारण आपणही आयुष्यात प्रेम केलेलं असतं त्यात ठेचा खाल्लेल्या असतातच ना. अजून एक गोष्ट म्हणजे यातलं लोकेशन आणि संगीत. २०१७ च्या जुलै मध्ये पहिल्यांदा प्रेमम पाहिला आणि लगेचच केरळला जाणं झालं. त्यामुळे तो अजूनच जवळचा झाला. असं म्हणतात संगीताला भाषेचं बंधन नसते आणि प्रेमाला सुद्धा. प्रेमम मधल्या गाण्याचे शब्द जरी कळत नसले तरी त्यात नकळतपणे आपलेपणा वाटतो. गाण्याचे बोल कळत नसले, उच्चार चुकत असले तरी माझ्यासारखे कितीतरी जणं प्रेमम ची गाणी गुणगुणत असतात.
ताक : हा चित्रपट हॉटस्टार वर पाहता येईल आणि याचा तामिळ कि तेलगू रिमेक आहेत ज्यात श्रुती हसन ने भूमिका केलीये तो चुकून सुद्धा पाहू नका.
प्रतिक्रिया
10 May 2019 - 4:34 pm | मराठी कथालेखक
हा कोणत्या भाषेतला चित्रपट आहे ??
10 May 2019 - 5:02 pm | अभ्या..
प्रेमम मल्याळम चित्रपट आहे, मल्याळमच बघावा कारण ह्यात साई पल्लवी आहे. तेलुगु बघु नका त्यात श्रुती हसन आहे. साई पल्लवी तिच्या फ्रेश वावराने आणि अप्रतिम नृत्यामुळे सध्या तमिळ व तेलुगु फिल्म इंडस्ट्रीतही प्रचंड फेमस आहे. धनुष सोबत केलेला मारी २ मधील राऊडी बेबी डान्स खूप फेमस आहे.
11 May 2019 - 6:08 pm | लौंगी मिरची
मस्त गाणं आणि डांस
10 May 2019 - 11:22 pm | शिव कन्या
96 नंतर हा पाहण्याचा सल्ला दिला अनेकांनी. आणि इतक्यात तुमची ही पोस्ट दिसली. धन्यवाद. बघण्यात येईल.