मैत्र - ९

शाली's picture
शाली in जनातलं, मनातलं
4 Apr 2019 - 6:08 am

सकाळी सकाळी शब्दकोडे सोडवत बसलो होतो. बाबांनी पुण्याहुन येताना हे पुस्तक आणले होते. त्याच्या प्रत्येक पानावर अगदी पानभरुन शब्दकोडे होते. या कोड्यांसाठी रविवारच्या वर्तमानपत्राची वाट पहायला लागायची पण आता पुर्ण पुस्तकभरुन कोडी समोर असताना मला पेन हातातुन सोडवत नव्हता. आईने पाठीमागुन हात धरुन हातावर दिड रुपया ठेवला. कोड्याच्या नादात पहिल्यांदा माझ्या लक्षात आले नाही. पण मग हातातला दिड रुपया पहाताच माझी ट्युब पेटली.
मी पैसे खाली ठेवत म्हणालो “मी अजिबात नाही जाणार हां दळण घेऊन आता. मी कोडी सोडवतोय.”
“असं रे काय करतो? हे पण बाहेर गेलेत नाहीतर त्यांना सांगितले असते. जा ना रे अप्पा” म्हणत आईने परत माझ्या हातात पैसे ठेवले.
“बघेन नंतर. अगोदर हे सोडवू दे मला” म्हणत मी पैसे खिशात घातले.
माझे काही उठायचे लक्षण दिसत नाही हे पाहुन आईने त्रास द्यायला सुरवात केली. मला न आवडाणाऱ्या गोष्टी आईला माहित नसणार तर कुणाला असणार?
डोक्यावरुन, गालावरुन हात फिरवत आईचे सुरु झाले “असं रे काय करतोस सोन्या! माझं गुणाचं बाळ ते. असं कुणी आईला त्रास देत का?”
हे असं काही केलं की मी वैतागुन उठणार हे आईला माहीत होतं, तसा मी उठलो आणि सोफ्यामागे ठेवलेली दळणाची पिशवी काढत म्हणालो “जातो बाई मी पण हे थांबव. मी बाळ राहीलो नाही आता. आणि ‘आईसाठी मुलं नेहमी लहानच असतात’ वगैरे सुरु करु नको तुझं. दे आधी दळण.”
मी पिशवीचे दोन बंद दोन हातात धरुन आईसमोर उभा राहीलो. डबा पिशवीत ठेवता ठेवता आई म्हणाली “आणि हे बघ अप्पा..”
तिला मधेच थांबवत मी म्हणालो “माहितीये, दळण गव्हावरच टाकायचं, बारीक दळायचं, अर्ध्या तासात हवं आणि पिठ थंड झाल्यावरच डब्याला झाकन लावायचं. सांगतो भिकोबाला. ठिके?”
आई माझ्या प्रत्येक वाक्याला “हंऽ हंऽ” करत होती. आईचं कधीही काहीही असतं. एकदा कोड्यांची लिंक तुटली की काही केल्या पुढचे शब्द आठवत नाहीत. अगदी डोळ्यासमोर असुनही आठवत नाही. मी पिशवी स्कुटरला लावली आणि गावाकडे निघालो.

गिरणीत लाकडी जाळीवर डबा ठेवला तर भिकोबा हसुन म्हणाला “काय अप्पा, दळण का?”
“नाही, शेंगदाणे आणलेत. तेल गाळून दे पटकन”
“काय रे, चिडलाय एवढा? काय आणलय? गहू?”
मी त्याच्याकडे डबा सरकावत म्हणालो “हे बघ भिकोबा, दळण फक्त…”
माझं वाक्य मधेच तोडून भिकोबा म्हणाला “गव्हावरच टाकायचं, बारीक दळायचं, लगेच पाहीजे, पिठ थंड झाल्यावरच झाकण लावायचं. अजुन काही?”
मी आपला त्याच्या प्रत्येक वाक्यावर “हं” करत होतो. आईचं ऐकुन माझं पाठ झालय, आणि माझं ऐकुन या भिकोबाचं. मला हसु आलं. राग जरा निवळला.
भिकोबा म्हणाला “काय अप्पा, तू रांगत होता तेंव्हा पासुन दळण दळतोय तुमचे. पण मोठ्याईच्या सुचना काही संपत नाही.”
या भिकोबाला मी लहानपणापासुन पहातोय. भरपुर केस आणि भरघोस मिशा. त्या कधी काळ्या होत्या की नाही माहित नाही. कारण जेंव्हा जेंव्हा त्याला पहावे तो पिठ उडुन त्याचे केस, मिशा आणि भुवयासुध्दा पांढऱ्याफेक झालेल्या असायच्या. पुर्वी पिठामुळे आणि आता म्हातारपणामुळे. हा भिकोबा मला आवडायचा. लहान असताना आईबरोबर ‘मागे लागुन’ दळणासाठी मी यायचो ते त्याला पहायला. गिरणीच्या चट्याक फट्याऽक आवाजात भिकोबा उलट्या पिरॅमिडसारख्या चौकोनी तोंडात दळण ओतायचा, हातातल्या हातोडीने पिठ पडणाऱ्या भागावर ठण्ण ठण्ण करुन आवाज करायचा आणि वर टाकलेल्या गव्हात कोपरापर्यंत हात घुसवून फिरवत रहायचा. अशा वेळी त्याला तंद्री लागायची. त्याला पाहुन मी ‘मोठेपणी गिरणीवाला व्हायचे’ हे नक्की केले होते. एकदा घरी आलेल्या पाहुण्यांनी “मोठा होवून कोण होणार बाळ?” या प्रश्नाला मी “गिरणीवाला” असं उत्तर दिल्याचे बाबा अजुनही हसत हसत सांगतात. नेहमीप्रमाणे भिकोबाने गिरणीवर ठण्णऽऽ असा जोरात आवाज करत म्हटलं “अप्पा किती वेळ बसणार या पिठाच्या फुफाट्यात? जावून ये भटाच्या वाड्यावर जायचे असेल तर.”
मलाही ते पटलं, म्हटलं चला जरा ठोब्बाकडे जावून त्याची कलाकुसर बघत बसावं. आजोबांना चांदीचा करगोटा करायचा होता त्याचं डिझाईनही त्याला रेखाटुन देता येईल.
“मी चाललोय म्हणून दळण मागे ठेवू नको रे भिकोबा” असं त्याला बजावत मी ठोब्बाकडे निघालो. जाताना शामला आवाज दिला. तो वाटच पहात असल्यासारखा शर्ट घालतच स्कुटरवर येवून बसला. आम्ही ठोब्बाच्या घरापुढे स्कुटर लावली. ठोब्बाचे घर तसे चार खोल्यांचे. शामच्या वाड्यापुढे काहीच नाही असे. पण जोतं मात्र सहा फुटांच्या आसपास होतं. पायऱ्या चढुन गेलं की पहिल्याच खोलीत काही काचेची कपाटे लावून ठेवलेली. एक बैठे लाकडी डेस्क आणि त्यामागे पांढरी शुभ्र गादी. डेस्कच्या शेजारीच बादलीच्या आकाराची शेगडी आणि तिला हवा घालण्यासाठी लोखंडी पंखा. पंख्याच्या कडेलाच अडकवलेल्या दागीन्यांवर जाळ फुंकायच्या दोन वाकड्या पितळी नळ्या. आम्ही गेलो तर ठोब्बा दोन पायांच्या अंगठ्यांमधे लोखंडी पट्टी धरुन त्यातुन चांदीची तार ओढत होता. पट्टीवर चढत्या क्रमाने आकार असलेली भोके होती. अगोदर मोठ्या आकारातुन तार ओढायची मग एक एक क्रम करत ती लहान छिद्रातुन ओढायची. म्हणजे हव्या त्या जाडीची तार मिळे. ठोब्बा तार ओढण्यात अगदी गुंग झाला होता. प्रयोगशाळेत टंगळमंगळ करणारा ठोब्बा, वडील दागीना घडवायला बसले की तेथुन हलत नसे. त्याला मनापासुन सोनारकाम आवडे. त्यामुळे वडीलही खुष असायचे त्याच्यावर. बरं तसा दागीन्यांच्या बाबतीत बुध्दीमान. त्याने माझ्या आईसाठी बांधलेल्या नथीचे डिझाईन तालुक्यात काय जिल्ह्यात कुठे नव्हते. आम्हाला पहाताच त्याने उरलेली तार पट्टीतुन घाईने ओढली आणि ती भेंडोळी त्याने व्यवस्थीत कपाटात ठेवून गादी झटकली.
एक तक्क्या माझ्याकडे सरकवत तो म्हणाला “अप्पा तू आज करगोट्याचा विषयच काढू नको. मी करीन डिझाईन आणि दाखविन तुला. भुंगा नको लावूस मागे.”
मी गादीवर टेकत म्हणालो “मी काही बोललोही नाही, तूच सुरु केलं कारे ठोब्बा. म्हणजे एखाद्याला वाटेल की अप्पाच मागे लागलाय सारखा याच्या. चालू आहात सगळे तुम्ही. ते म्हणतात ना ‘सोनार, शिंपी, कुलकर्णी अप्पा। यांची संगत नको रे बाप्पा॥’ ते अगदी खरय.”
मला कोपराने ढोसत शाम्या म्हणाला “आयला, त्याच्यावर कशाला घसरत असतो रे अप्पा नेहमी. तू एखादी गोष्ट डोक्यात घेतली की तुझा पार वनवासातला राम होतो. झाडा-दगडांमधेही तुला सितामाईच दिसायला लागते अशावेळी. माहितीये सगळ्यांना.” शामने बाजु घेतल्याने ठोब्बाला जरा बरं वाटलं.
तो आत पाहुन ओरडला “आई पाणी दे ग जरा. चहाही टाक.”
मी एक लोड टेकायला घेतला आणि दुसरा मांडीवर घेवून शाम्याला म्हणालो “होळीचे काय करायचे रे या वर्षी? धोंडबा काही आपल्याला मळ्यातुन एका काडीला हात लावू देणार नाही.”
शाम्याही विषयाची वाटच पहात होता. तो म्हणाला “त्याचंही बरोबर आहे रे. कशाला ही एवढी लाकडे जाळायची? एका आळीत एक होळी करायला हवी खरं तर. पण ते सगळं पुढच्या वर्षीपासुन. निदान या वर्षी तरी रामासमोरची होळी सगळ्यांपेक्षा मोठी झाली पाहीजे. धोंडबाला दुरच ठेवू होळीपासुन.”
“तुम्ही मस दुर ठेवान, मी राह्यला पायजे ना.” म्हणत धोंडबाच पायऱ्या चढून वर आला आणि भिंतीला टेकून सप्पय बसला.
मी नाराज होत म्हणालो “तू कसा काय कडमडलास येथे धोंडबा?”
“दळन टाकल रे भिकाकडं. तो म्हनला की तू बामनाच्या वाड्यावं गेलाय. तिकडं गेलो तर इन्नीनं इकडं लावून दिलं मला. पन बरंच झालं. ते व्हळी बिळीचं पार डोक्यातुन काढायचं अप्पा. आन् औंदा धुळवडबी करायची नाय. मे महिन्यात हरिचंद्रावं जातो ते कॅन्सल. धुळवडीलाच हरिचंद्रावर मुक्काम टाकू. इचारत नाय शाम्या, सांगतोय. पार बदल नाय व्हायचा यात.”
तेवढ्यात मालती चहाचे कप आणि चकल्या घेवून आली. मी न बोलता एक कप उचलुन समोर ठेवला आणि एक चकली घेवून दाताने कुरतडत बसलो. आता धोंडबाबरोबर वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. त्याला झाडं झुडपं, जनावरं यांना कुणी त्रास दिला की अजिबात सहन होत नसे. होळीच्या तर तो अगदी विरुध्द होता. गावाबाहेरच्या ओढ्यातले पाणी सुध्दा कुणी विनाकारण गढूळ केले तरी तो दगड फेकून मारायचा. आणि धुळवडीचेही त्याचे बरोबर होते. मागच्या वर्षी गावातल्याच काही मुलांचे बाहेरुन कब्बडी खेळायला आलेल्या मुलांबरोबर भांडण झाले होते. त्या मारामारीतून धोंडबानेच आम्हाला सुखरुप बाहेर काढून ज्याच्या त्याच्या घरी पोहचवले होते. या वर्षीही त्या भांडणाचा पुढचा अध्याय रंगायची शक्यता होती त्यामुळे या वर्षी धुळवडीला गावात न थांबनेच शहाणपणाचे होते. धोंडबाचे हरीचंद्राचे नियोजन मला पटले आणि आवडले देखील. कारण आम्हाला या भांडणात काडीचाही रस नव्हताच आणि धुळवडीला गडावर मुक्काम म्हणजे छान होळीचा भाकरीसारखा चंद्र असणार होता. मुक्कामाची रंगत वाढणार होती. पण आता त्याच्यापुढे होळीची चर्चा करण्यात काही अर्थ नव्हता. शाम्याचे तोंड अगदी बारीक झाले होते. मागच्या वर्षी शनीच्या मंदिरापुढची होळी खुप मोठी झाली होती, तेंव्हाच त्याने ठरवले होते की पुढच्या वर्षी रामाची होळी सगळ्यात मोठी करायची. सगळ्यात जास्त नैवेद्य आणि नारळ रामाच्या मंदिराच्या होळीतच पडायला हवे होते. दुसऱ्या दिवशी त्या खरपुस भाजलेल्या नारळाच्या वाटणात शिजवलेली कोंबडी खायचे प्लॅनिंगही त्याने वर्षभर आधीच केले होते पण आता धोंडबाने त्यात मोडता घातला होता. बरं धोंडबाला विरोध करणे म्हणजे भिंतीवर डोके आपटण्यासारखे होते. बोलायला दुसरा विषयही नव्हता. होळी, कोंबडी यासारख्या गोष्टीत ठोब्बाला रस नव्हता. मग मीच चहा संपवून उठलो. उगाचच बुड झटकत म्हणालो “जातो रे ठोब्बा. उठ शाम्या. भिकाने दळण दळले असेल. जातो घरी.”
माझी नाराजी धोंडबाला कळली. तो म्हणाला “अप्पा, कितीबी नखरे कर तू पण औंदा व्हळी निवद दाखवण्यापुरतीच करायची हे ध्यानात ठेव. नाद केला तर सगळ्यांची वस्ताऱ्याने चंपी करीन. हिंडा मंग टक्कल घेवून गावात. आयला, समद्या गावात तुमी बोंब मारुन सांगायचं की लहानी व्हळी करा, बारकी करा ते राह्यलं बाजुला, तुमीच गावापरीस मोठी व्हळी करायला निगाला. निदान या बामनाला तरी अक्कल असन असं वाटलं व्हतं तर हेच समद्यांच्या पुढं हाय. उठा, करुंद्या त्या ठोब्बाला काम.”
मग मी आणि शाम्याही निघालो. पण धोंडबाच्या बोलण्याचा आमच्यावर फारसा परिणाम झाला नव्हता. आम्ही त्याच्यासमोर बोलत नव्हतो पण दोघांच्या डोक्यात होळीचे प्लॅनिंगच फिरत होते.

शाम्याला घरासमोर सोडले आणि मी निघालो. इतक्यात इन्नीची हाक ऐकायला आली “अप्पा थांब रे. जावू नकोस इतक्यात.”
मी पुन्हा चावी फिरवून गाडी बंद केली आणि थांबलो. इन्नी हातात झाकलेले ताट घेवून आली. मला रागच आला. शकीलकडेच जायचय तर हिला पायी जाता येत नाही का? उगाच आपलं काहीही.
“इन्ने, तु काही सिंड्रेला नाही की इथे तिथे जायला तुला हरणांची गाडी पाहीजे.” मी गाडी सुरु करत म्हणालो.
इन्नी गाडीवर बसत म्हणाली “गोग्रास द्यायचाय रे गायीला. मग पोवळालाही द्यायला नको? म्हणून तुला थांबवले. नाहीतर मीच गेले असते पायी.”
आळीच्या शेवटी अंबुनाना रहायचे. त्यांच्याकडे गाय होती. आणि त्यांचा एक बैल होता पोवळा नावाचा. हा पोवळा त्यांच्याच गायीला झालेला. तो मोठा झाल्यावर नानांनी कैक बैल पोवळाच्या जोडीला आणले. पण एकही टिकला नाही. शेवटी नानांनी तो नाद सोडला आणि बैलगाडी ‘एका बैलाच्या छकड्यात’ बदलुन घेतली. पोवळा म्हणजे अत्यंत हुशार जनावर. त्याला घरामागे असलेल्या गोठ्यात नावाला बांधलेले असायचे. तो कधी घर सोडून गेला नाही की कुणाच्या रानात कामाला गेल्यावर त्याला कधी मुसके बांधावे लागले नाही. नानांनी घातल्याशिवाय तो कधी चारा खात नसे. तो घरातल्याच काय गावातील कुणालाही कधी जवळ येवू द्यायचा नाही. दत्ता आणि मी मात्र त्याच्याबरोबर हवी तशी मस्ती करायचो. पोवळा मला आणि दत्त्याला जवळ येवू देतो म्हणून नानाही आम्हाला खास वागणूक देत असत. नानांचा या पोवळावर अतिशय जीव. दर रविवारी त्याला कणिक आणि तुपाचे गोळे खावू घालत. नाना एकवेळ पोटच्या पोराकडे दुर्लक्ष करतील पण पोवळाकडे कधी दुर्लक्ष करणार नाही. बैल हा प्राणी कितपत हुशार असतो मला माहीत नाही पण या पोवळाला मात्र नानांची भाषा कळायची. नानांच्या “मागे ये, गोठ्यात जा, थांब जरा, शेताच्या कडेने चाल, मागे फिर” वगैरे आज्ञा तो अगदी तंतोतंत पाळायचा.
आज बारस. चिंतुकाकांनी कालच्या एकादशीचा उपवास आज सोडला होता त्यामुळे गोग्रास तर द्यायला हवा. गोदीला भरवला तरी पोवळाला कसा भरवायचा म्हणून इन्नीने त्यासाठी मला थांबवले होते. मी गाडी नानांच्या घरासमोर लावली. इन्नीच्या ताटातुन एक नैवेद्य उचलला आणि मागच्या गोठ्याकडे गेलो. इन्नीने गोदीला घास भरवला आणि मी पोवळाला. त्याने जीभेच्या एका वेढ्यातच सगळा नैवेद्य तोंडात ओढुन घेतला. मी त्याच्या मानेखालची मऊसुत पाळी कुरवाळीत उभा राहीलो. इन्नीने पलिकडच्या उकिरड्यावरची कोरडी राख घेऊन ताट स्वच्छ केले आणि माझ्या शेजारी येवून उभी राहीली. माझे तिच्याकडे लक्षच नव्हते. पोवळ्याच्या पाठीवरुन हात फिरवता फिरवता माझ्या डोक्यात एक कल्पना लख्खकन चमकुन गेली. ती माझी कल्पना मलाच इतकी आवडली की मी पोवळ्याच्या पुठ्यावर जोरात थाप मारुन ठॉप्पऽऽ असा आवाज काढला आणि हसलो.
इन्नी म्हणाली “काय रे, काय आठवलं? का हसलास?”
“काही नाही गं. तु चल लवकर. तुला घरी सोडतो. मला मळ्यात जायचय.” म्हणत मी इन्नीला हाताला धरुन गोठ्याबाहेर आणले. नाना चहाचा आग्रह करत होते पण तिकडे दुर्लक्ष करुन मी गाडी वळवली व पाचच मिनिटात शाम्याच्या घरासमोर उभी केली.
आत जाणाऱ्या इन्नीला ओरडूनच सांगीतले “दादाला पाठव गं बाहेर लवकर. मी गाडी बंद करत नाहीए.”
शाम बाहेर येत म्हणाला “काय रे, घरी नाही गेलास अजुन?”
“शर्ट नको काढूस. गाडीवर बस. जरा मळ्यात चक्कर मारुयात” म्हणत मी स्कुटर मजेत एक्सीलरेट केली.
‘त म्हटल्यावर ताकभात’ हे ओळखणाऱ्या शाम्याच्या लक्षात आले की मला काहीतरी सुचले आहे. तो काही न बोलता गाडीवर बसला.
मी स्कुटरचा गिअर टाकला आणि टाळीसाठी एक हात मागे करत म्हणालो “शामराव, टाळी द्या. होळीचे काम होतेय आपले”
माझ्या हातावर टाळी देत शाम म्हणाला “अप्पा, काय सुचलय ते मळ्यात गेल्यावर सांग बाबा. आता दोन्ही हाताने गाडी चालव पाहू पुढे पाहून”

मी स्कुटर कोंबड्यांच्या खुराड्यासमोर लावली व “दत्तोबा!” अशी हाक मारत ओट्यावर सँडल्स काढल्या. रांजणातले पाणी पायावर घेवून मी आणि शाम ओसरीवर आलो. दत्त्या समोरच्या पितळीमधल्या ताकामधे भाकरी चुरत होता. भाकरी गरम असावी कारण तो चुरता चुरता भाकरी एका हातातुन दुसऱ्या हातात खेळवत होता. आम्हाला पाहील्यावर त्याने एका हाताने पलिकडची घोंगडी जवळ ओढली आणि ती उलगडत म्हणाला “बसा, टायमावर आले पघा तुम्ही. ताक-भाकर पाह्यल्यावरच शाम्याची आठवन आल्ती. आई दोन पितळ्या दे अजुन” अर्थात शेवटचे वाक्य आईसाठी होते.
शाम घोंगडीवर त्याच्या शेजारी बसत म्हणाला “दुसरे ताट नको रे. एकाच ताटात खावूयात.”
ताक भाकरी माझी नावडती त्यामुळे मी वलनीवरची गोधडी काढून मधल्या खांबाजवळ टाकली आणि मांडी घालून, खांबाला टेकून बसलो.
भाकरी कालवता कालवता दत्त्या म्हणाला “व्हय रं अप्पा, आज कस्काय सकाळचा फेरा मारला इकडं? तू तसा यायचा नाय”
माझ्याऐवजी शाम म्हणाला “अरे होळीचे काही तरी केलं पाहीजे. तेच त्याला काहीतरी सुचलय. पण मला धोंडबाची भिती वाटतेय. तो काही या वर्षी होळी करु देणार नाही. बरं तो काही ऐकणाऱ्यातला नाही कुणाचे.”
दत्ता म्हणाला “आरं पन तो तरी काय चुकीच सांगतोय? उगा आपली लाकडं जाळायची व्हळीच्या नावाखाली! मला बी नाय पटत. लईच हौस असन तर पायलीच्या पोळ्या करा पुरनाच्या आन् घाला गावजेवान. कुना गरीबाच्या मुखात तरी गोडधोड पडन.”
मी वैतागुन म्हणालो “आयला, याच्याकडे आलो हा मदत करेल म्हणून तर हा धोंडबाच्या पुढचा निघाला. दत्त्या, आगावुपणा करु नकोस उगाच. काय समाजसेवा करायची ती पुढच्या वर्षापासुन करु. या वर्षी रामाची होळी जंगी झाली पाहीजे. बास, बाकी मला माहित नाही काही.”
दत्ता ताक-भाकरीचा काला भुरकत म्हणाला “बरं, तसं त तसं. मला काय! तेवढं धोंडबाचं कसं करायचं तेवढं पघा म्हनजे झालं.”
“तुझ्या डोक्यात काय होतं अप्पा?” शामला उत्सुकता होती.
मी एकदा दत्त्याकडे व एकदा शामकडे पहात म्हणालो “परवा पाराच्या वाडीत गेलो होतो. गोविंद्या रहातो ती वाडी. त्याच्याकडेच गेलो होतो. बाबांचे काम होते काही.”
दत्त्या हातातला घास तसाच ठेवत म्हणाला “सकाळी सकाळी कह्याला त्या इद्र्या मानसाचं नाव काढलं अप्पा. आरं ते पार कामातून गेलेलं कार्टं आहे. ते काय मानसात हाय का? गैबानं ध्यान कुठलं!”
“अरे ऐक तर अगोदर तू. त्याच्या वडीलांनी बैलजोड विकली मागच्या महिन्यात. बाबांकडेच आले होते ‘बँकेत पैसे भरुन द्या’ सांगायला.”
दत्त्याबरोबर आता शामही गोंधळला “अरे पण त्याचा होळीशी काय संबंध अप्पा? आणि असला तरी त्या गोंद्याचा काही विषय जोडू नकोस तू होळीबरोबर. आतरंगी पोरगं आहे ते. मला अजिबात नाही पटत. कधी तावडीत सापडला तर चांगला धडा शिकवणार आहे मी त्याला.”
मी हसत म्हणालो “मीही तेच म्हणतोय शाम. त्याला धडा शिकवून होईल आणि आपली होळीची सोयही होईल. एका दगडात दोन पक्षी मारुयात.”
शामचा गोंधळ आणखी वाढला “म्हणजे काय करायचं म्हणतो आहेस तू?”
“हे बघ, मी परवा गेलो होतो तेंव्हा गोविंदाचा गोठा रिकामाच होता. गाई बाहेर बांधली होती. पण तिची काळजी नको. गोठ्यात साधारण पंधरा फुटांच्या दोन गव्हाणी होत्या. चांगल्या मांडीपेक्षा जाड असतील. किमान सव्वा फुटाची असेल एक एक. दोन्ही गव्हाणी फोडल्या तर रात्रभर होळी पेटेल राममंदिरासमोर. आहेस कुठे?”
शामचा चेहरा खुलला. त्याच्या डोळ्यासमोर राममंदिरापुढली सगळ्यात मोठी होळी पेटली पण दत्ताने त्याला स्वप्नातुन जमीनीवर आणले.
दत्त्या वैतागुन म्हणाला “आराऽरा, अप्पा सक्काळ सक्काळ काय भांग झोकुन आला का काय तू? दावनीला जनावर नसलं म्हणून काय झालं, कुणाची गव्हान आणायची, तेबी व्हळीसाठी हे काय बरं नाय.”
या दत्त्याला सकाळपासुन माणूसकीचा कोणता किडा चावला होता मला समजेना.
मी वैतागुन म्हणालो “दत्त्या कुणाची कड घेतोय तू? अरे तुझ्या विहिरीवरच्या पंपाचा किती मोठा पाईप चोरला होता गोविंद्याने ते विसरलास का इतक्यात? त्यावेळेस तर मारे कुऱ्हाड घेवून धावत होता पाराच्या वाडीला. सहा महिने देखील झाले नाहीत अजुन.”
पाईपचा विषय निघाल्यावर दत्त्या गप्प बसला. या गोविंद्याने त्याचा पाईप नुसता चोरलाच नाही तर रात्रीत विकून त्याचे पैसे देखील केले होते. कारण नसताना या गोविंद्याने आणि त्याच्या वडीलांनी सगळी पाराची वाडी गावाविरुध्द उभी केली होती. गेले दोन वर्ष २६ जानेवारी, १५ ऑगस्टला ही सगळी वाडी गावापासुन फटकुन वाडीतच झेंडा वंदन करत होती. त्याचे वडील नेहमी डेअरीच्या कामात काही ना काही अडचण उभी करायचे. हिशोबात घोळ तर नेहमीचाच असे.
दत्त्याने रिकाम्या ताटात पाणी ओतले आणि ताट हलवत ते पाणी पिऊन तो म्हणाला “हायला, हुंद्या मंग त्याचा कार्येक्रम औंदाच्या व्हळीला. तशीबी या बाप-लेकांच्या बुडाला जरा चरबीच आलीय.”
दत्तााचे बोलणे ऐकून शामचा जीव भांड्यात पडला. त्याला वाटत होते की या होळीच्या भानगडीत दत्ताही धोंडबासारखा हात वर करतो की काय. तरीही शाम चाचरत म्हणाला “पण अप्पा, ते कुटूंब कितीही वाह्यात असले तरी त्यामुळे आपल्याला अधिकार नाही ना मिळत त्यांचे नुकसान करायचा? ते त्यांच्या कर्माची फळे भोगतील”
शाम्याने हा होळीचा तिढा आणखी वाढवला. खरं तर मलाही काही इरेसरी नव्हती होळी मोठी करायची पण शामचेच चालले होते. पण आता मात्र त्याचं सरळ मन जरा कच खायला लागलं होतं. पण त्याला तो गव्हाणींचा मोहही सुटत नव्हता. आता त्याला व्यवस्थीत समजावल्याशिवाय होळीचे प्रकरण मार्गी लागणार नव्हते. दत्त्या काय, कशालाही हो म्हणायला तयार होता. त्याला होळीपेक्षा पोळीत जास्त रस होता.
मी म्हणालो “शाम थोडावेळ असं समज की आपण गोंद्याला ओळखतच नाही. आपण दरवर्षी कुणाच्या ना कुणाच्या शेतातुनच होळीची लाकडे नेतो ना गुपचूप? मग या वेळी त्यांच्या गोठ्यातुन नेऊयात. त्यांना धडा वगैरे काही शिकवायचे नाहीए आपल्याला.”
शाम्याने मान डोलावली. मी म्हणालो “शाम्या, चोरीची लाकडे नसतील तर होळीला मजा नाही आणि दारा दारात जाऊन आंबिल नाही मागीतली ओरडुन तर ती बिज नाही. याला काही चोरी म्हणत नाही की भिक मागने म्हणत नाही. पटतय का?”
हे मात्र दत्त्याला एकदम पटलं. शाम्यालाही एकदम हायसे वाटले. शेवटी काय, माणसाला जे करायचे आहे त्याला थोडा नैतिक आधार मिळाला की तो तयार होतोच.
दत्त्याने विचारले “अप्पा, ते सम्दं ठिक हाये. पन दोन गव्हानी, त्याबी एवढ्या मोठ्या, आनायच्या कशा? तेबी कुणाला कळाल्या बिगर? नाय म्हनलं तरी पाराची वाडी दोन अडीच किलोमिटर तर नक्कीच आसनं गावापासुन.”
दत्त्याचा प्रश्न ऐकुन शाम्या परत चिंतेत पडला पण माझी मात्र कळी खुलली. कारण होळीची मजा ती पेटवण्यात कमी आणि लाकडे चोरण्यात जास्त असे. जेवढा जास्त थरार, तेवढी होळीची मजा जास्त. अर्थात ज्याची लाकडे चोरीला जात त्यालाही हे दोन दिवसांनी कळेच. पण त्यात त्यालाही समाधान असे की गावच्या होळीत आपली लाकडे होती याचे. हे सगळं खरं असलं तरी होळीच्या आधी आठ दिवस बहुतेक मळेकरी सावध असत.
मी दत्त्याला म्हणालो “मगाशी मी गोदीला गोग्रास द्यायला गेलो होतो इन्नीबरोबर. पोवळा तिला जवळ येवू देत नाही म्हणून.”
माझ्या वाक्याचा कसलाही संदर्भ न लागूनही दोघांनी मला मधे टोकले नाही. मी मांडी मोडत म्हणालो “तर प्लॅन असा आहे की होळीच्या आदल्या रात्री उशीरा अंबुनानांच्या गोठ्यात दत्ता आणि मी जाईन. पोवळा तसाही अगदी बारीक दाव्यानेच बांधलेला असतो. नांगराचे शिवाळ-जु तेथेच असते. ते पोवळ्याच्या गळ्यात घालून त्याला घेवून आम्ही गावाबाहेर येवू. दत्ता आणि मी असलो तर पोवळा निमुटपणे येईल. मग सगळे मिळून पाराच्या वाडीला जावू. गोंद्याच्या गोठ्यातल्या दोन्ही गव्हाणींना दोरांनी घट्ट बांधून त्याला पोवळाला जुपू आणि हळू हळू चालवत गावापर्यंत आणू. दोन्ही गव्हाणी रात्रीच रामच्या वखारीत पोहचवू आणि मिलवर चढवू. तोवर दत्ता पोवळ्याला पुन्हा गोठ्यात बांधुन येईल. सकाळपर्यंत छान हवे तसे सरपण तयार होईल. गव्हाणींचा मागमुसही रहाणार नाही. यासाठी दत्त्या घरुनच कासरे घेवून येईल. या सगळ्या भानगडीपासुन धोंडबाला अगदी दुर ठेवायचे. जे काही सांगायचे ते दुसऱ्यादिवशी हरिचंद्रावर गेल्यावर सांगू. तो ज्या काही शिव्या देईल त्या खावू. कशी वाटली कल्पना?”
एक मिनिट दोघेही कधी एकमेकांच्या तर कधी माझ्या तोंडाकडे पहात राहीले. मग दत्त्या एकदम उठुन उभा राहीला आणि बुड झटकत म्हणाला “आयला, अप्प्या साल्या तू तं नाना फडनिसाचा बाप निगाला राव. तुला लई साधा समजत व्हतो मी. मंग ठरलं. औंदा व्हळी गोंद्याच्या गव्हानींचीच करायची.”
आता शाम्यालाही हुरुप आला “अप्पा, ही तर महाराजांची मोहीमच आखलीस तू. पण धोंडबाचा ‘कात्रजचा घाट’ कसा करायचा ते पहा तेवढं म्हणजे झालं. आतल्या गोटातला गनिम केंव्हाही वाईटच. कधी पाणी फिरवेल मोहिमेवर ते सांगता येणार नाही.”
मी हसत म्हणलो “अरे त्याचा कशाला कात्रजचा घाट करायचा? दत्ता रात्री अकरा वाजता मळ्यातुन निघेल. धोंडबाचा नऊ वाजेपर्यंतच अजगर झालेला असतो. मी, शाम आणि राम वखारीतच थांबतो वेळ काढत. बारापर्यंत जरी पाराच्या वाडीला पोहचलो तरी पहिली गव्हाण अडीच वाजेपर्यंत मिलवर चढेल. पहाटे साडेतिनपर्यंत राममंदिराच्या ओवरीत सरपन रचुन होईल आपले. धोंडबाला काय कळणारे?”

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बाहेर पडताना मी आईला सांगितले “काकु आज चकोल्या करणार आहेत गं”
याचा अर्थ मी आज शामकडे जेऊन बहुतेक रामकडेच झोपणार हे आईने ओळखले. तिने काही डब्यात घालुन द्यायच्या आत मी बाहेरही पडलो. आज दिवसभर कॉलेजला असताना सुध्दा आमच्या डोक्यात फक्त होळी आणि गव्हाणीच होत्या. मधल्या सुट्टीत आम्ही या सगळ्या प्रकरणात शकीललाही ओढले. आम्हाला वाटले त्याची खुप समजुत काढावी लागेल पण उलट त्याला ही कल्पना फारच आवडली. दोन दिवस थांबायचा आमचा विचार होता पण शकीलनेच “आजही करते है यार. दोन दिवसात काय फाटे फुटतील कुणाला माहित.” म्हणत आम्हाला बळेच घोड्यावर बसवलं होतं. दत्त्याचे मधेच सुरु होते “आपण दांडीच मारायची का दुपारच्याला?” त्याला अगदीच रहावत नव्हते. जे काही करायचे ते रात्री अकरा नंतर करायचे होते पण दत्त्या दुपारीच दांडी मारायच्या तयारीत होता. संध्याकाळी काकुंना ‘वरणफळे खावी वाटतायेत’ एवढंच सांगीतले. अम्मीकडे एक चक्कर मारली आणि शामच्या ओट्यावर येवून बसलो. रामही आला. ठोब्बाला बोलवायची गरज नव्हती. त्याला दुपारीच सांगीतले होते की काकू डाळढोकळी करणार आहेत. त्यामुळे तोही हजर होता. दत्त्याही सहा वाजेपर्यंत गुरांना चारापाणी करुन, दुध काढुन हजर झाला. त्याने येतानाच मणी आणि कासरा आणला होता. (मणी: लाकडी पुलीसारखी छोटी वस्तु) म्हणजे तो आता परत मळ्यात जाणार नव्हता. थोड्यावेळाने शकीलही दुकानात चक्कर मारुन ओट्यावर येवून पोहचला. सगळेच उत्सुक होतो. कधी रात्र होतेय असं झालं होतं सगळ्यांना. दत्त्या तेवढ्यात अंबुनानांकडे चक्कर मारुन पोवळाला गोंजारुन आला होता. आमचा गोंधळ ऐकुन काकूंनी बाहेर येऊन विचारले “आज सगळेच जमलेत. काय विचार आहे अप्पा? आणि सगळेच थांबणारेत का जेवायला? मला डाळ वाढवायला?”
“कसला इचार न् काय काकू! चकोल्या आसतीन तं मी हाय जेवायला. वरन घ्या आन त्यात चपाती चुरा असला काय कुटानाच नाय पघा चकोल्यात.” असं म्हणत दत्त्या उगाचच मोठ्याने हसला. त्याला आज उत्साहाचे जणू भरतेच आले होते.
त्याच्या डोक्यात टपली मारत इन्नी म्हणाली “चपाती चुरायचा त्रास नको म्हणून वरणफळे हवीत होय रे तुला? आगावूच्चे”
दत्ता सावरुन घेत म्हणाला “तसं नाय गं इन्ने. आवडतो मला. आमच्या म्हतारीला कर म्हणलं तर डाळीत गुळ घालायच्या नावानी वराडती.”
तरी इन्नी आत जाता जाता म्हणालीच “अप्पा, तुमचं काय चाललय ते समजतय बरका मला.”
आता हिला काय समजणार आहे आमचं काय चाललं आहे ते पण उगाच आपला खडा मारुन पहायचा. पण तिला शंका आली होती हे नक्की. इतक्यात नेहमीचे पेंडीचे पोते घेऊन धोंडबा आला.
सायकल ओट्याला टेकवत तो म्हणाला “आज पंचायत भरवल्याली दिसतीय शामरावांनी. काय शकीलमिया, काय इषेश?”
शाम घाई घाईने म्हणाला “काही नाही रे. अप्पा म्हणाला की वरणफळे खायचीत. मग आईने सगळ्यांनाच थांबायला सांगीतले जेवायला.” धोंडबाला आजच्या प्लॅनची कुणकूण लागली असावी असा शामला उगााचच संशय होता. त्यामुळे त्याची कारण नसताना धोंडबापुढे तंतरत होती. धोंडबाने सायकलच्या मधे असलेले पोते काढुन कॅरेजवर टाकले. दत्त्याने क्लिप ओढुन धरत त्याला मदत केली. दोन्ही बाजुंनी पोते रस्सीने घट्ट आवळून बांधता बांधता धोंडबाचे ओट्यावरील दोरखंड आणि मणी याकडे लक्ष गेले. त्याने दत्त्याला विचारले “काय रं दत्ता, हे कासरा आन मनी कह्याला आनले गावात?”
दत्ता गोंधळून म्हणाला “अरे अंबुनानाला फास वढायचा व्हता बाभळीचा. दोन दिवस मागत व्हता. आज आठवनीनं आनला”
पोते आवळून झाल्यावर सायकल मेन स्टँडवर लावत धोंडबा म्हणाला “आयला, आंबुनाना काय आज बैलं राखीतो का काय? त्याला मनी-कासरा ठेवायला जमना व्हय? बिन वस्ताऱ्याचा न्हावी हाय का काय हा आंबुनाना”
आम्ही सगळेच धोंडबाने फार मोठा विनोद केल्या सारखे हसलो. आम्हाला असं झालं होतं की कधी एकदा हा येथून टळतोय. पण त्याने सायकल मेन स्टँडवर लावल्यावर मात्र शाम्याची चुळबुळ सुरु झाली. चोराच्या मनात चांदणे असावे तसे त्याचे एकुनच वागणे गोंधळल्यासारखे व्हायला लागले. मग बराच वेळ आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अर्थात धोंडबामुळे कुणाचेही लक्ष गप्पांमधे लागत नव्हते. त्यालाही काहीतरी गडबड असल्याचे जाणवले पण काय ते त्याच्याही लक्षात आले नाही. आता चांगलेच अंधारुन आले होते. इन्नी ताटे घेतल्याचे सांगायला बाहेर आली. “घ्या जेवून तुमी” म्हणत धोंडबाही निघाला. इन्नीने त्याला बळेच थांबवत म्हटले “धोंडीदादा तुही जेवूनच जा की.”
धोंडबा हसुन म्हणाला “हुंद्या तुमचं निवांत. आपल्याला तसलं गुळमाट जेवान नाय पटत. काय चपात्या शिजवुन खात्यात का कव्हा डाळीत. दत्त्याला वाढ डावभर जास्त.” धोंडबा मनापासुन हसला आणि त्याने सायकलवर टांग मारली. आम्ही मोकळा श्वास घेतला आणि जेवायला उठलो.

रात्री जेवणे वगैरे उरकुन आम्ही ओट्यावर बसलो होतो. आठ वाजत आले होते. अजुनही सगळे ओट्यावर आहेत हे पाहुन इन्नीच्या आणि चिंतुकाकांच्याही आत-बाहेर चकरा सुरु झाल्या. आमच्या गप्पांमध्ये नेहमीचा मोकळेपणा, मोठमोठ्याने हसने नव्हते त्यामुळे इन्नीला जरा जास्तच संशय यायला लागला. मग शकीलने खुणावले तसे आम्ही उठलो आणि राम मंदिराच्या ओट्यावर येऊन बसलो. रामही घरी सांगुन आला की वखारीतच थांबतो आहे म्हणुन. सगळ्या विषयांवर गप्पा झाल्या तरीही घड्याळाचा काटा फक्त दहा वाजल्याचे दाखवत होता. रोज झरझर जाणारा वेळ आज सरता सरत नव्हता. गावात सगळीकडे निजानिज झाली होती पण शकीलच्या म्हणन्यानुसार अकराची वेळ ठरवली तर अकरा वाजताच मोहीम सुरु करायची होती. ठोब्बासारखा थंड माणुसही आज टक्क डोळ्यांनी जागा होता. एक तर गव्हाणी आणायच्या याचा उत्साह तर होताच पण त्या गोविंद्याला परस्पर धडा शिकवला जाणार होता याचा सगळ्यांनाच आनंद होत होता. नाहीतर ठोब्बाने कोणत्याही परिस्थितीत आम्हाला साथ दिली नसती. दत्त्या सारखा चवड्यावर बसत होता तर कधी मंदिराच्या आवारात चकरा मारत होता. घड्याळात सव्वा अकरा वाजले आणि आम्ही “थांब थांब” म्हणत असताना दत्त्याने सगळ्यांना वेशीबाहेर बाजार ओट्यांजवळ थांबायला सांगीतले आणि मला ओढत अंबुनानांच्या घराकडे निघाला. दिवसभर ज्या गोष्टीच्या नुसत्या कल्पनेने उत्साहाचे फवारे उडत होते, प्रत्यक्षात ती गोष्ट करायची वेळ आल्यावर मात्र माझी तंतरली. दत्त्याने माझे मनगट धरले होते आणि मी फरपटल्यासारखा त्याच्या मागे ओढला जात होतो. मला मागच्या मागे पळून जावे वाटत होते. दत्त्याला माझा विरोध जाणवला असावा.
मागे वळून तो म्हणाला “आरं काय हे अप्पा! आयत्या टायमाला शेपुट घालनार पघ तू. चाल लवकर. तु नुस्ता सोबत ऱ्हा. बाकी समदं मी पघतो”
तरीही “लक्ष ठेवायच्या” नावाखाली मी अंबुनानांच्या अंगणातच थांबलो. दत्ता हळूवार पावलांनी गोठ्याकडे वळला. बऱ्यापैकी थंडी असुन मला घाम फुटला होता. अंगणातल्या वडाच्या झाडाचे एखादे पान पडले तरी मला दचकल्यासारखे होत होते. पाचच मिनिटात दत्त्या गोठ्याकडुन येताना दिसला. त्याच्या खांद्यावर जु आणि कासरा दिसत होता. एका हातात त्याने पोवळाची वेसण धरली होती आणि पोवळाही निमुटपणे त्याच्या मागे येत होता. माझा जीव भांड्यात पडला. दत्त्या जवळ आल्यावर मी त्याच्या हातातुन पोवळाची वेसण घेतली व दोघेही बाजारओट्यांकडे निघालो. वेशीतुन बाहेर आलो तर सगळे पिंपळाच्या झाडाखाली चिंतातुर होऊन उभे होते. शाम्याला चिंता होती की रात्रीच्या अंधारात पोवळा आमच्या सोबत येईल की नाही याची पण आम्हाला पाहील्यावर सगळ्यांनी ‘मुक’ जल्लोष केला.
दत्त्या म्हणाला “गोंधळ करु नका. पवळ्याला वाडीत गेल्यावरच कासरा लावू. आता निघा चटशीरी. गव्हानी एकदाच्या वखारीत पोचल्या आणि पवळा त्याच्या दावनीला परत गुतवला का आपन मोकळं.”
त्याचे बोलणे ऐकुन परत सगळे गंभीर झाले. आम्ही सगळेच ओढ्यावरचा दगडी पुल ओलांडुन पाराच्या वाडीच्या रस्त्याला लागलो. रात्रीचे पावनेबारा वाजले असावेत. सगळेच न बोलता चालत होते. पुल ओलांडला आणि गावाचे दिवे मागे पडले. आता चंद्रही खुप वर आला होता. निरव शांतता होती. दोन दिवसांवर पौर्णीमा असल्याने सुरेख चांदणे पडले होते. सगळेच निमुटपणे, न बोलता चालत होते. मी पोवळाची वेसण सोडली होती तरीही तो सुध्दा निमुटपणे माझ्या सोबत चालत होता. नुकत्याच केलेल्या डांबरी रस्त्यावर त्याच्या खुरांचे नाल आणि आमच्या चपलांचे आवाज येत होते. इतक्यात ठोब्बा पळत पळत पलीकडुन आला आणि माझ्या सोबत चालायला लागला.
मी विचारले “काय झाले रे?”
पण त्याच्या ऐवजी दत्त्याच रस्त्याच्या पलीकडे खुणावत, हसत मला म्हणाला “मसनवट!”
भीती वाटत नसुनही मला उगाचच शहारल्यासारखे झाले. अजुनही कुणी गप्पा मारायच्या मुडमधे नव्हते. जो तो निमुट चालत होता. पोवळाही मान वर खाली करत, मधेच कान, शेपटी झटकत शांतपणे आमच्याबरोबर चालत होता. डोक्यावर पगड्या आणि कमरेला तलवारी नव्हत्या इतकच नाहीतर आमची टोळी लाल महालात घुसायला निघालेल्या मावळ्यांच्या टोळीसारखी दिसत होती. स्मशान मागे पडले आणि थोड्याच वेळात पाराची वाडी दिसायला लागली. त्यातल्या त्यात एक गोष्ट आमच्यासाठी चांगली होती. वाडीच्या सुरवातीलाच गोविंद्याचे घर होते. घराच्या मागील बाजुला त्याचे आवाढव्य हिरवेगार शेत पसरले होते. घराच्या पलीकडील बाजुच्या पडवीत त्याचा गोठा होता. सध्या फक्त एकच गाई असल्याची माझी माहिती होती. आम्ही दबक्या पावलांनी गोविंद्याच्या घराजवळ पोहचलो. एखादे कुत्रे वगैरे असण्याची शक्यता होती. कितीही तिखट कुत्रे असले तरी दत्त्या त्याला सहज हाताळीत असे त्यामुळे दत्त्या सगळ्यांच्या पुढे होता. ऐनवेळी त्याला काय सुचले कुणास ठाऊक. त्याने पोवळाला जु चढवले, दोन्ही बाजुंनी शिवळा घातल्या आणि त्याला बाजुच्याच बाभळीला बांधले. गोविंद्याचे घर समोरच दिसत होते. त्याचे म्हणने होते की पोवळाला गोठ्याजवळ न्यायला नको. आपण एक एक गव्हान ओढत येथवर आणू आणि मग पोवळाला जुपू. घराच्या मागच्या बाजुला असलेल्या वळहीतुन दत्त्याने एक कडब्याची पेंढी ओढली आणि तिची गाठ मोकळी करुन पोवळासमोर टाकली. आता त्याने नाही खाल्ली तरी तो शांत नक्कीच रहाणार होता. ठोब्बा म्हणत होता की मी पोवळाशेजारीच थांबतो पण कुजबुजत्या आवाजात त्याला शिव्या घालुन दत्त्याने मागे यायला लावले. शकील गोठ्यात उभा राहुन गव्हाणींचे निरिक्षण करत होता. या अशा वेळी देखील रामचे डोके अगदी वखारीवाल्यासारखे चालत होते.
गव्हाणींकडे पाहुन तो कुजबुजला. “लाकुड घट्ट आहे रे शकील. गाठही नाहीए कुठे. फळ्या चांगल्या पडतील यांच्या.”
शकीलही त्याच्या कानात कुजबुजला “गधे, होळी पेटवायची आहे याची. कोयला कितना मिलेगा इसके बारेमे सोच. फळ्यांचे काय घेवून बसलास”
इतक्यात मी आणि दत्त्या गोठ्यात शिरलो. दत्त्याने अगोदर गोठा बारकाईने पाहीला. कोपऱ्यातच बैलगाडीला घालायच्या वंगणाची बाबूंची नळी होती. बाजुला खताच्या रिकाम्या गोणी होत्या. दत्त्याने वंगण घेवून दोन्ही गव्हाणींना चोळले. “हे कशाला?” विचारले तर म्हणाला “राहुंदे अप्पा. सरपान केलं गव्हाानीचं तरी जो तो आपली गव्हान वळखीतो बराबर. गव्हानच काय, गव्हानीचा धलपा बी वळखाया येतो.”
मी पटल्यासारखी मान डोलावली. दत्त्या आता अंगात आल्यासारखा लयीत काम करत होता. अशा वेळी ‘हाच तो भोळा दत्ता’ हे सांगुनही कुणाला खरे वाटले नसते. कदाचीत त्याच्या या भोळेपणामुळेच त्याच्या अंगात येवढे धाडस येत असावे. त्याने आम्हाला खुण करुन गव्हाण उचलायला लावली आणि खताच्या गोण्यांच्या घड्या दोन्ही गव्हाणींच्या टोकाच्या खाली सरकवल्या. “आता हे कशासाठी?” हे मात्र आम्ही विचारायच्या भानगडीत पडलो नाही. त्याने बाजुला ठेवलेला मोठा कासरा घेतला आणि त्याचे मजबुत फास दोन्ही गव्हाणींच्या टोकाला घातले. त्याचे आजोबा काही वर्ष गोदीत कामाला होते. त्यांच्याकडे खलाशांच्या अनेक गाठींची माहिती होती. ती दत्याने कधीच आत्मसात केली होती. ते आता कामाला आले होते. ज्या सफाईने दत्या मुसके विणायचा, झाडुचा दांडा विणायचा त्याच सफाईने त्याने दोन्ही गव्हाणी अगदी घट्ट बांधल्या. हात झटकत त्याने आमच्याकडे सुचक नजरेने पाहीले. आम्हीही एकदा एकमेकांकडे पाहीले आणि होकारार्थी माना डोलावल्या. दुवा मागायला समोर धरावेत तसे दोन्ही हात समोर धरुन दत्ताने त्यावर हलकेच थुंकल्या सारखे केले. पण तो खाली वाकायच्या आता शकीलने त्याचे तोंड गच्च दाबुन ठेवले. शकीलचे वागणे पाहुन मी, शाम्या, ठोब्बा सगळेच बावरलो. दत्त्या “आयला, बोंब झाली असती आता घेन्यान देन्याची. धरा समदे” म्हणत परत वाकला. काय झाले ते माझ्या लगेच लक्षात आले. सवयीप्रमाणे दत्ता “जे बजरंग बली” ओरडायला निघाला होता. ‘होता शकील म्हणुन वाचला दत्त्या बैल’ असं काहीसं पुटपुटत शाम्यानेही हात लावले. मी हसु दाबत गव्हाणीच्या दुसऱ्या टोकाला जोर लावला. आता शकील आणि दत्ता गव्हाण ओढत होते आणि आम्ही बाकीचे मागुन रेटा देत होतो. दहा मिनिटांच्या मेहनतीनंतर गव्हाण सरकत सरकत पोवळाला बांधले होते त्या बाभळीपर्यंत आली. या दहा मिनिटांच्या कसरतीने आमच्या कपाळावर घाम साठला होता. ठोब्बा गव्हाणीवरच मांडी घालुन टेकला.
ते पाहुन दत्ताने घाई केली. “हय इठुबा, टेकला कह्याला? हालव बुड चटशीरी. अजुन एक गव्हान बाकी हाय. आता अर्ध गिळलय ते मदीच नाय सोडता यायचं. त्या गोंद्याच्या बापाला कळालं तर भाजुन खाईन ऊद्या मला. हाल”
मग मात्र आम्ही थकवा विसरुन दुसऱ्या गव्हाणीच्या मागे लागलो. पुन्हा दत्ताने दुसऱ्या कासऱ्याने गव्हाण घट्ट बांधली आणि पहिल्या गव्हाणीसारखेच तिलाही हळू हळू ओढत दहा मिनिटात पहिलीशेजारी आणुन ठेवली. आम्ही कपाळावरचा, मानेवरचा घाम पुसत होतो तोवर त्याने दोन्ही कासरे व्यवस्थित पोवळाच्या गळ्यातला जुवाला बांधले. शिवळा घट्ट केल्या आणि त्याचा कासरा सोडला. त्याला थोडे दटावताच ते शहाणे जनावर चार पावले पुढे सरकले. तेवढ्यात दत्ताने वेसण धरुन त्याला थांबवले. पोवळाच्या चार पावलांनी दोन्ही गव्हाणी अगदी लिलया हलल्या होत्या आणि एकमेकींशेजारी आल्या होत्या. दत्त्याने हातातल्या लाकडी मण्यात दोर ओवला आणि दोन्ही लाकडांना एकमेकांच्या समांतर बांधुन टाकले. आता सगळे काम त्याच्या मनासारखे झाले होते. अशा कामात आम्ही फक्त सांगकामे असायचो. आम्ही दत्त्याकडे पाहुन प्रश्नार्थक माना हलवल्यावर तो म्हणाला “आरं झालं काम. आता पावलं उचला आणि निघा इथुन. आता पार रामाच्या देवळातच थांबायचं. चला.”
आम्ही एकदाचे ‘हुश्श’ केलं आणि गुमान दत्याच्या मागोमाग चालायला सुरवात केली. शाम, आणि मी गव्हाणींच्या एका बाजुने चालत होतो तर राम, ठोब्बा आणि शकील दुसऱ्या बाजुने चालत होते. पोवळाची वेसन धरुन दत्ता सगळ्यांच्या पुढे चालत होता. आमची चाल अगदीच मंद होती. मी अधुन मधुन पोवळाच्या पुठ्यावर थोपटत होतो. रात्रीचे दोन वाजत आले असावेत. आमच्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ असेल की सगळे एकत्र असुन कुणीच तिन तास एकमेकांशी बोलले नसेल. आडवी वाट संपुन आम्ही काटकोनात गावाच्या रस्त्याला वळालो तसे मागची पारवाडी नजरेआड झाली आणि समोर दुरवर गावातले दिवे दिसायला लागले. मधेच खुप अंतरावर सखल भागातला स्मशानातला दिवाही दिसत होता. वाडी नजरेआड झाली तरी आम्ही सावधगीरी म्हणुन काहीही बोलत नव्हतो. चाल अजुनही गोगलगाईचीच होती. त्यात दत्त्याने बांधलेल्या गोणींमुळे बराचसा आवाज कमी झाला असला तरी आता डांबरी रस्ता लागल्याने दोन्ही तुळयांचा रस्त्यावर बऱ्यापैकी मोठा आवाज येत होता. पंधरा-विस मिनिटांमधे आम्ही स्मशानाच्या अगदी जवळ पोहचलो होतो. आता आम्ही गाव आणि पारवाडी यांच्या बरोबर मधे होतो. डोक्यावरचा चंद्र आता पश्चीमेला झुकायला सुरवात झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजुला शेते असल्याने पहाटेची थंडी चांगलीच जाणवत होती. चंद्रप्रकाशात बाजरीची चंदेरी कणसे चमकत होती. चालता चालता दत्या क्षणभर थांबला. जरा अंदाज घेत म्हणाला “अप्पा, गड्या वाडी पार मागं राह्यली. आता काय भ्याव नाय. जरा दम खायचा का? कसं म्हणतो शकील?”
शकीलनेही मान हलवली. तसे आम्ही नुसतेच चालत होतो. काम तर पोवळा करत होता. पण गेले तिन साडेतिन तास मनावर जे दडपण होते त्यामुळे सगळ्यांनाच थकवा आल्यासारखे वाटत होते. दहा पंधरा मिनिटे थांबण्याने आता काही फरक पडणार नव्हता. दत्याने पोवळाला रस्त्याच्या मधेच उभे केले आणि वेसन सोडुन तो मागे आला. शकील आणि ठोब्बा बाजुच्या दगडांवर टेकले. मी आणि शाम गव्हाणी न्याहाळीत होतो. “याचे तुकडे करायला कोणत्या कामगाराला सांगायचे” याचा विचार करत रामही तेथेच उभा होता. कंटाळा आल्यावर आम्ही डांबरी रस्त्यावरच मांडी घालुन निवात बसलो. दत्त्या गव्हाणींवर बसला होता. पोवळा अधुन मधुन शेपटीने पाठीवरच्या माशा उडवत निवांत उभा होता. काही वेळ बसल्यावर शकीलने घड्याळाकडे पहात घाई केली. ठोब्बाही बुड झटकुन उभा राहीला. पारवाडी आता खुप मागे राहीली होती. समोर गाव होते. या मधल्यावेळात सगळ्यांच्याच मनावरचे दडपन दुर झाले होते. वृत्ती फुलल्या होत्या. रामची वखार आता काही मिनिटांच्या अंतरावर होती. आमची मोहीम जवळ जवळ यशस्वी झाली होती. आता गावात जावून गव्हाणी मिलवर चढवल्या की परवाच्या होळीची चिंता मिटणार होती. दत्त्याने उत्साहाच्या भरात दोन्ही गव्हाणींना बांधलेली पोती सोडवली आणि दुर केली. आता लाकडांचा कितीही आवाज आला तरी चिंता नव्हती. खरे तर आवाज यावा म्हणुनच त्याने पोती काढली होती. शकील सँडल घालत होता. एव्हाना मुळ दत्त्या जागा झाला होता. त्याने तोंडात दोन बोटे घालुन लांबलचक शिळ घातली आणि “जे शिरीराऽऽम” म्हणत जोरात आरोळी ठोकली. त्याचा उत्साह पाहुन शाम्याने त्याच्या पेक्षा जोरात “जऽऽय श्रीराऽऽम” म्हणत आरोळी ठोकली. त्या निरव शांततेत त्या आरोळ्या कितीतरी मोठ्या आणि कर्कश्श वाटल्या. मी अजुन रस्त्यावरच बसलो होतो. पण पाठीमागुन या दोघांच्या आरोळ्या अचानक ऐकुन मला एकदम धडकीच भरल्यासारखी झाली. ठोब्बाही चांगलाच दचकला. सँडलचे बक्कल लावणाऱ्या शकीललाही प्रथम काही कळलेच नाही कोण आणि का ओरडले ते. तोही बावरला. दत्त्याच्या आणि शामच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य दिसत होते. आम्ही त्या आरोळ्यातुन सावरतच होतो तोवर गव्हाणीवर उभा असलेला दत्त्या विजेचा शॉक बसावा तसा हिसडा मारल्या सारखा हवेतच आडवा झाला आणि दाणकन खालच्या डांबरी रस्त्यावर आपटला. त्याला प्रथम काही समजलेच नाही काय झाले ते. त्याचा धक्का लागुन शेजारी उभा असलेला शाम्याही रस्त्यावर वेडावाकडा धडपडला. समोरच स्मशान होते त्यामुळे ठोब्बाची तर एकदम पाचावर धारणच बसली. आणि माझ्या चटकन लक्षात आले काय झालं ते. दत्ता आणि शामच्या आरोळ्यांनी आणि शिट्यानी जसे आम्ही दचकलो होतो तसेच पोवळाही दचकला होता. इतक्यावेळ अगदी शांतपणे आम्हाला सोबत करणारं ते शहाणं जनावर जीव खाऊन चौखुर उधळलं होतं. दत्या अजुन सावरला नव्हता. त्याला बहुतेक कमरेला मार बसला असावा. मी आणि शाम्या “पोवळा हो, पोवळा” म्हणत हाकारत होतं. पण तो उधळलेला बैल आमच्या डोळ्यांसमोर दोन्ही जाडजुड गव्हाणी अगदी खेळणी ओढावीत तशी ओढीत काही अंतर रस्त्यावरुन सरळ धावला आणि अचानक उजवीकडे वळून एकदम शेतात घुसला. काय होतय ते शकीलच्याही ध्यानात आले. पण त्याला फक्त शेतात आडव्या तिडव्या उडत जाणाऱ्या गव्हाणीच दिसल्या फक्त. मी आणि शाम तिकडे धावलो व रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावर चढुन शेतात पहायला लागलो. पण सगळ्या रानात डोक्याच्या वर वाढलेली बाजरी होती. एखाद्या झाडावर चढल्याशिवाय आता काही दिसने अशक्य होते. शाम्या तशातही रानात घुसायच्या तयारीत होता पण मी त्याला खांद्याला धरुन मागे ओढले. आम्ही हताश होऊन मागे आलो. दत्त्या अजुनही मांडी घालुन रस्त्यावर बसला होता. सुदैवाने त्याची कंबर ठिक होती पण एकाच पायावर आपटल्याने उजवा गुडघा चांगलाच दुखावला होता. त्याची चौकशी करायची सोडुन शाम्याने त्याच्या पाठीत जोरात गुद्दा घालुन स्वतःचा राग बाहेर काढला. शकीलने त्याला बाजुला घेतले. ठोब्बा अजुनही बावरलेलाच होता तर राम अवाक होता.
शकीलने दत्त्याला हात दिला आणि म्हटले “उठ खवीस, चल, दो कदम चल के दिखा”
दत्त्या कसाबसा उठला आणि पहिल्याच पावलाला कळवळून खाली बसला. रामने त्याची पँट वर ओढली तर त्याचा गुडघा चांगलाच सुजला होता. मला काहीच सुचत नव्हते. मी दत्याला विचारले “जास्त दुखतय कारे दत्ता?”
दत्त्या कळवळत, तोंड वाकडे तिकडे करत म्हणाला “ते मरुंदे अप्पा. माझ चुकलच गड्या. थोड्यासाठी मी घोळ घातला उगी.”
मी त्याची पँट व्यवस्थित करत म्हणालो “असु दे रे. तु निट बस अगोदर. पोवळा कुठे जात नाही. शोधू आपण त्याला”
दत्ता ओशाळुन म्हणाला “आरं अप्पा, उधाळलेला बैल असा घावत असतो का कुठं. आठाठ मानसांना बैल आकळत नाय अशा टायमला. आता पवळा घावला तर सकाळच्यालाच घावन. सोड त्याचा नाद”
त्याचे बोलणे ऐकुन सगळेच हताश झाले. शाम्याच्या डोळ्यासमोर त्याच्या रामरायाची पेटती होळी विझली. ठोब्बालाही वाईट वाटत होते. तो दत्ताच्या पायावर हात फिरवत निमुट बसुन होता.
मी शकीलकडे पहात विचारले “आता काय करायचे रे शकील?”
शकील म्हणाला “होळी नाही झाली यावेळेस तर काही कयामत नाही येणार अप्पा. पण हा पोवळा जर सापडला नाही तर सकाळी अंबुनानांची काय अवस्था होईल सोच जरा.”
हा मुद्दाच माझ्या लक्षात आला नव्हता इतका वेळ. मला अंबुनानांचा चेहरा दिसायला लागला. मुलांना घास भरवायच्या अगोदर पोवळाला घास भरवणारे अंबुनाना काही माझ्या डोळ्यांसमोरुन हलेनात. दत्ता चालु शकत नव्हता. रात्री पोवळाला शोधने शक्य नव्हते आणि सकाळी शोधने म्हणजे हाताने आत्मनाश ओढवून घेण्यासारखे होते. आम्ही सगळे चांगल्याच खोड्यात अडकलो होतो. अर्ध्या तासापुर्वी आम्ही किती आनंदी होतो. आणि क्षणात कुठे येवून पडलो होतो. या सगळ्यातुन सावरायला आम्हाला काही मिनिटे लागली. जरा वेळाने आम्ही दत्ताला खांद्यांचा आधार देत उठवला. शाम्या, मी, ठोब्बा आणि सगळेच गावाकडे चालु लागलो. कुणाचीच डोकी काम करत नव्हती. दत्ताला माझ्या सोबतच वखारीवर झोपवायचे ठरवले होते. सकाळी शकील त्याला मळ्यात सोडणार होता. पहाट व्हायला आली होती. दत्त्याच्या घरची पहाटेची सगळी कामे आज तशीच रहाणार होती. त्यामुळे तासभरच विश्रांती घेऊन शकील दत्ताला मळ्यात सोडवणार होता. येताना धोंडबाला सगळी कल्पना देणार होता. त्यामुळे शिव्या दिल्या तरी निदान आज दत्त्याच्या घरची दुध काढने वगैरे कामे धोंडबाने केली असती. आमच्या पुढे दुसरा पर्यायच नव्हता. आता जे होईल त्याला सामोरे जायलाच हवे होते.

मी सकाळी जरा उशीराच उठलो आणि गावात न जाता सरळ कॉलेजलाच गेलो. गावात नक्की काय झालं असेल याची खुप उत्सुकता होती मला पण ते पहायला तिकडे जायची हिम्मत मात्र नव्हती. दत्त्या मात्र आज येणार नव्हता कॉलेजला हे नक्की होते. त्यालाही भेटायला जायला पाहीजे होते. दुपारनंतर दांडी माराची इच्छा होती पण धाडस होत नव्हते. हळु हळु शाम, ठोब्बा, शकील, राम सगळे आले. प्रत्येकजन वेगवेगळाच आला होता. कॉलेजमधल्या मुलांनाही आश्चर्य वाटत होते हे सगळे नग आज वेगवेगळे कसे उगवले याचे. प्रार्थना झाल्यावर पहिला तास बंक करुन आम्ही सगळेच गार्डनमधे जावून बसलो. मी शाम्याला खुप उत्सुकतेने विचारले “काय शाम, अंबुनानाच्या घरची काय हकिकत आहे रे?”
शाम म्हणाला “अरे सकाळीच त्यांना समजले की पोवळा गोठ्यात नाही. गेला असेल कुठे म्हणुन सगळा गाव शोधला त्यांनी. पण कुठेच नाही म्हटल्यावर त्यांचा समज झाला की पोवळा चोरीला गेलाय म्हणून. त्यांनी चक्क अंगणात बसुन हंबरडाच फोडला. त्यानंतरचे काहीच माहीत नाही मला कारण मी सरळ इकडेच आलो. सकाळी नाष्टाही केला नाही मी. इन्नीला काहीतरी संशय आलाय. हे ऐकल्यावर आधीच ताळ्यावर नसलेला आमचा जीव पार अंतराळी गेल्या सारखा झाला. हे वाईट स्वप्न आहे आणि थोड्या वेळाने ते संपनार आहे असं वाटत होते. आमचे कुणाचेच वर्गात लक्ष लागत नव्हते. शेवटी दुपारी कॉलेजला दांडी मारुन आम्ही मळ्याचा रस्ता धरला. सकाळी शकीलने दत्त्याला सोडवताना धोंडबाला सगळे सांगीतले होते. धोंडबाने त्याला मळ्यातच रस्त्यावर उभं राहुन यथेच्छ शिव्या घातल्या होत्या.
“एका पायानं काय भागतय तुझं, थांब जरा, दुसराही निखळून ठिवतो.” म्हणत दत्त्यावर तर तो पहार घेवून धावला होता. त्यात हे प्रकरण दुसरं काही असते तर हरकत नव्हती पण आम्ही होळीसाठी लाकडे चोरत होतो, ते ही दुसऱ्याच्या गोठ्यातली गव्हाण हे त्याला समजले होते. आता त्याने जीव जरी घेतला तरी आम्ही हुं का चूं करणार नव्हतो. सगळे दत्ताच्या ओट्यावर बसलो होतो. दत्ताही गोधडी टाकुन पडला होता. त्याच्या पायावर हळदीचा लेप लावलेला दिसत होता. ओट्यावर धोंडबा पिसाळलेल्या वाघासारखा आमच्या अवती भोवती फेऱ्या मारत होता आणि आम्ही त्या वाघाच्या पिंजऱ्यात अडकल्यासारखे जीव मुठीत धरुन बसलो होतो. फिरता फिरता धोंडबा कधी एखादी लाथ घालेल याचा भरवसाच नव्हता.
शेवटी शाम म्हणाला “हे बघ धोंडबा, आता चिडुन काही होणार नाही. जे झाले तो सगळा मुर्खपणा होता आमचा पण आता यावर मार्ग काढायला नको का? मी तर म्हणतो आपण आता गावात जाऊ आणि अंबुनानांना काय झाले ते सर्व सांगुयात. निदान पोवळा चोरीला गेला नाही हे त्यांच्या लक्षात येईल आणि योग्य ठिकाणी त्यांना शोध घेता येईल.”
धोंडबा एकदम उसळला “बामना तुझ्या रामाची पुजा नाय बांदायची. तो आंबुनाना तुमच्या डोक्यात पयलं लॉढनं घालीन आनी मग पवळ्याला शोदायला बाहेर पडन. तु हाय कुटं”
मी करवादुन म्हणालो “अरे मग धोंडबा करायचे काय पुढे? घातले डोक्यात लोढणे तर घालुदे. पण त्यांच्या जीवाचा घोर तर जाईल.”
धोंडबा जरा शांत होत म्हणाला “अप्पा काय टकुऱ्यावर पडलाय का तु? माझं ऐका. उद्या व्हळी हाय. उद्या दुपारपर्यंत वाट पघू. ते आंबुनानाचं जनावर हाय. कुठंतरी अडाकलं असन गव्हानीमुळं. ते घरं गाठल्याबिगार ऱ्हात नाय हे सोळा आनं खरं हाय. जर नाईच फिरला पवळा माघारी तर मंग व्हळी हुंद्या. समद्यांचे निवद झालं की राती सांगु त्याला काय खेळ करुन ठिवलाय तुमी ते. मंग काय व्हायची ती धुळवड हुंद्या एकदाची.”
आम्हाला धोंडबाचे म्हणने पटले. शकीलही जरा निवांत झाला. पण एवढ्या गंभीर प्रसंगातही शाम्याचे डोके भलतीकडेच चालले होते. तो म्हणाला “आपला हरिश्चंद्र वाध्यात येतोय तर. म्हणजे अंबुनानांच्या गोंधळावर आपले ठरणार धुलीवंदनाला गड चढायचा का नाही ते.”
“अरं शाम्या पयली अडाकल्याली मान सोडवायचं पघा जरा. तो हरिश्चंद्र बसलाय डोंगरावर. त्याचं तुमच्या वाचुन आनं तुमचं त्याच्या वाचुन काय अडत नाय. तुझ्या अशा वागन्यानं त्या चिंतुकाकाच्या छातीत कळ येईन एखांद्या दिवशी.”
शाम खजील होवून खाली बघत बसुन राहीला. मग उगाचच काहीतरी टाईमपास करत आम्ही मळ्यातच दिवस काढला आणि अंधारुन आल्यावर सगळे गावाकडे निघालो. मी शामच्या घरी न जाता परस्पर घराकडे वळालो. इन्नीपुढे जायची हिम्मत नव्हती माझ्याकडे.

सकाळी मला उगाचच टंगळमंगळ करत कामे करताना पाहुन आईला जरा आश्चर्य वाटले. तिने विचारले “अप्पा गावात नाही जात का? अरे होळी आहे ना आज? केलीय का काही तयारी?”
मी कसंबसं हसत म्हणालो “रामने दोन गाठी दिल्यात होळीसाठी. उस वगैरे धोंडबा घेऊन येईल सातच्या आसपास आणि चिंतुकाका पुजा सांगतील. तु नैवेद्य तयार ठेव.”
“बरं, आणि दत्ता येणारे का जेवायला? की काकूंकडेच जाणार आहे?” आई कामे उरकता उरकता म्हणाली.
मी म्हणालो “नाही गं. काल पडला तो झाडावरुन. फार नाही लागले पण गुडघा दुखावलाय.”
आईने माझ्याकडे लसुन सरकवत म्हटलं “तो कशाला कडमडला झाडावर? मधाचे पोळे का?”
लसुन हातावर चोळता चोळता मी म्हणालो “किती चौकशा करतेस गं? असेल त्याचे काही काम म्हणुन चढला असेल झाडावर. मी काय विचारायला नाही गेलो त्याला”
“अरे मग एवढं चिडायला काय झालं? काही उपद्व्याप करुन ठेवलाय का नवीन अप्पा? खरं सांग. सणासुदीचा घोर नको”
मी काही न बोलता समोरचा लसुन सोलत राहीलो. आज होळी असुन अंबुनानांच्या घरी पुरण शिजलं नसणार याची मला खात्री होती. मला एकदम बेचैन झाल्यासारखे वाटत होते. आयुष्यात पहिल्यांदाच अशी होळी आली होती की खरच मनगटावर चुना घालुन बोंब मारायची वेळ आमच्यावर आली होती. गोविंद्याला धडा शिकवायच्या नादात आम्हीच चांगला धडा शिकलो होतो. आजच्या इतकं अस्वस्थ आणि अपराधी मला कधीच वाटलं नव्हते. असं वाटत होतं की उगाच त्या धोंडबाचे ऐकुन गप्प राहीलो. कालच अंबुनानांना सांगायला हवे होते. त्यांनी निदान पोवळाला शोधायचा काही मार्ग काढला असता. चार शिव्यांनी काही आमच्या अंगाला भोके पडणार नव्हती. पण धोंडबालाही दोष देण्यात अर्थ नव्हता. मी विचारांच्या नादात किती लसुन सोलला ते माझ्या लक्षातच आलं नाही. इतक्यात बाहेर शकीलच्या जिपचा हॉर्न ऐकु आला. मागोमाग दार जोरात ढकलत शकील आत आला. त्याच्या अवताराकडे मी आणि आईदेखील पहात राहीली.
शकील म्हणाला “देखा अप्पा, अल्लामियाँ अपने बंदे को कभी मुश्कील में देख नही सकता। चल उठ गावात जाऊयात”
आई म्हणाली “अरे चाललय काय तुमचे? हा सकाळपासुन तोंड फुगवून बसलाय, तु उड्या काय मारत आलास. सांगा गरीब आई बापांना काही”
“कुछ नही मोठ्याई, आज होळी आहे ना म्हणुन. रात्री नैवेद्य दाखवल्यावर मी अप्पाबरोबर इकडेच येणार आहे पोळी खायला. जाताना अम्मीचा डबा नेईन” म्हणत त्याने मला ओढतच घराबाहेर काढले. मी “अरे काय झाले ते तर सांग” म्हणत असताना त्याने मला बळेच जिपमधे कोंबले. गाडी गिर्रेबाज वळवुन घेवून तो गावाकडे निघाला. निदान एका गोष्टीचा मला आनंद होता की शकील आनंदात दिसतोय म्हणजे बातमी चांगली असणार. शकीलने गाडी शामच्या घरापुढे थांबवली. शाम्या टुनकन उडी मारुनच गाडीत बसला. तोही खुशीत दिसत होता. शकीलने गाडी तशीच पुढे नेत अंबुनानांच्या घरासमोर थांबवली. तिथे अगोदरच बरीच गर्दी दिसत होती. जिप पहाताच गर्दीतुन धोंडबा, ठोब्बा, राम जिपकडे आले. मला समजेनाच काय झालंय ते. जिप पाहुन अंबुनाना घाई घाईने गाडीकडे आले. हसतमुखाने त्यांनी मला आणि शामला गाडीतुन उतरवले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. त्यांनी मला हाताला धरत जवळ जवळ खेचतच गर्दीतुन ओट्यापर्यंत नेले. मी समोर पाहीले आणि मला धक्काच बसला. ओट्यावर पोवळा उभा होता. बाजुलाच परातीत तुप कणकेचे गोळे ठेवले होते. पोवळाच्या गळ्यातल्या कासऱ्यांना अजुनही दोन्ही गव्हाणी तशाच होत्या. त्यांच्यावर बरेच गवताची, बाजरीची पाती चिकटलेली होती. दोन्ही गव्हानी चिखलाने बरबटलेल्या होत्या. अंबुनानांनी मला पोवळाशेजारी उभे केले आणि बाजुच्या परातीतला एक गोळा माझ्या हातात देत म्हणाले “अप्पा, भरव तुझ्या हाताने. दत्ताला का नाही आणले. माझ्या मागे फक्त तुमच्या दोघांच्या हातुन खातो पोवळा म्हणुन शकीलभाऊला तुला आणायला पाठवले होते.”
माझ्या डोळ्यातुन खळ्ळकन पाण्याचे दोन थेंब ओघळले. ते सुटकेच्या आनंदाचे होते पण अंबुनानांना वाटले ते पोवळासाठीच आहेत. माझ्या पाठीवर थोपटत ते म्हणाले “गप पोरा, रडु नको. आलाय ना पोवळा घरी आता? मग! भरव तुझ्या हाताने त्याला एक घास.”
मी पोवळाच्या दोन्ही शिंगाच्या मधे खाजवत त्याला कणकेचा गोळा भरवला.
डोळे पुसत अंबुनाना म्हणाले “तुला काय सांगु अप्पा, कुणा भाडखाऊने रात्रीतुन पोवळा नेला परवा. मला तपासही नाही कधी नेला ते. पण आपला पोवळा बघ, दोन दोन गव्हाणीला बांधला त्याला त्या भाड्याने पण हा गव्हाणीसकट गोठ्यातुन पळाला आणि तासाभरापुर्वी अंगणात येवून हंबरला. आता तो जो कोण बाराचा आहे ते कळुदे फक्त मग त्याला कसा दानाला लावतो ते बघच. गव्हानीवरुन आज ना उद्या कळेलच. बरं ते जावूदे. आज पोळ्या खायला माझ्याकडे यायचे सगळ्यांनी नक्की”
गर्दीत गोविंद्याही उभा होता. त्याच्या शेजारीच शाम, धोंडबा उभे होते.
धोंडबा गोविंद्याच्या कानात कुजबुजला “गोंद्या, गव्हानी तुझ्याच दिसत्यात रं. काय भानगड हाय. पारवाडीत एकसारख्या दोन गव्हानी फक्त तुह्याच गोठ्यात हायेत हे म्हायतीय मला.”
गर्दीतुन काढता पाय घेत गोविंद्या म्हणाला “हे पघ धोंडीबादादा गव्हानी माह्यावाल्याच हायती पर आईच्यान माझा कायबी संबंध नाय याच्याशी. गव्हानी गेल्या तं जाऊंदे पर तु माह्या गळ्याला तात लावू नको, लय उपकार व्हतील”
धोंडबाने शाम्याला टाळी दिली आणि म्हणाला “बामना उद्याची तयारी कर. यंघू उद्याच्याला हरिश्चंद्र. काय म्हणतो?”

त्या होळीला गावातल्या मंदिरांपेक्षा आमच्या रामाच्या मंदिरापुढली होळी सगळ्यात लहान होती पण आजवर कधी इतक्या समाधानाने होळीला आम्ही नैवेद्य दिला नव्हता जेवढा आज दिला होता. होळीत लुसलुशीत पुरणपोळी तुपाबरोबर चरचरत होती आणि त्या धुरात होळी भोवती राम, शाम, ठोब्बा, धोंडबा आणि शकीलही अत्यानंदाने बोंब ठोकत होते. मी मात्र एका मनगटाने बोंब ठोकत होतो आणि दुसऱ्या मनगटाने डोळ्यातले पाणी पुसत होतो.

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

4 Apr 2019 - 7:01 am | आनन्दा

_/\_

विजुभाऊ's picture

4 Apr 2019 - 10:20 am | विजुभाऊ

वा खूप मस्त वर्णन केलंय

मस्त ग्रामीण भागात होळी साठी क़ाय क़ाय करतात हे शिटी वाल्यानां नाही समजणाऱ्.

प्रमोद देर्देकर's picture

5 Apr 2019 - 8:54 pm | प्रमोद देर्देकर

लय भारी पण मग गव्हाणे कापले नाही का ?
आणि जरा गुगलून दाखवा ती काय वस्तू असते ती .

नावातकायआहे's picture

9 Apr 2019 - 10:20 pm | नावातकायआहे

_/\_

सिरुसेरि's picture

10 Apr 2019 - 12:40 pm | सिरुसेरि

मस्त लेखन .

लई भारी's picture

10 Apr 2019 - 3:35 pm | लई भारी

आवडलं!