दगड
----------------------------------------------------------------------------------
उजाडलं होतं, माणसांची वर्दळ सुरू झाली होती.
ती भिकारीण पडल्या जागेवर उठून बसली . तिने आजूबाजूला नजर फिरवली.तिच्याही पोटात आग पडली होती. रात्रीपासून खायला काहीच मिळालं नव्हतं
ते एक गाव होतं. लोक शेतावर निघाले होते. गुराखी गुरं घेऊन चरायला निघाले होते. कोणी दुधाचे कॅन मोटर सायकलला अडकवून डेअरीवर निघाले होते. म्हातारी माणसं पारावर बसून तंबाखू चोळत गावच्या राजकरणावर चर्चा करत होती. भाविक देवळाकडे निघाले होते. पोरं-सोरं दप्तरं अडकवून टिवल्या-बावल्या करत शाळेला निघाली होती. मोठी पोरं शायनिंग करत,वयात आलेल्या पोरीबाळींकडे पहात होती.
देवळाजवळ दोन-चार दुकानं होती. एक वडेवाल्याचं दुकान होतं. ताजा घाणा चालू होता. वडयांचा खमंग वास हवेत दरवळत होता. ढगाळ, उदासवाण्या पांढरट आकाशाच्या पार्श्वभूमीवर एक काळा डोमकावळा छपरावर बसून भजी- वडयाच्या आशेने कावकाव करत होता.
दिवस पावसाचे ; पण त्याने कुठे दडी मारलेली.
ती दुकानाजवळ आली. आशाळभूतपणे वडयाच्या टोपलीकडे पाहात उभी राहिली. दुकानदाराने तिच्याकडे पाहिलं.
ती पन्नाशीच्या आसपासची असावी. पण तिच्या परिस्थितीमुळे तिचं वय जास्तच वाटत होतं. डोक्यावर पदर होता. पण कळकट-मळकट. त्यातून काळ्या- पांढऱ्या केसांच्या झिंज्या वेडयावाकडया पसरलेल्या . सावळ्याशा कृश देहावर कळकटपणाचा लेप चढलेला . खांद्याला एक पिशवी होती. नायलॉनची. जुनी, मळ धरलेलीच. पायात साध्या प्लॅस्टिकच्या चपला. तिला मोठ्या होणाऱ्या. त्यातलाही एकीचा अंगठा तुटलेला.
“ए चल निघ हितनं.’’ दुकानदार मोठ्याने ओरडला. तेवढ्या वेळातही त्याच्या मनात आलं, ही नेहमीची दिसत नाही.
ती तिथनं हलली. दुकानदाराच्या नजरेस पडणार नाही अशा बेताने तिथेच पलीकडे उभी राहिली.
एका वेडेवाकडे केस ठेवलेल्या तरुण पोराने वडा घेतला. वडा गरम होता. त्याने त्याचा एक बारीकसा तुकडा तोडला. तरी त्याला चटका बसलाच. म्हणून त्याने वडयाकडे पाहिलं मात्र, तो आश्चर्यचकित झाला.
आतमध्ये एक भलमोठं झुरळ होतं. त्याच्या सोंडा वडया बाहेर येऊन वाऱ्यावर वरखाली हलत होत्या. क्षणभर त्यामुळे त्या पोराला झुरळ जिवंत आहे असं वाटलं, पण ते मेलेलं होतं.
‘ओऽ हे काय? काय राव - काहीही खायला घालता का तुम्ही?’तो चिरकटला .
त्याने झुरळ नेऊन दुकानदाराला दाखवलं. दुकानदार वरमला. त्या पोराच्या समाधानासाठी तो हाताखालच्या नोकरावर ओरडला.
पोराने एकदा मान झटकली व तो वडा लांब फेकला.
भिकारणीने पाहिलं. तिने थोडं थांबून तो वडा उचलला. त्याच्या वरची माती पुसली. आत मधलं झुरळ काढून फेकलं. मग तिने तो वडा वचावचा खाल्ला. तिला शिळंपाकं, गारढोण खायची सवय. तो गरमागरम वडा तिला खूप चविष्ट वाटला.
वडा खाल्ल्यावर ती पुढे असलेल्या चहाच्या गाडीवर गेली. एक माणसाने तिला चहा दयायला सांगितला. चहावाल्याने अनिच्छेने तो दिला. तरीही ती तशीच उभी राहिली. मग त्या माणसानेच काऊंटरवरचा एक पाव उचलून तिला दिला. चहा पाव खाल्ल्यावर तिला आणखी तरतरी आली.
ती तिथून निघाली. देवळाच्या बाजूबाजूने रस्ता मागे नदीकडे जात होता. चालून तिला दम लागला. ती तशीच एका वडाच्या झाडाखाली पारंबीला टेकून बसली.थोडा वेळ बसल्यावर तिला बरं वाटलं.
एक तरुण बाई देवळाकडे निघाली होती. तिच्या हातात डोक्यावर निळी मखमली कुंची चढवलेलं एक बाळ होतं. त्याची मान आईच्या खांदयावर होती. बाई पुढे गेली तसं ते बाळ तिला दिसलं. ते सावळं पण गोड बाळ बघून तिला छान वाटलं. तिने प्रेमळपणे त्याला हात दाखवला. तसं ते बाळ बोळकं पसरून हसलं. निर्व्याज! ती कोण आहे, कशी आहे याच्याशी त्या बाळाला काही घेणं नव्हतं. तिने हात दाखवला. याचाच आनंद त्याला मोठा होता.
तिला बरं वाटलं. ती तशीच बसून राहिली. तिची नजर शून्यात गेली. त्या बाळामुळे तिला तिचे जुने दिवस आठवले.
---
एका छोटयाशा गावात तिचं घर होतं. घर म्हणजे मातीचं, छोटंसं खोपटं. आई-बाप शेतमजूर, खाणारी चार तोंडं . दोन वेळा पोटभर खायला मिळायची मारामार.
ती वयात आली. तशी रसरशीत वाटू लागली. येणाऱ्या - जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरू लागली. आईबापाला लग्नाचा घोर पडला. पण पैसा?... तो कुठून आणायचा? त्यावरून नवरा बायकोची भांडणं होऊ लागली.
त्यामुळे स्वत:चं लग्न म्हणजे तिला बिलामत वाटू लागली. नको ते लग्न असं तिला वाटू लागलं.
अशात, शेजारच्या गावातलं एक स्थळ आलं. त्यांची तरी परिस्थिती काय धड होती. तेही असेच. शेतमजूर, घरात आई आणि पोरगा दोघंच . हुंडा वगैरे काही नको होतं त्या पोराला अन त्याच्या आईलाही .
गावाकडची असली, गरीब असली तरी ती एक तरुण मुलगी होती. वयात आलेली ती मोहरली. तिच्या डोळ्यांपुढे रंगीबेरंगी स्वप्न बागडू लागली. ती कधी सहजीवनाची असत, कधी संबंधांची असत, तर कधी पोराबाळांची असत. पण त्यात बाळांची जास्त. लहान बाळं तिला खूप आवडत. हवीहवीशी वाटत .
तिचं अवघं विश्वच बदललं. तिला भवताल बदलल्यासारखा वाटू लागला. नदीवर अंघोळीला जाताना लाज वाटू लागली. नजर सावध झाली. कोणी पाहत तर नाही ना याची सावधानता तिच्या अंगी आली.
तीच शेतं , तीच झाडं, पण त्यांचं डोलणं तिला वेगळं भासू लागलं . डौलदार वाटू लागलं. ज्या शेतावर तीही कामाला जायची ते तिला जणू एक राज्य वाटू लागलं. ज्याची ती राजकन्या होती. तिचं ग्रामीण सौंदर्य दिसामाजी खुलू लागलं.
लग्न लागलं .
पण हळद उतरेपर्यंत तिची स्वप्नंही झटक्यात खाली उतरली. पार जमिनीवर, त्यांनी लोळणच घेतली . पिवळ्या हळदीसारखी रसरशीत स्वप्नं पण काळवंडलीच जणू बिचारी .
तिचा नवरा हा नवरा असला तरी ‘पुरुष’ नव्हता. लग्नानंतरची पहिली रात्र होती. तो तिच्या जवळ येऊन झोपला. तसा भप्पकन गावठी दारूचा वास तिला आला. नकोनकोसा होणारा . मस्तकी तिडीक पोचवणारा . तिला तो वास नवीन नव्हता. बापही प्यायचा. पण इतक्या जवळून तिने तो वास पहिल्यांदाच घेतला होता.
नंतर तो घोरूही लागला.
तिला वाटलं, दारूमुळे झोपला असेल. पलीकडे आई असल्यामुळे बुजत असेल; पण त्यात काय एवढं? तिला कळायला लागलं तसं तिने आईबापाला पाहिलं होतंच की - तसं !
पण हे रोजच होऊ लागलं. तरीही तिला वाटलं की आज ना उदया परिस्थिती बदलेल, पण हळूहळू तिला परिस्थितीची जाणीव होऊ लागली. तरी त्या अडाणी पोरीला वाटलं, कधीतरी हे चित्र बदलेल . पण ते चित्र तसंच राहिलं- रंगहीन !
थोडया दिवसांनी तिचं दु:ख कमी झालं. नव्याचे नऊ दिवस संपले. कामामध्ये तिचं ते दु:ख बाजूला पडलं. ती एक गोष्ट सोडता बाकी ती खूष होती .कारण दिवसा नवरा तिच्याशी चांगलं वागायचा. चांगलं बोलायचा. काही बाही खायला आणायचा. गावातलं, साधंसंच. पण आठवणीने आणायचा.
असे थोडे दिवस गेले. सासूची भुणभुण सुरू झाली. नातू पाहिजे म्हणून. ती हबकलीच . पण ती बिचारी सासूला काही बोलली नाही . कसाही असला तरी तो तिचा नवरा होता. तिचं त्याच्यावर प्रेम होतं. स्वत:च, स्वत:च्या नवऱ्याची बदनामी कशी करायची ? एक तर खाष्ट सासूला ती उलट काही बोलायची नाही आणि नवऱ्याचं हे असं षंढत्व सांगायचं तरी कुठल्या तोंडानं ? सासू त्याची आई असली तरी - सांगायचं कसं ? अन मग वस्तीभर चर्चा सुरु झाली तर ? ...
पण नवरा पिसाटला. आईचं बोलणं ऐकून शेजारपाजारचे लोकही विचारायला लागले. मग त्याला वेगळाच मार्ग सापडला. तो आता जास्तच पिऊ लागला.
त्या तारेत डोकं सटकलं की तो तिला ‘वांझोटी-वांझोटी’ म्हणून मारहाण करू लागला.
ती रडत भेकत म्हणायची, ‘मी वांझोटी नाय.’
ती आधीच दु:खी होती. त्यात टोमणे आणि आता भरीला मारहाण. पण ती तेही सहन करत राहिली. यापेक्षा वेगळं ती तरी काय करू शकणार होती? तिला काही मार्ग नव्हता. माघारी जाण्याची सोय नव्हती. माहेरी अशीच परिस्थिती,त्यांचेच खायचे वांधे!
दिवस असे उदासवाणे पळत होते.
एकदा गावात मेडीकल कँप आला. स्त्रियांच्या आरोग्य तपासणीचा. गावातल्या बायका, डागतर फुकाट तपासणार म्हणून पटापटा गोळा झाल्या.
एकीने डागतर बाईला सांगितलं, “हिला प्वार होत नाय!’’ त्या तरुण पोरीने हिला पडदयामागे नेलं. तिला तपासणार तोच ही बोलली, “बाय, मला काय नाय गं. पण माझा नवराच मरद नाय!’’ तिच्या आवाजात नवऱ्याच्या खोटारडेपणाची चीड होती. संताप होता, खरेपणा होता.
ती तरुण डॉक्टर त्या खरेपणानं चपापली व गप्प बसली.
पण पडदयामागून लपून पाहणाऱ्या शेजारणीने ते ऐकलं. झालं ! बाईच्या तोंडात तीळ भिजतोय होय! हिला -तिला एक गोष्ट सांगते, पन कोनाला सांगू नगं. असं करत करत चांगलीच चर्चा साऱ्या वस्तीभर रंगली.
सासूच्या कानावर ही गोष्ट गेली ...
“ माज्या पोराला बदनाम करते रांडे!... त्याच्यावर नाव घेते. वांझोटी मेली. कूस उजवत नाय ते नाय . तिला काय सोनं लागलंय का तुला लागलंय भवाने?’’ सासू बोंबलू लागली.
त्यावर नवऱ्याने कोपऱ्यातली काठी उचलली व तिला गुरासारखं मारायला सुरुवात केली.
तिचं शरीर रक्तबंबाळ झालं.
त्याहीपेक्षा तिचं मन जास्त जखमी झालं.
जीव वाचवायला ती तिथून कशीबशी पळाली .पण नवऱ्याने तिला पुन्हा घरात घेतलंच नाही. गरीब असली तरी, घर होतं ते सुटलं, बिचारी निराधार झाली. बेघर झाली. गाव सुटलं, ती वणवण भटकू लागली. आज इथे तर उदया तिथे. ती कुठेही जाऊ लागली. दिशाहीन, अर्थहीन. पोटासाठी काही मिळवावं , खावं आणि एखादा आडोसा बघून पडून रहावं असे तिचे दिवस जाऊ लागले.
---
ती स्वप्नातून जागी व्हावी तशी भानावर आली. पाय ओढत नदीकडे चालू लागली. जणू त्या जुन्या आठवणी ती मागे टाकत होती.
ती नदीवर पोचली.आयाबाया धुणं धुत होत्या. त्यांच्या अंगावरच्या साडया , त्यांच्या बादलीतले कपडे, छान रंगीबेरंगी होते. तर तिच्या अंगावरची पांढरट साडीही आता धुरकट झालेली. एकच एक.
तिथल्या एका आगाऊ बाईने तिच्याकडे पाहिलं आणि ती उगाच खेकसली. “ए भिकारडे, चल हो पुढं!’’
त्यावर ती विझल्या नजरेने त्या बाईकडे पहात राहिली. आणखी एक दोन बायका तिच्यावर खेकसल्या. तशी ती तिथून निघाली. पाय ओढत त्यांच्यापासून लांब जात राहिली. त्यांच्या नजरेतून तिचा तो धुरकट ठिपका पार नाहीसा होईपर्यंत.
बऱ्याच वेळाने ती थांबली. ती नुसतीच बसून राहिली. नदीकाठच्या शुष्क वाळूमध्ये . तिथल्या दगड-धोंड्यासारखी ... दगड होऊन.
दगड ! ... वापरला तर एखादया इमारतीच्या कामासाठी वापरला जाणारा. नाहीतर अंत्यसंस्कार केल्यावर एखादा जीवखडा होणारा.
समोर नदीचं पाणी शांत वहात होतं. त्यामध्ये वाऱ्याने लहर येत होती. त्यामुळे पाण्यामध्ये नक्षी तयार होत होती.
मध्येच एका चमकदार निळ्या पिसांच्या खंडयाने पाण्यात सूर मारला. तो बाहेर आला तेव्हा त्याच्या चोचीमध्ये एक मासा होता.
तिला वाटलं, देवा माझ्यावर का रे असा झडप घालत नाहीस? ने बाबा, मलाही एकदाचा असाच उचलून ने.
रिकाम्या मनाने आणि रिकाम्या नजरेने ती सुन्न बसून राहिली. तिला खसखसून अंग धुवायचं होतं. पण तिला काहीच करावंसं वाटेना. काहीच !
आजूबाजूला कोणी नव्हतं.वातावरण शांत होतं. पाणी शांत होतं. आकाश शांत होतं. तीही शांत होती अन् -
ती शांतता चिरणारा एक आवाज आला.
कशाचा असावा तो आवाज ?- ती चाहूल घेऊ लागली .
तो आवाज म्हणजे एक तान्ह्या बाळाचं रडणं होतं. त्याचा ट्यँह्यॅ- ट्यँह्यॅ आवाज येत होता. ती त्या आवाजाचा कानोसा घेत त्या दिशेला चालू लागली .
---
नदीकाठाने वस्ती होती. ठिकठिकाणी वाड्या-गावं . असंच एक लांबवरचं गाव होतं. त्या वस्तीमध्ये एक जोडपं रहात होतं. त्याची बायको गरोदर राहिली. पोट खूपच मोठं दिसत होतं. तिला दोन जुळ्या मुली झाल्या. एकदम दोन मुली? - सासूचं डोकंच फिरलं, तिने सुनेचा जीवच काढला.
गावाकडची कथा. संततिनियमन वगैरे भानगडी कुठल्या? आणि दोन मुलींवर मुलगा पाहिजेच. मुलगा नाही झाला तर? तर त्या बाईचं काही खरं नाही.
ती बाई गुन्हा गरोदर राहिली आणि तिला पुन्हा मुलगी झाली... तिसरी!दारिद्य्र आणि अज्ञान पाचवीला पुजलेलं. मुलगा-मुलगी एक समान वगैरे घोषणा जाहिरातीत ऐकायलाच,चर्चा करायलाच.
बाईचं काही खरं नव्हतं. तिने मनाशी काही एक विचार केला. चारपाच दिवस जाऊ दिले.एका पहाटे, मुलीला उचलून तिने नदी गाठली. ती खूप लांब आली. तिच्या वस्तीपासून खूप लांब. ती मुलीला नदीत फेकणार होती. पण तिचं मन धजावेना. एका क्षणाला तिला वाटलं, मुलीसहित आपणही उडी मारावी. पण आधीच्या दोन मुलींचा विचार डोक्यात आल्यावर तिचं तेही धाडस होईना.
ती खाली वाळूत बसली. तिने पोरीला पाजायला घेतलं. शेवटचं ! पोरीचं पोट भरलं तशी ती प्यायची थांबली.
तिने पोरीकडे एकदा डोळे भरून पाहून घेतलं. तिचेही डोळे पाण्याने भरले. तिला उचलून ती चालू लागली. तिने मनाशी काही एक विचार केला . तिचा विचार थोडा बदलला होता.
एके ठिकाणी दाट झाडी होती. तिथं तिने गवतावर त्या पोरीला ठेवलं. ते हिरवं लुसलुशीत गवतही कोवळं होत अन ते गोड तान्हं बाळही . तिने त्या पोरीला नमस्कार केला. तिच्या डोळ्यात पाणी तरारलं.
आता पोरगी अन् तिचं नशीब! कोल्हेकुत्रे फाडून खातायत का कोण उचलून नेतंय? अनाथ आश्रमात जाते का आणि कुठं वाईट कामाला?... तिला वाटलं.
तिने मनावर दगड ठेवला.
पण मग मोठमोठयाने हुंदके देत , मागेही न बघता ती झपाझप चालत माघारी फिरली.
तिच्या बुद्धीला जे सुचलं ते तिने केलं होतं.
---
भिकारणीने त्या आवाजाचा कानोसा घेतला. ती चाहुल घेत त्या बाळाजवळ पोहोचली. तिने ते बाळ पाहिलं. बाळासारखंच मऊ असलेल्या एका गुलाबी दुपट्यामध्ये ते अर्भक काळजीपूर्वक गुंडाळलेलं होत .
एक तान्हं बाळ. एकटं. आजूबाजूला कोणी नाही.
तिच्या पोकळ आयुष्यात ती एक आश्चर्यकारक, खळबळजनक घटना होती.बाळाची आई जवळपास असायला हवी होती. तिने इकडे तिकडे पाहिलं. हाकाही मारल्या. पण कोणाची ‘ओ’ आली नाही.
भिकारीण असली तरी तिची माणसुकीवरची श्रद्धा अजून नासली नव्हती.
शेवटी वाट बघून तिने ते बाळ उचललं. बाळाला घेतल्याबरोबर ते रडायचं थांबलं. तिला आनंद झाला. खूप मोठ्ठा आनंद ! तिने असं तान्हं बाळ कधी जवळ घेतलंच नव्हतं. लग्न झाल्यावर तिला खूप वेळा असं वाटलं होतं, एखादं बाळ असावं , त्याला प्रेमाने जवळ घ्यावं , स्पर्शाव , पाजावं आणि त्या आनंदात सारी दुनिया विसरून जावं . पण ते कधी घडलंच नव्हतं. आई व्हायचं तिचं राहूनच गेलं होतं. अन् आईपणाही.
बाळच ते ! एकदम तान्हं, कोवळं; मिचमिच्या डोळ्यांनी बघणारं. बाळमुठी आवळणारं, वळवणारं; तिने बोट दिलं तर त्याने ते धरूनच ठेवलं. तिला मजा वाटली. ती भिकारीण आहे याचं बाळाला काही सोयरसुतक नव्हतं.
तिने एखादया आईच्या ममतेने त्या बाळाला जवळ घेतलं. ती त्याला निरखून पाहत राहिली. तिने त्या बाळाचे मटामटा मुके घेतले. तिला खूप खूप आनंदानं काय करावं ते सूचेचना. तिच्या सुकलेल्या हृदयात जणू आनंदाचे झरे वाहू लागले.
त्याच्या दुपट्याला त्याच्या घराच्या मायेचा वास होता; पण ती माया आत्ता कुठे हरवली होती, कोणास ठाऊक . ती तो वास नाकात भरून घेत राहिली . तेलाचा , पावडरचा , दुधाचा अन धुरीचा धुरकट असा एक संमिश्र वास त्या दुपट्या मध्ये भरुन राहिला होता .
पण ते बाळ पुन्हा रडू लागलं. तिने त्याला छातीशी धरलं, नुसतंच ! तिला कधी पान्हा फुटलाच नव्हता. तर आता तो कुठून फुटणार होता?
तिला आज स्वत:चा राग आला. तिला कसंतरीच होऊ लागलं . कसंतरीच वाटू लागलं.
तिला पान्हा फुटला नाही पण तिच्या डोळ्यांमधला अश्रूंचा बांध मात्र फुटला.
तिचे अश्रूही जणू सुकले होते. पण आज ते वाहत होते. खूप वर्षांनी - खूप वर्षांनी ती आज रडत होती.
इतक्या वर्षाच्या भिकारपणानंतरही तिचं मन दगड झालं नव्हतं.
तिचं रडणं थांबलं. पण बाळाचं रडं मात्र थांबलं नाही.
तिचं मन भीतीने थरथरलं. तिला जाणीव झाली की बाळ इथे राहीलं तर त्याच्या जीवाचं काही खरं नाही. तिला एक मात्र कळालं की या बाळाला इथे मुद्दामच सोडलंय.का अशी लोकांना मुलं नकोशी होतात? तिला वाटलं कोणी मुलं नाही म्हणून तरसतात तर कोणी मुलं नको म्हणून तडफडतात.
ती बाळाला घेऊन देवळाच्या दिशेने चालू लागली. वाळूतून, मातीतून. देवळाचा कळस बराच लांब दिसत होता.
ती ते बाळ देवळात नेऊन ठेवणार होती. तिच्या बुद्धीला जे सुचलं ते ती करणार होती.
ती चालत पहिल्या ठिकाणी पोहोचली. तिथे बायका धुणं धूत होत्या. एका बाईने तिच्याकडे पाहिलं.
“ या बया ! ही भिकारडी बाळाला कुठनं घेऊन आली?’’
त्या बरोबर सगळ्या बाया त्या भिकारणीकडे बघू लागल्या. कपडे धुताना पाण्यात होणाऱ्या खळबळीपेक्षा जास्त खळबळ त्या बायकांच्या मनामध्ये माजली होती.
पलीकडे अंघोळीसाठी कापडं काढलेला तरुण ओरडला, “ही पोरं पळवणारी बाई दिसते - असं लई चाललंया आजकाल. ते बी सगळीकडं’’
दुसऱ्या एका पोराने अजून कापडं काढलेली नव्हती. त्याने तत्परतेने खिशातून मोबाईल काढून शुटींगला सुरवात केली. तो किती स्मार्ट आहे ते दाखवायला.
एक बाई पुढे झाली. मोबाईलकडे बघत तिने त्या भिकारणीच्या एक थोबाडीत लावली.तिचा चेहरा त्या क्लिपमध्ये दिसणार होता म्हणून तिला फार मोठं काम केल्यासारखं वाटलं .
“आवो, माजं आयका, हे पोर... हे पोर...’’ भिकारीण म्हणू लागली. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ती बाई पुन्हा अंगावर आली.
तशी भिकारणीने तिची सारी शक्ती एकवटली. ती देवळाकडे पळत सुटली.
‘अरे पळाली, पळाली, धरा तिला,’ मागे एकच गलका झाला.
ती देवळापाशी पोचली तेव्हा तिला धाप लागली होती. तिच्या अंगठा तुटलेल्या चप्पलने तिचा तोल गेला. ती पडली. पण तिने बाळाला सोडलं नाही. तिने त्याला पडतानाही काही होऊ दिलं नाही. तीच अंग मात्र सडकून निघालं , सोलवटून निघालं.
शुटींग केलेल्या पोराने एव्हाना ते व्हॉटस् अॅपवर पाठवलं होतं. आपल्या देशात रिकामटेकडयांची काय कमतरता? दुसऱ्या मिनिटाला ती क्लिप व्हायरल झाली . ती पाहिलेली पोरं-माणसं देवळाकडे धावत सुटली.
कारण त्या छोट्याशा गावातली ती एक ‘ब्रेकिंग न्यूज’ होती.
भिकारीण सावरून पायरीवर बसली होती. बाळाला धरून.
लोकांनी तिला घेरलं. त्यांना त्वेष चढला होता. त्यांची सद्सद्विवेकबुद्धी गहाण पडली होती. कोणालाही खरं जाणून घेण्याची काही आवश्यकता वाटत नव्हती.
एकाने तिच्याकडचं बाळ हिसकावलं. त्याची उत्तेजित अवस्था इतकी टोकाला पोचली होती कि त्याला काय करावं सुचत नव्हतं . तो काय करतोय हेहि त्याला कळत नव्हतं . त्याला त्या गर्दीमध्ये फक्त इन्स्टंट हिरो मात्र बनायचं होतं . दुसरे थांब म्हणत असतानाही त्याने ते बाळ चक्क फेकलं. वाट्टोळं करायचं ; पण ते भिकारणीचं , हेदेखील त्या माजलेल्या मठ्ठाला समजत नव्हतं. जणू त्या बाळानेही गुन्हा केला होता.
केला होता ! खरं तर त्या पोरीने जन्म घेतला हाच मोठा गुन्हा केला होता !
पण - ते फेकलेलं बाळ एका मजुराने झेललं होतं. तो आणि त्याची बायको कामाला चालले होते. त्याच्या बायकोने पाठीला एक झोळी होती. ज्यामध्ये एक तान्हं बाळ होतं.
त्याने ते बाळ झेललं व त्याच्या बायकोकडे दिलं, ते रडत होतं.
भिकारीण जमावाला हात जोडत होती. पण जमावाला खून चढला होता. दुसऱ्या क्षणाला एकाने तिच्या डोक्यात काठी घातली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. ती प्राणांतिक भयाने किंचाळली , विचित्रशी. तिच्या त्या ओरडण्याने दगडालाही पाझर फुटला असता पण त्या जमावाचे जणू कानही बंद झाले होते.बाकीच्यांनी तिच्यावर लाथांचा वर्षाव केला. त्यांचं सामर्थ्य ते दाखवत होते. एक असहाय्य, दुबळ्या जीवाला मारून.
आज ती खूप दिवसांनी मार खात होती. आधी नवऱ्याचा मार होता. पण त्याने तिचं मन जखमी व्हायचं… आताचा मार मात्र जीवघेणा होता...
तिच्या धुरकट साडीवर नक्षी तयार झाली. लाल रंगाची. बाटीक प्रिंटसारखी. रक्ताची !
देवळाच्या पायऱ्यांवर रक्त पसरत गेलं. ओघळ मोठा होत गेला …
एका सेकंदासाठी तिने डोळे उघडून पाहिलं
त्या मजुराच्या बायकोने त्या बाळाला पदराखाली घेतलं होतं. भिकारणीच्या वाळकुडया ,सुकलेल्या देहातला आईपणाचा एक सूक्ष्म अंश समाधान पावला.
तिचा जीव घेणं हे आपलं परमकर्तव्य आहे असं समजून जमाव तिच्यावर तुटून पडला. त्या खात्या-पित्या माणसांपुढे तिचा उपासावर पोसलेला देह काय तग धरणार होता ?
आता - आकाशाचा पांढुरकेपणा काळवंडला होता .
लोकांची मनं दगड झाली होती अन आता तर त्यांच्या हातात दगड आले होते.
त्या दगडांनी त्यांचं काम सुरु झालं ... त्वेषाने !
भिकारीण अन माणुसकी - जमाव त्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी ठेचू लागला . इमाने- इतबारे !...
बाळाला प्यायला मिळाल्यावर ते शांत झालं
आणि इकडे भिकारीणही शांत झाली …कायमची.
----------------------------------------------------------------------------------
बिपीन सुरेश सांगळे
bip499@hotmail.com
प्रतिक्रिया
1 Apr 2019 - 3:28 am | शेखरमोघे
छान कथा! आवडली!!
1 Apr 2019 - 7:45 am | उगा काहितरीच
छान छान !
1 Apr 2019 - 11:22 am | सोन्या बागलाणकर
सुंदर म्हणवत नाही पण अतिशय हृदयस्पर्शी आणि वास्तवकथा!
अतिशय आवडली, असेच लिहीत राहा!
1 Apr 2019 - 11:39 am | श्वेता२४
छान असतात तुमच्या कथा. असेच लिहीत रहा.
2 Apr 2019 - 2:29 pm | भीमराव
एका कर्कश पक्षाची गोष्ट आठवली, गळ्यामध्ये काटा रूतला म्हणून वेदनेपाई त्याचं विव्हळणं लोकांना सुरेल गाणं वाटलं, तशाच या कथा. जगण्याची परवड कुणाला सुरेख वाटेल पण त्यातली वेदना मात्र जिवंत असते.
2 Apr 2019 - 5:12 pm | चिगो
समाजाच्या वांझोटेपणाचं सत्य मांडणारी कथा.. दर्जेदार.
2 Apr 2019 - 5:25 pm | गवि
उत्तम लिहिता. मिपावर ललित लेखनाची नवीन लेखकांची फळी उभी राहताना पाहून आनंद होतो.
2 Apr 2019 - 10:34 pm | सही रे सई
सुन्न करणारा शेवट..
कथा छानच जमली आहे.
3 Apr 2019 - 4:55 pm | मराठी कथालेखक
उगाच जास्त नाट्यमय न करता साधेपणानं लिहिल्यामुळे कथा जास्त परिणामकारक झाली आहे.
3 Apr 2019 - 10:13 pm | गामा पैलवान
सहमत!
-गा.पै.
4 Apr 2019 - 4:58 pm | साहेब..
कथा छानच जमली आहे.
20 Apr 2019 - 1:48 pm | बिपीन सुरेश सांगळे
आभार
सर्व वाचकांचे पुन्हा एकदा आभार