जाईजुई
रात्रीची वेळ. त्या एकांडया रस्त्यावर , भयाण शांततेत एका तान्ह्या बाळाचे रडणे ऐकू येत होते.
ऍक्टिव्हा चालवणारी जाई तो आवाज ऐकून चमकली. वेग हळू करून ती त्या आवाजाचा कानोसा घेऊ लागली. तो आवाज बराच पुढून येत होता.
शहराचा तो आय टी पार्कचा भाग होता. शनिवारची , रात्रीची वेळ असल्याने तिथे आज कमालीची शांतता होती. तिथे असलेल्या अनेक कंपन्यांच्या राक्षसांसारख्या टोलेजंग इमारतींनी अंधारात ती गजबज जणू गिळून टाकली होती. आणि ते राक्षस अस्ताव्यस्त सुस्तावून पडल्यासारखे वाटत होतं .
रस्त्यावरून एखाद- दुसरी गाडीच काय ते येत जात होती. आणि म्हणून - म्हणूनच कोणीतरी तिथे ते मूल टाकून देण्याचं धारिष्ट्य केलेलं होतं. त्या शांततेचा, त्या अंधाराचा फायदा घेऊन.
जाईचा मूड आत्ता अगदी खराब होता. तिच्या मनाचा नुसता संताप संताप होत होता. जयेशचं अन तिचं कडाक्याचं भांडण झालं होतं. तिला लवकर घरी जायचं होतं आणि बेडवर पडून मनसोक्त रडायचं होतं.
त्यात हि भानगड? ...
तिला वाटलं-जाऊ दे. असेल एखादं टाकून दिलेलं बाळ . आपल्याला काय करायचंय? नसती भानगड ! लोक त्यांची पापं उरकतात. अन वर हे आणखी पाप करतात- उकिरड्यावर फेकण्याचं !
असेल ते बाळ आईविना - आपल्यासारखं, त्याच्या आईला काही घेणं नसेल त्या बाळाशी - आपल्यासारखंच. दुर्दैवी असेल ते. ते बाळ अन त्याचं नशीब. जगेल नाहीतर मरेल...जगणारच असेल तर जगेल त्याच्या नशिबावर.
हे सारे विचार करत ती त्या आवाजाजवळ पोचली. तिने गाडी थांबवली. तिथे अंधार होता. तिथे एक बाभळीचं एकाट झाड उभं होतं. आवाज येत होता ; पण काही दिसत नव्हतं .
तिला काय करावं कळेना.
ती घाबरली - रात्रीची वेळ. ही नसती भानगड . उगा गळ्यात पडेल आपल्या. आजकाल इथे रात्रीच्यावेळी लुटण्याचेही प्रकार होतात. त्यात आपण पडलो बाईमाणूस, ती आणिकच वेगळी पंचाईत!
तिने गाडी सुरु केली व ती जाऊ लागली. ती त्या जागेपासून दूर जाऊ लागली ; पण तिचे बाळाबद्दलचे विचार मात्र दूर जाईचनात.
तिची चडफड झाली. तिला स्वतःचाच राग आला. तिचं मन तिला एकाचवेळी पुढे-मागे ओढत होतं.
तिला पुन्हा वाटलं - ते बाळ तसंच सोडलं तर त्याच्या जीवाचं काही बरंवाईट होईल. कुत्रे-बित्रे फाडून खातील. एक जीव हकनाक जाईल. अन वाचलं तरी?...अनाथ?...
ती थांबली.जयेशला फोन करावा.....पण आता या परिस्थितीत पुन्हा त्याला फोन करायचा? तो फोन घेईल?...
तिंच्या नकळत तिने फोन लावलासुद्धा.
तिच्या मनाला माहिती होतं -जयेशच !
'हॅलो '
' काय गं? विचार बदलला?' त्याचा चेष्टेचा स्वर
'ए गप,इथे एक प्रॉब्लेम झालाय.'
'होणारच ! अति घाई संकटात जाई. कळलं का जाई ?'
'आता ऐकतोस का?' ती करारी स्वरात म्हणाली व तिने त्याला परिस्थिती व ठिकाण सांगितलं .
'ओके,मी गाडी घेऊन येतो.तू तिथेच थांब.' तो म्हणाला .
ती मागे फिरली. उन्हाळ्याचे दिवस होते . रात्र असली तरी वातावरणात उष्मा होता. त्यात उत्तेजित अवस्थेनं ती घामेजली. पण मोकळा भाग असल्याने मधूनच वाऱ्याची येणारी झुळूक शीतल भासत होती. तुरळक असलेली झाडं वाऱ्यावर हालत होती. ती हालचाल त्या निर्मनुष्य ठिकाणी भयाणच वाटत होती. आजूबाजूला गवत वाऱ्यावर सळसळत होतं. सुकलेलं. अंधारात करडं भासणारं पिवळं गवत . त्या तसल्या वातावरणात त्याची सळसळ भीती वाढवणारं .
ती बाभळीच्या झाडापाशी पोचली. अंधारात तेही काळं -करडं , विचित्र आकार धारण केलेलं भासणारं . तिला उगा वाटलं - वेडी बाभळ.! माणसाने सोडलंय तरी ती बाभळ जणू बाळाचं रक्षण करतीये.
आवाज येत असला तरी बाळ दिसत नव्हतं. तिने गाडी लावली. ती झाडाजवळ गेली. तिने मोबाईलचा टॉर्च लावला. तेव्हा तिला एक खड्डा दिसला. त्यामध्ये ते बाळ होतं. एका घाणेरड्याशा फडक्यात गुंडाळलेलं. पण तोंड मात्र बाहेर.
ती पुढे झाली. मोबाईल तोंडात धरून तिने बाळ उचललं. तिचं मन थरारलं. आयुष्यात पहिल्यांदाच असं बाळ ती हातात घेत होती. तिचे हात चिकट झाले. अंधारात कळलं नाही तरी तिला ते रक्त असल्याची जाणीव झाली. त्या फडक्याला रक्त आणि गर्भपिशवीतला चिकट द्रव लागलेला होता . त्याचा विचित्र वास... तिने ते हात तिच्या नवीन गुलाबी ड्रेसलाच पुसले. मोबाईल पर्समध्ये ठेवला.
तिला तिच्या महागड्या ड्रेसची क्षणभरच काळजी वाटली. पण तो विचार बाजूला सारून , तिने ते बाळ उराशी धरलं. तिच्या मनात एकाचवेळी भीती होती, उत्तेजितता होती.
मधूनच एक गाडी गेली . त्यावेळी ती झाडाआड दडली. तिने बाळाचं इवलंसं तोंड हाताने दाबून धरलं. मनात नसताना, त्याच्या रडण्याचा आवाज दाबण्यासाठी . कोणाला बाळाचं कळलं तर उगीच त्या गोष्टीला वेगळं वळण लागू नये ,अशी तिची इच्छा होती
रात्रीची वेळ. ती एकटी . निर्जन रस्ता. हातात मूल. तेहि कोणाचं - माहित नाही. अंधारातून एखादी हडळ ते कोवळं मूल खाण्यासाठी झडप घेतीये कि काय असले भयंकर विचार मनात, येणाऱ्या जाणाऱ्या गाडया जणू हिंस्त्र श्वापदांसारख्या चाल करून येतशा भासणाऱ्या .
वेळ सरता सरत नव्हता. दहा मिनिटं युगासारखी वाटत होती.
शेवटी जयेश आला. त्याची कार घेऊन. ती रस्त्यावर येऊन उभी राहिली. तो खाली उतरला. तिची ऍक्टिव्हा लॉक करून त्याने किल्ली खिशात टाकली. बाळाला घेऊन ती कार मध्ये बसली.
'आता रे?'- तिने काळजीने विचारलं.
'डोन्ट वरी ! आपण कमलाताईंकडे चाललोय. मी त्यांना फोन केला होता'.
तिने सुटकेचा निश्वास सोडला. ती अधून मधून बोलत होती. ते ऐकत तो शांतपणे गाडी चालवत होता.
गाडीतला दिवा लावून तिने आता त्या बाळाकडे निरखून पाहिलं. लालसर गुलाबी ,नुकतंच जन्मलेलं. नाजूक , कोवळं अन मिचमिच्या डोळ्यांचं . असं बाळ ती पहिल्यांदाच पहात होती. तिला गंमत वाटत होती. आश्चर्य वाटत होतं आणि एक अनामिक थ्रिल सुद्धा. पण त्या सगळ्या भावनांच्या कल्लोळात , तिच्या मनात स्त्रियांच्या ठायी असलेलं मूळचं ममत्व जागं होत होतं.
जयेश आणि जाई एकाच आयटी कंपनीत होते. दोघे कंपनीतर्फे एका समाजसेवी संस्थेमध्ये सोशलवर्क साठी जायचे. कमलाताई तिथल्या एक उत्साही व प्रेमळ कार्यकर्त्या होत्या. वयस्कर तरीही तरतरीत.
ते कमलाताईंच्या घरी पोचले. त्या तयारच होत्या. लगेच खाली आल्या. त्यांना शांत बसणं कसं ते माहिती नव्हतं.
'काय गं,कुठे सापडलं? रडतंय म्हणजे ओके आहे.' त्या म्हणाल्या
उत्तेजित स्वरात ते तिघे बोलत राहिले. म्हणजे कमलाताईच जास्त . रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. ते लवकरच 'स्नेहमंदिरापाशी' पोचले. तो एक अनाथाश्रम होता.
कमलाताईंनी आधी तिथे बोलून ठेवलं होतं. त्यांची तिथे ओळख होती.
एक सेविका बाहेर आली. तिने जाईच्या हातातून बाळाला घेतलं. बाळ थांबून थांबून रडतच होतं.
'मुलगी आहे,' फडकं सोडत , बाळाला बाहेर काढत ती म्हणाली,' पण छान आहे हो ! '
बाळ बाहेर काढताच त्याची नाळ बाहेर लोंबली . अधर्वट ठेचलेली ती नाळ बघून जाई व जयेश दचकले. तिचं लोंबणं पाहून एखादं अशुभ लोंबल्यासारखं त्यांना वाटलं. पण उगाच .
जाईने आत्तापर्यंत हा विचारच केला नव्हता कि ते बाळ - मुलगा आहे कि मुलगी ? तिला वाटलं - या बाळाला मुलगी असल्याने सोडलंय का पापातून जन्माला आल्याने ?...
बाळाला देऊन ते तिघे निघाले.
कमलाताई सांगत होत्या , ' ही चांगली संस्था आहे. काम चांगलं आहे. पण इतर संस्थांसारखाच यांनाही पैशाचा प्रश्न भेडसावत असतोच. आपल्या देशात मोठ्या इतमामात लग्न पार पडतात, पार परदेशात जाऊनही. कोट्यवधी रुपयांची उधळण होते , त्याची सोशल मीडियावर चर्चा देखील होते .पण या अशा संस्थांना अगदी काही हजारांचीसुद्धा वानवा असते.'
त्यांचं घर आलं. निरोप घेताना त्यांनी जाईचा हात हातात घेतला, 'बाळा,आज एक चांगलं काम केलंस गं ! '
'त्यात काय एवढं ताई..., ' जाई प्रसन्न हसत म्हणाली.
त्यांना जाताना पाहून , 'मॅडम,बोला आता ?' जयेशने जाईला आज्ञाधारक पोरासारखं विचारलं .
'हो का? ' ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली .
'म्हणजे ? अहो आपण म्हणाल तसं. घरी सोडू का ? ' त्याने नम्रपणाचा आव आणला.
त्यावर ती त्याच्याकडे खट्याळपणे पहात राहिली. रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या चंद्रकोरीसारखी.
पुढचं काही सांगण्याची आवश्यकताच नव्हती.
बाळ सापडल्याचा धक्का आणि त्याला आश्रमापर्यंत पोचवल्याचं समाधान त्यामुळे जाईचा मूड पूर्णच बदलला होता. मगाच्या भांडणाच्या खुणा विरल्या होत्या.
त्यांनी वाटेत तिची गाडी घेतली. तो कार मध्ये ती गाडीवर, असे ते त्याच्या फ्लॅटवर पोचले. तो एकटाच राहायचा.
----------------------------------
ती आधी बाथरूममध्येच घुसली. अंघोळच केली तिने. गार पाण्याने . रात्रीची वेळ असली तरी उन्हाळ्यामुळे ते गार पाणीही बरंच वाटत होत तिला . चार-चार वेळा साबण फासला ,तेव्हाच तिला बरं वाटलं. दांडीवरचा त्याचाच टॉवेल तिने ओढला. टर्किशचा , केशरी रंगाचा . त्याला त्याच्या घामाचा वास येत होता. तो अनुभवत त्याने अंग पुसून तिने कपडे धुवायला टाकले.आता कपडे नव्हतेच तिला ...
मग तोच टॉवेल गुंडाळून ती तशीच बाहेर आली. ओलेत्या अंगाने, भिजल्या केसांनी, साबणाच्या वासाने घमघमत.
त्याने तिला असं यापूर्वीही पाहिलं होत,अनेकदा . मिठीमध्ये घेऊन, जवळून ,सारं अंतर मिटवून .
पण - पण आत्ताची गोष्ट और होती ... समोरचं सौंदर्य जीवघेणं होतं .
तिचं सावळं सौन्दर्य तो नजरेने पीत राहिला. तो तिच्याकडे पहातच राहिला. एकटक ! आसुसल्या नजरेने. असं आव्हान देणारं,ओलेतं, अर्धवस्त्र सौन्दर्य !....असं मादक सौन्दर्य - तेही रात्रीच्या त्या धुंद वेळी .. तिने त्याच्याकडे पाहून डोळे मोठे केले.
तर त्याचे डोळे मिटत नव्हते. त्याचे विचारही मिटत नव्हते- थोड्यावेळापूर्वीचा तो रागीट चेहरा आणि कुठे हे गोड हावभाव ! ...
त्याच्याकडे लटक्या रागाने पाहत ती चटकन बेडरूम मध्ये शिरली. तिने दार लावून घेतलं . त्याचाच एक टी शर्ट व एक ट्रॅकपॅन्ट चढवली. 'मॅड गाय' असं लिहिलेला तो ग्रे रंगाचा टी शर्ट तिला ढगळ होत होता. त्यातून जे झाकायचंय ते मजेशीर आकार धारण करून पुढे डोकवायचा प्रयत्न करत होतं...
तो आत आला व हसायलाच लागला.
'यात हसण्यासारखं काय आहे ?' तिने विचारलं, ' तुझे कपडे हसण्यासारखे आहेत होय ?'
'आरश्यात पहा - म्हणजे कळेल,कार्टून !'
ती कपाटाच्या मोठया आरशापाशी जाऊन उभी राहिली. स्वतःला पहात. ती हसली,लाजली. तिची नजर खाली झुकली.
त्यामुळे आरश्यात तिला जयेशचं जवळ येणारं देखणं , सावळं प्रतिबिम्ब दिसलंच नाही.
त्याने तिला मिठीत घेतलं.तिचे केस बाजूला सारून , मागून त्याने तिच्या मानेवर ओठ ठेवले.
'ए गप झोपायचं,ओके ? आपलं खाणं-पिणं,भांडण-बिंडण मगाशीच झालंय . उशीर झालाय...,' ती म्हणाली व बेडवर बसली.
' अच्छा .....ठीक आहे. माझा टी शर्ट दे आधी. हा मी झोपताना घालतो , मला तोच लागतो ' , तो जवळ येत म्हणाला.
'घे... नाहीतरी गरमच होतंय, तिने टी शर्ट काढला. तिचं तारुण्य अनावृत्त झालं. तोच तिने बेडशेजारचा दिवा मालवला. दोन्ही गोष्टी तिने क्षणार्धात केल्या होत्या.
त्याने तिला मिठीत घेतलं . तिचा स्पर्श स्वतःच्या देहामध्ये भिनवून घेत तो म्हणाला, ' ए,आपल्याला पोरं झाली ना तर त्यांचं असं होणार नाही.'
त्याचे ओठ ओठात घेत तिने त्याचं बोलणंच बंद करून टाकलं.
वर फुल स्पीडमध्ये फिरणारा पंखा, त्यांचे पेटलेले देह गार करायला पुरेसा नव्हता.
------------------------------------------------
स्वछंद जगावं असं जाईचा स्वभाव होता. लग्न वगैरे भानगडीत अडकूच नये अशा विचारांची ती होती. आताशा तरुण पिढीत अशा विचारांचे वारे वहात आहेतच. पण तिची चित्तरकहाणी वेगळी होती. तिचे विचार असे घडायला तिचं पूर्वायुष्य कारणीभूत होतं -
यशवंत एक भला माणूस होता.नोकरी बरी आणि आपलं कुटुंब बरं असं त्याचं वागणं होतं. तो आणि योगिनी एक सुखी जोडपं होतं. समस्या होती ती एकच. त्यांना मुलबाळ नव्हतं.
योगिनीमध्ये दोष होता. वेगवेगळ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन झाली होती. पण गुण आला नव्हता.तिला वाटत होतं , एखादं मूल दत्तक घ्यावं म्हणून. पण यशवंतला ते मान्य नव्हतं.
एकदा डॉक्टरांनी सांगितलं ,'तुम्ही आयव्हीएफ करून पहा .नवीन तंत्रज्ञान आहे , पण एक संधी घ्या. तुम्हाला तुमचं स्वतःचं मूल वाढवता येईल.
पण त्यामध्येही एक अडचण आलीच. योगिनीचं बीज गर्भधारणेसाठी सक्षम नव्हतं .त्यावर मार्ग काढण्यात आला. तो म्हणजे दुसऱ्या स्त्रीचं बीज घेण्याचा.....
यशवंत आणि ती अनामिक बीजदाती यांचं बीज एकत्र करून, वाढवून योगिनीच्या गर्भाशयात सोडण्यात आलं.
आता तिला मूल मिळणार होतं . स्वतःचं ....पण स्वतःच्या बीजाचं नसलेलं. अर्थात सगळं बाळंतपण तिनेच सोसायचं होतं. तिला खूप त्रास झाला. हे गर्भारपण म्हणजे तिच्या शरीरासाठी एक 'फॉरीन बॉडी 'होती. शरीराला ते स्वीकारायला खूप जड गेलं. तिची तब्येत खालावली. तिला खूप त्रास झाला. पूर्ण बाळंतपण तिने त्रासात काढलं.
यथावकाश जाईचा जन्म झाला. अवघडलेली योगिनी मोकळी झाली. यशवंत समाधान पावला. त्याला मूल असण्याची खूप असोशी होती. त्याच समाधान पाहुन योगिनी सुखावली .
सावळीच पण गोड चेहऱ्याची , गालावर खळी पडणारी जाई दिसामासी वाढू लागली.तिला जोजवण्यात,तिला पाहण्यात अन पाजण्यात योगिनी हरखून जाऊ लागली.
पण थोडे दिवस!......
जशी जाई मोठी होऊ लागली तसं यशवंतचं वागणं बदललं. तो तिच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होऊ लागला. त्याच्यावरून त्याचं आणि योगिनीचं भांडण होऊ लागलं.
त्याच्या डोक्याने विचित्रच खूळ घेतलं. त्याला वाटायचं -जाई फक्त त्याचीच आहे. त्याचं बीज होतं ना. त्यात योगिनीचं काय ?...ती तिची मुलगी नाहीच.त्यावरून तो योगिनीशी भांडू लागला.
ती मात्र दोघांकडेही लक्ष दयायची . जाईला तिचा लळा होता व तिला जाईचा. जाईला बाबांच्या रागवण्याचा अर्थ कळायचा नाही.
यशवंत योगिनीकडे दुर्लक्ष करू लागला. त्याचा अविचार पराकोटीला जाऊ लागला - जी मूल जन्माला घालू शकत नाही, तिच्याशी काय रत व्हायचं?...अशा चुकीच्या विचारांनी तो तिच्या जवळ जाणंही टाळू लागला. शेवटी तीही तरुण होती. तिचीही काही गरज होती. शारिरीक आणि मानसिक. पण नवऱ्याच्या वागण्याने तिला मानसिक त्रास होऊ लागला. तरीही ती ते जाईच्या प्रेमापोटी सहन करत राहिली....असह्य होऊनसुद्धा .
यशवंत पैसा राखून होता. त्याचे दोन फ्लॅट्स होते. दुसऱ्या फ्लॅटसाठी गिऱ्हाईक बघताना राघव हा इस्टेट एजन्ट मध्ये आला. बुटकासा , गोरा पण टकलू . तो बेरकी पण गोडबोल्या होता. त्याने योगिनीला हेरलं . तिच्या दुःखाचं कारण जाणलं. हळू हळू ती त्याच्या पाशात सापडली.
एके दिवशी तिचं आणि नवऱ्याचं कडाक्याचं भांडण झालं. तिने तिचं सामान उचललं आणि घर सोडलं. जाई तिला चिकटून-बिलगून , धाय मोकलून रडत असतानाही. 'आई,नको ना जाऊस', म्हणत असतानाही. फक्त तुझी मुलगी आहे तर ठेव तुलाच , असा काहीसा रागीट विचार योगिनीच्या डोक्यात होता .
तिच्याही डोळ्यात पाणी होतंच की. तिने जाईला जवळ घेऊन तिचे डोळे पुसले. त्या क्षणाला तिला तेवढंच करता येण्यासारखं होतं. पण त्या बालजीवाच्या मनावर असा सरसरीत ओरखडा उमटला कि तो परत पुसलाच गेला नाही. आई -बाबा दोघांचंही आपल्यावर खूप प्रेम आहे हे माहित असूनही. त्यावेळी ती पाच - सहा वर्षांची होती .
ह्या एका असल्या सणकीत , ती राघवकडे जाऊन धडकली. त्याला तिचं येणं सुखावह वाटलं. तिची सोय करणं त्याला अवघड नव्हतंच.
------------------------------------
जाईवर यशवंतचं खूप प्रेम होतं,यात शंकाच नव्हती. पण त्याची घर आणि नोकरी सांभाळता सांभाळता तारांबळ होऊ लागली. त्यात जाई लहान होती. आईविना पोर...
ती आईच्या आठवणीने रडायची. त्या गरीब जीवाला वाटायचं कि आई आज ना उद्या परत येईल. पण नाही. ती तिच्या आठवणीने रडायला लागली कि यशवंत रागवायचा,' रडू नको. बरं झालं ती अवदसा टळलीये 'असं काही काही म्हणायचा.तिचं हे कळण्याचं खरं तर वयच नव्हतं.
शेवटी यशवंतचा धाकटा भाऊ म्हणाला,'दादा, अरे मी घेऊन जातो जाईला माझ्याकडे. मला एकच तर मुलगा आहे. ही आणि एक मुलगी. माझ्या मुलीसारखीच.'
ती काकाच्या घरी गेली. काका प्रेमळ होता.पण काकूने तिला अनिच्छेनेच स्वीकारलं. ती स्वतःचा मुलगा आणि जाई ,दोघांमध्ये नेहमीच भेदभाव करत असे.
जाई जशी मोठी होत गेली तशी तिला प्रेमाला पारखं होण्याची सवय होत गेली. काकाचा जीव होता तिच्यावर ,पण त्याचं बायकोपुढे चालत नसे.
-----------------------------------------------------------------
राघवचं योगिनीवर प्रेम होतं.जरी त्याचे धंदे वेगळे असले तरी.
तो एक इस्टेट एजन्ट असला तरी त्याचा तेवढाच उद्योग नव्हता. तो अन्याभाई नावाच्या एका नामचीन गुंडाचा महत्वाचा माणूस होता. तो प्रत्यक्ष गुन्ह्यात कधीही सहभागी होतं नसला तरी टोळीचे पैसे सांभाळणे,ते जिरवणे,आत गेलेल्या पोरांना जामीन मिळवून देणे,त्यांना लागेल ती मदत करणे अशा एक ना दोन अनेक गोष्टी तो पार पाडत असे .
अन्याभाई बऱ्याचदा भूमिगत असे. त्याला शत्रूंची कमतरता नव्हती. बऱ्याच जणांना तर तो या जगात नकोच होता. पण तो हुशार होता. तो त्यांच्या हाताला काही लागत नसे.
शेवटी प्रतिस्पर्धी टोळीने त्याचा ब्रेन असलेल्या राघवलाच एके दिवशी उडवलं . कोसळत्या पावसात .
लग्न झालेलं नसलं तरी योगिनी विधवा झाली. तिच्यावरही आभाळच कोसळलं जणू !
आणि खरंच विधवा झाली ! .......
त्याच आसपास यशवंतही एकाएकी गेला.
त्यानंतर योगिनी कुठे गेली ते कळलंच नाही.
-----------------------------------------------------------
वडील गेल्याचं कळलं तेव्हा जाईला खऱ्या अर्थाने पोरकं झाल्यासारखं वाटलं .
आईने नाकारलेलं- तिचा पत्ता नाही आणि वडील गेलेले. त्यात काकू जणू सावत्र आई होती. पण जाईने ती सगळी परिस्थिती मूकपणे सहन केली. ती जिद्दी होती. त्याच्या जोरावर तिने शिक्षण पूर्ण केलं. यशवंतचा पैसा असल्यामुळे काकू त्या बाबतीत काही बोलू शकत नव्हती.
ती आयटी इंजिनिअर झाली. नोकरीला लागली. त्या बरोबर तिने काकाचं घर सोडलं. ती तिच्या आधीच्या घरी राहायला गेली .
काकालाच काय ते वाईट वाटलं .त्याचं जाईवर मुलीसारखंच प्रेम होतं. त्याचं प्रेम हाच काय तो जाईसाठी एक मायेचा आधार होता. नाहीतर ती कोलमडून पडली असती.
काकूने तिला थंडपणे परवानगी देऊन टाकली. चुलत भावाचा प्रश्न नव्हताच. त्याच्यासाठी जाई म्हणजे कायमच एक परकी मुलगी , वाटेकरी होती.त्या मायलेकांना बरंच वाटलं. जणू एक ब्याद टळल्यासारखं.
जाईची कंपनीमध्ये जयेशशी ओळख झाली. दोघांचं छान जमलं.घट्ट. ते एकत्र फिरत अन 'एकत्रही' येत.
पण एक गोष्ट निश्चित होती. तिचा लग्नाचा वगैरे विचार नव्हता. तिचा लग्न, कुटुंब संस्था या गोष्टीवरचा विश्वास उडालेला होता.
त्या दोघांचे अधून मधून खटके उडत, ते याच गोष्टीवरून.
जयेश गावाकडचा पोरगा होता. टॉल , डार्क अन हँडसम . शेतीवाडी असलेला, खटल्याच्या घरातला. गावात त्यांच्या घराला मान होता. एक काका राजकारणात , एक मुख्याधापक तर स्वत: वडील प्रगतिशील शेतकरी होते .
त्याची गावाकडची नाळ तुटलेली नव्हती.त्यांच्या घरातला एवढा शिकलेला तो पहिलाच पोरगा होता. तो शिकला आईमुळे. त्याची आई म्हणायची ,सगळ्यांचंच शेतीमध्ये काय काम ? जग बदलतंय. ह्या बदलत्या जगात तुझ्या रूपाने आपलं घर डोकवेल. ती अडाणी असली तरी नव्या आणि मोकळ्या विचारांची होती .
त्याच्या घरामध्ये मोठा बारदाना होता.भरपूर लहान मुलं होती.त्याला मुलं आवडत.तोही त्यांचा लाडका काका होताच.
त्यामुळे तो पारंपरिक पद्धतीने विचार करणारा होता.त्याचा कुटुंबसंस्थेवर विश्वास होता.त्याच्याही घरात वादविवाद होत. नाही असं नाही.पण अडीअडचणीच्यावेळी सारं कुटुंब एकत्र असतं ,हे त्याला माहिती होतं .त्याचे एक काका अकाली निवर्तले होते. पण त्यांच्यामागे त्यांच्या बायकापोरांचं कुठल्या गोष्टीसाठी अडलं नव्हतं .उलट त्यांना जास्त झुकतं माप दिलं जायचं.
तर जाईला आता मुलंबाळं ,लग्न ,संसार यांचं काहीच महत्व नव्हतं. आकर्षण नव्हतं. तिच्या लेखी,या गोष्टी म्हणजे तद्दन मूर्खपणाच होता. तिने आईवडिलांचा संसार मोडताना पहिला होता. ती फक्त आपली मुलगी आहे-- हे वडिलांचं म्हणणं चुकीचं आहे, हे तिला आता या वयात कळत होतं. आई एका परपुरुषाकडे गेली. तिथून ती गायब झाली. काकाच्या घरी आपण आश्रितासारखे वाढलो या गोष्टी तिच्या मनाला जाचत असत.वरकरणी ती कितीही जॉली आहे असं दाखवत असली तरी.
त्यामुळे आला दिवस आनंदात घालवायचा, खाओ पीओ मजा करो असं तिचं जगायचं तत्व होतं. त्यामुळेच ती मजेत जगत होती. ऐश करत होती. जयेशबरोबर हिंडत होती. सुखं भोगत होती.....सगळीच !
एकदा तिने विचारलं, ' तू एवढ्या मोठ्या बाता मारतोस रे संस्कृतीच्या अन संस्कारांच्या .....हो ना ? मग आपण लग्नावाचून एकत्र येतो हे तुझ्या संस्कारात बसतंय होय?'
त्यावर तो अवाकच झाला. आधी निरुत्तरच झाला तो !
' खरंय तुझं म्हणणं. तसं पाहिलं तर अगदीच चूक आहे....पण तारुण्य ?....त्याच्यावर फक्त निसर्गाचे संस्कार असतात. आणि आपण ना एका विचित्र काळात अडकलो आहोत. नवं जग आपल्याला खुणावतंय . पण त्याचवेळी आपला पाय मागच्या गोष्टींच्या गुंत्यात अडकलेला आहे. आपण तो पाय सोडवू शकत नाही- इझिली . तुला जमतंय ते, पण माझ्यासाठी तर जाम अवघड आहे. माझ्या घरी असलं काही चालत नाही खरं तर . त्यांना कळलं ना तर धक्काच बसेल. सगळ्यात आधी माझी आई उखळात घालून दणादणा कुटल मला !
त्याच्या त्या वाक्यावर तिला जाम हसू लोटलं.
तिच्या डोळ्यांसमोर उखळात बसलेला, उघडा -वागडा , केविलवाणा जयेश आला.
------------------------------------------------------------
सकाळ झाली. उन्हं पसरली. तशी पसरलेले ते दोघे जागे झाले. एकमेकांच्या मिठीत झोपल्याने आता चांगलंच उकडायला लागलं होतं. तिच्या अंगावर तोच ग्रे टी शर्ट होता. त्याचाही वरचा देह उघडाच होता. त्याचं भरलेलं सावळं शरीर आकर्षक भासत होतं.
पण आता या क्षणाला तिच्या डोक्यात काल रात्री सापडलेल्या त्या बाळाचेच विचार होते .
ते बाजूला करत , लाडाने तिने हाक मारली, 'जयू '-
'ए ,काय गं ? ' तो डोळेही न उघडता म्हणाला.
'ए,उठ ना. चहा कर ना.'
'मलाही हवाय. तूच कर ' तो आळोखे पिळोखे देत म्हणाला.
'नाही, मला तुझ्या हातचा चहा हवा. मला आवडतो.'
' अस्सं ? ओके. पण एका अटीवर. माझ्याशी न भांडता एका विषयावर बोलायचं.'
'ओके.'
जाई विचार करू लागली. तिला त्याचा विषय माहिती होता . काल याच विषयावर तर भांडण झालं होतं. त्याने कालही लग्नाचा विषय काढला होता. त्यावर ती नेहमीप्रमाणे नाही म्हणाली होती .त्यावर तो चिडून म्हणाला होता, ' ठीक आहे.मग इथून पुढे आपापले रस्ते स्वतंत्र.! ...पुन्हा कधी एकमेकांच्या आयुष्यात यायचं नाही. असं तो यापूर्वी कधी म्हणाला नव्हता.
आलं घातलेल्या चहाचा मस्त उकळी फुटल्याचा वास आला.
तो दोन मग भरून चहा घेऊन आला. गरमागरम चहाचा घोट घोट आस्वाद घेत ते बोलू लागले.
'असाच तुझ्या हातचा गरमागरम चहा कायम घ्यायला मिळावा, ' ती म्हणाली.
'मिळेल की ,पण त्यासाठी माझी बायको व्हावं लागेल.'
ती हसली खुद्कन. ' फक्त चहासाठी मी तुझी बायको होऊ ? '
'नाही गं राणी. सगळ्या सगळ्यासाठी!...'
' हं ...'
'ए, ऐक ना. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर '
'हो ?....माझं पण आहे म्हणलं,'
'तसं नाही. पण मला लग्न करायचंय तुझ्याशी, संसार थाटायचाय.'
'आपण एकत्र असतो. एकत्र येतो. पुरे आहे ना. त्यासाठी लग्नच कशासाठी? किती वेळा तेच तेच.'
'असंच राहिलो ना तर गावाकडचे लोक म्हणतील याने ठेवलीये हिला. अन आमच्या अख्ख्या खानदानात अजून तरी कोणी कधी बाई ठेवली नाहीये.'
'मला ठेवलीये? ' ती गरजली .
' बघ - ठेवलीये असं नुसतं म्हणल्यावर एवढा राग येतो . मनाला कुठेतरी खटकतं ना .....कळलं ? म्हणून तर गपगुमान लग्न करायचं . अन, आपल्या पिढीचा एक वेगळाच घोळ आहे. मी नेहमी म्हणतो,कि आपण संक्रमणाच्या काळात जगतो आहोत. धड पुढचं पूर्ण नवं जग आपण आपलंसं केलेलं नाही अन धड मागचंही सोडवत नाही . मध्येच कुठेतरी लटकल्यासारखं जिणं झालंय गाभडं ! ' त्याचा आवाज मध्येच वर चढला .
'ए,तुझे ते गावाकडचे घाणेरडे शब्द कोंबून बोलायचं बंद कर.'
'ओके, सॉरी. पण तेच ना - धड इकडे ना धड तिकडे.'
'ए ते तुझं हां. माझं नाही.'
' नाही कसं? तू स्वतःला आधुनिक समजतेस. मग चतुर्थीला गणपतीच्या दर्शनाला जातेसच ना .दिवाळीला सण म्हणून नवीन कपडे घालतेसच ना . इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत गं आपल्या आयुष्यातल्या , संस्कारांच्या . त्या पुसल्या जात नाहीत . अन का पुसल्या जाव्यात ? सांग ना . '
'ए,ती वेगळी गोष्ट आहे.'
'मला नाही वाटत. मी तेच म्हणतोय की आपण आपले संस्कार सोडून देत नाही. आपण पुढच्या - मागच्या गुंत्यात अडकलेलोच आहोत. हा आपल्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. माझ्या गावाकडच्या लोकांना हे प्रश्न साले पडत नाहीत. पण त्यांच्या पुढच्या पिढीला, माझ्यासारख्या मुलांना मात्र या गुंत्यातून सुटका नाही.'
'बरं, तुझं म्हणणं काय शेवटी? '
तो चाचरत म्हणाला, तिचा अंदाज घेत, 'आता ठेवलेली म्हणण्यापेक्षा.....रीतसर घरधनीणच हो ना.'
घरधनीण शब्दावर ती हसली व म्हणाली, '' ए , घरधनीण म्हणजे अंगण बिंगंण शेणाने सारवु काय हां - गावाला जाऊन ? ' मग गंभीर होऊन ती म्हणाली ,' तुझ्या आईला चालेल ? मी सून म्हणून ?'
'का नाही चालणार? माझी पसंती म्हणल्यावर ती काय माझं तंगडं मागं ओढंल होय ? '
'गुड ! मग तुमच्या गावात मुलगी दाखवण्याचा मोठा सोहळाच असतो, नाही?'
'असतो की .'
'मग तुझ्या आईला जर सांगितलं कि मुलगी दाखवायची गरज नाही. मुलीने आधीच सगळं दाखवलेलं आहे ! तर ?...
त्यावर त्याने डोक्याला हात लावला. तो गप्प झाला. मग हसतच सुटला. मग विचारात पडला .
'हं ?... तरी चालंल. जिच्याशी भानगड केली तिच्याशीच निभावतोय म्हणल्यावर आई मला तडातडा बोलंल, फडाफडा मारंल,पण मान्य करंल , '
'तू सारखं आई आई काय करतोस रे?'
'का नाही करणार? आई आहे ती शेवटी. तुला काही वाटत नाही, ती गोष्ट वेगळी.'
'नाही वाटत. आणि का वाटावं? माझ्या लहानपणी माझ्यावर पांघरायची माया ती लाथाडून गेली. तिच्या विषयी मला का वाटावं ? '
'पण लहानपणी ती काय तुझा दुस्वास करत होती का ? नाही ना ? मग? अगं ,उद्या माझ्या आईने तुला पोटच्या मुलीसारखी माया केली, तर तुला नको वाटंल का?
आई नावाची एक दुखरी पण हवीशी वाटणारी नस तिच्या मनात ठसठसली. जाईच्या डोळ्यात पाणी टपटपलं .त्याने पुढे होऊन ते पाणी पुसलं. तिला जवळ घेतलं .
'अगं, एखादीच आई खरी वैरीण असते. कालच्या त्या बाळाला सोडलेल्या हडळीसारखी .' तो म्हणाला.
' तिचाही काही प्रॉब्लेम असेल... कदाचित तिलाही बाळाला सोडताना दुःख झालं असेल !.....' ती म्हणाली .
दोघेही काही न बोलता गप्प बसून राहिले.
थोड्या वेळाने तीच म्हणाली, ' ए, कालचं ते बाळ आता कसं असेल रे ? '
'मजेत असेल.'
'काहीही बोलतोस? ' ती उसळली,' कसं काय? '
' पाहायला जाऊ या? आत्ता? '
' हो, ' तिचे डोळे आनंदाने लकाकले .
तिच्या डोळ्यांमधला स्त्रीपणाच्या त्या नव्या खुणा तो न्याहाळातच राहिला.
------------------------------------------------------
दोघेही उत्कंठित अवस्थेत होते . तो गाडीमधला एसी लावायचा विसरला होता ; तरीही दोघांना त्याचं काही वाटत नव्हतं .
गाडीमधून पोचताना त्यांनी ठरवलं होतं. स्नेहमंदिराला चांगलीशी आर्थिक मदत करायची.
तिथे पोहचताच प्रेमळ चेहऱ्याच्या , भारदस्त संचालिका बाईंनी त्यांचं स्वागत केलं. रात्रीच्या त्या सेविका आता दिसत नव्हत्या. अर्थातच,त्यांची सुट्टी झालेली .
मॅडम म्हणाल्या, 'नमस्कार. तुम्ही काल खूप चांगलं काम केलंत. नाव काय आपलं? '
'हा जयेश आणि मी जाई .' जाई म्हणाली .
त्यावर आतून कोणीतरी डोकवुन बाहेर पाहिलं.
'मॅडम,ते बाळ कसं आहे हो ? ' जाईने उत्सुकतेने विचारलं .
' आता ठीक आहे '.
' पण त्याच्या दुधाची व्यवस्था?'
'होते व्यवस्था .काही आया असतात ,ज्या रक्ताच्या नसल्या तरी पोटच्या गोळ्यासारखं पाजतात अशा दुर्दैवी बाळांना.'
दोघेही विचारात पडले.
त्यावर त्या म्हणाल्या, ' वेळप्रसंगी प्राणी दुसऱ्यांच्या पिल्लांना पाजतात. मग आपण तर माणसं आहोत. होते फिडींगची व्यवस्था. आणि आमच्या इथल्या सेविका खूप चांगल्या आहेत. खूप माया करतात मुलांवर. मुलांना त्यांचा लळा असतो.
एक सेविका ते बाळ घेऊन बाहेर आली . बाळ आता पिणं झाल्याने ,अंघोळ झाल्याने अगदी शांत झोपलं होतं . आकाशी रंगाच्या एका नव्या मऊशार दुपट्यात . जाईला ते पाहून आनंद झाला . काल रात्रीची अन आजची परिस्थिती , किती फरक आहे , तिच्या मनाला वाटलं .
मग त्या आत पाहून म्हणाल्या, ' ताई चहा आणताय ना? '
आतून आवाज आला, 'हो.'
पाच मिनिटांनी चहा घेऊन त्या ताई बाहेर आल्या. ज्यांनी आधी डोकावून बाहेर पाहिलं होतं .
जाई त्या ताईंकडे पहात राहिली. वयापेक्षा जास्त वयस्कर वाटणारा चेहरा. वेडेवाकडे, पांढरे झालेले केस. पण तो मूळचा चेहरा?....
जाई उभी राहिली, 'आई..? ' तिच्या स्वरात शंका होती, आश्चर्य होतं अन दुःखही.
आणि रडवेल्या स्वरात त्या ताईंनी हाक मारली 'जाई ? '...
जाई क्षणभर थांबली . तिचं मन मागेपुढे हेलकावत राहिलं - पण क्षणभरच . पुढच्याच क्षणाला ती आईच्या कुशीत शिरली. दोघी रडत राहिल्या , मन मोकळं करत राहिल्या .
जाई रडत म्हणाली, ' आई, ते बाळ अनाथ आहे.पण मी?... मी नाही ना ? '
'नाही गं पोरी नाही '.
मॅडम आणि जयेश आश्चर्याने पाहतच राहिले होते. आधी त्यांना काही संदर्भच लागत नव्हता .
'मग मला का सोडून गेलीस, मी तुझी नाही म्हणून?'
'तू माझी नाहीस ? , अगं, मीच तर तुला माझ्या पोटात वाढवलंय ना. तूच तर तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके ऐकले आहेत ना? अगं मीच तुला पाजलंय आणि अंगाखांद्यावर खेळवलंय.'
दोघीही रडत राहिल्या.तो दिवस वेगळाच होता त्यांच्यासाठी.
कडक उन्हाळ्यातही शीतल भासणारा .
--------------------------------------------------------------------
' मला लग्न करायचंय. अन मला मुलंही हवी आहेत. मी त्यांना बापाचं प्रेम भरभरून देईन. पण तू हि आईचं प्रेम देशील ना ? ' जयेशने जाईला विचारलं.
त्यावर जाई हसतच सुटली.
'ओके बाबा,मी तयार आहे लग्नाला.पण पोरं-ती नकोच.'
'का ? तुझं तर ना एक नाटक संपलं कि दुसरं चालू होतंय.'
'बरोबर ! पुरुषांना ना काय कळतच नाय. ! '
'काय गं ? '
'अरे,तुला कळत कसं नाही 'मॅड गाय'! आपण इतक्यांदा एकत्र आलो. कित्येकदा कुठलीही काळजी न घेता. कधी काही गडबड झाली?....सुरवातीला तुला वाटलं.तू विचारलंस तेव्हा मलाही वाटलं-पण नंतर कळलं कि असं काही होणारच नाहीये. माझ्यातही दोष असावा.'
त्यावर तो खजील झाला.स्वतःच्या डोक्यात त्याने एक टप्पू मारून घेतला .
'हं !.......मग आपण आयव्हीफ करून घेऊ या,' तो म्हणाला.
त्यावर ती उसळून म्हणाली , 'काही गरज नाही ! '
-----------------------------------------------------
जयेश आणि जाईचं लग्न झालं. अगदी रीतसर. गावाकडे .पार दारात मांडव बिंडव घालून.धुमधडाक्यात . कुडकुडत्या थंडीत .
जयेशच्या घरातल्या मंडळींचा आधी विरोध होता. पण त्याची आई खंबीरपणे ह्यांच्या पाठीशी उभी राहिली.त्याच्या वडिलांनीही पाठिंबा दिला . विरोध करणाऱ्या भावकीतल्या लोकांना , भावांना त्यांनी सांगितलं - पारंपरिक वाणापेक्षा वेगळं ,सुधारित वाण लावतोच ना आपण . कशासाठी ? हेदेखील तसंच समजा आपली पोरं कधी हुशार होणार ? शिकणार ? आणि परदेशातही नाव कमावणार ?
योगिनीताई येऊन-जाऊन रहाते म्हणाल्या होत्या. पण जयेश आणि जाईने त्यांच्यावर प्रेमाची जबरदस्तीच केली. त्या ह्या दोघांकडे राहायला आल्या.
जयेशच्या घरी तर ह्या गोष्टीवरून गहजबच झाला . त्यांना हे असलं काही मान्य नव्हतं. हे अति होतंय , असं त्यांचं म्हणणं होतं .त्यांनी जयेशबरोबर संबंधच तोडले . पण जाईचं आणि तिच्या आईचंही आधीचं आयुष्य लक्षात घेऊन त्यांनी समजावून घेतलं . मग सारं काही सुरळीत झालं .
अर्थात, या वेळीदेखील जयेशच्या आईने मुख्य भूमिका पार पडली होती . त्यांना जाईच्या आईच्या गतायुष्याबद्दल कणव वाटली होती . एक स्त्री या नात्याने त्यांनी त्यांचं दुःख जाणलं होतं. ते थोडं तरी दूर करणं हे त्यांना त्यांचं कर्तव्यच वाटलं होतं .
पुढे बऱ्याच कालांतराने , त्यांनी त्या अनाथ बाळाला दत्तक घेतलं. त्या मुलीचं नाव जुई ठेवण्यात आलं होतं. जाईने आणलं म्हणून.
संध्याकाळी योगिनीताई देवापाशी दिवा-उदबत्ती लावतात. कधी मायलेकींची दृष्ट काढतात आणि म्हणतात, ' माझ्या जाई-जुई गं. देवा,आता ह्यांना कोणाची नजर लागू देऊ नकोस रे बाबा . उदबत्तीचा सुवास जसा पसरतो तसं सुख ह्या घरभर पसरू दे '
पुढे जाई गरोदर राहिली. तिच्या मध्ये काही दोष नव्हता. योगायोगाने आधी तसं झालं होत खरं , की ती 'राहिली ' नव्हती . आपण कधीच राहणार नाही असं तिला वाटत होत ,एवढंच.
स्वतःच्या मुलीचं बाळ , दुसरं नातवंड पाहायला योगिनीताई खूप उत्सुक आहेत.
त्या तिची बाळंतपणाची सारी उस्तवार करतात तेव्हा जाईच्या डोळ्यात क्षणोक्षणी पाणी उभं राहतं. तिला आईची माया जाणवते . तिने कसं आयुष्य काढलं असेल याचा ती विचार करत राहते .
ती पोटावरून हात फिरवत राहते . जुई असतेच तिच्या जवळ , गळ्यात हात घालून , आईच्या पोटाला हात लावत , बाळाबद्दल प्रश्न विचारत .जुईला बाळ कधी होणार आहे याची जाम घाई झालेली आहे . ते तिच्याबरोबर कधी मस्ती करणार याची ती वाट पाहतीये !
तेव्हा तिला वाटतं - बाळा , तुला आई- बाबा , आजी आणि ताई , सासरचं अख्खं खानदान - साऱ्या साऱ्यांचीच माया मिळणार आहे. तू कधीही एकटा पडणार नाहीस रे ... माझ्यासारखा .
या तिघी कायम एकत्र पाहून जयेश लाडाने कुरकुरतो , ' जाई , जुई अन आई , तुम्हा तीन बायकांच्या राज्यात आता मीच अनाथ झालोय ! '
तेव्हा जाई म्हणते ,' आता मुलगाच होईल बघ मला, अन येईल तुझ्या जोडीला !'
त्यावर चिमुकली जुई म्हणते,' नाही माझ्या जोडीला !'
तिचं बोलणं ऐकून मग सारे मजेने हसू लागतात .
त्यावर ती चिमुरडी रुसते अन गाल फुगवून फुरंगटून बसते .
---------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे,
प्रतिक्रिया
20 Mar 2019 - 10:23 am | नेत्रेश
छान कथा !
20 Mar 2019 - 12:37 pm | पद्मावति
मस्तंच.
20 Mar 2019 - 12:42 pm | यशोधरा
आवडली कथा. बरेच दिवसांनी मिपावर कथा आली.
20 Mar 2019 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर कथा.
21 Mar 2019 - 12:47 pm | बिपीन सुरेश सांगळे
नेत्रेश
पद्मावती
यशोधरा
डॉ . म्हात्रे
आपला आभारी आहे
21 Mar 2019 - 12:49 pm | बिपीन सुरेश सांगळे
यशोधरा -
आवडली कथा. बरेच दिवसांनी मिपावर कथा आली.
आभारी आहे .
पण मिपावर कथा कमी असतात का ?
आणि का??
21 Mar 2019 - 4:41 pm | यशोधरा
असंच काही नाही. मिपावर उत्तम कथा येऊन गेल्या आहेत.
उदाहरणार्थ, सद्ध्या मुख्य पानावर असलेली काटेकोरांटी वाचा.
व्यक्ती तितक्या प्रकृती, तसं लेखनाचं आहे. कथाही आहेत, शोधा, वाचा. खूप जणांचं उत्तम लेखन मिपावर आहे. शोधणाऱ्याला सापडून जातं.
21 Mar 2019 - 1:43 pm | मराठी कथालेखक
कथानक चांगलं आहे. शृंगारिक वर्णनामुळे मजा आली.
पण शेवटच्या काही वाक्यात क्रियापदे वर्तमानकालीन का झालीत ? हे खड्यासारखं खटंकलं.. तितकं टाळा बरे..
23 Mar 2019 - 8:56 am | बिपीन सुरेश सांगळे
कथालेखक
आभार .
आणि क्षमस्व .
शृंगारिक वर्णनामुळे मजा आली.
पण असं का ? जरा विस्तृत पणे सांगाल .
.
पण शेवटच्या काही वाक्यात क्रियापदे वर्तमानकालीन का झालीत ? -
गोष्ट भूतकाळातून वर्तमानकाळात आली आहे . असे मला दर्शवायचे आहे .
24 Mar 2019 - 4:11 pm | मराठी कथालेखक
अहो एकंदर कथानक चांगलंच आहे..पण शृंगारिक वर्णनामुळे थोडा वेगळा रसबदल अनुभवायला मिळाला. तसंही मिपावरील कथांमध्ये शृंगारिक वर्णनं फारशी नसतात.
मान्य .. पण वर्तमानकाळात नियमित घडणार्या गोष्टींकरता वर्तमानकालीन क्रियापद वापरणे योग्यच (मला वाटतं याला सामान्य वर्तमानकाळ म्हणतात, व्याकरण तज्ञ अधिक सविस्तर सांगू शकतील) पण एखाद वेळेला घडणार्या वा घडलेल्या गोष्टीकरिता भूतकाळवाचक क्रियापदच वापरायला हवे.
उदा: मी बाईकने ऑफिसला जातो हे ठीक आहे कारण मी रोजच ऑफिसला जातो.
पण माझी बाईक रस्त्यात पंक्चर होते हे चुकीचं ठरेल. माझी बाईक काही रोजच पंक्चर होत नाही.
आता कथेमध्ये तुम्हाला हे सगळे संवाद /प्रसंग कथेतील पात्रांमध्ये सध्या नियमितच होत आहेत असं काही दाखवायचं असेल तर ठीक आहे.. तसं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो :)
24 Mar 2019 - 6:44 pm | बिपीन सुरेश सांगळे
कथालेखक,
आभार .
एक लेखक म्हणून अशी चर्चा व्हायला हवी .
पण फार कमी होते .
आपण आवर्जून लिहिलेय हे किती चांगलय .
'अहो एकंदर कथानक चांगलंच आहे..पण शृंगारिक वर्णनामुळे थोडा वेगळा रसबदल अनुभवायला मिळाला. तसंही मिपावरील कथांमध्ये शृंगारिक वर्णनं फारशी नसतात.'
ओके - चांगल्या अर्थाने ओके .
'आता कथेमध्ये तुम्हाला हे सगळे संवाद /प्रसंग कथेतील पात्रांमध्ये सध्या नियमितच होत आहेत असं काही दाखवायचं असेल तर ठीक आहे.. तसं असेल तर मी माझे शब्द मागे घेतो :)'
होय .कथेत तिथे वर्तमानकाळ आहे आणि तशी चर्चा सतत होते असेच मला म्हणयचे आहे .
माझीही चूक होऊ शकते , म्ह्णून मी आवर्जून तुम्हाला विचारले .
पुन्हा आभार आणि मनापासून .
24 Mar 2019 - 7:22 pm | सविता००१
मस्त कथा आहे. आवडली
19 Apr 2019 - 9:47 pm | बिपीन सुरेश सांगळे
सगळ्या वाचकांचे पुन्हा एकदा आभार
19 Apr 2019 - 11:11 pm | वीणा३
मला तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कथा आवडल्या. भाषा, गोष्ट सांगण्याची पद्धत आवडली. प्रयेक वेळी प्रतिसाद द्याल जमत नाही, पण वाचते नक्की.
2 May 2019 - 7:55 am | बिपीन सुरेश सांगळे
| वीणा३
मला तुमच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कथा आवडल्या. भाषा, गोष्ट सांगण्याची पद्धत आवडली. प्रयेक वेळी प्रतिसाद द्याल जमत नाही, पण वाचते नक्की.
खूप आभारी आहे मी आपला या प्रतिक्रियेबद्दल !
4 May 2019 - 6:58 am | प्रमोद देर्देकर
मस्त हलकी फुलकी कथा लिहता तुम्ही .
तुमची बहावा सगळ्यात जास्त आवडली.
5 May 2019 - 1:51 pm | बिपीन सुरेश सांगळे
प्रमोदजी
धन्यवाद
माझ्या इतर कथांवरही आपण आपल्या कॉमेंट्स दिल्या आहेत .
आणखी समीक्षा समजून घ्यायला आवडेल