एक पुस्तक जगताना - 'कसाब आणि मी'

सटकाजी's picture
सटकाजी in जनातलं, मनातलं
24 Jan 2019 - 7:20 pm

पुस्तक परिचय
नाव : कसाब आणि मी
लेखक : रमेश महाले (मुख्य तपास अधिकारी )
प्रकाशक : मेनका प्रकाशन

Book_Cover

समुद्रामार्गे मुंबईत मच्छिमार नगराजवळ 'ते' दहाजण उतरले आणि पुढचे साठ तास मुंबई रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन निघाली. संपूर्ण देश श्वास रोखून टीव्हीसमोर स्तब्ध उभा होता. नेमके किती अतिरेकी मुंबईत घुसलेत? कुठे कुठे हल्ले सुरु आहेत? किती लोक मारले गेलेत, किती जखमी आहेत? याचा काहीच अंदाज लागत नव्हता. अनेक ठिकाणी रायफल मधून सुटलेल्या गोळ्यांचा आणि ग्रेनेडचा आवाज ऐकू येत होता. सगळीकडे अराजकता माजली होती, अफवांचं पीकही फुटलं होतं. हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्या आठवणी आजही ताज्या असतील यात शंका नाही.
__________________________________

शेकडो निरपराध मारले गेले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा आत्मघातकी (फ़िदायीन) हल्ला असूनही एक अतिरेकी 'कसाब' जिवंत पकडला गेला. इतर सर्व अतिरेकी मारले गेले आणि मुंबईसह संपूर्ण देशाने निश्वास टाकला. यावेळी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त होते राकेश मारिया. त्यांनी सदर घटनेचा तपास रमेश महाले यांच्यावर सोपवला.
__________________________________

रमेश महाले हे मुंबईच्या 'गुन्हे प्रकटीकरण' शाखेत कार्यरत होते, त्यांच्या कामाचे स्वरूप अनेकांना माहीत असल्याने २६/११ हल्ल्याच्या तपासात त्यांची नियुक्ती अगदी योग्यच होती. केवळ ९० दिवसात चार्जशीट दाखल करण्याचं आव्हान महाले आणि त्यांच्या टीमवर होतं. जवळपास शंभर पोलीस अधिकारी दिवस रात्र तपासात गुंतले होते. महाले साहेब गमतीने त्यांच्या टीमला 'शंभर पांडवांची सेना' असेच संबोधतात. कामाची व्याप्ती आणि गुंतागुंत मोठी होती. तपास संपला, मग सरकारी वकील उज्वल निकम यांनी उत्तम प्रतिवाद करत न्यायालयाने निर्णय सुनावला. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबला फाशी झाली.
__________________________________

खरंतर या घटनेचे पुनर्कथन करण्यासाठी एक- दोन पुस्तकेच काय पण सिनेमा देखील येऊन गेला. परंतु घडलेल्या घटनांचा मागोवा पुराव्यानिशी केवळ न्यायालयातच मांडला गेला होता, त्यामुळे सर्वसामान्यांना या घटनेतली गुंतागुंत माहित नव्हती. परिणामी अनेक समज-गैरसमजही पसरले. यापैकीच्या एका पुस्तकात दिलेल्या माहितीत आणि सत्यतेत मोठी तफावत असल्याने मुख्य तपास अधिकारी रमेश महाले अतिशय अस्वस्थ झाले. कामातून निवृत्ती घेऊन त्यांनी लेखणी हातात घेतली आणि घटनांचा क्रम जुळवत एक संदर्भग्रंथाला जन्म दिला. या पुस्तकाचं नाव 'कसाब आणि मी'.
__________________________________

पुस्तकाचा प्रवास सुरु होतो 'कसाबला' आर्थर रोड तुरुंगातून एका रात्री दोन वाजता पुण्याकडे घेऊन जाण्याच्या प्रवासानेच, कारण एकच - फाशी !
तपासात पाळलेली गुप्तता आणि प्रकरणाचे गांभीर्य लेखकाने असे रंगवले आहे कि वाचकांनाही तो मानसिक तणाव जाणवेल. या प्रकरणानंतर संपूर्ण पुस्तक फ्लॅशबॅक (भूतकाळ) मध्ये लिहले आहे म्हणजेच सुरु होतो पुस्तकाचा दुसरा टप्पा - अतिरेक्यांचा पाकिस्तान ते मुंबई कडचा प्रवास.
__________________________________

भारतीय मच्छिमारांची बोट 'कुबेर', सीएसटी वरील तांडव, कामा इन -आऊट, हॉटेल ओबेरॉय -ट्रायडंट आणि ताजवरचा हल्ला , अचानकच मुंबईच्या इतर भागात झालेले भीषण स्फोट या सर्व प्रकरणांचं वर्णन एखादा थ्रिलर चित्रपट पाहतोय असेच वाटते. सदर प्रकरणात ठिकठिकाणी न्यायालयात सादर केलेले संदर्भ , अतिरेक्यांचे फोन टॅपिंग जसेच्या तसे दिले आहेत. भाषा-शैली अतिशय प्रवाही असल्याने कुठेही कंटाळा येत नाही.
__________________________________

पुस्तकाच्या पुढच्या प्रवासात जणू कसाब आपल्याशीच बोलतोय असे वाटू लागते, कारण पुढील प्रकरणं कसाबच्या जबाबावर आधारित आहेत. हल्ल्याची पार्श्वभूमी , लष्कर -ए -तैयब्बा चा जिहाद ,पूर्वतयारी आणि प्रशिक्षण यांचं वर्णन थक्क कारणांर आहे.कसाबच्या या जबाबाने मात्र पाकिस्तानचे पितळ उघडे पडले. पुस्तकात अनेक व्यक्तींच्या स्वभावाचे दर्शन लेखकाने केले आहे. मग राकेश मारिया यांची अचाट स्मरणशक्ती असेल किंवा वकील उज्वल निकम यांचे प्रसंगावधान किंवा कसाबची दुसरी बाजू , सौ. महाले यांचा समजूतदारपणा आणि बरंच काही.
__________________________________

या पुस्तकाचा मूळ गाभा आहे या समज आणि गैरसमज. वर नमूद केल्याप्रमाणे या प्रकरणाशी निगडित समज-गैरसमजांविषयी भाष्य करणे 'रमेश महाले' यांना अतिशय आवश्यक असल्याचे वाटते. तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भूमिका, पोलीस दलातील अतिशय प्रसिद्ध असे अधिकारी हेमंत करकरे - अशोक कामटे - विजय साळसकर हे तिघेही योगायोगाने (?) एकत्र कसे आले , आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू कसा झाला , इतर पोलिसांची भूमिका, टीव्ही मीडियाने उठवलेल्या अफवा अशा अनेक गोष्टींचा परामर्श लेखकाने घेतला आहे . तो समाविष्ट केल्याने वाचकांची मोठी सोय झाली आहे.
__________________________________

एखाद्या घटनेचा शेवट (परिणाम ) जेव्हा माहीत असतो, तेव्हा ती गोष्ट पुन्हा रंगवून वाचकांना खिळवून ठेवण्याचे कसब लेखकात नक्कीच आहे. माझ्या मते काही पुस्तक फक्त वाचायची असतात परंतु व्यंकटेश माडगूळकर सारख्या लेखकांची पुस्तकं जगायची असतात, आज त्या जगण्याच्या माझ्या यादीत 'कसाब आणि मी' या पुस्तकाचा समावेश केलाय. अगदी दोन महिन्यांपूर्वीच ( नोव्हेंबर २०१८) हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ आकर्षक नाही परंतु Don't judge book by its cover. तेव्हा आवर्जून वाचा.

-RP

इतिहाससमीक्षालेख

प्रतिक्रिया

मस्त परीक्षण लिहिलंय तुम्ही. नक्की वाचणार.

याच विषयावर अजून एक उत्तम पुस्तक म्हणजे 'The Siege: 68 Hours Inside the Taj Hotel'.

https://www.amazon.com/Siege-Hours-Inside-Taj-Hotel-ebook

लेखक पाकिस्तानात जाऊन तिथून जमवलेली माहिती वापरल्यामुळे या पुस्तकाला एक वेगळेपणा आला आहे.

NSG ची माहिती लेखकांना वापरता न आल्याने कारवाईचा भाग संक्षिप्त झाला आहे, तरीही पहिल्या पानापासून शेवटपर्यंत खाली न ठेवता वाचण्याजोगे पुस्तक आहे.

सटकाजी's picture

24 Jan 2019 - 10:39 pm | सटकाजी

धन्यवाद , नक्की वाचतो .

मुख्य तपास अधिकारी आणि लेखक रमेश महाले यांना ज्या पुस्तकाने अस्वस्थ केले ते पुस्तक म्हणजेच The Seige, तसे त्यांनी 'कसाब आणि मी' च्या पुस्तक प्रकाशनावेळी नमूद केले आहे,

The Siege पुस्तकात पुस्तकात काही सनसनाटी आरोप केले आहेत ते या पुस्तकाच्या निमित्ताने खोडुन काढण्याचा प्रयत्न महाले यांनी केला आहे.

प्रकाशनाचा काही व्हिडिओ इंटरनेटवर आहे का? अमेरिकेत असल्यामुळे पुस्तक लवकर हाती लागण्याची शक्यता नाहीये, म्हणून विचारलं.

माझं असं एकंदरीत मत झालंय (कदाचित ते चुकीचे पण असेल) की या प्रकरणी आपल्या सुरक्षा यंत्रणा ढिसाळपणाने वागल्या. त्याचं आपण जर वस्तुनिष्ठपणे आणि तटस्थ राहून विश्लेषण करणार असू तर आपल्याला भविष्यात काय सुधारणा करता येतील ते कळेल. जगभरातल्या पोलीस यंत्रणांनी मुंबई हल्ल्याचा असा अभ्यास केला आहे.

अजून एक - या हल्ल्याचे CCTV व्हिडीओ फुटेज आणि अतिरेक्यांचे पुष्कळसे फोन संभाषण यूट्यूब वर आहे.

मूळ निकालपत्र pdf इंटरनेटवर आहे.

(एक पुस्तकाच्या अनुवादासाठी तयारी म्हणून हे सगळे जमा केले होते)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jan 2019 - 9:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर परिक्षण. पुस्तक वाचावेच लागेल.

परीक्षण आवडले. पुस्तक मिळवून वाचण्यात येईल.

पद्मावति's picture

25 Jan 2019 - 12:07 am | पद्मावति

सुंदर परिक्षण.

नक्की वाचणार हे पुस्तक.

मला एक प्रश्न नेहेमी सतावतो... कशाला झाला हा हल्ला? का झाले यापुर्वीचे हल्ले? युद्धनिती म्हणावी तर या अशा हल्ल्यांनी भारताच्या सामरीक शक्तीवर काहिच परिणाम होत नाहि. भारताला भिती दाखवायची असेल असं म्हणावं तर परिणाम नेमका उलट होतो... अशा घटनांमुळे अगदी सामान्य माणुस देखील मुठी आवळतो. सरकारवरील विश्वास उठवायचा असेल तर ते ही अशक्य, कारण लोकशाहीत तसंही सरकारवर एका मर्यादेपलिकडे जनतेचा विश्वास नसतोच (तसं अभिप्रेत देखील नाहि).
मग काय कारण असावं?? भारत फॉरेन उद्योगांना अनुकुल नाहि हे दाखवायचं म्हणुन? संरक्षण क्षेत्रातील अतिबलिष्ठ लॉबींचा फायदा व्हावा म्हणुन? अतिरेकी हल्ल्यांची प्रॅक्टीस म्हणुन? धार्मीक बेबनाव वाढावा म्हणुन? भारताने इतरत्र कुठे नाक खुपसु नये याचा इशारा म्हणुन ? कि इतर काहि??

टवाळ कार्टा's picture

25 Jan 2019 - 5:10 pm | टवाळ कार्टा

आम्ही कधीही कुठेही येऊन हल्ला करू शकतो आणि तुमच्या पोखरलेल्या सिस्टमचा फायदा घेऊ शकतो

हे दाखवणे? मानसिक धैर्य खच्ची करायला?

अर्धवटराव's picture

28 Jan 2019 - 8:30 am | अर्धवटराव

धन्यवाद.
पण यातलं नेमकं काय? कि हे सगळच ? आता हे प्रकार थोडे थांबल्यासारखे झाले आहेत. हि वादळापुर्वीची शांतता म्हणावी काय? पुढे काय वाढुन ठेवलय? आपण तर सर्वकाहि विसरुन परत काथ्याकुट करायला मोकळे आहोत.

शित्रेउमेश's picture

25 Jan 2019 - 9:02 am | शित्रेउमेश

मस्त परीक्षण लिहिलंय तुम्ही. नक्की वाचणार.

कुमार१'s picture

25 Jan 2019 - 12:02 pm | कुमार१

व मुद्देसूद परिचय.
पु ले शु