मागच्या चार-पाच वर्षात बऱ्याचदा असं वाटलं की सिंहगडाबद्दल लिहायला हवं. जुने कागद हुडकताना भरपूर नवे काही या गडाबद्दल सापडते, त्यातले जे काही अजूनही आठवते ते इकडे एक लेखात मांडतो आहे. लेख आवडला असेल तर प्रतिक्रियेत जरूर कळवा. पुढचा भाग - सिंहगडाची अखेरची लढाई आणि त्यानंतर ब्रिटिश काळातील एक अप्रकाशित जाहिरात टाकेन, जर उत्सुकता असेल तर ...
सिंहगड म्हणले म्हणजे प्रथम आठवतात तानाजी मालुसरे आणि त्यांनी गाजवलेला पराक्रम. इथे अनेकदा शशिकांत ओक आणि इतरांनी त्याबद्दल लिहिण्याचा आग्रह केला होता, पण दुर्दैवाने तानाजीच्या पराक्रमाबद्दल फार थोडे अस्सल तपशील आपल्यापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे पुराव्यानिशी नक्की काय आणि कसे घडले हे सांगता येत नाही. ते कल्पनेने उभे करता येईल, पण त्या पद्धतीचे लेखन मला करायचे नव्हते आणि ते मला जमेल याचीही खात्री वाटत नाही. म्हणून त्याऐवजी गडाबद्दल आपल्याला जे मूळ कागदात सापडते ते शक्यतो जसेच्या तसे इथे देतो आहे.
सिंहगड हा जुन्या काळी फार मोक्याचा किल्ला होता. पुण्याच्या जवळचे सुरक्षित स्थान म्हणून त्याला महत्व होते. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाबाई, छत्रपती राजाराम महाराज इथे राहिल्याचे उल्लेख आहेत. औरंगझेब ज्या वेळी मराठ्यांच्या विरोधात दक्षिणेत लढत होता, त्या वेळी एकटा सिंहगड २७ वर्षात ८ वेळा मोगल-मराठे यांच्या ताब्यात आलटून पालटून असल्याचे उल्लेख सापडतात त्यावरून गडाचे महत्त्व ध्यानी यावे. त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत.
- १६८४ मराठे => मोगल
- १६८६ मोगल => मराठे
- १६८९ संभाजी महाराज पकडले गेले, किल्ला प्रतिकार न होताच मोगलांनी घेतला
- १६९३ (१६९२ च्या असफल प्रयत्नानंतर) नावजी बलकवडे यांनी किल्ला घेतला
- १७०३ औरंगजेबने सिंहगड घेऊन त्याचे बक्षिदाबक्ष है नाव ठेविले
- १७०५ मोगल => मराठे औरंगजेब हा महाराष्ट्रातून निघून वाकिणखेड्याला (गुलबर्गा जिल्हा) वेढा घालण्यासाठी म्हणून चालू लागताच मराठ्यांनी एप्रिल, १७०५ मध्ये सिंहगड जिंकून घेतला.
- १७०६ मराठे => मोगल सेनापती जुल्फिकारखान याने सिंहगड पुन्हा घेतला
- १७०७ मोगल => मराठे
अशी सिंहगडाची आठ वेळेला सत्तापालट झाली. यावरून स्वराज्यातील किले जिंकून घ्यावे म्हणून मोगल आणि ते फिरून हस्तगत करावे म्हणून मराठे किती निकराने लढत होते, याची कल्पना येईल.
तानाजीने सिंहगड घेतला याची माहिती महाराष्ट्रात सर्वत्र आढळते, पण नावजी बलकवडे याने तितकाच पराक्रम करून इ. स. १६९३ मध्ये सिंहगड घेतला, याची माहिती कित्येकांना नाही. यासंबंधी इ. स. १६९३ मध्ये शंकराजी नारायण सचिव याने राजश्री काकाजी नारायण देशाधिकारी प्रांत मावळ, तालुके लोहगड यांना पत्र लिहिले आहे, ते पुढे दिले आहे.
शिवचरित्र साहित्य खंड पाच, पान १८८
इ. स. १६९३
शंकराजी नारायण सचिव => राजश्री काकाजी नारायण देशाधिकारी प्रांत मावळ, तालुके लोहगड
“सिंहगड, पुरंदर, लोहगड हे किल्ले मोठ्या आशरफची (महत्त्वाची) ते गनिमाकडे आहेत. त्यामुळे रायगडास काम पाहोन मदंती होते. याकरिता वरघाटच्या किल्ल्यामध्ये प्रस्तुत एक स्थल हस्तगत करावे म्हणजे रायगडची कित्येक भातेने मदत राहोन पुढे राहिली स्थले हस्तगत होतील. याकरिता किल्ले सिंहगड गनिमापासून हस्तगत करावयाचा विचार करून छ १ (एक) शब्वाली रा. त्र्यंबकपंत मुतालीक दि ।। सुरनिशी यांनी किल्ले कौरिंगडाहून स्वारी करून राजमाचीस मुक्काम केला. स्थळ सुदतेचे हवीस (मोक्याचे पाहणीस) मशारनिल्हे विठोजी कारके पदाती पंचसहस्त्री (म्हणजे पायदळाच्या पाच हजारी सैन्याचा मुख्य) यांस पाठविले. त्यांनी किल्ल्यास जाऊन हवी करून आले. ऐशियास किल्ला हस्तगत करणे त्यास पथक धारकरी ह्शमच्या (पायदळ) सरदारांमध्ये नेमिता मशारनिल्हे नावजी बलकवडे पदाती पंच सहस्री यांनी मर्दुमकीच्या जोमे धार कबूल केली. त्यास हवी धारकरी याने मनास आणिले पाहिजे याबद्दल नावजी बलकवडे यास व विठोजी कारके यास रवाना केले. उभयता जाऊन विठोजी कारके यांनी जे जागा हवी केली होती ते नावजीने पाहून उभयता राजमाचीस आले.
त्या उपरी जमावामध्ये धारकरी निवड करीता नावजी बलकवडे यांनी विनंती केली की “स्वामीने आपणास धार नेमिली तर आपण कबूल केली; परंतु सिंहगड म्हणजे मोठे आशरफचा आहे. गनीम बहुत जोरावर हमेशा खबरदार आहे. साले गुदस्ता (१६९२) स्वामीने किल्ला हस्तगत करावयासी स्वारी रवाना केलीं होती. ते समयी जमाव जाउन आदीकरून सिड्या तटास लाविल्या. गनिमाची खबरदारी देखोन धारकरी यांनी कच खावोन आले. कामास धक्का बसला. त्या उपरी अलीकडे. तो बहुतच गनिमांनी खबरदारी करून नाजूक जागाची बेहुबुदी (नीट करणे) बहुत भौतेने करून खबरदार आहे. बिलंद (उंच) जागे आदीकरून पाहारे चौकस बसवून चारी प्रहर रात्री गस्तीवरी गस्ती चालताती. किल्लेदार तरवारीचा जोम धरून जमावानिसी गतवषपिक्षा राहात आहे. किल्ले यास दगा द्यावा ऐसा जागा खबदारी करिता राहिला नाही. हल्ली हवी (मोक्याची जागा) पाहिली आहे. त्या जांगा पाहारेयाची बौही आहे कस्तेने जोशवारीने दगा द्यावा लागतो. पूर्वी राजश्री कैलासवासी स्वार्मींचे वेळेस किला गनिमांकडे असता किला हस्तगत करावयाचा प्रयत्न केला. तान्हाजी मालुसरे यासारखा सरदार धारेस नेमिला होता. त्यांनी शर्थ करून किला ह्स्तात केला. तान्हाजी मालुसरे यासारखे माणूस खर्च होऊन गेले. आपण जिवावरी निदान करून धार कबूल केली आहे. किल्ला हस्तगत झालियावरी मौजे सावरगाव तालुके पौन मावळगाव हा गाव आपणास इनाम दिला पाहिजे”, विनंती केली. त्यास सिंहगड आश्रफाचा जागा त्यासारिखे ह्या स्थळी गनिमाची जोरावरी आहे. नावजी ह्यानी धार कबूल केली. याबाबत गाव इनाम द्यावयाचा तह केला.
त्याउपरी छ एक जिल्कादी (२५ जून १६९३) राजमाचीकडून जमावानिसी स्वारी करून कोकणातून घाटमाथा चढून मजलदरमजल गडानजीक रानामध्ये दबा धरिला. ७ ६ जिला (जून ३०, १६९३) धारकरी यांची निवड करून किल्ला कबज करावयासी कूच केले. ते किले मजकुराच्या कह्यावती जाऊन धारकरी भाले लावून चढविले. नावजी बलकवडे प्रथम धारेस नेमले होते. त्यांनी त्याचे जातीने प्रथम लागून मालेने चढले. तटासंनिध जमावानिशी गेले. त्या उपरी.... रात्री गनिमाची खबरदारी गस्तीवर गती होत. शिड्या लावावया अवकाश फावला नाही. अरुणोदयीस- विठोजी कारके यांनी तटासी पाहारियाजवळी लाविली. नावजीने मन वाढून शर्तीने सिड्यावरी चढौन पहारा चोपून छ ७ रोजी (१ जुलै, १६९३) किल्ला हस्तगत केला. याकरिता मौजे सावरगाव तालुके बीन मावळ हा गाव कुलबाब कुलकानू खेरीज हक्कदार व इनामदार नूतन इन्हाम दिला असे.'
यावरून आपल्याला खालील महत्वाच्या गोष्टी समजतात -
- सिंहगडावर दोन प्रकारचे संरक्षण होते १) प्रत्यक्ष तट २) तटाखालचा काळ्या दगडाचा कडा. पहारे तटावर असले तरी त्यांना सहज तटाबाहेर येऊन कड्याच्या टोकावर उतरता येत नसावे. अगदी आजही आपल्याला हे पाहता येते.
- कड्याच्या वरती पण तटाच्या खाली एखाद्या सैन्यतुकडीला वरच्या पहारेकऱ्यांपासून रात्रभर लपून राहण्यासाठी जागा होती (ही जागा नावजी आधी जाऊन पाहून आला)
- नावजी कडा भाले वापरून चढला मात्र तट चढण्यासाठी माळा म्हणजे दोराच्या शिड्या वापरल्या.
- नावजीने वापरलेली जागा हीच असेल असे नाही (तिचा उल्लेख केला नाही, त्यामुळे ते समजणे अवघड आहे), पण आपल्याला या फोटोवरून अंदाज करता येतो - ही किल्ल्याची दक्षिणेच्या बाजूची जागा (मागे राजगड आणि तोरणा धूसर दिसत आहेत) ...
प्रतिक्रिया
22 Dec 2018 - 6:12 am | कंजूस
भारी॥
22 Dec 2018 - 10:49 am | जेडी
लेख आवडला . सिंहगडाबद्दल ," गड आला पण सिंह गेला " याच्याशिवाय काहीच माहिती नाही . नव्याने बरेच काही कळले . धन्यवाद . पुढेही वाचायला आवडेल
22 Dec 2018 - 11:01 am | अनिरुद्ध.वैद्य
पुणे दरवाज्यावर बलकवडे ह्यांनी मालुसरेंप्रमाणेच गड घेतला असे लिहिलेले आहे. पण एवढ्या जोरात शत्रू असतांना कामगिरी केली हे आजच समजले!
हॅट्स ऑफ!!
आपण दिलेल्या माहितीबद्दल खूप धन्यवाद!!
22 Dec 2018 - 11:11 am | मनो
विठोजी कारके यांचंही नाव तिथे असायला हवं होतं. हे अस्सल पत्र जर लावलं तर मग बाकी अजून काही सांगायची गरजच नाही ...
2 Jan 2019 - 12:20 am | शशिकांत ओक
...नावाजीला नंतर सावरगावची इनामदारी मिळाली... बरोबरीने लढलेल्या विठोबाजी कारकेला काय बक्षिशी मिळाली तेही धड सांगायची तसदी घेतलेली नाही.
... नावजीकडे किती सैनिक होते? त्यांना किती सैनिकांशी लढावे लागले? जर गस्ती रात्रंदिवसभर आळी पाळीने होत्या तर त्यांच्याशी सुरवातीला लढावे लागले असेल त्यानंतर मुख्य किल्लेदाराला कसे पटकन मारले गेले? कारण मुख्य सेनापती वा किल्लेदार मरेपर्यंत लढाई चालू राहते. नायक मेला तर जिंकलेल्या लढाईचे पारडे फिरते....
लढाईत दोन्ही बाजूने किती कामी, किती जखमी झाले? त्यानंतर किती लढाईत उपयोगी येणारी जनावरे, पैसा, शस्त्रे, शस्त्रे बनवणारे, जनावरांची निगा राखणारे असे निम लष्करी कुशल कामगार किती मिळाले? त्यांची विल्हेवाट कशी लावली गेली?... वगैरे वगैरे...
हेच ते लेफ्टनंट कर्नल ब्रेकर... ज्यांनी नंतर मराठ्यांच्या राज्याच्या पराभवावर अभ्यासपुर्ण लेखन केले. भाग 2 मधील नकाशे त्यांच्या पुस्तकातून दाखवले गेले आहेत.
ते मेमॉयर्स ऑफ ऑपरेशन्स मधील प्रस्तावनेत लिहितात... मिलिटरी कॉमेंटेटरने आपली आवड निवड कमांडरांची नावे वगैरे त्यांच्या कौतुकासाठी न लिहिता लढाईच्या कामाची माहिती वाचकांना दिला तर त्यांना खरे वाचल्याचे समाधान मिळेल.
1817-18 च्या सुमारास पेशव्यांच्याकडील सैन्याची संख्या किती आहे हे, ज्यांच्याशी ब्रिटिशांना लढायचे आहे त्यांची बित्तंबातमी काढून ते अशी वर्गवारी करून आपल्या पुस्तकात देतात...
2 Jan 2019 - 8:40 am | प्रचेतस
नावजींवरुन एक अवांतर.
नावजी बलकवड्यांची समाधी ताम्हिणीतल्या कुंडलिका नदीचे उगमस्थान असणार्या पिंप्री बंधार्यानजीकच्या सिनेर खिंडीजवळ आहे.
2 Jan 2019 - 9:33 pm | मनो
'डोंगरयात्रा' या पाळंदे यांच्या पुस्तकात या जागेचा उल्लेख वाचला होता. तिथे बऱ्याचदा जाऊनही आल्याचे आठवते. त्या वेळी रस्ता अगदीच खराब होता. तिथली दरी सुंदर आहे. अंधारबन गावाच्या वाटेवर खिंडीच्या खाली देऊळ आहे, तेच ते का?
पुढे एकदा तिथून घुटका - एकोले - घनगड - तेलबैल करत लोणावळा गाठलं होतं, पण तो रस्ता दगड माती बाहेर आलेला होता, आजची स्थिती माहीत नाही.
2 Jan 2019 - 9:46 pm | प्रचेतस
मी ते स्मारक खूप पूर्वी पाहिलं होतं, मला आठवतं त्याप्रमाणे ते अंधारबनच्या वाटेवरच होतं.
तो पिंप्री, भांबर्डे रस्ता सध्या खूपच बरा आहे. २० वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा तर संपूर्ण कच्चा रस्ता होता, प्रत्येक फेरीगणिक थोडी थोडी सुधारणा जाणवतेय आता.
22 Dec 2018 - 11:10 am | प्रचेतस
उत्तम लेख.
उपरोक्त छायाचित्रातील जागा हीच नावजीने सर केलेली जागा नसण्याची शक्यता खूपच जास्त आहे. छायाचित्रातील जागा झुंझार बुरुजाची दिसते. आपण दर्शवलेल्या तटातूनच एक चोरवाट खालच्या सोंडेला जाऊन मिळते. आजही ही चोरवाट पाहता येते आणि तेथून उतरताही येते. आणि उतरणेही अजिबात अवघड नाहीये. अर्थात त्या काळी हा कडा पूर्ण बंदोबस्तातच असणार हे उघड आहे.
22 Dec 2018 - 11:17 am | मनो
होय, ती जागा सांगणं तसं अवघड आहे. रात्रभर एक छोट्या तुकडीला तटाखाली लपायला जागा तशी हवी. वरून तिथे उतरता नाही आलं पाहिजे, आणि खालचे दिसता कामा नये. मला जी गडाची छायाचित्रे मिळाली त्यातलं हे एक बरं आहे, आणि 30 जून म्हणजे पावसाळ्याशी मिळतं जुळतं आहे म्हणून वापरलं.
आणि पेशवेकाळात जर काही कडे खोदले असतील किंवा तट तोडून नवीन सुधारणा केल्या असतील त्यामुळं मूळ कुठे काय होतं ते सांगणं कठीण आहे.
22 Dec 2018 - 12:13 pm | प्रचेतस
ते आहेच.
डोंगरातील पूर्वीच्या वाटा जशा बुजत असतात तशाच नव्यानेही तयार होत असतातच त्यामुळे प्रत्यक्ष शिवकाळात नेमकी वाट कशी होते ते आता सांगणे कठीणच आहे.
त्या वाटेची मी घेतलेही ही काही छायाचित्रे.
1 Jan 2019 - 10:52 pm | शशिकांत ओक
तशा न सापडणाऱ्या वाटा 'शोधून' एकमेकांशी वाद घालायला त्या कदाचित कामी येतील, पण कुठून आले, कुठून चढले, यापेक्षा वर चढल्यावर लढाई कशी झाली असावी याचा विचार होणे गरजेचे आहे. नेमके तेच काम मिलिटरी कमांडर्स कंबाईन्ड यामधून साधायचा प्रयत्न आहे. जर आजच्या मिलिटरी कमांडर्सना हीच कामगिरी त्या काळातील साधनसामुग्रीचे भान ठेऊन, करायचे आदेश दिले तर ते ती लढाई कशी नियोजित करतील आणि पार पाडून दाखवतील असे याचे स्वरूप आहे. अर्थात लढाई अशीच झाली असा आग्रह नाही पण सर्वसामान्य रूपरेषा समजून घ्यायला उपयोगी होईल. अशी अपेक्षा आहे.
22 Dec 2018 - 11:15 am | तुषार काळभोर
अवांतर - तलवारी, भाले, दांडपट्टा यांच्या समोरासमोर लढाईत जे जखमी होत, त्यांचे उपचार तेव्हा कसे होत असतील? म्हणजे समजा दंडावर, पोटरीवर तल्वारीचा एक इंचा खोल वार असेल, किंवा भाला छातीत/पोटात अर्धा-एक इंच घुसला असेल, तर काय करत असतील? सर्वात आधी रक्त वाहणे थांबवण्यासाठी कापड वापरणे होत असेल. पण वेदना (ज्या प्रचंड असतील) त्या थांबवण्यासाठी काय करत असतील ? पुढे जखमा भरून येण्यासाठी काय उपचार करत असतील>>?
(बहुतेक विश्वास पाटील यांच्या) एका कादंबरीत अशा उपचारांसाठी तुपाच्या विहिरी भरून ठेवल्याचा उल्लेख वाचलाय. तो कितपत खरा व उपयुक्त असेल.?
23 Dec 2018 - 6:17 am | विजुभाऊ
जखमा भरून येण्यासाठी जुने तूप वापरत असत. चितोड मधेही अशा तूप साठवण्याच्या जागा आहेत
1 Jan 2019 - 10:38 pm | शशिकांत ओक
या कथनात अद्भूत रम्यता वाटते.
जखम झाल्याझाल्या तिथे काय उपचार केले जात असावेत? आपल्या सदस्यांपैकी कोणी जडीबूटीचे, लेप, आदि उपयोग लढाईत जखमी झालेल्यांवर तात्काळ वेदना कमी करायला पुर्वीच्याकाळी काय व कसे उपचार केले जात असत यावर प्रकाश टाकायची विनंती करतो.
22 Dec 2018 - 1:14 pm | यशोधरा
माहितीपूर्ण लेख व प्रतिसाद. धन्यवाद.
23 Dec 2018 - 6:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक लेख आणि प्रतिक्रिया.
23 Dec 2018 - 8:53 pm | नावातकायआहे
पुढेही वाचायला आवडेल......
29 Dec 2018 - 6:46 am | मनो
दुसरा भाग जवळ जवळ लिहून झाला आहे, २-४ दिवसात टाकतो.
29 Dec 2018 - 10:25 am | वेडसर
फार सुरेख. येऊ द्या अजून..