या सम हा ...!

मनीषा's picture
मनीषा in जनातलं, मनातलं
1 Nov 2008 - 1:52 am

स्थळ : Esplanade - on the bay , Singapore
३० ऑक्टोबर २००८
Masters of Percussion

सभागृहात मिट्ट काळोख होता. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती. सारंगीचे सूर सभागृहात पसरू लागले... एक प्रकाशझोत स्टेजवर दिसू लागला.. त्यात एक तरुण आपल्या सारंगीतून सूरांची उधळण करत होता‌. सर्वजण मंत्रमुग्ध होउन पाहत/ऐकत होते. थोडावेळ आलापी झाल्यावर शेजारील तबल्यातून एक ताकदवर, खणखणीत बोल उठला... प्रकाशझोत आता तबल्यावर आला होता.... तो तोच होता.

अनेक वर्ष त्याने रसिकांच्या र्‍हुदयावर अधिराज्य गाजवलेलं आहे... त्याला आज तालाच्या दुनीयेत कोणी प्रतिस्पर्धी नाहीत... तो च... उस्ताद झाकीर हुसेन. त्याने काही वर्षांपूर्वी पन्नाशी ओलांडली आहे हे खरे वाटणार नाही. आजुनही तबल्यावरची थाप तितकीच दमदार... ती ऐकून एखादे थांबलेले र्‍हुदय परत धडकायला लागेल. कलेवरची असीम निष्ठा, कला माझ्यासाठी नसून मी कलेसाठी आहे.. ही विनम्र जाणीव, कलाक्षेत्रात अत्त्युच्च स्थानावर असूनही रियाजात कधी कमी नाही... आणि सर्जनशीलता... निरनिराळे प्रयोग करण्याची आवड... त्यातूनच पाश्चिमात्य संगीता बरोवर हिंदुस्थानी संगीताचे फ्युजन, आणि हा विविध तालवाद्यांचा अनोखा कार्यक्रम Masters of percussion.

यात स्वतः उस्ताद झाकीर हुसेन यांच्या बरोबर श्री व्ही. सेल्वागणेश (खंजीरा), श्री विनायक राम (ढोलक), खेतेखान (खरताल), आबोस कोसिमोव्ह (दोयरा) हे तालवाद्द्यांचे उस्ताद होते, आणि सूरसंगत होती दिलशाद खान (सारंगी) आणि श्री निलाद्री कुमार (सतार) यांची.

सुरवातीला झाकीर हुसेन यांनी तीनतालातील पेशकार, कायदे, रेले पेश केले. तबला हे खर तर साथीचे वाद्य आहे.. पण त्याची सुद्धा एक स्वतंत्र परिभाषा कशी असते हे अतिशय रोचक पद्धतीने समजाउन सांगीतले. ते ऐकत असताना त्यांचे श्रोत्याशी संवाद साधण्याचे अकृत्रीम कसब जाणवत होते.. ते म्हणाले "Zebra crossing" -- is the name of an animal in African jungle for Indians . असे म्हणून मुंबईच्या गणपतीच्या दिवसातील रहदारीचे वर्णन तबल्याच्या भाषेत कसे करता येईल ते सांगीतले.. ते सांगत असताना तालाचे बोल म्हणून ते तबल्यातून कसे उमटतात त्याचेही प्रात्यक्षिक दाखवले.

मग सुरू झाला एक अनोखा प्रयोग Masters of percussion.. विविध तालवाद्य एकसमान बोली बोलत होती. साथीला सारंगी आणि सतारीचे सूर होते.. त्यांनी "वैष्णव जन तो... " आणि "रघुपती राघव राजा राम... " या गाण्यांची धून वाजवली... अनेक वेळा ऐकलेली ती गाणी ...पण या सूर ताला च्या उस्तादांकडून ऐकताना दैवी वाटत होती. सभागृहातील काळोख्या शांततेत प्रकाशझोतात बसलेले ते उस्ताद आणि त्यांनी उभे केलेले ते स्वरलयीचे विश्व... हा एक अलौकीक अनुभव होता .

सर्व कलाकार स्टेजवर येउन श्रोत्यांना अभिवादन करत होते .. त्या सर्वांच्या बरोबरच हा तालांचा बादशहा ... उस्तादोंका -उस्ताद विनम्रपणे उभा होता . त्याच्या कलेइतकाच त्याच्यातला माणूस सुद्धा श्रेष्ठ आहे .

म्हणुनच म्हणावेसे वाटते ... "झाले बहू ... होतील बहू - पण या सम हाच !!! "

समाजअनुभव

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

1 Nov 2008 - 7:25 am | विसोबा खेचर

छोटेखानी, परंतु छान लेख..

झाकिरहुसेन यांचे तबल्यावरील प्रभूत्व, त्यांचा रियाज, त्यांची मेहनत निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.. एकल तबलावादन तसेच गायनावादनाला त्यांची तबल्याची साथसंगत, ता दोन्हींवर त्यांचे प्रभूत्व वादातीत आहे..

इतक्या मोठ्या आणि विनम्र कलाकाराला माझाही सलाम. एखाद दोन खाजगी तसेच जाहीर मैफलीत स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्यासोबत त्यांच्या साथसंगतीचा दुग्धशर्करा योग मी अनुभवला आहे...

म्हणुनच म्हणावेसे वाटते ... "झाले बहू ... होतील बहू - पण या सम हाच !!! "

असं मात्र मी म्हणणार नाही. किंबहुना उस्ताद अहमदजान थिरकवा ऐकणारा कुणीच असं म्हणणार नाही असं सांगू इच्छितो.. :)

थिरकवाखासाहेबांवर फिल्मस् डिव्हिजननेही एक चित्रफित काढली होती ती इथे पाहता येईल. त्यांची बातच निराळी! त्यांच्या बाबतीत कदाचित झाले बहु, होतील बहु.. असे म्हणता येईल..!

आपला,
(थिरकवा प्रेमी) तात्या.

विसोबा खेचर's picture

1 Nov 2008 - 9:11 am | विसोबा खेचर

ते म्हणाले "Zebra crossing" -- is the name of an animal in African jungle for Indians . असे म्हणून मुंबईच्या गणपतीच्या दिवसातील रहदारीचे वर्णन तबल्याच्या भाषेत कसे करता येईल ते सांगीतले.. ते सांगत असताना तालाचे बोल म्हणून ते तबल्यातून कसे उमटतात त्याचेही प्रात्यक्षिक दाखवले.

मुंबईच्या गणपतीच्या दिवसातील रहदारीच्या वर्णनाचे तबल्यातून बोल काढणे, घोड्यांच्या टापा, पाण्याच्या झर्‍याचा आवाज, आगगाडीचे बोल वाजवणे, याकरता तबला हे वाद्य नव्हे!

हा असला काही तबल्यातील उथळपणा पाहिला की आजच्या दुनियेत शुद्ध, घराणेदार तबल्याची किती आवश्यकता आहे हे समजते आणि म्हणूनच उस्ताद अहमदजान थिरकवांसारख्यांचे मोल समजते..!

खुद्द झाकीरजीही हे जाणतात आणि,

"लेकीन क्या करे भाईजी, पब्लिक के लिये बजाना पडता है..!"

अशी खाजगीत पं भाई गायतोंडे यांच्यासारख्या बुजुर्गाचे चरणस्पर्श करत कबुलीही देतात...! सुदैवाने मी अश्या घटनांचा साक्षिदार आहे! :)

आपला,
(शुद्ध, पारंपारिक व घराणेदार तबल्याचा व गाण्याचा प्रेमी) तात्या.

मनीषा's picture

1 Nov 2008 - 4:34 pm | मनीषा

काही कला या "आम" लोकांसाठी असतात तर काही "खास" लोकांसाठी म्हणुन त्यांचे मोल कमी जास्त होत नाही असं मला वाटते .
"मुंबईच्या गणपतीच्या दिवसातील रहदारीच्या वर्णनाचे तबल्यातून बोल काढणे, घोड्यांच्या टापा, पाण्याच्या झर्‍याचा आवाज, आगगाडीचे बोल वाजवणे " ...... हा मला उथळपणा वाटत नाही .कारण हे करण्यासाठी सुद्धा भरपुर विचार/ आणि मेहनत केलेली असते .
एखाद्या सुशिक्षित माणसाला नविन काही शिकवणे काहीच कठीण नाही ... पण तेच जर तुम्ही एखाद्या अशिक्षित माणसाला शिकवू शकलात तर ते खरं कसब ... थिरकवॉ हे थोर होतेच , पण म्हणुन झाकीर हुसेन करत असलेले प्रयोग उथळ ठरत नाहीत .

विसोबा खेचर's picture

1 Nov 2008 - 4:55 pm | विसोबा खेचर

हा मला उथळपणा वाटत नाही .कारण हे करण्यासाठी सुद्धा भरपुर विचार/ आणि मेहनत केलेली असते .
पण म्हणुन झाकीर हुसेन करत असलेले प्रयोग उथळ ठरत नाहीत .

ही माझी मतं नाहीत, प्रत्यक्ष झाकीरभाईंनीच "भाईजी, पब्लिक के लिये बजाना पडता है.." अशी कबुली दिली आहे. त्यांचे वडील उस्ताद अल्लारखांचंही, "हा घराणेदार, अभिजात तबला नव्हे.." असंच मत होतं! असो.

अर्थात, घराणेदार तबला या विषयावर झाकीरसाहेबांचा भरपूर विचार आणि मेहनत आहेच हे निर्विवाद...

थिरकवॉ हे थोर होतेच , पण म्हणुन झाकीर हुसेन करत असलेले प्रयोग उथळ ठरत नाहीत .

"परंतु या सम हा..." या संबंधात मी थिरकवांचे उदाहरण दिले होते.. त्यातून ही उपमा आपल्याला झाकीरभाईंकरता वापरायची असेल तरी आपण अवश्य वापरू शकता. मी फक्त माझं मत दिलं!

तात्या.

चित्रा's picture

1 Nov 2008 - 7:21 pm | चित्रा

हा असला काही तबल्यातील उथळपणा पाहिला की आजच्या दुनियेत शुद्ध, घराणेदार तबल्याची किती आवश्यकता आहे हे समजते

झाकीर हुसेन हे तबलावादक म्हणून खूपच श्रेष्ठ आहेत, पण मागे आमच्या कॉलेजमध्ये आले असताना म्हणून त्यांनी हे प्राण्यांचे आदी आवाज तबल्यातून काढून दाखवले तेव्हा तेथे त्यांचे तबलावादन ऐकायला गेलेल्या आमच्यासारख्या मुलांना त्यांनी खूपच निराश केले होते ते आठवले.

प्रमोद देव's picture

1 Nov 2008 - 9:30 am | प्रमोद देव

मैफिलीचे वर्णन आवडले.
जमल्यास त्याची झलक ऐकवलीत तर अजून मजा येईल.

मनीषा's picture

1 Nov 2008 - 4:37 pm | मनीषा

सभागृहात रेकॉडींग करण्यास किंवा फोटो परवानगी नसल्याने ऐकवता येणार नाही

डॉ.प्रसाद दाढे's picture

1 Nov 2008 - 8:37 pm | डॉ.प्रसाद दाढे

झाकिरभाई ग्रेट आहेच. पण तात्या म्हणतात तसे आजकाल सगळेच
कलाकार 'गिमिक्स' च्या आहारी गेले आहेत. त्याचे कारणही आहे. मुळात शास्त्रीय स॑गीताच्या जाणकार प्रेक्षका॑ची (कानसेना॑ची) बर्‍यापैकी वानवा आहे. लाईट म्युझिक कुणीही ऐकू शकतो, गुणगुणू शकतो. तसे क्लासिकलचे नाही. मुळात आवड लागते व थोडेफार ज्ञानही. म्हणजे त्यातल्या नजाकती, सौ॑दर्यस्थळे कळू लागतात. 'पोचलेल्या' गाणार्‍याला वा वाजविणार्‍याला थोड्या वेळातच श्रोतृवर्गाचा वकूब कळतो. ऐकणारा जाणकार असेल पेश करणारासुद्धा पोतडीतन॑ एकेक चीज बाहेर काढतो. पण अपेक्षित जागा॑ना दाद नाही मिळाली की तो समजायचे ते समजतो आणि मग काहीतरी घोड्याचे आणि गाढवाचे आवाज काढायला लागतो. (एका ज्येष्ठ व्हायोलिन वादक महाशया॑नी दूरदर्शनवर गाढवाचा व वेगवेगळ्या वयोगटातल्या को॑बड्या॑चा आवाज काढून दाखविताना मी पाहिल॑ आहे !)
आज शास्त्रीय स॑गीताच्या मैफिलीला गेल्यावर (जास्तीकरून) मागून टकल॑च चमकता॑ना दिसतात. असे रेल्वेचे आवाज वगैरे कदाचित तरूण कि॑वा तबल्याची खूप माहीती नसणार्‍या क्राऊडला आकर्षित करण्यासाठीही वाजविले जात असावेत.
खर॑ म्हणजे असले आवाज काढण॑ झाकीरलाच काय कुणाही तरबेज वादकाला वाजविण॑ जमू शकत॑. झाकिरसाठी ते डाव्या हातचा मळच आहे हे तात्या॑ना ठाऊक आहे म्हणूनच ते अस॑ म्हणाले.
बाकी वर्णन छान आहे मनीषाताई.