पहिले महायुद्ध! प्रकरण २ भाग १-बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता.

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
6 Nov 2018 - 5:16 pm

पहिल्या महायुद्धाला तोंड कसे लागले ह्याचा संक्षिप्त इतिहास आपण पहिल्या प्रकरणात पहिला . ह्या युद्धात सगळ्यात आधी बळी गेले ते बेल्जियम हे चिमुकले राष्ट्र. ह्या बेल्जियम च्या तटस्थ राहण्याच्या हक्कावरूनच- त्या हक्काच्या जर्मनीने केलेल्या पायमल्लीमुळे हे युद्ध युरोपातील देशात लढले गेलेले एक छोटे मोठे युद्ध न राहता ते जागतिक महायुद्ध बनले.

पहिले महायुद्ध

प्रकरण दुसरे, भाग १

बेल्जियमवरचा बलात्कार आणि श्लिफेन योजनेची अपरिहार्यता.

इतिहास काळात बेल्जियमचा भूभाग रोमन साम्राज्यात मोडत असे. त्यापूर्वी त्या भागाला गॉल असे संबोधले जाई. तसा सध्याचा फ्रांस, बेल्जियम, नेदरलंड, स्वीत्झर्लंड, लक्झेम्बर्ग हा सगळा भुभागही गॉल म्हणूनच ओळखला जात असे.बेल्जीयमच्या ह्या भागात तेव्हा सेल्टिक(कि केल्टिक?), जर्मानिक आणि बेल्गिक अशा गॉल टोळ्यांची मिश्र वस्ती होती. त्यातील जरा जास्त प्रभावी अशा बेल्गिक टोळ्यांमुळे ह्या भागाचे नाव पुढे बेल्जियम झाले हा सगळा भाग इ.स.पूर्व ५३ ते १०० मध्ये रोमनांनी पादाक्रांत केला.रोमन आक्रमणाविरुद्ध बेल्गिक लोकांनी बंड केले. त्यांचा नेता होता अम्बिओरिक्स(Ambiorix). पण ताकदवान रोमन साम्राज्यापुढे ते टिकू शकले नाहीत अन त्यांचा पराभव झाला.(लहान मुलांच्या आवडत्या कार्टून सिरीज Asterix & Obelix मधील शूर आणि रोमन लोकांना शरण न जाता, उलट भरपूर पिडणारे गॉल ते हेच) रोमन साम्राज्याच्या पतनानंतर हा प्रदेश कधी फ्रांस कधी ऑस्ट्रिया ( हाब्सबर्ग घराणे) तर कधी स्पेन च्या अधिपत्य खाली राहिला. पुढे १८ व्या शतकात नेपोलियनने हा सगळाच प्रदेश जिंकला पण १८१५ साली पराभूत झाल्यावर जी विएन्ना कॉंग्रेस(१८१५) झाली त्यात हा भाग नेदरलंड ला बहाल केला गेला. मात्र ह्या नव्या सत्ताधारयांशी न पटल्याने तेथील लोकांनी बंड केले .१८३० साली त्यानी फ्रांस ची मदत मिळवून नेदरलंड पासून स्वातंत्र्य मिळवले.खरेतर रशियाला हे पसंत नव्हते आणि फ्रांस विरुद्ध त्यानी नेदरलंडला मदत करायचे ठरवले पण नेमकं त्याच सुमारास पोलंड मध्ये बंडाळी माजल्यामुळे रशिया फार काही करू शकला नाही.(तेव्हा पोलंड हा रशियाच्या अखत्यारीत येत असे.)पण नेदरलंडने मात्र ह्या त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याला दाबायचे ठरवले, पुढची ९ वर्षे त्यांच्यात लहानसहान लढाया, चकमकी होत राहिल्या अखेर १८३९ साली लंडन येथे फ्रांस, ऑस्ट्रिया, रशिया, जर्मनी ( तेव्हाचे जर्मन राष्ट्र संघ ) ह्यांनी एकत्र येऊन बेल्जियमला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आणि दबाव आणून नेदरलंडला ही मान्यता द्यायला भाग पाडले.इथेच त्यानी बेल्जियमच्या स्वातंत्र्य सार्वभौमत्व आणि तटस्थतेच्या रक्षणाची हमीही घेतली. ह्या सगळ्यात तत्कालीन ब्रिटीश परराष्ट्र सचिव लॉर्ड पामरस्टन ह्याने फार महत्वाची भूमिका बजावली. हा करार पुढे युरोपियन आंतरराष्ट्रीय कायद्याचा पाया ठरला. ह्या कराराचा हवाला देतच इंग्लंडने जर्मनीला बेल्जीयमच्या तटस्थतेचा मान ठेवायला सांगितले होते पण “हा करार म्हणजे एक कागदाचा कपटा( Scrap of Paper) फक्त आहे आणि त्यावरून इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारणे हा मूर्खपणा आहे...” अशा शब्दात जर्मनीने म्हणजे चान्सेलर बेथमान होल्वेगने त्या कराराची संभावना केली .ह्या त्याच्या कागदाचा कपटा( Scrap of Paper) म्हणून केलेल्या हेटाळणीचा पुढे इंग्लंडने जर्मनी विरुद्ध जनमत संघटीत करण्यासाठी चांगलाच उपयोग करून घेतला... असो.
मंगळवार ४ ऑगस्ट १९१४ रोजी सकाळी ८ वाजता जर्मन फौजांनी बेल्जियमवर हल्ला केला आणि परिणामी इंग्लंडने जर्मनीविरुद्ध ह्या युद्धात उडी घेतली. खरे पाहू जाता चिमुकल्या बेल्जियमचा, ऑस्ट्रिया,जर्मनी कुणाशीही काहीही झगडाच नव्हता. नी फ्रांझ चा खून असो वा बाल्कन प्रदेशातली सुंदोपसुंदी असो त्यांचा त्याच्याशीही दुरान्वयानेदेखील काही संबंध नव्हता. पण मग ह्या तटस्थ लहानशा देशावरच जर्मनीने पहिला वार का करावा! ह्याला कारणीभूत होता जर्मनीचा भूतपूर्व सेनाध्यक्ष आल्फ्रेड फॉन ग्राफ श्लिफेन आणि त्याने तयार केलेला प्रसिद्ध ‘श्लिफेन प्लान’. कोण होता हा श्लिफेन? आणि काय होता त्याचा प्लान?त्याची थोडी पार्श्वभूमी पाहू.

सेनाध्यक्ष आल्फ्रेड फॉन ग्राफ श्लिफेन

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१८३३ साली प्रशियातील साय्लेशिया प्रांतात श्लिफेन नावाच्या एका प्रतिष्ठित उमराव घराण्यात जन्माला आलेला आल्फ्रेड फॉन ग्राफ श्लिफेन १८५० पासून जर्मन सैन्यात होता. त्याचे वडील सैन्यात अधिकारी होते पण त्याला स्वत:ला आधी सैन्यात जायचे नव्हते तर वकिली करायची होती म्हणून त्याने वकिलीची पदवी अन सनद मिळवली पण त्याकाळी प्रशियात असलेल्या सक्तीच्या सैन्य सेवेच्या नियमाप्रमाणे सैन्यात काही काळ नोकरी करताना त्याला हे काम आवडले आणि मग तो तेथेच चिकटून राहिला. सैन्यात दाखल झाल्यानंतर पाच वर्षातच म्हणजे १८५५ साली त्याने बर्लिन इथल्या जर्मन सैनिकी प्रशिक्षण संस्थेतून उच्च शिक्षण घेतले.त्याकाळी प्रशियात आणि इतर बऱ्याच देशातही, उच्चवर्णीय उमराव घराण्यातले लोकच सैन्याधिकारी, सेनापती-जनरल वगैरे होऊ शकत असत. त्यातही ह्या प्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळणे जास्त प्रतिष्ठेचे मानले जाई कारण उमराव घराण्यातले असूनही सगळ्यांनाच तेथे प्रवेश मिळत नसे पण श्लिफेन मात्र वयाच्या फक्त २२व्य वर्षीच तेथे दाखल झाला आणि उत्तम गुणांनी परीक्षा पास देखील झाला. त्यानंतर तो सैन्याच्या नकाशा तयार करणाऱ्या आणि सैन्य हालचालीची योजना बनवणाऱ्या(Topographic Bureau of the General Staff)विभागात रुजू झाला. त्यामुळे त्याला जर्मनी तसेच एकूणच युरोपच्या भूगोलाबद्दल आणि त्याबरहुकूम जलद सैन्य हालचालीसाठी कराव्या लागणाऱ्या तयारीचे उत्तम ज्ञान प्राप्त झाले. त्याने जर्मन एकीकरणाच्या निमित्ताने झालेल्या प्रशिया-ऑस्ट्रिया (कोनिग्स्बर्ग-१८६६)युद्धात तसेच फ्रांको-प्रशियन युद्धात(१८७०-७१) सक्रीय सहभाग घेतला होता. नंतर त्याला प्रशियन युद्ध इतिहास आणि शिक्षण विभागाचा प्रमुख म्हणून बढती मिळाली.त्याने तेथे असताना अमेरिकन गृह युद्ध आणि त्यातील सैन्याचे दळणवळण, त्याकरता केला गेलेला रेल्वेचा-लोहमार्गाचा परिणामकारक वापर आणि आधुनिक दळण वळण तंत्रज्ञान ह्याचा बारकाईने अभ्यास केला होता. ह्याकाळात त्याला जर्मन सेनानी हेल्मुट फॉन मोल्टके (सिनियर) ह्याच्या बरोबर काम करायची संधी मिळाली. पुढे १८९१ साली जर्मन सरसेनानी (chief of the General Staff) आल्फ्रेड फॉन वाल्डर्सी हा निवृत्त झाल्यावर तो जर्मन सरसेनानी झाला.१९०६ साली घोड्यावरून पडल्याने श्लिफेन जखमी झाला आणि त्याने सैन्य सेवेतून निवृत्ती स्वीकारली. १९१३ साली म्हणजे पहिले मह्युद्ध सुरु व्हायच्या फक्त १९ महिने आधी तो वारला. अत्यंत कर्तबगार असूनही त्याला राजकीय महत्वाकांक्षा नव्हत्या त्यामुळे त्याने कधीही राजकारणात हस्तक्षेप केला नाही आणि सैन्यालाही सत्ताकारणापासून दूरच ठेवले.
१८९० साली रुसो-जर्मन मैत्री करार संपुष्टात आल्यावर आणि तो पुढे वाढवून द्यायला जर्मनीने म्हणजे कैसरने आणि चान्सेलर थिओ फोन काप्रीफी नकार दिल्यावर फ्रांस आणि रशिया मैत्री करार झाला.तसे पाहू जाता रशियात रोमोनाव्ह ह्या राजघराण्याची सत्ता होती. रशिया पराकोटीचा हा सरंजामशाही आणि फ्रांस तर पडलेप्रजासत्ताक – रशियाच्या रोमोनाव्ह घराण्याप्रमाणेच बर्बन ह्या राजघराण्याच्या जुलमी,दमनकारी राजसत्तेविरुद्ध रक्तरंजित क्रांती करून प्रजासत्ताक झालेला, त्यामुळे मुळातच अनैसर्गिक असलेला हा करार टिकणार नाही किंवा आपण त्यात यशस्वी रीतीने खिंडार पडू शकू अशी आशा जर्मन मुत्सद्द्याना वाटत होती. पण तसे काही झाले नाही. उलट हळूहळू तो मैत्रीकरार उतरोत्तर अधिकच दृढ होता गेला. पुढे १९०४ साली त्यात इंग्लंडही सामील झाले आणि ह्या तीन बड्या सत्तांची युती शेवटी आपल्याकरता गळफास ठरू शकते हे जाणवून जर्मन सत्ताधारी आणि सैन्याधिकारी दोघेही काळजीत पडले.( हे असे का झाले? ह्याची सविस्तर चर्चा आपण पहिल्या प्रकरणात केलेलीच आहे.)कैसरच्या एकंदर धोरणाकडे पाहता भविष्यात जर्मनीला रशिया आणि फ्रांस ह्या दोघांशीही एकाच वेळी दोन वेगळ्या आघाड्यांवर युद्ध करावे लागू शकते ह्याचा अंदाज आल्याने श्लिफनने आपले सगळे डावपेची ज्ञान वापरून असे दोन आघाड्यांवर लढावे लागणारे युद्ध जिंकण्याची एक योजना बनवली. हीच ती प्रसिद्ध श्लिफेन योजना किंवा श्लिफेन प्लान

श्लिफेन प्लान

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

श्लिफेन प्लान-ढोबळ मानाने

१८९७ पासूनच श्लिफेन ह्या योजनेची अगदी बारीक सारीक तपशिलासकट आखणी करत होता आणि त्यात कालानुरूप बदलही करीत होता, १९०६ साली निवृत्त झाल्यावरही त्याचे ह्या योजनेवर काम चालूच होते आणि त्याचे शेवटचे म्हणजे १९१२-१३ सालचे ४९वे संस्करण म्हणजेच हि श्लिफेन योजना.
फ्रांस आणि रशिया ही दोन्ही सैनिकी दृष्ट्या प्रबळ राष्ट्रे असली तरी फ्रांस हा जर्मनीप्रमाणे तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या सोयीत पुढारलेला असल्याने युद्ध सुरु झाल्यावर तो लगेचच पूर्ण तयारी निशी जर्मनीवर कोसळू शकतो त्यामुळे फ्रान्सला युद्धात प्रथम आणि जलद गतीने परास्त करणे तो पर्यंत रशियन सैन्याला पूर्व सरहद्दीवरच थोपवून धरणे हे ह्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते(आणि एकदा का फ्रान्सचा काटा काढला कि मग सर्व शक्तीनिशी रशियावर हल्ला करणे आणि त्यांना पराभूत करायचे ). रशिया सैन्य-संख्या बळात जर्मनीपेक्षा अनेकपटीने बलवान असला तरी त्याच्याकडे रेल्वे आणि इतर दळण वळणाच्या साधनांची कमतरता होती. त्यांचे सैन्यदेखिल प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे आधुनिक युद्धतंत्र, आणि इतर तंत्रज्ञानाच्याबाबतीतही जर्मनीच्या खूप मागे होते. ह्या कमतरता नुकत्याच झालेल्या १९०४-५ च्या रुसो जपान युद्धावेळी उघड झाल्या होत्या. शिवाय रशियाचा भूविस्तर अतिप्रचंड होता. प्रदेश दुर्गम, अपरिचित, प्रतिकूल हवामानाचा आणि सैन्य हालचालीसाठी खडतर होता. त्यांची मोस्को, पिटस्बर्ग अशी महत्वाची शहरे सीमेपासून बरीच आत आणि दूरदूर (एकमेकांपासूनही) होती. नेपोलियनने जसा रशियावर हल्ला करून तो पादाक्रांत करायचा प्रयत्न केला तसे करणे मूर्खपणाचे ठरले असते. त्यामुळे रशियाचा प्रांत काबीज करण्याचा वेडेपणा न करता सीमेजवळ त्याना पराभूत करणे गरजेचे होते. दुर्गम आणि विस्तीर्ण प्रदेशामुळे रशियाला देखील त्यांचे सैन्य सीमेजवळ आणायला जास्त वेळ लागेल तेवढ्या अवधीत फ्रान्सला पराभूत करणे गरजेचे होते.(श्लिफेनच्या अंदाजाने हा काळ साधारण ६ आठवडे होता, आणि त्याचा अंदाज बऱ्यापैकी बरोबर ठरला.)
फ्रांस आणि जर्मनीची सामायिक सरहद्द जेमतेम १५० मैल किंवा २५० किमी लांबीची आहे. त्याच्या दक्षिण टोकाला स्वित्झर्लंड हा तटस्थ देश तर उत्तरेकडे लग्झेम्बर्ग आहे. हा भाग बराच डोंगराळ असून तेथे १८७१ च्या युद्धात मार खाल्ल्यावर फ्रांसने वर्डून, मेट्झ, तुल, एपिनाल,बेल्फोर्ट अशा अनेक ठिकाणी पूर्ण सोयीने सुसज्ज अशा बुलंद लष्करी ठाण्यांची किंवा आधुनिक किल्ल्यांची मालिकाच उभारली होती, त्यांच्या मधून मोकळा, सैन्य बंदोबस्त नसलेला प्रदेश होता हे खरे पण त्यातून घुसायचा प्रयत्न करणाऱ्या जर्मन सैन्याला चिमटीत पकडून चोपून काढायचे ते सापळे होते हे उघड होते.ह्या सरहद्दीलाच लागून असलेल्या जर्मनीच्या अल्सेस-लोरेन प्रांतावर फ्रान्सचा डोळा होता. हा भाग आधी त्यांच्या कडे होता पण १८७०-७१च्या युद्धात नामुश्कीकारक पराभव पत्करल्यावर तो जर्मनांनी काबीज केला होता. त्यामुळे झालेल्या अपमानाचे उट्टे काढण्याची फ्रांस संधी शोधत होताच. थोडक्यात सांगायचे म्हणजे ह्या सीमेवरून हल्ला करून फ्रांस मध्ये घुसणे आणि त्यांचा पराभव करणे तेही कमीत कमी कालवधीत जर्मनीला शक्य नव्हते. १८७० साली वापरलेले धक्कातंत्र (सरप्राईज एलिमेंट) आता ह्यावेळी कामाचे नव्हते. शिवाय अशा समोरासमोरच्या युद्धात जर्मनीची हानीही खूपच झाली असती .
म्हणून मग जर्मनीने फ्रान्सवर हल्ला करताना तीन आघाड्यांवरून तो सुरु करायचा असे ठरवले गेले. प्रथम अल्सेस-लोरेन सरहद्दीवरून जोरदार हल्ला करायचा देखावा करायचा आणि फ्रांसने प्रतिहल्ला केला कि चक्क माघार घेत फ्रेंच सैन्याला त्यांची संरक्षक ठाणी सोडून जर्मनीत आत पर्यंत घेऊन यायचे त्याच वेळी भरपूर तयारीनिशी उत्तरेकडून बेल्जियमच्या सरहद्दीतुन प्रवेश करून फ्रान्सवर उत्तरेकडून जोरदार हल्ला करायचा. अल्सेस-लोरेन सीमेवरून आत आलेले सैन्य उत्तरेकडून आलेल्या आक्रमणाचा मुकाबला करायला मागे वळू लागले कि दक्षिणेकडे असलेली तिसरी फळी पाचरी प्रमाणे मध्ये घुसवून आत आलेले फ्रेंच सैन्य पहिल्या आणि तिसर्या आघाडीच्या कात्रीत पकडायचे. एकदा का उत्तरेकडून पूर्ण तयारीनिशी येणार्या सैन्याचा मार्ग निर्धोक झाला कि राजधानी पॅरिसला वेढा घालून १८७०-७१ प्रमाणे परत एकदा फ्रान्सला शरणागती पत्करायला भाग पडायचे अशी ढोबळमानाने ती योजना होती.तसे पाहू जाता ह्या योजनेत अभिनव किंवा क्रांतीकारी असे काही नव्हते. अशा युक्त्या इतिहासात अनेकांनी यशस्वी किंवा अयशस्वीरीत्या वापरलेल्या आहेत. त्या अर्थी ही एक साधी सरळ योजना होती. साधी सरळ असणे हा त्या योजनेचा गुणविशेष होता, एवढेच नाही तर ह्या योजनेप्रमाणे सैन्य हलचाली करायची सिद्धता जर्मनांनी केलेली होती. लक्षात घ्या त्यांनी ह्या योजनेप्रमाणे १४-१५ लाख जर्मन सैन्य फ्रान्समध्ये उतरवण्याची सिद्धता केलेली होती. त्याकाळी ट्रक बसेस वगैरे माल आणि माणसांची वाहतूक करणारी साधने अगदी प्राथमिक अवस्थेत होती, ती वारंवार नादुरुस्त होत आणि रस्ते ही खराब आणि कमी प्रमाणात असत. वाहतुकीचा मुख्य भर रेल्वे वरच होता पण त्यासाठी रेल्वे मार्ग उपलब्ध असले पाहिजेत. विशेषत: शत्रुप्रदेशात ते कसे पसरले आहेत? ते आपण काबीज करून वापरू शकतो? का अशा असंख्य बाबींचा त्यात विचार केला गेला होता आणि त्यामुळेच युद्धाच्या पहिल्या काही दिवसात जर्मन फौजांच्या हालचाली इतक्या जलद आणि झंझावाती होत्या कि फ्रांस सह सगळी दोस्त राष्ट्रे चकितच होऊन गेली.

पण ह्या योजनेत काही अंगभूत तृटी होत्या.

१.वर नकाशा कडे पाहिल्यावर कळून येतेकी ह्या योजनेत सगळ्यात उत्तरेकडच्या जर्मन सैन्यदलांवर अतिशय जलद गतीने हालचाल करत सगळा उत्तर फ्रांस काबीज करण्याची जबाबदारी होती. जर्मन सरहद्दीत असे पर्यंत त्याना रेल्वेमार्गाचा उपयोग होणार होता, बेल्जीयमम्ध्ये घुसल्यावर ही ते सैन्य दृष्ट्या अगदीच अशक्त असल्याने त्याना लगेच हरवून त्यांचे लोहमार्ग देखील सहीसलामत असतानाच काबीज करून वापरता येण्याची शक्यता होती पण एकदा का जर्मन सैन्य फ्रांस मध्ये घुसले कि मग मात्र त्यांचा प्रवास खडतर होता. त्यांची रसद रेषाही ताणली जाणार होती आणि त्याना फ्रेंच सैन्याच्या कडव्या संघर्षाला तोंड द्यावे लागणार होतेच शिवाय उत्तरेकडून- इंग्लंडकडूनही धोका होता. ह्या योजनेत इंग्लंड युद्धात उतरणारच नाही हे गृहीत धरले गेले होते आणि ते तसे तटस्थच राहावे ह्याची जबाबदारी राजकारण्यांवर टाकलेली होती.इंग्लंड जर फ्रान्सच्या बाजूने युद्धात उतरले तर काय करायचे? ह्याची योजनेत तरतूद नव्हती.थोडक्यात आपण ज्याला प्लान B म्हणतो (पर्यायी योजना ) तसली कुठलीही योजना तयार केली गेलीच नव्हती.

२.बेल्जियम सारखे देश लहान असले तरी ते कडवा प्रतिकार करू शकतात आणि जर्मनीकरता अत्यंत मौल्यवान असलेला वेळ खाऊ शकतात, दग्धभू धोरण अवलंबुन ते आपलच प्रदेश बेचिराख करत त्यातले रस्ते, लोहमार्ग, उद्योगधंदे, शेती नष्ट करून जर्मन सैन्याचे मार्गक्रमण खडतर करू शकतात, ह्याचा विचार श्लिफेन योजनेत केला गेलेला नव्हता. शिवाय १८३९ च्या कराराने जर्मनीबरोबरच इंग्लंड फ्रांस आणि रशिया हे बेल्जियमच्या तटस्थतेचे संरक्षक होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करत संरक्षकच असलेल्या जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केला तर त्याचे गंभीर राजकीय आणि लष्करी परिणाम होऊ शकतात ह्या बाबीकडे तर श्लिफेन योजनेत पूर्ण दुर्लक्ष (जाणून बुजून?)केले गेलेले होते.

३.सगळ्यात महत्वाचे म्हणजे जरी फ्रांसची राजधानी पॅरिस जर्मनांच्या हाती पडली तरी फ्रांस लगेच १८७० प्रमाणे शरणागती पत्करेल हा देखिल भाबडा आशावादच होता. १८७० साली फ्रान्समध्ये नेपोलियन दुसरा ह्याची राजसत्ता होती. आता तेथे प्रजासत्ताकाची पुनर्स्थापना झालेली होती आणि सरकार स्थिर होते. त्यामुळे पराभवाच्या छायेत तेथे राजेशाहीविरुद्ध क्रांती वगैरे होण्याची शक्यता अजिबात नव्हती.उलट प्रजासत्ताकवर झालेल्या हल्ल्याच्या विरुद्ध सगळी जनता आणि सैन्य एक झाले असते जसे ते झालेच ...

४.लोहमार्ग, आधुनिक शस्त्रास्त्रे आणि इतर सैन्य तंत्रज्ञान ह्याबाबतीत रशिया मागे असला तेरी तो फार काळ तसा राहणार नव्हता आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न जोरात चाललेलेच होते. जर्मन गुप्तचर विभागाच्याच माहिती नुसार १९१६-१७ पर्यंत रशिया त्याच्या संरक्षण सिद्धतेत स्वयंपूर्ण बनला असता आणि मग मात्र गोष्टी जर्मनीला नुसत्या अवघडच गेल्या नसत्या तर संभावित युद्धात जर्मनीला चक्क पराभव स्वीकारावा लागला असता. युरोपातल्या त्यांच्या दराऱ्याला त्यामुळे जबरदस्त तडाखा बसणार होता. ह्याची जाणीव जर्मन सेनाधीकाऱ्याना असल्याने जर युद्ध व्हायचेच असेल तर ते रशियाची तयारी पूर्ण व्हायच्या आत म्हणजे १९१४-१५ च्या आसपास व्हायला पाहिजे, तरच युद्धात जर्मनीचे पारडे जड झाले असते. थोडक्यात श्लिफेन योजनेला एक्सपायरी डेट होती तर.

श्लिफेन प्लानची एवढी माहिती झाल्यावर आपल्याला जुलै पेचावेळी जर्मनीने घेतलेल्या पवित्र्याची संगती लागू लागते. म्हणजे खरेतर सगळ्यात शेवटी सैन्य-जमवाजमव/ सिद्धता(General mobilization) सुरु केली त्यानी, पण रशियाविरुद्ध, फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारण्याची आणि बेल्जीयम वर हल्ला करण्याची घाई ही त्यानीच केली. एकदा का, युद्ध आता होणारच, ते टाळता येणे शक्य नाही हे कळल्यावर त्याना त्वरेने आपली शलिफेन योजना कार्यान्वित करणे आणि त्याप्रमाणे हालचाल करणे भाग होते. सगळ्यात महत्वाचा, मूल्यवान आणि अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असलेला वेळ वाया घालवणे जर्मनीला परवडणे शक्य नव्हते.
अर्थातच त्यावेळी हा श्लीफेन प्लान अत्यंत गुप्त असल्याने फक्त बड्या सेनाधिकाऱ्याना आणि मोजक्या राजकारण्याना त्याबद्दल संपूर्ण माहिती होती. असो तर ही ढोबळ मानाने श्लीफेन योजनेची आणि त्यातल्या त्रुटीची माहिती. झाली. आता आपण बेल्जियम कडे वळू.

राजा अल्बर्ट पहिला

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९१४ साली बेल्जियमवर राज्य करत होता राजा अल्बर्ट पहिला. तोच बेल्जियमच्या सैन्याचा सरसेनापतीही होता. अल्बर्ट लिओपोल्ड क्लेमंट मरी मेनार्ड हे त्याचे पूर्ण नाव.८ एप्रिल १८७५ साली ब्रुसेल्स मध्ये जन्मलेला अल्बर्ट बेल्जीयमच्या तेव्हाच्या राजा लिओपोल्डच्या धाकट्या भावाचा म्हणजे प्रिन्स फिलीप ऑफ फलॅण्डर्सचा पाचवा मुलगा. त्यामुळे तो पुढे राजा होईल ह्याची शक्यता धूसरच होती. पण त्याच्या आधीची सगळी भावंड ह्या ना त्या कारणाने वारल्यामुळे तोच सिंहासनाचा उत्तराधिकारी झाला.तो आईकडून जर्मनी किंवा तेव्हाच्या प्रशियाच्या नातेसंबंधात होता. त्याची आई प्रिन्सेस मेरी ही होहेन्झोलर्न घराण्यातली राजकन्या - प्रशियन पंतप्रधान कार्ल आंटोन ह्याची मुलगी होती तर त्याची बायको एलिझाबेथ ही एक बवेरीयान डचेस होती.त्याचा काका राजा लिओपोल्ड डिसेंबर १९०९ मध्ये वारल्यावर तो बेल्जियमचा राजा झाला. तो बराच उदारमतवादी आणि लोकप्रिय राजा होता.गादीवर आल्यावर त्याने प्रशासनात बऱ्याच सुधारणा केल्या, सैन्य शक्ती वाढवायचा प्रयत्न केला, १९१३ साली त्याने सक्तीची सैन्य सेवा(Conscription) लागू केली. जेव्हा १९१४ साली जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले तेव्हा साधारण २-२.५ लाखापर्यंत खडे सैन्य बेल्जीयम्कडे होते.पण लष्करी सामुग्री, प्रशिक्षण आणि अनुभवी सैन्य नेतृत्व मात्र तेवढया प्रमाणत नव्हते. संख्येनेही अर्थात ते जर्मनीपुढे अगदीच तोकडे होते पण त्यानी फ्रांस आणि जर्मनीला लागून असलेल्या सीमावर्ती भागात अनेक भक्कम, मजबूत तटबंदी असलेल्या किल्ल्यांची साखळी बांधली होती.त्यांच्या जोरावरच त्याने जर्मनीच्या भरधाव निघालेल्या युद्ध-वारुला बेल्जीयममध्येच थोडा काळ गुंतवले त्यामुळे इंग्लंड आणि फ्रान्सला तयारीला थोडा अवसर मिळाला.जर्मन सैन्याची आगेकूच धीमी करण्यासाठी म्हणून त्याने धरणे फोडूंन प्रदेश जलमय केला. हे कृत्यमात्र त्याच्या अंगलटच आले. ह्या कृत्यामुळे जर्मनांची आगेकूच फार थोड्या प्रमाणात का होईना, मंदावली हे खरे, पण त्यामुळे देशात ओला दुष्काळ, उपासमारी, साथीच्या रोगांचा फैलाव होऊन जवळपास ५० हजार सैनिक आणि जनता प्राणाला मुकले. अल्बर्टने जर्मनीच्या दबावापुढे अजिबात न झुकता, युद्धाकरता दंड थोपटल्यावर, बेल्जियमचीची जनता आणि सैन्यदेखिल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. अर्थातच लवकरच युद्धात त्यांचा दारूण पराभव झाला, जवळपास ९०% बेल्जियम जर्मनांनी व्यापला पण राजा अल्बर्ट आणि बेल्जियन जनता डगमगले नाहीत कि झुकले नाहीत. इंग्लंडच्या मदतीने उरलेल्या १०% भूभागातून पहिले महायुद्ध संपेपर्यंत ते जर्मनांशी लढत राहिले.
बेल्जीयम सरहद्दीमध्ये फौजा घुसवण्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे २ ऑगस्ट रोजी जर्मन सैन्याने लग्झेम्बर्ग ची सरहद्द ओलांडली होती. हा देखिल बेल्जियम प्रमाणेच, नव्हे अजून छोटा असा एक तटस्थ देश. त्याची एकूण लोकसंख्याच साधारण अडीच पावणेतीन लाख होती आणि खडे सैन्य होते हजार बाराशेच्या आसपास. त्याना तर तोंडदेखला प्रतिकारदेखिल करता येणे शक्य नव्हते, त्यानी फक्त तोंडदेखला निषेध करून शरणागती पत्करली.
आता प्रश्न उभा राहातो कि जर बेल्जियमच्या तटस्थतेच्या उल्लंघनामुळे जर्मनी विरुद्ध इंग्लंड युद्धात उतरले तर लग्झेम्बर्गच्या वेळी ते गप्प का बसले होते, नव्हे त्याविषयी ब्रिटीश संसदेत काही चर्चा झाल्याचे देखिल उल्लेख नाहीत, इतरही कुठेच काही निषेध निंदा वगैरे नाहीत. एवढेच नाही तर बहुतांश समकालीन इतिहास लेखकांनी लग्झेम्बर्गचा साधा उल्लेख देखील केलेला नाही.असा आप-पर भाव का? ह्या प्रश्नाचे उत्तर मोठे रंजक, इंग्लंडचे अंत:स्थ हेतू उघड करणारे आणि एकूण ह्या युद्ध आणि कटकटी मागची त्यांची भूमिका स्पष्ट करणारे आहे.’राजकारणात कुणीही कायमस्वरूपी मित्र नसतात.’ हे खरे पण तात्कालिक, तेवढ्या प्रसंगापुरते तरी ते मित्र असतात असे इंग्लंड त्यावेळी मानत होते का?त्यांचे खरेखुरे हेतू आणि धोरणे काय होती /आहेत ? अशा काही गोष्टी ह्यानिमित्ताने आपल्याला समजतील पण त्याबद्दल आपण ह्या प्रकरणाच्या शेवटी पाहू.
असो तर पुढील भागात बेल्जियम आणि फ्रांस मध्ये जर्मनांनी काय केले ते पाहूयात ...
क्रमश:

इतिहासलेख

प्रतिक्रिया

आदित्य कोरडे's picture

6 Nov 2018 - 5:21 pm | आदित्य कोरडे

कंपनीतल्या कामाचा लोड, घरी अचानक आलेली आजारपणं ह्यामुळे पुढचे भाग येण्यात एवढा विलंब झाला शिवाय आणि अक्षर मैफलच्या संपादकांची त्यांच्या मासिकाआधी इतरत्र कुठे प्रसिद्ध न करण्याची विनंती(वजा तंबी) होतीच पण आता अगदी राहवत नाही म्हणून थोड्या उशीराने का होईना दुसरे प्रकरण टाकायला सुरु करत आहे ...

आनन्दा's picture

6 Nov 2018 - 7:09 pm | आनन्दा

दिवाळी च्या मुहूर्तावर सुरुवात केलीत.. मस्त

आधी प्रतिक्रिया दिली, आता वाचतो..

कामानिमित्त काही वर्षे मी ब्रुसेल्समध्ये राहतो पण बेल्जियमसारखा लहान देश पहिल्या महायुद्धात कसा काय सहभागी झाला? याच उत्तर आज या लेखामुळे मिळाले त्याबद्दल कोरडेसरांचे शतांश आभार ... तसेच ब्रुसेल्स मधील काही बस थांब्याची नावे Ambiorix , बेलंगिक आणि लिओपोल्ड १, २ आणि ३ का आहे याचा उलगडा झाला..त्याबद्दल हि धन्यवाद !!

नोट: मिपावरील हि माझी पहिलीच कंमेंट असल्याबद्दल आनंद.. आणि काही वर्ष चुपचाप वाचनकरून कंमेंट न केल्याबद्दल क्षमस्व...

तुषार काळभोर's picture

7 Nov 2018 - 8:14 am | तुषार काळभोर

वाहतुकीच्या सोयी इतक्या मर्यादित असताना चौदा पंधरा लाख सैन्य, त्यांची रसद एवढी वाहतूक जलद गतीने करणे म्हणजे मोठे आव्हान असणार.

दुसऱ्या महायुद्धातसुद्धा अतिवेगवान लष्करी हालचाल हे जर्मनीच्या युद्धतंत्राचे प्रमुख वैशिष्ट्य होते.

दहा टक्के भूभागावरून पाच वर्षे संघर्ष करत राहण्याची बेल्जियमची चिकाटीसुद्धा कौतुकास्पद.

दीपक११७७'s picture

12 Nov 2018 - 1:11 pm | दीपक११७७

हा भागही छान झाला आहे.
सुंदर रेखाटन.

३१ जुलै १९१४ रोजी फ्रेंच कामगार संघटनेचा नेते 'Jean Jaurès' यांचा झालेला खून आणि पाहिलं महायुद्धाचा या मध्ये काही संबंध एस्सेल तर त्यावर माहिती वाचायला आवडेल. आस वाचण्यात आलं आहे कि जीन हे शांतिदूत म्हणून काम करत होते आणि ते युरोपमधील सगळ्या कामगारांना(फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया इत्यादी) युद्धामध्ये प्रत्येक्ष किंवा अप्रतेक्ष सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न करत होते पण व्यापरी संघटना(Business lobby) ज्यांना युद्ध हवं होत(ज्यामुळे त्यांचे युद्ध साहित्याचा व्यापार होईल आणि त्याच बरोबर कामगारांच्या मागण्या पण मागे पडेल ) म्हणून जीनचा बिमोड करण्यात आला? हे खरं आहे का?

आदित्य कोरडे's picture

13 Nov 2018 - 6:14 am | आदित्य कोरडे

असे म्हणतात खरे पण ज्यां जॉरेसचा खून मात्र एका राष्ट्रवादी उजव्या विचारांच्या तरुणाने केलेला होता जगातल्या सगळ्या कामगारांनी युद्धाचा विरोध केला पाहिजे कारण हे युद्ध भांडवलशाही आणि सरंजामशाही ह्यांनी एकत्र अभद्र युती करून कामगारांच्या न्याय्य व रास्त मागण्यांना बगल देण्यासाठी छेडले आहे तेव्हा देश प्रांत भाषा असले फुटकळ भेद विसरून जगातल्या सर्व कामगारांनी ह्या युद्धाला विरोध केला पाहिजे अशा प्रकारचे म्हणणे त्याचे होते. असले विचार त्यात तथ्यांश कितीही असला taree लोकांना आवडणे शक्य नव्हते , आजही आवडत नाही. युद्धानंतर जर्मनीत लोकांचे खरेखुरे सरकार ( वायमार रिपब्लिक) आले असताना देखील उजव्या विचार् सरणीच्या निमलष्करी स्वयंसेवक दलांनी (freicorps) गृहयुद्ध छेडले होतेच , रोझा लक्झेम्बर्ग सारख्यांची हत्या त्यानीच केली भांडवल शहा तेव्हा जर्मनीतून तरी दुबळे झाले होते आणि राजेशाही असत पावली होती हिटलर आणि नाझी पार्टी पटलावर येणे अजून खूप दूर होते . ह्या उलट युद्ध सुरुव्हायाच्या थोडेच आधी(३० जुलै १९१४ ) इंग्लंड मध्ये भांडवलदार व्यापारी stock brokers इत्यादींचे शिष्टमंडळ तेव्हाचे अर्थमंत्री लोइड जॉर्ज ह्याला जाऊन भेटले होते आणि इंग्लंडने ह्या युद्धात भाग घेऊ नये अशी गळ घातली होती,त्यामुळे आपले व्यापारी आणि आर्थिक नुकसान भयंकर होईल अशी भीती व्यक्त केली होती जे खरेही ठरले. ह्या युद्धात नागरिकांच्या प्राणाचे मोल देऊन का होईना पण आर्थिक फायदा फक्त अमेरिकेचा झाला हे खरे पण तसे काही होईल ही कल्पना अमेरिकेला ही नव्हती , म्हणजे डोंगराच्या वरच्या बाजूला वादळ येऊन झाडे पडली आणि नदीतून वाहत वाहत खालच्या बाजूच्या गावात आली लोकांना फुकट लाकूड मिळाले तसे अमेरिकन भांडवलदारांचे झाले काहीसे. त्यानी बक्कल पैसा कमावला हे खरे पण त्याकरता युअद्ध चालू व्हावे किंवा चालूच राहावे म्हणून मात्र काही केले नाही ...

राहुल५१'s picture

14 Nov 2018 - 7:23 pm | राहुल५१

धन्यवाद!

अस्वस्थामा's picture

14 Nov 2018 - 9:47 pm | अस्वस्थामा

मस्त हो..!

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2018 - 10:43 am | सुधीर कांदळकर

हाही भाग आवडला. धन्यवाद.

सुधीर कांदळकर's picture

15 Nov 2018 - 10:43 am | सुधीर कांदळकर

हाही भाग आवडला. धन्यवाद.

नजदीककुमार जवळकर's picture

4 Dec 2018 - 11:11 pm | नजदीककुमार जवळकर

खुप मस्त .. येऊ द्या !!