आईच्या बांगड्या
मला आईच्या हातातल्या बांगड्या आठवतात सारख्या. सोन्याच्या कमी आणि काचेच्या जास्त. आई उठताना, बसताना, काम करताना, पुस्तक वाचताना, शाळेचे पेपर तपासताना किंवा आणि काही करताना त्या काचेच्या बांगड्या एकमेकांना आणि सोन्याच्या बांगड्याना घासूंन एक सुंदर आवाज येत अशे. काचेच्या बांगड्या एकमेकांना घासल्या की किण किण असा आवाज येई. काचेच्या आणि सोन्याच्या बांगड्या एकमेकांना घासल्या की खण खण असा आवाज येई आणि काचेच्या आणि सोन्याच्या बांगड्या एकमेकांना घासल्या की वेगळा आवाज येई. आई जेवण करताना एक मधुरसा सुंदर आवाज येई आणि पहाटच्या वेळी तो आवाज काकड़ आरतीच समाधान देऊन जाई. सकाळी जर तीला शाळेत जायला उशीर झाला तर बांगड्यांचा वेग आणि नाद वेगळा अशे. भांडी वीसळताना वेगळा आवाज येई. अजूनही कधीतरी पहातटेच्या वेळी जाग येते आणि तो जेवणाचा सुरेख वास आणि बांगड्याची किण किण ह्यांचा भास होतो.
त्या बांगड्याना ती खुप जपत असे. कारण विचारल्यावर फक्त हसत असे. त्या तिच्या माहेराच्या बांगड्या होत्या आणि त्या तिच्या शरीराच्या अविभाज्य भाग होत्या. एकदा चुकुंन तिच्या कडून काचेची एक बांगड़ी फुटली तेंव्हा तिला खुप वाईट वाटल होत. तीन ते बोलून दाखवले नाही पण तरी पण मला ते कळल.
आता उद्यावर दिवाळी आली आहे. परवा अभ्यंग स्नान असेल. अश्यावेळी तीन अंगाला तेल उटण लावताना बांगड्यांचा जो विशिष्ठ आवाज यायाचा तो आठवतो. स्नान झाल्यावर कारीट फोडून ती भरभर रंगोली घालाय ची तो आवाज वेगळा यायचा. फराळ करतानाचा आवाज वेगळा, ओवाळणी करतानाचा आवाज वेगळा.
तिच्या शेवटच्या दिवाळीला मी तिला पैसे दिले होते ते तिने तिच्या कपाटात जपून ठेवले होते. त्यावेळी कपाट उघडताना आणि बंद करताना झालेला आणि बांगड्यांचा किण किण आवाज माझ्या कानावर आला. तो मिश्रीत आवाज म्हणजे आईच्या आयुष्यातली भैरवी होती खर तर ते आम्हाला खूपच उशिरा कळले.
आज शरण्या सणासुदीला कधीतरी काचेच्या बांगड्या घालते. त्या तिच्या छोट्या हातातल्या बांगड्या खण खण कण कण असा आवाज करतो. इतरांच माहीत नाही पण मला मात्र तो आवाज ओळखीचा वाटतो कारण माझ आणि त्या आवाजाच नात खुप जून आहे आणि तितकच लोभस सुद्धा