भा.रा.तांबे यांच्या निवडक कविता - १. रिकामे मधुघट

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जे न देखे रवी...
15 Dec 2007 - 6:25 pm

नमस्कार लोकहो,

राजकवि श्री. भास्कर रामचंद्र तांबे हे मराठी साहित्यातील अमोल रत्न. आमचे अत्यंत आवडते कवि.

दिनांक ७ डिसेंबर १९४१ रोजी हा प्रतिभावंत काळाच्या पडद्याआड गेला. मराठी काव्याचे 'मधुघट रिकामे' झाले. खरे तर भास्कररावांना आदरांजली म्हणून आम्ही "रिकामे मधुघट" ही मालिका ७ डिसेंबर रोजीच सुरू करणार होतो. पण ते जमले नाही.

भास्कररावांनी मराठीला दिलेल्या अमूल्य ठेव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या मालिकेच्या माध्यमातून भास्कररावांच्या काही निवडक कविता 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आमचा संकल्प आहे.

आज तांब्याच्या कविता वाचायला मिळणे ही गोष्टच दुर्लभ झाली आहे. आमचा हा संकल्प आमचे कुलदैवत श्री व्याडेश्वराच्या कृपेने सिद्धीस गेल्यास 'मिसळपाव'वर मराठी भाषेतील ही रत्ने कायमस्वरूपी जतन होतील.

हा संकल्प सिद्धीस जावो हीच श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.

भा.रा. तांबे यांच्या पुण्यस्मृतीस आमचे विनम्र अभिवादन.

आपला,
(भा.रा.वलेला) धोंडोपंत

रिकामे मधुघट

मधु मागशि माझ्या सख्या, परिं
मधुघटचि रिकामे पडति घरीं !..... ध्रु.

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं रोष न सखया, दया करी.....१

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गांठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणीं कशी तरी......२

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि रे बळ न करीं !......३

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविति हृदया,
अता मधूचें नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतिरीं........४

मधु मागशि माझ्या सख्या, परी
मधुघटचि रिकामे पडति घरीं !

राजकवि भास्कर रामचंद्र तांबे
लेखनकाळ - १९३३ , ग्वाल्हेर.

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Dec 2007 - 6:43 pm | विसोबा खेचर

पंत,

भास्कररावांनी मराठीला दिलेल्या अमूल्य ठेव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा लेखनप्रपंच आहे. या मालिकेच्या माध्यमातून भास्कररावांच्या काही निवडक कविता 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आमचा संकल्प आहे.

आपल्या या संकल्पाचे सहर्ष स्वागत आहे! तांब्यांच्या कविता मिसळपाववर जतन करायच्या असे आपण ठरवले आहे, ही गोष्ट मिसळपावला निश्चितच वैभवाशाली बनवणारी आहे!

वरील कविता हे एक आम्हाला आवडणारं अतिशय सुंदर गाणं आहे. दिदीचा हृदयाला हात घालणारा आवाज, सहजसुंदर चाल, मोहक ठेक्यातला केरवा यामुळे हे गाणं अतिशय श्रवणीय झालं आहे!

आपलाच,
तात्या.

ऋषिकेश's picture

15 Dec 2007 - 7:04 pm | ऋषिकेश

वा! हा संकल्प बघुन कोण आनंद झाला आहे म्हनून सांगु! आज तांब्याच्या कविता वाचायला मिळणे ही गोष्टच दुर्लभ झाली आहे हे खरेच. त्यामुळे असा अमोल ठेवा देऊ केल्याबद्दल धोंडोपंतांचे अनेक आभार आणि अनेकोत्तम शुभेच्छा!!
श्रीगणेशाही माझ्या एका आवडत्या गाण्याने केल्याबद्दल आभार!

काहि (आगाउ)सुचना,
१. गाणे दिल्यावर जर ते ऐकण्यासठी एखादा दुवा देता आला तर बहार येईल. अर्थात जेव्हा शक्य असेल तेव्हाच
संपादक मंडळ,
२. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का?

(या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश

विसोबा खेचर's picture

15 Dec 2007 - 7:19 pm | विसोबा खेचर

२. आता तर हे लेखन मुख्यपृष्ठावर साठवून ठेवायची नितांत आवश्यकता आहे. डॉ. साहेबांच्या लेखात धोंडोपंतांनी म्हटल्याप्रमाणे "संग्राही लेखन" नावाचा विभाग मुख्यपृष्ठावर करता येईल का? किंवा मग प्रत्येक सभासदाला वाचनखुणा साठवून ठेवण्याची सुविधा देता येईल का?
(या संकल्पाने आनंदित) ऋषिकेश

ऋषिकेशराव, मिसळपाववरील प्रेमाबद्दल आणि आस्थेबद्दल मनापासून आभार. लवकरच यातील तांत्रिक तज्ञ मंडळींना भेटून मिसळपावचे मुखपृष्ठ, साठवणीचे स्वरुप, रंगरूप, इत्यादी बाबतीत काही बदल करायचे ठरवले आहे.

तात्या.

विकास's picture

15 Dec 2007 - 7:06 pm | विकास

चांगला संकल्प आहे.

भा. रा. तांब्यांच्या कवितेत कधी कधी गर्भितार्थ फारच वेगळा असे, तसे माहीत असल्यास ती माहीती देखील येथे द्यावी. उ.दा. नववधू प्रिया मी बावरते ही प्रसिद्ध कविता आणि गाणे....

संजय अभ्यंकर's picture

15 Dec 2007 - 7:26 pm | संजय अभ्यंकर

पंत,

सुन्दर विषय निवडलात!
धन्यवाद!

संजय अभ्यंकर

नंदन's picture

15 Dec 2007 - 7:54 pm | नंदन

उत्तम उपक्रम, धोंडोपंत. या कवितांबरोबरच तुमचे त्यांच्यावरील भाष्यही वाचायला आवडेल. तात्याने म्हटल्याप्रमाणे, हे गाणंही अतिशय सुंदर आहे. खासकरून 'संध्याछाया भिवविती हृदया'चं आर्त कडवं.

कदाचित थोडं अवांतर होईल, पण 'करीं' वरील अनुस्वार पाहून सत्त्वशीला सामंतांची काही वर्षांपूर्वी लोकसत्तेत आलेली (दोन लेखांची) लेखमाला आठवली. जुन्या पद्धतीप्रमाणे, उच्चारानुसार अनुस्वार द्यायची पद्धत महाराष्ट्र राज्यशासनाने नेमलेल्या शुद्धलेखनविषयक समितीने १९६५ च्या आसपास कधीतरी काढून टाकली. यामुळे, विशेषकरून जुन्या गाण्यांच्या/कवितांच्या झालेल्या अर्थहानीबद्दल लिहिताना, त्यांनी या गाण्यातील 'मधु पिळण्यापरी बळ न करीं' या ओळीतील श्लेषाचे सुरेख उदाहरण दिले होते. माझ्या हातांत मध पिळण्याइतपत बळ नाही हा एक अर्थ, आणि मध पिळण्यासाठी बळ(जबरी) करू नकोस असा दुसरा. तुम्ही मूळ कविता तशीच लिहिलीत म्हणून आठवले. (त्या लेखातले, दुसरे उदाहरण म्हणजे -- 'तुझ्या गळां, माझ्या गळां'चे झालेले 'तुझ्या गळा, माझ्या गळा' हे भ्रष्ट रूप).
[ विषयांतर वाटल्यास क्षमस्व.]

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

प्रमोद देव's picture

15 Dec 2007 - 8:55 pm | प्रमोद देव

नंदनशी सहमत आहे. अतिशय उत्तम संकल्प आहे. माझ्या तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
अता मधुचे नाव कासया ह्या मध्ये कासया चा अर्थ काय असावा?
का सया असे तर नसावे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Dec 2007 - 8:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत,
भा.रा. तांबे यांच्या कवितांचे 'मिसळपाव' वर जतन करण्याचा आपण जो संकल्प आहे, त्यास आमच्या शुभेच्छा आहेतच.
पण, नंदन म्हणतात तसे, त्या कवितांवर आपले भाष्य आले तर खूप आनंद होईल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धोंडोपंत's picture

15 Dec 2007 - 9:57 pm | धोंडोपंत

वर अभिप्राय दिलेल्या सर्वांना धन्यवाद. आपल्याला हा संकल्प आवडला हे बघून आमचाही हुरूप वाढला.

१) तात्या - मिसळपाववर दर्जेदार साहित्य जतन व्हावं म्हणून आम्ही आमच्या कुवतीनुसार प्रयत्न करीत आहोत आणि करत राहू.

२) ऋषिकेश - गाणे ऐकण्यासाठी दुवा देणे या बाबतीत आम्ही फारच अडाणी आहोत. गाण्य़ांच्या दुव्यासंदर्भात जे तज्ञ आहेत त्यांनी यासंबंधी काही केले तरच.

३)विकासराव - सूचना स्वागतार्ह आहे. एकदा एखादी कविता येथे आली की त्यावर चर्चा करता येईल.

४)संजयराव - धन्यवाद

५)नंदनराव - आपल्या विचारांशी १००% सहमत. शासकीय नियम जेव्हा साहित्यात लुडबुडायला लागले तेव्हापासून मराठीची मोठी हानी झाली आहे. आम्ही मात्र येथे भास्कररावांनी जसे लिहिले तसेच लिहू. कारण आम्ही फक्त भारवाही म्हणून हे काम करीत आहोत. भास्कररावांनी लिहिलेले एक टिंबही वगळण्याचा प्रमाद आम्ही करायला धजावणार नाही. आपण लिहिलेले विषयांतर मुळीच नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा यात आहे जो लोकांपर्यत पोहोचला नसता.

६)प्रमोद राव - क्या बात कही है | नाव कासया आणि नाव का सया वर येथे चर्चा व्हावी. त्यातून सर्वांच्या जाणीवा समृद्ध होतील.

७) प्राध्यापक साहेब - आपली थाप पाठीवर असली म्हणजे झाले.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत's picture

15 Dec 2007 - 11:10 pm | धोंडोपंत

या कवितेबद्दल थोडेसे:-

या कवितेची माधव ज्युलियन यांच्या

का उठता खाली बसा तरूण मंडळी,
उपचार ठेविता का हा? समताच योग्य ह्या स्थळी

या कवितेशी जवळी़क वाटते. याचे कारण असे आहे की , माधव ज्युलियन यांनी या कवितेत त्यांचा काव्यदीप लयाला चालला असल्याची खंत व्यक्त केली आहे. आणि 'क्रांतीचे पुढील सौंदर्य" हे तरूण कविंवरच अवलंबून आहे असे म्हटले आहे.

तांब्यांनी हीच खंत अत्यंत भावुकपणे या कवितेत मांडलेली आहे की आजपर्यंत तुला हा काव्यरूपी मध मी देत आलो पण आता माझेच घट रिकामे होऊ लागलेत. कविता १९३३ ची आहे आणि तांब्यांचा मृत्यू १९४१ चा. आयुष्याच्य़ा अखेरच्या पर्वात लिहिलेली . म्हणून ते म्हणतातआजवरी कमळाच्या द्रोणी तुला हे रसपान घडवले ती पूर्वीची सेवा आठव आणि आता रागावू नकोस.

आता जे आहे ते शेवटची राहिलेली एकच दुधाची वाटी ती देवपु़जेसाठी उरलेली आहे. आता जे काही उरले आहे ते ईश्वरार्पण. ती एकमेव वाटी (थोडासा काव्यरस) कसाबसा धेऊन मी पुढचा प्रवास करणार आहे.

तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही.

आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय.

तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल?

आपला,
(प्रभावित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर's picture

16 Dec 2007 - 12:30 am | विसोबा खेचर

तुला जीवनातील विविध रसांचे अमृतपान करायचे आहे. त्यात तारूण्यातील शृंगार आहे, तरूण -तरूणींची सल्लज कुजबुज आहे, निसर्ग आहे, संसारातील विविध गोष्टींबद्दल तुला ऐकायचे आहे. पण काय करू? आता माझ्यात ते बळ उरलेले नाही.

आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय.

वा पंत! अतिशय सुरेख रसग्रहण...

तांबे जरी म्हणाले की माझ्या प्रतिभेला ओहोटी लागलेय. पण ही कविता वाचल्यावर कोणाला वाटेल की या माणसाच्या प्रतिभेला कधी ओहोटी लागू शकेल?

क्या बात है! अगदी खरं...

पंत, आपल्याकडून तांब्यांच्या, कुसुमाग्रजांच्या आणि इतरही उत्तमोत्तम कवींच्या कवितांचे उत्तम रसग्रहण इथे लिहिले जावो आणि आम्हा रसिक मिसळप्रेमींना ते वाचावयास मिळो हीच शुभकामना..

तात्या.

सुनील's picture

15 Dec 2007 - 10:52 pm | सुनील

ह्या कवितेचा जन्म एका पोस्टकार्डावर झाला होता असे कुठेतरी वाचल्याचे अंधुकसे स्मरते (चु भू द्या घ्या). भास्कररावांच्या एका स्नेह्याने, "बर्‍याच दिवसात तुमची नवी कविता आली नाही तेव्हा आता एक येऊद्यात" असे पत्र पाठवले. त्याला उत्तर देताना भास्कररावांनी ही कविताच पाठवली. अशी कथा आहे.

बाकी भा रा तांब्यांच्या कविता इथे देण्याचा संकल्प छानच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सर्किट's picture

16 Dec 2007 - 6:40 am | सर्किट (not verified)

मीही असेच ऐकले होते..

- सर्किट

उग्रसेन's picture

16 Dec 2007 - 12:43 am | उग्रसेन

धोंडू भाऊ
लय भारी लिव्हाला सुरुवात झाली

जन पळ भर म्हणतील काव- काव

तेचा बी अर्थ सांगा जरशीक.

धोंडोपंत's picture

16 Dec 2007 - 11:41 am | धोंडोपंत

बाबूराव,

भास्कररावांच्या कवितांवर प्रगल्भ प्रतिसाद अपेक्षित आहेत.

कृपया आमचा नाही पण त्यांचा मान राखा.

प्लीईईईईईईईईईईईईईईईज.

धोंडोपंत

सर्किट's picture

16 Dec 2007 - 6:39 am | सर्किट (not verified)

धोंडोपंत,

मिसळपावावर आपल्यासारख्यांचा वावर ही मिसळपावाला अभिमान वाटावा अशी गोष्ह्ट आहे !

तांब्याम्च्या कवितांचे इतके सुंदर रसग्रहण आपण करताहात, की क्या कहने !

आपला हा उपक्रम हा असाच सुरू रहावा, ही शुभेच्छा !

- सर्किट

मुक्तसुनीत's picture

16 Dec 2007 - 6:59 am | मुक्तसुनीत

भा रा तांबे यांच्या कविता आमच्या पिढीपर्यंत पोचल्या त्याचे श्रेय मंगेशकर भावंडाना जाते. किंबहुना वसंत प्रभु आणि मंगेशकर यानी त्यांच्या कवितेतील उत्तमोत्तम धन गाण्यांच्या रूपाने जतन केले , लोकांपर्यंत पोचविले. वसंत प्रभुंनी दिलेली तांब्यांची गाणी साठीच्या दशकाच्या आगेमागे मनामनात पोचली. त्यात रेडीयोचा वाटा फार मोठा होता. "देवानाही हेवा वाटावा" असे प्रेम या गाण्याना , गायकाना आणि संगीतकाराना उभ्या महाराष्ट्राने दिले. आणि त्या सगळ्याचा एक मोठा परिणाम म्हणजे रेडीयो ऐकणार्‍या लाखो लोकांपैकी तांब्यांच्या पुस्तकांकडे वळले. राजकवी तांबे त्यांच्या मृत्यूनंतर अनेक दशकानी लोकांपर्यंत पोचले. त्या गाण्यातील आणि संगीतातील गोडी इतकी की, आजच्या भीषण वेगवान जगात सुद्धा कुणाला त्याची आठवणा जतन करावीशी वाटते; आणि कित्येक जणांची दाद त्याला मिळते.

व्यक्तिशः मला मंगेशकरानी केलेली तांब्यांची गाणी फार आवडतात. "मावळत्या दिनकरा" सारख्या कवितेने मंगेशकराना आपल्या स्वतःच्या वडीलांच्या आठवणीपर्यंत नेले आणि एका उत्कृष्ट सांगितिक रचना जन्माला आली. "दे मला गे चंद्रिके" हे देखील (कलावती रागातील ?) फार सुंदर गाणे आहे.

प्राजु's picture

16 Dec 2007 - 9:44 am | प्राजु

सुंदर आहे ही कल्पना..
आणखीही येऊदेत तांब्यांच्या कविता...

खूप दिवसांनी वाचते आहे या कविता.

- प्राजु.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Dec 2007 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पंत,
कवितेचे रसग्रहण आवडले.

आता दिवस ढळत आलाय. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. आता कसला मधुरस मागतोस? कसा देऊ तुला आता? आता तर पैलतीरावर दृष्टी लावून मी बसलोय.

मस्त !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंत's picture

16 Dec 2007 - 1:29 pm | गुंडोपंत

वा! मस्त प्रकल्प आहे.
कविता वाचायला मिळाव्यात हे आमचे भाग्यच आहे.
आपल्याला या कार्यासाठी शुभेच्छा!

आपला
गुंडोपंत

केशवसुमार's picture

16 Dec 2007 - 2:17 pm | केशवसुमार

धोंडोपंत,
हा ही संकल्प अतिउत्तम.. अभिनंदन आणि शुभेच्छा..
सगळे संकल्प खंड न पाडता लगेच हता वेगळे करा..
अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना)
(आतूर) केशवसुमार

विसोबा खेचर's picture

16 Dec 2007 - 7:59 pm | विसोबा खेचर

अवांतरः मि.पा. मालकांनी त्यांचे असे बरेच उत्तोमोत्तम संकल्प रंगाळत ठेवले आहेत ह्या आठवण झाली म्हणून हि काळजी वजा विनंती (सुचना)

हम्म! अवश्य करू सुमार साहेब. आत्ताच जरा कुठे काही नवीन लेखन करण्यास निवांतपणा मिळाला आहे! :)

आता भरभरून लिहीन...:)

तात्या.