वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : १

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
4 Oct 2018 - 10:52 am

नुकतेच २०१८चे विविध शाखांतील नोबेल पुरस्कार जाहीर झाले. ज्या विज्ञान शाखांमध्ये हे पुरस्कार दिले जातात त्यात वैद्यकशास्त्र ही एक महत्वाची शाखा आहे. जेव्हा एखादा वैद्यकातील पुरस्कार जाहीर होतो तेव्हा संबंधित विजेत्यांबरोबरच त्यांच्या संशोधनाचा विषयही कळून येतो. बऱ्याचदा त्या विषयाचे नाव आणि कामाचे स्वरूप हे सामान्य वाचकाला समजत नाही. तेव्हा हे काहीतरी ‘उच्च’ असून क्लिष्ट आहे अशी त्याची भावना होते. परंतु, कालांतराने या संशोधनावर आधारित एखादी नवी रोगनिदान अथवा रोगोपचार पद्धत उपलब्ध होते. तेव्हा असे संशोधन खऱ्या अर्थाने मानवजातीसाठी वरदान ठरते.

इतिहासात डोकावता असे दिसेल की १९०१ ते २०१७ च्या कालखंडात २१४ व्यक्तींना हा पुरस्कार दिला गेलेला आहे. यंदाचा पुरस्कार कर्करोग उपचारातील संशोधनासाठी एका वैज्ञानिक द्वयीला जाहीर झाला आहे. वैद्यकातील या पुरस्काराचे अधिकृत नाव ‘ Nobel prize in Physiology or Medicine’ असे आहे.
यातील Physiology म्हणजे ‘शरीरक्रियाशास्त्र’ तर Medicine म्हणजे ‘औषधवैद्यक’. थोडक्यात सांगायचे तर Physiology हा औषधवैद्यकाचा पाया असतो. शरीराच्या अनेक क्रिया होत असताना विशिष्ट पेशींत काय मूलभूत घडामोडी होतात याचा तो अभ्यास असतो. त्या ज्ञानावर आधारित पुढे रोगांचा अभ्यास होतो. त्यापुढे जाऊन रोगनिदान पद्धती विकसित होतात आणि शेवटी योग्य ते उपचार शोधले जातात.

अशा प्रकारे गेल्या ११८ वर्षांत वैद्यकात अनेक नोबेल पुरस्कार दिले गेले आहेत. साधारणपणे त्या संशोधनांचे स्वरूप असे होते:
१. पेशींची रचना व कार्य
२. पेशींतील मूलभूत रेणूंचा शोध (उदा. DNA)

३. शरीरक्रियांचा अभ्यास
४. जनुकांचा अभ्यास

५. रोगजंतूंचा शोध
६. रोगांची कारणमीमांसा

७. रोगनिदान पद्धतींचा शोध
८. जीवरक्षक औषधांचा शोध
९. अवयवरोपणाचे उपचार

अशा संशोधानापैकी सुमारे १५-२० संशोधने ही अत्यंत मूलगामी स्वरूपाची होती आणि त्यांचा वैद्यकाच्या वाटचालीवर खूप प्रभाव पडला. ‘अभूतपूर्व’ आणि ‘क्रांतिकारी’ असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. या संशोधनांचा व संबंधित संशोधकांचा अल्प परिचय वाचकांना या लेखमालेतून करून द्यावा असा विचार आहे. तो शक्य तितक्या सोप्या भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न करेन. एका लेखात २-३ संशोधने घ्यावीत असा विचार आहे. वाचकांच्या प्रतिसादानुसार मालेची लांबी कमीअधिक करता येईल.

सध्या यंदाचे नोबेल पुरस्कार क्रमाने जाहीर होत आहेत. यथावकाश त्यांचे वितरण होईल. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वैद्यक-पुरस्कारांच्या इतिहासात डोकावत आहे. वाचकांनाही ते रोचक वाटेल अशी आशा आहे.
*********************************************
या लेखमालेचे एकूण १० भाग असून भागवार विषय सूची अशी आहे:

भाग १ : प्रास्ताविक
२ : अ) घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy)
आ) पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास

३. : अ) थायरॉइड ग्रंथीचे कार्य, रोगमीमांसा व शल्यचिकित्सा यांचा सखोल अभ्यास
आ) इन्सुलिनचा शोध
इ) इ.सी.जी. चा शोध व अभ्यास

४. : मानवी रक्तगटांचा शोध
५ : पेनिसिलिनचा शोध व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापर

६. : अ) क्ष-किरणांमुळे होणाऱ्या जनुकीय बदलांचा शोध
आ) डीएनए या रेणूच्या रचनेचा शोध
७. इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार

८. MRI या प्रतिमातंत्रासंबंधी संशोधन
९. HIV चा शोध
१०. समारोप

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

4 Oct 2018 - 11:27 am | प्रसाद_१९८२

वैद्यकशास्त्रातील सर्वाधिक नोबेल पुरस्कार, आतापर्यंत कोणत्या देशातील संशोधकांना मिळाले आहेत ?

कुमार१'s picture

4 Oct 2018 - 11:57 am | कुमार१

अमेरिका ९३
यु. के. २९
जर्मनी १६

पुंबा's picture

4 Oct 2018 - 11:54 am | पुंबा

वाहवा!!
येऊ द्या. प्रतिक्षेत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Oct 2018 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे वा ! सुंदर विषय... आणि ति तुम्ही तुमच्या माहितीपूर्ण व रोचक शैलीने मस्त खुलवाल यात संशय नाही !

अनिंद्य's picture

4 Oct 2018 - 2:39 pm | अनिंद्य

उत्तम विषय. आधुनिक वैद्यक संशोधनाचा इतिहासच डोळ्याखालून जाईल म्हणायचा.

लेखमालेच्या प्रतीक्षेत.

NiluMP's picture

4 Oct 2018 - 5:13 pm | NiluMP

Waiting...........

श्वेता२४'s picture

4 Oct 2018 - 5:25 pm | श्वेता२४

ज्ञानात भर घालणारे असतात. क्लिष्ट विषयही अत्यंत सोपा करुन सांगता. वाचायला आवडेल

कुमार१'s picture

4 Oct 2018 - 6:46 pm | कुमार१

प्रोत्साहनाबद्दल आभार. तुमच्या शुभेच्छांमुळेच या लेखमालेस हात घालत आहे.

लेख उत्तम आहे त्याबद्दल धन्यवाद. एक खटकले ते म्हणजे तुमचे फिझियोलोजि या शब्दाचे स्पेलिन्ग. त्यात वाय हे अक्शर हवे होते.

कुमार१'s picture

5 Oct 2018 - 7:30 am | कुमार१

चुकीबद्दल माफी असावी .
अनवधानाने झाले.

चौकटराजा's picture

5 Oct 2018 - 6:43 pm | चौकटराजा

या लेख मालेचीच वाट पाहात आहे . खरे तर अनेक शोध हे महत्वाचे आहेत . माझ्या मते डी एन ए , रक्तगट व प्रति जैविक हे हे बाजी मारतील बहुदा !

तुषार काळभोर's picture

5 Oct 2018 - 7:14 pm | तुषार काळभोर

अतिशय रोचक विषय!

कुमार१'s picture

5 Oct 2018 - 7:16 pm | कुमार१

अगदी मनकवडे आहात बुवा !

एका शतकाच्या पुरस्कारांतून मोजके निवडायचे काम कठीण आहे खरे. त्याचीच मनात घुसळण चालू आहे.
धन्यवाद

अथांग आकाश's picture

5 Oct 2018 - 7:38 pm | अथांग आकाश

.

कुमार१'s picture

5 Oct 2018 - 8:23 pm | कुमार१

धन्यवाद.
अ आ, तो फोटो छान आहे, कोणाचा ते कळेल का ?

फोटो कोणाचा आहे माहित नाही! जालावरचाच चिकटवलाय!

पुंबा's picture

7 Oct 2018 - 8:41 pm | पुंबा

हौ आय मेट युअर मदर या सिरीजमधला बार्नी आहे तो..

सुधीर कांदळकर's picture

6 Oct 2018 - 6:06 am | सुधीर कांदळकर

लेखमाला अपूर्व सुंदर ठरो .....शुभेच्छा

शेखरमोघे's picture

6 Oct 2018 - 10:58 pm | शेखरमोघे

उत्तम विषय आणि योग्य वेळी निवडलेला. जरी प्रत्येक नोबेल परितोषिक जाहीर होताना त्याबद्दल थोडीबहुत माहिती देखील प्रसिद्ध होते, बर्‍याच वेळा ती त्रोटक असते. आपल्या (नेहेमीप्रमाणेच्या) माहितीपूर्ण मालिकेच्या प्रतिक्षेत!

कुमार१'s picture

7 Oct 2018 - 8:15 am | कुमार१

प्रोत्साहनाब द्दल अनेक आभार !

निशाचर's picture

8 Oct 2018 - 4:31 am | निशाचर

उत्तम विषय! लेखमालेच्या प्रतीक्षेत.

कुमार१'s picture

8 Oct 2018 - 7:14 am | कुमार१

इथे आहे:
https://www.misalpav.com/node/43402

प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार !

ट्रम्प's picture

9 Oct 2018 - 5:49 pm | ट्रम्प

लेखमाले बरोबर नोबेल पारितोषिक चा इतिहास सुद्धा दिला तर सोने पे सुहागा होईल .
नोबेल म्हणजे कोण ? ही संस्था कोणती ? पारितोषिक देण्याचा त्यांचा हेतू काय ?

कुमार१'s picture

9 Oct 2018 - 6:36 pm | कुमार१

सवडीने एक परिच्छेद लिहितो.
ते बहुतेक सर्वांना माहीत असतो म्हणून मी फक्त वैद्यकीय शाखेपुरतेच मर्यादित ठेवले आहे.

कुमार१'s picture

9 Oct 2018 - 7:17 pm | कुमार१

Alfred Nobel हे स्वीडिश अभियंता होते. त्यांनी आपल्या मृत्युपत्रा द्वारे मोठी संपत्ती मागे ठेवली. त्याचा विनियोग ६ क्षेत्रातील मूलभूत संशोधन अथवा कल्याणकारी काम करणाऱ्या व्यक्तीस पारितोषिक देण्यासाठी केला जातो. ती क्षेत्रे अशी:

१. भौतिकशास्त्र
२. रसायनशास्त्र
३. वैद्यकशास्त्र
४. साहित्य
५. शांतता
६. अर्थशास्त्र ( हे मुळात नव्हते, नंतर स्वीडिश बँकेने चालू केले)

१९०१ पासून ही दरवर्षी जागतिक स्तरावर दिली जातात.

…..
या लेखमालेत फक्त वैद्यकीय शाखेचा विचार केलेला आहे.

गुल्लू दादा's picture

10 Oct 2018 - 4:30 pm | गुल्लू दादा

सुंदर सुरुवात झाली आहे सर....येऊ द्या आता पटापट..;)

यंदाचा नोबेल-शांतता पुरस्कार Congoच्या एका डॉक्टरना विभागून मिळाला आहे. म्हणून हे दोन शब्द.

डॉ डेनिस मुकवेगे हे ते डॉ.
त्यांच्या देशात कायम युद्ध वा सदृश परिस्थिती असते. कुठल्याही युद्धात स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतात. ते भीषण असतात. अशी शिकार झालेल्या स्त्रियांना ते १९९९ पासून वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र रुग्णालय उभे केले आहे.
त्यांच्या या थोर कार्याबद्दल सलाम !

कुमार१'s picture

24 Dec 2018 - 9:59 am | कुमार१

आज ही लेखमाला समाप्त झाली आहे. तिचे एकूण १० भाग असून भागवार विषय सूची अशी आहे:

भाग १ : प्रास्ताविक
२ : अ) घटसर्प (Diphtheria) या रोगावर प्रतिविषाचे उपचार (serum therapy)
आ) पचनसंस्थेचा मूलभूत अभ्यास

३. : अ) थायरॉइड ग्रंथीचे कार्य, रोगमीमांसा व शल्यचिकित्सा यांचा सखोल अभ्यास
आ) इन्सुलिनचा शोध
इ) इ.सी.जी. चा शोध व अभ्यास

४. : मानवी रक्तगटांचा शोध
५ : पेनिसिलिनचा शोध व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापर

६. : अ) क्ष-किरणांमुळे होणाऱ्या जनुकीय बदलांचा शोध
आ) डीएनए या रेणूच्या रचनेचा शोध
७. इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार

८. MRI या प्रतिमातंत्रासंबंधी संशोधन
९. HIV चा शोध
१०. समारोप
***************************************************