बदमाश अँथनी स्मिथ भाग ३.
सुरतच्या बदसूरतीची कहाणी
रेव्हरंड एल ईस्कालियट लिहितो. " बुधवार दि ६ जानेवारी १६६६...
सुरतच्या सीमेवरील एका बागेत शिवाने तळ ठोकला. आणि त्याच्या सैनिकांनी धडाधड घुसून आगी लावून धुमाकूळ घालत सुरतच्या किल्ल्यावर मोर्चा वळवला. आम्ही वरून पहात होतो की काळ्या धुरांचे लोळ उठत होते. ते तसे पुढे ३ दिवस रात्रंदिवस भडकत होते. म्हणतात की सुरतच्या गडकऱ्यानी किल्ल्यावरून तोफा डागून शिवाच्या सैन्याला भेडसावून पाहिले. पण ते परत जायच्या ऐवजी तोफबाजीतील गोळे आपल्याच गावकर्यांच्या परिसरात पडून बरेच नुकसान झाले.
मराठ्यांच्या सैनिकांच्या तुकड्या शहरातील गबर व्यापारी पेठांमध्ये एकेक घरात घुसून त्यांच्या कडील मालमत्ता, लपवलेला माल शोधायला जमिनी, भिंती खणायला लावून माल जप्त करून जाताना त्या हवेली, पेढी आगलावून जात. आमच्या कस्टम्स हाऊसमधील १००० पौंड किमतीच्या निर्यातीच्या कापडाच्या गाठी त्यांनी पळवल्या.
हे सगळे लुटालुटीचे आणि जाळपोळीचे प्रकार चालले होते त्या गोंधळात अँथनी स्मिथ आमच्या स्वालीच्या कचेरीतून सटकला. पण पकडला गेला. तो सांगतो की शिवा त्याला म्हणाला, 'औरंगजेबाने आपल्याच नातलगांना मारून व आमच्या देशातील प्रजेवर जे अत्याचार चालवले आहेत त्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्याच्या श्रीमंत शहरात येऊन त्याला धडा शिकवावा म्हणून आलोय. तुम्हा विदेशी व्यापाऱ्यांना त्रास द्यायला, मारायला आम्ही आलेलो नाही. पण जर डच, इंग्रज व्यापारी लोकांनी आम्हाला मागू तितकी मागणी पुरी केली नाही तर मग मात्र तुमचा भरपूर छळ करू.' मेहेंदळे नोंदवतात की असे बोल फक्त फुशारक्या मारू अँथनी स्मिथ म्हणाला असे नाही. एका १९ मार्चच्या इंग्रजी पत्रातून अशाच आशयाचे विधान कळवले गेल्याने अँथनी स्मिथचे कथन विचारात घ्यावे लागेल.
शुक्रवारी वीरजी व्होरा यांची हवेली लुटली व जाळली. त्याचे डच कचेरीवर त्याचे ही आगीचे लोळ येत राहिले. काळ्या धुरामुळे दिवसा रात्र झाली आहे कि काय अशी गत झाली होती. धामधुमीत इंग्रजांनी आपल्या रक्षणासाठी कशी तयारी केली ते समजून घेणे रंजक आहे. जहीर बेग नामक सरदाराच्या हवेली शेजारी इंग्रजी लोकांची कचेरी होती. झहीर बेग किल्ल्यावर अडकला होता. त्याला निरोप पाठवून इंग्रजांनी त्याच्या घरात प्रवेश करून त्याच्या घराला व मालमत्तेला वाचवायला परवानगी मागितली. उद्देश असा की जाळपोळ झाली तरी आपल्या पर्यंत त्याची झळ सोसावी लागू नये. तशी मिळाली व तोफांचे मोर्चेबांधणी तिथे करून हल्ल्याच्या तयारीमुळे वखारीतील जानमाल सुरक्षित राहिला. असो.
अँथनी स्मिथच्या बदमाश कारवाया
१६५८मधे अँथनी अहमदाबाद येथील इस्ट इंडिया कंपनीचा मुख्य म्हणून नियुक्त झाला. तिथे त्याने गोलमाल करून बरीच खाजगी देणी करून ठेवली. कदाचित म्हणून त्याला मोचा या एडन जवळच्या कचेरीत १६५९ साली पाठवण्यात आले. पण अहमदाबादेतील व्यापारी कंपनीच्या मालाला अडवून पैसे परत करता करता कंपनीला तोटा सहन करावा लागला. मोचा बंदराच्या कचेरीत गेल्यावर तिथे कंपनीच्या व्यापारात घोटाळे करून ठेवलेन. पुढे ४ वर्षे तो सुरतच्या कचेरीत त्याने वेळोवेळी कामाचे रिपोर्ट पाठवले नाहीत. गडबडगुंडा करत पैशात, मालात हेराफेरी केली म्हणून सूरतला परत गेलाच नाही. खूप आज्ञा मिळूनही त्याने कंपनीच्या लोकांना दाद दिली नाही.
मधल्या काळात त्याचे मोचा बंदराच्या मुखियाशी बिनसले. तो त्याच्यावर भडकला होता. कारण अँथनी स्मिथ महाशयांनी रेड सीमधे धुमाकूळ घालणाऱ्या ह्युबर्ट ह्युगो नामक समुद्री चाच्याशी सलगी करून उपद्रवाला फूस दिली होती असा संशय होता. त्याने केले काय की ह्युगोच्या चाच्यांना आपल्या वखारीत बोलावून घेतले आणि तिकडे मोचाच्या गव्हर्नरकडे माझ्या पश्चात वखारीतील माल लुटीची खोटी तक्रार दाखल केली. १६६३ साली शेवटी सूरतच्या कचेरीतून दोन जणांना त्याला अटक करून ताब्यात घ्यायला पाठवले गेले. तर ते दोघेही बराच काळ गायब झाले. शेवटी त्याला सुरतेत आणले तेंव्हा त्यावर अनेक आरोप टाकून नोकरीतून काढून टाकले गेले. पण अँथनी स्मिथ बारा गावचे पाणी प्यालेला गडी!
नोकरी गेली तरी परिवार घेऊन सुरतेत राहायला लागला.
त्या सुमारास कंपनीने लंडन मधून आलेले ब्रॉड क्लॉथ अगदी कमी दर लावून बाजारात व्यापाऱ्यांना विकून नंतर मालाला उठाव आल्यावर एकदम भाव वाढवून फायदा कमवायचा असे ठरवून विक्री केली. पण ही बातमी अँथनी स्मिथने व्यापारी लोकांत पसरवून व्यापाऱ्यांचे सिंडिकेट करून कंपनीला गंडा घातला. इतकेच नव्हे तर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याला हजार रुपयांच्या हिर्यांच्या अंगठीची लालूच दाखवून फोडायला पाहिले. तो बधला नाही. पण मग त्याला कैदेत टाकले गेले. शिवाजी महाराजांच्या सुरतच्या लुटीच्या वेळी तो पेरोलवर बाहेर आला आणि शिवाजी समोर ठाकला. तिथूनही जीवावरचे बेतलेले निभावून परत बायाबापड्यांसह १३ फेब्रुवारी १६७७ पर्यंत मजेत जगला.
म्हणून एका इंग्रजांच्या पत्रात जे म्हटले आहे की अशा अँथनी स्मिथपेक्षा जगात इतका नास्तिक नीच इसम जगायच्या लायकीचा नसावा! ते त्याला एकदम फिट्ट लागू होते.
समाप्त...
प्रतिक्रिया
12 Sep 2018 - 12:01 pm | खटपट्या
कायच्या काय रोचक !
अशीच माहीती अजून येउदे...
12 Sep 2018 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक माहिती. अजून अशी माहिती येऊ द्या.
12 Sep 2018 - 8:07 pm | दुर्गविहारी
मस्तच माहिती. अशा कथांमुळे ईतिहास रोचक होतो.
12 Sep 2018 - 11:26 pm | शशिकांत ओक
हे मोचा नेमके होते कुठे यावर प्रकाश टाकायची विनंती करत आहे.
12 Sep 2018 - 11:40 pm | शशिकांत ओक
हे मोचा नेमके होते कुठे यावर प्रकाश टाकायची विनंती करत आहे.
13 Sep 2018 - 12:56 am | डॉ सुहास म्हात्रे
याचा उच्चार मोका (इंग्लिश शब्द Mocha) असा आहे. हे, रक्तसमुद्राच्या बाब-अल-मंदार या मुखापासून सुमारे १०० किमी आत, येमेनच्या रक्तसमुद्राच्या किनार्यावर असलेले ठिकाण आहे. मोका हे कॉफिच्या पुरातन व्यापाराच्या मार्गावरचे महत्वाचे बंदर होते. मोका (caffè mocha किंवा mocaccino किंवा moca) या लोकप्रिय कॉफी बनवण्याच्या पद्धतीचे नाव याच ठिकाणावरून पडलेले आहे.
इथिओपिया (जिथल्या काफ्फा (Kaffa) प्रदेशावरून कॉफी हे नाव पडले आहे) आणि सुदानमध्ये पेय म्हणून सर्वप्रथम वापरात आलेली कॉफी, येमेनमध्ये गेली व तेथे लोकप्रिय पेय झाली. पुढे ती अरेबियन द्विपकल्प, पर्शिया (आताचा इराण), तुर्कस्थान व उत्तर अफ्रिकेत गेली. नंतर युरोपियन व्यापार्यांनी वसाहतवादाच्या काळात तिला युरोप व सर्व जगभर पसरवले.
13 Sep 2018 - 12:48 pm | शशिकांत ओक
डॉ अमर सुहास म्हात्रे सर,
मोकाचिनो कॉफी ची सविस्तर माहिती मिळाली. आता सायंकाळी झूल्यावर बसून गरमागरम कॉफी पिताना मोक्याच्या क्षणी 'माय नेम इज अँथनी... ची आठवण येत राहील.
...
गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या ग्रंथातील माहितीवर आधारित काही धागे सुचले की सादर करेन.
13 Sep 2018 - 7:06 pm | गामा पैलवान
शशिकांत ओक,
मोक्याचा क्षण किंवा मोक्याचं ठिकाण यांतलं मोका हे नाम पण या गावावरनं पडलेलं असावं.
आ.न.,
-गा.पै.
14 Sep 2018 - 12:50 am | शशिकांत ओक
गा. पै.
मोक्याच्या क्षणी व ठिकाणी...
शोधता शोधता 'मुखा' असा उच्चार आहे असे ऐकण्यात आले!
https://www.dictionary.com/browse/mocha?s=t
Mocha
Mokha
noun
a port in Yemen, on the Red Sea; in the former North Yemen until 1990: formerly important for the export of Arabian coffee. Pop: 14 562 (2005 est)
14 Sep 2018 - 11:18 am | डॉ सुहास म्हात्रे
तुम्ही दिलेल्या दुव्यावरच्या Mocha या शब्दाच्या पुढे असलेल्या स्पिकरवर क्लिक केले की "मोका" असाच उच्चार ऐकू येतो !
शिवाय, "Also Mukha. a seaport in the Republic of Yemen on the Red Sea" अशी टिप्पणीही आहे. तो कदाचित भाषाभ्रंश असेल... अरबीमध्ये एकाच शब्दाचे स्थानापरत्वे अनेक उच्चार असणे नेहमीचे आहे.
14 Sep 2018 - 12:36 pm | शशिकांत ओक
काही व्यक्ती जिवंतपणी उपद्रवी असतात. हा मात्र दिवंगत होऊनही मनात गावाच्या नावातून किंवा अगाऊपणा आठवून ठसठसत राहतो....
14 Sep 2018 - 1:19 pm | प्रचेतस
असेच उत्तमोत्तम माहितीनं भरलेलं लेख येऊ द्यात काका.
14 Sep 2018 - 2:48 pm | बबन ताम्बे
विशेषतः ही मह्त्वाची माहिती मिळते.
तो सांगतो की शिवा त्याला म्हणाला, 'औरंगजेबाने आपल्याच नातलगांना मारून व आमच्या देशातील प्रजेवर जे अत्याचार चालवले आहेत त्यांचा बदला घेण्यासाठी आम्ही त्याच्या श्रीमंत शहरात येऊन त्याला धडा शिकवावा म्हणून आलोय. तुम्हा विदेशी व्यापाऱ्यांना त्रास द्यायला, मारायला आम्ही आलेलो नाही. पण जर डच, इंग्रज व्यापारी लोकांनी आम्हाला मागू तितकी मागणी पुरी केली नाही तर मग मात्र तुमचा भरपूर छळ करू.'
एक सुरत मुळ गाव असलेली व्यक्ती ऑफिसमध्ये होती. त्याचा शिवाजी महाराजांवर फार राग. तो शिवाजी द्वेष्टाच होता. कारण काय तर त्यांची सुरत लुटली. वरील माहीतीवरुन हे समजते की महाराजांचा उद्देश फ्क्त लुट करणे हा नव्ह्ता तर औरंगजेबाने महाराष्ट्रातिल प्रजेवर केलेल्या अत्याचाराचा त्यांना बदला घ्यायचा होता.
15 Sep 2018 - 2:41 pm | शशिकांत ओक
तो योग्य आहे. म्हणून सुरतेतील सध्याच्या नागरिकांना शिवाजी महाराजांच्या आक्रमणांचा राग आला तर तो योग्यच आहे.
उत्तर भारतातील प्रदेशात पेशव्यांच्या काळापासून मराठे हे चौथाई आणि अन्य कर वसूली करायला आलेले सैन्य. ते शक्तीच्या बळावर धाकात ठेवून प्रजेवर दडपण आणायला आलेले असल्याने ते आणि खैबर खिंडीतील लुटारू कबीलेवाले यांच्यात सामान्य रयतेला फरक काय वाटणार?...
15 Sep 2018 - 10:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
पूर्वीच्या काळात अशी लूटीची स्वारी करण्याने अनेक साध्ये साधली जात असावित :
१. आपली राजसत्ता व सैन्य अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक संपत्ती मिळवणे.
२. शत्रूच्या मुलुखात लूट करून, (अ) स्वतःच्या बलाची चुणूक दाखवणे, (आ) शत्रूच्या आधिक्याखाली असलेल्या जनतेत त्याची नाचक्की करणे व (इ) आपल्या आधिक्याखालील जनतेच्या मनात स्वबळाची खात्री ठसवणे, इत्यादींमुळे 'आपली प्रजा', 'लूट केलेला शत्रू व त्याची प्रजा' आणि 'आजूबाजूच्या इतर सत्ता व त्यांच्या प्रजा' यांच्या मनात दबदबा निर्माण करणे.
३. सुरतसारख्या महत्वाच्या व्यापारी शहरावर स्वारी करून लूट करण्याने, एतद्देशिय व युरोपियन व्यापार्यांच्या मनात जानमालासंबंधी असुरक्षतेती भावना निर्माण करून शत्रूच्या राजकिय-आर्थिक बळावर आघात करणे आणि त्यांच्या व्यापाराला आपल्या ताब्यातल्या 'सुरक्षित' व्यापारी शहरांकडे वळवणे.
अश्या लूटीच्या मोहिमा, सर्वंकष युद्धापेक्षा अनेक पटींनी कमीत कमी खर्चात, जास्तीत जास्त राजकिय, सामरिक, व्यापारी आणि मानसिक फायदा मिळवून देत असत.
17 Sep 2018 - 11:54 am | गामा पैलवान
शशिकांत ओक,
प्रश्न उत्तम आहे. माझ्या मते मराठे आणि कबिलेवाले यांच्यात प्रमुख फरक असा की मराठे पैशाच्या बदल्यात रक्षणाची हमी घेत असंत.
आ.न.,
-गा.पै.
16 Sep 2018 - 10:48 pm | शशिकांत ओक
शब्दांकन करून गरज आणि परिणाम यांचा सुरेख संगम मांडला आहेत डॉ साहेब...