फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate your love..)
कथा - ८
रक्षाबंधन.. प्रेमाचे जतन..
ती - 'का रे, असे अचानक का भेटायला बोलवलेस, आणि काल माझा फोन का उचलला नाहीस..?'
तो- 'मला तुला काहीतरी सांगायचे होते म्हणून..!'
ती- 'सांग मग..'
तो- 'आधी तू सांग, तू का फोन करत होतीस..?'
ती- 'हेच विचारायला की आज कॉलेजला येणार आहेस का..?'
तो- 'का पण काही काम होते का..?'
ती- 'हो होते एक काम..!'
तो- 'काय..?
ती तिच्या बॅगेत काहीतरी शोधत म्हणाली-
ती- 'ते जाऊ दे, पण तू काय सांगणार होतास..?'
तो- 'मी का..' असे म्हणत तो त्याच्या बॅगेत हात घालतो..
ती- 'अरे तुला कळले का सकाळी कॉलेज मध्ये..'
तो- 'काय झाले कॉलेजमध्ये..?'
ती- 'अरे त्या अनघाने सुजयला राखी बांधली..!'
तो आश्चर्यचकित होत- 'काय सांगतेस काय..!'
ती- 'हे होणारच होते..!'
तिने असे म्हणताच त्याने बॅगेतील हात बाहेर काढत विचारले..
तो- 'का होणार होते..?'
ती- 'कारण, आताच फ्रेंडशिप डे ला फ्रेंड्स झाल्यावर आता तो प्रपोज करणार होता तिला आणि हे तिला कळले म्हणून..'
तो- 'मग त्याचे काय चुकले, त्याला आवडली असेल ती म्हणून तो विचारणार असेल..'
ती- 'अरे पण एवढी घाई कसली होती त्याला, मैत्री व्हायला एक क्षण पुरेसा असतो, पण ती फुलायला वेळ दिला पाहिजे ना.. नात्याने बाळसं धरायच्या आधीच तुम्ही त्याचा जीव गुदमरून टाकताय..'
तो- 'एका बाजूने तुझे बरोबरच आहे, पण तिनेही राखी बांधायची घाईच केली ना..'
ती- 'काय रे तुम्ही मुले राखी बांधून घ्यायला एवढे घाबरता का..'
तो- 'जिच्यावर प्रेम करतो त्या मुलीकडून राखी बांधायला घाबरतो आम्ही असे म्हण..'
ती- 'म्हणजे इतर मुलीकडून राखी बांधून घेऊ शकता..?'
तो- 'का नाही, एकदा आपल्याला आपली आवडणारी जागा मिळाली की दुसऱ्या जागेवर कोण बसतोय ह्याची काळजी आपण करतो का.?'
ती- 'पण प्रियकर आणि भाऊ.. काळजी घेणारे दोघेही असतात, लाड पुरवणारे दोघेही असतात, मग राखी बांधली तर बिघडले कुठे..'
तो- ' असे कसे म्हणू शकतेस तू, अग प्रियकर आणि भाऊ दोघाच्या प्रेमाच्या छटा वेगवेगळ्या आहेत.. खासकरून सSS..' तो अडखळतो..
ती- ' खासकरून स्पर्शाच्या म्हणायचंय ना तुला..!'
तो तिची नजर चुकवत म्हणतो- 'हो कदाचित..'
ती- ' हेच असते मुलांचे प्रेम.. स्पर्श हवाय फक्त..'
तो- ' चुकीचे काय आहे त्यात.. कारण स्पर्श ही प्रेम व्यक्त करण्याची भावना आहे..'
ती- ' असेलही पण स्पर्शाच्या अविवेकी अतिरेकामुळे मैत्रीची निरागसता त्या प्रेमात संपून जाते.. खरंतर ते प्रेम राहतेच कुठे.. तिथे सुरू होते प्रेमाची घसरण..'
तो- ' हे मान्य आहे, पण राखी बांधूनही कुठे जपली जाते मैत्री.. आणि आजकाल तुम्ही मुलींनी तर ह्या भाऊ बहिणीच्या नात्याचा खेळ केलाय.. नाही आवडला एखादा मुलगा की बांध राखी, दुसऱ्या बॉयफ्रेंडला पहिल्या बॉयफ्रेंडची ओळखपण लांबचा भाऊ म्हणून सांगतात, कधी घरच्यांनी पहिलेच बॉयफ्रेंड बरोबर तर सरळ म्हणता तो मला भावासारखा आहे.. का तेव्हा का नाही सांगत, आहे तो माझा चांगला मित्र.. तेव्हा का नाही धाडस करत मुली स्पष्ट बोलायला..'
ती- 'मुली सांगतील पण हा समाज त्या मैत्रीला प्रेमाचे लेबल लावतो त्याचे काय..'
तो- 'मग तुमच्या घरी जर ह्या गोष्टी आवडत नसतील तर नका करू मुलांशी मैत्री..'
ती- 'हो काही मुली नाही करत मैत्री मुलांशी, पण तुम्ही मुले तरी कुठे गप्प बसता, तुम्ही पाठलाग करताच ना..'
तो- 'तेही खरेच आहे.. पण राखी बांधणे हे पटत नाही मला.. कितीजणी नाहीतरी हे राखीचे नाते कॉलेज संपल्यावर आवर्जून आठवणीने जपतात.. आणि चुकून लग्नानंतर जर जुना बॉयफ्रेंड भेटला तर स्वतःच्या मुलाला त्याची ओळख मामा म्हणून सांगतात, असे का..? काहीही म्हणा हे राखी बांधणे म्हणजे मुलांना अपमानास्पद वाटू शकते..'
ती- 'मान्य आहे, जर तुम्ही मुले संयम ठेवत असाल, तर मुलीही मैत्री जपतील..'
आकाशात ढग जमा होत होते, पाऊसाचे वातावरण तयार झाले होते, दूरवर कुठेतरी पडलेल्या पावसाचा मृदगंध मन सुवासित करत होता.. आणि त्या दोघांचा संवाद त्याच्या मैत्रीला स्वच्छ करत होता..
ती- 'तसे पाहिले तर मुला-मुलींच्या मैत्रीच्या तराजूत एका बाजूला प्रेमाचा गुलाब असतो आणि एका बाजूला राखी.. अशीच तोलली जाते मैत्री आजकाल, कशाचे वजन जास्त भरेल, आता त्या तराजूचे पारडे कुठे झुकेल कोणास ठाऊक.. आता तिला त्याचे प्रेम नको होते पण त्याची गरज होती म्हणून तिने त्याला भाऊ म्हणून निवडले..!'
तो- 'गरज होती म्हणून भाऊ नाही बनवले, तर फक्त त्याच्या प्रेमभावनांना तिला अप्रत्यक्षपणे विरोध करायचा होता म्हणून.. तिच्यात धाडस नव्हते सरळ नकार द्यायचे..'
ती- 'पण आजकाल मुलांना सरळ नकार दिला तरी कुठे पचतो, मग घडतात गुन्हे एकतर्फी प्रेमातले..'
तो- 'हे पण खरं, निदान त्याला भाऊ बनवले तर त्याच्यापासून तरी धोका राहणार नाही..'
ती- 'पण मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही मुले मैत्री ही फक्त प्रेमासाठी करता का..?'
तो- 'नाही असे काही नाही, पण माणूस कधीही प्रेमात पडू शकतो ना.. मित्र झाल्यावर पण..'
ती- 'हो पडू शकतो, पण एवढ्या लवकर..? हे शंकास्पद आहे मग.. असेल प्रेम तर सरळ विचारावे त्याला मैत्रीचे लेबल कशाला..'
तो- 'पण पुढच्या व्यक्तीचा स्वभाव मात्र मैत्री झाल्यावरच कळू शकतो ना..?'
ती- 'तसा तो प्रेम केल्यावर पण कळू शकतो की..'
तो- 'पण प्रेमातून बाहेर पडताना प्रेमभंगाचे दुःख पण मिळते, पण एवढा त्रास मैत्रीत होत नाही.. कारण मैत्रीत आपण बांधील नसतो ना..'
ती- 'हेही खरं.. पण असे म्हणतात एखाद्या नात्यात माणूस जेवढा लवकर शिरतो तेवढा लवकर बाहेर पडतो खासकरून प्रेमात..'
तो- 'असेलही.. मग माणसाने प्रेम करायचे कधी.. असे ठरवून किंवा वेळ पाहून प्रेम कसे होईल..'
ती- 'प्रेम करावे ना.. पण त्यासाठी मैत्री पणाला लावणे हे मला खटकते.. म्हणजे मैत्रीत त्यांच्या नात्यात जो मोकळेपणा, निरागसपणा असतो तो प्रेमात राहत नाही.. खासकरून मैत्रीत एकमेकांची स्पेस जपली जाते..'
तो- 'मग प्रेमातही एकमेकांना जपले जातेच की..'
ती- 'असेलही, पण प्रेम हे मैत्रीपेक्षा पूर्णपणे वेगळे असते.. कारण मैत्रीतला हट्ट हा प्रेमात हक्क बनू पाहतो..'
तो- 'पण हे प्रत्येक माणसाच्या स्वभावावर अवलंबून आहे..'
ती- 'हो ना आणि स्वभाव मैत्री झाल्यावरच कळेल ना..'
तो- 'मीही तेच म्हणालो ना मघाशी..'
ती जीभ चावत कान पकडून सॉरी म्हणते..
तो- 'पण असे का होते जर आपण मैत्रिणीला प्रपोज केले आणि तिला ते नाही आवडले, तर त्यांची मैत्री पुन्हा पहिल्यासारखी का होत नाही..'
ती- 'कारण तिने त्याच्या बाबतीत तसा काही विचार केलेलाच नसतो, तिच्या मनात त्याच्याबद्दल एक आदरभाव असतो, तो मात्र तिला त्या नजरेने पाहतो हेच तिला खटकत असेल..'
तो- ' मग आपल्याला आवडणाऱ्या मुलीला लगेच प्रेमासाठी प्रपोज करणे उत्तम मैत्री करण्यापेक्षा..'
ती- ' असे काही नाही, कारण असे प्रेम हे कदाचित आकर्षणही ठरू शकते, असे लगेचच वचनबद्ध होण्यापेक्षा चांगले मित्र होऊन एकमेकांना व्यवस्थित ओळखून मग ठरवावा पुढचा प्रेमाचा प्रवास..'
तो- 'म्हणजे मैत्रीतही प्रेमाला संधी असू शकते..'
ती- ' हो का नाही, कारण प्रत्येक मुलगा हा मुलीचा भाऊ होऊ शकत नाही आणि प्रत्येक मुलगी ही मुलाची बहीण होऊ शकत नाही.. तिलाही प्रियकर हवाच असतो.. फक्त त्याच्या सहवासातून त्याचे प्रेम दिसावे, स्पर्शाची तृष्णा नाही.. दोघांनाही एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवताना अवघडल्यासारखे वाटले नाही पाहिजे..'
तो- 'काय ग, काही नाती मैत्रीच्या पलीकडे पोहचतात हे आज मला कळले.. तुला काय वाटते..?'
ती- 'मलाही असेच जाणवले..'
तो- 'पण काय म्हणायचे ह्या नात्याला, बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर (bff) की हाफ गर्लफ्रेंड आणि हाफ बॉयफ्रेंड..'
ती- 'प्रत्येक नात्याला नाव देण्याची गरजच काय..?'
पाऊस सुरू झाला की सगळे कसे धुऊन काढतो, तसे काही आज त्यांच्या संवादाने घडले होते, त्याच्यातील मैत्रीचे संदर्भ स्पष्ट होत होते..
ती- ' आणि समजा झाला तुमचा प्रेमाचा प्रवास सुरू, पुढे काय, काही दिवस एकमेकांना जपणे, नंतर एकमेकांचे दोष काढणे, चुका शोधणे, नंतर भांडण, वाद विवाद, आणि मग नात्याचा पर्यायाने मैत्रीचाही शेवट.. एखादाच ह्यातून टिकवू शकतो त्यांचे प्रेम..'
तो- 'पण प्रयत्न तर करायला हवा ना..'
ती- ' हरकत नाही, पण खरंतर मला ना अशा प्रेमाच्या प्रवासात राहायला आवडेल, एकमेकांचा अंदाज घेत राहणे, नकळत एकमेकांना जपणे, लग्नाच्या वेळी घ्यायचाच आहे की निर्णय, तोपर्यंत हे रोमांच असेच टिकवता आले तर उत्तमच..'
तो- 'हेही खरे नाहीतर कधीकधी तिला प्रेयसी बनविण्यापायी आपण चांगली मैत्रीण गमावतो..'
ती- 'आणि कधी भाऊ बनवण्याच्या हट्टापायी चांगला मित्रही गमावला जाऊ शकतो हेही तितकेच खरे..'
आता पाऊस सुरू झाला.. दोघेही त्या बेंचवरून उठले आणि बाहेर पडले..
आता त्या पावसात भिजत स्वच्छ होत होते.. त्या बेंचवरचा त्या दोघांनी आणलेला तो प्रेमाचा गुलाब आणि ती राखी..
शेवटी काय, त्यांच्या मैत्रीत गुलाबाने आणि राखीने आपआपले वजन तेवढेच ठेवत राखले होते.. त्यांच्या मैत्रीचे संतुलन..
आणि त्यामुळेच झाले होते त्यांच्या मैत्रीतील प्रेमाचे जतन..
***
राही..©
***
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.
संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)
8378 045145 (Rahi..)
प्रतिक्रिया
1 Sep 2018 - 2:22 am | ज्योति अळवणी
कथेपेक्षा वाद विवाद स्पर्धा वाटली
2 Sep 2018 - 10:51 am | रा.म.पाटील
हीच तर व्यथा आहे आजच्या प्रेमाची आणि नात्याची.
संवाद कमी आणि वाद जास्त असतो..
मी दोन्ही बाजू मांडल्या आहेत.. त्यामुळे तुम्हाला असे वाटले असेल कदाचित..
मनःपूर्वक धन्यवाद.. कथा वाचल्याबद्दल..!!
1 Sep 2018 - 3:44 am | शब्दबम्बाळ
वाचता वाचता भूतकाळात गेलो त्यामुळे खरतर पूर्ण वाचलंच नाही पण ज्योतीताई म्हणतायत तसेही वाटतंय...
आपल्याइथे शाळांमध्ये मुलींचे बाक आणि मुलांचे बाकी यामध्ये जणू एक अदृश्य लक्ष्मण रेखा असायची. आताची परिस्थिती माहित नाही!
पण त्यामुळे खऱ्या अर्थाने मुलामुलींमध्ये कधी संवाद व्हायचाच नाही. शिक्षक सुद्धा उगा डोक्याला ताप नको म्हणून संवाद घडवून आणायचे नाहीत.
एखाद्या मुलाचा पेन,पेन्सिल, खोडरबर चुकून बाकावरून पडून मुलींच्या बाजूला गेला तर शत्रूराष्ट्रात गेल्यासारखा दंगा व्हायचा!
मग कितीही ओरडा पलीकडच्या राष्ट्रात तुमचा आवाज पोहोचणारच नाही! तुमचा पेन शहीद झाला समजा...
जर कोणीतरी चांगुलपणा दाखवून वस्तू लगेच परत केली तर तो मग फितूर!
अगदीच महाग प्रकरण असेल तर युनायटेड नेशन्स म्हणजेच बाईंकडे आपली तक्रार करून शत्रूराष्ट्राकडून आपली गोष्ट हस्तगत करावी लागायची पण त्यात खूप झंझट होती. पेन तिकडेच का गेला? तुम्ही काय करत होतात? तूच फेकला असशील अशा प्रश्नांचा प्रतिवाद करावा लागायचा...
हीच गोष्ट मुलींच्या वस्तूंबाबतीत! पण मुलींच्या वस्तू शक्यतो कधी मुलांच्या बाजूला यायच्याच नाहीत! कदाचित लहानपणापासूनच त्या जपून राहायच्या कि काय कोणास ठाऊक... तसेही मुली कधी पेनापेनी खेळताना पहिले नाही किंवा बेंचवर खोडरबर घासून घासून त्याचा निघालेला मळ इतरांच्या अंगावर उडवताना झटापट होऊन खोडरबर उडालेला देखील पाहिलं नाही त्यामुळे कशाला त्यांचं काय मुलांच्या हद्दीत येईल. वाईट्ट मुली!
कायम एकमेकांबरोबर भांडणे ठरलेली आणि अश्यात कधीतरी रक्षाबंधन यायचं आणि अचानक एक्दम पवित्र का काय असं वातावरण शाळेत तयार केलं जायचं!
काही वर्गशिक्षिका प्रत्येक मुलीकडून एका मुलाला एक राखी बांधून घ्यायच्या, नशीब आमच्या शिक्षिकांना असली बुद्धी कधी झाली नाही!
म्हणजे वर्षभर राग राग करायचा, भांडायचं आणि अचानक त्यातलीच एक आपली बहीण! च्यामारी काय आहे हे?!
त्यानंतर कधीतरी कॉलेज सुरु झालं (११वी आणि १२वी म्हणजे कॉलेज हि आपल्या इथे मारली जाणारी सगळ्यात मोठ्ठी थाप आहे!) तिकडे काही मुलांना "मैत्रिणी" होत्या. "मुलगा वाया जाणे" म्हणजे हेच असावे असे काही मुलांचे (अर्थातच ज्यांना मैत्रिणी नव्हत्या) स्पष्ट मत होते.
पण तिथेही अशा मुलांना रक्षाबंधन नामक दिवसाचा धाक होताच... ज्यांच्याकडे गमवायला काहीच नव्हते ते अगदी स्वतःच नाम वगैरे लावून लेक्चर ला जाऊन बसायचे पण त्या दिवशीही कोणती मुलगी त्यांना "राखी बांधू का " म्हणून विचारायची नाही... असो! बरंच होईल लिहीत गेलो तर...
तर मी काय म्हणत होतो की रक्षाबंधन हे घरगुती समारंभ म्हणून स्वतःची आब राखून आहे पण शाळा, कॉलेज, कंपनी इत्यादी सर्व ठिकाणी महिला वर्गाने त्याचा वापर पुरुषवर्गाची मुस्कटदाबी का काय म्हणतात ते करायला केला आहे वगैरे वगैरे!! :P
2 Sep 2018 - 10:54 am | रा.म.पाटील
तुमची प्रतिक्रिया वाचून मलाही माझे शाळेतले दिवस आठवले..
धन्यवाद..!!
2 Sep 2018 - 10:57 am | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ७ ची लिंक
https://www.misalpav.com/node/43130
2 Sep 2018 - 10:59 am | रा.म.पाटील
फेसबुक पेज ची लिंक
https://m.facebook.com/festivdiaries