मी पाहिलेले दशावतारी नाटक!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
21 Aug 2018 - 4:06 pm

दशावतारी नाटक ही मालवणी मुलूखातील एक प्रसिद्ध आणि प्राचीन लोककला. भगवान विष्णूंच्या दहा अवतारांतील तसेच इतर पौराणिक व्यक्तिरेखा घेऊन रामायण, महाभारत आणि विविध पुराणे यांतील कथा या नाटकांत रंगमंचावर सादर केल्या जातात.

मला अलीकडेच म्हणजे 2018 च्या ऑगस्ट महिन्यात 11 तारखेला दशावतारी नाटक बघण्याचा योग आला. तसा मी व्यवसायाने इंजिनियर म्हणून एका खासगी कंपनीत मी कार्यरत आहे पण सर्व प्रकारच्या कलेची तसेच अध्यात्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींची लहानपापासूनच मला आवड आहे आणि छंद म्हणून मी विविध विषयांवर लिहीत असतो. लिखाणाची मला प्रचंड आवड!

आतापर्यंत माझ्या अनेक लघुकथा, कादंबऱ्या आणि लेख ऑनलाईन प्रसिद्ध झाले आहेत आणि मला त्यावर जगभरातील वाचकांच्या प्रतिक्रिया येत असतात. अशातूनच "कोंकण संवाद" चे प्रतिनिधी श्री. समीर म्हाडेश्वर यांचेशी एकदा फोनवर बोलणे झाले. अतिशय मनमोकळे सद्गृहस्थ. त्यांच्या साठी एक लेख लिहायचा म्हणून मी त्यांना विषय मागितला तर मला त्यांनी दशावतारी नाटकाबद्दल लिहा अशी विनंती केली. तसे मी दशावतारी नाटकांबद्दल ऐकून होतो पण कधीही पाहिले नव्हते आणि "गणपतीपुळे" वगळता इतर कोकण न पाहिलेला मी, या लोककलेबद्दल लिहू शकेन का याबद्दल साशंक होतो.

पण समीर यांनी लवकरच पुण्यात टिळक स्मारक मंदिरात दशावतारी नाटकाच्या एका प्रयोगाला मला आमंत्रित केले. एवढेच नव्हे तर त्यांनी तेथील कलाकारांशी नाटक सुरू होण्याआधी मला बोलता येईल, मेकप रूम मध्ये त्यांना भेटता येईल अशी व्यवस्था सुध्दा त्यांच्या पुण्यातील स्नेही मंडळींतर्फे केली. त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच.

रंगमंचामागे:

ठरल्या वेळेस पोहोचलो तेव्हा मेकप रूम मध्ये मी कलाकारांची लगबग पहिली. नाटक सुरू होण्याच्या जवळपास दोन तास आधीपासून ही कलाकार मंडळी आणि संचालक तसेच संगीत विभाग सांभाळणारी मंडळी यांची लगबग सुरू झाली होती. मी जमेल तसे कलाकारांना त्यांच्या मेकप (वेशभूषा आणि केशभूषा) मध्ये जास्त व्यत्यय न आणता विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली. सर्वांनीच माझी आस्थेने चौकशी करून माझ्या प्रश्नांची छान उत्तरे दिली.

संगीत हा या नाटकाचा आत्मा असतो. हार्मोनियम, पखवाज, झांज यासारख्या वाद्यांच्या साहाय्याने नाटकातील दृश्यांना पार्श्वसंगीत दिले जाते तसेच अधून मधून नाटकातील प्रसंगांवर गाणे सुध्दा सादर केले जाते असे मला या सगळ्यांची मुलाखत घेतांना समजले. ही लोककला जिवंत ठेवण्यासाठी किती ही त्यांची मनापासून मेहनत चालली होती! ते पाहून थक्क व्हायला होत होतं!

हे मंडळ खानोलकर दशावतारी नाट्य मंडळ होते. तसेच मुंबई हितवर्धक दशावतार नाट्य मंडळाचे उपसचिव यांनी मला अनेक प्रकारची मोलाची माहिती दिली. तसेच सर्व कलाकारांची ओळख करून दिली.

तेथील सर्व कलाकार स्वतःचा मेकप स्वतःच करत होते. स्त्रियांची भूमिका पण यात पुरुष कलाकारच करतात हे त्यातील एकाने मला सांगितले. पण त्यांचा मेकप इतका हुबेहूब होता की तो पुरुष आहे हे माहिती असूनही साडी बदलणाऱ्या एका कलाकराकडे जेव्हा मी मुलाखत घेण्यासाठी जायला कचरलो तेव्हा तो कलाकार हसायला लागला आणि म्हणाला, "हीच तर या लोककलेची खासियत आहे सर! पण एक खंत वाटते की या कलेची म्हणावी तेवढी दखल प्रेक्षक आणि सरकारकडून घेतली जात नाही. आम्हाला मिळणारे मानधन हे इतर नाटकांच्या कलाकारांच्या तुलनेत तुटपुंजे असते."

नाटकातील यक्षाची भूमिका करणारे एक कलाकार त्यांचा मेकप पूर्ण करून माझेकडे आले. मी त्यांचेसोबत सेल्फी घेतली, नंतर दिलखुलासपणे ते म्हणाले, "खरे तर कर्नाटकातील "यक्षगान" आणि आपली दशावतार कला एकमेकांच्या जुळ्या बहिणीच. मी आणि आणखी एक कलाकार अशा आम्हाला दोघांना खलनायकी म्हणजे यक्ष, राक्षस अशा भूमिका करण्याची सवय झाली आहे. तसेच आम्ही बदल म्हणून विनोदी भूमिका सुध्दा करतो!"

त्यांचा यक्ष हा इतका हुबेहूब होता की यांनी तेथे जर का "राक्षसी गडगडाटी हास्य" माझ्यासमोर सुरू केले असते तर मुलाखत घ्यायची सोडून मी नक्की मेकप रूम मधून बाहेर पळालो असतो...

नंतर नारद मुनी, भगवान शंकर, राजा, कोळी यांचे दर्शन झाले. हे पाहून मला जुन्या काळात गेल्यासारखे वाटायला लागले होते. मग मी काही सेल्फी आणि काही फोटो पटापट माझ्या कॅमेरात बंदिस्त केले.

एकूण मूळचे दशावतारी पारंपारिक मंडळ फक्त नऊ आहेत, पण सध्या अनेक मंडळ कार्यरत असतात. नाटकात नेहमी शेवटी एक चांगला संदेश असतो तसेच नाटके बहुतेक वेळा सुखांत असतात म्हणजे हॅपी एन्डींग! तसेच या लेखाच्या शेवटी मी एक खास माहिती सांगेन. मुद्दाम शेवटी! तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का मिळावा यासाठी!

सगळ्यांची तयारी (मनाची सुध्दा) झाल्यानंतर गणेश वंदना झाली आणि कलाकार रंगमंचावर जायला तयार झाले. मग मी तेथील संचालक यांनी सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकांमध्ये पहिल्या रांगेत जाऊन बसलो.

प्रत्यक्ष रंगमंचावर:

(मागे काळा पडदा. नेपथ्य नाही. संगीतकारांनी आपापली जागा घेतलेली आणि गाणे सुरू झालेले. प्रेक्षागृह खचाखच भरलेले होते)

"सूर निरागस हो" या गाण्याने सुरुवात होते. नंतर आलेलं "एक राधा एक मिरा, एक प्रेम दिवानी, एक दर्द दिवानी" हे गाणे अचानक जुन्या आठवणी जाग्या करून गेलं. कॉलेज जीवनात ऐकलेलं हे गाणं बऱ्याच कालावधीनंतर अनपेक्षीतपणे ऐकायला मिळालं होतं.

मग रंगमंचावर शंकर येतात. नारद शंकर संवाद सुरू होतो. शंकर गेल्यानंतर नारद गातात: "भक्तिविना मुक्ती नाही!"

नंतर नारद भजन म्हणतात मग यक्षाची एन्ट्री (आगमन).

नारद यक्षाला एक चुकीचा सल्ला देतात कौंडीण्यपूरच्या राजाला मारण्याचा आणि त्याचे राज्य काबीज करण्याचा.

मग कौंडीण्यपूरच्या राजाचे भाषण, युवराज शिक्षण घेऊन परत आलेले असतात. दोघांचा संवाद. युवराज जातो.

राजासमोर राक्षस येतो. राक्षस राजा युद्ध होते. युद्ध होतांना गाणे.

(राजा आणि यक्ष तलवार घेऊन नाचतात आणि गाणे होते)

राजा जखमी. मंत्री येतो आणि यक्ष पळून जातो. मंत्री राजाला घेऊन जातो.

प्रसंग बदल:

कोळी (मासेमार) येऊन विनोद निर्मिती करतो.

(हे विनोद मालवणी भाषेत असल्याने मला कळले नाहीत पण प्रेक्षकांत हास्याचे कारंजे उडत होते, टाळ्या पडत होत्या)

कोळ्यांची मुलगी मासे विकते. तिच्यावर यक्षाची वाईट नजर आणि हल्ला. एक तरुण तिला वाचवतो. तरुण यक्ष संवाद आणि युद्ध. यक्ष पळून जातो.

"या जन्मावर शतदा प्रेम करावे" हे गाणे वाजवले जाते.

तो तरुण आणि ती कोळीण यांची मैत्री. प्रेम.

तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून युवराज असतो.

राजाकडे कोळी आणि त्याची मुलगी लग्नाच्या विनंतीसाठी जातात.

राजाचा दोघांच्या लग्नाला विरोध. "राजघराणे आणि धीवरकन्या यांचे मिलन होऊ शकत नाही", असे म्हणतो.

पण नारदाची मध्यस्थी.

राजा शांतनू आणि धीवर कन्या सत्यवती यांचे महाभारतातील उदाहरण नारद देतो आणि लग्न लावून देतो.

नंतरही अनेक प्रसंग येतात. नाटक संपते. टाळ्या पडतात....

हे नाटक अडीच तास चालले. कोकणात मात्र रात्रभर हे नाटक चालते. तेथे गावाकडे हे नाटक मंदिरांत रात्री सुरू होते आणि सकाळी संपते. हो अनुभव अर्थातच काही वेगळाच असेल यात वादच नाही.

नाटक सुरू असतानाच काही प्रेक्षकांकडून संगीतकारांना किंवा कलाकारांना बक्षीस जाहीर होत होते. मग नाटक मध्येच थांबवून बक्षीस देणाऱ्याचे नाव वाचले जायचे. मी सुध्दा रंगमंचावर जाऊन नारद मुनींना त्यांच्या भूमिकेसाठी बक्षीस देऊन आलो. कलेची दाद म्हणून!

नाटक संपल्यावर बाहेर आलो तेव्हा बाहेर पाऊस सुरू होता. टिळक रोडवर ट्रॅफिक, रात्रीचे एल्ईडी दिवे, जाहिराती, दुकाने असे आधुनिक जग दिसायला लागले. एक वेगळी आठवण मनात घेऊन मी घरी आलो...

आता राहिला कबूल केल्याप्रमाणे आश्चर्याचा सुखद धक्का देतो तो म्हणजे दशावतारी नाटकाला चक्क संहिता नसते. म्हणजे कथा, पटकथा, संवाद वगैरे काहीच आधी ठरलेले नसते. उत्स्फूर्तपणे हे कलाकार सगळे नाटक सादर करत असतात. आहे की नाही गंमत!!

- निमिष सोनार, पुणे.

संस्कृतीसमीक्षालेख

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

21 Aug 2018 - 6:07 pm | अभ्या..

नमस्कार सोनार साहेब,
ते कोंबडा नामक कुणी सज्जन सांगत होते की तुम्ही फारच जबरदस्त लिहिता. आवर्जून वाचले तुमचे लेखन.
नतमस्तक आहे तुमच्या लेखनापुढे. अकराआवतारी नाटक फारच आवडले.

बोलघेवडा's picture

21 Aug 2018 - 7:28 pm | बोलघेवडा

फार मजा आली वाचून. काही फोटोज टाकता आले तर अजून मजा येईल. धन्यवाद.

समर्पक's picture

22 Aug 2018 - 3:19 am | समर्पक

उत्स्फूर्तपणे म्हणजे कौतुक आहे !
वर्णन आवडले...

सतिश गावडे's picture

22 Aug 2018 - 7:33 pm | सतिश गावडे

खरं तर दुसरा परिच्छेद आणि तिसर्‍या परिच्छेदातील पहीलं वाक्य वाचून डोळे भरुन आले होते. कंठ दाटून आला होता, हृदयसुद्धा भरुन आले होते. त्यामुळे वाचन तिथेच थांबवणार होतो.

मात्र घरातील मालवणी माणसाला कळले की मी दशावताराबद्दल असणारा लेख उघडून पुर्ण न वाचताच बंद करत आहे. तेव्हा त्याच्यातील कलाप्रिय मालवणी माणूस जागा झाल्याने मला हा लेख पुर्ण वाचावा लागला. दशावतारी नाटकांची थोडक्यात छान ओळख करुन दिली आहे.

त्याऐवजी असे वाचा: "मी लेखक नाही, माझे कोणतेच लेख कथा कादंबऱ्या आजपर्यंत कुठेही प्रसिद्ध झाल्या नाहीत आणि मला कोणत्याच जगातल्या कुणाकडूनही कोणत्याच प्रतिक्रिया आल्या नाहीत"... आता तर खुश झालात ना!
आणि दुसऱ्या परिच्छेदात तुम्हाला काय खटकले ते सांगावे म्हणजे ते सुद्धा मी बदलतो!!

मंदार कात्रे's picture

25 Aug 2018 - 8:27 pm | मंदार कात्रे

इच्छुकांसाठी येथे दशावतारी नाटक पाहण्याची सन्धी नि:शुल्क उपलब्ध आहे https://www.youtube.com/watch?v=jRYJ2iDEKEA