काळी मांजर
मी आता जे लिहिणार आहे ते थोडेसे खाजगी स्वरुपाचे आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असा माझा बिलकूल आग्रह नाही. आता मी ज्याचा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा असे मी तरी कुठल्या तोंडाने म्हणणार ? आणि समजा म्हटले तर तुम्ही मला वेड्यात काढणार नाही का ? पण मी वेडा नाही आणि स्वप्नेही पाहात नाही. पण उद्या मी मरणार आहे आणि आज मला माझ्या हृदयावरील ओझे दूर सारायलाच पाहिजे. मला ज्या काही घटना ज्या माझ्या आयुष्यात घडल्या त्या जगापुढे थोडक्यात मांडायच्या आहेत आणि त्या मांडताना मी त्याच्यावर कसल्याही टिपण्या करणार नाही. या घटनांचा मी धसका घेतला. त्यांनी माझे आयुष्य उध्वस्त केले, माझा छळ केला तरी पण मी त्या घटनांचा अर्थ समजवून सांगण्याचा प्रयत्न करणार नाही. माझ्यासाठी त्या घटना भयानक होत्या पण कदाचित, कदाचित काही जणांना तसे न वाटण्याचा संभव नाकारता येणार नाही. पुढे कधीतरी कोणी हुशार माणूस या घटनांचा तर्क सुसंगत अर्थ लावेल ही व माझा भ्रमनिरास करेल ही पण त्यासाठी मला या घटना जरा सविस्तरच लिहाव्या लागतील. मी भितभितच हे लिहितो आहे. वास्तव लिहितो आहे.
लहानपणापासूनच माझा स्वभाव कोमल व निर्मळ होता. माझ्या या स्वभावाची व माझ्या कोमलपणाची माझे मित्र टर उडवायचे जे मला अजून आठवतंय. मला प्राण्यांविषयी विशेष ममत्व वाटत असे. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी बरेच प्राणी पाळले होते. माझा बराच वेळ मी या प्राण्यांबरोबर घालवायचो. त्यांना कुरवाळताना आणि खायला घालताना मला सगळ्यात जास्त आनंद वाटायचा. मला प्राण्यांबद्दल वाटणारे हे प्रेम माझ्या तरुण वयातही तसेच राहिले. प्राण्यांबरोबर असलो की मला कशाचीही शुद्ध नसायची. ज्यांनी कुत्री पाळली आहेत त्यांना या प्रेमभावनेबद्दल काही विशेष सांगण्याची गरज नाही. ज्या माणसाने मनुष्यप्राण्याच्या स्वार्थी प्रेमाची चव चाखली आहे त्याच्या बाबतीत तर प्राण्याचे निःस्वार्थी प्रेम त्याच्या ह्रदयाला जाऊन भिडते.
मी इतर मित्रांपेक्षा जरा लवकरच लग्न केले. नशीबाने माझ्या बायकोचा स्वभाव माझ्या स्वभावाशी जुळणारा असल्यामुळे मी मनोमन खुश होतो. माझे प्राणी प्रेम पाहून तिने माझ्यासाठी ताबडतोब माझ्यासाठी पाळीव प्राणी घरात आणले. मला अगदी माझ्या आईची आठवण झाली. तीही माझ्यासाठी माझ्या लहानपणी असेच प्राणी पाळायची. केवळ माझ्यासाठी. आमच्याकडे लवकरच पक्षी, सोनेरी मासे, एक मस्त कुत्रा, ससे, एक छोटे माकड हे प्राणी आले आणि एक काळेभोर मांजर ही आले.
या मांजराकडे पाहताना डोळ्यात भरायचा तो त्याचा आकार. इतर मांजरापेक्षा त्याचा आकार जरा मोठाच होता. पण होते मात्र भलतेच गोंडस. मांजर तसाच एक चतूर, बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातोच म्हणा. पण हे त्याबाबतीत अत्यंत विलक्षण होते. माझी बायको अजिबात अंधश्रद्धाळू नाही किंवा तिचा कुठल्याही अंधश्रद्धांवर विश्वासही नाही. पण त्या काळ्या बोक्याच्या बुद्धिमत्तेचे वर्णन करताना ती नेहमी एका दंतकथेतील एका समजुतीचे उदाहरण देई. ‘चेटकीणी काळ्या मांजरांचे रुप घेऊन या जगात वावरतात.’ कधी कधी लाडात आल्यावर ती त्या मांजराला चेटकीण म्हणूनही हाका मारत असे. बोका आणि चेटकीण हे कसे काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर मी तुम्हाला दोष देणार नाही. (माझ्याही मनात हा प्रश्न आला होता) पण कथेप्रमाणे सर्व काळी मांजरे चेटकीणी असतात असे असल्यामुळे मी तिला या बाबतीत माफ केले होते. अर्थात मी ते एवढे काही गंभीरपणे घेत नसे आणि तीही बहुतेक वेळा कौतुकाने किंवा चेष्टेने असे म्हणत असे. मीही ही गंमत आत्ताच आठवली म्हणून सांगितली. बाकी काही नाही बरं का !
या मांजराचे नाव होते ‘‘मन्या’’. थोड्याच काळात मन्याची आणि माझी गट्टी जमली. माझा लाडका झाला तो. तो फक्त माझ्याच हातून अन्न खात असे आणि फक्त मीच त्याला ते भरवीत असे. मी कुठेही जाऊ देत तो कायम माझ्या पायात घुटमळत माझ्याबरोबरच चालत असे. कधी कधी तो माझ्या मागून रस्त्यावरही येऊन मला लाज आणत असे. मी महत्प्रयासाने कसेबसे त्याला परत घरी पाठवे.
आमची ही गट्टी बरेच वर्षे टिकली. पण माझ्या स्वभावात हळूहळू फरक पडत चालला होता. मला कबुली देण्याची शरम वाटते याला कारणीभूत होते माझे दारूचे व्यसन. मी पक्का दारुडा बनत चाललो होतो. दिवसेंदिवस मी जास्त मनस्वी होत चाललो होतो. मी मधेच एकदम उदास व्हायचो. कटकट करायचो आणि दुसर्याला काय वाटेल याची फिकीर करणे मी केव्हाच सोडून दिले होते. माझ्या बायकोला शिव्या देण्यात मला आसूरी आनंद व्हायचा आणि कधी कधी मी तिच्यावर हातही टाकायचो किंवा फारच राग आला तर लाथेने तुडवायचोही. असा राग मला दारू झोकल्यावर नेहमीच येत असे. माझ्या पाळलेल्या प्राण्यांना माझ्या स्वभावातील हा बदल जाणवला असणारच कारण मी त्यांच्याशीही आता तसंच वागायला लागलो होतो. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि एवढेच नाही तर त्यांचा दुरुपयोग ही करायला लागलो. पण मन्याला मात्र माझ्याकडून जरा वेगळी वागणूक मिळायची. बहुधा माझ्या अंतर्मनात त्याच्याबद्दल थोडासा जिव्हाळा शिल्लक असावा. मी कुत्रा, पक्षी, माकडांना आता क्रूरतेनं वागवायला लागलो पण मन्याला अजूनही मी चांगले वागवायचो. उदा. माकड, ससे, कुत्रा जर माझ्या वाटेत आले तर मी निर्दयपणे त्यांना लाथेने उडवायचो पण मन्याला ? छे ! तसे काही माझ्या हातून होत नसे. पण हळू हळू जसे दिवस उलटायला लागले तसा दारूने माझा ताबा घेतला. दारू हे कसे व्यसन आहे हे मी तुम्हाला सांगायला नको. आता मन्यालाही माझ्या रागाचा प्रसाद मिळू लागला. तोही आता म्हातारा झाला होता पण अजून चलाख होता. एकदा मी असाच त्याला गंमत म्हणून लाथेने उडवला तर पठ्ठ्या खिडकीत बसलेली चिमणी तोंडात पकडून खाली पायावर उतरला. मला आता गंमत म्हणूनही बायकोला, त्या मुक्या प्राण्यांना लाथा घालण्यात अतिशय आसूरी आनंद होई.
एकदा एका रात्री गुप्ताच्या गुत्त्यावर गावठी झोकून घरी आलो. हल्ली मला तीच दारू परवडायची. शिवाय गुप्ताचा गुत्ता पहाटेच उघडायचा त्यामुळे पहाटे ही दारूची सोय व्हायची. आता ओळख झाल्यामुळे तो माझ्यासाठी गुत्ता केव्हाही उघडायचा. असो मी काय सांगत होतो बरं... हंऽऽ मी त्या रात्री घरी आलो तेव्हा मला वाटले की मन्या मला टाळतोय. माझ्यापासून दूर पळतोय. मी त्याला धरला. तो घाबरला. त्याने ओठ मागे सारले व तो माझ्यावर फिस्कारला. त्याने माझ्या हाताचा चावा घेतला. थोडेसेच रक्त आले पण त्याने माझ्यातील सैतान जागा झाला. माझे डोकेच फिरले. मी स्वत:ला विसरलो. मला कळेना मला काय होतेय ते. माझ्या नसानसातून कुठलीतरी पाशवी शक्ती वाहते आहे असे मला वाटू लागले. माझे रक्त आतल्या आत उकळू लागले. त्याची सुटण्याच्या धडपडीकडे छद्मीपणे हसत मी त्याचा गळा माझ्या पंजात धरला व खिशातील चाकू काढला. मी त्याला एक थप्पड दिली व त्याचा एक डोळा बाहेर काढला. हे सगळे लिहिताना माझ्या अंगावर काटा उभा राहतोय आणि शरमेने माझी मान खाली जातेय.
दुसर्या दिवशी जेव्हा दारू उतरली तेव्हा माझे हललेले डोकेही ताळ्यावर आले. रात्रीचा प्रसंग आठवून माझ्या अंगावर शहारा आला. मी केलेल्या क्रूर कर्माने माझे मन पश्चात्तापात होरपळून निघाले पण या सगळ्या भावना थोड्याच वेळ टिकल्या. मग मात्र मी ती कटू आठवण विसरण्यासाठी काल उरलेल्या दारूत परत एकदा स्वत:ला बुडवून टाकले.
थोड्याच दिवसात तो बोका बरा झाला. त्याच्या एका डोळ्याच्या रिकाम्या खोबणीने तो भयानक दिसत होता खरा, पण बहुधा आता त्याला कसल्याही वेदना होत नसाव्यात. नेहमीप्रमाणे तो घरात हिंडत फिरत होता पण माझी चाहूल लागली की तो जिवाच्या आकांताने पळ काढत असे. माझ्या मनात थोड्याफार भावना शिल्लक असल्यामुळे, जो प्राणी माझा एकेकाळी लाडका होता तो आता माझा तिरस्कार करतोय हे पाहून मला थोडे दु:ख झाले. पण या दु:खाची जागा लगेचच त्राग्याने घेतली. मी चिणकारलो. नंतर अटळ असल्याप्रमाणे माझा विकृतपणा उफाळून आला. या असल्या भयानक भावनेचा कुठल्याही तत्त्वज्ञानात अभ्यास आजवर झालेला नसेल. पण मला वाटते माणसातील इतर प्रवृत्तींसारखी ही एक प्रवृत्ती असावी. पण कुठल्याही श्वापदात ती आढळत नाही. बहुधा माणसाने त्याच्या निर्मितीबरोबरच ती बरोबर आणली असावी. हीच प्रवृत्ती बर्याच वेळा माणसाला हुकूम सोडते आणि मग घडू नयेत त्या गोष्टी घडतात. नाहीतर माणसाला नको ते कर्म केल्यावर मी असे का केले हा प्रश्न का बरे पडला असता ? मी असे म्हणतो कारण माणसाच्या प्रवृत्ती मोठ्या विचित्र असतात. उदा. एखादा कायदा आपल्या भल्यासाठीच केला आहे हे समजताच माणसाचा हात तो मोडण्यासाठी का बरं शिवशिवतात ? ही एक प्रकारची विकृत भावनाच नाही का ? थोडक्यात याच विकृतीने शेवटी माझ्यावर ताबा मिळवला. मनात खोल कुठेतरी एक अशीच तीव्र इच्छा आली की काहीतरी केले पाहिजे. कोणालातरी इजा करायला पाहिजे. ही इच्छा तीव्र होत होत इतकी तीव्र झाली की मी त्या बोक्याचा समाचार घेण्याचे ठरवले. एका थंडगार पहाटे मी तेवढ्याच थंडपणे एक फास मन्याच्या गळ्यात अडकवला आणि पश्चात्तापाने दग्ध होत समोरच्या झाडाच्या फांदीवर त्याला टांगला. तो तडफड करीत होता आणि इकडे माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या कारण मला माहीत होते की या प्राण्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि त्याला फासावर लटकविण्यासारखा त्याच्या हातून कसलाही गुन्हा घडलेला नाही. मी रडत होतो कारण मला कल्पना होती की माझ्या हातून एक भयंकर पाप घडत आहे. इतके भयंकर की त्यासाठी परमेश्वर कितीही दयाळू असला तरी त्याने माझी रवानगी नरकात केली असती. शंकाच नाही !
त्याच रात्री मला झोपेतून जाग आली ती आगीच्या धगीने. माझ्या घराच्या फाटक्या पडद्यांना आग लागली होती. थोड्याच वेळात ती आग भडकली आणि सगळे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मी, माझी बायको व आमचा एक म्हातारा नोकर, जो या दिवसातही आम्हाला सोबत देत होता कसेबसे वाचलो. आगीत माझे जे काही होते ते सगळे जळून त्याचे भस्म झाले. मला नैराश्य आले. मी खचलो.
दोन घटनांचा बादरायण संबंध लावण्या इतका काही मी दूधखुळा नाही किंवा मूर्ख ही नाही. पण मी सगळ्या घटनांची साखळी तुम्हाला सांगण्याचे ठरवले असल्यामुळे काही निसटू नये म्हणून हे सगळे सविस्तर सांगणे भाग आहे. माझ्या हातून घडलेली हत्या आणि घराला लागलेली आग याचा काही संबंध तर नसावा? असा एक विचार माझ्या मनात आला खरा. मी अर्थातच तो बाजूला सारला. दुसर्या दिवशी मी जळून खाक झालेल्या माझ्या घराच्या अवशेषांना भेट दिली. सगळ्या भिंती पडल्या होत्या पण फक्त एक मात्र उभी होती. ही भिंत माझ्या शयनगॄहाची होती आणि या भिंतीला टेकून माझा पलंग होता.. मी पलंगावर या भिंतीकडे डोके करून झोपत असे. भिंतीला नुकत्याच केलेल्या गिलाव्यामुळे तिचा आगीपासून थोडा का होईना बचाव झाला होता. मी तेथे पोहोचलो तेव्हा त्या भिंती भोवती बरेच लोक जमले होते व त्या भिंतीचा एक भाग संमिश्र नजरेने न्याहाळत होते. ‘‘विचित्रच !’’ असे कधी पाहिले नव्हते बुवाऽऽ’’ अरेच्चा !’’ असे अनेक शब्द त्या जमावातून उत्स्फुर्तपणे उमटत होते. मी जवळ गेलो आणि पाहिले तर त्या भिंतीवर एका मोठ्या मांजराचे शिल्प कोरलेले दिसले. सर्व बारकाव्यांसहीत कोरलेले ते शिल्प मला फारच आवडले. पण त्याच्या गळ्यात एक फासही अडकवलेला मला दिसला...
मी हे भूत पाहिले, हो भूतच म्हणायला हवे... आणि मी कमालीचा हादरलो. माझा थरकापच उडाला. पण थोड्याच वेळात मी सावरलो. मला आठवले की मन्याला बागेत फाशी देण्यात आले होते. आग लागल्यावर त्या बागेत बरीच गर्दी जमली होती. त्यातीलच एकाने ते लटकते मांजर काढून खिडकीतून माझ्या खोलीत फेकले असणार. बहुधा मला उठविण्यासाठी किंवा ...जाळण्यासाठी. त्या आगीच्या धगीने व कोसळणार्या इतर भिंतींनी बहुतेक मन्याचा चेंदामेंदा होऊन ते या भिंतीला चिकटले असणार. बहुधा गिलाव्यातील चुना आणि मांजराच्या प्रेतातील अमोनियाचा संयोग होऊन त्याचे ते शिल्प तयार झाले असावे.
ते शिल्प कसे तयार झाले असावे याबद्दल मी माझ्या मनाची समजूत काढली खरी पण माझ्या मनात जी पाल चुकचुकायची ती चुकचुकलीच. ते शिल्प पाहिल्यावर मला धक्का बसायचा तो बसलाच. पण माझ्या मनात पश्चात्तापाची भावना त्यावेळी तरी आलेली नव्हती. मी निर्लज्जपणे माझ्या गुत्त्याच्या आसपास अजून एखादे मांजर मिळते आहे का हे पाहू लागलो. एक दोन पिल्ले मला सापडली पण मला मन्यासारखी दिसणारी मांजरे पाहिजे होती.
एका रात्री मी माझ्या पापाच्या खपल्या काढत बसलो बसलो असतानाच माझे लक्ष एका काळ्या वस्तूकडे गेले. माझ्या घरात आता इतर फर्निचर नव्हतेच. होत्या त्या फक्त दारूच्या बाटल्या. माझ्या दारूच्या बाटल्यांवर बसलेल्या त्या काळ्या वस्तूकडे मी जरा लक्षपूर्वक पाहिले व जवळ गेलो. एक मोठी काळी मांजर ! अगदी मन्या एवढी नव्हती पण बर्यापैकी मोठी. मी तिला हात लावून माझी खात्री करून घेतली. मन्याची हुबेहुब प्रतिकृती फक्त एकच फरक होता. मन्याच्या अंगावर एकही पांढरा केस नव्हता तर या मांजराच्या पोटावर व छातीवर पांढरेशुभ्र केस होते.
मी त्याला हात लावल्या लावल्या ते उठले व गुरगुरत त्याने माझ्या हातावर डोके घुसळलं. एकंदरीत त्याला माझ्या कुरवाळण्याने आनंद झालेला दिसला. मला पाहिजे होते तसेच मांजर ! मी लगेचच त्याला उचलले व माझ्या नवीन मालकाला भेटून ते विकत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली पण त्या मालकाने स्पष्ट नकार दिला. त्याच्याकडे तसले मांजर नव्हते आणि त्याने असले मांजर कधी पाहिलेही नव्हते.
मी त्याच्या डोक्यावर बोटांनी कुरवाळले व खाली सोडले. पण आश्चर्य पहा, मी घरी निघालो तेव्हा त्या मांजराला माझ्याबरोबर यायचे होते. मी अर्थातच त्याला परवानगी दिली. मी चालू लागल्यावर तेही माझ्या पायात घुटमळत चालू लागले. मीही मधून मधून थांबून त्याच्या डोक्यावर थोपटत होतो व त्याच्या आयाळीला कुरवाळत होतो. घरी पोहोचेपर्यंत ती पार माणसाळली होती. तिला पाहिल्या पाहिल्या माझी बायकोही त्या मांजराच्या प्रेमातच पडली.
माझे म्हणाल तर थोड्याच काळात माझ्या मनात नेहमीप्रमाणे त्या मांजराबद्दल घृणा निर्माण झाली. मला प्रथम जे वाटले होते त्याच्या हे बरोबर उलटेच झाले. हे का झाले हे मी सांगू शकणार नाही. त्या मांजराला जेवढा मी आवडे तेवढीच जास्त घृणा मला त्याच्याबद्दल वाटू लागली. हळू हळू माझ्या या भावनेचे तिरस्कारात रुपांतर कधी झाले हे मलाच कळले नाही. मी त्या मांजराला टाळू लागलो. मला त्याला पाहिल्याबरोबर मन्याची आठवण येई व माझ्या त्या भयंकर कृत्याची. मला नंतर नंतर माझीच घृणा वाटू लागली. पण त्यामुळे मी त्याला मारहाण करण्याचे धाडस दाखवू शकलो नाही. वाचले बिचारे ! काही आठवडे असेच गेले आणि मी त्या मांजराकडे द्वेषाने पाहायला लागलो व ते दिसले की मी तेथून पळ काढू लागलो. जणू ते मांजर म्हणजे प्लेगचा उंदीरच आहे.
माझ्या द्वेषाच्या मागे अजून एक कारण होते ते मी लिहिण्यास विसरलो. ते म्हणजे ज्या दिवशी मी त्या मांजराला घरी आणले त्याच दिवशी मला कळले होते की त्यालाही मन्यासारखा एक डोळा नव्हता. पण या सगळ्या प्रकारात हे मांजर माझ्या बायकोचे जास्तच लाडके झाले. मी तुम्हाला पूर्वीच सांगितले आहे की भूतदया हा माझ्या बायकोच्या अनेक गुणांपैकी एक महत्त्वाचा गूण आहे आणि त्या गुणाने मला भरपूर आनंदही दिलाय.
जसा मला या मांजराविषयी वाटणारा द्वेष वाढत गेला तसे माझ्या लक्षात आले की त्यालाही मी अधिकच आवडू लागलो. मी जाईन तेथे ते माझ्या मागे मागे येत असे. पण त्याच्या या मागे येण्यात एक प्रकारचा उर्मटपणा भरला होता. ते ठाम पावले टाकत माझ्यामागे थोडे अंतर ठेऊन पाठलाग केल्यासारखे माझ्या मागे मागे येई. मी काय म्हणतोय ते कदाचित वाचकांना समजणार नाही.. मे बसलो की ते माझ्या खुर्चीखाली मुटकुळी करून बसे किंवा माझ्या मांडीवर उडी मारून बसे व मला चाटत असे. मी उठून चालायला लागलो की ते एकदम माझ्या पायात येई व मला खाली पाडण्याचा प्रयत्न करी. कधी कधी माझ्या कपड्यात त्याची ती अणकुचीदार नखे खुपसून मला पकडण्याचा प्रयत्न करे तर कधी कधी पार माझ्या छातीपर्यंत चढून बसे. मला त्यावेळेस त्याला फटका मारून खाली पाडावे अशी तीव्र इच्छा होई पण मी स्वत:ला ते करण्यापासून रोखत असे. त्याला कारणे दोन - एक म्हणजे माझ्या हातून घडलेल्या पापाची बोच आणि दुसरे म्हणजे (खरं सांगण्यास हरकत नाही) माझी छाती ते मांजर फोडेल अशी मला उगीचच भिती वाटायची. मला त्या मांजराची आता भितीच वाटू लागली होती..
या भीतीचे स्वरुप मला सांगता येणार नाही. म्हणजे एखाद्या खड्ड्यावरुन उडी मारताना इजा होईल म्हणून वाटते तसली ही भीती नव्हती. कशी होती त्याचेही वर्णन मी करू शकणार नाही. आत्ता या अत्यंत धोकादायक कैद्यांसाठी असलेल्या कोठडीतही मला सांगण्यास शरम वाटते - त्या मांजराने मला हळूहळू भरीस पाडले आणि मी भ्रमिष्ट होत गेलो. माझ्या बायकोनेही दोन तीन वेळा मला सावध करण्याचा प्रयत्न केला. या मांजराच्या छातीवर असलेले पांढरे केस मन्याच्या अंगावर नव्हते. ही दोन्ही मांजरे वेगवेगळी आहेत हे पटविण्याचा प्रयत्न तिने प्रामाणिकपणे केला. नाही असं नाही. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले होते की या मांजराच्या पोटावर आणि छातीवर पांढर्या रंगाचा एक पट्टा होता पण आता त्याला एक आकार येऊ लागला होता. तो कशाचा होता हे सांगण्याचा नुसता विचारही जरी माझ्या मनात आला तरी माझ्या जीवाचा थरकाप उडतो. माझी छाती धडधडू लागते. त्या आकारात मला फाशीचे तख्त दिसू लागले. फाशीचे तख्त... वेदना आणि मृत्यूचे एक भयानक यंत्र...
आता मात्र माझी अवस्था कुठल्याही मनुष्य प्राण्याची होणार नाही एवढी वाईट झाली होती. एका प्राण्याने, ज्याचा जमातीचा एक प्राणी मी ठार मारला होता त्यानेच माझी ही अवस्था केली होती. माझी झोप उडाली. दिवसा ते मला एकटे सोडत नसे आणि रात्री मी दचकून किंचाळत उठे. त्याचा गरम उष्ण श्वास माझ्या नाकाशी मला जाणवे तर छातीवर त्याचे वजन. छाती वरील वजनाची मला काळजी नव्हती पण माझ्या ह्रदयावर पडलेल्या त्याच्या मणामणाच्या ओझ्याने माझा जीव रात्री बेरात्री गुदमरू लागला. हळूहळू मला निद्रानाश जडला..
या अमानवी छळाने माझ्यात जो काही चांगुलपणा शिल्लक होता त्याचीही वाट लावली. माझ्या मनात दुष्ट विचारांना काहीच अटकाव राहिला नाही. अत्यंत दुष्ट व घाणेरडे विचार सतत माझ्या मनात पिंगा घालू लागले. माझी मन:स्थिती उदास आणि अधिक उदास यात हेलकावे खाऊ लागली. मला वारंवार नैराश्याचे झटके येऊ लागले. मला सगळ्या जगाचा तिरस्कार वाटू लागला. मला क्रोधाचे तीव्र झटके येऊ लागले व या सगळ्याचा त्रास अर्थातच माझ्या सोशीक पत्नीला झाला. ती बिचारी निमुटपणे सगळं सहन करीत दिवस कंठत होती.
एक दिवस ती माझ्याबरोबर आमच्या तळघरातील घरात उतरली. आता आम्हाला या जुनाट इमारतीचे दमट घाणेरडे तळघरच परवडत होते. हे मांजर आमच्या मागे मागे येत होतेच. त्याने एकदम माझ्या पायात उडी मारली व मला जवळजवळ पायऱ्यांवरून ढकलूनच दिले. माझे डोके सणकले. ‘सालं मुद्दामच करतोय हा !’’ मी किंचाळलो. त्याची वाटणारी भीती वगैरे विसरून, भडकून मी माझ्या हातातील कुर्हाड त्या मांजरावर घातली पण ती त्याला लागलीच नाही. माझ्या बायकोने मधे हात घातल्याने वाचले सालं ते मांजर ! तिच्या या हस्तक्षेपामुळे माझा रागाचा पारा इतका चढला की पुढच्याच क्षणी मी कुर्हाड तिच्या हातातून हिसकावून घेतली आणि तिच्याच डोक्यात घातली. त्याच क्षणी ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडली. मेली !
हे बीभत्स कृत्य झाल्यावर आता ते प्रेत लपवणे आलेच. शेजार्यांच्या दृष्टीस न पडता, दिवसा ढवळ्या किंवा रात्री बेरात्री सुद्धा ते तेथून हलविणे शक्यच नव्हते. माझ्या मनात त्या प्रेताचे विल्हेवाट लावण्याच्या योजना लगेचच तया होऊ लागल्या. प्रथम मला वाटले त्या प्रेताचे बारीक तुकडे करून ते घरातच जाळावेत. तळ घरातच खड्डा करून ते प्रेत तेथेच पुरून टाकावे असाही विचार माझ्या मनात तरळून गेला. नंतर मी ते प्रेत मागच्या विहिरीत फेकून द्यावे असे ठरवले. पण तीही कल्पना मला विशेष पटली नाही. नंतर ते प्रेत एका पेटीत भरून हमालांकरवी ती मालाची पेटी बाहेर हलवावी असाही एक विचार माझ्या मनात आला पण तोही विचार मी दूर सारला. शेवटी एक कल्पना मला पसंत पडली. मी ते प्रेत भिंतीत चिणून टाकण्याचे ठरवले. पूर्वी गुन्हेगारांना भिंतीत चिणून ठार मारत तसे..
या कामासाठी ते तळघर अत्यंत योग्य होते. त्याच्या भिंती ओल आल्यामुळे ढिसूळ झाल्या होत्या आणि त्याचा गिलावाही ठिकठिकाणी पाझरत होता. त्यामुळे तो गिलावा अजून ओलसर होता. शिवाय एका भिंतीत एक फडताळ विटांनी बुजवलेले मला आढळले. त्या विटा सहज निघण्यासारख्या होत्या. त्या काढून ते प्रेत आत चिणून त्या विटा परत लावणे हे जमण्यासारखे होते. फक्त नंतर इतर भिंतींच्या गिलाव्यास जुळणारा गिलावा केला की काम भागणार होते. कोणाच्या बापालाही हे कळणे शक्य नव्हते. मी मनातल्या मनात एक शीळ घातली...
माझी ही गणितं काही चुकणार नव्हती आणि चुकली ही नाहीत. एका पहारीने मी त्या सगळ्या विटा बाहेर काढल्या. आत भिंतीला ते प्रेत काळजीपूर्वक टेकवून उभे केले व विटांनी ते चिणून टाकले. नंतर जी पडझड झाली होती त्याची दुरुस्ती केली व सगळीकडे नजर फिरवली. ‘आता गिलावा केला की झालं.’’ मी मनाशी म्हटले. नंतर मी गिलाव्याचे सगळे सामान गोळा केले व फरक ओळखू येणार नाही असा गिलावा त्या भिंतीला करून टाकला. मी परत परत त्या भिंतीची सगळ्या कोनातून तपासणी केली. समाधान झाल्यावर मी सुटकेचा निःश्वास टाकला. आता कोणालाही येथे काही झाले आहे असे ओळखता आले नसते. खाली पडलेला कण न् कण मी वेचला व खाली कसलाही कचरा राहाणार नाही याची काळजी घेतली. ‘‘ चला येथे तरी माझे कष्ट वाया गेले नाहीत म्हणायचे !’’ मी समाधानाने म्हणालो.
ज्या प्राण्याने मला या संकटात टाकले त्याचा आता शोध मला घ्यायचा होता. त्याला ठार मारल्या शिवाय माझ्या जिवाला शांती लाभली नसती. ते मांजर तेव्हा माझ्या समोर आले असते तर मी त्याचा त्याच क्षणी मुडदा पाडला असता. पण त्याने चलाखपणे माझ्या हिंस्रपणाला घाबरून पोबारा केला होता. ते मांजर गेल्यामुळे मला आता सुटल्यासारखे वाटत होते. कसे वाटत होते हे सांगणे शब्दांच्या पलिकडचं आहे. त्या रात्री ते घरी फिरकले नाही. म्हणजे त्या रात्री तरी ते आले नव्हते. मी निवांतपणे शांत व गाढ झोपलो. हो ! जरी माझ्या शिरावर खुनाचे ओझे असले तरीही !
दुसरा दिवस गेला आणि तिसराही. मी आता जरा मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली. त्या राक्षसाने घाबरून माझी कायमची रजा घेतलेली दिसत होती. आता मला त्याचा शोध घेण्यात अर्थ नाही याची खात्री वाटू लागली. ते मांजर आसपास नाही याचा मला हर्षवायू व्हायचा तो काय बाकी होता. माझ्या काळ्या कृत्याचा आता मला पश्चात्ताप वाटेनासा झाला. पण काळजी म्हणून मी परत एकदा त्याला सगळीकडे शोधले पण ते काही दिसले नाही. काही लोकांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते मांजर काही सापडले नाही. ‘‘चला एकंदरीत चांगले दिवस आले म्हणायचे’’ मी मनात म्हटले.
खुनाच्या चवथ्या दिवशी अचानक पोलीस आले आणि त्यांना तळघराची व इमारतीची कडक तपासणी करायची होती. मी केलेल्या कामाबद्दल मला खात्री असल्यामुळे मी त्या तपासणीची विशेष काही फिकीर केली नाही. त्या पोलीस अधिकार्यांनी मलाही त्यांच्या बरोबर त्यांच्या तपासणीच्या कामात सामील करून घेतले. त्यांनी घराचा एकही कोपरा सोडला नाही. चार पाच वेळा इमारत व वरची खोली तपासून झाल्यावर अखेरीस ते तळघरात उतरले. माझ्या चेहर्यावरील एक सुरुकुतीही हलली नाही. माझ्या ह्रदयाचे ठोके नेहमीप्रमाणे संथगतीने पडत होते. एखाद्या शांत झोपलेल्या माणसाप्रमाणे. मी हाताची घडी घालून शांतपणे त्यांच्या मागे मागे फिरत होतो. शेवटी त्यांचे समाधान झाल्यावर ते जाण्यास निघाले. माझा आनंद माझ्या चेहर्यावर मावेना. मनातून मला माझ्या कामगिरीच्या अगदी फुशारक्या मारायचा मोह होत होता पण मी तो मोठ्या कष्टाने आवरला.
‘‘ साहेबांनो !’’ शेवटी मी म्हणालोच. ‘‘ निघालात की काय तुम्ही ? संशय घ्यायचे तुमचे कामच आहे. त्याबद्दल मला बिलकूल वाईट वाटले नाही. या घराची बांधणी जुनी व भक्कम आहे. बघा ना याच्या भिंती कशा भरभक्कम आहेत त्या !’’मी काय बोलतोय याकडे माझे लक्षच नव्हते. ते निघाले आहेत या कल्पनेनेच मी मनमोकळेपणाने बोलत होतो. असे म्हणून मी हातातील काठीने त्या भिंतीवर ठोकले. हाय रे माझ्या कर्मा ती तीच भिंत होती ज्यात मी माझ्या बायकोला गाडले होते. मी काठीने त्या भिंतीवर ठोकले. त्या निरव शांततेत त्या ठोकण्याचा आवाज केवढातरी मोठा भासला. त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून आतून एक घुसमटणारा आवाज आला. एखादे लहान मुल किंचाळत रडताना येतो तसा. थोड्याच क्षणात त्याचे रुपांतर एका ह्रदयाला घरे पडणार्या किंकाळ्यात झाले. मला का कोणास ठाऊक त्या किंकाळ्यात विजयोत्सवाच्या आरोळीचा भास झाला....
माझ्या मनात त्या वेळी काय विचार आले याबद्दल बोलण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. धडपडत मी विरुद्ध दिशेच्या भिंतीकडे धाव घेतली. जिने चढणारी माणसे एका क्षणासाठी स्तब्ध उभी राहिली. ते ऐकून त्यांच्या अंगावर काटाच आला असणार. पुढच्या क्षणी दहा पंधरा हात त्या भिंतीवर तुटून पडले. अखेरीस ती भिंतच कोसळली. त्यांच्या समोर एक कुजलेले व ताठरलेले प्रेत उभे होते. त्या प्रेताच्या डोक्यावर शेपटी हलवत, दात विचकत, लाल तोंडाचा, ज्या प्राण्याने मला या खुनासाठी प्रवृत्त केले होते तो प्राणी फिसकारत बसला होता. त्याच्या आवाजाने मी केलेल्या खुनाची बातमी जगाला ओरडून सांगितली... मी एका राक्षसालाच भिंतीत चिणण्याचा प्रयत्न केला होता.....
अनुवाद : जयंत कुलकर्णी
मूळ लेखक : एडगर ॲलन पो.
प्रतिक्रिया
5 Aug 2018 - 7:52 pm | सोमनाथ खांदवे
जबरदस्त ओघवती शैली , छान अनुवाद केलाय कुलकर्णी सर !
5 Aug 2018 - 9:13 pm | जव्हेरगंज
मस्त आहे!!!
5 Aug 2018 - 9:43 pm | तुषार काळभोर
एकदम भारी!
अवांतर: ती मुघलांच्या वंशजांची लेखमाला संपली की राहिली आहे अजून?
5 Aug 2018 - 11:06 pm | विजुभाऊ
श्वास रोखून वाचली कथा .
लै भारी
6 Aug 2018 - 7:47 am | सिरुसेरि
जबरदस्त .
6 Aug 2018 - 8:57 am | अभ्या..
मी ही कथा वाचली होती आधी पण जयंतकाकांच्या लेखणीतून अत्यंत सुरस अशी उतरलीय. मस्त.
6 Aug 2018 - 11:08 am | जेम्स वांड
एडगर ऍलन पो आणि कुलकर्णी काकांची अनुवाद शक्ती! ढवळून काढलेत राव. दंडवत!.
6 Aug 2018 - 1:58 pm | ज्योति अळवणी
भयंकर
6 Aug 2018 - 8:58 pm | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
6 Aug 2018 - 9:06 pm | टवाळ कार्टा
यावेळेस बात कुछ जम्या नै
7 Aug 2018 - 4:05 pm | चांदणे संदीप
भारीय!
आधी मला वाटलं जयंतकाका स्वतःची आत्मकथा वैग्रे सांगत आहेत. विश्वास बसत नव्हता पुढे पुढे वाचत गेल्यावर अनुवाद आहे हे लक्षात आलं. अनुवादाची शैली ओळखू येते लगेच.
Sandy
7 Aug 2018 - 4:23 pm | प्रचेतस
जबरदस्त कथा आहे ही. क्षणोक्षणी बदलत जाणारी गूढकथा
7 Aug 2018 - 4:34 pm | प्रसाद_१९८२
़बर्डस्ट वर्नण
7 Aug 2018 - 4:35 pm | प्रसाद_१९८२
जबरदस्त वर्णन, खूप आवडली.
7 Aug 2018 - 6:56 pm | खटपट्या
जबरदस्त...
13 Aug 2018 - 3:01 pm | पुंबा
जबरदस्त!!!!
19 Aug 2018 - 4:08 pm | टर्मीनेटर
भयंकर.