सिंदखेडचे राजे लखुजी (अथवा लुखजी ) जाधवराव - राजमाता जिजाबाईसाहेबांचे वडील आणि शहाजी राजांचे सासरे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा. मराठ्यांच्या इतिहासातील सुरुवातीच्या काळातली महत्वाची व्यक्ती. अश्या जाधवरावांचे एक नव्हे तर दोन चित्रे मला सापडली, त्या दोन चित्रांची ही कथा.
न्यूयॉर्कच्या 'मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट' मध्ये एक 'बादशाही अल्बम' नावाचा चित्रांचा संग्रह आहे. हा संग्रह जहांगीर बादशाहच्या काळात बनवण्यास सुरुवात झाली. शाहजादा खुर्रम म्हणजे शहाजहान याच्या काळात त्यात चित्रे जोडण्यात आली. औरंगझेबाच्या राज्यकाळात हा संग्रह पूर्ण झाला. या संग्रहावर असलेल्या शिक्क्यांवरून आणि सुरुवातीच्या 'शमसा' आणि 'उनवान' या नक्षीदार पानांवरुन आपल्याला हे सांगता येते. खास बादशाही संग्रहात असणारी चित्रे यात असल्याने हे चित्रे खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्तम दर्जाची आहेत. ही चित्रे दिल्लीत बादशाही संग्रहात होती आणि इ. स. १७३९ मध्ये नादीरशहाच्या लुटीतून ती वाचली. १८०२ साली इंग्रजांनी मराठ्यांकडून दिल्ली घेतल्यावर सुरुवातीचे इंग्रज 'लूनी अख्तर' म्हणजे डेविड ऑकतरलोनी आणि विल्यम आणि जेम्स फ्रेझर हे बंधू. त्यातील फ्रेझर बंधूनी स्थानिक मोगल चित्रकारांकडून जुन्या चित्रांच्या नवीन प्रती बनवून घेतल्या. फ्रेझर संग्रहात आपल्याला लखुजी जाधवरावांच्या चित्राची दुसरी १८०० च्या सुमारास काढलेली प्रत आढळते. दिल्लीतील आर्ट डीलर यांच्याकडून पाश्चात्य संग्राहकानी ही दोन्ही काळातील चित्रे विकत घेतली आणि परदेशी नेली.
राजे लखुजी जाधवराव - इ. स. १६२२ मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क
शिवभारत, बाद्शाहनामा आणि बसातीनुसलातीन या ग्रंथातून आपल्याला जाधवरावांच्या खुनाची हकीगत कळते. इ. स. १६२९ मध्ये निजामशहाच्या दरबारी लखुजी जाधवराव, त्यांची मुले अचलोजी आणि रघुजी आणि नातू यशवंतराव यांचा पूर्वनियोजित कारस्थानाप्रमाणे खून करण्यात आला. राजमाता जिजाबाईसाहेबांचे माहेर उध्वस्त झाले. शहाजीराजांनी निजामशाही सोडली.
राजे लखुजी जाधवराव - इ. स. १६२२ - चेहेऱ्याचे तपशील
चित्रावर शाहजहान बादशहाच्या हस्ताक्षरात फारसीमध्ये 'शबह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम' म्हणजे 'जाधवराव दखनी यांची प्रतिमा, हाशिमने काढलेली’ असे लिहिलेले आहे. हाच मजकूर (हाशीमचे नाव आणि दखनी वगळून) जाधवरावांच्या पांढऱ्या कपड्यांवर पायापाशी बारीक अक्षरातही लिहिलेला आहे.
चित्रकार आणि चित्रातील व्यक्तीचे नाव - 'शबिह-ए जादून राय दखनी अमल-ए हाशिम'
पायांजवळचा मजकूर
तीन मोगल फारसी हस्तलिखितांमधे जादूनराय यांचे इ. स. १६१४ ते १६२९ या काळातील उल्लेख आहेत. या विशेषनामाचा उल्लेख तुझुक-ए-जहांगिरी या जहांगीर बादशाहच्या आत्मचरित्रात येतो. जादूनराय असा उल्लेख शहाजहानच्या बादशाहनाम्यातही येतो. तिथे 'शाहूजी भोंसला दामाद जादू राय' असा स्पष्ट फारसी उल्लेख मिळतो. यावरून १६२९ पर्यंत जादूनराय म्हणजे लखुजी जाधव असे म्हणता येते. या चित्राचा काळ इ. स. १६२२ असा पाशात्य संशोधकांनी निश्चित केला आहे. त्यामुळे चित्रातील व्यक्ती म्हणजे लखुजी जाधवराव असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो.
जादूनराय असा उल्लेख - शहाजहानचा बादशाहनामा - जाधवरावांच्या खुनाची हकीगत
'शाहूजी भोंसला दामाद जादू राय' असा फारसी उल्लेख - शहाजहानचा बादशाहनामा
या निष्कर्षाला बळकटी देणारी काही कारणे अशी आहेत.
जादूराय अथवा जादूनराय (मराठीत जाधवराव) हा लखुजी जाधवराव यांना मिळालेला किताब होता. त्यांच्या मृत्यूनंतर तो किताब लखुजी जाधवराव यांचा नातू पतंगराव याला देण्यात आला असा उल्लेख 'माथीर-ए-अलामगिरी' या फारसी ग्रंथात आहे. किताब देण्याची ही पद्धत मोगल आणि दखनी सुलतान यांच्या दरबारात प्रचलित होती. उदाहरणार्थ मिर्झा अबू तालिब याला शाहिस्तेखान असा किताब होता. त्याचा उल्लेख शाहिस्तेखान म्हणूनच सहसा होतो. (अवांतर - याचीच बोटे छत्रपती शिवाजी महाराजांनी कापून त्याला शास्त म्हणजे शिक्षा केली आणि शास्ताखान नाव 'सार्थ' केले असा उल्लेख मराठी साधनात एके ठिकाणी आहे).
चित्रकार हाशिम
या चित्राचा चित्रकार हाशिम याची बरीच माहिती संशोधकांनी निश्चित केली आहे. त्यावरून असे सांगता येते की हाशिम हा मूळचा दख्खनचा रहिवासी होता. त्याच्या चित्रकार-कारकिर्दीची सुरुवात अहमदनगर अथवा विजापूर इथे झाली असावी. त्यानंतर तो त्या काळातली मोगलांची दख्खनच्या सुभ्याची राजधानी बऱ्हाणपूर इथे होता. तिथून तो उत्तर हिंदुस्तानातील मोगल दरबारात आणि वेळप्रसंगी परत दक्षिणेत येत जात होता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणाऱ्या आणि ठळक आणि ताकदवान रेषांनी काढलेल्या व्यक्तिचित्रांमुळे तो त्या काळातला एक श्रेष्ठ चित्रकार मनाला पाहिजे.
त्याच्या सुरुवातीच्या काळातल्या चित्रांपैकी एक म्हणजे इ. स. १६१७ मध्ये प्रसिद्ध निज़ामशाही हबशी सरदार मलिक अंबर याचे त्याने बऱ्हाणपूरचा सुभेदार अब्दुल रहीम खानखानान याच्यासाठी काढलेले चित्र. त्यात मलिक अंबरची ओबड-धोबड व्यक्तिमत्व साध्या पार्श्वभूमीवर उठून दिसते. हाशिमच्या चित्रांमध्ये गुलाबी, लाल, केशरी गडद निळा-तपकिरी, पांढरा आणि सोनेरी असे विशिष्ट रंगच त्याने वापरलेले दिसतात.
पानासाठी चुन्याचा काळा डबा (चुनारदान), सोनेरी खंजीर आणि हातातील सोन्याच्या अंगठ्या
हाशीमची व्यक्तिचित्रे अत्यंत अचूकपणे बारकाव्यासहित काढलेली दिसतात. मलमलीचा अंगास घट्ट बसणारा कुडता आणि अर्धपारदर्शक पायजमा, सुटलेली पोटे, सोन्याची चमकदार आभूषणे आणि तलवारी, पटक्यास जोडलेले मोत्यांचे तुरे, फुलाफुलांच्या भूमितीय नक्षीचे छाप असणारे कपडे आपल्याला त्याच्या चित्रांतून आढळतात. बलवान परंतु सुकुमार हात, कान मात्र हाशिमच्या विशिष्ट शैलीत काढलेले दिसतात.
बारकावे आणि हात
त्याच्या तरुण वयात काढलेल्या चित्रांवरचा दखनी प्रभाव आपल्याला त्याच्या सगळ्याच चित्रात थोडाफार आढळून येतो. हाशिम हा दख्खनमध्ये असताना शाहजादा खुर्रम म्हणजे नंतरचा बादशाह शहाजहान याच्या आश्रयास असलेल्या चित्रकारांमध्ये सामील झाला. शहाजहानचा नातू आणि दाराचा मुलगा सुलेमान शुकोह याचे हाशिमने काढलेले चित्र इंग्लंडमध्ये आहे. हाशीमने जाधवरावांच्या काळातील दख्खनमधील इतरही महत्वाच्या व्यक्तींची चित्रे काढली आहेत. त्यात विजापूरचा इब्राहिम आदिलशाह दुसरा, मलिक अंबर, अब्दुल रहीम खानखानान, मुल्ला महम्मद विजापूर यांची चित्रे येतात.
चित्राच्या मागे मोगली पद्धतीप्रमाणे सुंदर हस्ताक्षरात (कॅलिग्राफी) एक साधी-सोपी गझल लिहिलेली आहे. अनुवाद असा आहे.
जर चंद्र तुमच्यासारखा सुंदर असता,
तर चंद्रकोरीपेक्षाही सूर्य लहान असता!
तुमच्या काळात, हे दोस्ता,
तुमच्याशिवाय दीर्घ काळ राहण्याची सबुरी कुणाकडे आहे?
(गरीब अली अल-कातीब याने लिहिली असा उल्लेख)
या चित्राच्या कडांवर काढलेल्या नक्षीदार सोनेरी फुलांचा अभ्यास करून संशोधकांनी संग्रहातील इतर चित्रे, चित्रांचा काळ, संग्रह इत्यादी तपशील ठरवण्याचे निकष निश्चित केले आहेत. या गोष्टींवरून आपल्याला चित्रांविषयी अधिक माहिती मिळवता येते.
चित्राच्या फ्रेममधील फुले
फ्रेझर संग्रहातील चित्र - लखुजी जाधवराव १८०० च्या सुमारास काढलेले चित्र
फ्रेझर संग्रहातील चित्रात आपल्याला जाधवरावांच्या चेहेऱ्यातील बारकावे दिसत नाहीत. याची तुलना हाशीमच्या मूळ चित्राशी केली की हाशीमचे व्यक्तिमत्वाला उठाव देणारे चित्रण उठून दिसते.
फ्रेझर संग्रह - चेहेऱ्याचे तपशील
फ्रेझर संग्रह - चित्राच्या फ्रेममधील फुले
संदर्भ
----
गजानन भास्कर मेहेंदळे, ‘श्री राजा शिवछत्रपती’
माहिती त्यांच्या कॅटलॉगमधून घेतली आहे. तो इथे पूर्ण पाहता येईल
https://archive.org/stream/TheEmperorsAlbumImagesofMughalIndia
http://www.sothebys.com/en/auctions/ecatalogue/2012/arts-of-the-islamic-... आणि Willam Dalrymple 'White Mughals' यातून
शिवभारत, बाद्शाहनामा आणि बसातीनुसलातीन
बादशाहनामा पान ३०९
बादशाहनामा पान ३२७
प्रतिक्रिया
17 Jul 2018 - 8:17 pm | प्रसाद_१९८२
अतिशय सुंदर माहिती.
हि बातमी आजच्या मटात सकाळी वाचली होती मात्र ते संशोधक तुम्हीच आहात हे माहित नव्हते.
---
मटातील बातमीत वरिल चित्रे दिली नव्हती तिथे फक्त शिवाजी महारांजाचा फोटो होता असे का ?
17 Jul 2018 - 8:51 pm | मनो
म टा ने चित्र फक्त छापील आवृत्तीमध्ये टाकले आहे. त्यांच्या वार्ताहराला विचारले तर तो म्हणाला की ऑनलाइन असायला हवे. काय झालंय ते काही माझ्यापर्यंत पोचले नाही. म टा वाले ऑनलाइन दुरुस्ती करतील अशी आशा आहे.
17 Jul 2018 - 9:00 pm | टवाळ कार्टा
भारी.....बाकी ते पहिले चित्र पाहिल्यावर खालचा फोटो आठवला
18 Jul 2018 - 10:51 pm | मनो
मोहिंदर अमरनाथ? मिश्या नाहीत, असत्या तर अजून साधर्म्य दिसल असतं. चित्रकार हाशिमची जादू तीच आहे, फटकन एकदम व्यक्ती आणि व्यक्तिमत्व डोळ्यापुढे उभे राहते.
17 Jul 2018 - 9:17 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमचे लेख एकाहून एक अभ्यासू आणि रोचक असतात ! असेच लिहिते रहा, इथे तुमचे खूप चाहते झालेले आहेत.
17 Jul 2018 - 9:25 pm | सतिश गावडे
लेख आवडला. असेच खर्या अर्थाने अभ्यासू लेख मिपावर वाचायला मिळोत.
17 Jul 2018 - 9:43 pm | सोमनाथ खांदवे
देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो , एक अमूल्य ठेवा तुम्ही शिवप्रेमी जनते पुढे आणला आहे .
17 Jul 2018 - 11:45 pm | रुपी
अप्रतिम! इतकी अभ्यासपूर्ण आणि ध्यासाने माहिती मिळवून ती आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी धन्यवाद!
18 Jul 2018 - 9:16 am | प्रचेतस
उत्कृष्ठ लेख.
18 Jul 2018 - 11:31 am | श्वेता२४
हे सर्व आमच्यापर्यंत पोचविल्याबद्दल धन्यवाद
18 Jul 2018 - 12:35 pm | प्राची अश्विनी
लेख नेहमीप्रमाणेच उत्तम.
18 Jul 2018 - 12:43 pm | शाली
खुप छान माहिती मिळाली. मस्तच लेख. आवडला.
18 Jul 2018 - 1:17 pm | माहितगार
अभ्यासपुर्ण चांगला लेख. पु.ले.शु.
18 Jul 2018 - 2:23 pm | खटपट्या
खूप छान माहीती आणि लेख.
धन्यवाद मनो.
18 Jul 2018 - 4:51 pm | गवि
उत्तम.