शनिवार दुपारची वेळ, साधारण १:३० वाजलेले. सहकुटुंब मराठी picture ला जायचा योग तसा कमीच येतो आमचा, पण ह्यावेळी शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांवरचा picture असल्यामुळे एकत्र बघायचा असे ठरवलेच होते, picture अर्थातच "फर्जंद". तर theater मध्ये पोचलो आणि अजिबात गर्दी दिसेना. जरा वाईटच वाटलं मला. काही दिवसांपूर्वीच "Jurassic World" बघायला गेलो असताना "संजू" साठी १ km लांब असलेली रांग बघितली होती. संजय दत्तवरचा picture बघायला लोकं इतकी गर्दी करतात आणि मावळ्यांवरच्या picture ला नाही ह्याचं वाईट वाटलं बहुदा मला. "आपण लवकर पोचलो आहोत, picture सुरु होईपर्यंत लोकं येतील" असे नवऱ्याचे समजुतीचे शब्द ऐकत आत जाऊन बसलो. खरंच picture सुरु व्हायच्या वेळेपर्यंत बरीच लोकं आली होती, अगदी housefull नसला तरी theater तरी भरलेलं दिसत होतं आता.
picture सुरु झाला आणि सुरवातीलाच तानाजी कोंढाणा(सिंहगड) काबीज करतात ते बघताना डोळ्यात पाणी आले. काय त्या लोकांचं शौर्य आणि राजांवरची श्रध्दा! जसा जसा picture पुढे जाऊ लागला, तश्या ह्या गोष्टी अजूनच ठळक होत गेल्या. पुढचा-मागचा काही विचार न करता, महाराज आणि आऊसाहेबांनी सांगितलं की सगळे मावळे मोहिमेचा विडा उचलायला तयार असतं, एकही प्रश्न न विचारता. ही सगळी माणसं कुठल्या वेगळ्याच मातीची बनलेली असावीत का? एवढी प्रचंड निष्ठा आपल्या महाराजांवर! अर्थात त्यांनी जसा स्वतःचा जीव ओवाळून टाकला होता स्वराज्याच्या स्वप्नासाठी, तेवढाच जीव शिवरायांनी आणि जिजाबाईंनी त्या सगळ्यांना लावला होता. शिवबा सगळ्या मावळ्यांना स्वतःचे भाऊ समजत असत तर जिजाबाई सगळ्यांना त्यांची लेकरे. रयतेला जोवर दुश्मनांकडून त्रास होत आहे तोपर्यंत स्वराज्य असले तरी सुराज्य येणार नाही हे शिवाजी राजांनी ओळखले होते आणि म्हणूनच सुराज्यावरही त्यांचा भर होता. प्रजेची एवढी काळजी असणारा आणि प्रजेची आपुलकीने चौकशी करणारा राजा दुर्मिळच. picture मध्ये एक वाक्य आहे शिवाजी महाराजांचं "स्त्रियांची अब्रू लुटली जात असताना सुराज्य कसं येणार?". राजे, माफ करा पण हे माप लावायचं झालं तर आज शेकडो वर्षांनंतरही ह्या जगात कुठेच सुराज्य नाही असच म्हणायला लागणार आम्हाला.
लहानपणी शाळेत इतिहासाच्या पुस्तकामध्ये जी शिवाजी राजांची ओळख झाली, तेव्हापासूनच ते अगदी आपले राजे वाटायला लागले होते. आणि मलाच काय, ज्यांनी हा इतिहास शिकला आहे, राजांबद्दल ज्यांना माहिती आहे त्या प्रत्येक व्यक्तीलाच असं वाटत असावं बहुदा. पुढे "श्रीमान योगी" सारखी पुस्तकं वाचली, "जाणता राजा" सारखी नाटकं पाहिली आणि ही आपुलकी अजूनच वाढली. पुण्याचा कसबा गणपती, लाल महाल, प्रतापगड अशा जागी गेलो की नकळत अभिमान वाटतो ना? एके काळी ह्या परिसरातून शिवाजी महाराज, जिजाऊ आणि राजांचे मावळे फिरत असतील ह्या विचारानेच किती छान वाटतं(अगदी पुण्याच्या भाषेत सांगायचं तर कसलं भारी वाटतं ना!!). राजे काही एका जातीच्या किंवा एका धर्माच्या लोकांचे नव्हते, तर सगळ्या मराठी माणसांचे होते. राजांसाठी त्यांची सगळी प्रजा देखील सारखीच होती आणि स्वराज्य/सुराज्य म्हणजे "श्रीं ची इच्छा"! बाकी त्यात कुठलाही स्वार्थ नाही.
picture सुरु असताना, आमच्या अपेक्षेप्रमाणे, मध्ये-मध्ये मुलीचं शंकानिरसन करणंही चालू होतंच. आपल्या इतिहासातील एक पान तिला दाखवावं, इतकाच आमचा हेतू होता तिला घेऊन जाण्यामागे. पन्हाळगड सर झाल्यावर picture संपला आणि बाहेर पडताना मुलगी म्हणाली. "आई, good guys had only 60 people and bad guys had 2500 people. Those 60 people were so brave!". आणि मी काही उत्तर देणार त्याच्या आत गाणं गुणगुणायला लागली, "मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी"!! मग आम्हीदेखील बाकी काही न बोलता तिचं गाणं ऐकत गाडीकडे चालू लागलो...
प्रतिक्रिया
11 Jul 2018 - 4:15 pm | सिद्धार्थ ४
छान लिहिले आहे.
11 Jul 2018 - 8:08 pm | सोमनाथ खांदवे
माहीत होत सिनेमा फसला आहे तरी गेलो महाराजां साठी , आणि झालं पण तसेच . कोंडाजी फर्जंद च्या भूमिके साठी अंकित मोहन नावाचा बॉडी बिल्डर घेतला मग शिवाजी महाराजांच्या भूमिके साठी किरकोळ शरीरयष्टीच्या चिन्मय मांडलेकर ला का घेतले ? चिन्मय मांडलेकर नी कितीही छाती फुगवून अभिनय केला तरी तो महाराज नाही शोभत . त्या पेक्षा झी टी व्ही वरील संभाजी मालिकेतील महाराजांची भूमिका त्या कलाकाराने सरस केली आहे . फर्जंद च्या निर्मात्या दिग्दर्शकाची अक्षरशः कीव येते आणि त्यांची बौद्धिक क्षमता बघून वाईट वाटते .
तीनशे वर्षा पूर्वीचा इतिहास जर पडद्यावर उभा करायचा असेल तर स्पेशल ईफेक्ट चांगले हवेत पण तिथं ही बोंबाबोंब .
लहानमुलांची शाळेतील लफडी किंवा दलित आणि उच्चजातीतले लफडी किंवा खूपच आशयघन कथा ह्या त्याच त्याच चोथा झालेल्या विषयावर मराठी चित्रपट बनून रिलीज होत होते , खूप दिवसानंतर ऐतिहासिक कथेवर ' फर्जंद ' सिनेमा आला पण त्यात बालगंधर्व मधील बालनाट्याचेच फिलींग येत होते .
सई ताई , तुमचा पण अनुभव असाच असेल .
11 Jul 2018 - 8:22 pm | ज्योति अळवणी
छान लिहिलंय
11 Jul 2018 - 9:40 pm | Ram ram
बाकी काही असो पण खांदवेभाऊ शिवप्रेमी आहेत हे बरं वाटलं.
12 Jul 2018 - 11:17 am | श्वेता२४
महाराष्ट्रात शिवप्रेमी नसलेला माणूस औषधाला तरी सापडेल काय?
12 Jul 2018 - 11:35 am | लई भारी
हेच म्हणतो.
12 Jul 2018 - 5:26 pm | टवाळ कार्टा
उपरयांमध्ये असतीलच....आणि गडकोटांवर स्वताची नावे लिहिणारे, कचरा करणारे, बांधकामे करणारे मराठी लोक आहेतच की....इतके लांब कशाला जायचे, मिपावरच एकदा कोणीतरी उलटसुलट लिहिलेच होते
12 Jul 2018 - 7:53 pm | सोमनाथ खांदवे
हे मात्र खरं , असतात काही अस्तनी तील निखारे !!
गडावर थिल्लरपणा करून नाव लिहणाऱ्यांना आणि त्या वास्तू च महत्व माहीत नसणाऱ्या त्या जोड्या दोन तीन महिन्यांत वेगळ्या झाल्या असतील .