प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र!
गेली काही म्हणजे खरेतर अनेक वर्षे २२ जून १८९७ ही तारीख तशी लोकांच्या विस्मरणात गेलेली होती. क्वचित कधीतरी दूरदर्शन वर लागणाऱ्या ‘२२ जून १८९७” ह्या नावाच्या आणि (त्या घटनेवरच्या/विषयावरच्या) एकमेव मराठी चित्रपटाखेरीज फार काही कुठे दाखवले जात नसे. अगदी ताणून ताणून किंवा बादरायण संबंध जोडून सांगायचे म्हटले तर मध्यंतरी पुणे आकाशवाणीवर “गोंद्या आलारे...!” ही कॅच फ्रेज असलेली एक जाहिरात ऐकवत असत.तिचा संबंध चापेकर बंधूंशी जराही नसला तरी त्या निमित्ताने काही लोकाना आठवण तरी होत असे. त्यापेक्षा अधिक काही नाही. पण कधी नव्हे ते लोकाना ह्या वर्षीच चापेकर बंधूचे स्मरण झाले आहे. आता चापेकर बंधू हे परतंत्र भारतात एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यावर हल्ला( कोणतेही खाजगी कारण नसताना) करून त्याचा जीव घेणारे अगदी पहिले वहिले क्रांतीकारक. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे जरी आद्य क्रांतीकारक असले तरी त्यानी कोठल्याही इंग्रज अधिकाऱ्याला जीवे मारले नाही (अर्थात म्हणून काही त्यांच्या कार्यात, देशभक्तीत कमीपणा राहत येत नाही.) पण जन्माने हे लोक ब्राह्मण असल्याने स्वतंत्र भारताच्या इतिहासात दखलपात्र असण्याचे काही कारण नव्हते. स्वातंत्र्य वीर सावरकरांपेक्षा त्या अर्थाने ते खरेच भाग्यवान. पण २०१८ हे साल त्यांच्या साठी खास भाग्योदयाचा योग घेऊन आलेले दिसतेय. महारष्ट्रात पुन्हा नव-पेशवाई अवतरल्याची आणि ती भीमा कोरगाव येथे गाडण्याची हाकाटी झाली. त्याच सुमारास जळगावात कुणा ईश्वर जोशी नावाच्या माणसाने पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीत अंघोळ करणाऱ्या मुलाना( अनेकदा समजावून ताकीद देऊनही ऐकत नसल्याने ) फटकावल्याने सवर्ण समाज मागासांवर कसे अत्याचार करून राहिलाय ह्याचे ज्वलंत दर्शन घडले – पुढे हा ईश्वर जोशी जोशी आडनावाप्रमाणे ब्राह्मण नसून भटक्या विमुक्त समाजातालाच एक आहे म्हणजे मागास आहे हे कळल्यावर सगळ्यांचीच तोंड कडू झाली.असो...
तर २०० वर्षापूर्वी २८००० ब्राह्मण सैन्याला खडे चारल्याची आणि इंग्रजांची तळी उचलल्याची साग्रसंगीत, वाजत गाजत आठवण काढून झाल्यावरही काही मजा येईना.अगदी छत्रपती शिवाजीमहाराजांचे चित्र असलेले टि शर्ट घातलेल्या राहुल फटांगळेचा बदडून खुन, कपाळावर शिवगंध( हा काय प्रकार आहे?) लावलेल्या विशाल जाधव वर प्राणघातक हल्ला, " छत्रपती , भवानी , गणेश " या आणि अशाच प्रकारची नावे असलेल्या जवळपास १३० मालमत्ताची नासधूस जाळपोळ करणे, याशिवाय गणपती , साई बाबा यांच्या मंदिराची मोडतोड करुन विटंबना करणे इत्यादी प्रकार करूनही काही रंग भरेना. ( हे सगळे पोलीस दफ्तरी नोंद आहे. –आभार तुषार दामगुडे )
मग २२जुन आला आणि थोडे फार ह्या निमित्ताने ब्राह्मणजातीत जन्माला आलेले टिळक आणि ब्राह्मणच असलेल्या चापेकरांचे चारित्र्य हनन करून थोडी तोंडाला चव येते का पाहूयात! ह्या उच्च भावनेने प्रेरित होऊन महारष्ट्रातील काही विचारवंत लोकांनी खालील प्रमाणे पोस्टी टाकल्या...
चाफेकर बंधुनी रैंड चा खून केला .
या खुनाला प्लेगच्या साथीची पार्श्वभूमी होती . जेव्हा पुण्यात प्लेगची साथ सुरु झाली तेव्हा माणस पटापट मरत होती . मरणाऱ्यांची संख्या काही हजारा पर्यंत पोहोचली होती .
अश्या परिस्थितीत सनातनी ब्राम्हण ही साथ देवाची अवकृपा झाली आहे म्हणून देव पाण्यात बुडवून रोगी नीट होण्याची वाट बघत होते.
रोग हे एखाद्या जिवाणू मुळेच होतो हे फ़क्त यूरोपियन देशामध्येच माहीत होत . तेव्हा भारतामध्ये या बद्दल कमालीच अज्ञान होत .
या रोगांना भारतात देवांचा कोप झाला असच समजत असत आणि इतर समाज ही सनातनी ब्राम्हणांचे शेपुट धरून त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत असत .
या रोगावर काही उपाय नव्हता . फ़क्त हां संसर्गजन्य रोग आहे आणि बाधित रोग्यांना इतर चांगल्या माणसांपासून दूर ठेवले असता हां रोग नियंत्रणात येतो .. एव्हडेच कळाले होते .
त्या नुसार इंग्रजांनी उपाय सुरु केले . या कामासाठी सिव्हिल ऑफिसर रैंड याची प्लेग कमिशनर म्हणून नियुक्ति केली .
रैंड ने लोकांमध्ये जाऊन या रोगाची माहिती दिली .. या रोगाची तीव्रता सांगितली .. रोग्यांना इतर चांगल्या माणसां पासून दूर ठेवण हाच एक उपाय आहे हे सांगितले .
परंतु रोग हे अश्या काही विषाणु मुळे होतात हे मुळातच माहीत नसलेल्या सनातनी ब्राम्हण समाजाने रैंडला विरोध केला . रैंड ने त्याच्या कर्तव्याला जागुन घराघरातून प्लेग चे रोगी शोधून त्यांना इतरां पासून वेगळे ठेवले आणि प्लेग नियंत्रणात आणला .
रैंड ने या उपचार मोहिमेत लाखो भारतीयांचे प्राण वाचविले .
परंतु लाखो भारतीयांचे प्राण वाचवीणाऱ्या रैंडच्या या उपकाराचा सनातनी ब्राम्हणांना गंध ही नव्हता . सनातनी ब्राम्हणांनी या मोहिमेला संस्कृतीचा ऱ्हास असा समज करुन घेतला . हां गैरसमज समाजात टिळकांनी पसरवला .
प्लेग आटोक्यात आल्यावर टिळकांनी आपल्या संस्कृतीचा ऱ्हास इंग्रजांनी केला असा गैरसमज मोठ्या प्रमाणावर समाजात पसरवला .
टिळकांनी केसरी मध्ये अग्रलेख लिहून .. ठिकठिकाणी भाषणे देऊन इंग्रजांच्या या समाजाला आवश्यक असणाऱ्या मोहिमे विरुद्ध इतर सनातनी ब्राम्हणांना इंग्रजां विरुद्ध भडकवायला सुरुवात केली .
याच्याच् परिणाम असा झाला की लाखो भारतीयांचे प्राण वाचवीणाऱ्या रैंड चा खून सनातनी विचारधारा बाळगुण असणाऱ्या चाफेकर बंधुनी 22 जून 1897 रोजी केला . रैंड बरोबर त्याचा सहाय्यक आयस्टर याचाही खून केला गेला .
रैंड आणि आयस्टर च्या खुना बद्दल चाफेकर बंधुना फाशी देण्यात आली आणि समाजात सुधारणा घडवून आणण्यात बाधा निर्माण करण्याच्या आरोपा खाली टिळकांना सक्तमजुरिची शिक्षा झाली .
महेश भोसले , पुणे
23/6/2018
थोडा वेळ उपरोध आणि खवचट पणाची भाषा बाजूला ठेवून जर बोलायचे म्हटले तर ही पोस्ट नुसती तर्क दुष्ट आणि असत्यावर आधारलेली आहे असे नाही तर अत्यंत थंड डोक्याने आणि सत्याचा सोयीस्कर अपलाप करून आणि असत्य योग्य ठिकाणी पेरून तयार केलेली आहे. ह्यातून पुढे काही वर्षानी चिंचवड आणि गणेश खिंड इथे कोरेगाव भिमासारखे उत्पात घडले तर आश्चर्य वाटायला नको.
मुळात प्लेगची साथ भारतात आणली इंग्रजांनीच, ह्यापूर्वी इ.स. ५००-६०० च्या सुमारास आणि इ.स. १३००-१४०० च्या सुमारास मोठ्याप्रमाणात साथी येवून युरोपात प्रचंड मानव हानी झालेली होती.(ब्युबोनिक प्लेग, black death अशा अनेक नावानी हा प्लेग इतिहासात प्रसिद्ध आहे.)व्यापार उदीमाच्या निमित्ताने जगभर फिरणारी जहाजे त्याच्यावर ह्या रोगाचे प्रमुख वाहक जे उंदीर ते घेऊन ही फिरत. ह्या उंदरांच्या अंगावर असलेल्या पिसवा ह्या रोगाच्या विषाणूने ग्रस्त होत. त्याना काही होत नसे पण उंदीर मात्र आजारी पडून मरत. उष्ण रक्ताच्या प्राण्यांच्या कडे आकर्षित होत असल्यामुळे ह्या पिसवा जर माणसाच्या जवळ आल्या तर त्या माणसांच्या अंगावर चढून माणसाना देखील ह्या रोगाची लागण करत. हा रोग अत्यंत संसर्ग जाण्या आल्याने पुढे ह्या माणसाच्या संपर्कात येणार्या इतर माणसाना ही हा रोग होता असे ह्या प्लेगची भारतात १८९६साली पहिली साथ आली ती मुंबईत. आता इंग्रजाना जो एकदम भारतीयांचा कळवळा आल्याचे ह्या पोस्टीत लिहिलेय तसे ते नसून भारतात प्लेग (त्याला गोळी ताप म्हणत किंवा ग्रांथिक सन्नीपात) आल्यावर युरोपातील त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून वाटेल ते उपाय करून प्लेगची साथ काबूत आणायचे स्पष्ट आदेश भारत सरकारला होते आणि त्याप्रमाणे हिंदी सैनिकांचे पथक कामाला लावून मुंबईत प्लेगची साथ आटोक्यात आणली गेली. त्यानंतर ४ फेब्रु १८९७ रोजी साथीच्या रोगाचा कायदा( The Epidemic Diseases Act) मध्यवर्ती विधीमंडळात संमत झाला. जो प्लेगचा निर्बंध म्हणूनही ओळखला जातो.ह्या कायद्याने इंग्रज अधिकार्याना अमर्याद अधिकार दिले गेलें त्यांच्या गैर वापराविरुद्ध न्यायालयात दाद मागायची ही सोय नव्हती.
हि साथ पुण्यात आली तेव्हा ती आटोक्यात आणण्यासाठी प्लेग कमिटी नेमून वॉल्टर चार्ल्स रँड हा आय सी एस अधिकारी तिच्यावर नेमण्यात आला आणि त्याच्या हाताखाली गोऱ्या सोजीरांची तुकडी देण्यात आली. हा रँड आधी सातार्याला जिल्हाधिकारी म्हणून होता. त्याची विकृत किंवा दुष्ट वृत्ती सांगायची तर तेव्हा काशीयात्रेवरून आलेल्या माणसांची मिरवणूक काढून वाजत गाजत गावात घेऊन यायची पद्धत असे त्याला द्वारं काढण म्हणत . तर ह्या रँडने त्यावर बंदी घातली म्हणजे वाजत गाजत मिरवणूक काढण्यावर बंदी घातली आणि तरी ही एकाने अशी मिरवणूक काढली तर त्या मिरवणुकीतल्या ११ जणाना पकडून त्याना १ महिना ते ३ महिने सश्रम कारावासाच्या शिक्षा तर ठोठावल्याच पण त्याना रणरणत्या उन्हात मुद्दाम गावातून २२ मैल अनवाणी चालवत गावाबाहेरच्या तुर्रुंगापर्यंत नेले.
तर असा हा रँड आपल्या बरोबर कर्नल फिलिप्स आणि कॅप्टन बीव्हरीज आणि इतर शेकडो गोरे सोजीर घेऊन प्लेगचा बंदोबस्त करण्यासाठी पुण्यात आला होता. ह्या पैकी कॅप्टन बीव्हरीज हा डॉक्टर होता आणि त्याला पूर्वी होंगकोंग मध्ये प्लेग च्या साथीत काम करण्याचा अनुभव होता. हो तिथे ही इंग्रजाच ही प्लेगची भेट घेऊन गेले होते. तर ह्या कॅप्टन बीव्हरीज च्या मताप्रमाणे एतद्देशीय शिपायाकरवी रोगी लोकाना वेगळे करणे तितक्या निष्ठुर पणे होत नाही म्हणून ह्या कमी फक्त गोरे सोजीरच घेतले पाहिजेत असे होते.आणि त्याला अर्थातच व्साहेब्ची मान्यता आणि पोर्ण सक्रीय पाठींबा होता.( मुंबईत हीच साथ हिंदी सैनिकांनी कशी काबूत आणली ते विच्रारायचे नाही.) धन्य ते इंग्रज आणि धन्य तो पुण्यात्मा रँड!
पुण्यात संगमाजवळ तात्पुरते प्लेग इस्पितळ उभारले आणि स्वारगेट जवळ त्या रुग्णाच्या नातेवाईकाना वेगळे करून ठेवले जात असे. समजून घ्या हे ऐच्छिक नसे तर जबरदस्ती असे. आजारी माणूस जाऊ द्या पण त्याच्या घरात राहणारा हरेक माणूस केवळ संशयावरून तिथे जाऊन खितपत पडत असे. प्लेगचा रोग झालेला माणूस बहुतेक वेळा मरतच असे पण त्याचे अंतिम दर्शन सोडा त्याच्या प्रेतावर अंतिम संस्कार करू देत नसत . आणि मुख्य म्हणजे मरणारे रोगी फक्त ब्राह्मण नसत.
त्याहून भयानक गोष्ट म्हणजे तपासणी पथक. सुरुवातीला हे पथक कदाचित समजुतीने वागले असेल ही पण लवकरच घरात घुसून आत अगदी खाजागीच्या खोलीत जाणे, सामानची नासधूस करणे पी पैका, चीज वस्तू लुबाडणे, केवळ संशय जरी आला तरी घरातले सगळे समान बाहेर काढून त्याला आग लावून टाकणे असे प्रकार सर्रास करत . संशयित रोगी प्लेग इस्पितळात पाठवला जात असे, घरात थकलेले, अंथरून धरलेले वृद्ध रोगी समजून प्लेगच्या इस्पितळात पाठवत त्याला रोग झालेला नसला तरी तिथे लागण होईच , असे कितीजण हकनाक मेले असतील त्याची गणतीच नाही. तिथे सुश्रुषा स्वच्छता खाणे पिण्याचीही कमतरता असे. .
तपासणी करता गेलेलं सोजीर घरातल्या सगळ्याना घराबाहेर काढून त्यांचे कपडे उतरवून तपासणी करत . काही समजतंय का? उघड्यावर दिवसाढवळ्या कपडे उतरवून तपासणी . आणि ह्या रोगाची गाठ काखेत तसेच जांघेत येई म्हणजे मांडी जिथे कमरेला चिकटते तिथे जननेन्द्रीयाच्या बाजूला. तेव्हाचा काल सोडा आजही हे कुणी चालवून घेईल का? प्लेगचा रोग झाल्याचा संशय आला म्हणून एखाद्या इंग्रजाला त्यांच्या देशात किंवा भारतात अशी वागणूक मिळाली असती का?ह्याबाबत तक्रार केल्यावर घरात अंधार असल्याने नीट बघता येत नाही म्हणून उघड्यावर अशी तपासणी करावी लागते असली निर्लज्ज उत्तरे दिली जात. गोऱ्या सोजीरांची पलटण धाड टाकायला येते हे कळल्यावर लोक जमेल तेवढे समान पैसा अडका घेऊन पलायन करत म्हणून मग पुढे अख्या पेठेलाच गराडा घालुन सगळ्यांची उघड तपासणी होई. घर समान सुमान आणि माणसाना बाहेर काढून रिकामे करत आत जंतुनाशक पावडरी आणि फिनेल टाकून निर्जंतुक करत आणि त्यला सील ठोकून लाल फुली मारत. अक्खी पेठ म्हणजे फक्त त्यात ब्राह्मण नसत सगळ्याच जातीचे लोक असत त्यात त्यांची ससे होलपट होई. त्याना तसेच गुराढोरासारखे हाकलत हाकलत स्वारगेटला घेऊन जात. त्यावेळी गोपाळ कृष्ण गोखले इंग्लंडला होते पण अनेक सुधारकांनी त्याना ह्या अत्याचाराची हकीकत पत्र-तार करून कळवल्यावरून त्यानी मँचेस्टर गार्डियन मध्ये मुलाखत देऊन संताप व्यक्त केला होता ( ११ मार्च १८९७ )
आता वर विनोद दिवे ह्यांच्या विखारी पोस्ट मध्ये त्यानी जे “महार आमच्या ब्राह्मण स्त्रियाना उलथापालथ करून बगला तपासतात, गणेशाचे वाहन उंदराला मारून टाकतात ...सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? “ असे लिहिले आहे त्यात महार सोडा, ब्राह्मणही सोडा इतर कुठल्याही जातीत-स्वजातीय परक्या पुरुषाना सर्रास घरात घुसून स्त्रियांच्या काखा बगलात हात घालून तपासायची मुभा होती का? त्याना तसे म्हणायचे आहे का? तसेच हा जो सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? म्हणून अतिप्रसिद्ध असलेल्या अग्रलेखाचा उल्लेख इलेला आहे तोच मुळी रँडच्या खुनानंतर पुण्यात इंग्रजांनी जी दडपशाही चालवली होती तसेच प्लेग बाबत अजूनच कठोर वर्तन सुरु झाले होते त्यावेळचा आहे. ह्यालाच दिशाभूल म्हणतात. कळले ?
टिळकांची भूमिका
एकंदर ह्या पोस्टचा वापर टिळकाना बदनाम करण्यासाठी केलेला असल्याने त्यांच्या भूमिकेबद्दल सविस्तर लिहिणे भाग आहे.
प्लेग सारख्या भयानक संसर्गजन्य आणि जीवघेण्या रोगावर प्रभावी उपचार नाही आणि रोगी माणसाना वेगळे काढणे हाच त्याचा फैलाव रोखण्याचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाईकाना वेगळ्या संसर्गवर्जक तळावर ठेवणेही भाग आहे हे जाणून टिळकांनी त्याप्रमाणे सुरुवातीला जनतेला सरकारला ह्या कामी सहकार्य करावे असेच आवाहन केलेले आढळते, तसेच एवढे पुरेसे नसून ह्या संसर्गवर्जक तळावरील लोकांची आबाळ होऊ नये म्हणून त्याचे व्यवस्थापन पालिकेकडे असावे म्हणून मुंबई राज्याचे गवर्नर लॉर्ड सँडहर्स्ट ह्याना अर्ज दिला होता. तो अर्थात मान्य झाला नाही म्हणून मग पुण्यातील डॉक्टर आणि इतर प्रतिष्ठीत लोकांना एकत्र करून लोकांना सरकारच्या उपाय योजनान्बद्दल आणि त्याच्या आवश्यकते बद्दल समजावणे, अवगत करणे, पैसे व इतर सामान वर्गणी स्वरूपात गोळाकरून त्यातून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची सोय करणे असे उपक्रम सुरु केले. लोक रोगाच्या भयाने गाव सोडून पळत पण त्याने रोग इतरत्र फैलावतो म्हणून गाव सोडून न जाता पुण्याबाहेर म्हणजे फर्ग्युसन कॉलेज च्या जवळच्या टेकडी आणि आसपास तंबू ठोकून राहण्याची कल्पना त्यानी मांडली व स्वत: अंमलात आणली. स्वत:ला किंवा त्यांच्या कुटुंबियाना रोगाची लागण होऊ शकते हे माहिती असून ते गाव सोडून पळून गेले नाहीत. त्यांचा थोरला मुलगा देखील प्लेग होऊनच वारला. ह्या त्यांच्या जनते विषयीच्या बांधिलकीने, कळवळ्यानेच ते खरेखुरे लोकनेते होते हे सिद्ध होते.देहभान विसरून प्लेगच्या साथीत रुग्णसेवेचे काम करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांना ह्या रोगाची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला हे ही इथे आवर्जून नमूद केले पाहिजे.
पुढे रँड आणि त्याच्या पलटणीचे अत्याचार वाढू लागले आणि रोगाचा फैलावही वाढून जनतेची हलाखी अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटात अधिकच वाढली. सरकारचे हे उपाय(!)देखिल कमी पडू लागले तसे पुण्यातील व पुण्या बाहेरील डॉक्टर लोकांची मदत मिळवून त्यानी हिंदू प्लेग रुग्णालय स्थापन केले. त्याला अर्थात पुण्यश्लोक रँडने विरोध करत परवानगी नाकारली तर लॉर्ड सँडहर्स्ट कडून अनुमती मिळवून टिळकांनी रँडचा विरोध मोडून काढला. पुढे २० वर्षानी चिरोल केस संदर्भात साक्ष देताना लॉर्ड सँडहर्स्टने ह्या त्यांच्या कार्याचा गौरव पूर्वक उल्लेख केलेला आहे.
टिळक तर जहाल म्हणून प्रसिद्ध पण पुण्यातील मवाळ पक्षीयानी देखील लॉर्ड सँडहर्स्टकडे तक्रार अर्ज दाखल केले तसेच आपल्या वृत्तपत्रातून रँडच्या अत्याचाराचा प्रखर भाषेत विरोध केलेला आढळतो.त्यानीच पुण्यातून २० सहस्त्र सह्या असलेले अर्ज पत्र लॉर्ड सँडहर्स्टकडे पाठवून रँडच्या अत्याचाराला आळा घालण्याची विनवणी केली होती.सुधारक च्या १२ एप्रिल १८९७ च्या अंकात संपादक म्हणतात “...इतके दिवस चोरीवरच भागत होते, पण आता बायकाच्या अब्रूवर हात टाकेपर्यंत ह्यांची मजल गेली आहे आणि तरी आमचे लोक शांतच. अरे तुम्ही इतके नि:सत्व कशाने झाला आहात? पृथ्वीच्या पाठीवर आमच्या सारखे नामर्द लोक सापडणार नाहीत.आडदांडास कायदा शिकवा...” तर १० मे १८९७ रोजी सुधारक म्हणतो “...इतके सगळे झाले तरी आमच्याने प्रतिकार करवत नाही. हे कशाचे लक्षण! सर्व जगातील रानटी पासून ते सभ्य समाजातील लोक ज्या एका बाबतीत संवेदनशील असतात त्या तुमच्या स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे काढून जाहीर विटंबना केल तरी तुम्ही स्वस्थ ते स्वस्थच. धिक्कार असो तुमचा. अरे जनावरानाही इतका सोशिकपण शक्य नाही.” आता सांगा तसे म्हटले तर हे मवाळाचे विचार काय कमी चिथावणीखोर आहेत पण खरोखर इतके भयंकर अत्याचार तेव्हा होत होते.हे सगळे लोक केवळ ब्राह्मण होते म्हणाल तर अंजुमन-ए- इस्लाम असोसिएशन ह्या संस्थेचे अध्यक्ष नवाब अब्दुल फिरोज खान ह्यांनी देखील सरकारकडे ह्याची तक्रार करणारा अर्ज शेकडो सह्या गोळ्या करून धाडलेला होता.
ह्या अत्याचारातून कुणीच देशी माणूस सुटत नसे. पंडिता रमबाई ह्यांच्या शारदाश्रामावर ही त्यांच्या धाडी पडल्या आणि त्यात दोन स्त्रीयावर बलात्कार देखील केले गेले आणि त्यातली एक तर नंतर गायबच झाली. ह्यासंबंधी रमाबाईन्नी ज्ञानप्रकाश मध्ये पत्र प्रसिद्ध केलेच पण कलकत्त्याहून निघणाऱ्या अमृत बझार पत्रिका आणि मुंबईच्या Bombay Guardian मध्ये ही वृत्तांत छापून आणला. त्यात त्या म्हणतात “...अशा किती सत्शील मुली ह्या प्रमाणे नाश पावल्या आहेत आणि नाहीशा झाल्यात ते एका ईश्वराला ठाऊक...” Bombay Guardian १६ मे १८९७. सदाशिव पेठेत अशीच तपासणी चालू असताना सोजीरानी काही स्त्रियांची भर रस्त्यात तपासणी केली. तेव्हा त्या स्त्रियांनी आकांत करत शनीच्या पारावर डोके आपटून कपाळ मोक्ष करून घेतला.
स्वत:च्या घाणेरड्या मनसुब्यान्साठी चापेकर आणि टिळकांची बदनामी करणारे कुलांगार ह्या स्त्रियांचे पणतू खापर पणतू नसले म्हणजे मिळवले नाहीतर त्या माउल्याना जिवंत असताना भोगाव्या लागल्या तशाच यातना मृत्युपश्चात भोगाव्या लागायच्या.
हे सगळे पाहत लोक विशेषत: तरुण अगदीच शांत होते असे नव्हे,रास्तापेठेत त्यानी सोजीराना तुफान मारहाण केली होती. इतकी कि त्यातला एक नंतर मरण पावला तर कॅप्टन ओवेन लुईस ह्या संसर्ग वर्जक तळाच्या अधिकार्याच्या घोडागाडीवर दगड फेक केली गेली. पण ह्या फुटकळ घटना झाल्या/
चापेकर बंधूना टिळकांनी चिथावले असे म्हणणे हा तर बेशरम पणाचा कळस आहे . असले अत्याचार इंग्रज करत असताना टिळकांनी वेगळे आणि चीथावायची गरज काय होती! ह्याच चापेकरांनी प्लेगचे साथ मुंबईत चालू असतना, म्यात्रीक्युलेशनच्या परीक्षेचा मांडव जाळला होता(३१ ऑक्टोबर १८९६) का तर प्लेगची साथ जोरावर असल्याने सरकारने हि परीक्षा पुढे ढकलावी असे निवेदन गंगाधर देशपांडे नावाच्या विद्यार्थ्याने केले होते पण सरकारने ती विनंती मान्य केली नाही. विचार करा परीक्षेच्या निमित्ताने बाहेरगावाहुन येणारी मुलं हा रोग घेऊन आपल्या गावी नसती का गेली? हा सरकारचा जनतेविषयी कळवळा आणि प्लेग संबंधी काळजी! चापेकरांनी त्याआधीच विक्टोरिया राणीचा मुंबईत जो एस्प्लनेड रोड वरचा पुतळा होता त्याची डांबर टाकून आणि खेटरांची माळ घालून विटंबना केली होती.(११ ऑक्टोबर १८९६) कारण होते १८९७ हे वर्ष राणीच्या राज्यारोहणाचे ५० वे वर्ष होते. थोडक्यात चापेकर हे आधीपासून इंग्रज विरोधक होते आणि त्याचे कारण त्यानीच लिहून ठेवले आहे ते म्हणजे त्याना इंग्रजी सैन्यात नोकरी करायची होती पण ब्राह्मण विशेषत: चित्पावन ब्राह्मण असल्याने त्याना सैन्यात घेतले गेले नाही त्याचा राग त्यानी मनात धरला होता. आता ते विचारवंत, सुधारक किंवा फार गुणी संघटक होते असे नाही तसे ते उचापत खोरच होते. अनेक धर्मांतरीत हिंदुना चोप देणे हे त्यांचे आवडते काम होते.त्यानी पुण्यात गोफण क्लब स्थापन करून इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची योजनाही आखली होती, इतके त्यांचे एकंदर परिस्थितीचे आणि त्यावरच्या उपायांचे आकलन तोकडे होते. ते कर्मठ, सनातनी होते पण तो त्यांचा गुणविशेष नाहीच. जेव्हा सर्व जाती धर्मातले पुढारी विचारवंत, धुरीण( काही सन्माननीय अपवाद सोडून) पुण्यात चाललेल्या अत्याचाराकडे षंढ बनून पहात बसले होते तेव्हा ह्या अतिसामान्य कुवतीच्या तरुणांनी शांत न बसता प्रतिकार करायचे ठरवले. परिणामांची तमा न बाळगता. त्यांच्या ह्या कृत्याने खुद्द इंग्लंड पर्यंत धक्का छोटा का होईना पण बसला. अजून सगळीच राख झाली नाही, काही निखारे अजूनही धुमसत आहेत ह्याची जाणिव ह्या निमित्ताने सगळ्यांनाच झाली. ह्या कृत्यानंतर पुण्यात प्लेगच्या साथी पुढंही आल्या पण असे अत्याचार करण्याची हिम्मत किंवा दुर्बुद्धी म्हणा इंग्रज सरकारला पुन्हा झाली नाही. एका अधिकाऱ्याच्या खुनात इंग्रज सरकार उलथून पडणार नव्हते कि स्वातंत्र्य मिळणार नव्हते पण ही उपलब्धी काय कमी होती. ह्या बलिदानाने चापेकरांचा निर्वंशच झाला, त्यांच्या घरात कुणाला प्लेग झाला नव्हता तरी त्यानी स्वत:च्या मर्जीने हे बलिदान केले. त्याची आज काहीतरी लाज बाळगली पाहिजे कि नको?टिळकांनी चिथावणी दिल्यामुळे त्यानी हे कृत्य केले असे जरी म्हटले तरी तो सत्याचा अपलाप आणि चापेकारावाराती अन्याय होईल आणि न केलेल्या कृत्याचे श्रेय टिळकांना मिळेल अन्यथा ह्यात लाजिरवाणे असे काही नाही. पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या जुलमाचा प्रतिशोध घेण्या मुळे मनस्वी दु:ख होणाऱ्या अधमाधम कुलांगार अवलाद्देना त्याचे काय होय . द्रविड बंधू जसे इंग्रजाना फितूर झाले तसल्याच ह्या अवलादी...
आता विजय दिवे ह्यांनी जाणून बुजून जो महार लोकांचा त्या सैनिकांनी घरात घुसून ब्राह्मण बायकांच्या काखा बगला तपासण्याचा गलिच्छ उल्लेख केला आहे त्याबद्दल थोडे .
हे समजायला फार अक्कल लागणार नाही कि हा महार सैनिकांचा उल्लेख यंदाच झालेल्या भीमा कोरेगाव , महार बटालियन , २०० वर्षापूर्वीच्या युद्धाच्या जायच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या भावना भडकावण्या साठी मुद्दाम केला आहे पण
ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीने बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्री मध्ये सामील असलेल्या लोकातून महार जातीचे लोक वेगळे काढून पुढे महार रेजिमेंट स्थापन केली.इंग्रज-मराठा युद्धात महार रेजिमेंट ने असामान्य पराक्रम शौर्य आणि स्वामी निष्ठा दाखवत इंग्रजाना अनेक जय मिळवून दिले हे खरेच पण त्यानी १८५७ च्या बंडाच्या बंदोबस्तात उत्तम कामगिरी करत महाराष्ट्रात तरी बंडाचा वणवा न भडकू देण्यात मोलाचा वाटा उचलला.( ह्यात जात म्हणून महारांची बदनामी करण्याचा हेतू नाही. इतर अनेक भारतीय सैनिकांच्या पलटणी स्वामिनिष्ठ होत्याच पण संस्थानिकही इंग्रजानप्रती स्वामी निष्ठच होते.भारताप्रती निष्ठा दाखवायला भारत एक देश म्हणून अगदी संकल्पना म्हणून तेव्हा लोकाना माहिती नव्हता.)पण इंग्रजानी ह्याची परत फेड कशी केली तर १८५७ च्या नंतर इंग्रज अधिकाऱ्यांनीच मांडलेल्या The Martial Races theoryप्रमाणे महार हे लढवय्ये जमातीत येत नसल्याने त्यांची भरती कमी केलीच पण १८९२ मध्ये ती महार रेजिमेंट खालसाच केली. अगदी १९१४च्य प्रथम विश्व युद्धात देखील त्याना घेतले गेले नाही. भारतातून तेव्हा जवळपास १० लाख लोक भरती केले गेले पण ते सगळे ह्या The Martial Races theoryप्रमाणेमराठा पंजाबी, पठाण, शीख गुरखा वगैरे...ह्या महारांच्या केलेल्या विश्वासघाताबद्दल गोपाल बाबा वालन्गकर,शिवराम जानबा कांबळे अशा तत्कालीन महार पुढार्यानी नाराजी व्यक्त करत हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारकडे प्रयत्न केले . त्याला गोपाल कृष्ण गोखले ह्यांनी ही साथ दिली पण इंग्रज बधले नाहीत. पुढे दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर हे Defense Advisory Committee of the Viceroy's Executive Councilचे सदस्य म्हणून निवडून घेतले गेले तेव्हा त्यानी अथक प्रयत्न करून हा अन्याय दूर केला आणि १९४१ साली परत महार रेजिमेंट स्थापन केली, जी आजतागायत चालु आहे.
तर मुद्दा असा कि जर १८९२ पासून महार रेजीमेंटच नव्हती तर १८९७ साली पुण्यात स्त्रियांच्या काखा बगला तपासायला, अब्रूवर घाले घालायला महार सैनिक येणार कुठून?आणि अशा अबला स्त्रियांच्या विटंबना करण्यात काय पौरुष ? पण जातीय विखर पेटवायचा म्हटल्यावर अक्कल अशीच गहाण टाकून इतिहास असाच दावणीला बांधला जातो.
---आदित्य
संदर्भ
१. कंठस्नान आणि बलिदान – वि श्री जोशी
२. पुणेरी – श्री ज जोशी
३. जोशीपुराण - श्री ज जोशी
४. लो. टिळकांचे केसरीतील लेख(online pdfs)
५. आत्मवृत्त- धोंडो केशव कर्वे
प्रतिक्रिया
7 Jul 2018 - 8:24 pm | तुषार काळभोर
लोकांची बुद्धी अशा विकृत गोष्टीत का चालते?
खरंतर इतकं संदर्भासहित समजावूनही काही उपयोग होणार नाही, उलट या लेखावर सुद्धा चिखलफेक चालू होणार, याची १००% खात्री बाळगा!!
7 Jul 2018 - 8:29 pm | प्रसाद गोडबोले
नवे षडयंत्र
>>> ह्यात नवीन काय आहे ? गेले कित्येक वर्षे हे वाचत आहे ! तस्मात ह्याविषयावर जास्त काही लिहिण्यासारखे नाही !
त्याच सुमारास जळगावात कुणा ईश्वर जोशी नावाच्या माणसाने पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीत अंघोळ करणाऱ्या मुलाना( अनेकदा समजावून ताकीद देऊनही ऐकत नसल्याने ) फटकावल्याने सवर्ण समाज मागासांवर कसे अत्याचार करून राहिलाय ह्याचे ज्वलंत दर्शन घडले – पुढे हा ईश्वर जोशी जोशी आडनावाप्रमाणे ब्राह्मण नसून भटक्या विमुक्त समाजातालाच एक आहे म्हणजे मागास आहे हे कळल्यावर सगळ्यांचीच तोंड कडू झाली.असो...
>>>> ह्या विषयावर तर मजाच झाली ! राहुलबाबाने देखील हे " जोशी" ब्राह्मण आहेत समजुन सवर्णांच्या माथ्यावर खापर फोडले. मिपावरही स्वयंघोषित पुरोगामी लोकांनीही लगेच " सवर्ण लोकांनी दलितांना जगण्याचा हक्क नाकारला " वगैरे वगैरे चर्चा झडल्या . पिण्याच्यापाण्यात नागड्याने पोहणे हा माणुस म्हणुन जगण्याचा हक्क असतो . लोल =))))
बरं सदर जोशी स्वतः दलित आहेत म्हणाल्यावर राहुल ने किंव्वा त्या मेवानीने भलते आरोप केल्याबद्दल माफी मागितलेली नाही , ए.बी.पी माझा देखील चर्चेवर चर्चा घेत होते पण मुळ मुद्द्यतच दम नाही आणि आपण चुकीचे आरोप केले म्हणुन माफी मागण्याचे किमान दिलगीरी व्यक्त करण्याचे औदार्य त्यांच्यातही नाही !
मिपावर किमान ते औदार्य दिसले ही समाधानाची बाजु आहे :)
अर्थात ह्या सार्यामध्ये सवर्ण म्हणजे मुखय टारगेट ब्राह्मण आणि मग ते पुढे अजुन ताणुन आरेसेस आणि अर्थातच बीजीपी असे असते हे कळण्याइतके लोकं आता आता सुजाण झाले आहेत हीच काय ती समाधानाची बाब !!
असो. तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
7 Jul 2018 - 11:21 pm | सोमनाथ खांदवे
कोरडे साहेब , सोयीस्कर रित्या फक्त जळगाव दलित मारहाण प्रकरण उल्लेख करण्यात अर्थ नाही . भाजप सत्तेत आल्याच्या उन्मादात कित्तेक राज्यात भाजप च्या दलितेर लोकांनी गेली तीन चार वर्षे दलित लोकांना मारहाण करण्याच्या घटनांचे प्रमाण लक्षणीय वाढले होते . भाजप बद्दल दलित समाजात वाढलेल्या असंतोष ला हवा देण्याचे काम एल्गार परिषद ने केले . एल्गार परिषद मधील मेवानी ,प्रकाश आंबेडकर , वेमुला ची आई आणि उमर खालिद यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाते .
सर्वात प्रथम भाजप चा जनाधार तोडण्याचा प्रयत्न कोरेगाव भीमा च्या दंगलीत केला गेला , त्यामुळे कोरेगाव दंगलीत मराठा समाज होरपळून निघाला . भिडे आणि एकबोटे यांच्या वर गुन्हे दाखल केले गेल्या मुळे मराठा विरुद्ध ब्राह्मण विरुद्ध दलित असा रंग निर्माण झाला .आता कोरेगाव भीमा दंगली नंतर भाजप बद्दल अजून जास्त संभ्रमावस्था वाढवण्यासाठी नवनवीन कारणे ( चाफेकर बंधू आणि टिळकांची बदनामी ) शोधली जात आहेत . 2019 पर्यंत असेच चालत राहणार .
8 Jul 2018 - 5:30 pm | आदित्य कोरडे
भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षाचा उल्लेख करण्यात हशील नसतो भाजपच्या काळात दलितांवर किती अत्याचार झाले त्याआधी किती झाले असली आकडेवारी काढली तर मूळ लेखाला कलाटणी बसेल. जळगाव च्या जोशी-दलित मारहाण प्रकरणाचा उल्लेख केला कारण अगदी स्पष्ट दिसत होते कि मारणारा माणूस ब्राह्मण आहे असे वाटल्याने अनेकाना चक्क आनंद झाला होता चला आता आरडा ओरडा करायला एक नैतिक पाठबळ मिळाले म्हणून पण जेव्हा तो जोशी ब्राह्मण नसून भटक्या विमुक्तांपैकी आहे हे कळले तेव्हा सगळे गप्पच झाले. ह्याचा परिणाम म्हणून म्हणा पण दि एस कुलकर्णी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि अटक झाली तर ते ब्राह्मण आहेत म्हणून मुद्दाम केली असे काही ब्राह्मणानी म्हटले तर नंतर त्यांना जामिनावर सोडले तर ते ब्राह्मण होते म्हणून सोडले अशा प्रकारचे विधान चक्क सुरेश खोपडे ह्यानी केले. ...हे सगळे अत्यंतदुर्दैवी आहे अशा एक न अनेक घटनांचे परामर्श घेऊन लिहायचे तर मग पुस्तकच लिहावे लागेल .
आता पहिल्या महायुद्धावर लिहित आहे आणि त्यात बरे असे वाटते कि त्या इतिहासात आपल्या मराठी लोकांच्या भावना दुखाव्यात असे काही नाही नाहीतर साधे टायपिंग मिस्टेक जीवावर बेतायाची ... शाहू फुले आंबेडकर अन छत्रपती शिवाजी हे मराठी लोकांचे स्फूर्तीस्थान कमी अन मर्म स्थान जास्त झालेत त्यामुळे भावना फार लगेच आहत होतात....आता नुकत्याच झालेल्या रितेश देशमुख , रावि जाधव न विश्वास पाटील ह्यांच्या रायगडावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बरोबर कि पाठ दाखवून काढलेल्या सेल्फी प्रकरणाचे प्बघा...एक तर हे प्रकरण एकूणच जास्त ताणले आहे असे मला वाटते पण त्यात कुणा हृषीकेश जोशी नावाच्या माणसाने रितेश देशमुखविरुद्ध पोलीस तक्रार केली(हे तर फार झालय हे माझ व्यक्तिगत मत आहे .)तर एक बामन मराठ्यात फुट पाडतोय अशी हाकाटी सुरु झाली आणि लोकांच्या प्रतिक्रिया लगेच किती खालच्या ठरला गेल्या पहा खाली फक्त एक उदा दाखल स्क्रीन शोट देत आहे इतके वातावरण कलुषित झाले आहे
8 Jul 2018 - 9:00 pm | सोमनाथ खांदवे
तुमच्या लेखातील खास करून पुढील भागावर मी फोकस करण्याचा प्रयत्न केला होता की ब्राह्मणद्वेष वाढवताना यात कोरेगावच्या घटनेत मराठी लोकांना कसे ओढले गेले . " २०० वर्षापूर्वी २८००० ब्राह्मण सैन्याला खडे चारल्याची आणि इंग्रजांची तळी उचलल्याची साग्रसंगीत, वाजत गाजत आठवण काढून झाल्यावरही काही मजा येईना.अगदी छत्रपती शिवाजीमहाराजांचे चित्र असलेले टि शर्ट घातलेल्या राहुल फटांगळेचा बदडून खुन, कपाळावर शिवगंध( हा काय प्रकार आहे?) लावलेल्या विशाल जाधव वर प्राणघातक हल्ला, " छत्रपती , भवानी , गणेश " या आणि अशाच प्रकारची नावे असलेल्या जवळपास १३० मालमत्ताची नासधूस जाळपोळ करणे, याशिवाय गणपती , साई बाबा यांच्या मंदिराची मोडतोड करुन विटंबना करणे इत्यादी प्रकार करूनही काही रंग भरेना. ( हे सगळे पोलीस दफ्तरी नोंद आहे. –आभार तुषार दामगुडे ) "
तुम्हाला कदाचित माहीत असेलच पुणे , कोल्हापूर , सांगली ,सातारा या भागातील खेडोपाडी भिडे गुरुजींचे हजारोंच्या संख्येत समर्थक आहेत म्हणून कोरेगाव च्या दंगली मध्ये भिडे गुरुजींना गोवण्यात आले व एकबोटे ना गुंतवून ब्राह्मणेतर लोकांना संभ्रमित करून टाकले . दंगलीत सर्वात जास्त नुकसान मराठ्याचें झाले व कोरेगाव आणि आजूबाजू च्या गावात पेरणे,वढू , वाघोली ,सणसवाडी इतर भागात दंगली च्या गुन्ह्यात अक्षरशः गोवण्यात आले कारण राष्ट्रीय पातळीवरून दबाव होता म्हणे . तात्पर्य मराठे विरुद्ध ब्राह्मण विरुद्ध दलित असा त्रिकोण निर्माण झाला . इतिहासातील प्लेग च्या साथी बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे ती बाजू मी पास केली .
तुम्ही मला सांगू शकता का आता फक्त ब्राह्मण च्या विरोधात बातम्या पसरवून , समाजमन कुलुषित करून कोणाचा ? आणी काय फायदा आहे ? तर पुन्हा विषय 2019 च्या निवडणूकपाशी येतो . भाजप च्या सगळ्या विरोधीशक्ती कसे ही करून भाजप ला सत्तेतून हाकलून देण्यासाठी उतावळ्या झाल्या आहेत म्हणून मी प्रतिक्रिये मध्ये भाजप चा उल्लेख केला होता . तसेच भाजप म्हणजेच भटजी आणि शेटजी चा पक्ष हे सुद्धा विरोधकांनी च 2014 च्या निवडणूक आधी पासुन सर्वत्र प्रसिद्ध केले होते . शेटजी मंडळी जी एस टी आणि नोटबंदी मूळे भाजप वर नाराज आहेतच मग ब्राह्मणां च्या विरोधातील कुठल्याही कथित ( जळगांव केस , महाराष्ट्र बँक मॅनेजर मराठे केस ) बातमीला हवा देवून मोठा आगडोंब करायचा जेणेकरून इतर जातधर्म वाले भाजप ला मतदान करणार नाहीत असा त्यांचा प्रयत्न आहे असं मला वाटतंय .
8 Jul 2018 - 9:04 pm | प्रसाद गोडबोले
रितेश देशमुख
काय बोलणार ह्या विषयी ? मिपावरही धागाकाढायचा विचार होता पण परत स्वतःच्या जातीकडे पाहुन काहीही लिहायचे टाळले !
बाकी ते रवि जाधव आणि रितेश देशमुखला सोडा , २६११ नंतर रामगोपाल वर्माला ' साइट सीईंग' करुन आणणार्यांकडुन दुसरी काही अपेक्षाच नाही ! पण पानिपतकार विश्वास पाटीलांच्याकडुन असे काहीतरी व्हावे हे अत्यंत खेदकारक आहे :(
असो. तक्रार करणारे आपण कोण ?
तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
10 Jul 2018 - 7:16 pm | सोमनाथ खांदवे
" दि एस कुलकर्णी महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि अटक झाली तर ते ब्राह्मण आहेत म्हणून मुद्दाम केली असे काही ब्राह्मणानी म्हटले तर नंतर त्यांना जामिनावर सोडले तर ते ब्राह्मण होते म्हणून सोडले अशा प्रकारचे विधान चक्क सुरेश खोपडे ह्यानी केले. ...हे सगळे अत्यंतदुर्दैवी आहे अशा एक न अनेक घटनांचे परामर्श घेऊन लिहायचे तर मग पुस्तकच लिहावे लागेल ." या तुमच्या ङोयलॉग मध्ये ही पुढची बातमी कुठे बसते का बघा बर !!!! . ताजी बातमी - बहुचर्चित डी एस के प्रकरणात मराठे च्या जामिनावर मुंबईतील प्रज्ञा सावंत आणि श्रीधर ग्रामोपाध्ये यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली .
8 Jul 2018 - 1:18 am | माहितगार
PLAGUE Poona site:api.parliament.uk याचे मझे विश्लेषन उद्या देतो.
8 Jul 2018 - 7:50 am | एमी
मायबोलीवरील इतिहासतज्ञ, साथीच्या रोगांचा अभ्यास केलेले डॉक्टर, झालंचतर स्त्रीवाद कोळून पिलेले स्त्रीवादी यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
===
जेव्हा सर्व जाती धर्मातले पुढारी विचारवंत, धुरीण शांत बसले होते तेव्हा ह्या अतिसामान्य कुवतीच्या + इंग्रजी सैन्यात नोकरी करायची होती पण ब्राह्मण विशेषत: चित्पावन ब्राह्मण असल्याने त्याना सैन्यात घेतले गेले नाही त्याचा राग मनात धरलेल्या + उचापत खोर + अनेक धर्मांतरीत हिंदुना चोप देणे हे आवडते काम असलेल्या तरुणांनी शांत न बसता प्रतिकार करायचे ठरवले.
>>>
हम्म ठिकाय.
8 Jul 2018 - 8:01 am | मदनबाण
सडक्या मेंदुची विकॄत माणसे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साला नशिबाने गंडवलंन...
8 Jul 2018 - 1:18 pm | माहितगार
ह्याचा अर्थ समोर दिसतो तेवढा नाहीए. १८५७ च्या आधी पासूनही आणि १८५७ नंतर विशेषतः पेशवाई गेलेले चित्पावन उठाव करणार नाहीत ना या भितीत इंग्रज आणि त्यांच्या पॉलीसी होत्या. चित्पावनांना लोअरलेव्हल अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये घेतले जात होते पण सैन्य भरतीत ब्रिटीशांशी लॉयल राहतील -लगेच उठावाची फारशी शक्यता असणार नाही -अशाच जातींची भरती वर भर होता, त्यात चित्पावन बसत नव्हते चित्पावनांना सैनिकी शिक्षणाच्या संधी देणे टाळले जात होते .
दुसर्या बाजूला चापेकर बंधूचे इंरजी शिक्षणाशी सूत जुळू नाही शकले, क्रांतीकारी विचारांनी भारावलेले होते, पण क्रांतीसाठी लागणारे सैनिकी शिक्षण नव्हते म्हणून सैन्यात भरती हवी होती. -इंग्रजांकडे सरळ संधी नाही मिळाली तर संस्थानिकांकडे प्रयत्न केले पण संस्थानिकही ब्रिटीश रेजंटांच्या अधिकाराखाली असल्यामुळे तशीही संधी मिळाली नाही.
ह्या माणसास -चित्पावनांना - ब्रिटीशांनी सैन्यात संधी दिली असती तर कधी न कधी तो खरोखरी ही मंगल पांडेच झाला असता. आणि चित्पावनांनी अजून एखाद दोन सैनिकी उठाव घडवलेच असते, त्यामुळे त्यांच्यस्वतःच्या हिताच्या पॉलिसीत ब्रिटीश चूक होते असे नाही.
सैनिकी भरती शिक्षणात अडवल्या गेलेल्या या माणसाने संघाच्या स्टाईलची पूर्वीची आवृती समजता येईल अशी शाखा सम शाखा शालेय विद्यार्थ्यांना घेऊन चालवली होती पण बाकी ऑर्गनायझेशनल स्किलचा अभाव होता त्यामुळे संघटीत कार्य होण्याची इच्छा असली त्यासाठी लागणारी फ्लेक्झीबिलीटी नव्हती (बहुधा काल्सुसंगत न राहीलेल्या कर्मठपणामुळे), मग एकट्या दुकट्याने एखाद हल्ला करुन दुधाची तहान ताकावर भागवावी असे इतर क्रांतीकारकां प्रमाणेच याही माणसाचे झाले.
मांडणि माझी संदर्भ प्रा. यशवंत सुमंत यांचा A critical study of the political ideas of the national revolutionaries in Maharashtra हा शोधगंगा डॉट कॉम वर उपलब्ध असलेला शोधप्रबंध चॅप्टर ५ वा ' दि चापेकर्स'
8 Jul 2018 - 5:06 pm | आदित्य कोरडे
हो हे कंठस्नान आणि बलिदान मध्ये पण साद्यंत आहे आणि त्याना लहूजी वस्ताद ह्यांनी तालमीत शिक्षण दिल्याचे ही उल्लेख आहेत परंतु लेख फार मोठा होऊ लागल्याने घेतले नाही... आता वाटते घ्यायला हवे होते...
8 Jul 2018 - 2:24 pm | एस
इतिहासाचे निर्बुद्ध विकृतीकरण. समाजात तेढ माजवण्याच्या असल्या भयानक प्रकारांना सोशल मीडियाच्या माध्यमातून हवा मिळते आहे. कोरडेसाहेब, परखड आणि वास्तववादी विवेचन आवडले.
8 Jul 2018 - 3:09 pm | नाखु
ज्यांना विखारच पसरवून घाण करायची आहे तिथं फार अडकून न पडता मी असल्या बातम्या वाचतो
"आज आत्ता चिंचवडमध्ये चापेकर वाड्यात केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे, चापेकर यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशन.
ह्या कोल्हेकुई कडे दुर्लक्ष करा,एक दोन गृप असं खडसावून सोडले आहेत
8 Jul 2018 - 3:24 pm | माहितगार
या लेखा साठी चर्चेच्या निमित्ताने काल ब्रिटीश पार्लमेंट मधील तत्कालीन डिबेट्सचे अर्काईव्ह्ज वर वर चाळले . जिज्ञासूंनी अधिक अभ्यासण्यास हरकत नसावी . एकेक करुन संदर्भासहीत लिहिण्यास मला वेळ देणे शक्य नाही पण काही जाणवलेल्या ढोबळ मुद्दे खाली देण्याचा प्रयास करतो.
* १८९७ पर्यंत स्वातंत्र्य प्रेमी दादाभाई नौरोजींच्या नंतर चक्क ब्रिटीश समर्थक भारतीय स्वातंत्र्याचे विरोधक भावनगरी नावाचे एक पारसी गृहस्थ ब्रिटीश कॉमन्स (संसदेत ) निवडून गेले होते. रँडचा खून होण्या आधी काही आठवडे शिवजयंती साजरी झाली होती. त्या वेळच्या भाषणात ब्रिटीश धोरणांना वैतागलेले टिळक ब्रिटीश सरकारला राज्य करण्यासाठी चार्टर (अधिकार) काही देवाने प्रदान केलेले नाहीत असे काही म्हणाले असावेत. (टिळकांच्या मराठी भाष्याचे ब्रिटीश प्रेमींकडून होणारे अनुवाद काहिच्या काही असु शकत, पण इन एनी केस अँग्लो इंडीयन त्यांचे भारतीय मित्र असोत वा राष्ट्रवादी दोन्ही गट टिळकांच्या भाष्य आणि लेखनाचे लगोलग अनुवाद भारत आणि विदेशात त्या काळात उपलब्ध करत !)
आता या भावनगरीने टिळकांच्या या भाषणाचा आणि रँडवरील हल्ल्याचा काही संबंध आहे का ? असा टिळकांवर कारवाई केली जावी म्हणून हेतुपुरस्सर प्रश्न विचारलेला दिसतो आणि उत्तर देणारे मंत्री मौनपाळताना दिसतात.
१८५३ मधला गव्हर्नर जनरलचा एक व्यक्तिगत संदेश ब्रिटिश संसदे समोर आला . त्यातील ब्रिटिशांची निती पाहिली तर 'कायद्याचे राज्य ' हि प्रतिमा जपायची जेणे करुन लोकसमर्थन अंशतः टिकवता येते, दुसरीकडे भारतातील जहालवादी कायद्याच्या कचाट्यात कुठे आणि कसे सापडतील याची वाट पहायची . लोकप्रीय माणसे असतील तर त्यांच्या प्रभावक्षेत्रा पासून दूरच्या जागी पाठवायचे जेणे करुन त्यांचा जनतेवरील प्रभाव काळाच्या ओघात कमी होईल. आणि हिच निती टिळकांबद्दलही ठेवलेली दिसते.
* अर्थात भावनगरी सारखे फितुर असले तरी त्याच संसदेत काही आयरिश खासदारही होते जे भारतातील प्लेगची समस्या आणि प्लेग निवरण कार्याच्या काळात होणार्या अयोग्य गोष्टींबाबत हिरहिरीने प्रश्न मांडत होते.
* प्लेगलसीवर हाफकीन नुकतेच काम करत होता पण त्या लसीची पूर्ण खात्री माहिती नसल्याने , ब्रिटिश भारत सरकारचा भर परंपरागत म्हणजे घराघरातजाऊन तपासण्या , आजारी लोकांना वेगळे करणे , घर स्वच्छता इत्यादीवर भर होता. दुसर्या बाजूला परंपरागत भारतीय सोवळे पाळणारी -खासकरुन देवघरात सोवळ्या शिवाय जाणे अपराध असे- आणि हिंदू स्त्रीयांसाठी अप्रत्यक्ष पडदा पद्धती होती म्हणजे स्त्रीला बुरख्यात तर ठेवले जात नव्हते पण पण परपुरुषांनी न्याहाळणे सुद्धा गैर होते.
* १८५७ चा झटका बसून गेलेला होता म्हणून प्लेगसाठीच्या घरतपासणी साठी वापरलेल्या फौजेस/सैन्यास स्थानिक संवेदनशील भावनांची काळजी घेण्यास सांगितलेले होते पण स्थानिक संवेदनशील भावना म्हणजे काय आणि त्या कशा पद्धतीने हाताळाव्यात याच्या विचाराचा अभाव होता.
* त्यात पुण्याची स्थिती मुंबई पेक्षा वेगळी होती मुंबईत वापरलेले २/३ सैनिक भारतीय होते १/३ ब्रिटीश होते तर पुण्यात प्लेग निर्मुलनार्थ वापरलेली बहुतांश सैनिक ब्रिटीश होते , असे असण्याचे कारण म्हणजे पुणे कँटॉनमेम्ट एरीआत ब्रिटीश सैनिकांची मोठी वसाहत होती, पुण्यातला प्लेग सक्ती ने निपटला नसता तर ब्रिटीश सैन्याला स्वतःला प्लेग होण्याचाही तेवढाच नाही पण बर्यापैकी धोका संभवत असावा. म्हणून ब्रिटीश सैनिकांनाच वापरुन पुण्यातील प्लेग निर्मुलन सक्तीने चालू होते.
* ब्रिटीश सैनिकांकडून अन्याय होऊ नयेत म्हणून काही डॉक्टर्स आणि काही स्थानिक भारतीय निरिक्षक दिलेले होते नाही असे नाही पण निरिक्षकांची संख्या एकुण कमी दिसते. गोपाळकृष्ण गोखल्यांसारख्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही पण टिळकांसारख्या लोकप्रीय नेत्यास विश्वासात घेण्याचे प्रयत्न झालेला दिसत नाही. ब्रिटीश संसदेत गोखल्यांचा पंडिता रमाबाईंचा दाखला देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो तर टिळकांना अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न दिसतो.
* किमान देवघरातील देव बाहेर काढण्यासाठी काही सोवळे ब्राह्मण आणि स्त्रीयांना न्याहाळ्ण्यासाठी अधिक स्थानिक स्त्रीयांच्या नेमणूकीची गरज असावी पण या स्थानिक संवेदनशीलत नेमकी कशी जपावी याचे ज्ञान केवळ नियमांवर बोट ठेऊन असलेल्या अभारतीय रँडला असणे शक्यच नव्हते. आणि प्रत्येक घरतपासणि सोबत निरीक्षक देणेही शक्य झाले नसावे. त्यात काही ब्रिटीश सैनिक निरीक्षक समोर नसताना वावगे वागले असतील आणि त्यांनी आगळीक केली असणार हे अत्यंत संभवनीय दिसते. कारण रमाबाई पंडितांचीही तक्रार आहे तसेच कलकत्त्यात अशाच प्रकारची वर्तने झाल्याची वृत्तेही ब्रिटीश संसदे पर्यंत पोहोचल्याचे दिसते.
* काही आगळीकी झाल्या असणार त्यात, ब्रिटीश सैनिक आणि पुण्यातील इंग्रजी न जाणणारा सर्वसामान्य नागरीक आणि अनपेक्षीत कारवायांनी घावरलेल्या स्त्रीया आणि नागरीक यात भाषेची अडचणही झालेली असणार त्यामुळे अफवा पसरुन ब्रिटीश फौजेची भितीही वाढली असणार.
* ब्रिटीश सैनिकांकडुन आगळीक होती आहे अशा तक्रारी ब्रिटीश संसदे पर्यंत पोहोचल्या चौकशीचे आदेश निघाले पण संसदेस गव्हर्नर ने दिलेले रिपोर्ट पाहिले तर कोणतीही त्रयस्थ कमिशन कडून चौकशी न करता पदावर असलेल्याच व्यक्तींकडून पुन्हा रिपोर्ट मागवले गेले ज्यात आजी असे काही घडलेच नाही ज्यांनी लेखी तक्रारी केल्या त्यातील अनेक माणसे अस्तीत्वातच नाहीत, तर उर्वरीतांनी तक्रारी मागे घेतल्या हे संसद सदस्यांना हसू फुटावे अशा खिल्लीच्या स्वरुपात सादर केले गेल्याचे दिसते.
* तत्कालीन भारतीय स्त्रीची परिस्थिती पाहिलीतर आपल्यासोबत आगळीक झाल्याचे कबूल केले तर आपलेच नवरे आपल्याला सोडून देतील आणि घराची अप्रतिष्ठा होईल या भिती पोटी स्त्रीयांनी परंपरेने मौन पाळले असावे. हि अडचण निटशी रिपोर्ट झालेली दिसत नाही. दुसरी अडचण परकीय व्यक्ती अचानक समोर येतात तेव्हा सगळे एक सारखेच वाटतात, तुम्हाला त्याम्चे नाव वाचता येत नाही त्याने सांगितले तरी समजत नाही मग आगळीक केलेले ब्रिटीश सैनिक शोधायचे कसे ? आणि त्यांच्या विरुद्ध पुरावे गोळा होणर कसे ?
त्यामुळे ज्यांनी लेखी तक्रारी केल्या त्यांना त्या सिद्ध करता नाही आल्या , सिद्ध नाही करता आल्या तर त्यांच्याकडून माफीनामे लिहून घेतले गेले . आणि हे माफीनामे आमचे सैनिक कसे निर्दोष आहेत हे संसद आणि बाकी जगास दाखवण्यास वापरले गेले असावेत असे दिसते.
* रँडकडूनही त्याचा जवाब मागवला गेला होता त्याने जवाब पूर्ण लिहिण्याच्या आधी त्याची हत्या होऊन गेली असे दिसते. एकुण ब्रिटीश सैनिकांविरुद्ध आगळीकीचे पुरावे मिळाले नाही त्यांच्यावर कारवाई तक्रारी होऊन झालीच नाही उलट माफी नामे लिहून द्यावे लागले त्यावर रँडची हत्या झाल्यामुळे आख्य्ख्या पुण्या वर पोलीस बंदोबस्त वाढवला गेला आणि पोलीस बंदोबस्ताच्या नावाने मोठा आकडा सामुहीक दंडम्हणून पब्लिकच्या माथी मारला गेला.
* अशा परिस्थितीत रँड आणि त्याच्या सोबतच्या आधीकार्यास उडवणार्या चापेकरा बाबत तकालिन पब्लिकला सहानुभूती वाटली असेल तर स्वाभाविक आहे.
* पण प्रत्यक्षात रँडने स्वतः व्यक्तीशः गैर कृती केली नाही हे चापेकर बंधूंनाही मान्य असावे, त्यांचा आक्षेप आगळीकीला थांबवण्यास रँड असमर्थ ठरत होता , त्या पुर्वी वाई मध्ये चापेकर बंधूंना न पटलेला अल्पसंख्यांक अनुनय रँडकडून झालेला होता ( वाई प्रकाराबाबत रँड बहुधा त्याच्या समोरच्या नियमानुसार वागला असणार , रँड तसा नियमाम्चा पक्का दिसतो पण त्याचे हे पक्के असणे स्थानिक भावना समजण्याच्या क्षमतेच्या पलिकडचे असावे)
* समजा पुणे प्रकरण झाले नसते तरीही चापेकर बंधू ब्रिटीशांविरुद्ध च्या राजकीय स्वातंत्र्याच्या विचाराने भारावलेलेच होते , त्यामुळे त्यांनी केलेला रँडचा वध हा राजकीय कारणामुळे झाला आहे हे ब्रिटीश आधिकार्यांनाही मान्य होते आणि त्यांनि त्यामुळे चापेकर बंधूंना इतर सर्वसामान्य कैद्याप्रमाणे वागणुक न देता राजकीय कैद्यां प्रमाणे वागणूक दिल्याचे दिसते.
ढोबळ संदर्भ ब्रिटीश पार्लमेंतातील पुणे प्लेग संदभातील चर्चा आणि प्रा. सुमंत यांचा शोध प्रबंध
8 Jul 2018 - 3:40 pm | माहितगार
* १८९७ पुणे प्लेग आगळीकी बद्दल प्रत्यक्ष कारवाई दाबण्यात ब्रिटीश गव्हर्नरला यश आले आणि १८९७ मुंबईत शांत गेले तरी १८९८ पर्यंत पुणे प्रकरण गाजल्याने मुंबई पब्लिकची भीड चेपलेली होती १८९८ मध्ये आगळीक करणार्या ब्रिटीश सैनिकांना मुंबईच्या पब्लिकने चांगला चोप दिलेला दिसतो.
* चापेकर आणि नंतर वर्षाभरात मुंबईतन मिळालेल्या चोपामुळे ब्रिटीशांनी या प्रकरणातन धडा घेतला असणार हे नक्की पण त्याच वेळी त्या पुढील दहा वर्षात प्लेगच्या साथीतील मृतांची संख्या भारतभर हजारो लाखोंनी वाढलेली दिसते हे ही खरे.
* त्यापुढ ची मदार डॉक्टर लोकाम्वर सोडून लसी प्रसारावर भर दिला असावा असे दिसते. पण जनतेने लस प्रकार स्विकारे पर्यंत काही लाख जीव गेले
* पण त्याच वेळी ब्रिटीश सैनिकाम्च्या प्लेगने मृत्यूचे प्रमाण अगदिच हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते , एवढा फरक का असावा ? प्रत्ये ठिकाणि काँस्पीरसी थेअरी वापरलिच पाहिजे असे नाही पण ब्रिटीश आणि आमेरीकनांनी स्वतःची लोकसंख्या वाढण्यासाठी काही अनैतिक मार्ग गुप्तता बाळगत वापरल्याचे काही इतर वृत्ते दिसतात. भारतातील प्लेगच्या बाबतीत ब्रिटीशांचे दाखवण्याचे दात बहुताम्श स्वच्छ दिसतात हे खरे पण खाण्याचे दात वेगळे राहीले असल्यास सांगणे कठीण असावे. अर्थात काँस्पीरसी थेअरी चिमुटभर मिठा एवढ्याच घेणे श्रेयस्कर.
8 Jul 2018 - 3:44 pm | माहितगार
या धागा लेखाच्या संदर्भात नोंदवायचे झालेतर सोशल मिडीयावरील पोस्ट मधील निसटत्या बाजू ससंदर्भ तर्कपुर्ण पद्धतीने दाखवून दिल्या बद्दल त्यांचे कौतुक केले पाहीजे. अर्थात धागा लेखाची चर्चा पुणे प्लेग आणि चापेकरांपुरती मर्यादीत राहिली असती तर चर्चा भरकटण्याचे प्रमाण कमी राहीले असते आणि सोशल मिडियावर त्यांची बाजू कुणाला केवळ पुणे प्लेग आणि चापेकरांपुरती मर्यादीत फॉर्वर्ड करायची झाली असती तर सोपे झाले असते असे वाटून गेले. असो.
8 Jul 2018 - 6:27 pm | आदित्य कोरडे
माहिती पूर्ण प्रतिसादाबद्दल खरोखर धन्यवाद , आता हा लेख मी परत लिहायचा विचार करतोय, मुळात बदनामी कारक मजकुराला प्रतिसाद देताना लिहिलेला असल्याने त्याला मर्यादा पडल्या होत्या ...
8 Jul 2018 - 8:46 pm | गवि
या धाग्यावर माहितगार यांनी दिलेली माहिती चांगली वाटली. एकूण नेमके प्रचंड अत्याचार म्हणजे काय होते आणि त्यामागे किती खरोखरचं दुर्वर्तन आणि कितपत जनतेच्या परंपरागत भावनांना धक्का होता, हा प्रश्न मनात नक्कीच उभा राहू शकतो. संघर्षांचं रूप न देता नेमक्या फॅक्ट्स समजल्या की एकूण विषय समजायला मदत होते. मुळात इतिहासाविषयी अर्धवट माहिती असल्याने रँड हा क्रूरकर्मा होता अर्थात करझन वायली, डायर किंवा तत्सम दुष्ट दडपशाहीसाठीच आलेला लॉ अँड ऑर्डर / मिलिटरी इत्यादीपैकी कोणीतरी होता अशी समजूत उगीच होती. अनेकांची अजूनही असते. या लेखात वाचून मुळात तो रोगनिवारणाचा हेतू घेऊन आलेला नागरी अधिकारी होता हे कळलं.
9 Jul 2018 - 5:39 am | एमी
इथले माहितगार यांचे आणि माबोवर (https://www.maayboli.com/node/66701) राही यांचे प्रतिसाद चांगले आहेत मूळ लेखापेक्षा.
9 Jul 2018 - 9:12 am | सोमनाथ खांदवे
डायरेक्ट लिंक लागत नाही हो , माबो चे पाहिले पान उघडत आहे .
9 Jul 2018 - 2:20 pm | राही
धन्यवाद ॲमी.
9 Jul 2018 - 2:47 pm | राही
माहितगार यांचे प्रतिसाद आवडले. त्यात माझ्या अल्पमतिनुसार थोडी भर घालण्याचे धारिष्ट्य करीत आहे.
पुण्यात जितका हलकल्लोळ झाला तितका मुंबईत झाला नाही. याची दोन कारणे असू शकतात. एक तर मुंबईत पुण्याइतक्या सखोल आणि कडक तपासण्या झाल्या नसाव्यात. किंवा दुसरे कारण म्हण्जे मुंबईकरांना या तपासण्यांचा फारसा बाऊ वाटला नसावा. मुंबई हे गाव शहर म्हणून जन्माला येतानाच कर्मठपणा सौम्य करून आणि आधुनिक विचाराना अनुकूल होऊनच जन्मले असावे. अति तीव्र विचार या शहराला मानवत नाहीत. कामसू, सोशिक, मध्यममार्गी, सारासारविचारी असे हे शहर प्रथमपासूनच आहे. पाणी सोडले तर इतर कशातच ते वाहावून जात नाही.
शंभर सवाशे वर्षांपूर्वी कुठल्याही जातीच्या बायका मोठ्या संख्येने तत्कालीन सरकारी नोकर होत्या असतील असे वाटत नाही.
ब्रिटिश सैनिकांमध्ये प्लेगमृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते याचे कारण कदाचित असे असू शकेल की तत्कालीन रोगप्रतिकारक आणि रोगनिर्बंधक उपाय त्यांना अवगत असतील आणि ते त्यांना मान्य असल्याने ते सुलभपणे अमलात आणले गेले असतील. त्यांनी आपली तपासणी करू दिली असेल, रोग्याचे तवरित रिपोर्टिंग केले असेल इत्यादि.
9 Jul 2018 - 3:18 pm | राही
टीका आणि चिकित्सेमुळे इतके प्रक्षोभित का व्हावे? एक तर सूर्यावर थुंकल्याने सूर्याचे तेज अजिबात कमी होत नाही; दुसरे म्हणजे चिकित्सा, निंदा, हेत्वारोप कुणालाही चुकले नाहीत. माणूस जितका थोर तितकी त्याची चिकित्सा आणि चिरफाड अधिक, द्वेषमत्सर निंदा अधिक. शंकराचार्य, जीझस ख्राइस्ट, ग्यानबातुकाराम, एकनाथ, म. फुले, गांधी नेहरू कोणालाही टीकाकारांनी मोकळे सोडलेले नाही. खुद्द लो. टिळकांनी आगरकरादि सुधारकांवर अगदी जहरी भाषेत टीका केली आहे. आतापर्यंत लो. टिळक यांच्यावर फारशी कठोर टीका झाली नव्हती. तस्मात व्यथित होणे ठीक असले तरीही क्षोभित होण्याचे कारण नाही.