फेस्टिव्हल डायरीज ..!!
(Decorate Your Love) :
कथा - ५
लग्न..
( प्रेमाची सप्तपदी..)
सर्व उपस्थित लोकांच्या नजरा नव्या नवरीवर खिळल्या जेव्हा नवरीने हॉलमध्ये प्रवेश केला आणि त्याची नजर मात्र नवरीमागून येणाऱ्या एका करवलीवर..
हीच का ती त्याच्या आयुष्याच्या पिक्चरची हिरॉईन.. स्पीकरवर गाणे लागले होते.. 'तुम्हे जो मैने देखा, तुम्हे जो मैने जाना, जो होश था, वो तो गया..'
त्याला हवे तसेच ते गाणे.. न तिची एन्ट्री.. त्याचा प्रेमाचा चित्रपट सुरू झाला होता बहुतेक..
सकाळीच एकाच्या ' तुझ्या दृष्टीने प्रेमाच्या सप्तपदी कोणत्या असतील?' ह्या प्रश्नाला उत्तर देताना तो म्हणाला होता- प्रेमाच्या सप्तपदीतील पाहिले पाऊल, अनुरूप सौंदर्य..
आता ते सौंदर्य समोर दिसले होते.. आता सप्तपदीचे पुढचे पाऊल.. तिचा गोड आवाज..
' मुलगा किती हँडसम आहे ना..' - तिची मैत्रीण तिला म्हणत होती.
ती- ' वरची सुंदरता काय आयुष्यभर टिकणार आहे का..? माणूस विचारानेही सुंदर हवा..!'
असे म्हणत असताना तिला त्याचा धक्का लागतो.. तिच्या हातातील फुलाची पिशवी हवेत उडते न तिचा तोल जाता जाता तो तिला हातावर अलगद सावरतो.. न वरून हवेत उडालेल्या पिशवीतील फुलाच्या पाकळ्या पडू लागतात.. ह्यावेळी स्पीकरवर गाणे वाजत असते - ' तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या कहे, हो गया है कैसा कमाल क्या कहे..' अगदी पिक्चरचा सीन..
पण खऱ्या आयुष्यात पिक्चर नसतो..
म्हणूनच ती त्याच्यावर ओरडते-
'दिसत नाही का तुला, मुद्दाम केलेस ना तू..?'
तो सॉरी बोलणार तोच तिला कोणीतरी हाक मारते.. ती निघून जाते..पण त्याला तिच्या आवाजात त्याला हवा तसा तो गोडवा जाणवतो.. जरी ती रागाने बोलली असली तरी.. आणि पिक्चरमध्येही सुरुवातीला हिरो आणि हिरॉईनचे भांडण होतेच ना..
' मुलगा किती नम्र वाटतो ना..'- तिची मैत्रीण,
ती - ' हो अशा वेळी सर्वचजण व्यवस्थितच बोलतात.. पण त्यांचा खरा स्वभाव ते जेव्हा रागावतात ना तेव्हा कळतो..'
साखरपुड्याचा कार्यक्रम झालेला असतो.. पण एवढा कार्यक्रम होईपर्यंत तिने त्याच्याकडे त्या नजरेने पहिलेच नव्हते.. त्याच्याकडेच नाही तिने इतर कोणत्याही मुलाला त्या नजरेने पाहिले नव्हते..
'चांद सितारे फुल और खुशबू ये तो सारे पुराने है, ताजा ताजा कली खिली है, हम उसके दिवाने है..' कदाचित वाजत असलेले हे गाणे त्याच्या भावना बरोबर व्यक्त करत होते,
पण ह्या भावना तिला कळणार कश्या..? काही करून तिच्याशी बोलले पाहिजे
ती त्या गोष्टीं करत नव्हती.. ज्या इतर मुली करत होत्या.. मुलाच्या समोरून मिरवणे आणि त्यांच्या नजरेतून स्वतःचे कौतुक करून घेणे.. सारखे सेल्फी काढत राहणे..म्हणजे इतर मुलीपेक्षा ती वेगळीच होती.. त्याच्या सप्तपदीतील तिसरे पाऊल..
'सेल्फी..?'- तिच्या मैत्रिणीने मोबाईल समोर धरत तिला विचारले..तिने नको म्हटले..
तिची मैत्रीण- ' तु जगावेगळीच आहेस बघ.. सेल्फी नको.. मेकअप नको..'
ती- ' कदाचित मी स्वतःशी प्रामाणिक आहे.. मी जशी आहे तशी राहते.. आता हेच मला कळत नाही स्वतःशी प्रामाणिक राहणे हे जगावेगळे कसे काय ठरू शकते.. की कदाचित हे जगच वेगळे वागत आहे का?'
हळदीचा कार्यक्रम सुरू होतो.. सर्व वस्तू व्यवस्थित मांडल्या जात असतात, तीही त्यात मदत करत असते, तसे तर सकाळपासून ती प्रत्येक कामात मदत करत असते, आणि प्रत्येक कामात तिची तितकीच सहजता न नाजूकता, असे म्हणतात मुलगी चांगली गृहिणी होऊ शकते का हे अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या तिच्या आवडीतून कळते, त्याच्या प्रेमाच्या सप्तपदीतले चौथे पाऊल..
' काय ग तुला कंटाळा नाही का येत ह्या कामाचा, घरी पण हेच करायचे आणि इथे पण हेच.. लग्नात काम नाही एन्जॉय करायचे असते..'- तिची मैत्रीण
ती- 'मी पण एन्जॉय करतेच आहे की, आता ह्या गोष्टीतून मला आनंद मिळतो आहे म्हणजे मी एन्जॉयच करत आहे ना..'
नवरा नवरीला हळद लावली जाते न मग सुरू होतो एकमेकांना हळद लावण्याचा प्रयत्न.. ती अतिशय उत्साहाने तिच्या मैत्रिणींना, बहिणींना आणि नातेवाईकांना हळद लावत असते.. तिचा अवखळपणा, तिचा उत्साह सारे काही नजरेत भरत होते, पण त्यातही जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे तिने ज्येष्ठांचा ठेवलेला मान.. सारं काही अदबशीर.. तिचा तो हसरा चेहरा तो डोळ्यात साठवत होता.. सर्वांसाठी ती जवळची होती.. न तिच्यासाठी सर्वजण जवळचे होते.. एकत्र कुटुंबात वाढलेली दिसते.. सर्वाना धरून राहते.. त्याच्या सप्तपदीतील पाचवे पाऊल..
'मुलाला बहीण भाऊ कोणी नाही..आई वडील आहेत फक्त न तेही गावाकडे राहतात.. अशा मुलाशी लग्न म्हणजे राजा राणीचा संसार, तुला काय वाटते..'- तिची मैत्रीण
ती -' उलट मला असे वाटते घरात जेवढी जास्त माणसे तेवढा आधार जास्त.. नाही का..'
हळदी उरकतात. आताच वेळ असतो तिच्याशी बोलायला, तो धाडस करून तिच्याजवळ पोहचतो.. तो काही बोलणार तोच त्याचे वडील त्याला हाक मारतात.. वडिलांचे काम झाल्यावर तो पुन्हा तिला शोधू लागतो.. पण ती हॉलमध्ये नसते.. बहुतेक ती वधू कक्षात गेली असेल.. आता लवकर बाहेर नाही येणार.. स्पीकरवरचे गाणे बहुतेक त्याची समजूत काढत असते..
'मिलन अभी आधा अधुरा है, मिलन अभी आधा अधुरा है..' हे तर पिक्चरचे मध्यांतर आहे..
नवरदेव घोड्यावरून देवदर्शनाला निघतो. त्याला मात्र हॉल मध्येच थांबावे असे वाटत होते पण मित्राच्या आग्रहाखातर तो जातो. देवदर्शन करून नवरदेवाचा घोडा हॉलच्या दारात येतो. झिंगाट गाणे वाजत असते. आणि घोड्यासमोर नाच चालू असतो.. झिंगलेल्यांचा आणि न झिंगलेल्यांचाही..
तो मात्र नाचत नसतो.. मित्र त्याला नाचायला ओढत नेत असतो..
तो- 'अरे मलाही नाचायला आवडेल पण स्टेजवर सर्वांसमोर तालात आणि सुरात असे मुळीच नाही..'
त्याची नजर हॉलच्या गॅलरीकडे जाते.. सर्व करवल्या बघत असतात.. कौतुकाने की हास्यास्पद म्हणून त्यांचे त्यांनाच माहीत.. काही मुली गॅलरीत नाचतही असतात थोडेसे लटके झटके देत..
त्याची नजर तिच्यावर पडते.. ती नाचत नसते.. अरे वा म्हणजे ती सामाजिक भान राखून आहे तर.. त्याच्या प्रेमाच्या सप्तपदीचे सहावे पाऊल..
'तू का नाचत नाहीस.. ये की नाचायला..' - मैत्रीण तिला बोलावते
ती- ' नाचणे हि एक कला आहे, न ती तिथेच सादर व्हावी जिथे तिचे व्यासपीठ आहे नाहीतर त्या कलेची किंमतच राहणार नाही..'
नवरा नवरी मंडपात पोहचली.. हार सत्कार सुरू झाले..
तो मित्राला- ' काय विरोधाभास आहे बघ ना, इथे लग्नाला लोक आलेले आहेत, पण कुठेतरी कोपऱ्यात लग्न प्रकियेचे वाभाडे निघत असेल, कोणीतरी आपल्या सुनेबद्दल तर कोणी जावयाबद्दल गाऱ्हाणी सांगत असेल, कोणी कोणाला सल्ला देत असेल तू मात्र लग्न विचार करून कर, माझ्यासारखा घाईत निर्णय घेऊ नको.. खरच काहीतरी चुकतंय आपल्या लग्न ठरविण्याच्या प्रक्रियेचे..'
ती मैत्रिणीजवळ- ' कसं आहे आपल्याकडे बहुतांशी लग्न ही जुन्या पद्धतीने होत आहेत, आता सुशिक्षित मुलगा किंवा मुलगी साधे पाहण्याच्या कार्यक्रमात एकमेकांशी एकांतात बोलण्यासाठी काही वेळ मागत नाहीत, मी तर असे म्हणेन जर कोणी असा एकांतात न बोलता निर्णय घेत असेल तर पहिली शंका तिथे यायला हवी..'
तो मित्राला- ' असा एकांतात बोलायला वेळ मागितला तर ज्येष्ठ लोकांचे उत्तर तयार, आमच्यावेळी नव्हते असं काही.. मग ह्याच्यावेळी पत्रिका तरी कुठे पाहत होते लग्न ठरवताना.. विचित्र आहे बघ सर्व..'
ती मैत्रिणीजवळ- ' मुलगा मुलगी सुरुवातीलाच एकमेकांशी स्पष्ट का बोलत नाहीत म्हणजे नंतर कोणाला दोष दयावा लागणारही नाही आणि पश्चातापही नको.. खरंतर आपल्याकडे सुशिक्षित मुले मुली नकळत आपल्या लग्नाचा निर्णय अशिक्षित लोकांच्या हातात देतात, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पत्रिका..'
तो मित्राला- ' पत्रिका पाहणे चुकीचे नसेलही बहुतेक पण त्यामागचे शास्त्रीय कारण किंवा तत्वज्ञान तरी कोणी ज्येष्ठ सांगू शकतो का.. फक्त आहे परंपरा म्हणून पाळायची..'
ती मैत्रिणीजवळ- 'लग्न जास्त कशाने टिकतील, पत्रिका जुळली तर की विचार जुळले तर..'
त्याच्या मित्राने नवरीकडून आलेल्या भांडी आणि वस्तू दाखवून म्हणले - 'तूझ्या प्रेमाच्या सप्तपदीचे सातवे पाऊल.. आधार..'
तो- ' नाहिरे माझे म्हणणे असे कि लग्नानंतर ती माझी जितकी जबाबदारी असेल तितकाच तिचा आधारही वाटावा.. शाररिक, मानसिक, वैचारिक, आर्थिक सर्व बाबतीत..'
अक्षता घेत तिची मैत्रीण म्हणते- ' मुलाचा स्वतःचा फ्लॅट आहे, गाडी आहे आणि पॅकेजही भरपूर आहे.. म्हणजे काय पूर्ण आराम..'
ती- ' मुलींचा स्वतःवर विश्वास का नाही..? उलट मला असे वाटते मुलीने असा विचार केला पाहिजे आता मुलाकडे जर घर, गाडी नसेल तर लग्नांनंतर दोघे मिळून घेऊ, आणि त्यांनी एकत्र घेतले तर त्यात जास्त आनंद असेल दोघांना..'
लग्नघटिका जवळ आली.. मंगलाष्टके सुरू झाली.. अक्षता टाकत टाकत तो तिला चोरून बघत होता.. साडीत ती अजून सुंदर दिसत होती.. आणि तिची नजरही त्याच्यावर गेली.. तो लगेच नजर चुकवून इकडे तिकडे बघू लागला.. नंतर त्याने तिच्याकडे पहायचे धाडस केले नाही.. लग्न लागले, गर्दी हळूहळू कमी होऊ लागली..
आता मंडपात उरले होते लग्नाचे भावी उमेदवार आणि त्यांचे आई वडील व नातेवाईक.. एकमेकांना स्थळ सुचवत होते, माहिती घेत होते.. युवा वर्ग नजर जुळवत होते आणि ज्येष्ठ वर्ग अपेक्षा जुळवत होते.. जणू मिनी वधु वर मेळावा भरला होता..
स्टेजवर फोटो काढण्याचे कार्यक्रम सुरू झाले होते.. आता ती जेव्हा येईल फोटो काढायला तेव्हा तिचा फोटो काढून घेऊ.. तो मनातल्या मनात ठरवतो..पण ती हॉलमध्ये कुठेच दिसत नाही..
तोच त्याच्या आईने त्याला बोलावले.. थोडेसे नाराज होत तो तिकडे गेला.. पाहतो तर काय तिची मैत्रीण तिथे आईशेजारी उभी होती पण ती तिथेही नव्हती.. आईने ओळख करून दिली.. ' ही माझ्या मावसबहिणीची मुलगी, तुम्ही पहिल्यांदाच भेटत असाल..'
तो मनातल्या मनात खुश झाला, आता हीच आपल्या पिक्चरची साईड हिरॉईन.. ही मदत करेल आपल्याला..
त्याने व्यवस्थित ओळख करून घेतली पण तिच्याबद्दल कसे विचारणार न तेही आईसमोर..
तोच तिच्या मैत्रिणीने निरोप घेतला, ती गेल्यावर आई म्हणाली - ' अरे हिच्या आईने तिच्या एका मैत्रीणीची जागा तुझ्यासाठी सुचवली होती, ती सुंदर, सुशिक्षित, चांगल्या घरातून आहे पण.. तुझे बाबा म्हणताहेत तुमच्या पत्रिकेतील फक्त सात गुणच जुळताहेत..'
तोच आईने कोणाकडे तरी हसून पाहिले, त्याची नजर तिकडे गेली.. तिची मैत्रीण आणि ती..
'हे बघ हीच ती, तिची मैत्रीण तुझ्यासाठी सुचवलेली..'
त्याला वाटले की सात वचने, सात फेरे, सात मंगलाष्टके न सात जन्म असतात मग पत्रिकेत फक्त सातच गुण का जुळवावे लागत नाहीत.. बहुतेक बहुतांश प्रेमकथा इथेच संपल्या असतील.. पत्रिका जुळत नाही..
'अग हाच तो, ज्याबददल मी सकाळपासून सांगत होते..'- तिची मैत्रीण..
ती- ' काय तू ह्याच्याबद्दल बोलत होतीस, न मला वाटले..'
तिची मैत्रीण- 'तुला काय वाटले..?'
ती- ' मला वाटले तू आजच्या नवरदेवाबद्दल सांगत आहेस..'
ती आणि तिची मैत्रीण हॉलबाहेर चालल्या होत्या.. तो तिच्याकडे पाहत होता आणि तीही त्याच्याकडे पाठीमागे वळून पाहत होती..
पूर्ण लग्न होइपर्यंत जे भाव तो तिच्या नजरेत शोधत होता ते आता तिच्या डोळ्यात दिसत होते.. तेही शेवटच्या क्षणी..
आणि स्पीकरवर गाणे वाजत होते.. ' हम आपके, आपके है कौन..'
स्टेजवर सप्तपदी सुरू झाल्या होत्या.. आणि स्टेजच्या खाली सात गुण जुळूनही न जुळलेल्या पत्रिकेत अडकली होती त्यांच्या ' प्रेमाची सप्तपदी..'
*******
राही..
*******
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही.
संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)
8378 045145 (Rahi..)
प्रतिक्रिया
3 Jun 2018 - 9:34 am | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ४ ची लिंक
https://www.misalpav.com/node/42507
3 Jun 2018 - 9:36 am | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ३ ची लिंक
https://www.misalpav.com/node/42247
3 Jun 2018 - 9:37 am | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - २ ची लिंक
https://www.misalpav.com/node/42046
3 Jun 2018 - 9:39 am | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - १ ची लिंक
https://www.misalpav.com/node/41841
3 Jun 2018 - 9:43 am | रा.म.पाटील
Facebook Page link
https://m.facebook.com/festivdiaries
3 Jun 2018 - 10:26 am | कपिलमुनी
दवणीय अंडे
14 Jun 2018 - 6:38 pm | रा.म.पाटील
वरील लेखातील खालील वाक्याऐवजी
'खरंतर सुशिक्षित मुलं मुली नकळत आपल्या लग्नाचा निर्णय अशिक्षित लोकांच्या हातात देतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पत्रिका..'
खालीलप्रमाणे वाचावे-
'खरंतर सुशिक्षित मुलं मुली नकळत आपल्या लग्नाचा निर्णय त्रयस्थ लोकांच्या हातात देतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पत्रिका..'
तसदीबद्दल क्षमश्व..