छत्रपती संभाजी महाराजांचे एक तथाकथित चित्र

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
10 May 2018 - 11:56 pm

काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीराजांविषयी एक फेसबुक पोस्ट पाहण्यात आली. तिच्याबरोबर एक चित्रही होते. अर्थातच मी मोठ्या उत्सुकतेने लगेच उघडली. चित्र तर मी आजपर्यंत पाहिलेले नव्हते. छत्रपती संभाजीराजांची अगदी एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी चित्रे आजवर उजेडात आली असल्याने छत्रपती संभाजीराजांचे नवीन चित्र म्हणजे फार मोठा शोध होता. त्याला तितक्याच बारकाईने तपासून पाहायला हवे होते. पण दुर्दैवाने ते चित्र कुठले ते त्या पोस्टमध्ये काही लिहिलेले नव्हते.

इंटरनेटवर बरेच शोधूनही मला काही ते चित्र मूळ कुठले ते सापडले नाही. त्या पोस्टमध्ये असा उल्लेख होता की छत्रपती संभाजीराजांचे नाव पुसट अश्या डच अक्षरात लिहिलेले आहे, पण मला ती अक्षरे त्या चित्रात काही सापडली नाहीत. आपले डच भाषा आणि मराठा इतिहासाचे तज्ज्ञ बॅटमॅन यांची मदत घेऊन डच मजकूर वाचता आला असता. चित्राचे हाय रेझोल्युशन स्कॅन नसल्याने मोठे करून पाहण्यावर मर्यादा येत होत्या, त्यामुळे मला ती गोष्ट तपासता आली नाही. नंतर अचानक दुसरेच काही शोधताना मला ते चित्र सापडले. छत्रपती संभाजी महाराज या ऐवजी 'शंभूजी' अश्या नावाखाली ते टाकल्याने ते चित्र सहज सापडत नव्हते. मूळ चित्र हे रिक्सम्युसिअम या नेदरलँडमधील संग्रहात आहे.

मूळ चित्र
=====
https://www.rijksmuseum.nl/en/collection/RP-T-1895-A-3066

original-painting

चित्र पाहताच काही गोष्टी पटल्या नाहीत. शक्यतो याबाबत काही न लिहिण्याचा माझा विचार होता, पण मला हेच चित्र एका पुस्तकाच्या मुखपृष्ठावरपण आढळले. त्यामुळे नकळत किंवा अनावधानाने भलतीच चूक कुणाकडून होऊ नये आणि ह्या चित्राची योग्य ती तपासणी व्हावी या हेतूने मी हा लेख लिहितो आहे. त्यामागे कुणाच्या भावना दुखावणे अथवा चुका दाखवणे हा उद्देश नाही. तसा समज कोणी कृपया करून घेऊ नये.

चित्र मोठे करून पाहताच मला जाणवले की डच मजकूर चित्रात नाही. चित्राच्या वरती काही पुसट मजकूर आहे खरा, पण तो फारसी आहे, डच नाही. सगळ्या गोष्टी बारकाईने तपासून पाहून आणि त्यावर बरेच दिवस विचार करून माझे असे मत झाले आहे की हे चित्र छत्रपती संभाजीराजांचे असणे शक्य नाही.

या चित्राच्या खोटेपणाची करणे सविस्तर सांगतो.

१) पुसट मजकूर मोठा केल्यावर असे दिसले की तो मजकूर उलट म्हणजे मिरर-इमेज असा आहे. असे होणे विचित्र वाटले तरी त्याचे एक सोपे कारण आहे. या चित्रावर एक आयताकृती चिट्ठी चिटकवलेली होती आणि मजकूर त्या चिट्ठीवर होता. चिट्ठी आधीच्या पानांमुळे चित्रावर दाबली जाऊन त्याची उलट प्रतिमा चित्रावर उमटली आहे. चित्र नीट पाहिले तर चिट्ठी कुठे चिटकवली होती ते दिसते.

हा मजकूर उलट करून घेतल्यावर आणि कॉन्ट्रास्ट वाढवल्यावर असा दिसतो.

text

यात शंभूजी अथवा संभाजी लिहिलेले आहे का ते मी शोधून पाहिले, पण मला तसा शब्द काही आढळला नाही. याउलट खालील विसंगत गोष्टी सापडल्या.

- हा मजकूर धार्मिक आहे (म्हणजे कुराण अथवा तत्सम ग्रंथातील), कारण धार्मिक मजकुरात सर्व उच्चारचिन्हे (जेर, जबर, पेश) दाखवलेली असतात (एकही अक्षराचा चुकीचा उच्चारही होऊ नये यासाठी). सध्या मजकुरात ती चिन्हे गाळलेली असतात. नक्की कुठला मुस्लिम धर्मग्रंथ आहे ते माझा अभ्यास नसल्याने मला सांगता येणार नाही.

- मध्यभागी असलेला शब्द 'अल्लाहू' असा वाचता येतो. हा शब्द चित्राशी विसंगत आहे, तो तिथे नको असायला हवा.

२) हिंदू व्यक्तीच्या चित्रात शक्यतो कपाळावर लावलेले गंध आणि कान टोचलेले आणि कानात आभूषण दाखवतात. या चित्रात तसे काही आढळत नाही. अगदी चित्रात दाखवलेल्या लहान मुलातही हिंदू असल्याचे काही लक्षण दाखवलेले नाही. तुलनेसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे हे दुसरे चित्र पहा.

genuine

३) छत्रपती संभाजीराजांच्या इतमामाला साजेशे अलंकार या व्यक्तीने घातलेले नाहीत. मोत्यांची माळ, शिरपेच, तुरा, बाजूबंद असॆ कुठलेच अलंकार नाहीत. अगदी साध्या सरदाराच्या चित्रातदेखील आपल्याला असे अलंकार दिसतात. हे चित्रातल्या लहान मुलाबाबतही (छत्रपती शाहू असायला हवा?) खरे आहे.

४) फक्त शंभूजी असं म्हणून या व्यक्तीला छत्रपती संभाजीराजे मानता येणार नाही कारण याच कालखंडात (१७००) नंदुरबार इथे शंभूजी देसाई नावाची व्यक्तीपण होऊन गेली. नंदुरबारच्या शंभूजी देसायाने मुस्लिम धर्म स्वीकारला असा उल्लेख औरंगझेबाच्या समकालीन अखबारात आहे.

५) हे चित्र नक्की छत्रपती संभाजीराजांचे आहे असे रिक्सम्युसिअमचेही ठाम मत नाही, यासाठीच तर त्यांनी चित्राच्या नावापुढे प्रश्नचिन्ह टाकले आहे. (मूळ शीर्षक Deccan-heerser (Maratha king Shambhuji?), anonymous, c. 1650 - c. 1699). या चित्राचा अभ्यास करणाऱ्या लंडन येथील संशोधकांशी माझा जुजबी परिचय ई-मेल द्वारे होता. त्यांना माझ्या शंका पाठवल्यानंतर त्यांनी त्यावर काही उत्तर पाठवलेले नाही.

वरील बाबींचे समाधानकारक निराकरण होत नाही तोपर्यंत या चित्राला छत्रपती संभाजीराजांचे चित्र म्हणणे योग्य होणार नाही.

तुमचे काय मत आहे?

इतिहासलेख

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

11 May 2018 - 12:17 am | बॅटमॅन

मनो सर,

अगदी योग्य पोस्ट. आपले अगोदरचे बोलणे आठवले. तुम्ही या विषयाच्या मागे लागून एकदा त्याचा छडा लावलात ते बेस्ट केलेत. आता तरी लोक बिनदिक्कतपणे चुकीच्या चित्राचा वापर करणार नाहीतसे वाटते. एकाने चूक केली की ती चक्रवाढ व्याजाप्रमाणे वाढत जाते. त्याऐवजी मुळातूनच विसंगती दाखवलीत हे बेस्ट.

प्रचेतस's picture

11 May 2018 - 9:21 am | प्रचेतस

सहमत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2018 - 10:59 am | डॉ सुहास म्हात्रे

+१

manguu@mail.com's picture

11 May 2018 - 12:45 am | manguu@mail.com

छान

या गोष्टीचा छडा लावल्याबद्दल अभिनंदन आणि आभार. वर बॅटमॅन यांनी म्हटल्याप्रमाणे एकाने चूक केली की दुसरे तिची व्याप्ती अजूनच वाढवू शकतात. आणि आजकाल सोशल मीडियामुले तर ते सहज शक्य झाले आहे.

शाली's picture

11 May 2018 - 6:11 am | शाली

तुम्ही दिलेली लिंक पहात असताना मलाही या दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या. मला फारसी येत नाही पण ऊर्दू येते. त्यामुळे मजकुर विचित्र जाणवला. तसेच ईतर दागिन्यांचे माहीत नाही पण कानातले चौकडे नाहीते हेही पहाताक्षणीच वेगळे वाटले. नंतर पुढील लेख वाचल्यावर तुम्हीही याच मुद्द्यांचा ऊल्लेख केलेला वाचला. हे चित्र कुणाचे आहे माहीत नाही पण चित्रातली व्यक्ती हिंदू खचितच नसावी. माझा काही अभ्यास नाही या गोष्टींचा पण आपण मांडलेले विचार अगदी योग्य आहेत. धन्यवाद!

माहितगार's picture

11 May 2018 - 9:22 am | माहितगार

@ मनो

१) औरंगजेबाच्या अखबारात शंभूजी देसाई नाव दिसते वगैरे इतपत बारीक माहिती आपणास आहे, आणि बारकावे प्रयत्नपुर्वक पडताळता या साठी कौतुक

२) चित्राच्या वर जो काही कागद ; बहुधा चित्रच -किंवा जाड पृष्ठच राहीले असणार पातळ कागदाच्या मागे अशी चिठ्ठी असती तर त्या पातळ कागदाला फाटून आली असती आणि मिरर इमेज राहिली नसती .

३) फार्सी काळातील चित्रसंग्रहकाने चित्रांच्या मागे चिठ्ठाया चिटकवण्याचे प्राथमिक काम संग्रहातील इतर चित्रांवरही केले असू शकते . - ज्या चिठ्ठ्या हवेतील आद्रतेने आणि दबावाने आधीच्या पृश्ठावर चिटकल्या असतील म्हणून या चित्र संशोधनातील पुढील टप्पे कदाचित

३.१ ) उपरोक्त चित्र म्युझीयम कडे कोणत्या मार्गाने कोण कोणत्या हस्ते परहस्ते कोणत्या मुख्य चित्र संग्रहातून पोहोचले याची चौकशी करणे , त्या मूळ संग्रहातील इतर चित्रे कुठे आहेत ?

३.२) म्युझीयम क्युरेटरच्या मदतीने या चित्राच्या मागे चिठ्ठी आहे किंवा होती असेच आधीच्या चित्रावर दबली ते चौकशी करावे लागेल - असल्यास त्याचा फोटो- .

३.३ ) जर पूर्ण मूळ संग्रह म्यूझीयम कडे असेल तर चित्रांच्या पाठी मागील चिठ्ठीचा मजकूर आधीच्या चित्रावर चिटकल्या मुळे आता चित्राच्या मागची चिठ्ठी वाचता येत नाही अशी कोणकोणती चित्रे सापडतात आणि त्यांचा शोध घेणे

३.४) परदेशातील एंबसीची स्वतंत्र वेबसाईट असतात , सदर मजकुर इतिहास संशोधनासाठी वाचनात साहाय्य हवे असल्याचे इराण मधील एंबसीशी इमेलद्वारे चौकशी करुन होऊ शकले तर पहाण्यास हरकत नसावी. असे वाटते.

अशा स्टेप असू शकतील . एकुण चित्राच्या मागे चिठी असून त्याची खातरजमा केल्या शिवाय सदर चित्र छ. संभाजी महाराजांचे असण्या बद्दल आपली साशंकता प्रथम दर्शनी ग्राह्य वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 May 2018 - 11:05 am | डॉ सुहास म्हात्रे

२) चित्राच्या वर जो काही कागद ; बहुधा चित्रच -किंवा जाड पृष्ठच राहीले असणार पातळ कागदाच्या मागे अशी चिठ्ठी असती तर त्या पातळ कागदाला फाटून आली असती आणि मिरर इमेज राहिली नसती .

हा मजकूर (किंवा त्याची चिठ्ठी) चित्राच्या मागे नसून त्याच्या विरुद्ध असलेल्या (opposite) पानावर असावा. ते पान व चित्राचे पान एकमेकावर दाबले जाऊन चित्रावर उलटा मजकूर (mirror image) उमटणे सहज शक्य आहे.

माहितगार's picture

11 May 2018 - 11:38 am | माहितगार

हे पण शक्य आहे, खास करुन पुस्तकातील चित्र असेल तर , तो फाटलेल्या (रिकाम्या) जागेचा साईज तुकडा कुठे जुळतो ते बघावयास लागेल.

नितिन१९८३'s picture

11 May 2018 - 10:36 am | नितिन१९८३

सहमत आहे.

याचबरोबर छत्रपती संभाजी राजांचे अस्सल चित्र मानता येईल असे आजवर अप्रकाशित चित्रही मला सापडले आहे. त्याबद्दल उद्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी येईल, मग ते इथे प्रसिद्ध करतो. ते चित्र सुंदर आहे, त्यात पूर्ण चेहरा दिसतो आहे, आता एवढे पुरे .... २ दिवस वाट पहा .........

माहितगार's picture

11 May 2018 - 11:39 am | माहितगार

प्रतिक्षा आणि शुभेच्छा

नीलकांत's picture

11 May 2018 - 1:13 pm | नीलकांत

त्या चित्राची वाट बघतोय.

कपिलमुनी's picture

11 May 2018 - 1:49 pm | कपिलमुनी

_/\_

इथे पण द्याल ते अस्सल चित्र.

पैसा's picture

11 May 2018 - 2:48 pm | पैसा

शिवाजी महाराज यांच्या चित्रात काढलेले असते तसेच संभाजी राजांचे नाक छान धारदार आणि डोळे तेजस्वी दिसतात. या तथाकथित चित्रात ही दोन्ही वैशिष्ट्ये जाणवली नाहीत.

या शिवाय दोन्ही सेवकांचे पोशाख मराठी पद्धतीचे नाहीत. मुख्यतः पगड्या. त्यांचे चेहरे, कानाजवळ (न) असलेले कल्ले काहीसे स्त्रैण वाटले. हे एकूण विसंगत वाटते.

हारुन शेख's picture

11 May 2018 - 3:46 pm | हारुन शेख

पट्टीवरचा मजकूर वाचला. कुरानातला आहे. त्यामुळे अर्थातच अरबीमध्ये आहे. सुराह ५ आयत ११२ मधला शेवटचा शब्द 'مُؤْمِنِين पासून पुढे सुरु होऊन, आयत ११३ पूर्ण आणि आयत ११४ चा काही भाग त्यात आला आहे.

या आयत येशू ख्रिस्ताकडे काही लोक प्रार्थना करतात कि आम्हाला तू देवाकडून ( अस्मानातून ) अन्न मिळवून दे आणि येशू ख्रिस्त मग तशी देवाकडे प्रार्थना करतो. त्या प्रसंगाचे संक्षिप्त वर्णन करणाऱ्या आहेत. तस्मात हे लिखाण संभाजी राजांशी संबंधित वाटत नाही.

माहितगार's picture

11 May 2018 - 4:23 pm | माहितगार

वरच्या प्रतिसादात डॉ. म्हात्रे अपोझिट बाजूच्या कागदावरील मजकूर चिटकण्याची शक्यता वर्तवत होते पण हे चित्र येशू संबंधित नाही म्हटल्यावर . ओप्पोझिट बाजूच्या कागदावरचा मजकूर चिटकाला असण्याची शक्यता निकालात निघते , म्हणजे मजकूर या चित्रावर ठेवल्या गेलेल्या कागदाच्या मागच्या बाजूचा असण्याची शक्यता बळावते , म्हणजे चित्रांबद्दल काही माहिती चित्राच्या मते असू शकते का ते तपासावयास हवे .

अजून एक छोटे निरीक्षण चित्रातील वरच्या बाजूच्या पांढऱ्या छत्र्यामवरही किंचित कागद चिटकला असण्याची शक्यता दिसते ,

माहितगार's picture

11 May 2018 - 4:26 pm | माहितगार

* काही माहिती चित्राच्या मागे असू शकते का ते तपासावयास हवे .

टवाळ कार्टा's picture

11 May 2018 - 7:14 pm | टवाळ कार्टा

कुराणात येशू????

manguu@mail.com's picture

11 May 2018 - 9:21 pm | manguu@mail.com

कुराणात ज्यू व ख्रिस्चनांचेही दूत येतात. पैगंबर हे याच श्रेणीतील अखेरचे दूत.

मोघल राजांच्या दरबारात येशू , मेरी यांच्या तसबिरी होत्या .

http://www.theheritagelab.in/christian-art-india/

टवाळ कार्टा's picture

11 May 2018 - 10:04 pm | टवाळ कार्टा

च्चायच्च कबूतर....मग इतकी भांडणे कशाला? आणि २ वेगळे धर्मतरी कसे?

चित्रगुप्त's picture

11 May 2018 - 9:43 pm | चित्रगुप्त

कुराणात येशू????

कुराणात एकूण २५ पैगंबर (prophet) सांगितलेले आहेत असे दिसते. येशू पर्यंतचे २४ ख्रिस्त्यांच्या 'जुन्या करारा' पैकीच आहेत:
१. आदम = Adam
६. इब्राहीम = Abraham
८. इस्माईल = Ishmael
१०. याकूब = Jacob
११. युसूफ = Joseph
१४. मूसा = Moses
१७. दाऊद = David
१८ सुलेमान = Solomon
२४. ईसा = Jesus
२५. मुहम्मद.
.... ख्रिस्त्यांच्या मते येशू हा शेवटला, तर मुसलमनांच्या मते मुहम्मद.

टवाळ कार्टा's picture

11 May 2018 - 10:05 pm | टवाळ कार्टा

बाब्बो....२५ पैकी २४ सारखे तर मग दोन वेगळे धर्म कसे?

नेमका रेफरन्स दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. वेगवेगळ्या विषयांच्या जाणकारांनी एकत्र येऊन असे नेमके काम केले तर त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही.

एक चित्र घेऊन त्यावर व्यापक अभ्यास आणि चर्चा चाललेली बघून खूप बरे वाटले.
खालील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हेच चित्र संभाजी महाराजांचे म्हणून दिलेले दिसते.
...

मनो's picture

11 May 2018 - 11:41 pm | मनो

१) डॉ. जयसिंगराव पवार संपादित छत्रपती संभाजी स्मारक-ग्रंथात चित्राचा उल्लेख आहे. त्याची दोन पाने खाली देत आहे. हे मला आधी माहित नव्हते.

२) नंदुरबारच्या शंभूजी देसाई विषयी माहिती - सेतुमाधवराव पगडी यांच्या मोगल दरबारची बातमीपत्रे भाग ३ यातून.

नंदूरबारचा देसाई

मराठी इतिहास संशोधनात काही वर्षापूर्वी एक चमत्कारिक घटना घडली. पुण्याच्या भांडारकर संशोधन संस्थेचे क्युरेटर डॉ. गोडे यांनी शंभूराज चरितम नावाचे एक काव्य प्रसिद्ध केले. हे काव्य संस्कृतमध्ये होते. त्यात वर्णिखेला शंभूराज म्हणजे शिवाजीचा पुत्र संभाजी राजे होत. असा निष्कर्ष डॉ. गोडे यांनी काढला. या शंभूराजाचे लग्न सुरतेच्या चंपा नावाच्या मुलीशीं झाले होते. यावरून संभाजीराजांची ती दुसरी पत्नी असावी असा तर्क त्यांनी केला. यावर महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली.
इतिहास संशोधक श्री. भा. रं. कुलकर्णी, यांनी दाखवून दिले की, काव्यातील शंभूराज हे संभाजी राजे नसून नंदुरबारचा देसाई शंभूनाथ हा होता. पण गोडे आपल्या मताला चिकटून राहिले. पुढे श्री. वा.सी.बेंद्रे यांनी हे मत उचळून धरून, ही चंपा म्हणे रजपूत मुलगी संभाजी राजांचे दोन पुत्र उद्धवसिंग व मदनसिंग यांची आई होय, असा मुद्दा मांडला. औरंगजेबाच्या दरबारातील बातमीपत्रावरून हा शंभूनाथ उर्फ शंभूराज देसाई हा नंदुरबारचा राहणारा असून त्याला मोगलांनी कैद केले होते. २२ नोव्हेंबर १७०३ च्या नोंदीप्रमाणे शंभूनाथ देसाईने कदेतून सुटका करून घेण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. त्याचे मुसलमानी नाव अब्दुल मोमीन असे ठेवण्यात आले.

मागील पानावर नंदुरबारचा देसाई शंभूराज हा मुसलमान झाला याची हकीकत आली आहे. या संबंधीची अधिक हकीकत १५ फेब्रुवारी १७०४ च्या नोंदीत आढळते.

सकाळी बादशहाना पुढीलप्रमाणे कळविण्यात आले “सुल्तानपूर नंदुरबारचा देशमुख मुहम्मद मोमीन उर्फ शंभूनाथ हा बादशहाच्या छावणीत होता तो वारला. त्याचे वारस म्हणतात की एका माणसाने त्याला विष घालून मारले आहे* बादशहानी पुढीलप्रमाणे आज्ञा केली की, मयताच्या (शंभूनाथ उर्फ मुहम्मद मोमीन) वारसांना आणि ज्याच्यावर आरोप आहे त्याला धार्मिक न्याय कचेरीसमोर (शुरा) उभे करण्यात यावे. हे काम बादशाही छावणीचा कोतवाल सर्रबराहखान यांजकडे देण्यात आले.”

शंभूराज उर्फ मोहम्मद मोमीन याचा अंत अशा प्रकारे झालेला दिसतो. ही माहिती अद्याप बाहेर आलेली नव्हती. त्याचे वारस त्याचे प्रेत घेऊन नंदुरबारला गेलेले दिसतात.

[संपादकाची टीप. --काही वर्षापूर्वी मी नंदुरबारला गेलो असतांना तेथील वाणी लोकांच्या आळीत जाऊन आलो. शंभूराज देसाई याचा वाडा अद्याप तेथे असून वाड्यातील एका कोपऱ्यांत अद्याप त्याची कबर पहायला मिळते. ती दुर्लक्ष अवस्थेत आहे. शंभूराजचे वंशज हे हिंदूच आहेत, हे सांगणे नको. वरील बातमीवरून या पुढे तरी शंभूराज म्हणजे संभाजीराजे असा गैरसमज पुढील इतिहास ग्रंथात चालू ठेवण्यांत येणार नाही अशी आशा आहे. ]

३) हारून शेख यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे - सुराह ५ आयात ११२ चा शेवटचा शब्द 'मुहमीनीं' इथे सर्वात वर आलेला आहे. त्याखाली आयात ११३ आणि ११४ आहे. उत्सुकता असेल त्यांनी इथे पहा - प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि इंग्रजी भाषांतर दिले आहे.

https://quran.com/5/112-120?translations=20

यात पहिल्या ओळीत शेवटचा शब्द गायब आहे आणि तिसऱ्या ओळीत सुरवातीचा शब्द गायब आहे. असं वाटतंय की कुणीतरी कोणीतरी कुराणातील चिट्ठी फाडून मागच्या कोऱ्या भागावर काहीतरी लिहून ती इथे चिटकवली असावी का? किंवा याच्या वरचे पान कुराणाचे असावे का? असो, पण छत्रपती संभाजी महाराजांशी या चित्राचा संबंध काही दिसत नाही.

पाने जोडायची राहून गेली.

page1

page2

बॅटमॅन's picture

12 May 2018 - 1:41 am | बॅटमॅन

नंदुरबारवाली शंभूराजाची माहिती एकदम अपरिचित आहे. शेअर केल्याबद्दल अनेक धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

12 May 2018 - 8:29 am | चित्रगुप्त

चित्राचे आणखी सूक्ष्म निरिक्षण केल्यावर खालील बाबी लक्षात येतातः
१. चित्रात दिसणारा भोवतालचा नक्षीकामवाला भाग हा चित्राचा मूळ भाग नसून चित्राभोवती लावलेला माउंट बोर्ड आहे. (कट माऊंट किंवा पूर्ण बोर्डवर चित्र चिपकवलेले असेल, काय ते मूळ चित्र बघून सांगता येईल)
सुमारे १६५० - ९९ सालच्या दरम्यानचे हे चित्र एप्रिल १८९५ मधे रिज्क्स संग्रहालयात येण्यापूर्वी भारतातच हे माउंटिंगचे काम झालेले असणार.
२. या मोठ्या माउंटच्या आतल्या बाजूला आणखी एक माउंट आहे, ज्यात मूळ चित्र बसवलेले आहे. (समजा हा भाग अगदी दुसरा माउंट बोर्ड नसला तरी नक्षी काढलेल्या कागदाच्या पट्ट्या चिपकवलेल्या असू शकतात).

.,.
या दोन्हीच्या आत बसवलेले मूळ चित्र एवढेच आहे:
.

चित्राच्या वरील भागाचे निरिक्षण केल्यास तो भाग एकसंध नसून अनेक तुकडे/पट्ट्या चिकटवून बनलेला दिसतो:
.

या तुकड्यांचे रंग वा कागद तसेच नक्षीकाम वेगवेगळ्या प्रकारचे असलेले दिसते. तसेच मधे असलेला जाड कागद उचकटून/फाडून काढल्यामुळे निर्माण झालेला खड्डाही स्पष्ट दिसतो.
.

चित्र बनवल्यापासून पुढील दोनशे वर्षात (विशेषतः माउंट आणि वरील भागातील मजकुराचा भाग) वेळोवेळी बदल झालेले दिसतात, त्यामुळे फिल्मी भाषेत "ये राज और भी गहरा होता जा रहा है"
आणखी एक निरिक्षण:
चित्रातील व्यक्ती दुसर्‍या कुणाचे चित्र बघत नसून आरश्यात स्वतःचा चेहरा बघत आहे, असे वाटते. तसेच ती व्यक्ती जरी हिंदू नसली तरी आरसा धरणारा आणि वारा घालणारा हे दोघे मात्र कानातील भिकबाळीवरून हिंदु असावेत. एकाद्या सुलतानाने आपल्या लहानपणी आपण आपल्या शौकीन मामाच्या (वा कुणाच्यातरी) अवतीभोवती खेळत असल्याची आठवण म्हणून काढवून घेतलेले चित्र असेही काहीतरी असू शकते.
एक प्रश्नः अरबी/फारसी लेखन हे उजवीकडून डावीकडे केले जात असते, तेंव्हा चित्रात दिसणारे लेखन सरळ आहे वा उलटे ?

मनो's picture

12 May 2018 - 10:30 am | मनो

मिरर इमेज आहे - आरशात पहिल्यासारखी.

तुषार काळभोर's picture

12 May 2018 - 10:00 am | तुषार काळभोर

मनो यांचा लेख, तसेच नंतरचा विस्तृत प्रतिसाद आणि हारून व चित्रगुप्त यांचे अधिक प्रकाश टाकणारे प्रतिसाद... सकस माहितीपूर्ण चर्चा झाल्याचे समाधान वाटले.

दुर्गविहारी's picture

12 May 2018 - 11:53 am | दुर्गविहारी

अतिशय उत्तम चर्चा. चित्र नक्कीच संभाजी राजांचे नाही. सर्वच प्रतिसाद वाचनीय झाले आहेत. रोजच्या राजकिय धुळवडीपेक्षा असे धागे यावेत हि ईच्छा.

या धाग्यावरील एकंदरित चर्चेचा निष्कर्ष हे चित्र संभाजी राजांचे नाही असा निघतो, तर मग तसे आजवर कशाच्या आधारे म्हणवले जात होते ?

गामा पैलवान's picture

12 May 2018 - 11:01 pm | गामा पैलवान

टवाळ कार्टा,

बाब्बो....२५ पैकी २४ सारखे तर मग दोन वेगळे धर्म कसे?

लोकं ईसाई व इस्लाम हे दोन वेगळे धर्म मानतात. वर चित्रगुप्त यांच्या यादीतले पहिले काही प्रेषित यहुदी धर्मातले आहेत. तरीपण बरेचसे लोकं यहुदी हा देखील वेगळा धर्म मानतात. एकंदरीत इस्लाम व ईसाई पंथ राजकीय शक्तींचे निदर्शक आहेत. म्हणून ते वेगळे धर्म मानले जातात.

अशीच फ्याशन हल्ली भारतातही बोकाळली आहे. भारतात काही लोकं बौद्धपंथ हा वेगळा धर्म मानतात.

आ.न.,
-गा.पै.

.
50 x India : de 50 mooiste miniaturen van het Rijksmuseum
(50 x India : the 50 most beautiful miniatures from the Rijksmuseum...... Malini Roy.
मालिनी रॉय यांच्या वरील पुस्तिकेत हे चित्र आहे असे कळते, त्यात या चित्राबद्दल काय लिहीले आहे ते बघायला हवे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2018 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा आणि प्रतिसाद अतिशय उत्तम. आभार.

-दिलीप बिरुटे

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

25 May 2018 - 10:58 am | हणमंतअण्णा शंकर...

चित्रातल्या कमानी संगमरवरी आहेत. किंबहुना छत्र्यासुद्धा संगमरवरी आहेत. बाग, हौद तिरंगी बदकं ह्या एकंदरीत मुघल ऐशोआरामी गोष्टी महाराजांच्या आयुष्यात आल्या होत्या का? कमानीवरची नक्षी मुघल शैलीतली दिसते. चित्रात दाखवल्याप्रमाणे हे एका शृंगाराच्या डेली रुटीनचे प्रसंगचित्र वाटते.

नाखु's picture

30 May 2018 - 10:35 pm | नाखु

अपरिचित माहिती

नेमस्त नाखु