२०११ च्या काळात इजिप्त धुमसत होता. मुस्लीम ब्रदरहूड आणि जनता यांच्यातला वाद शिगेला पोचला होता. तेहरीर चौक या सगळ्या घडामोडींचं केंद्र बनलं होतं. रोज हजारो माणसं तिथं येत-जमत, निदर्शनं करीत असतं. तेव्हा ’एक २०-२२ वर्षांची मुलगी आपल्या कॅमेरानं हे सगळं टिपत असे. आजूबाजुची परिस्थिती, अंधाधुंद माजलेली अराजकता, वारंवार निघणारे मोर्चे-निदर्शनं, त्यांच्यावरची दडपशाही, लष्कराचं डोळ्यात भरणारं अस्तित्व, जनतेतला रोष असं बरचं काहीसं तिनं आपल्या कॅमे-यात कैद केलं होतं. दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर बनत जाणारी स्थिती एक २०-२२ वर्षांची मुलगी तिच्या गळ्यात लटकणा-या कॅमे-यातनं पकडू पाहत होती, बहुदा म्हणूनच तिला नाव दिलं गेलं………..‘ अ लेडी विथ द कॅमेरां..’…!!
‘आयदा-अल-कशेफ (Aida-El-Kashef)’ तिच्या मातृभूमीत, इजिप्तमध्ये याच नावाने ओळखली जाते. तिच्या सोबत असणारा तिचा कॅमेरा हा तिचा अविभाज्य घटक आहे. ‘शिप ऑफ थेओसीस’ किंवा ‘द स्क्वेअर’ सारख्या जगात नावाजलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय करूनसुद्धा ती तिच्या दिग्दर्शकीय कामासाठी जास्त नावाजलेली आहे. तिचे ‘अ टीन टेल’ किंवा ‘राप्स्डी इन ओटोमन’ सारखे लघुपट तिची ओळख आहेत. एक स्वतंत्र चित्रपटकार (Individual Filmmaker) म्हणून तिचं एक स्थान आहे पण आपण भारतात तिला अभिनेत्री म्हणून ओळखत असलो तरीही तिला तिथे तेवढीच ओळख नाही.
२०११ असो किंवा २०१३, इजिप्त मधल्या सत्ता बदलाच्या संघर्षात, जनतेबरोबर पूर्णपणे जे काही चित्रपटसृष्टीतील लोक खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरलेले होते त्यातला आयदा हा एक महत्वाचा चेहरा होता . आयदा भारताला ठाऊक झाली ती २०१३ साली, जेव्हा तिचा ‘शिप ऑफ थेओसीस’ चित्रपटगृहात आला त्यावेळी.. खरं सांगायचं तर तिला त्याच वर्षीचा ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा. त्या आधी आपल्याला किंबहुना जगालाही तसूभरही ठाऊक नव्हतं आयदा कोण आहे? २००९ साली ‘शिप ऑफ थेसिस’ च्या शूट च्या निमित्ताने भारतात आलेल्या आयदाला परत तिच्या मातृभूमीत जायला २०१० उजाडलं. तिकडे सत्ता संघर्ष मोठ्या प्रमाणात भडकू लागला होता. आयदा परत पोहोचेपर्यंत तिकडे परिस्थिती प्रचंड बदलली होती. आतापर्यंत फक्त मुबारक सरकार विरोधातला उठाव अस भासणारं रूप आता क्रांतीच्या पायरीपर्यंत पोचलं होतं. जनता आता क्रांतीच्या मूड मध्ये होती.. काहीही होवो सत्ता बदल झालाच पाहिजे हा हट्ट झाला होता. जनता अपेक्षेप्रमाणे रस्त्यावर उतरली. संपूर्ण देश आता या संघर्षात सामील झाला होता. आयदा तिथे पोचली अन एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे तीही या सगळ्यात सामील झाली.
तिकडे आयदा आपल्या मातृभूमितल्या लढ्यात सामील झाली अन इकडे आनंद गांधीला काही दृश्य पुन्हा चित्रित करण्याची गरज निर्माण झाली. आयदा कुठे आहे याचा त्याला पत्ताच नव्हता . २०१० नंतर त्याच्या जवळपास तिच्याशी संपर्क तुटल्याच सारखा होता. आता गरजेच्या क्षणीदेखील तिच्याशी काहीच संपर्क होत नव्हता. एके दिवशी फेसबुक वरच्या एका पेजवर का कॅम्पेन दिसलं….’फ्री आयदा’..!!
इकडे इजिप्तमध्ये सामान्य निर्दशनं करताना एके दिवशी अचानाक तिथल्या पोलिसांनी निदर्शनकर्त्या जमावाला अटक केली. त्यात आयदाचाही समावेश होता. मधल्या काळात गळ्यात कॅमेरा लटकावून फोटोग्राप्स काढत मोर्च्यात- निदर्शनात बोलणारी हि मुलगी एक चेहरा बनली होती. त्यामुळी तिच्या अटकेचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. संपूर्ण गळचेपिनंतर बाकी राहिलेल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या सुटकेसाठी मोठ्या स्केलवर कॅम्पेन सुरु झालं …. फ्री आयदा..!! पण ती कमी कालावधीतच बाहेर आली.. अगदी सुखरूप.. तिला बाहेर घडणा-या कुठल्याच प्रकारची माहिती नव्हती,
”मी इतर अनेक निदर्शकांपेक्षा फार कमी काळ तुरुंगात राहिले. माझ्यासाठी बाहेर असं कॅम्पेन वगैरे चालू असेल अशी कल्पनाही मला नव्हती.’”
आपण जेव्हा दोन कामांमध्ये एकाला निवडण्याच्या स्थितीला येतो तेव्हा निर्णय हा ब-याचदा महत्वाच्या कामाच्या बाजूला किंवा आर्थिक वा प्रसिद्धी देणा-या कामाच्या बाजूकडे झुकलेला असतो. २०१२ साली पुन्हा आयदाची गरज भारतात्त निर्माण झाली. ‘शिप ऑफ थेओसीस’ च्या प्रमोशनच्या वेळी सुद्धा ना आनंदला ना ही किरण रावला तिच्या सहभागाबद्दल काही कल्पना होती. त्यावेळी तिकडे इजिप्तमध्ये बरचं पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. ती आणि तिचे सहकारी पुन्हा रस्त्यावर उतरले होते. पुन्हा तेहरीर चौक मोहम्मद मोर्सीच्या सरकार विरुद्ध बंड करत होता पण ते सगळं लवकरच शमलं. मोर्सी अपेक्षेपेक्षा फार लवकर पायउतार झाले नि आयदा लगेच विमान पकडून भारतात आली. पण फक्त ४ दिवसांसाठी. आनंदाला सगळं त्या चार दिवसात आटपावं लागलं.
“ खरतर इथे (इजिप्त ) माझी जास्त काळ गरज होती पण मी थांबू शकत नव्हते. कारण त्याच दरम्यान तिकडे कैरोत, क्रांतीच्या पहिल्या वर्धापनदिनाची तयारी चालू होती. माझं तिथे असणं जास्त गरजेचं होतं.”
क्रांतिपर्व संपलं. एखादी गोष्ट तशीच चालत राहत नाही. हळूहळू इजिप्त मधलं जनजीवन सुरळीत होऊ लागलं. पण काही गोष्टी तशाच समोर राहत होत्या. या सगळ्या क्रांतीच्या काळात महिलांवरील सामुहिक अत्याचाराच्या घटना वाढल्या होत्या. इजिप्तच नाही तर बहुतांशी मुस्लीम राष्ट्रांमध्ये महिलांवर सामुहिकरित्या होणा-या अत्याचारांचं प्रमाण खूप मोठं आहे. कुठलंही सरकार त्यावर आळा घालू शकलेलं नाही. इजिप्तमधल्या या उठवादरम्यान सरासरी १८ इतकं या सामुहिक अत्याचारांचं प्रमाण होतं. वरवर एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते वाटणारे जमावातील लोक खड्या महिलेला गर्दीत वेढून तिला सावजासाराखं वागावत असतं. उठावाच्या काळात ती या सगळ्या घटनांची एक साक्षीदार होती. आता याच प्रश्नावर ती काम करण्याचं ठरवलं.
अशा पिडीत महिलांच्या आधारासाठी, त्यांच्याबाबतीत आवाज उठवण्यासाठी नोव्हेम्बर २०१२ मध्ये आयदा आणि तिच्या सहका-यांनी ‘Opantish’ या संस्थेची स्थापना केली. क्रांतीनंतर पुन्हा एका नव्या कामात तिनं स्वत:ला झोकून घेतलं.
त्याचं महिन्यात आयदा एका मुलीला वाचवताना या हल्ल्याची बळी ठरली. कैरोत एका जमावाच्या ताब्यातून मुलीला वाचवताना आयादाला आत ओढलं गेलं,
. “ मला वाटलं होतं मी आता मरेन. माहित नाही किती शरीरांचा भार माझ्या अंगावर पडत होता. सगळा जमाव मला मिळेल त्या दिशेने ओढत होता . माझे कपडे फाडत होते. तो एक फार भयानक अनुभव होता. आपण जरी फक्त कल्पना केली की आपल्या शरीराच्या प्रत्येक इंचावर एकाच वेळी अगणित हातांचे स्पर्श होताहेत तर त्यातली क्रूरता आपल्याला लक्षात येईल.”
पण नशीब बलवत्तर होतं. आयदा यातून सुखरूप बाहेर पडली. यानंतर ती अजून जोमाने काम करू लागली. या विषयावर जाहीररित्या बोलू लागली. हे फक्त तेहरिरच्या चौकातच घडले होते. उठाव हा इतर शहरातही झाला होता पण तिकडे अशा घटनांचा काहीच उल्लेख नव्हता.
त्यांच्या ‘‘Opantish’ याच नावाच्या फेसबुक पेजवर अनेक फोटोज, विडीओज त्यांनी प्रसिद्ध केले ज्यातून हे सगळं जागतिक स्तरावर पोहचू शकलं. पुन्हा एकदा नवीन उठावाची सुरुवात झाली होती. याही वेळी ती एका सामान्य नागरिकाप्रमाणे त्यात सहभागी झाली. या काळात तिनं बरचं काही शूट केलं. पण ते सगळं डॉक्युमेंटरीसाठी न वापरता जगासमोर आणलं. तिच्या मते उठावाचा दुसरा चेहरा जगासमोर येणं महत्वाचं होतं. तीच खरी प्राथमिकता होती.
क्रांती झाली तरी देशातले प्रश्न काही सुटत नाहीत. काळ पुढे चालू राहतो. इजिप्तमधल्या क्रांतीला आता जवळपास ५ वर्षे झाली आहेत पण तिथली परिस्थिती फार काही सुधारलेली आढळत नाही. आयदा ओपान्तीश च्या माध्यमातून महिलांच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहे. खर तर ही एका बदलाची नांदी किंवा देशांतर्गत का होईना पण क्रांतीची नांदी आहे हे नक्की. मुळात इस्लामिक राष्ट्रांमध्ये महिलांवरील अत्याचारांवर एक महिला आवाज उठवते आहे हीच तर खरी क्रांतीची सुरुवात आहे. आता पडणा-या ब-याच प्रश्नांची उत्तरे काळच देईल इतकं नक्की.
#Aida_E_Kashef #aniruddhprabhu
-अनिरुद्ध प्रभू
(पूर्वप्रसिद्धी:- वास्तव रूपवाणी …मार्च २०१८)
प्रतिक्रिया
4 May 2018 - 2:59 pm | सस्नेह
प्रभावी परिचय !
आयदाबद्दल वाचून स्मिता पाटील या चित्रपट तारकेची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही.
4 May 2018 - 6:10 pm | माहितगार
कथित अरब स्प्रिंग नॅचरल किती आणि बाह्यशक्तींनी किती हस्तक्षेप केला अशी साशंकता वाटत रहाते. इजिप्त तुर्की इराक सिरीया आधीच्याच राजवटी हुकुमशाही असतील पण धर्मांधता मॉडरेट होती, गल्फ आणि एक्सटेंदेड गल्फ जिथे आमेरीकेने हस्तक्षेप केला तिथे मॉडरेट राजवटींची गच्छांतीच झाली का असे वाटते.
5 May 2018 - 12:55 am | एस
+१
5 May 2018 - 11:18 am | शाली
+१
4 May 2018 - 7:43 pm | दुर्गविहारी
सुन्न करणारा लेख. एक चांगली ओळख करुन दिल्याबध्दल धन्यवाद.
5 May 2018 - 12:30 am | पिशी अबोली
खूप जबरदस्त लेख. शिप ऑफ थिसियसमुळे चांगलाच माहीत झालेला हिचा चेहरा फोटोत बघून चमकलेच. किती झपाटलेपण, किती झोकून देण्याची वृत्ती!
5 May 2018 - 5:42 am | कंजूस
छान ओळख!