किस्सा ए पारसी
पारशी लोक म्हटले कि आपल्याला ही गोष्ट अगदी आवर्जून सांगितली जाते कि ते ८व्या कि ९व्या शतकात इराण मधल्या मुसलमानी आक्रमणामुळे पलायन करून गुजरात मधल्या संजाण नावाच्या गावी आले आणि त्यानी तिथल्या राजाकडे( जाधव राणा किंवा यादव राणा )आश्रय मागितला मग त्याने दुधाने भरलेला वाडगा पाठवला – तुमच्या करता इथे जागा नाही हे सुचवायला, तर त्या पारशी लोकांच्या प्रमुखाने त्यात मूठभर साखर टाकली – ह्या साखरेप्रमाणे आम्ही तुमच्यात मिसळून जाऊ आणि उलट गोडवाच वाढवू असे सुचवण्याकरता. आता ही गोष्ट कितपत खरी आहे ते माहिती नाही. पण खरी नसावी. कारण पारशी लोक संजाण गावी यायच्या आधीपासून भारतात व्यापाराच्या निमित्ताने ये जा करत होते अगदी सिकांदाराच्या स्वारीच्या आधीपासून आपले त्यांचे संबंध होते त्यामुळे ते आपल्या चांगलेच ओळखीचे होते.त्यामुळे शक्यता अशी आहे कि ते जरी असे निर्वासित होऊन आले असले तरी त्याना येऊन आमच्या राज्यात वसू नका असे सांगावे, असे काही त्या राजाला वाटले नसावे आणि ते इथे अगदीच उपरे ही नसावेत. असो पण आता जो किस्सा इथे सांगणार आहे तो थोडा वेगळाच आहे.
झाले असे कि हे पारशी लोक भारतात आल्यानंतर इंग्रजांचे राज्य येई पर्यंत तसे अगदी गुप्तच होते. म्हणजे ते होते त्यांचा धर्म, त्यांच्या चालीरीती, त्यांचा व्यापार सगळे चालू होते पण ते राजकीय पटलावर चमकले नाहीत अगदी गप गुमान राहिले(बादशाहा अकबराने सर्व धर्माची चर्चा करताना त्यांचे काही धर्मगुरू आले होते असा उल्लेख सापडतो आईने अकबरीत) त्यामुळे त्यांचा फारसा उल्लेख सापडत नाही पण इंग्रज आल्यावर मात्र ह्यात फरक पडला. एक तर त्यांची शरीरयष्टी, वर्ण बराचसा युरोपियानान्प्रमाणे असल्याने, त्यानी पटकन इंग्रजी भाषा आत्मसात केल्याने आणि व्यापारउदीमात त्यांचे बस्तान आधेच बसले असल्याने ते लगेचच ह्या नव्या इंग्रजी राज्यात नावारूपाला आले. मुंबई हे इंग्रजांमुळे भरभराटीला आलेले बंदर त्यामुळे ते गुजरातेहून तिथे येऊन स्थायिक झाले. सुरुवातीला मुंबई वसवणारे समाजगट तीनच म्हणजे कोळी आगरी भंडारी पाठारे प्रभू हे मराठी लोक , पारशी आणि गुजराती व्यापारी हे गुजरातहून आलेले लोक आणि अर्थात इंग्रज. तर ह्या पारशी आणि पाठारे प्रभुनी लवकरच मुंबईत बक्कळ पैसा कमावून भरपूर इस्टेटी केल्या, व्यापार उदीम चालू केला. तर ही गोष्ट आहे १८३०-३२ सालच्या सुमाराची. इस्ट इंडिया कंपनीच्या मुंबई ऑफिसात काम करणारा एक अधिकारी होता, फिशर म्हणून, त्याला मुंबईच्या रस्त्यावरच भटकं कुत्रं चावलं.१८३२चा जुना काळ तो, तेव्हा कुत्रा चावल्यावर घ्यायच्या लशी आल्या नव्हत्या (त्या आल्या १८६५ नंतर ) त्यामुळे हा बिचारा रेबीज होऊन मेला. चांगले १५-२० दिवस त्याने हाल सोसले. त्यामुळे मरताना त्याने आपल्या जमा संपत्तीचा बराचसा हिस्सा इस्ट इंडिया कंपनीकडे सोपवला आणि त्याचा उपयोग मुम्बईच्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करावा अशी अंतिम इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे मग इस्ट इंडिया कंपनीने एक फंड स्थापन करून मुंबईतल्या लोकाना जे भटके कुत्र मारून त्यांचे शव आणून दाखवेल त्याला प्रती कुत्रा आठ आणे द्यायला चालू केले. (हल्ली हल्ली पर्यंत कुत्रे नाहीतरी उंदीर मारायची आणि पैसे कमवायची हि योजना चालू होती.) तर झाले असे कि १८३० च्या सुमारास होता दुष्काळ आणि त्याकाळी आठ आणे ही तशीही बऱ्यापैकी मोठी रक्कम होती, त्यामुळे अनेक लोक मग कुत्रा मारून ते पैसे घेत, लवकरच मुंबईतभटके कुत्रे कमी आणि त्याना मारणारे जास्त असे झाले. मग ह्या लोकांनी लोकांच्या घरातले पाळीव कुत्रे पळवून नेऊन मारायला आणि पैसे घ्यायला सुरुवात केली आणि प्रॉब्लेम सुरु झाला. तसेही पारशी भटके कुत्रे मारून टाकायच्या कंपनी सरकारच्या निर्णयाविरुद्ध होते. त्यांच्या धर्माप्रमाणे कुत्रा हा पवित्र प्राणी असून तो मृत्युनंतर आत्म्याला परलोकात मार्गदर्शन करतो तसेच आप्त जणांचे संदेश त्यांच्या पर्यंत पोहोचवतो( आपल्या कडे कावळा किंवा जुन्या इजिप्शियन लोकांमध्ये मांजर हे असे काम करते असे मानले जाते)त्यामुळे कंपनी सरकारला आधीच ते कुत्रे मारणे बरोबर नाही ते थांबवा अशी तक्रार करत होते त्यात अनेक पारशांनी हौसेने, प्रेमाने पाळलेले कुत्रे पळवून नेल्याच्या आणि मारून टाकून पैसे कमावल्याच्या घटना घडल्या आणि पारशी संतापले. ३ जून १८३२ रोजी त्यानी हरताळ केला. इंग्रज सोल्जर आणि तर अधिकाऱ्यासाठी फोर्ट मध्ये पाव घेऊन जात असलेल्या गाड्या अडवून त्यातले पाव आणि मांस रस्त्यावर फेकले, खाताकांच्या दुकानांची मोडतोड केली, अनेक दुकान आणि ऑफिसेस उघडू दिली नाहीत एवढेच नाहीतर मुंबई हायकोर्टाचे (तेव्हाचे बॉम्बे हाय कोर्ट) न्यायाधीश जे होते ते रस्त्याने जात असताना त्यांची बग्गी अडवून त्यात चक्क रस्त्यावरचा कचरा आणि २-५ मेलेल्या घुशी टाकल्या. असा एकंदर दिवसभर बराच धुमाकूळ घातल्यावर मग शेवटी कंपनी सरकारने संध्याकाळी कुलाब्यावरून सोजीर लोकांची पलटण बोलावून गोळीबार केला, धरपकड केली आणि हा दंगा काबूत आणला. (अजून मुंबईत पोलिस खातेसुद्धा निर्माण झाले नव्हते किंवा भारतीय दंडविधान अस्तित्वात आलेले नव्हते.) धुमाकूळ घालणाऱ्या बर्याच पारशाना कैद करून २-२,३-३ वर्षांच्या शिक्षा सुनावल्या. पण कुत्रे मारायचे मात्र लगेच बंद केले. आणि बैलगाड्यावर लोखंडी पिंजरे ठेवून गल्लोगल्लीच्या भटक्या कुत्र्याना पकडणे आणि शहराबाहेर नेऊन सोडणे चालू केले. त्यांच्या करता मग पांजरपोळ ही बांधले.
आणखी एक, मागे फ्रांस मध्ये चारली हेब्डो मासिकाने पैगंबरांचे चित्र छापले म्हणून काही माथेफिरू मुस्लिमानी त्यांच्या ऑफिसात जाऊन गोळीबार केला होता. अगदी तसेच १८५१ साली एका पारशी गृहस्थाने त्याच्या चित्रज्ञानदर्पण ह्या गुजराती मासिकात पैगंबरांचे चित्र छापले त्यावरून काही माथेफिरू मुसलमान लोकांनी त्याच्या ऑफिसात जाऊन तोडफोड केली. पारशी लोकही स्वस्थ बसले नाहीत त्यानी ही मारहाण तोडफोड प्रतिहल्ले केले आणि ही दंगल मग पेटली. लुटालूट एकमेकांची कार्यालये दुकाने आणि डोके फोडणे , हल्ले प्रतिहल्ले हा प्रकार जवळपास महिनाभर सुरु होता शेवटी दोन्ही समाजातल्या मान्यवर लोकांनी एकत्र येऊन सभा घेतली त्यात ह्या पारशाने माफी मागितली आणि मग ते प्रकरण एकदाचे मिटले.
अशाप्रकारे आपल्याला नेहमी शांत सभ्य कायदे पाळणारे म्हणून माहिती असणारे पारशी हे मुंबईतल्या पहिल्या वाहिल्या दंग्याचे जनक ठरले.
संदर्भ
मुंबईचे खरे मालक कोण? -वासंती फडके
बावाजीन्च्या सुरस कथा - किशोर आरस
https://www.researchgate.net/publication/231894694_Mad_Dogs_and_Parsis_T...
https://scroll.in/article/700501/how-an-accidentally-distorted-drawing-o...
प्रतिक्रिया
30 Apr 2018 - 6:53 pm | खटपट्या
रोचक, शांत असणारा पारशी समाज कधीकाळी दंगा करत होता आणि दंगा करण्याएवढी त्यांची संख्या होती हे वाचून आश्चर्य वाटले.
30 Apr 2018 - 9:58 pm | कपिलमुनी
अगदी हेच वाटले !
( किंवा संख्या कमी झाली म्हणून ते शांत झाले का ? )
30 Apr 2018 - 11:16 pm | manguu@mail.com
पारशी गप्प होते कारण त्याकाळात बहुतांश पारशी अफूचा व्यापार करायचे. त्यातूनच ते श्रीमंत झाले.
1 May 2018 - 9:02 am | आदित्य कोरडे
हो , अगदी आजच्या घडीचे नामवंत tata समूहाचे संस्थापक आणि भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ज्याना आपण संबोधतो ( त्यात चूक काहीही नाही )त्या जमशेदजी टाटान्चे आजोबा अफूचा व्यापार करूनच श्रीमंत झाले होते, भारतामध्ये अफू पिकवायची आणि चीनमध्ये नेऊन विकायची हा धंदा अनेक वर्षे चालला , चेन मधील तरुणांची अख्खी पिढी बरबाद झाली इतकी कि एरवी जनतेच्या स्थितीबाबत बेफिकीर असलेले चीनीराजघराणे ही खडबडून जागे झाले आणि त्यानी अफू विक्रीवर बंदी घालणारा कायदा केला त्यावरून झालेलं ओपियाम वार प्रसिद्ध आहे ...
1 May 2018 - 2:59 pm | अनिरुद्ध.वैद्य
ते चुलते होते बहुधा. आपल्या होळकरांच्या राज्यातील अफू सर्वश्रेष्ठ होती मानायचे !
30 Apr 2018 - 11:19 pm | manguu@mail.com
पारशी गप्प होते कारण त्याकाळात बहुतांश पारशी अफूचा व्यापार करायचे. त्यातूनच ते श्रीमंत झाले.
1 May 2018 - 7:14 am | चित्रगुप्त
त्या काळच्या ब्रिटिश अंमलात अफूचा व्यापार कायदेशीर होता की बेकायदेशीर ?
भारतातून मिळवलेली अफू ब्रिटिश सरकार चीनमधे विकायचे. त्यासाठी बनवलेल्या खास बोटीचे चित्रः
The clipper ship Le-Rye-Moon, built for the opium trade, 19th-century wood engraving from the Illustrated London News. (Encyclopædia Britannica, Inc).
1 May 2018 - 9:05 am | आदित्य कोरडे
राज्य ब्रिटीशांचे त्यामुळे बेकायदेशीर असण्याचा प्रश्न नव्हताच , निळीची शेती अशीच , ती जमिनीचा कस कमी करते पण इंग्रजांन ती हवी असायची म्हणून मग नीलीकाराता ठरवलेल्या शेतात इतर कोणतेही पिक घेणे बेकायदेशीर होते - कायदे त्यांच्या सोयीसाठी होते न्यायासाठी किंवा सर्वसामान्यांना संरक्षण देण्यासाठी नव्हते ...
1 May 2018 - 3:01 pm | अनिरुद्ध.वैद्य
सगळं. गप्प बसायला काय ते तस्करी थोडीच करत होते.
30 Apr 2018 - 6:56 pm | manguu@mail.com
छान
30 Apr 2018 - 9:01 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक आहे ! पारशी बावांचा जमाव रस्त्यावर येऊन दंगा करतोय असे चित्र डोळ्यासमोर आणणे कठीण जातेय ! :)
30 Apr 2018 - 9:20 pm | एस
इंटरेस्टिंग.
30 Apr 2018 - 10:12 pm | शब्दानुज
संधी भेटली की सगळ्याच समाजातील काही लोक घे पंगा कर दंगाच्या मूडमद्धे येत असावेत
1 May 2018 - 2:27 am | गामा पैलवान
आदित्य कोरडे,
चांगला लेख आहे. बरीच माहिती मिळते. हे विधान रोचक वाटलं :
रोचक अशासाठी की पारशांचा प्रमुख व्यापारउदीम अफू वगैरे अंमली पदार्थांचा म्हणजे ड्रग्जचा होता. दंगा करायला बळ कुठून आलं याचा उलगडा होतो. अफूनंतर हे पारशी लोकं कापडाच्या धंद्यात घुसले.
आ.न.,
-गा.पै.
1 May 2018 - 9:27 am | श्रिपाद पणशिकर
1 May 2018 - 9:28 am | श्रिपाद पणशिकर
.
1 May 2018 - 10:29 am | तिमा
आमचा जन्म मुंबईत गेला. माझे वडील टाटा मधे नोकरीला होते. आम्ही एका उपनगरांत रहायचो, त्याच्या समोरच भली मोठी पारशी कॉलनी होती. त्यातील अनेकांना आम्ही ओळखायचो. थोडक्यांत, पारशी लोकांशी आमचा अगदी जवळून संबंध आला आहे. त्या अनुभवावरुन मी काही विधाने करु इच्छितो.
पारशी हे तसे शांतताप्रेमी, पण अन्याय सहन करत नाहीत. बहुसंख्य पारशी कायदा पाळणारे आणि कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे असतात. दोस्ती झाली तर ते तुमच्यासाठी काहीही करतील.
विक्षिप्तपणा हा बर्याच पारशांचा स्थायीभाव असतो. रस्त्यांत धक्का लागला आणि सॉरी म्हटले नाही तर एक पारशी माणूस तुमच्या मागे येऊन तुम्हालाही तसाच हात लावून जात असे.
पारशी तरुणांची लग्ने फार उशीरा होतात, आणि ते सहसा जातीबाहेर लग्न करत नाहीत. त्यामुळे त्यांची लोकसंख्या कमी होत चालली आहे.
काही पारशी बायका भांडकुदळ असतात. पारशी कॉलनीत, दोन पारशी बायकांचे भांडण झाल्यावर, त्यातल्या एकीने, शब्दशः दुसरीची जीभ हासडली होती, तिला हॉस्पिटलमधे जावे लागले.
पारशी कॉलनीत मधे एकदा, रात्री चोर्या होऊ लागल्या. त्यामुळे काही पारशी तरुणांनी रात्री पाळत ठेवली आणि चोराला पकडले. त्याचे सर्व कपडे काढून त्याला बदडले. पोलिस येईपर्यंत, काही पारशी बायका, त्या चोरावर टॉर्चचा उजेड टाकून त्याला आणखी लाजवत होत्या.
आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर, एक गुंड, सायकलच्या चाकाला फुगा बांधून, आवाज करत फिरत असे आणि बायकांची छेड काढत असे. त्या पारशी कॉलनीतल्या एका धिप्पाड बाईने, त्या गुंडाला कॉलर धरुन खाली खेचले आणि दोन मुस्कुटांत ठेवून दिल्या. त्यानंतर तो गुंड परत कधी दिसला नाही.
वरील सर्व किश्शांचा मी साक्षीदार आहे.
1 May 2018 - 12:28 pm | राही
अगदी सहमत.
1 May 2018 - 12:44 pm | गामा पैलवान
आदित्य कोरडे,
आता अफूचा विषय निघालाच आहे तर एक गोष्ट सांगावीशी वाटते. HSBC ही जगातली भलीमोठी बँक स्थापन झाली तेव्हा तिचं नाव हाँगकाँग बँक असं होतं. ही बँक स्थापन करणाऱ्या संस्थापकांपैकी काही जण पारशी अफूव्यापारी होते. या अफूच्या पैशातून पुढे एका पारशाने हाँगकाँग विद्यापीठ स्थापण्यात पुढाकार घेतला. मुंबई विद्यापीठ देखील अशाच अफूच्या पैशातून बांधलं गेलं आहे.
आ.न.,
-गा.पै.
1 May 2018 - 1:19 pm | राही
पारसी लोक हे स्वत: अत्यंत न्यायी, नियम पाळणारे, सार्वजनिक (आणि खाजगीही) मालमत्तेची फिकीर आणि निगा राखणारे असे असतात. अन्याय सहन करीत नाहीत. कोर्टात खटले लढवण्यात वाकबगार. जमीनजुमला प्रचंड प्रमाणात. कित्येकदा कोणी वारस नसतो. मग पारसी पंचायत मध्ये पडते. झोपडीमाफिया, गल्लीमाफिया यांनी यांच्या अनेक जमिनींचा बेकायदेशीर ताबा घेतलेला आहे. हिल स्टेशनसमधल्या पूर्वापार जमीनजुमल्याचा ताबा स्थानिक झारीतल्या शुक्राचार्यांमुळे यांना सहजासहजी मिळत नाही. एक ओळखीचे पारसी आपली इस्टेट ताब्यात येण्याकरता अनेक वर्षे देवळालीच्या वाऱ्या करीत होते. त्यांच्या हयातीत काही ते काम पूर्ण झाले नाही. हे लोक नोकरांवर पोटच्या मुलांप्रमाणे माया करतात. कित्येकदा नोकरांना फ्लॅट्स वगैरे घेऊन देतात.
व्यापारउदीमात हे सुरुवातीपासूनच आहेत. ससॅनिड राजांचे चीनच्या सम्राटांशी व्यापारी संबंध होते. सुरुवातीला खुश्कीच्या सिल्क रूटने आणि नंतर सीलोनला वळसा घालून हिंदी महासागरातून हा व्यापार चाले. नंतर पुढे भारतात सुरतेत यांचा मोठा व्यापार होता. गुजरातेतली संजाण, उदवाडा, बिलिमोरा, नवसारी, भरुच ही यांची मूळ निवासस्थाने. जहाजबांधणी, कापडाची निर्यात आणि ब्रिटिशांसाठी चहाची आयात असा व्यापार असे. इंग्लंड, हिंदुस्थान आणि चीन असा हा सुवर्णत्रिकोण होता. ब्रिटिशांचा चीनशी अफूचा व्यापार होता त्यात पारसीही शिरले. एके काळी पारसी लोकांतले काही जण नावाजलेले कायदेतज्न असत. अनेक नामांकित लॉ फर्म्स पारश्यांच्या असत. चष्मे, फोटोग्राफी याही उद्योगात सुरुवातीला पारसी आघाडीवर होते. मुंबईच्या उत्तरेला बोरडी, घोलवड, चिंचणी, तारापूर, डहाणू परिसरात यांच्या अजूनही चिकू, लिची वगैरे फळांच्या बागा आहेत. अगदी अंधेरी- विलेपारलेच्या पूर्व भागात चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत इराणी वाड्या आणि चिकूवाड्या होत्या. दानशूरपणात पारश्यांचा हात कोणी धरणार नाही. अनेक इस्पितळे, शैक्षणिक संस्था, रस्ते, कॉज्वे, कलामहाविद्यालये पारश्यानी दिलेल्या देणगीतून स्थापन झालेली आहेत. गुरचरणीसाठी गिरगावनजीक जमशेदजी जीजीभाय यांनी जागा विकत घेऊन दिली. १८५६ साली हॉंगकॉंग आणि शांघाय बॅंक स्थापन करताना पारसी आघाडीवर होते. ह्या बॅंकेचे दोन आद्य संस्थापक पारसी आहेत. कॅंटन, शांघाय, हॉंगकॉंग येथे यांची उद्योगसाम्राज्ये होती.
पारश्यांविषयी लिहावे तितके थोडे.
1 May 2018 - 3:19 pm | राही
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जे बी एच वाडिया, आर्देसिर इरानी, सोहराब मोदी असे जायंट्स हिंदुस्तानी चित्रपटसृष्टीत होऊन गेले. आर्देसिर यांनी जवळ जवळ ८०-८५ चित्रपटांची निर्मिती केली. मॅजेस्टिक मूवीटोन, त्यानंतर रॉयल आर्ट स्टूडिओ आणि शेवटी इंपीरिअल फिल्म्स अशा तीन कंपन्या त्यांनी स्थापल्या. आलम आरा हा हिंदुस्थानातला पहिला बोलपट इंपीरिअलचाच होता.
पारसी रंगभूमीही समृद्ध होती. १८५३ १८६९ या काळात जवळजवळ २० थिएटर कंपन्या होत्या. राजा हरिश्चंद्र या नाटकाचे पारसी रंगभूमीवर ३० वर्षांत ४००० प्रयोग झाले होते. सुरुवातीला मराठी रंगभूमीवरसुद्धा पारसी रंगभूमीची छाप होती.
1 May 2018 - 6:44 pm | अभ्या..
आणि पारशी जिमखाना पण हिंदू मुस्लिम जीमखाण्यासोबत चौरंगी पंचरंगी सामने गाजवत असे. उंचापुरा बांधा, युरोपियन लोकांशी असलेली जवळीक, खाण्यापिण्यात असलेली मोकळीक आणि व्यापारातले काही गुण ज्यामुळे अगदी शालिन वगैरे नसले तरी उत्तम नागरिक म्हणून पारशी लोक मस्त एकदम. बेटी व्यवहारात मात्र अगदी कर्मठ असलेने त्यांच्या लोकसंख्येवर परिणाम झाला. जवळपास जीवनातले सारे कर्म पारशानी गाजवले असे म्हणायला हरकत नाही. बर्याच स्त्रियांच्या फॅशन्स पारशी महिलांनी पुढे आणल्या. ब्रिटिश आणि तत्कालीन नेटिव्ह ह्यातला दुवा पारशी होते असे म्हणायला हरकत नाही, जिथे जिथे ब्रिटिश आणि त्यांच्या कोलनीज होत्या त्या त्या गावात पारशी दिसणारच. हुशारी, शौर्य, धुर्तपणा, देखणेपणा, व्यवहारचातुर्य, कलासक्ती, तंत्रज्ञान, दानशूरपना, इतर धरमांचा आदर, नागरी जीवनाचा आदर, न्यायसंस्थावर विश्वास अशा बऱ्याच गोष्टीत पारशांचे अस्तित्व उठून दिसते.
सोलापुरातील काही पारशांचा चक्रमपणा, धडाडी, टिच्चून राहण्याची वृत्ती आणि त्यांच्या इस्टेटी ह्याच्या कित्येक आख्यायिका ऐकण्यात आहेत.
2 May 2018 - 3:17 pm | राही
क्रिकेटवरून काही नावे आठवली. पाल्हन(पॉली) उमरीगर, नरी कॉंट्रॅक्टर, फारुख इंजीनिअर. मॅडम भिखाजी कामा यांनी स्वतंत्र भारतासाठी एक झेंडा बनवला आणि तो पॅरिस येथे फडकवला. पारसी महिलांवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल इतके त्यांचे कार्य आहे.
2 May 2018 - 3:49 pm | राही
मॅडम कामा यांनी तो झेंडा जर्मनीत फडकवला होता. पॅरिसमध्ये नव्हे.
अनेक नावे आहेत . कांगा लीगवाले होरमसजी कांगा, डॉ बानू कोयाजी, दादाभाई नवरोजी, खुर्शेद नरिमन(वीर नरिमन), नानी पालकीवाला, सोली सोराबजी, सकलातवाला, सीरवई, सावकi वाचछा(बॉंबे टॉकीज, महल चित्रपट), फली मिस्त्री, वगैरे. फोटोग्राफीमध्येसुद्धा अनेक पायनीअर हे पारसी आहेत. एव्हढ्याश्या, अगदी मिनिस्क्यूल अशा समाजाने असे चौफेर कर्तृत्व गाजवावे हे खरेच आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे.
1 May 2018 - 4:50 pm | शाम भागवत
सॅम माणेकशा यांना कोण विसरेल?
1 May 2018 - 5:09 pm | Topi
जगात कुठल्याही वांशिक गटाचा ऱ्हास होण्यापूर्वी त्यांची प्रचंड आर्थिक प्रगती होते आणि त्यानंतर त्यांची लोकसंख्या कमी होऊन शेवटी नाश होतो असं वारंवार बघण्यात आले आहे शालीनतेने तेथे राहणाऱ्या नागरी गटांवर जंगली किंवा रानटी टोळ्या आक्रमण करून त्यांच्या संस्कृतीचा नाश करतात हेच पारशांच्या बाबतीत झाले आणि होत आहे
1 May 2018 - 6:21 pm | manguu@mail.com
हल्ली नागरी टोळ्या जंगली जमिनीवर आक्रमण करतात
2 May 2018 - 11:13 am | तिमा
आत्ताच्या जंगली टोळ्या, स्वजातीय संमेलने भरवतात, तर काही स्वजातीय मोर्चे काढतात.
5 May 2018 - 11:42 pm | टवाळ कार्टा
आणि काही *** खतरे मे अश्या आरोळ्या देतात
1 May 2018 - 6:28 pm | राही
ही लिंक पाहा.
तीनशे वर्षांपूर्वीच्या हिंदुस्थानातील व्यापाराचे आणि त्यातल्या पारश्यांच्या बलस्थानांचे सुंदर तपशील आहेत.
2 May 2018 - 11:05 pm | Topi
तिमा
आत्ताच्या जंगली टोळ्या, स्वजातीय संमेलने भरवतात, तर काही स्वजातीय मोर्चे काढतात
त्या टोळ्यांना शहरी सुखवस्तू शालीन जीवन हवे आहे म्हणूनच ते स्वजातीय संमेलन व मोर्चे काढीत आहेत