फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love)
कथा - ४
यात्रा..
(प्रेमाचा प्रवास..)
समोरून ती येत होती.. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली.. पाहताक्षणीच कोणालाही आवडतील इतके सुंदर डोळे.. डोळ्यावरूनच तिच्या सौन्दर्याचा अंदाज येत होता.. पण स्कार्फने चेहरा झाकल्याने ते सौन्दर्य सध्या तरी भूमीगतच होतं..
आणि कानात त्याच्या मोबाईलवरचे गाणे घुमत होते.. 'गुलाबी आँखे जो तेरी देखी, शराबी ए दिल हो गया'
संभालो खुद को ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया..'
खरच स्वतःला सावरणे त्याला कठीण होत होतं.
आणि जशा समोरच्या दोन तीन रिकाम्या जागा सोडून ती पुढे सरकली तसा तो खुश झाला कारण आपल्या शेजारची जागेवर बहुतेक हीच बसणार.. म्हणजे आजचा प्रवास आठवणीत राहणार..
पण ती मागे तर जाऊन बसणार नाही ना? तो प्रश्नात अडकला असतानाच ती समोर येऊन म्हणाली..
ती - ' एक्सक्युज मी, विंडो सीटचे माझं रिझर्वेशन आहे..'
तो मनातल्या मनात - ' रिझर्व्हेशन नसतं तरीही मी विंडो सीट दिली असती तुला..'
पण तोंडातून शब्द न काढता तोही बाजुला सरकून तिला खिडकीजवळ जागा देतो.
ती - ' थँक्स..'
तो अगदी दबक्या आवाजात - ' इट्स माय प्लेझर..!'
ती हक्काच्या जागेवर बसत, तोंडावरचा स्कार्फ बाजूला करत, बॅग वरच्या कप्प्यात ठेवून त्यातील इअरफोन बाहेर काढते..
मस्तपैकी गाणी ऐकत खिडकीतून बाहेर बघू लागते..
म्हणजे हिने मला पाहिले की नाही.. ह्याच्या मनाची घालमेल सुरू झाली..
पण त्याला कुठे ठाऊक की तिने त्याच्यासाठी काय केले ते..?
त्याची अवाजवी चुळबुळ तिच्याही लक्षात येत होती, आता तिला त्याच्या अस्वस्थतेने आतून गुदगुल्या होऊ लागल्या आणि चेहऱ्यावर नकळत ते ओठ दाबून येणारे हसू उमटले..
त्याच्या तिरक्या नजरेतूनही ते सुटले नाही.. कदाचित हा तिचा सिग्नल तर नाही ना.. तो पुन्हा बावरला..
सुरुवात करावी तरी कशी.. आणि कोणी.. प्रश्न दोघांनाही पडला.. पण गाडीने वेग धरला होता..
ती अजूनतरी अनोळखीच आहे, जर बोलली तर ओळख होईल, नाहितर एक प्रवासीच राहील..
त्याने शेवटी धाडस केले,
तो- 'हाय..' पण इतक्या हळू आवाजात तो बोलला की तिने कानातील इअरफोनमुळे ऐकले की नाही हा त्यालाच प्रश्न होता..
पण त्याने आपल्याकडे बघून काहीतरी बोलले हे मात्र तिला जाणवले.. तिने ती संधी जाऊ नये म्हणून लगेच एक स्माईल दिले..
आता मात्र त्याने तिला नीट पाहिले आणि त्याला कळले तिच्या डोळ्यांनी तिच्या चेहऱ्याशी प्रतारणा केली नव्हती, ती तिच्या डोळ्याइतकीच सुंदर होती की तिचे डोळे तिच्याइतके सुंदर होते..नक्की काय..! पण तिचे स्माईल नक्की सुंदर होते..
आता त्याला बरे वाटले, न त्याने पुढचा प्रश्न विचारला..
तो- ' बोलू शकतो का?'
ती हसत- ' हो'
तो पुन्हा विचारात, आता काय विचारावे..?
तुझे नाव काय..? कॉलेज?
तुझा आवडत रंग कोणता?
तुझा मोबाईल छान आहे , कुठे घेतला?
नको हे सर्व मूर्खासारखे वाटतील..
काहीतरी भन्नाट सुरुवात हवी..
तिने विचारले तर बरे होईल..
खरच अनोळखी माणसाशी बोलणे एवढे अवघड असते..?
हा काहीच बोलेना म्हणून ती पुन्हा कानात इअरफोन अडकवू लागली..
तोच तो म्हणाला- ' कानात इअरफोन टाकल्यावर मी बोललेले ऐकू कसे येईल.. जर गाणेच ऐकायचे असेल तर मी गाऊ का.?'
पुन्हा तसेच ओठ दाबत ती हसली.. तिचे हसणे म्हणजे ह्याच्या हजरजबाबीपणावर न तिच्या विनोद आकलन क्षमतेवर शिक्कामोर्तब करणारे होते.. त्याच्या मुलीच्या अपेक्षितील पहिला टप्पा तिने पार केला होता न गाडीनेही..
गाडी आता शहरातल्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर आली होती.. प्रवास सुरु झाला होता..
ती- ' हो चालेल, पण मला सिंगल स्टेटसची गाणी जास्त आवडतात..'
तो- ' म्हणजे..'
ती-' जसे की बत्तमीज दिल..'
तो-'अजून एखादे..'
ती- ' दिल जैसे धडक धडकने दो..'
तो- ' मग तुला आयटम सॉंग पण आवडत असतील..,
तिने प्रश्नार्थक चेहरा केला..
तो- ' अग ते नाही का चिकनी चमेली, छुपके अकेली म्हणजे ती पण सिंगल स्टेटसचीच असते ना..'
ती काही न बोलता खिडकीतून बाहेर बघू लागते..
त्याला मात्र कळत नाही, ती रागावली आहे की त्याचा जोक फारच खराब होता.. गाडीला ब्रेक लागला होता..
ती स्वतःला सावरून विचारते- ' मग गाणी सोडून अजून काय येतं तुला..?'
विषयांतर. म्हणजे कोणता विषय टाळावा हेही तिला कळतंय. गाडीने आता दुसरा टप्पाही ओलांडला होता..
तो- 'लिहायला, वाचायला..'
ती ज रा लटक्या रंगात- ' अरे म्हणजे काय शिकत आहेस..'
तो- ' सध्या गाडी चालवायला फोर व्हिलर..'
ती पुन्हा तसेच हसते..
तो- ' बी टेक ऍग्री झालोय आता शेती आणि ग्रामीण जीवनावर संशोधन करतोय आणि तू..?'
ती- ' बी इ सॉफ्टवेअर इंजिनीअर झालेय आणि सध्या जॉब शोधतेय..'
तो- 'ओह गुड'
ती-' पण तुझ्याकडे बघून असे वाटते की तू डॉक्टर किंवा इंजिनीअरिंग करत असशील..'
तो- ' सर्व जण हेच म्हणतात, वडील डॉक्टर असताना मी हे क्षेत्र का निवडले?'
ती-' माझाही तोच प्रश्न आहे..'
तो-' मला गावाकडची शांतता आवडते, ती हिरवाई, ती गावाकडची ताजी हवा, ताजा भाजीपाला आणि तो पक्ष्यांचा किलबिलाट, सर्व काही फ्रेश.. कसं अगदी प्रसन्न वाटतं.. गुदमरलेल्या अवस्थेतून बाहेर पडून मोकळा श्वास घेतल्यासारखे..'
ती- 'हं, असेलही, पण मला अगदी ह्याच्या उलटे वाटते, म्हणजे मला गावाकडून शहरात आल्यावर मोकळा श्वास घेतल्यासारखे वाटते..'
तिच्या ह्या वाक्यावरून आतापर्यंत त्याच्या प्रेयसीच्या अपेक्षांचा प्रत्येक टप्पा सुरळीत पार करत असलेली तिची गाडी खड्ड्यात आदळली..
तो-' पण शहरात एवढी गर्दी आहे त्यात तर नक्की जीव घुसमटतो..'
ती-' माझ्या मते गावाकडच्या लोकांच्या जुन्या विचारांच्या बंधनाने जास्त गुदमरल्यासारखे होते..'
तो-' म्हणजे तू शहरात स्वातंत्र्य शोधते आहेस.. पण त्यासाठी तू तुझे आरोग्य पणाला लावत आहेस हे लक्षात येत नाही तुझ्या..'
ती- ' हे खरे आहे तुझे, पण गावाकडे तू नातलग किंवा आजूबाजूच्या माणसाकडून मानसिक किंवा भावनिक दृष्ट्या उध्वस्त झाल्यावर शाररिक व्यवस्थित असून काय फायदा..?'
तो- ' आणि जर शाररिकदृष्ट्या उद्धवस्त झालो तर मानसिक किंवा भावनिक कणखर तरी कुठे राहता येते..'
ती जरा विचारात पडते..
तो- 'शेवटी काय, गाडीची दोन्ही चाके सुस्थितीत पाहिजेत..'
गाडी आता खड्डे चुकवत होती..
तो-' आणि शहरातल्या फ्लॅटमध्ये राहून माणूस संकुचित विचाराचा बनतो तेच गावाकडच्या मोकळ्या अंगणात त्याच्या विचारांची आणि भावनांची व्याप्ती वाढते असे मला वाटते..'
ती- ' असेलही, पण आर्थिक प्रगती तर शहरातच होते ना..?'
तो- ' हो होते पण तितकाच आर्थिक खर्च, कारण शहरात तुमच्या राहणीमानाची उंची वाढते आणि त्यामुळे ते जपण्याचा खर्चही..'
ती- ' पण हे पक्षीही स्थलांतर करतातच ना, चांगल्या हवामानासाठी, चांगले अन्न आणि निवाऱ्यासाठी.. मग माणसाने केले स्थलांतर शहरांकडे तर त्यांचे काय चुकलं..'
तो- ' हेही बरोबर आहे, पण पक्ष्यांना काही निर्मिती करायला मर्यादा आहेत पण माणूस निर्मिती करू शकतो.. मला सांग हि शहरे तयार कशी झाली असतील.. कोणीतरी उद्योग उभारले असतील, मग नोकरी मिळते आहे आणि शेतीपेक्षा चांगले पैसे मिळत आहेत तेही दरमहा म्हणून इतरजण गाव सोडून नोकरी करू लागले असतील, नंतर त्या इतर लोकाच्या गरजा भागवण्यासाठी बाकीच्यांनी पूरक उद्योग उभारले असतील, आणि हळूहळू ती जागा शहर बनली असेल..'
ती- ' हो असेच घडले असेल.. '
तो- ' मग मला सांग, जेव्हा उद्योग उभे राहिले असतील तेव्हा लोकांनी नोकरीसाठी गाव सोडले नसते तर काय घडले असते?'
ती- ' कदाचित उद्योग प्रत्येक गावात पोहचले असते आणि सर्वाना रोजगार मिळाला असता..'
तो- ' आणि प्रत्येक गाव शहराइतके विकसित झाले असते..'
ती- ' हो तेही खरंच, पण आता काय.. शहरे तर कधीच तयार झाली आहेत..'
आता गाडी एका हॉटेलपाशी थांबली होती, दोघांनी एकत्र चहा घेणे पसंत केले.. आजूबाजूला नजर टाकत तो म्हणाला..
' तू गावाला का जात आहेस आज, सुट्टीसाठी ?'
ती- ' नाही रे, यात्रा आहे गावाची म्हणून'
तो-' अरे वा, आमच्याही गावाची यात्रा आहे परवा..'
ती- ' यात्रा म्हटले की किती भारी वाटते ना, सर्वजण भेटतात, मग त्या रंगणाऱ्या गप्पा, ते कार्यक्रम, त्या पंगती, त्याची लगबग..'
तो- 'हो ना, हे शहरात कुठे मिळणार नाही..'
ती- ' पण आजकाल गावातले लोक शहरी झाल्यासारखे वागताहेत, त्याचे राहणीमान, खाणेपिणे, सारं काही शहरी बनत चाललयं..'
तो- ' हो ना, पण खरं तर मलाही गावाचे शहर होणे आव डणार नाही, कारण गावाचे गावपण जेवढे टिकेल तेवढी गावाची ओढ टिकून राहील.. आणि त्यामुळे हा निसर्गही..'
ती- ' पण गावात कसे आपण गावकी आणि भावकीत नकळतपणे ओढले जातो, शहरात कसे आपण अलिप्तपणे राहू शकतो..'
तो- ' पण शहरात राहून तुम्ही सुरक्षित आहात असे पण नाही..'
ती- ' पण क्वालिटी लाइफ पण एक गोष्ट आहे ना.. जी गावाकडे कशी मिळेल..?'
तो- ' कसली क्वालिटी, चारचाकीतील प्रवास पण तासनतास सिग्नलच्या रांगेत उभे.. ए सी ऑफिसेस पण तिथे निवांत बसायलाही वेळ नाही.. मॉल, शॉपिंग, सारं काही दाराशी पण समाजातील देखाव्याची स्पर्धाहि तेवढीच.. उच्च शिक्षणाच्या संधी पण अवाजवी ताणही तेवढाच..'
ती- ' अरे पण तू पॉझिटिव्हली बघ ना.. अरे तू अर्धा रिकामा ग्लास पाहतो आहेस, पण तो पाण्याने अर्धा भरलेला आहे हे बघ ना?'
तो- ' मान्य आहे, हे महत्वाचे आहेच कि तो ग्लास अर्धा रिकामा असला तरी अर्धा पाण्याने भरलेला आहे, पण हेही तितकेच महत्वाचे कि ते पाणी तेवढे स्वच्छ आणि शुद्ध हवे..!'
गाडीने पुन्हा प्रवास सुरु केला..
ती- ' पण गावाच्याही अश्या काही उणीवा आहेतच कि जसे कि शिक्षणाचा दर्जा, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधीचा अभाव..'
तो- ' तुझे पण बरोबर आहे.. पण आपल्यासारख्या शिकलेल्या लोकांनी पुढाकार घेतला तर ह्यावरही मार्ग काढता येतील.. पण त्यासाठी गाव सोडणे हे योग्य नाही..'
ती- ' आणि दुष्काळी गावाचे काय..?'
तो- ' तिथेही प्रयत्नातून चित्र बदलू शकते हे आता सिद्ध होत आहे..'
ती- ' हो पण प्रयत्न सर्वाकडून हवे आहेत एकटा काय करू शकतो..?'
तो- ' हि अलिप्तता शहरात जास्त जाणवेल पण गावाकडे खूप क्वचितच असे मला वाटते..'
ती- ' अरे पण सामाजिक विचार केला तर वैयक्तिक प्रगती मागे राहते..'
तो- ' असेलही पण आयुष्यात अशीही एक वेळ येते की प्रत्येकाला सामाजिक व्हावे लागते.. आता हेच बघ ना तुलाही गावाची यात्रा आवडतेच ना..'
गाडी घाटातून जात होती, नागमोडी वळणे घेत प्रवास करत होती.. गावाच्या दिशेने..
ती- ' तुझा नेमका मुद्दा काय आहे..?'
तो- ' मला हेच समजत नाही की अलीकडच्या गावातील बऱ्यापैकी शिकलेल्या मुलींना लग्न करून शहरात यायचे असते असे का? त्यांना गावाकडे का राहायचे नसते..'
ती- ' कारण मुलींनी त्याच्या आईला किती कष्ट पडतात ते पाहिलेले असते..'
तो-' मान्य, पण कष्ट कोणालाच चुकलेले नाही, मग शहरात असो की गावात, स्त्री असो की पुरुष.. '
ती- 'आणि शहरातल्या व्यक्तींना गावाकडे आल्यावर सन्मानही मिळतो..'
तो- 'सन्मान तो तर परदेशांत नोकरी करून आलेल्या व्यक्तीला तितकाच दिला जातो भले तो तिथे जाऊन हमाली करून आलेला असेल.. हीच आपली समाजाची शोकांतिका.. मी म्हणत नाही त्यांचा सन्मान नको करायला, तो कराच पण तितकाच सन्मान गावातून एखादा शेतकरी शहरात आला की त्याचाही करा..'
ती- 'अजून असेही असेल की गावाकडच्या मुली लग्न करून शहरात जायचे कारण कि त्यांना स्वतःला सिद्ध करायचे असते कि त्याही पुरुषाच्या बरोबरीने उभ्या राहू शकतात..'
तो- 'हे मान्य, पण मग असे गावाकडील कामात का सिद्ध करावेसे वाटत नाही..?'
ती- 'शेवटी ज्याची त्याची आवड, आता तू नाहीस का डॉक्टर व्हायचे सोडून शेती करायचे म्हणतोस..'
तो मिश्कीलपणे हसत म्हणतो- ' मला ना अशी निर्मिती करायला खूप आवडते..'
ती- 'मग इंजिनीअर व्हायचे..?'
तो- 'कसे आहे ना, सिमेंटची जंगले उभारण्यापेक्षा झाडाची जंगले उभी करायला जास्त आवडतील मला..'
गाडीने ब्रेक लावला, तिचा स्टॉप आला होता.. जाताना म्हणाली, 'भेटू पुन्हा असेच एखाद्या प्रवासात, प्रवासी म्हणून..'
हातातील तिकीट तिने सीटवर टाकले न बॅग उचलून दरवाज्याकडे निघाली.. त्याने सहज ते तिकीट उचलले, ते पाहून त्याला धक्का बसला, अरे हे तर आताच्या प्रवासाचे तिचेच तिकीट आहे , आणि त्याला आठवले की तिने तिकीट काढले होते मघाशी बस कंडक्टरकडून.. म्हणजे तिचे रिझर्वेशन न्हवते तर.. म्हणजे ती मुद्दामहून आपल्या शेजारी बसली होती न तेही खिडकीशेजारी.. वा स्मार्ट निघाली ती..
तिने त्याच्या अपेक्षेतला हाही टप्पा पार केला होता, स्मार्टपणाचा.. पण आता दोघांच्याही विचारांच्या वाटा वेगळ्या होत्या..
तिची गाडी गावाकडून शहराकडे धावत होती.. आणि..
त्याची शहरातून गावाकडे..
तो खिडकीतून तिच्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे पाहत होता.. पण तिने वळून पाहिले नाही.. गाडी सुरू झाली होती..
काही वेळाने तिने मागे वळून पाहिले तोपर्यंत गाडी रस्त्याला लागली होती..
तिलाही वाटत होते, तो तसा प्रत्येक बाबतीत परफेक्ट होता. पण त्याचा प्रवास वेगळ्या वाटेने होता. बघू भविष्यात त्याची वाट आपल्या रस्त्याला येऊन मिळाली तर..
त्याने इअरफोन कानाला लावले, मोबाईलवर गाणं वाजत होतं..
'सफर का ही था मैं, सफर का रहा..!'
त्याला काही ओळी सुचल्या होत्या,
'असाही एक प्रवास होता, त्याला तिचा सहवास होता,
दोघे अगदी अनोळखी, पण ओळखीसाठी प्रयास होता,
ओळख झालीही आता, पण त्यांचा प्रवास वेगवेगळा होता, पण थांबला नाही तो, कारण शेवटी तो एक प्रवासी होता..'
त्याला मात्र जाणवले होते, की अजूनही चालू राहील एक प्रवासी बनून त्याचा प्रेमाचा प्रवास..!!
***
राही..
***
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.
संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)
8378 045145 (Rahi..)
प्रतिक्रिया
30 Apr 2018 - 8:05 am | कुसुमिता१
मस्त लिहिलंय!
30 Apr 2018 - 11:34 pm | रा.म.पाटील
धन्यवाद.. मनापासून आभार..
30 Apr 2018 - 11:41 pm | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - १ ची लिंक
https://www.misalpav.com/node/41841
30 Apr 2018 - 11:42 pm | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - २ ची लिंक
https://www.misalpav.com/node/42046
30 Apr 2018 - 11:44 pm | रा.म.पाटील
फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ३ ची लिंक
https://www.misalpav.com/node/42247
30 Apr 2018 - 11:45 pm | रा.म.पाटील
Facebook Page link
https://m.facebook.com/festivdiaries