आमचा बॉस आणि आम्ही

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
26 Oct 2008 - 2:42 pm

आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकवावा' , पण... चेहेर्‍यावर 'आपल्याच घड्याळाचे काटे मोडल्याचा' भाव आणावा लागतो.

आमचा बॉस विचारतो, "उशीर का झाला?"
आम्ही सांगतो, " ट्रेन लेट"
"मग तूमच्या बरोबरचे देशपांडे वेळेवर कसे?"
" ट्रेन पकडायला लेट. " आम्ही उत्तरात थोडासा बदल करतो.

आमचा बॉस आमच्या हजेरी बूकात एक फूली मारतो. आम्ही बॉसला मनातल्या मनात ३ ते ४ 'फूल्या' वहातो. आमचा बॉस म्हणतो आता आसन ग्रहण करा आणि कामाचा अभिषेक सोडा. आम्ही नम्रतेचा भाव आणून 'तस' करतो.

आमचा बॉस कधी म्हणतो, "आपल्याला मिळून टार्गेट पूर्ण करायचय. हेड ऑफीस कडून रीमाइंडर आलय." आम्हाला कळून चूकत आम्हाला आता मान मोडेपर्यंत काम करायचय आणि आमचा बॉस बायकोसाठी (स्वतःच्या) साड्या आणि गजरे आणणारै.

आम्ही कधीतरी फोनवर मित्रांशी (व अगदी चूकून मैत्रीणींशी) बोलत असतो. अगदी त्याचवेळी आमचा बॉस समोर प्रकट होतो आणि आमच्याकडे (खूळ्यासारखा) बघत रहातो. आम्हाला वाटत फोनच्या वायरीचा हार बॉसच्या गळ्यात घालावा. पण पेलत नाही. आम्ही मनातल्या मनात बॉसला आणि प्रत्यक्षात फोनला आदळतो आणि भक्ती भावाने बॉस कडे बघतो. बॉस म्हणतो "आज डोक दूखतय म्हणून लवकर घरी जाणारै. आमच्या दोन मीटींगा तूम्हालाच करायच्यात. हे त्याचे तपशील." आमच न दूखणार डोक दूखायच थांबत. आणि मित्राबरोबर नूकताच ठरवलेला पिक्चर चा प्रोग्राम आम्ही 'क्रोसिन' च्या गोळीबरोबर गिळून टाकतो.

आमचा बॉस कधीतरी काम केल्यासारख करतो. पण सवय नसली की थोड्याफार चूका ह्या व्हायच्याच. आम्ही समोर बसलेले असतो. बॉस अचानक समोरचा फोन उचलतो, १२-१५ बटण दाबतो आणि आमच्याकडे बघून विचारतो ह्यात '+' च बटण का नाहीये. आमच्या चेहेर्‍यावर आलेली गडगडाटी हास्याची गाडी आम्ही अगदी दोन्ही हात जोर लावून मागे ढकलून देतो आणि नेहेमीचीच 'बंद पडलेली' साळसूदपणाची गाडी आणून चेहेर्‍यावर उभी करतो. एवढ्या वेळात बॉसला आपली चूक (की धांदरट पणा) कळतो आणि तो आमच्याकडे बघून हसतो आम्हीही घाबरत घाबरत हसल्यासारख करतो. आज आम्हाला चहा बरोबर तोंडी लावायला बिस्कीटांची गरज नसते.

आमचा बॉस जेंव्हा कधी तरी काम करतो, तेंव्हा तो फारच विनोदी दिसतो. बॉसचा बॉस हेड ऑफीस वरून आलेला असतो. तो आमच्या बॉसला उभा आडवा झाडत असतो. तेंव्हा आम्ही हळूच आमचे मेल चेकून घेतो. समस्त मित्रांना फोन उरकून घेतो. दूपारी हॉटेल मध्ये जावून 'पेश्शल' थाळी मागवतो. वर २ रुपये टीप देतो. जमलच तर बाहेर पानाच्या गादीवर जावून ' मसाला पान' खातो आणि बॉसच्या नावाने 'पिंक' मारतो. आम्ही परत येतो तेंव्हा बॉसचा बॉस गेलेला असतो. आमचा बॉस प्राणिसंग्रहालयातल्या (का सर्कशीतल्या) वाघा सारखा केबीन भर फिरत असतो. आम्ही अलगद त्याच्या समोर जावून उभे रहातो. अगदी 'शेळी आणि वाघ' गोष्टीतल्या 'शेळी' सारखे. आमचा बॉस शिव्या देत असतो. मध्ये मध्ये त्याच त्याच शिव्या परत देतो. आम्हाला खूदकन हसूच येत पण आम्ही ते आवरतो.बॉस म्हणतो- ' कोण समजतो कोण स्वतःला?. कधी तरी इथे येऊन काम करून बघा म्हणाव म्हणजे कळेल' (आम्ही आठवायचा प्रयत्न करतो आमच्या बॉस ने शेवटच काम कधी केलय बर?) सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत रोज मरत असतो (आम्हाला बॉस ५ च्या पूढे कधी थांबल्याच आठवत नसत). 'आता ह्यापूढे टाईम टू टाईम काम करायच. सन्ध्याकाळी ५ च्या पूढे कोणी थांबायच नाही.' अस म्हणतो. आम्ही लगेच पडत्या फळाची आज्ञा झेलतो. आज घरी जाताना आमच मन अगदी प्रफूल्लीत असत. 'घरच्या बॉस' बरोबर फिरायला जायला मिळणार म्हणून नव्हे, तर 'आमच्या बॉसला' आज कोणीतरी त्याच्या 'आम्ही' पणाची जाणीव करून दिली म्हणून.

****************************************** समाप्त.

विनोदलेख

प्रतिक्रिया

भास्कर केन्डे's picture

5 Nov 2008 - 4:34 am | भास्कर केन्डे

दुर्बळांच्या हस्ते कसला कुंचला
महाबळ आले लेखनाला...
विठ्ठलं विठ्ठलं, ह्हो!!

आपला,
(आभंगी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मूखदूर्बळ's picture

7 May 2009 - 4:52 pm | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

संदीप चित्रे's picture

7 May 2009 - 5:23 pm | संदीप चित्रे

आवडला...
'ट्रेन लेट'नंतर उत्तरातला थोडासा बदल खूपच आवडला.
एकूण सगळा लेख वाचल्यावर निरनिराळ्या साहेबलोकांची आठवण झाली.

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

दशानन's picture

7 May 2009 - 5:45 pm | दशानन

मायबोली वर हाच लेख आहे येथे तुम्ही तेच का केदार १२३ ? मागील वर्षी एक जानेवारीला प्रसिध्द केला होता.

तुम्हि तेच केदार आहात हे पाहून आनंद झाला ;)

थोडेसं नवीन !

यशोधरा's picture

7 May 2009 - 5:33 pm | यशोधरा

राजे, केदारचाच लेख आहे, केदारनेच इथेही प्रकशित केला आहे.
शांती, शांती :)

श्रावण मोडक's picture

7 May 2009 - 5:37 pm | श्रावण मोडक

वाचला तेव्हाच वाटले होते की आधी वाचले आहे कुठंतरी.

नितिन थत्ते's picture

8 May 2009 - 5:50 pm | नितिन थत्ते

आमचा बॉस बायकोसाठी (स्वतःच्या) साड्या आणि गजरे आणणारै

स्वतःच्या हे विशेषण साड्यांचे आहे असे आधी वाटले होते. =))

खराटा
(रंग माझा वेगळा)

लिखाळ's picture

8 May 2009 - 6:56 pm | लिखाळ

लेख मजेदार :)
आवडला..
-- लिखाळ.

छोटा डॉन's picture

8 May 2009 - 8:37 pm | छोटा डॉन

मजेशीर लेख आहे, खुसखुषीत असल्याने मज्जा आली ...
उत्तम लेखन...

बाय द वे, बराच जुना होता तरी वाचायचा कसा राहिला ?
असो. पुलेशु.

------
(बॉस)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

मूखदूर्बळ's picture

9 May 2009 - 10:53 am | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

सुहास's picture

10 May 2009 - 4:01 am | सुहास

सही लेख ...

आमचा जुना बंगाली साहेब आठवला.. तो यायचा १२ वाजता हापिसात... आम्ही ९ वाजता हापिसात असावे असा त्याचा आग्रह असायचा.. नियमाप्रमाणे ५:३० ला जावे असे वाटायचे, पण रोजच ७ वाजायचे... एखाद्या शनिवारी कामे लवकर आटपतील आणि ३-३:३० ला निघायचे म्हणून जेवणाची सुट्टी रद्द करुन कामे आटपली की याचे फर्मान यायचे "उत्पादकता कशी वाढवता येईल याची चर्चा करण्यासाठी केबिन मध्ये या"... तेथे उत्पादकतेच्या नावाखाली आमची मापे काढली जायची.. आणि मग ७-७:३० वाजता केबीन मधून आमची सुटका व्हायची.. गंमत अशी की एवढ्या उत्पादकतेच्या मिटींग्ज नंतर त्याला अनुत्पादकतेसाठी आणि कामगार गळती बद्द्ल पद सोडावे लागले.. असो... आता मला कुणी बोलत नाही कारण मी नोकरी करत नाही..

--सुहास