निसर्ग नावाचे काहीतरी आहे, याचे भान आम्हाला फक्त फेसबुकवर फोटो पोस्ट करताना, शनिवार रविवारी फिरायला जाताना, फोटो लाईक करतानाच होत असते. इतर वेळेस आपले वागणे असे असते की फक्त माणुस आहे, निसर्ग वगैरे बाकी काही नाही.
मित्र सोमनाथ मातेरे यांनी त्यांच्या एका फेसबुक पोस्ट मध्ये साधारण एक दोन वर्षापुर्वी , निसर्गाच्या क्रांती / प्रतिकार / विद्रोहाविषयी विषयी लिहिले होते. अस्पष्ट आठवतय ते आता. माणुस नावाचा प्राणी असा वागतोय जणु काही तो या निसर्गाचा अंगभुत घटक नसुन, निसर्गाचा मालक आहे, फक्त उपभोक्ता आहे. सोमनाथ ने म्हंटले होते की, एक वेळ अशी येईल की निसर्ग माणसाच्या ह्या उपभोक्तेपणाचा प्रतिकार करण्यासाठी खडाडुन उठेल व त्यावेळेस माणसाचे जगणे अवघड होईल.
खरच निसर्गाने अस काही केल तर? अस म्हणजे निसर्ग प्रतिकारासाठी उभा राहु शकला तर? हे शक्य आहे का?
आज अचानक हे आठवण्याचे कारण म्हणजे पुन्हा तोच दरवर्षीचा, वैशाख वणवा. वणव्याने आपल्या मुळशी वेल्हे तालुक्यातील एक देखील डोंगर सोडलेला नाहीये. झाडुन सगळेच्या सगळे डोंगर काळेकुट्ट झालेत. मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात, ज्या बिया रुजल्या, त्यांची रोपे तयार झाली, फुट फुट उंच वाढली, ती सगळीच्या सगळी जळुन भस्म झाली. या वर्षी वणव्याचे दुष्परीणाम मला देखील प्रत्यक्ष सोसावे लागले आहेत. मुलांप्रमाणे वाढवलेली माझी झाडे वणव्यात जळुन गेली. आता त्या दोन दोन फुट झाडांच्या जागी त्यांची प्रेतेच दिसताहेत. अत्यंत विदारक आणि भयावह व भावनांची कोंडी करणारे ते दृष्य पाहुन मागचा एक आठवडा चिनभिन झाले होते.
रस्त्याच्या कडेने जाता जाता, सिगरेट बिडी ओढुन, ती काडी, बिडी न विझवता जर रानात , वाळलेल्या गवतात पडली तर, चैत्र, वैशाखात त्या थोड्याशा थिणगीचा लगेचा वणवा होतो. तसेच, स्वतच्या घर शेताच्या स्वच्छतेसाठी आजुबाजुचे गवत जाळण्यासाठी टाकलेली काडी कधी वणवा लावते हे काडी टाकणारालाही समजत नाही. अशा प्रकारे वणवा लागण्याची कारणे अनेक असु शकतात. या कारणाविषयी मी मागील वर्षीच्या लेखांमध्ये सविस्तर लिहिले आहे. वणवा लावला जाऊ नये यासाठी काय उपाय योजना सर्वांनी करावयास हव्यात त्याविषयी देखील मी लिहिले, तहसीलदार आदींना या बाबत निवेदनदेखील दिले. पण प्रत्यक्षात वणवा लागणे थांबत नाही व मला अशी पुर्ण खात्री झालेली आहे की वणवा लागणे किंवा लावणे थांबणार देखील नाही. हे असेच चालु राहणार.
निसर्गशाळेच्या कॅम्पसाईटवर, नवीन शौचालयांचे बांधकाम चालु आहे. त्यावर कामासाठी स्थानिक पुरुष महीला येतात कामासाठी. एक वयस्कर स्त्री देखील येते असते मजुरीच्या कामाला. जेवणाच्या सुट्टीदरम्यान असेच गप्पा मारता मारता, त्यांनी सांगितले की , ज्या ठिकाणी सध्या आमची विहीर आहे, त्या ठिकाणी पुर्वी बारमाही पाण्याचा झरा होता. झ-याच्या उशाला एक आजनाचे झाड होते. कितीही उन असले तरी त्या झ-याचे पाणी खुप थंडगार असायचे व जाता येता, आजुअबाजुच्या सर्व गावातील लोक इथे पाणी पिण्यासाठी थांबायचे. मी आवर्जुन त्यांना वणव्या विषयी विचारले. त्यावर त्या म्हणाल्या की पुर्वी वणवे वगैरे नसायचे. आम्ही फक्त जेवढ्या रानात, म्हणजे डोंगरउतारावर, नाचणी , व-ही करायची तेवढेच रान पेटवुन घ्यायचो. ते ही पेटवण्यापुर्वी, त्या जागेभोवती जाळरेस काढली जायची, जेणे करुन आग बाहेर पांगु नये. त्या आजींचे वय लक्षात घेता , हा काळ किमान ४०-५० वर्षापुर्वीचा असेल वाटते. सिध्दहस्त लेखक गोनिदांनी आठव्या नवव्या दशकात (१९७० ते ८०), काही कादंब-या लिहिल्या. ग्रामीण ललित कथा म्हणुन तो प्रकार प्रसिध्द झाला. त्यांच्या मी वाचलेल्या पवनाकाठचा धोंडी, वाघरु आदी कादंब-यामध्ये, वणव्याचे वर्णन वाचावयास मिळत नाही. गोनिदांसारख्या संवेदनशील माणसापासुन वणवा कसा काय लपुन राहु शकतो?
तर मुद्दा असा आहे, की वणवा, म्हणजे आजकालचा विकृत वणवा, जो सर्रास सगळे डोंगर जाळुन टाकतो, तो वणवा फार जुना नसावा.
मी एप्रिल १९९५ मध्ये माझ्या आयुष्यातील पहीला ट्रेक केला. रायरेश्वर, केंजळ गड. त्या ट्रेक दरम्यान आम्ही वणवा किंवा वणव्याने जळालेले डोंगर पाहील्याचे मला आठवत नाही. त्यानंतर, लगेचच, मे १९९५ मध्ये तिकोणा-अजीवलीची देवराई असा ट्रेक केला. तिकोणा किल्ल्यावर त्यावेळी काढलेला आमचा एक ग्रुप फोटो मला अजुनही आठवतो आहे. त्या फोटो मध्ये, आमच्या पायाच्या आसपास म आमच्या मागचे सर्व गवत जळुन गेल्याचे, पाहीले मला स्पष्ट आठवते आहे.
तसेच आमच्या भरे गावातुन उन्हाळ्यात, उत्तरेकडे पाहीले की जे डोंगर, दिसतात ते देखील उन्हाळ्यात, रात्रीच्यावेळी जळताना दिसायचे.
एकुणच काय की, वणव्याचा जन्म आमच्याच पिढीच्या वेळी झाला असावा असा माझा अंदाज आहे.
ह्या वर्षी आमच्या गावालगत दोन वर्षापुर्वी सामाजिक वनीकरणाद्वारे बरीच झाडे लावुन वनक्षेत्र तयार केले आहे. गेली दोन वर्षे, वणव्यामुळे ह्या झाडांचे खुपच नुकसान होत आहे. पुणे शहरातुन काही सामाजिक संस्था, उन्हाळ्यामध्ये, इथे येऊन, जळुन गेलेल्या झाडांना पाणी घालतात व त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी त्यांची, तेथेच भेट झाली व जळालेली झाडे व त्या लोकाची निराश मने पाहुन त्यांना एक सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी, मोलमजुरीची माणसे लावुन, त्या वनक्षेत्रातील गवत दिवाळीनंतर, लगेचच कापुन घेतले. यावर्षी देखील वणवा लागलाच. फक्त, झाडांच्या खाली गवत जास्त नसल्याने, झाडांचे नुकसान कमी झाले.
आमचा गावचा डोंगर, शेजारच्या गावचा डोंगर असाच गेली कित्येक दशके जळतो आहे. सगळा सह्याद्रीच अहोरात्र जळतो आहे.
ह्या सर्व परिस्थीतीला जबाबदार कोण?
अनेक पर्यावरण प्रेमींचे म्हणने आहे की, वणव्यांना स्थानिक लोक जबाबदार आहेत. काही लोकांना असे वाटते की शासन प्रशासनास वणव्यासाठी जबाबदार धरावे. काहींच्या मते, राजकीय इच्छाशक्ती अभाव वणव्यासाठी जबाबदार आहे. काहींना असे वाटते की हा प्रश्न ग्रामीण भागाचा आहे व ग्रामीण लोकच याला जबाबदार आहेत.
वणव्याच्या रूपाने माणसाने, निसर्गाच्या विनाशासाठी एक, निसर्गावर हत्यारच उगारले आहे. अनेकदा मी वणवा लागलेला दिसला की, आसपासच्या गावातील लोकांशी बोलतो. त्यावर ते लोकदेखील खेद प्रकट करतात. वणवा कुणालाच नकोय.
मध्यंतरी ग्रामीण भागामध्ये, वणवा लावण्यामागे एक कारण सांगितले जायचे. ते असे की, वणवा लावला की पुढच्या पावसात जे गवत येते अधिक चांगले येते. आज विज्ञान सांगते की वणव्याचा आणि गवत अधिक चांगले येण्याचा काहीही संबंध नाहीये. उलट वणव्यामुळे मातीची धुप जास्त होते. माती सुटी होते, व पहील्या पावसासोबत ती सुटी माती वाहुन जाऊन नद्या धरणांमध्ये साचते. अशा प्रकारे माती वाहुन गेल्याने, व खडक उघडे पडल्याने कदाचित अजुन शे दोनशे वर्षांनी त्या जागेवर गवत उगवणारच नाही.
त्यामुळे चांगले गवत येण्यासाठी वणवा लावावा, हा गैरसमज ब-यापैकी दुर झालेला दिसतोय आजकाल. वणवा घातकच आहे, हे सर्वांना समजते आहेच. पण वणवा नेमक लावत कोण मग?
आणखी एक खेदाची गोष्ट अशी की की कुणालाही उसंत नाहीये. वणवा, त्याचे दुषपरीणाम असल्या अर्थशुण्य (पैसाशुण्य) विषयावर, बस एक दोन काळजीची वाक्ये बोलण्या लिहिण्यापलीकडे कुणी ही काहीही जास्त करीत नाही. वेळ नसणे हे वेगळे, पण खरच आपल्या कडे वेळ नाहीये का?
गावागावात, वाडीवस्तीत, प्रत्येक माणसाला धरुन , बसवुन, त्याला वणव्याची शोककथा ऐकवली गेली पाहीजे. कुणालाही सोडायचे नाही. प्रत्येकास #वनसाक्षर करावे लागेल. एकीकडे, वर्तमानात जे देशाचे कामाचे हात आहेत त्यांना वनसुरक्षा कशी करावी हे शिकवावे लागेल, तर दुसरीकडे, पुढच्या पिढ्यांना ह्या सकंटावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी तयार करावे लागेल. हा कार्यक्रम एकट्या दुकट्याचा, एखाद्या संस्थे, सरकारचा नाहीये. हा कार्यक्र्म पिढ्यांचा आहे.
जो वनसंस्कार, मागच्या पिढ्यांनी पुढे दिला नाही, ज्या वनसंस्कारात खंड पडला, तो वनसंस्कार, अगदी अंगणवाडी पासुन ते कनिष्ट महाविद्यालयांपर्यंत, घराघरात, दारादारात, देवळादेवळातुन झाला पाहीजे. असे केले तरच वणवे थांबतील.
आणि नाही केले आपण असे तर, सोमनाथ च्या म्हणण्याप्रमाणे निसर्ग विद्रोह केल्यावाचुन राहणार नाही आणि त्या विद्रोहानंतर केवळ निसर्ग असेल पण त्या निसर्गात माणुस नसेल.
प्रतिक्रिया
18 Apr 2018 - 7:53 pm | एस
या प्रश्नाणे मीही व्यथित झालो आहे. गेले पाच वर्षे मेहनत करून जगवलेली झाडे यावर्षी वणव्यात खाक झाली. कुठेकुठे धावावे!
19 Apr 2018 - 12:11 pm | आनन्दा
हा विषय खूप खोल आहे.. साधारण मागच्या 10 वर्षात दरवर्षी वनव्याची 1 तरी बातमी ऐकायला मिळतेच आहे.
21 Apr 2018 - 6:10 pm | हेमंत ववले
अहो, आख्खा मावळ पट्टा जळुन जातोय दरवर्षी. मावळ, मुळशी, वेल्हा आणि भोर या परीसरात माझे नेहमी फिरणे असते. या मावळ पट्ट्यात एक ही डोंगर वणव्यापासुन वाचलेला नाही या वर्षी देखील. हताशा.
21 Apr 2018 - 9:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
:(
21 Apr 2018 - 10:06 pm | सस्नेह
निसर्गाचा दणका ४० च्या वर गेलेल्या तापमानाच्या रुपाने बसलाच आहे ना.
पुढच्या पिढ्यांसाठी वणवेच ठेवून जाणार आहोत आपण :(
22 Apr 2018 - 1:07 am | पैसा
चिपळूण भागात उघडे बोडके डोंगर दिसले ते कोळसेवाल्यांचे काम असे ऐकले. रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावर विहिरीसारखे खोल खणून रेती उपसा होतो. ही सगळी दुष्कर्म माणसाचीच. आग आपोआप लागत नाही. माणूस लावतो.
आमच्या काजूच्या बागेत गवत कापायला सांगितले त्याने आळशीपणा करून आग लावली आणि गधडा झोपला. २५ एक झाडे काळी ठीक्कर पडली होती. त्यांना सतत १५ दिवस पाणी विकत घेऊन घातले आणि जगवले. मोठी झाडे असल्याने त्यांची मुळे व खोडे आतून चांगली होती. पण लहान रोपे मरून जाणार. :(
22 Apr 2018 - 3:47 am | चित्रगुप्त
हल्ली कायप्पावर यूपी बिहारवाले कामगार, सुतार, रंगारी वगैरे किती मेहनती, कसबी, प्रामाणिकपणे काम करणारे असतात आणि मराठी कसे आळशी असतात याबद्दल बरेचदा येत असते. या संदर्भात प्रश्न असा की हा गधडा कोण होता ? मराठी की यूपीबिहारी ?
22 Apr 2018 - 7:08 am | पैसा
अगदी गावचा.
22 Apr 2018 - 8:10 am | माहितगार
मिपा सारखा मंच मर्यादीत जागृतीसाठी महत्वाचा आहेच पण मास मिडीया (टिव्ही) आणि सोशल मिडीया माध्य्मातून दृकश्राव्य स्वरुपातील माहिती अधिक प्रभाव टाकू शकेल असे वाटते