कधी हसणे,कधी रुसणे..हजारो बाज गझलेचे...
तुला सांगू किती नखरे? किती अंदाज गझलेचे!
तिने नजरेत बाणांचा निशाणा बांधला आहे
कशी टाळू नजर! डोळे..निशाणेबाज गझलेचे!
जगाला द्यायला बाकी न दुसरे राहिले काही
मला मंजूर सारे कर्ज सारे व्याज गझलेचे!
मलाही साद देणारे कुणी होते,अता कळते...
कधी मी ऐकले होते मुके आवाज गझलेचे!
जशी सुचते तशी लिहितो,जरा शृंगार तू तिजला
तुझ्या ओठातुनीे यावे सुरीले साज गझलेचे!
—सत्यजित