baabukaka
aajibai
natha
mangyaa
sanjya
ranshur
wilaas
तो ऐशीचा काळ होता. मी शाळेत सहावी सातवीत असेन. नुकतेच आमची बिल्डिंग बांधायचे काम सुरु झाल्याने आम्ही सगळे दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते राहायला गेलो होतो.मी पहिले जिकडे राहत होतो त्यापेक्षा इथली मुले बरीच उडाणटप्पू होती. आणि मुख्य म्हणजे ती मोठ्या मुलांबरोबर उठबस करत असल्याने त्यांचे विषय जरा वेगळेच असायचे. उदाहरणार्थ कोण पोरगी कोणाबरोबर फिरते, कोणी कोणाशी मारामारी केली. कोणाची पोलीस केस झाली वगैरे .
भाईगिरीबद्दल नुकतीच माहिती समजायला सुरुवात झाली होती. आणि त्या भागात मोहनचे नाव फारच आदराने किंवा भीतीने घेतले जायचे. त्याच्या नावावर अनेक खऱ्या खोट्या बातम्या पसरायच्या किंवा जुने किस्से चघळले जायचे. आमच्या गावातले दोन प्रथितयश बिल्डर पैकी फाटक यांच्याबरोबर तो जोडलेला होता . म्हणजे कदाचित त्यांच्या व्यवसायात येणारे अडथळे दूर करून देणे आणि त्याबद्दल मोबदला घेणे असे काहीसे त्याचे काम असावे. त्यासाठी बरीच मोठी पोरांची फौजही त्याच्याबाजूने होती.
गणेशोत्सव नवरात्री गोपाळकाला यामध्ये कधी कधी त्याचे दर्शन होई. मधेच कधीतरी तो गायब असे, मग तो छोटा राजन बरोबर काम करतोय वगैरे बातम्याही ऐकू यायच्या.
अचानक एकदा त्याने २ ग्रेट डेन जातीचे कुत्रे पाळले आणि ते बरोबर घेऊन तो फिरायचा. गावात त्यावेळी असे कुत्रे कोणी पहिलेच नव्हते त्यामुळे ते आश्चर्य बघायला पोराटोरांची खूपच गर्दी होत असे.कधी कधी तो घोड्यावरून यायचा तेव्हा तर हिरोसारखाच वाटायचा.
मग एक दिवस बातमी आली कि दिलीपचा खून झाला.मोठी अंत्ययात्रा निघाली.घोषणाबाजी झाली.हा दिलीप सुद्धा एक नामचीन गुंड होता.मोहन ने त्याला आधीपण एकदा टपकवायचा प्रयत्न केला होता. पण नवरात्रीच्या धामधुमीत दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजावरून उडी टाकून तो पळाला आणि जीव वाचवला. दुसऱयांदा मात्र पूर्ण प्लॅन करून मोहनने नमस्कार मंडळासमोर त्याच्यावर तलवारीने वार केले आणि त्याचा गेम वाजवला. तात्या हा मोहन चा एक अजुन मित्र. त्याचेही अन्सारी चौक परिसरात असेच नाव होते. मोहन आणि त्याची जुनी मैत्री. हिंदू मुस्लिम दंगल असो किंवा अजून काही राडा असे अनेक छोटे मोठे किस्से झाले.
पण प्रत्येकाची वेळ कधी ना कधी येतेच.त्याच्याच गल्लीत राहणाऱ्या समेळशी त्याचे काहीतरी वाकडे होते. कदाचित वैयक्तिक किंवा व्यावसायिक. पण दोघातून विस्तव जात नसे.
समेळ बंधूपैकी कोणीतरी मोहनची सुपारी किसनला दिली. प्लॅन प्रमाणे किसनने कोणाबरोबर तरी निरोप देऊन मोहनला कोन गावातल्या एका बांधकाम साईटवर बोलावले. ओळखीच्या माणसाने निरोप दिला होता त्यामुळे बेसावध मोहन फक्त बंड्या नावाच्या एका पोराला घेऊन फियाट गाडीने तिकडे गेला.
तिकडे त्याची वाट बघत ५-६ जण आधीच दबा धरून बसले होते. त्यांनी मोहनवर तलवारीने हल्ला केला. मोहनने जीवाच्या आकांताने बंड्याला फियाट घेऊन पळायला सांगितले आणि स्वतः तलवारीचे वार झेलले. परिणाम व्हायचा तोच झाला. दुसऱ्या दिवशी मोहनची मोठी अंत्ययात्रा निघाली. सगळी पोरे शोकसागरात बुडाली.बंड्या भूमिगत झाला. पण पोलिसांनी इतर साक्ष पुरावे वापरून किसनला साथीदारांसह जेलमध्ये टाकले.
यथावकाश मोहनचे छत्र हरवलेली सगळी पोरे काम धंद्याला लागली. कोणी रिक्षा चालवू लागले, तर कोणी दुकान टाकले, कोणी छोटी मोठी नोकरी करू लागले.
मोहनच्या जाण्याने एक पर्व संपले.
प्रतिक्रिया
5 Apr 2018 - 3:10 pm | वरुण मोहिते
गिरगाव का?
6 Apr 2018 - 2:25 am | गामा पैलवान
दुर्गाडी किल्ला, कोन गाव म्हणजे कल्याण.
-गा.पै.
5 Apr 2018 - 11:10 pm | एस
थोडा लवकर आटोपता घेतल्यासारखा वाटला लेख. बाकी या लेखमालिकेतील नवीन लेख पाहून आनंद झाला. पुभाप्र.
6 Apr 2018 - 12:58 pm | राजेंद्र मेहेंदळे
होय, जरा संदर्भ कमी पडले , आणि काही काही उल्लेख टाळावे लागले, त्यामुळे लेखाची लांबी घटली.