साताऱ्याच्या वेढयात औरंगझेब - अजिंक्यताऱ्याची कहाणी

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
19 Feb 2018 - 11:13 am

१९ फेब्रुवारी या शासकीय शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझ्या संशोधनावर आधारित ही बातमी प्रसिद्ध होत आहे. पॅरिसच्या राष्ट्रीय संग्रहालयात मला मराठयांच्या इतिहासातील एक सुवर्णपान ज्याला म्हणता येईल अश्या साताऱ्याच्या वेढ्याचे चित्र सापडले. त्यावर पुढील संशोधन करताना आणि चित्राची सत्यता तपासताना यासंबंधीत जुनी माहिती सापडली. ही माहिती आणि ते चित्र एकत्रित स्वरूपात इथे इतिहासाच्या अभ्यासकांसाठी आणि इतिहासप्रेमी वाचकांसाठी इथे देत आहे. हा लेख मूळ स्वरूपात सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.

big
सर्व चित्रे (अनुल्लेखित) साभार Bibliothèque nationale de France यांच्याकडून. त्यांची परवानगी वापरासाठी आवश्यक आहे.

हे चित्र कर्नल जेंतील याच्या संग्रहात मिळाले. हा फ्रेंच सैनिक अवधचा नबाब शुजाउद्दोला याच्या पदरी मिलिटरी सल्लागार म्हणून होता. १७७८ साली त्याने फ्रान्सला परत जाताना सगळा संग्रह आपल्याबरोबर नेला. तो आता फ्रान्सच्या राष्ट्रीय संग्रहालयात आहे.

चित्रातला प्रसंग १४ एप्रिल १७०० या दिवशी घडला. त्यामुळे हे चित्र १७०० ते १७७८ या कालावधीत कधीतरी काढलेले आहे. औरंगझेबाने चित्रकला इस्लामला निषिद्ध मानली होती, त्यामुळे त्याच्या पदरी असलेले बादशाही चित्रकार दुसरीकडे आश्रयाला गेले. मोगल चित्रकलेला पुन्हा राजाश्रय लाभला तो मुहम्मद शाह रंगीला याच्या कारकिर्दीत १७१९ ते १७४८ ला वर्षात. त्यामुळे हे चित्र बहुदा त्या काळातले असायची जास्त शक्यता आहे. वेढ्याची जी हकीगत आहे त्यातले प्रसंग एकत्र जोडून हे चित्र काढलेले दिसते. हे चित्र त्यामुळे अनेक प्रसंग जोडून एकदम दाखवते. हे काही एखाद्या फोटोग्राफसारखे अस्सल प्रातिनिधिक सत्यचित्रण नाही.

aur

या मोठ्या केलेल्या भागात आपल्याला बादशाह औरंगझेब हा 'तख्त-ए-रवा' (फारसी - म्हणजे चालते-फिरते सिंहासन) या पालखीसारख्याच पण वरून उघड्या वाहनात दिसतो. बादशाह हा नेहमी सार्वजनिक जागी आजूबाजूच्या गोंधळाकडे लक्ष न देता हातात कुराणाची एक प्रत घेऊन ती वाचत असे. त्याचे खास शाही भोई लाल रंगाचे कपडे घातलेले आहेत. बादशाही मानमरातब चिन्हे छत्र-चामर इत्यादी जवळपास आहेत. बादशाहच्या डोक्याभोवती नेहेमीप्रमाणे सोनेरी वलय (अरोरा) आहे. त्यावर फारसीत त्याचे नाव 'आलमगीर' آلمگیر असे लिहिलेले आहे. बादशाह हा पूर्ण वृद्ध झाला असून त्याची मानही म्हातारपणामुळे वाकलेली आहे.

azam
शाहजादा आझम (विकिपीडियावरून साभार)

बादशाहच्या काळ्या ढालीवर असलेली खास व्यक्ती म्हणजे त्याचा मुलगा शाहजादा आझम. त्याचा या लढाईतील आणि किल्ल्याच्या नामकरणातील सहभाग आपण खाली नंतर बघणार आहोत. आझमचे वयही भरपूर दिसते आहे, त्याची दाढी जवळजवळ पांढरी झालेली आहे.

tar

बाद्शाहसमोर हात पुढे घडी घालून उभी असलेली व्यक्ती म्हणजे बहुदा तर्बीयतखान. हा मोगलांचा 'मीर-अतिश' म्हणजे तोफखान्याचा मुख्य होता. याच्याच प्रयत्नाने किल्ल्याला सुरुंग लावला गेला. तोफा, त्यांचे दमदमे हे सगळे याने आपल्या तुकडीकरवी रचले. त्याने पूर्ण लोखंडी चिलखत घातले आहे आणि त्याची दोन मुले (अथवा दोन अनुयायी/सरदार) त्याच्या मागे उभी आहेत.

tar1

हीच व्यक्ती (बहुदा तर्बीयतखान) आपल्याला हल्ला करायला तयार असलेल्या घोडेस्वारात एका घोड्यावर स्वार दिसते. घोडेस्वारांच्या रांगा सुरुंगातून पडलेल्या खिंडारावर हल्ला करायला तयार आहेत. मोगली सैन्यातले वेगवेगळे मनसबदार, त्यांचे झेंडे, सजवलेले घोडे असा सगळं आपल्याला तपशिलात काढलेले दिसते. प्रत्यक्षात (आपण खाली पाहू) हा हल्ला पहाटेस अंधारात घडला आणि साताऱ्याच्या किल्ल्यात घोडेस्वारावरून हल्ला करणे शक्य नाही. त्यामुळे आपण हा भाग एक कल्पनाचित्र म्हणूनच पहायचा.

top

इथे आपल्याला किल्ल्यावर हल्ला करण्याऱ्या तोफा एकत्र आग ओकताना दिसतात. एका वर्षानंतर १७०१ मध्ये पन्हाळ्याच्या वेढ्यात हजार असलेल्या इंग्लिश राजदूत विल्यम नॉरीस (हा एक एक वेगळ्या लेखाचा विषय आहे) याने म्हणाले आहे की मोगल लोखंडी गोळ्याऐवजी बऱ्याचदा दगडाचे तुकडे तोफातून उडवीत. त्यामुळे तोफा लवकर खराब होत.

bur

इथे आपल्याला किल्ल्यावरच्या बुरुजाला एक गोल छप्पर घातलेले दिसते. डेक्कन कॉलेजचे श्री. सचिन जोशी याना इतर चित्रातही ते सापडले आहे. त्यावरून सारे सांगता येते की त्या काळात पहारेकर्यांच्या सोयीसाठी (उन्हापावसात, रात्री अपरात्री गस्त घालताना) बुरुजावर आडोसा केलेला होता. सचिन जोशी यांचे अनुमान असे की तो लाकडाचा असल्यामुळे कधीच नष्ट झाला. त्याच्या खोबणी आपल्याला आजही कुठेकुठे किल्ल्यांवर सापडतात.

bur1

या भागात आपल्याला किल्याला सुरुंग उंडवल्यामुळे पडलेले खिंडार दिसते.

औरंगझेबाच्या दरबारात रोज घडलेली हकीगत फारसीत लिहून ठेवली जात असे . जयपूर इथे त्या हकीगतीतले काही सारांश मिळाले आहेत. ते लंडन आणि बिकानेर इथे सध्या आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळात त्याची कॉपी आहे. त्यांना 'अखबारात-ए-दरबार-ए-मुअल्ला' म्हणजे 'श्रेष्ठ दरबारची बातमीपत्रे' असे म्हणतात. दिनांक १४ एप्रिल १७०० या दिवसाखाली आपल्याला खालील नोंद अखबारात सापडते.

(मी श्री. सेतुमाधवराव पगडी यांनी 'मोगल दरबारची बातमीपत्रे खंड १' यात दिलेले मराठी भाषांतर वापरलेले आहे)
काल बादशहा शेख हिदायतकेश याला म्हणाले, "तुम्ही तरबियतखानाला आज रात्री सुरुंग उडविण्यासाठी हुकुम लिहा." त्याप्रमाणे तरबियतखानाला हुकुम पाठविण्यात आला. बादशहांनी मुखलिसखान, हमीदुद्दीनखानबहादुर, सियादतखान वगैरेंना पुढीलप्रमाणे आज्ञा केली - रात्रीचा एक प्रहर राहिला असता तुम्ही स्वतःची पथके घेऊन हल्ला करण्यासाठी म्हणून तरबियतखानाच्या मोर्च्यात जा.

दिवसाच्या चार घटिका झाल्या असता बादशहांना कळविण्यात आले ते असे : आज्ञेप्रमाणे तरबियतखान याने दोन्ही सुरुंग उडविले. किल्ल्याची भिंत किल्ल्याच्या आत पडली. पण बुरुजाचा वरील भाग, वीस दरआ (?) लांबी रुंदीचा उडून दमदुम्यावर पडला. पुढील माणसे ठार झाली :-- खास चौकीची माणसे, मरहूम दिलावरखानाची मुले सखीखान, बुदीखान, असदुद्दीन, मरहूम लोधीखान याचा मुलगा अहमद, मुहंमद जमान वगैरे काकड जमातीचे लोक, सटवाजी डफळे याचा मुलगा बुदीखान, हजारी पथकातील माणसे, बंदुकची, दक्षिण सुभ्यातील तैनात सैनिक. अशी एकंदरीत जवळजवळ एक हजार माणसे दगडांच्या उडण्यामुळे त्या माराने मारली गेली आहेत. गनीम (मराठे) हे बुरुजाच्या पलीकडच्या बाजूला ठाण मांडून उभे असून बाण आणि बंदुकी यांचा मारा करीत आहेत. मुखलिसखान, तरबियतखान, हमीदुद्दीनखानबहादुर, मतलबखान वगैरे सरदार हे लढत आहेत (हमला मी नुमायद, हल्ला करीत आहेत). पण वरून बाण व बंदुकी यांचा इतका वर्षाव होत आहे की त्यांना पुढे सरकण्यास वाट सापडत नाही.

अर्थातच औरंगझेबाच्या स्वतःच्या अखबारात त्याला कमीपणा येईल अशी गोष्ट सापडत नाही, किंवा ती अगदी सौम्य पद्धतीने लिहिली जाई, कारण बादशाह अखबार स्वतः पाहून त्याला मंजुरी देत असे. हे अखबार बऱ्याच महत्वपूर्ण आणि तपशीलवार माहितीने भरलेले आहेत (त्यांच्याविषयी पुन्हा केंव्हातरी एका वेगळ्या लेखात लिहीन) आपल्याला साताऱ्याच्या प्रसंगाचे साग्रसंगीत विवरण साकी मुस्तेदखान या समकालीन इतिहासकाराने आपल्या 'मासिर-ए-अलामगिरी' या ग्रंथात लिहून ठेवलेले सापडते.

(हा उताराही सेतुमाधवराव पगडी यांच्या खंड १ मधून)
"काही वेळाने किल्ल्यातील मराठे त्या जागी आले. आणि बंदुकी झाडून गोळ्यांचा वर्षाव करू लागले. मोगलांचा दमदुमा मोडून पडला होता. त्यांच्या तोफा ठिकठिकाणी पडल्या होत्या. मोगल सैनिकांनी लढण्याचे सोडून दिले होते. मराठ्यांशी लढू शकेल असा तेथे कोण होता? मोर्चे येथून तेथपर्यंत लाकडाचे होते. बहेलियांनी रात्रीच्या वेळी कुणाला न कळत मोर्च्यांना आगी लावल्या. ही आग सात रात्री सात दिवस सारखी जळत होती. त्या भयंकर आगीला विझवू शकेल इतके पाणी तेथे कोठून मिळणार? ढिगाऱ्यात सापडलेले सगळे हिंदू आणि ज्यांना काढण्यास अवधी मिळाला नाही असे काही मुसलमान हे सगळे जळून खाक झाले. धन्य आहे या विश्वरूप अग्निकुंडाची."

map

सातारा जिल्हा गॅझेटीअरमध्ये आपल्याला सैन्याची रचना आणि सुरुंग लावलेली अंदाजे जागा सापडते. ही माहिती मी वरील नकाशात दाखवली आहे. आजही सातारा जिल्ह्यात अजिंक्यताऱ्याच्या दक्षिणेस आपल्याला नदीकाठी शहापूर हे खेडे सापडते. १७०० साली शाहजादा आझम याचा मुक्काम इथे होता. स्वतः औरंगझेब उत्तरेस 'कारंजा' इथे छावणी करून होता.

यानंतरची हकीगत आपल्याला अखबार आणि मराठी पत्रे (परशुरामपंत प्रतिनिधी यांनी चांदजी पाटणकर याना पाठवलेले पत्र - रेकॉर्डस् ऑफ शिवाजी पिरियड) यातून समजते. शाहजादा आझम याने साताऱ्याचा किल्लेदार सुभानजी याच्याबरोबर वाटाघाटी केल्या. मराठ्यांना बादशाहच्या नकळत एक मोठी रक्कम देणे कबुल केले आणि किल्ल्यातील सर्वाना सुरक्षित बाहेर जाऊ देण्याची हमी दिली. त्यानुसार मराठ्यांनी किल्ला रिकामा केला. बादशाहने मात्र शाहजादा आझम याने किल्ला 'घेतला' याचा आनंद मानून सातारा किल्ल्याचे नाव 'आझम तारा' असे ठेवले. आझम या फारसी शब्दाचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ (Greater; greatest. Grand.). किल्ला मोगलांना फार काळ लाभला नाही. मराठ्यांनी तो लगेच पुन्हा ताब्यात घेतला. आझमताऱ्याचा आज अजिंक्यतारा असा (अपभ्रंश?) आपल्याला झालेला दिसतो.

सातारा वेढ्याच्या चार महिन्यांच्या काळात सेनापती धनाजी जाधव यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. बादशहाला झुल्फिकारखानाची नेमणूक धनाजीच्या पाठलागावर करावी लागली. त्यांच्या या पाच महिन्यात सहा लढायांची अखबारात नोंद आहे. पंधरा हजार सैन्यानिशी कऱ्हाड इथे, मग हमिद्दुदीनखान याच्याशी लढाई, मग रहिमतपूरजवळ झुल्फिकारखानाबरोबर झुंज, खानापूर ठाण्यावर हल्ला, मग परांडा तालुक्यात उंदरगाव इथे खजिन्यावर हल्ला आणि गुलबर्गा जिल्ह्यात फिरोझाबाद इथे पुन्हा झुल्फिकारखानाबरोबर अशी चौफेर धनाजी जाधवांनी दिलेल्या लढायांची यादी फक्त सातारा वेढ्याच्या जेमतेम ४ महिन्यांच्या काळात आपल्याला सापडते.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

एस's picture

19 Feb 2018 - 12:13 pm | एस

फारच रोचक आहे. ह्या माहितीसाठी तुम्ही घेतलेल्या कष्टांना सलाम!

सविस्तर लेखनासाठी धन्यवाद, खुप सखोल अभ्यास आहे आपला. असेच लिहीते रहा.

बापू नारू's picture

19 Feb 2018 - 1:23 pm | बापू नारू

छान माहिती दिलीत ,धन्यवाद !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Feb 2018 - 1:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून एक माहितीपूर्ण आणि रोचक लेख. तुम्ही असेच लिहित रहा, आम्ही वाचत राहू... कंटाळा येण्याची शक्यता शून्याहूनही कमी आहे !

पद्मावति's picture

19 Feb 2018 - 3:14 pm | पद्मावति

तुमचे लेख नेहमीच अतिशय माहितीपूर्ण आणि उत्तम असतात. हा लेखही अपवाद नाहीच. सुंदर लेखन.

दुर्गविहारी's picture

19 Feb 2018 - 7:16 pm | दुर्गविहारी

खुपच उत्तम धागा ! माझ्या माहितीप्रमाणे अंजिक्यतार्‍याचे किल्लेदार प्रयागजी प्रभु होते. आणि सुरुंग ज्या बुरुजाखाली पेरला होता तो "मंगळाईचा बुरुज"

आनंदयात्री's picture

19 Feb 2018 - 8:22 pm | आनंदयात्री

अतिशय रोचक! म्हणजे नेमके झाले काय? मोगल सैन्याने नियोजन वाईट होते, त्यांनी फार सारासार विचार न करता सावधगिरी ना बाळगता, सैन्यतळ सुरक्षित ठिकाणी न पाठवता सुरुंग लावल्याने स्वतःचेच मोठे नुकसान करून घेतले. मराठ्यांनीहि किल्ल्याचा पडलेला भाग लावून धरला आणि मोगलांना काही आत शिरताच आले नाही. पण किल्ला कोणत्याची प्रकारे घ्यायचाच असल्याने आझमीने पैसे देऊन किल्ला रिकामा करून घेतला. असे?
आणि दमदुमा म्हणजे छावणी का?

त्या काळी तोफांची मारा करण्याची रेंज फार नसे. म्हणून तोफा डोंगरावर भिंतीच्या जितके जवळ जात येईल तितक्या नेत. पण तोफा जवळ आल्या की किल्ल्यावरून बंदुका आणि वरच्या तोफांच्या माऱ्यात येत. म्हणूनआक्रमण करणाऱ्या सैन्यास आणि तोफांच्या गोलंदाजास संरक्षण म्हणून लाकडी भिंत / मनोरा टाईप तात्पुरता लाकडी आडोसा बांधत. त्याला दमदमा असं म्हणतात.

तरबियतखानाने दोन सुरुंग उडवले. पहिला बरोबर उडाला आणि भिंत आत पडली. दुसरा चुकला आणि भिंत बाहेर जमलेल्या सैन्यावर आणि दमदम्यावर पडली. दारूच्या मोठ्या सुरुंगाचा स्फोट कसा होईल ते सांगणे अवघड असते आणि ते शास्त्र त्यावेळी प्रगत नव्हते. हा हल्ला पहाटे अंधारात झाला आणि भिंत चुकीची पडली त्यामुळे बादशहाची अचानक हल्ल्याची कल्पना बाजूला राहून आक्रमक सैन्यातच गोंधळ उडाला.

मराठ्यांची नेहमीची पद्धत हीच होती - शक्य तेवढा वेढा लांबवायचा, मग पैसे घेऊन किल्ला द्यायचा. पावसाळा संपला की किल्ला कुठे जातो आहे - परत ताब्यात घ्यायचा.

आनंदयात्री's picture

19 Feb 2018 - 9:56 pm | आनंदयात्री

ओके. आले लक्षात. अजून एक प्रश्न, इथे सुरुंग म्हणजे पेरायचे सुरुंग का? तुम्ही उडवले म्हणताय, उडतो तर तोफगोळा ना? का तोफेने सुरुंग उडवायचे? (अर्थात म्हणजे काय करायचे हे लक्षात आलेले नाहीच)

खडकात भोक पडून एक मोकळी पोकळी तयार करायची, त्यात तोफा अथवा बंदुकीची दारू ठासून भरायची. त्याला वात लावून वात पेटवायची. दारूच्या धुरास इतर कुठे जायला जागाच नसल्याने तो खडक फोडून बाहेर पडतो. अगदी आजही दगडाच्या खाणीत सुरुंग लावतात. तोफगोळा वेगळा , फटाके उडवतात तसाच सुरुंग उडवला असा शब्द प्रयोग मी केला आहे.

आनंदयात्री's picture

19 Feb 2018 - 10:36 pm | आनंदयात्री

आले लक्षात. धन्यवाद.

प्रमोद देर्देकर's picture

19 Feb 2018 - 8:38 pm | प्रमोद देर्देकर

लेखन माहितीपूर्ण आहे.

एक कुतुहल :- तुम्ही ऐसी अक्षरे वरील मनोबा आहात का?

नाही हो, ऐसी वर माझे नाहीये अकाउंट.

अत्युत्तम लेखन. प्रचंड आवडले.

OBAMA80's picture

20 Feb 2018 - 11:21 am | OBAMA80

धन्यवाद. माहितीपूर्ण आणि रोचक लेख.
एक छोटी शंका- दमदमा की धमधमा? धमधमा म्हणजे प्रतिगुल्म (तोफा चढविण्याचा उंचवटा). उग्राखेडी, सुवरखेडी या पानिपतामधील गावांच्या आसपास भाऊंनी तोफांसाठी असे धमधमे उभे केल्याचे वाचले होते. तसेच, दिलेरखानाने पुरंदर जिंकण्यासाठी लाकडी धमधमे (बुरुज) उभे करून वज्रगडावर तोफांचा मारा केला होता.

मनो's picture

20 Feb 2018 - 8:41 pm | मनो

दमदमा == धमधमा

हा फारसी शब्द आहे. A raised battery असा अर्थ इथे दिला आहे.

https://archive.org/details/dictionaryinper00ramduoft

माहितगार's picture

20 Feb 2018 - 11:38 am | माहितगार

अभिनंदनीय लेख. वृत्ती संशोधकीय असल्यास म्युझीयम मधल्या ऐतिहासिक चित्राचा असाही अभ्यास करता येतो हे दाखवून दिलेत.

विकिपीडिया वरील माहिती नुसार छ. राजाराम महाराजांचा मृत्यू ३ मार्च १७०० सिंहगडा वरचा आहे . पण त्या आधी काही महिने पासून औरंगजेबाचे लक्ष सातार्‍याच्या किल्ल्या कडे दिसते. काही किरकोळ प्रश्न , औरंगजेबाला सातार्‍याच्या किल्लयाचे महत्व त्या वेळी का वाटले असावे की त्याच्यासाठी त्यावेळी तो इतर किल्यांप्रमाणे एक किल्ला होता ?

दुसरे राणी ताराबाईंच्या बद्दलच्या ईंग्रजी विकिपीडिया लेखात त्यांचे म्हणून खालील चित्र वापरलेले दिसते.

Queen Tarabai ?

विकिमिडीया कॉमन्सवर या चित्राबद्दल अल्प महिती दिसते.

चित्रातील स्त्रीने नऊवारी लुगडे परिधान केलेले नसल्यामुळे ते चित्र कितपत प्रातिनिधीक आहे या बद्दल साशंकता व्यक्त केली गेल्याचे आठवते. या विषयी धागा लेखक किंवा इतर जाणकार काही सांगू शकतील का ?

हे चित्र कुणीतरी व्ही आर रघु या लेखकाच्या 'द ग्रेट मराठाज' या पुस्तकातून घेतले अशी नोंद तिथे आहे. मी या लेखकाचे अथवा पुस्तकाचे नावही कधी ऐकलेले नाही. मला इंटरनेटवर या पुस्तकाबद्दल काहीही सापडले नाही. त्यामुळे अजून या चित्रविषयी नवीन काही कळेपर्यंत चित्राला संशयास्पद मानणे भाग आहे.

पैसा's picture

20 Feb 2018 - 12:40 pm | पैसा

औरंगझेबाची मराठ्यांनी थट्टा मांडली होती पैसे आणि किल्ले दोन्ही ताब्यात घेऊन! एवढा धूर्त औरंगझेब पण मराठे त्याला पुरे पडले!

आज इतक्या वर्षानंतर आपल्याला गोष्टी सरळ वाटतात पण त्या काळी वस्तुस्थिती फार गुंतागुंतीची होती. साधारण कल्पना अशीच होईल की औरंगझेबाकडे लाखो सैन्य आणि मराठे त्यामानाने संख्येने कमी होते. पण खरे पाहता मराठ्यांची सैन्ये पाठलाग करणाऱ्या मोगल सैन्यापेक्षा बऱ्याचदा संख्येने जास्त असत. कारण मोगल सैन्य पार औरंगाबादपासून ते थेट जिंजीपर्यंत विभागले गेले होते. झुल्पिकारखानकडे, शहाजादा बेदरबख्त, कामबक्ष यांच्याकडे स्वतंत्र सैन्ये होती. औरंगझेबाच्या छावणीत राज्यकारभाराचे काम चाले, ती एक चालती राजधानीच होती, त्यामुळे त्यात बिनलढाऊ कित्येक हजार लोक होते. या लोकांना रसद, पैसे हे नेहेमी बाहेरून आणावे लागत. मराठे हे अशीच एक रसद आणणारी तुकडी हेरून मोठ्या संख्येने घेरून त्यांना लुटत. त्यात मराठ्यांची हानी अत्यल्प होई, आणि फायदाही खूप असे.

मोगल दरबारची बातमीपत्रे खंड ३ मधून -

बादशहाच्या पुण्याच्या मुक्कामात मोगल छावणीत रसदेची टंचाई सतत जाणवत होती. इ.स. १७०३ मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. मोगल छावणीतील दुर्दशेचे चित्र त्यावेळी तेथे हजर असलेल्या मंडळींनी रेखाटले आहे. बादशहाच्या छावणीत असलेला त्यांचा चिटणीस साकी मुस्तैदखान हा लिहितो- “बादशहा पुण्यात सहा महिने आणि अठरा दिवस होता. अवर्षणामुळे धान्याचा दुष्काळ पडला. अनेक गरीब लोक त्यामुळे मृत्यूमुखी पडले. अनेक दुबळी माणसे शोक करू लागली. चणे, गहू, आणि तांदूळ फार कष्टाने मिळत. बादशाही लष्करातील धान्याचा बाजार (शहागंज) तर गरीबांच्या आक्रोशांनी भरून गेला होता. पण एक वेळ काळ आपला बेत बदलेल पण बादशहा आपल्या निर्धारापासून हटणार नाहीत.

भीमसेन सक्सेना लिहितो:--“कोंडाणा जिंकून घेतल्यानंतर बादशहाने पुण्यात छावणी केली. (१ मे १७०३) मराठ्यांच्या धामधुमीमुळे बादशाही छावणीत धान्य आणि इतर रसदही येईनाशी झाली. धान्याची महर्गता भयंकर झाली. रूपयाला तीन शेर या भावाने धान्य विकू लागले. दख्खनच्या मुलखात त्या वर्षी पाऊस असा झाला नाही. त्यामुळे पिके आली नाहीत. महर्गता इतकी भयंकर झाली की, लोक आपली घरे-दारे सोडून परागंदा झाले. नर्मदेच्या दक्षिणेस रूपयाला सहा शेरापेक्षा जास्त असे धान्य कोठेच
मिळेनासे झाले.”

हे असे का घडले असावे याचे विवेचन करताना भीमसेन सक्सेना हा मराठ्यांचे वाढते आक्रमण, औरंगजेबाची प्रवृत्ती आणि राजनिती याचे थोडक्यात पण मार्मिक विवेचन करतो. त्या काळाचा तो साक्षीदार असल्यामुळे त्याचे विवेचन मोठे उद्बोधक आहे, तो म्हणतो--" बादशहा प्रजाहिततत्पर असला की राज्य समृद्ध आणि प्रजा आरामात असते. बादशहाच्या हुकूमाचा सर्व सर्व लहान-थोरांना वचक असतो. बादशहाचे अधिकारीही व्यवस्थितपणे वागू लागतात. हे प्राचीन ग्रंथाच्या अवलोकनाने दिसून येईल. पण आता सध्याच्या युगात कुणाची नियत चांगली असल्याचे दिसून येत नाही. बादशहाच्या डोक्यात किल्ले जिंकून घेण्याचे वेड शिरले आहे. प्रजाहिताची कामे करणे त्याने आजिबात टाकून दिले आहे. बादशहाचे वजीर आणि अमीर हे योग्य सल्ला देईनासे झाले आहेत. यामुळे देशाची स्थिती भयंकर झाली आहे. देशाची विलक्षण अशी दुर्दशा झाली आहे. मराठ्यांचा जोर सर्वत्र वाढला आहे, त्यांची आक्रमणे वाढली आहेत, त्यांना अडविण्याचे काम कुणाच्याने होत नाही. लोक चांगला मार्ग सोडून वागू लागले आहेत. म्हणून परमेश्वराची त्यांच्यावरील कृपा नाहीशी झाली आहे."

रायभान भोसले (तंजावरचे राजे व्यंकोजी यांचा मुलगा) याना मध्यस्त म्हणून वापरून शाहूराजांकरवी मराठ्यांशी तह करण्याचा प्रयत्नही मोगलानी केला.

“या सुमारास बातमी पसरली की, बादशहाला काहीनी सल्ला दिला असून शहाजादा कामबक्ष याच्या मध्यस्थीने मराठ्यांच्याबरोबर तडजोड होण्याचे घाटत आहे. शहजादा कामबक्ष याने विनंती केल्यावरून बादशहाला भीड पडली. त्याने शाहूला आपल्या गुलालबार येथील निवासस्थानातून काढून शाहजाद्याच्या हवाली केले. शहाजादा कामबक्ष यांनी आपली माणसे एकाहून अधीक वेळा धनाजी जाधवकडे पाठविली. पण मोगलांनी मराठ्यांना थोडेच जिंकून घेतले होते. दख्खनचा तमाम सुभा काही कष्ट न करता शिर्र्याचा गोळा घशात घालण्यास मिळावा, तसा ताब्यात गेला होता. ते काय म्हणून तहाला प्रवृत्त होतील? रायभान नावाचा एक मराठा होता. तो आपल्याला शिवाजीच्या भाऊबंदापैकी म्हणवीत असे, त्याच्या मध्यस्थीने तडजोडीची बोलणी चालू होती. त्याच्याकडून हे काम होईल असे वाटत होते. तो बादशहाला येऊन भेटला. त्याला
बादशहाने सहा हजारी मनसबदार बनविले. बादशहाने मराठ्यांच्याकडे पाठवलेली माणसे निराश होऊन परत फिरली. राजा शाहू यास गुलालबारेत परत नजरकैदेत ठेवण्यात आले."

खटपट्या's picture

20 Feb 2018 - 11:04 pm | खटपट्या

रोचक माहीती. निनाद बेडेकरांच्या एका व्याख्यानात ऐकले होते की मराठे पैसे घेउन किल्ला ताब्यात देत असत. आणि नन्तर परत जिंकून घेत असत...:)

मोगल दरबारची बातमीपत्रे खंड ३ मध्ये सिंहगडाच्या बाबतीत अजून एक उदाहरण आहे.

सिंहगडाबद्दल मोगल इतिहासकार साकी मुस्तैदखान याने फार त्रोटक उल्लेख केला आहे. तो मोगलांच्या ताब्यात कसा आला याबद्दल तो बोलत नाही. तो इतकेच म्हणतो की “वास्तविक पाहता तो किल्ला (सिंहगड) इतका मजबूत आहे की परमेश्वरानेच तो मिळवून द्यावा, नाही तर, कितीही प्रयत्न करा तो सर होणे शक्‍यच नाही.” भीमसेन सक्सेना हाही त्याकाळी सिंहगडाच्या जवळपासच होता. तो अधिक मोकळेपणाने लिहितो. तो म्हणतो: “तरबियतखानाने किल्ल्यातील लोकांशी बोलणे लावले आणि त्यांना
भक्कम रक्कम चारून किल्ला ताब्यात घेतला." सिंहगडावरील पाण्याची टंचाई, रोगराई, आणि अन्न धान्याचे दुर्मिक्ष इत्यादी कारणांनी मराठ्यांनी किल्ला सोडून द्यावयाचे ठरविले असे दिसते, तरी किल्ला इतक्या लवकर का सोडला, पावसाळा येईपर्यंततरी लढवायचा होता. असा ठपका ताराबाईने किल्ल्याच्या शिबंदीवर ठेवला. आपल्या पत्रात ताराबाई म्हणतात--“सिंहगडास औरंगजेब बिलगला होता. त्यास नतिजा पावावया निमित्त स्वामीने तुम्हास किल्ला मजकुरी ठेविले होते. उतावळी करून हिंमत सोडून, तहरह करून किल्ल्यावरून उतरून राजगडास आलेस म्हणोन हे वर्तमान धोंडोजी चव्हाण दिंमत लबे यांनी हुजूर विदित केले. त्यास स्वामीने तुमचे मदतीस लोक पाठवले. ऐवज दास पाठविण्यास काही न्यून केले नसता उताविळी करून हिंमत सोडून ही गोष्ट केली, हे काही बरे केले नाही, पर्जन्य पडेपर्यंत (किल्ला) भांडवावयाचा होता, ती गोष्ट न केली.”

यावेळी जरी मराठ्यांना सिंहगड सोडावा लागला तरी मराठ्यांनी तो १७०५ मध्ये जिंकून घेतला. मोगलांनी शाहूराजांना पुढे करून इ.स.१७०६ मध्ये परत घेतला. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे १७०७ मध्ये मराठ्यांनी तो कायमचा परत मिळविला. महाराष्ट्रात सिंहगडासाठी इतके अटीतटीचे संघर्ष झाले तितके इतर कोणत्याही किल्याबद्दल झाले नाहीत.

सिंहगडच्या वेढ्याच्या काळातला एक महत्वाचा प्रसंग (त्या काळाबद्द्दल लिहितो आहे म्हणून) सेतुमाधवराव पगडी यांच्याच शब्दात.
----

९ मे १७०३ या तारखेची नोंद पुढीलप्रमाणे आहे: बादशहाने हमीदोद्दीनखान यास म्हटले, “तुम्ही शाहुकडे जा, त्याला म्हणावे--तू मुसलमान हो. त्याप्रमाणे हमीदोद्दीनखान शाहूकडे गेला. त्याने शाहूला बादशहाचा निरोप सांगितला. शाहूने त्या सूचनेला निर्धाराने नकार दिला परत येऊन हमीदोद्दीनखानाने शाहूचा नकार बादशहाला कळविला. हे ऐकून बादशहा इतकेच म्हणाला "शाहूवर कडक नजर ठेवा."

ही बातमी मोगल दरबाराच्या अखबारामध्ये सहजपणे नोंदली गेली आहे. पण महाराष्ट्राच्या इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय आश्चर्य आहे पहा. संभाजी राजांना ठारच मारावयाचे असा निर्णय औरंगजेबाने घेतला होता. तू धर्मांतर कर असे संभाजीला म्हणण्याचे औरंगजेबाला काहीच कारण नव्हते. तसे म्हटल्याचा पुरावाही नाही. असे असूनही, महाराष्ट्रात, या विषयी भल-भलत्या दंतकथा पसरल्या आहेत. या उलट शाहूला “तू मुसलमान हो असे औरंगजेबाने म्हटल्याचा लेखी पुरावा अखबारामध्ये मिळतो पण या गोष्टीचा महाराष्ट्राच्या इतिहासात उल्लेखही नाही. शाहूने धर्मांतराला नकार दिल्यामुळे महाराष्ट्रातील केवढे तरी मोठे संकट टळले. शाहूला असा ठाम निर्णय घेण्याची शक्‍ती कोठून आली असावी? त्याचा विचार करता आपले लक्ष येसूबाईकडे जाते. मोगलांच्या छावणीतील सगळे वातावरण आणि संस्कार हे मुसलमानी धर्माला पोषक होते. बादशहाच्या साच्निध्यांत, निर्बंधात राहात असतांना शाहूच्या संस्कारक्षम वयात त्याच्या मनावर धर्मांतराला अनुकूल असे परिणाम होणे काही अशक्य नव्हते. पण असे घडले नाही. याला मोठे कारण म्हणजे शाहूवर येसूबाईचीं सतत नजर हेच होय. सतत १८ वर्षेपर्यंत शाहू हा मुगलांच्या निर्बंधात होता. या काळात त्याची आई येसूबाई ही त्याच्या मागे सतत सावली सारखी वावरत होती. शाहूचे धर्मरक्षण येसूबाईने महाराष्ट्राच्या या जगदंबेने केले असेच म्हणावे लागेल.

कपिलमुनी's picture

21 Feb 2018 - 5:00 pm | कपिलमुनी

तू धर्मांतर कर असे संभाजीला म्हणण्याचे औरंगजेबाला काहीच कारण नव्हते. तसे म्हटल्याचा पुरावाही नाही. असे असूनही, महाराष्ट्रात, या विषयी भल-भलत्या दंतकथा पसरल्या आहेत

" संभाजी महाराजांस धर्मांतराचा आग्रह केल्याचा पुरावा नाही " या बद्दल अधिक माहिती मिळेल काय ??

समकालीन कागदात धर्मांतर करण्याबद्दल काहीही नोंद नाही.

पैसा's picture

21 Feb 2018 - 8:27 pm | पैसा

शाहूला धर्मांतराचे सांगितल्याची माहिती फार कुठे वाचनात आली नव्हती. येसूबाई यांचे बरेच आयुष्य कैदेत गेल्यामुळे असेल किंवा कसे त्यांच्याबद्दल फार माहिती मिळत नाही. मात्र राजारामला जिंजिकडे रवाना करणे, शाहूला धर्मांतराचा आग्रह अशा वेळी त्यांनी खूप धैर्य दाखवले. शिवाजी महाराजांच्या दोन्ही सूना कर्तबगार निघाल्या.

manguu@mail.com's picture

21 Feb 2018 - 4:26 pm | manguu@mail.com

छान

बिटाकाका's picture

21 Feb 2018 - 6:10 pm | बिटाकाका

_/\_ _/\_. मनःपूर्वक आभार! खूपच सुंदर लिखाण!

अरविंद कोल्हटकर's picture

23 Feb 2018 - 11:15 am | अरविंद कोल्हटकर

माझे संपूर्ण शालेय आयुष्य सातारा किल्ल्याच्या छायेत सातारा गावामध्ये गेले आणि त्यामुळे सातार्‍याच्या किल्ल्याचा हा वृत्तान्त फार आवडला. मी स्वतः किल्ल्यावर काही डझन वेळा गेलो असेन. विशेषतः नवरात्रामध्ये किल्ल्यावरील मंगळाई देवीचा उत्सव असे तेव्हा सातार्‍यातील लोक, शाळेतील विद्यार्थी सहलीने किल्ल्यावर जात. सातार्‍याची 'माची' ही पेठ किल्ल्याच्या पायथ्यावरच वसली आहे. पुष्कळ लोक सकाळी किल्ल्याच्या अर्ध्या वाटेवरील मारुतीपर्यंत फेरफटका करून येत असत, जसे सातार्‍याच्या उत्तर सीमेवर राहणारे आमच्यासारखे लोक सकाळी भैरोबाच्या डोंगरावर जात असत, ज्याचा उल्लेख वरच्या एका नकाशात दिसला.

मात्र त्या काळातहि किल्ल्यावर काहीच उरलेले नव्हते, एका वाड्याचा चौथरा होता जो जुना सरकारवाडा असे सांगितले जाई. चांदबिबीला येथे किल्ल्यावर कैदेत ठेवले होते असे बरेच ऐकले जाई आणि एक सुस्थितीत असलेली आणि चार भिंतींमध्ये बंदिस्त अशी एक खोली तिचा तुरुंग म्हणून दाखविली जाई. अलीकडच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील बरेच बोअर युद्धातील कैदी हिंदुस्तानात आणून बंदीत ठेवलेले होते आणि त्यातील काही ह्या किल्ल्यावरहि होते. त्यांच्या वास्तव्याचा पुरावा म्हणून की काय हिरव्या बीअर बाटल्यांचे जाड तळ इकडेतिकडे पडलेले मी स्वतः पाहिलेले आहेत.

किल्ल्याच्या दोन दरवाज्यांपैकी पश्चिमेकडील मुख्य दरवाजा अजूनहि वापरात आहे. दक्षिणदरवाजा मात्र तेव्हाहि संपूर्ण प्डझड झालेला होता.

अलीकडे सुमारे ३० वर्षांमध्ये माझे सातार्‍यास जाणे झालेले नाही. सध्या किल्ल्याला जायला जीपयोग्य रस्ता असून वर पोलिसांचे बिनतारी केन्द्र, टीवीचा टॉवर असे कायकाय आहे असे ऐकून आहे.

ह्या किल्ल्याचे सध्याचे सर्रास वापरातले नाव 'अजिंक्यतारा' हे नामकरण अगदी अलीकडचे, 'आम्हीहि कोणी होतो' ह्याचे द्योतक आहे असे वाटते. आमच्या लहानपणी हे नाव कोणीच ऐकले नव्हते. आम्ही किल्ल्याला 'अजिमतारा' म्हणत असू. आणि सर्व जुन्या पुस्तकात, ब्रिटिशकालीन १८८५ च्या सातारा जिल्ह्याच्या गझेटीअरमध्ये त्याचे नाव सर्वत्र 'सातार्‍याचा किल्ला' असे सापडते. औरंगजेबाने १७०० साली हा - आणि जवळचाच परळीचा - असे दोन किल्ले जिंकले. सातार्‍याची मोहीम त्याचा मुलगा मुअज्जम चालवत होता आणि त्याचे नाव किल्लयास दिले गेले. त्यापूर्वी त्याला कोणतेच नाव नव्हते, तो केवळ सातारचा किल्ला म्हणून ओळखला जात असे.

सध्या सार्वत्रिकरीत्या त्याला 'अजिंक्यतारा' असे स्फूर्तिपूर्ण नाव मिळाले असून असल्या-नसल्या परंपरेचा जयजयकार करण्याच्या चालू दिवसात किल्याच्या जुब्या नावाचे सत्य अप्रिय ठरत आहे. आता किल्ल्यावर 'अजिंक्यतारा' अशी निऑनमध्ये मोठी हॉलिवुडी पाटी लागली असून ती गावभरून दिसते. तेव्हा नामकरण आता पूर्ण झाले आहे असे मानावे!

अरविंद कोल्हटकर's picture

25 Feb 2018 - 10:14 am | अरविंद कोल्हटकर

कर्मधर्मसंयोगाने पुढील सातारा किल्ल्याच्या फेरफटक्याचा विडीओ दिसला:
https://www.youtube.com/watch?v=cZPJpoImHRo

रमेश आठवले's picture

26 Feb 2018 - 3:47 am | रमेश आठवले

किल्ल्याचा व्हिडीओ छान आहे. .

मराठी कथालेखक's picture

26 Feb 2018 - 11:22 am | मराठी कथालेखक

चांगला लेख , सोबतच तुम्ही तत्कालीन राजकीय परिस्थितीचे अधिक विश्लेषण करुन सांगावे ही विनंती.
सध्यातरी माझे इतिहास वाचन मिपापुरते मर्यादित आहे. त्यामुळे घटना समजतात पण सामाजिक वा राजकीय परिस्थितीचा नीट बोध होत नाही.
औरंगजेबाच्या दक्षिणेतल्या जवळपास सर्व मोहिमा मिर्झाराजे जयसिंग यांच्या मोहीमेचा अपवाद वगळता (त्याही मोहीमेत कुणी मोगल सरदार होताच ...दौलतखान नाव होते का ?) शाही फौजाच लढत होत्या असे दिसते. खरंतर जयसिंगच्या मोहीमेला मोठे यश लाभले होते असे दिसते. याउलट शाहिस्तेखान वगैरेच्या मोहिमा मोगलांची नाचक्की करणार्‍या ठरल्या. असे असूनही औरंगजेबाने पुन्हा राजस्थानाकडील मांडलिक राजांना दक्षिणेकडे पाठवलेले दिसत नाही. हे त्याच्या संशयी स्वभावामुळे की इतर काही राजकीय परिस्थिती कारणीभूत होती ?

कपिलमुनी's picture

26 Feb 2018 - 12:49 pm | कपिलमुनी

राजपूत + मराठे युतीची भिती आउरंगझेबाच्या मनात होती, त्यामुळे मिर्झाराजेंच्या वे़ळेस दिलेर्खान सोबत होता

मराठी कथालेखक's picture

26 Feb 2018 - 12:53 pm | मराठी कथालेखक

शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेंचे मन वळविण्याचा बराच प्रयत्न केला होता असे वाचून आहे.
इतर राजपूत राजांच्या बाबतीत शिवरायांनी असा काही प्रयत्न केला का ? राजपूत राजांचा मराठी राज्याकडे बघण्याचा दृष्टीकोन साधारण काय होता ?

फार मोठा विषय आहे हा, तरी थोडक्यात सांगतो.

राजस्थानमध्ये बिकानेर इथे राजस्थान स्टेट अर्काइव्ज नावाचा शासकीय दप्तरखाना आहे. तिथे जयपूर, जोधपूर आणि इतरही राज्यांच्या दप्तरातून जे काही वाचले ते इथे जतन करून ठेवले आहे. त्यांनी 'मुघल फर्मानो के प्रकाश मे भारत एवं राजपूत शासक' असे तीन भाग प्रसिद्ध केले आहेत. प्रत्येक भागात मूळ फारसी फर्मान, त्याचे हिंदी वाचन आणि अनुवाद असे दिलेले आहेत.

मला अमेरिकेत बादशाह औरंगझेबाच्या हस्ताक्षरातले महाराजा जसवंतसिंग याला लिहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्धच्या मोहिमेचे फर्मान आढळले. त्याच बरोबर इतरही कागद सापडले. त्यावर भारत इतिहास संशोधक मंडळात मागच्या वर्षी मी एक व्याख्यानही दिले होते. (इथे त्याची माहिती टाकली होती)

बिकानेरचा दप्तरखाना
bikaner

या अस्सल आणि मूळ फर्माने आणि पत्रांवरून खालील गोष्टी कळतात.
- राजा मानसिंग हा आमेरचा राजपूत राजा. राणा प्रतापविरुद्ध तो मोगलांच्या बाजूने लढला. त्याचा नातू मिर्झा राजा जयसिंग. त्याने ३ बादशहाच्या पदरी नौकरी केली. जहांगीरच्या फर्मानात आपल्याला प्रथम जयसिंग याने आपले आजोबा मानसिंग यांच्याप्रमाणे एकनिष्ठ राहून सेवा करावी असा उल्लेख दिसतो. त्यानंतर शहाजहानच्या पदरी जयसिंग होता. १६५८ च्या सुमारास ज्या वेळी शहाजहानच्या आजारपणाचा फायदा घेऊन ३ शाहजादे बंड करून उठले त्या वेळी शहाजहानला मिर्झा राजा जयसिंग याच्यावर अवलंबून राहणे भाग पडले. (जसवंतसिंग यांच्यावरही शाहजहान अवलंबून होताच, ते खाली पाहू). जयसिंग आणि दारा शुकोहचा मुलगा सुलेमान शुकोह हे बंगालमधून चालून येणाऱ्या शुजाविरुद्ध चालून गेले. त्यांनी शुजाचा पराभवही केला. पण औरंगझेबाच्या जसवंतसिंगाविरुद्धच्या विजयामुळे पारडे फिरले, आणि जयसिंग धूर्तपणे कोणती बाजू जिंकते याची वाट पाहत स्वस्थ बसला. या काळात शाहजहाँची अनेक निकडीची पत्रे, तातडीचे हुकूम जयसिंगाला आले. पण त्याने त्यांची अंमलबजावणी केली नाही. औरंगज़ेबानेही लगेच जयसिंगास पत्रे पाठवली. शाहजहान कैद झाला हे पाहताच जयसिंग औरंगझेबास मिळाला. आपल्याबरोबर त्याने जसवंतसिंग याचीही रदबदली औरंगझेबाशी केली आणि बादशाहने जसवंतसिंग याला माफ केले. औरंगझेबासाठी जयसिंग याने दारा शुकोहचा पाठलाग केला आणि त्याला पकडून दरबारात हजर केले. अश्या प्रकारे योग्य राजकारण खेळून जयसिंग दरबारात ५,००० मनसबदार या मोठ्या पदावर चढला.

- त्याला स्वतः बादशहा स्वतःच्या हस्ताक्षरात पत्रे लिही (हा बहुमान समजला जाई). त्याचा मुलगा रामसिंग याला बादशाहने आपल्या जवळ ठेवले होते. जयसिंगाच्या मृत्यूनंतर परंपरेनुसार रामसिंगाचा मुलगा बादशाहजवळ पाठवण्याचे फर्मान या संग्रहात आहे. मराठ्यांविरुद्धच्या स्वारीत रामसिंगचा नातू सवाई जयसिंग (जयपूर शहराचा संस्थापक) हा बादशाही छावणीत होता. बादशहाशी अश्या प्रकारे जयसिंगच नव्हे तर पूर्ण घराण्याचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते.

- प्रसंगी शिवाजीशी दगाबाजी करून त्याला कैद करीन अथवा ठार मारीन असे जयसिंग म्हणतो, त्यामुळे त्याची निष्ठा मोगल दरबारशी होती हे उघड आहे. तो छत्रपती शिवाजी महाराजांना सामील होणार नव्हता. तसे करायचे असते तर त्याला आयुष्यात अश्या अनेक संधी पूर्वीही मिळाल्या होत्या.

- जसवंतसिंग हा चुकीच्या बाजूने म्हणजे धर्मावतच्या लढाईत औरंगझेबाविरुद्ध लढला. जसवंतसिंग याचा पराभव झाला. त्यावेळीही शहाजहानने जसवंतसिंग हा योग्य सेनानायक नव्हे, जयसिंगची वाट पहा असे दाराला सांगितले होते. पुढे सामूगढ इथे खुद्द दाराचा पराभव झाला. जयसिंगाच्या मध्यस्तीने जसवंतसिंगास माफी मिळाली आणि शुजाविरुद्ध त्याला पाठवले. पण तिथे त्याने औरंगझेबाविरुद्ध दुसऱ्यांदा दगाबाजी केली आणि तो शत्रूला सामील झाला. तो प्रयत्न फसला, आणि त्याला औरंगझेबाने दुसऱ्यांदा माफ केले. त्याला गुजरातच्या सुभेदारीवर पाठवण्यात आले. नंतर त्याची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध झाली आणि तो शाहिस्तेखानास जाऊन मिळाला.

- शहाजहान जिवंत असेपर्यंत औरंगझेब हा राजपूत अथवा हिंदूंशी कडकपणे वागू शकला नाही, कारण त्याची सत्ता काही अंशी राजपुतांवर अवलंबून होती. नंतर त्याने जोधपूरचे राज्य खालसा केले आणि दुर्गादास राठोड त्यासाठी औरंगझेबाविरुद्ध लढला. १६८० नंतर औरंगझेबाचं दरबारात राजपूत अथवा हिंदूंना कोणतीही मोठी पदे दिलेली दिसत नाहीत.

- पेशवेकाळात राजपूत हिंदू होते म्हणून मराठे त्यांच्याशी नरमाईने वागले असे दिसत नाही. याउलट शिंदे, होळकर यांनी वारंवार राजपुतान्यात हस्तक्षेप केले. बिजेसिंग आणि माधोसिंग यांच्या भांडणात जयाप्पा शिंदे यांचा दगाबाजी करून खून करण्यात आला.

त्यामुळे एकूणच प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहून सोयीस्कर भूमिका घेताना दिसतो. आपल्याला आज जरी राजपूत आणि मराठे एकत्र होऊन मोगलांविरुद्ध लढलेले हवे असले तरी त्यांनी त्या काळात तसे केलेले दिसत नाही.

१७०० सालातले एक उदाहरण. सेतूमाधवराव पगडी यांच्या मोगल दरबारची बातमीपत्रे यातून.

रजपुतांच्या बाबतीत औरंगजेबाला विशेष आस्था होती असे दिसत नाही. इतकेच नव्हे तर त्यांची मने राखण्याचा त्याने विशेष प्रयत्न केला असेहि दिसत नाही. उलट त्यांची मने दुखावली गेली तरी विशेष बिघडणार नाही असे त्याला वाटत असावे. या कालखंडातील पुढील उदाहरण फार बोलके आहे :--

माळव्यातील रजपूत सरदार गोपाळसिंग चंद्रावत याचे घराणे मोगलांच्या सेवेत गाजलेले. माळव्यातील रामपुरा येथे त्यांची जहागीर होती. महाराणा प्रताप याचा विश्वासू सरदार दुर्गासिंह याचे हे घराणे. गोपाळसिंहाचा बाप अमरसिंह हा साल्हेरच्या लढाईत मराठ्यांशी लढत असतांना इ. स. १६७२ मध्ये मारला गेला. गोपाळसिंग हा बेदारबख्ताच्या सैन्यात नोकरी बजावीत होता. त्याचा मोठा मुलगा रतनसिंग हा माळव्यात आपल्या बापाच्या जहागिरीचे काम बघत होता. तिकडून त्याने बापाकडे खर्चासाठी रक्कम पाठविणे बंद केले. गोपाळसिंगाची फार ओढाताण होऊ लागली. आपल्याला आपल्या जहागिरीवर जाऊन येण्याची परवानगी मिळावी अशी त्याने विनंती केली. ती नाकारण्यात आली. आपले म्हणणे मांडावे म्हणून गोपाळसिंग बादशाही छावणीत आला. बेदारबख्ताची परवानगी घेतल्याशिवाय का आला म्हणून बादशहा त्याच्यावर रागावला.

या सुमारास रतनसिंग हा माळव्याच्या सुभेदारापाशी गेला आणि मुसलमान झाला (नऊ एप्रिल १७००). औरंगजेबाने त्याला इस्लामखान ही पदवी देऊन त्याच्या बापाची जहागीर त्याच्या नावावर करून टाकली. ज्या घाईने रतनसिंग उर्फ इस्लामखानाचे कौतुक करण्यात आले ती पाहता औरंगाजेबाच्या मनोवृत्तीचा अंदाज येणे कठीण नाही. गोपाळसिंगाची स्थिति केविलवाणी झाली. आपली जहागीर परत घेण्यासाठी गोपाळसिंग उत्तरेकडे निघाला तर तो सापडेल तेथे त्याला पकडावे अगर ठार मारावे अशी आज्ञा औरंगजेबाने केली. पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर रतनसिंग हा आपल्या बापाशी लढत असताना ठार झाला. आणि गोपाळसिंगाने आपली जहागीर परत मिळविली.

गामा पैलवान's picture

27 Feb 2018 - 2:36 am | गामा पैलवान

मनो,

गोपाळसिंहाचा बाप अमरसिंह हा साल्हेरच्या लढाईत मराठ्यांशी लढत असतांना इ. स. १६७२ मध्ये मारला गेला.

एका जबरदस्त लढाईची आठवण जगवल्याबद्दल आभार. या लढाईत गनिमी कावा न वापरता मराठे सरळ गनिमांना भिडले होते. थेट लढाई अंगावर घ्यायची ही पहिलीच वेळ होती. या परीक्षेत मराठे उत्तम प्रकारे उत्तीर्ण झाले.

आ.न.,
-गा.पै.