समुद्राला ओहोटी लागली की समुद्रातील खडकाळ भाग दिसू लागतो. लांबून हे नुसते खडक दिसतात. जवळ जाऊन पाहिला की खडक नक्षीदार, काही उघड्या तर काही बंद कवचांनी भरलेले दिसतात. ह्या बंद कवचांमध्ये तयार होत असतात कालवं नावाचे पांढरे मांसल जीव. मांसाहारी लोकांसाठी कालव हा खाद्याचा प्रकार आहे. ह्या कालवांपासून विविध जेवणातील रुचकर पदार्थ बनवता येतात.
कालवं कवचातून आख्खी बाहेर काढण्याचीही एक कलाच आहे. कोयता, खरळ सारखे टोकदार हत्यार घेऊन त्याच्या टोकाने ते कवच पूर्ण निघेल असे बाजूने टोचून कवच काढून आख्खा कालव काढला जातो. समुद्राच्या जवळपासचे काही स्थानिक गावकरी आपल्या रोजी रोटी किंवा जेवणासाठी हत्यार घेऊन ठक ठक आवाज करत कालवं काढताना दिसतात. त्यांच्यासाठी बिनाभांडवल पण जोखीम आणि मेहनतीचा हा उद्योग आहे. भरती ओहोटीचे तर ही कालवे काढताना भान ठेवावेच लागते पण त्या बरोबर कालवाचे आवरण काढल्याने कवचे इतकी धारदार होतात की तिथे चुकून जरी पाय पडला तरी पाय रक्तबंबाळ होतो. चांगली बुटे व चप्पल घालूनच ही कालवे काढावी लागतात. त्यात कुठे चिकट झाले असेल तर पाय घसरण्याची शक्यता म्हणून पावलेही जपूनच टाकावी लागतात.
कालवाचे गोळे काढले की ते समुद्राचेच स्वच्छ भरलेल्या तांब्या किंवा एखाद्या खोल भांड्यात ठेवतात. मग हे त्या स्थानिक कष्ट्कर्यांचे एका वेळचे जेवण होते किंवा बाजारात विकून थोडी कमाई होते. कालवे बाजारात किंवा घरोघरी फिरून तांब्यावर विकली जातात. एक तांब्या ५० किंवा अजून वेगवेगळे दराने विकली जातात.
काही ठिकाणी कालवांच्या कवचांचे पुंजकेच बाजारात आणतात आणि गिर्हाईकांना त्यांच्यासमोर ताजी कालवे काढून देतात. कालवांमधेही छोटी-मोठी आकाराची कालवे असतात. ह्या कालवांचा ह्या कष्टाळू लोकांसाठी पोटापाण्याचा आधारच म्हणायला हरकत नाही.
कालवे ताजी असताना थोडीशी हिरवट असतात तर शिळी होत गेली की जास्त पांढरी पडतात शिवाय पाणी भरून फुगीर बनतात. अशी फुगीर कालवे शिजवली की ती आकसतात व चवीला कमी पडतात. ताजी कालवे कडक-मांसल व चविष्ट लागतात.
कालवे कच्चीही खातात. विदेशात चांगल्या हॉटेल्स मध्ये बर्फात ठेवून कच्च्या कालवांची कवचासकट डिश ठेवलेली असते तसेच इतर प्रकारेही वेगवेगळ्या विदेशी डिशेश बनवल्या जातात. आपल्याइथे कांद्यावर, कांद्याशिवायही कालवांचे सुके, कालवांच्या वड्या, रस्सा असे प्रकार बनविले जातात. कालवांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
कालवं शिजवण्यापूर्वी ती काळजीपूर्वक साफ करावी लागतात. कारण कवचातून काढताना थोडे कवच कालवाला लागलेले असते ते काढावे लागते नाहीतर दाताखाली ही कवचे येतात. एका ताटात ही कालवे घेऊन एक एक कालवाचे कवच चाचपून काढून टाकायचे असते. कालवे आकाराने मोठी असली तर पदार्थ बनवताना ती कापावी लागतात. कवच काढल्यावर कालवे धुऊन घेतात. आता आपण कालवांपासून तयार होणारे काही पदार्थ पाहूया.
मोठी कालवे
कालवांचे सुके
साहित्य : कालव १ ते दोन वाटे, १ मोठा कांदा, ७-८ लसूण पाकळ्या ठेचून, हिंग, हळद, मसाला १ ते २ चमचे, चवीपुरते मीठ, १ टोमॅटो किंवा ३-४ कोकम, थोडी कोथिंबीर चिरून, तेल.
कृती:कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. त्यावर हिंग, हळद,रोजच्या वापरातला लाल मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजू द्यावी. पाणी घालू नका कारण कालवांना पाणी सुटत. ५ ते ७ मिनिटांनी त्यात चिरलेला टोमॅटो किंवा कोकम घालावा व मीठ घालावे. जरा परतून कोथिंबीर घालावी थोडावेळ वाफेवर ठेवून गॅस बंद करावा. ही कालवे भाकरी बरोबर अजून चविष्ट लागतात.
कालवांच्या वड्या
साहित्य
कालव १ वाटा,१ कांदा बारीक चिरून, बेसन १ छोटी वाट,, २ चमचे तांदळाचे पीठ, आल लसूण पेस्ट १ चमचा
थोडा गरम मसाला, रोजच्या वापरातला लाल मसाला किंवा लाल तिखट १ चमचा किंवा आपल्या तिखटाच्या गरजेनुसार, हिंग, हळद, थोडी कोथिंबीर चिरून,चवीपुरते मीठ, तेल.
कृती :
कालवांच्या वड्यांचे दिलेले वरील तेल सोडून सर्व साहित्य कालवांसकट एकत्र करा थालीपिठाप्रमाणे घट्ट पीठ मळा जर कालव टाकून पातळ होत असेल तर त्यात अजून बेसन घाला. आणि चांगलं मळून छोट्या छोट्या वड्या तव्यावर तेल टाकून शॅलोफ्राय करा. ह्या वड्या रुचकर लागतात व साइड डिश म्हणून छान पर्याय असतो.
तळलेली कालवे
साहित्य :
कालव १ वाटा, ८-१० लसूण पाकळ्या, पाव चमचा हिंग, १ चमचा हळद, २ चमचे रोजच्या वापरातला लाल मसाला, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मिठ, २-३ कोकम, तेल.
कृती :
तेल गरम करून त्यावर लसूण परतवावा. त्यावर हिंग, हळद घालून परतवून लगेच कालवे घालावी मग मसाला टाकावा म्हणजे मसाला करपत नाही. मधून मधुन ढवळावीत. नंतर मिठ, कोथिंबीर आणि कोकम घालून एक वाफ आणावी आणि गॅस बंद करावा.
हे लेखन ऑगस्ट २०१७ च्या माहेर अन्नपूर्णा अंकात प्रकाशीत.
प्रतिक्रिया
5 Feb 2018 - 12:27 pm | प्रसाद_१९८२
कालव खायचा कधी योग आलाच नाही आजवर.
5 Feb 2018 - 1:52 pm | गवि
टोमॅटो किंवा कोकम?
छे छे. कोंकणचा अपमान.
;-)
ह. घेणे. लेख उत्कृष्ट.. येऊ दे आणखी.
आम्हाला वेगवेगळ्या कारणांनी मेजवानीचें निमंत्रण टाळले तरी अजूनही इच्छुक.. - गवि ;-)
5 Feb 2018 - 2:22 pm | जागु
आशा सोडू नका :)) :))
6 Feb 2018 - 10:44 pm | shashu
काल्वांची आठवण..
लहानपण समुद्र किनारी गेल्याने (सासवणे-अलिबाग) कालवा न बद्दल माहिती आहे. लहानपणी आई सोबत समुद्रावर खड़काळ ठिकाणी जायचो. आई कालवे फ़ोडायची.
कालवे फोड़णे म्हणजेच काल्वाचा गोळा कवच फोडून बाहेर काढणे. तसेच थंडी असताना खुब्र्या आणि शिप्टे सुद्धा सापडतात. मला काल्वान पेकश्या खुब्र्यानची आमटी जास्त आवडते. वेळ मिळेल तेव्हा खुब्र्यान बद्दल आणि शिपटान बद्दल नक्की लिहेन. लहानपणी आम्ही भावंडे खुब्र्या वेचायला ओहोटीच्या वेळी दिवसा अथवा रात्रि विजेरी घेवुन जायचो. रात्रि जाणे जास्त फयदयाचे असायचे कारण अंधारात खुब्र्या खडकावर यायच्या. त्या फ़क्त विजेरीच्या प्रकाश्यात पटापट उचलून पिशवीत किंवा बादलित भारायच्या.
आणि हो माझी आई काल्वांचे मुटके सुद्धा करायची. रेसिपी विचारू नका कारण मला माहित नाही.
काल्वान मुळे एकदम flashback मधे जायला झाले. खुप सारे प्रसंग डोळ्यासमोर आले.
लहानपण देगा देवा....
धन्यवाद जागु
6 Feb 2018 - 11:02 pm | मुक्त विहारि
कालवे आणि तिसर्या सारखेच का?
7 Feb 2018 - 9:11 am | shashu
नाही.........माझ्या महितिप्रमाणे तिसऱ्या दुसऱ्या असतात :)
कालवे आणि तिसऱ्या वेगवेगळे आहेत.
जागु यावरती अधिक प्रकाश टाकटील अशी अपेक्ष्या आहे.....
7 Feb 2018 - 11:46 am | जागु
शशांक छान आठवणी आहेत तुमच्या. शिप्टे म्हणजे पालकं का?
कालवे आणि तिसर्यात खुप फरक आहे.
खुबड्या - https://www.misalpav.com/node/15948
खुबे - https://www.misalpav.com/node/16260
तिसर्या https://www.maayboli.com/node/17476
7 Feb 2018 - 11:46 am | जागु
शशांक छान आठवणी आहेत तुमच्या. शिप्टे म्हणजे पालकं का?
कालवे आणि तिसर्यात खुप फरक आहे.
खुबड्या - https://www.misalpav.com/node/15948
खुबे - https://www.misalpav.com/node/16260
तिसर्या https://www.maayboli.com/node/17476
7 Feb 2018 - 1:44 pm | shashu
आमची वेळ आणि लिहावयाचे कष्ट वाचवल्याबद्दल धन्यवाद.......
(असाही आम्हाला कधी वेळ मिळाला ास्ता आणि आम्ही कधी कष्ट घेतले असते...हे देवाला सुद्धा महित नसेल)
दुवे खुप छान आहेत...
7 Feb 2018 - 2:07 pm | जागु
तरी पण वेळ मिळेल तेव्हा तुमच्या पद्धतीने लिहा.
7 Feb 2018 - 12:09 pm | shashu
अगदी बरोब्बर.....
पण हल्ली आपली प्रगति खुप झाल्याने आमच्या इकडे पालकं कमी झाली आहेत.
एक कारण असे की मुंबई समुद्रमार्गे ~१४ कि.मी. असल्या मुळे मागील दशका पासून पाणी खूपच प्रदूषित होत आहे. त्यामुळे इतर मासळी सुद्धा खुप कमी झाली आहे.
थोड़ी वेगळी माहिती...
समुद्रात खड़कात पाय कापला गेला तर पाय समुद्राच्याच पाण्यात बुडवून ठेवायचो. प्रचंड त्रास व्हायचा पण त्यामुळे जखम लवकर ठीक होत असे. (पूर्वजांची निरिक्षणे)
7 Feb 2018 - 12:59 pm | जागु
आमच्याइथे पालकं मिळतात पण मी एकदाच बनवली होती आणि इथे रेसिपी टाकली होती. ती बनवायला त्रास जास्त असतो.
7 Feb 2018 - 3:40 pm | shashu
पालकांचा विषय निघालाच आहे तर आणखी एक आठवले......
२०१६-२०१७ ला कामनिमित्त मोरक्को देशी (नॉर्थ अफ्रीका) जाणे झालेले. नित्य दिनक्रम म्हणून संध्याकाळी पळायला जायचो. असेच एक दिवस समुद्र किनारी गेलो असताना <यूरेका> मला पालकं दिसली. अगदी जलदगतिने थोड़ी गोळा करून रूम वर आलो. म्हटले आज मस्त पेकी बेत होणार परदेशी पालकांची आमटी खायला मिळणार. प्रकाश्यात नीट निरखून पाहिले. गोळ्याचा रंग थोड़ा वेगळा होता (ताम्बुस). म्हटले ठण्ड वातावरणामुळे, समुद्राच्या पाण्याच्या फरकामुळे असेल कदाचित असे.
अति उत्साहात स्वदेशी फोटो पाठवण्यात आले. थोड्याच वेळात घरुन एक जोरदार प्रहार झाला. (कानाखाली फोन होता ना). घरचे पालक जागे झाले. 'तू असे काहिही खाणार नाही आहेस. फ़ूड इन्फेक्शन झाले तर, विषारी असेल तर, ती पालकेंच आहेत कश्यावरून, एक तर दूर देशी आहेस, तिकडे कोणी बघणारे नाही आहे, त्यामुळे ती पालकें आत्ताच्या आत्ता फेकून दे, फेकताना विडिओ कॉल वर दीसुदे आम्हाला (टेक्नोलॉजी चा असाही उपयोग हे जरा जास्तच झाले)' असे एक ना अनेक प्रश्नांचा प्रहार माझ्या कनाखाली होत गेला.
ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला. मनात विचार पक्का होता. काही होत नाही, जो होगा देखा जायेगा (समुद्र किनारी रहात असल्यानाने लाटांना चिरून पुढे जाणे माहिती होते). तरीसुद्धा मानवि स्वभावा प्रमाणे घरच्या पालकांची वाक्य (-ve) डोक्यात फेर धरु लागली. सरते शेवटी -ve ने +ve वर विजयाचा गुलाल उधळला आणि माझा पालकांच्या आमटी चा बेत माझ्याच पालकांनी उधळवून लावला.