सातारा छत्रपतींची २३३ हिऱ्यांची पगडी?

मनो's picture
मनो in जनातलं, मनातलं
29 Jan 2018 - 6:53 am

महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान खजिने परदेशांत आहेत. दुर्मिळ चित्रे, मूळ हस्तलिखिते, पोथ्या, मूर्ती एवढेच नव्हे तर हिरे, माणके आणि सोन्याच्या वस्तूही त्यात आहेत. थोड्या दिवसांपूर्वी श्री. संकेत कुलकर्णी यांनी नाशिक-हिरा याच्याबद्दल एक संशोधन प्रसिद्द केले होते. या वेळी लंडनमध्ये नव्हें तर अमेरिकेतील अश्याच एक विशेष मौल्यवान वस्तूची ही कहाणी. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी प्रसिद्ध होत आहे. माझा हा लेख इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी इथे टाकत आहे. हा लेख मूळ स्वरूपात शेवटच्या तीन पॅराग्राफ्सकट सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.

pagadi1

अमेरिकेतील व्हर्जिनिया म्युझियम इथे मला ही पगडी आढळली. गुलाबी रंगाच्या रेशमी कापडाने ती बनवली आहे. पगडी बनवताना सोन्याची तार, लाकूड, चांदी वापरली आहे. पगडीत एकूण २२३ हिरे आहेत. हिऱ्यांचे एकूण वजन २५ कॅरॅट आहे. एकूण १७ मोठे हिरवे पाचू ज्यांचं वजन १७३ कॅरॅट आहे ते सरपट्टीवर वापरले आहेत. असंख्य मोती सोन्याचा तारेने ओवले आहेत. हिरे आणि मोती सोन्या-चांदीच्या तारेने सुबकपणे सरपट्टीच्या खोबणीत बसवलेले आहेत. डोके जिथे बसते ती जागा साधारण २८ सेंटीमीटर व्यासाची आहे.

pagadi2

म्युझियमकडे असलेल्या नोंदींवरून असं कळतं की ही पगडी पुण्याजवळच्या एका मराठा दरबारातील आहे. पगडीच्या ठेवणीवरून ती पेशवेकालीन ब्राह्मणी पद्धतीची नाही हे दिसते. पेशवेकालीन ब्राह्मणी पगड्या आपल्याला बहुतेक सगळ्या पेशव्यांच्या चित्रात दिसतात. विसाव्या शतकात बाळ गंगाधर टिळकांचे फोटो अथवा चित्रे पाहिली तर नंतरच्या पुणेरी पगड्या कश्या दिसत ह्याचा अंदाज येतो. ही अमेरिकेतील पगडी तशी दिसत नाही.

कोल्हापूर छत्रपतींचे राज्य १८५० साली होते. त्यांच्या पगडया कश्या होत्या त्याचा तपास मी केला. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा खालील फोटो पाहिला म्हणजे कोल्हापूरची पगडी कशी दिसत होती याचा अंदाज येतो. ही अमेरिकेतील पगडी कोल्हापूर पगडीसारखी दिसत नाही.

shahu

म्युझियमच्या क्युरेटरच्या म्हणण्यानुसार मी सातारा छत्रपतींचे चित्र तपासले. खालील चित्रात आपल्याला जवळजवळ अशीच पगडी छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे दत्तक पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी घातलेली दिसते. चित्रात आपल्याला "श्री शाहू महाराज छत्रपती श्री प्रतापसिंह माहाराजयारीII कासी मुकामी दतक घेतलेल्याची तसवीर संस्थान सातारा" असं मराठीत लिहिलेलं आणि "Shree Shahoo Maharaj Chattrapati The adopted son of the late Maharajah Partap Singh of Sattara" असं इंग्रहीत लिहिलेलं सापडतं.

shahu1

छत्रपतींच्या चेहेऱ्याचा भाग मोठा करून पहिला म्हणजे आपल्याला हे साम्य अधिकच जाणवते.

shahu2

सातारा छत्रपती श्री प्रतापसिंह महाराज यांची कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांना ब्रिटिश सरकारने अन्यायाने पदच्युत केले. चित्रात दाखवलेले छत्रपती शाहू महाराज हे त्यांचे दत्तक पुत्र. दुसरे समोर असलेले अप्पासाहेब छत्रपती हे प्रतापसिंहाचे बंधू. ब्रिटिश सरकारने छत्रपती शाहू महाराज यांना साताऱ्याच्या गादीचे वारस मानायला नकार दिला आणि साताऱ्याचे राज्य खालसा केले. रंगो बापूजी यांनी इंग्लंडला जाऊन याविरुद्ध बराच लढा दिला पण दुर्दैवाने त्यांना यश आले नाही.

साताऱ्याचे राज्य खालसा झाल्यानंतर छत्रपतींच्या उत्पन्नाचे साधन काही राहिले नाही. १८५७ च्या उठावानंतर परिस्थिती अजूनच बिकट झाली. साहजिकच छत्रपतींच्या संग्रहातील अनेक मौल्यवान वस्तूंची विक्री झाली. ज्येष्ठ इतिहास संशोधक गणेश हरी खरे यांनी लिहिलेल्या एका लेखानुसार इतिहास संशोधक द. बा. पारसनीस यांनी छत्रपतींच्या संग्रहातील काही चित्रे आणि इतर वस्तू विकत घेतल्या. पारसनिसांच्या मृत्यूनंतर हा संग्रह इतर ठिकाणी विखुरला. तो आज आपल्याला पुण्यातील डेक्कन कॉलेज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी पाहावयास मिळतो. माझा तर्क असा आहे की याच काळात इ. स. १८५० नंतर ही पगडी साताऱ्यातून कुणा इंग्रज अधिकाऱ्याने विकत घेतली असावी. तो अधिकारी इंग्लंडला परतल्यावर त्याच्या संग्रहात ती असावी. या अधिकाऱ्यांच्या वंशजांनी ती व्हर्जिनिया म्युझियमला सुपूर्द केली असावी. यासंबंधी ठोस पुरावा असा काही माझ्याकडे नाही, पण इतर कागदपत्रे अभ्यासून जर काही हाती लागले तर ते मी नंतर प्रसिद्ध करेन.

पगडीचा फोटो Virginia Museum of Fine Arts, Richmond यांच्यातर्फे साभार.

इतर ठिकाणी फोटो टाकताना खालील माहिती जोडणे आवश्यक आहे.
Photo: Katherine Wetzel © Virginia Museum of Fine Arts

Image must be credited with the following collection and photo credit lines:

Virginia Museum of Fine Arts, Richmond. Gift of Col. Henry W. Anderson, Mr. Raymond Aronian, Dr. and Mrs Frank L. Call, II, Mrs. Harvey Archer Clopton, Robert A Fisher, Mr. and Mrs. Mark Fratti, Dr. William M. Patterson, Mrs. E. A. Rennolds in memory of Mr. and Mrs. John Kerr Branch, Mr. Charles B. Samuels, Mr. George Green Shackelford, and William A. Willingham, by exchange; Robert A. and Ruth W. Fisher Fund

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2018 - 7:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पगड़ी आवडली आणि तिचा मूळ शोध घेण्याचाही प्रयत्न आवडला. लेखन माहितीपूर्ण आहे. आभार.

-दिलीप बिरुटे

धन्यवाद सर, लेख टाकल्या टाकल्या 15 मिनिटांच्या आत प्रतिक्रिया :) ☺️

चित्रगुप्त's picture

29 Jan 2018 - 7:47 am | चित्रगुप्त

संशोधन, चित्रे, लेखन सर्वच प्रसंशनीय. व्हर्जिनिया संग्रहालयात आणखी काय काय आहे ?

पुष्कळ गोष्टी आहेत. माझ्याकडे 600 पानांचे पुस्तक आहे त्याच्या फक्त यादी(काटलॉग)चे. तुम्ही याल अमेरिकेत तर पाहून या जवळ असेल तर.

पगला गजोधर's picture

29 Jan 2018 - 9:03 am | पगला गजोधर

फोटो सहित लेख दिल्यामुळे, विथ रेफ टू फोटो भाष्य केल्याने, लेख चांगला वाटला, लेखं आटोपशीर सुद्धा झाला.

प्राची अश्विनी's picture

29 Jan 2018 - 9:16 am | प्राची अश्विनी

लेख अर्थातच आवडला. तुम्ही ही माहिती शोधण्याचे आणि लोकांसमोर आणण्याचा जो प्रयत्न करतात त्यासाठी कौतुक, आभार आणि आदर. __/\__

पैसा's picture

29 Jan 2018 - 10:34 pm | पैसा

खूपच कौतुकास्पद काम करत आहात.

आजच मटामध्ये ह्यावरील तुमचा लेखही वाचला.
धन्यवाद ह्या माहितीबद्दल.
पुढील अनेक संशोधनांसाठी खूप सार्‍या शुभेच्छा.

उत्तम धागा !!! तुमचा निष्कर्ष मला तरी योग्य वाटतोय. या संदर्भात अधिक संशोधन व्हावे असे वाटते.

शशिकांत ओक's picture

29 Jan 2018 - 12:36 pm | शशिकांत ओक

मनो,
आपण सचित्र माहिती व सखोल विश्लेषण करूनआम्हा मीपाकरांना मिसळपावाच्या हातगाडीवरून श्रीखंड पुरीचा बेत असलेल्या पंगतीचा लाभ दिल्याचा आनंद झाला. या पगडीला ज्याच्या शिरावर विराजमान व्हायला बनवले गेले होते ते इतिहासाच्या गर्तेत विलुप्त झाले. अन ही पगडी घालणाऱ्यांची डोकी बदलत बदलत आता एका म्युझियमची शान वाढवत आहे... मस्त लेखन.

एकनाथ जाधव's picture

29 Jan 2018 - 12:51 pm | एकनाथ जाधव

छान लेख.
मटाची लीन्क मीळेल का?

शोधली मी खूप. पण नाही सापडली. ही इ-पेपरवाली लिंक आहे फक्त.

https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/get/MTPUN-2018-...

श्रीगुरुजी's picture

29 Jan 2018 - 3:18 pm | श्रीगुरुजी

खूपच छान माहिती! लेखातील प्रकाशचित्रे, संशोधन, पगडीचे मूळ शोधायचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. भारताचा मौल्यवान सांस्कृतिक ठेवा व कलाकारी भारताबाहेर असल्याचे वाईट वाटते.

बिटाकाका's picture

29 Jan 2018 - 3:29 pm | बिटाकाका

लेख आवडला!

विलक्षण कौतुकास्पद आणि अभिमानास्पद प्रयत्न! तुमच्या भावी संशोधनाला मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या वरच्या लेखामध्ये संकेत कुलकर्णी ह्यांच्या नाशिक हिर्‍याबाबतच्या 'संशोधना'चा उल्लेख आढळला. थोडा अधिक शोध घेतल्यावर हे 'संशोधन' मला ह्या फेसबुकपानावर आढळले.

मला असे स्पष्ट दिसते की हे सर्व संशोधन माझा जुन्या 'उपक्रम'मधील ह्या लेखाचे सारांशीकरण आहे. लेखातील प्रत्येक मुद्दा माझ्या लेखामध्ये अधिक विस्ताराने मांडला आहे आणि संकेतरावांनी माझ्या लेखाचे सारांशरूप केले आहे. (थोडी चित्रे शेवटी चिकटवली आहेत जी मुळात नव्हती. संकेतराव लंडन मध्येच असल्याने लेखाच्या दुव्यांवरून ती चित्रे मिळविणे त्यांना सहज जमले असावे पण इतकीच काय ती त्यांची स्वतःची भर आहे. थोडक्यात म्हणजे हे ग्रन्थचौर्य आहे आणि ते करून संकेतरावांनी आपल्या चाहत्यांकडून वाहवा मिळविली आहे.

माझा मूळ लेख येथेच वेगळ्या धाग्यामध्ये दाखवणार आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jan 2018 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे देवा.....!

-दिलीप बिरुटे

बिटाकाका's picture

29 Jan 2018 - 9:45 pm | बिटाकाका

तुमचा आणि त्यांचा दोन्ही लेख वाचले. माफ करा, पण ग्रंथ चौर्याचा आरोप लावण्याइतके साम्य आढळले नाही. अर्थात हे माझे हे मर्यादित ज्ञान आणि संदर्भामुळे वैयक्तिक मत आहे. दोन्ही लेख कसदार आणि माहितीपूर्ण वाटले.

Rahul D's picture

8 Feb 2018 - 1:55 pm | Rahul D

100% अनुमोदन

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jan 2018 - 10:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितीपूर्ण लेख आणि फोटो. तुमची पुरातन वस्तूंच्या संशोधनाबद्दलची कळकळ कौतुकास्पद आहे. ही माहिती आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल धन्यवाद !

आनंदयात्री's picture

30 Jan 2018 - 8:18 am | आनंदयात्री

>> काळात इ. स. १८५० नंतर ही पगडी साताऱ्यातून कुणा इंग्रज अधिकाऱ्याने विकत घेतली असावी. तो अधिकारी इंग्लंडला परतल्यावर त्याच्या संग्रहात ती असावी. या अधिकाऱ्यांच्या वंशजांनी ती व्हर्जिनिया म्युझियमला सुपूर्द केली असावी. यासंबंधी ठोस पुरावा असा काही माझ्याकडे नाही,

वंशजांनी इंग्लंडहून अमेरिकेला येऊन इथल्या म्युझियमला ती पगडी का दिली असावी? (इंग्लंडातल्या म्युझियमला न देता). १८५० नंतर अमेरिकेत ब्रिटिश मायग्रेशन किती झाले असावे याबद्दल अर्थात फारशी माहिती नाही.

ते वंशज आता अमेरिकेत आहेत म्हणून. अमेरिकेत आयरिश आणि इतर युरोपिअन लोकांचा ओघ सतत चालू होता 19 व्या शतकात आणि नंतरही.

माहितीपूर्ण लेख आणि फोटो. तुमचे प्रयत्न खूप प्रशंसनीय आहेत!

सगळेच्या सगळे फोटो दिसत नाहीयेत.

दोन फोटोचा घोळ मीच केला आहे, करतो ठीक आज.

हापिसात फोटो दिसत नव्हता, घरी आल्यावर दिसला. खूप आवडला लेख, अजून येउद्यात!

बिटाकाका's picture

8 Feb 2018 - 9:33 pm | बिटाकाका

दोन लेखांनातर उत्सुकता खूप चाळवली गेली आहे. आपलं लिखाण कुठे एकत्रित वाचता येईल का?

राघवेंद्र's picture

8 Feb 2018 - 11:29 pm | राघवेंद्र
बिटाकाका's picture

9 Feb 2018 - 12:09 pm | बिटाकाका

धन्यवाद _/\_.