प्रिय वैष्णवी,
आज चुकून पहाटे डोळा उघडला. बाहेर मस्त थंडगार वारा सुटला होता. कशी कोण जाणे पण तुझी आठवण आली मला. थंड हवेत तुझा चेहरा एकदम वेगळाच दिसतो. डोळ्यातून हसणं तू कुठून शिकलीस माहित नाही, पण तुझे डोळे बघितले कि खूप उबदार वाटतं मला. हे वाचून तू परत डोळ्यातल्या डोळ्यात खुदकन हसशील हे माहित आहे मला. कदाचित तू तसा हसावस म्हणूनच हे लिहिलं गेलं माझ्याकडून. खूप निरागस आहेस तू. माझ्या पिल्ला एवढीच. तसं बघायला गेलं तर मी तुला पण माझं पिल्लूच समजतो. फरक एवढाच कि माझी पिल्लू लहान आहे आणि तू तिच्या पेक्षा लहान आहे. असं असून सुद्धा आज एक गोष्टं विचारावीशी वाटत आहे. जर जमलं तर उत्तर दे. नाहीतर नेहमीसारखी हसून दाखव आणि मी नेहेमी सारखंच सगळं विसरून जाईन.
आपली लुटुपुटीची भांडणं तुला नवीन नाही. पण खरी भांडणं कधीकधी मोठी होत जातात. शब्दाने शब्द वाढतो. का कुणास ठाऊक पण एक पाउल मागे सरावं असं कुणालाच वाटत नाही. मग भडका उडतो. कळत नकळत आपल्या आजू बाजूची माणसं त्यात सामील होतात. गट बनतात. समोरच्याचं कसं आणि काय चुकलं हे आपण नं विचारता आपल्याला सांगितला जातं. मागे कधीतरी घडून गेलेल्या गोष्टींना पण आत्ताच्या भांडणाचा संदर्भ लागू पडतो आणि मग माघार घेणं शक्य होत नाही. खरं सांगतो बाळ खूप अवघड वेळ असते हि. आणि अश्या वेळेला तुम्हाला समोरची व्यक्ती आणि तुमचा अहंकार यात निवड करावी लागते. You may win an argument but you might lose the person. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अश्या वेळेला आपल्या माणसाची निवड करणं याच्यासारखी मजा नाही. कारण काहीही झालं तरी दान तुमच्याच बाजूने पडलेलं असतं.
सरलेल्या काळाने मला शिकवलं कि चांगलं वाईट खरं खोटं असं काही नसतंच मुळी. चांगलं आणि वाईट याची व्याख्या आपल्या मनाप्रमाणे बदलतो आपण. मग कधी कधी वाटतं का खोटं बोलतो आपण. जे काही आपण करतो ते चुकीचा आहे हे आपल्याला माहित असतं तेव्हा खोटं बोलतो आपण आणि जर आपल्याला माहित आहे कि जे करतो ते चूक आहे ते का करतो आपण? या प्रश्नांनी मस्त भुगा केला होता माझ्या डोक्याचा. मग एका क्षणी ठरवलं मी कि जे मनाला पटतं तेच करायचं. जे केलं ते चूक कि बरोबर हे येणारा काळ ठरवेल. आणि चूक झाली तर झाली. जर चूक करताना घाबरलो नाही तर कबूल करताना लाज का वाटावी.
खरं सांगायचं तर हे सगळं मी तुझ्याकडून आणि माझ्या पिल्लाकडून शिकलो. कुणाची पर्वा नं करता मनाला जे पटेल ते करायला वेगळीच जिगर लागते. आधी वाटायचं कि पिल्लू लहान आहे म्हणून असं वागणं तिला जमतं. पण तू सुद्धा ते तितक्याच सहजतेने करतेस की. मला मनापासून असं वाटतं कि पिल्लू तुझ्याएवढी झाल्यावर पण तुझ्या इतकीच निरागस आणि हुशार असेल.
....आणि त्याकरता तू कुठली गोळी किंवा औषध घेतेस तेवढं फक्तं मला सांग. बस एवढंच विचारायचं होतं तुला.
प्रतिक्रिया
4 Jan 2018 - 9:36 pm | ज्योति अळवणी
खूप सुंदर लिहिलं आहात. फक्त argument की नातं यात नातं जपणारे लोक विरळा. बाकी सगळे इगो आणि argument जिंकणे यातच अडकतात. आणि मग हरवलेलं नातं मुळात महत्वाचं नव्हतंच अस स्वतःला आणि इतरांना पटवत राहातात... याचं दुःख वाटतं
5 Jan 2018 - 2:08 pm | मराठी कथालेखक
कुणाला लिहिलंय पत्र हे नीट कळालं नाही.