जेंव्हा कधी दुखणी मागे लागतील
तेंव्हा लोकांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पीडणार नाही
त्यांची त्यांना कामं आहेत, माझी मी वेळेवर औषधं घेईन
किती वेळा ‘जावं’ लागलं, चर्चा करणार नाही
माझ्या दुखण्याची काळजी घेणारे आहेतच
त्यांचा मान ठेवेन, पण भार होणार नाही
गरज असेल तेंव्हा हक्काने मदत मागेन
पण नावडता म्हातारा होणार नाही!
फोन केला कुणाला तर मी कोण ते आधी सांगेन
कोणाशी बोलायचंय ते सांगेन, ‘कोण बोलतंय’ विचारणार नाही
‘एकच मिनिट वेळ घेतो, वेळ आहे ना?’ असं विचारून
कामातल्या लोकांचा अर्धा-पाऊण तास वेळ खाणार नाही
हल्ली लोकांना संदेशवहनाचे अनेक मार्ग आहेत
अवचित ऐकलेल्या दु:खद वार्ता मुद्दाम ‘इकडून तिकडे’ सांगणार नाही
घरच्यांच्याही कमिटमेंट्स असू शकतात, चक्कर टाकू इच्छिणाऱ्या भल्या मित्रांना
‘लागल्या फोनवर’ ‘जेवायलाच या’ म्हणणार नाही
घरातल्यांनी माझंही मन राखण्याची अपेक्षा असेलही
पण त्रासदायक म्हातारा होणार नाही!
पुरूषांचं टेस्टेस्टेरॉन, स्त्रियांचं इस्ट्रोजेन
कमी होत जाणं हे जीवशास्त्रीय सत्य आहे
त्या कुबड्यांचा आधार घेऊन चिडचिड,
वैफल्याकडे जाणार नाही
अगदी तिशी-चाळीशीतल्याही उत्साहाने
क्रिकेट, बॅड्मिंटन आता झेपणार नाही
वेळ बदलली आहे, खेळ बदलेन,
रोज दोनदा चालेन, बसून खाणार नाही
तारुण्याचं स्टेशन एकदाच येऊन जातं,
ते गेलं, हे विसरणार नाही
वयानुरूप स्वत:ला बदलेन,
वयाविपरीत वागणारा म्हातारा होणार नाही
आदराचा आधार-हात
चुकूनही झिडकारणार नाही
पण शक्य तोवर स्वावलंबी राहीन,
सतत लाडाची अपेक्षा करणार नाही
सूचवणं आणि हट्ट धरणं यातला फरक लक्षात ठेवेन
माझंच ऐकावं अशी अपेक्षा ठेवणार नाही
नेहमी स्वत:ला सांगेन
"Grow grey gracefully"
अनुभव असलाच तर दोनच उपदेशपर शब्द बोलेन
हेकट, दुराग्रही म्हातारा होणार नाही
चित्रपट, नाटकं, कविता, पुस्तकं राहून गेलेली आहेत
शक्य असेल तेंव्हा आस्वाद घेईन
'माझाच चॅनेल लावा' म्हणत
रिमोट हडपणार नाही
शक्य तिथे सहजीवनाची कास धरेन
पण एकट्यानेही मनमुराद आनंद लुटेन
इतरांच्या मर्यादा सांभाळून स्वतंत्र जगेन
कडवट, एकाकी म्हातारा होणार नाही
गात्रं यथावकाश थकतीलच,
तरीही माझ्यायोग्य कामं असतीलच
ती आनंदात करेन, उपयोगी ठरेन
निरुपयोगी म्हातारा होणार नाही
क्षुद्र राजकारणी, वाढते कर, महागाई, हे असतीलच
बीभत्सता, रोग, कंप्यूटर व्हायरसेसही वाढतील
केवळ कुंपणावरून टीका करण्यापेक्षा
बदलाचा प्रयत्न करणारा माणूस होईन
"काय दिवस आलेत?" म्हणणार नाही
कुरकुऱ्या म्हातारा होणार नाही
चारचौघांत सुखावेल इतकंच प्रिय बोलेन
स्वार्थासाठी लाळघोटेपणा करणार नाही
शक्य तेंव्हा नजरेने आधार देईन
दुखवेल असं सत्य बोलणार नाही
सखीला, मुलाबाळांना नजर चुकवावी लागेल
असं अशोभनीय वर्तन करणार नाही
बहुगुणी म्हातारा मी नसेनही
अवगुणी म्हातारा होणार नाही!
समस्त मिपाकरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रतिक्रिया
30 Dec 2017 - 7:26 am | तिमा
म्हणजे थोडक्यांत, 'नटसम्राट' मधल्या बेलवलकरसारखं वागणार नाही, असंच ना ?
30 Dec 2017 - 7:57 am | उगा काहितरीच
म्हातारपणी इतक सगळं समजण्याची क्षमता अंगी रहावी , हीच इच्छा !
30 Dec 2017 - 7:57 am | उगा काहितरीच
म्हातारपणी इतक सगळं समजण्याची क्षमता अंगी रहावी , हीच इच्छा !
30 Dec 2017 - 8:18 am | चामुंडराय
अतिशय सुंदर
उतणार नाही मातणार नाही
घेतला वसा टाकणार नाही
अवगुणी म्हातारा होणार नाही(.)
30 Dec 2017 - 8:19 am | पगला गजोधर
चांगलं लिहिलंय,१+
बचपन खेलमें खोया, जवानी निंद भर सोया, बुढापा देखकर रोया......
(
युवराज असताना, बुद्धाला, जसं अनुक्रमे म्हातारा, रोगी, तिरडी...पाहून विचारचक्र सुरू झाले) त्याचंच काहीसं अत्यल्प प्रतिबिंब या मुक्तकात दिसत आहे....
30 Dec 2017 - 8:52 am | नाखु
उपयुक्त झालों तर फार उत्तम पण उपद्रव होणार नाही याची काळजी नक्की घेईन.
बरीच पुस्तके वाचायची , जुने मिपाकरांनी शिफारस केलेल्या चित्रपटांचा आस्वाद, बागकाम व उलुशी स्वांतसुखाय शेती करायचीच इच्छा बाळगून असलेला अतिसामान्य नाखु पांढरपेशा
30 Dec 2017 - 8:52 am | नाखु
उपयुक्त झालों तर फार उत्तम पण उपद्रव होणार नाही याची काळजी नक्की घेईन.
बरीच पुस्तके वाचायची , जुने मिपाकरांनी शिफारस केलेल्या चित्रपटांचा आस्वाद, बागकाम व उलुशी स्वांतसुखाय शेती करायचीच इच्छा बाळगून असलेला अतिसामान्य नाखु पांढरपेशा
30 Dec 2017 - 9:40 am | सुबोध खरे
माझ्या बाबतीत म्हणायचं तर
१) सर्वात पहिलं म्हणजे मी आणि मुलं एकत्र (एका घरात) राहणार नाही.
स्वातंत्र्य हे अनमोल असतं.
एकत्र कुटुंब पद्धतीचे कितीही गोडवे गेले तरीही ती पद्धती स्त्रियांच्या "त्यागावरच" उभी होती ज्यात स्त्रीचे मत "गृहीत" धरलेले होते.
२) पुढच्या पिढीला उपदेश करणे नाही. आजही विचारलं "तर आणि तरच" सल्ला देतो.
"दवणीय" (उपदेशात्मक) गोष्टी लोकांना सांगू नये किंवा सार्वजनिक न्यासावर लिहू नये.
फुकटच्या उपदेशात कुणालाही रस नसतो मग तो कितीही त्या माणसाच्या फायद्याचा असला तरीही
३) हात पाय चालत आहेत तोवर मी काम करत राहणार. "निवृत्त होणे" हे माझ्या शब्दकोशात नाही.
४) आजचा काळ कसा वाईट आहे आणि आमचा काळ कसा चांगला होता याबद्दल गहिवर काढणारे शब्द चुकून सुद्धा तोंडातून काढायचे नाहीत. भारताची एवढी प्रचंड लोकसंख्या गर्दी गजबजाट याला आजची तरुण पिढी नव्हे तर "मागच्या पिढ्याच" जबाबदार आहेत. रेशनच्या, रेल्वे, एस टी तिकिटाच्या रांगा, परमिट राज बंदिस्त अर्थव्यवस्था इ. गोष्टी चांगल्या काळाच्या "दर्शक" नक्कीच नव्हत्या.
५) अगदीच गलितगात्र होईस्तोवर ( दुर्दैवाने) मुलांच्या डोक्यावर बसणार नाही. तसे झाले तर असा वृद्धाश्रम तोवर नक्कीच शोधन ठेवेन. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधन आणण्याचे कोणतेही परमिट आपल्याला दिलेले नाही.
"दवणीय" (उपदेशात्मक) गोष्टी लोकांना सांगू नये किंवा सार्वजनिक न्यासावर लिहू नये.हा सल्ला पाळण्याचे ठरवले असल्याने पुढील मुद्दे खोडलेले आहेत.
संपादकांना वरील मुद्दे दवणीय वाटल्यास त्यांनी ते उडवून टाकावेत हि विनंती.
30 Dec 2017 - 11:30 am | ज्ञानोबाचे पैजार
सगळ्या मुद्यांना +१
क्र ३ च्या मुद्याला तर +९९९९९९९९९९९
५) अगदीच गलितगात्र होईस्तोवर ( दुर्दैवाने) मुलांच्या डोक्यावर बसणार नाही. तसे झाले तर असा वृद्धाश्रम तोवर नक्कीच शोधन ठेवेन.
गलितागात्र झालेल्या वृध्दांना ठेउन घेण्यास / सांभाळण्यास वृद्धाश्रम देखिल फार उत्सुक नसतात याचा अनुभव आमचे एक निकटवर्तिय घेत आहेत. त्यांना नाईलाजाने आपल्या मुलांकडे रहावे लागत आहे आणि मुलांना देखिल नाईलाजाने / लोकलज्जेस्तव त्यांना सांभाळावे लागत आहे. पण दर सहा महिन्यांने होणारा त्यांचा फुटबॉल बघवत नाही.
त्यामुळे नीट चौकशी करुन या बद्दलचा प्लॅन काळजीपूर्वक बनवणे गरजेचे आहे असे वाटते. या विषयी इतर अनुभवी मिपाकरांचे सल्ले वाचायला आवडतील.
पैजारबुवा,
30 Dec 2017 - 9:43 am | ज्योति अळवणी
झक्कास
30 Dec 2017 - 9:48 am | प्रकाश घाटपांडे
चला आपण सारे आदर्श बायोकेमिकल म्हातारे रोबो होउ या!
30 Dec 2017 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे
गम्मत बाजूला ठेवू पण मुक्तक आवडले
30 Dec 2017 - 9:59 am | गवि
आसपासच्या पाहण्यातून असं जाणवलंय की लोकांना वयानुसार वाचन करण्याचाही डोळ्यांना आणि त्याहूनही डोक्याला थकवा येत जातो. एकूण रसास्वाद घेण्याची गोडीच कमी होत जाते. त्यामुळे पुस्तकं, टीव्ही बरंच काही असूनही त्यात रस न उरलेले लोक दिसतात.
इतरांचंही असं निरीक्षण आहे का?
30 Dec 2017 - 11:36 am | प्रकाश घाटपांडे
यालाच म्हणतात दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत.
30 Dec 2017 - 12:05 pm | एस
टीका जेव्हा व्हायची असेल तेव्हा होणारच, आणि करणारे करणारच. तेव्हा फार मनावर न घेता आनंदाने उर्वरित आयुष्य जगावे असे वाटते. यानिमित्ताने स्वेच्छामरण हा जुनाच विषय पुन्हा मनात आला. एखाद्याला खूप समाधानाने आणि कृतज्ञतेने आपला जीवनप्रवास आता थांबवावासा वाटला तर त्याला तसे करण्याची कायदेशीर अनुमती असावी असे माझे प्रामाणिक मत आहे. या तरतुदीचा वेगवेगळ्या मार्गांनी होऊ शकणारा दुरुपयोग लक्षात घेऊनही असंख्य वृद्धांना याचा खूप दिलासा मिळेल याची खात्री आहे.
31 Dec 2017 - 10:10 am | मदनबाण
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अभी अभी तो मिले थे फिर जुदा हो गए... क्या थी मेरी खता तुम सज़ा हो गए,[मुझे खोने के बाद इक दिन तुम मुझे याद करोगे... फिर देखना मिलने की मुझसे तुम फरियाद करोगे...] २ :- Tera Zikr - Darshan Raval | Official Video
31 Dec 2017 - 2:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुरेख मनोगत !
हे कसे जमवावे यासाठी माझे दोन पैसे मनोगत...
१. नव्या आणि जुन्या पिढीतले अकारण संघर्ष टाळून प्रेमाचे संबंध अबाधित राहण्यासाठी प्रत्येक पिढीने स्वतंत्रपणे रहायची सवय आणि तरतूद केली पाहिजे. यामुळे, प्रत्येक पिढीला आपल्या मनासारखे जगायची मोकळीक मिळेल, रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या मतभेदांमुळे होणारे खट्टू मन / खटके थांबतील आणि कधीमधी भेटल्यावर जास्त आनंदी संबंध राहतील. तसे न करणे, व आर्थिकदृष्ट्या नवीन पिढीवर अबलंबून रहावे लागणे / राहणे ही जुन्या पिढीच्या आपल्या जीवनाचे व्यवस्थापन करण्यातली कमतरता समजावी.
२. शिक्षण आणि मूलभूत स्थैर्य मिळाल्यावर (काही गोष्टींबाबत तर ते मिळवत असतानाही) नवीन पिढीला तिच्या मनाप्रमाणे धडपडू व वाढू द्यावे. आपली अपूर्ण स्वप्ने त्यांच्यावर लादून त्यांच्या जीवनात लुडबुड करू नये... जन्माला घालण्याअगोदर असे काही सहन करण्याचे वचन नवीन पिढीने जुन्या पिढीला दिलेले नसते, हे खात्रीने सांगू शकतो ! एका ठराविक काळानंतर नवीन पिढीला सतत हात धरून पुढे नेणे (त्यांच्या जीवनात / निर्णयात लुडबूड करणे) ही मदत न ठरता त्यांची निर्णयशक्ती, स्वाभिमान व आत्मविश्वास दुबळी करणारी कुबडी बनते आणि वर त्यांच्या चिडचिडीचे कारण बनते, ते वेगळेच.
३. (अ) नवीन पिढी आपल्यापेक्षा जास्त कर्तबगार व्हावी अशी अपेक्षा ठेवताना, त्याच बरोबर (आ) त्यांनी स्वतःच्या उत्कर्षासाठी आपल्याला सोडून दूर जाऊ नये, त्यांच्या प्रत्येक निर्णयापूर्वी आपले मत / संमती घ्यावी, त्यांच्या कामाचा रिपोर्ट सतत देत रहावे आणि त्यावरच्या न मागितलेल्या आपल्या टीप्पण्यांना अंतीम आदेश समजावा, इ, इ, इ, अत्यंत विरोधाभासी अपेक्षा ठेऊ नयेत... किंबहुना अश्या विरोधाभासी अपेक्षा ठेवल्याने आपण नवीन पिढीचे पंख कापत असतो, याचे भान असू द्यावे. आपल्या मागे त्यांना स्वतःच्या बळावरच जगाला तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठीची त्यांची पूर्वतयारी आपण दूरून पाहिली तर त्यांनी स्वबळावर कमावलेले यश आपल्याला अधिकच सुखकारक आणि आश्वासक असेल !
४. वरच्या क्र १ च्या मुद्द्यात अंतर्भूत/निहित (included / implied) असला तरी पुढचा मुद्दा फार महत्वाचा आहे म्हणून जरा जास्त विस्ताराने. एका विशिष्ट वयानंतर निवृत्ती घ्यावी व अर्थार्जन हा उद्देश ठेऊन काम करू नये... मग ते सामाजिक कार्य असो की छंद असो. याचा माझ्या मते अर्थ असा की आपल्याला जबरदस्ती न वाटता आवडणारे काम करावे किंवा सरळ आराम करावा.
यासंबंधीचा निर्णय करण्याचा माझा हिशेब असा आहे...
अ) मी माझ्या मोकळ्या वेळेला एक किंमत आहे असे समजतो (जी प्रत्येकाच्या मताप्रमाणे वेगळी असू शकते). ती वेळ देऊन केलेल्या कामाने होणारा (आर्थिक + मानसिक) फायदा मला त्या कामासाठी सहन कराव्या लागणार्या व्ययापेक्षा (वेळ + शारिरीक व मानसिक त्रास + माझ्या अपूर्ण इच्छांना/छंदांना पूर्ण करण्यासाठी राखून ठेवलेला वेळ, इत्यादींपेक्षा) जास्त असेल तरच ते काम मी करतो.
आ) आपल्या जबाबदार्या पुर्या करताना व वृद्धापकालासाठी आवश्यक धन जमवताना प्रत्येकाच्या अनेक इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. आपले शरीर आणि मन पुरेसे निरोगी व ताकदवान असतानाच त्या इच्छा पूर्ण कराव्यात. त्या वेळेनंतर बँकेत कितीही पैसे पडून असले तरी त्याचा आपल्याला उपयोग नसतो... माझ्या मते ते वरचे पैसे कमवताना खर्च केलेला वेळ, श्रम आणि स्वार्थत्याग निरुपयोगी ठरतो.... शिवाय ते पैसे मेल्यावर पुढच्या उपयोगासाठी बरोबरही नेता येत नाहीत ! ;)
५. थोडक्यात, आपण या जगात एक स्वतंत्र व्यक्ती (तिची परवानगी न घेता) आणली आहे... तेव्हा तिला स्वतंत्रपणे विचार करण्याचा, वागण्याचा, राहण्याचा हक्क आहे आणि आपल्याला तिच्यावर मालकी हक्क गाजविण्याचा अधिकार नाही, हे कधीच विसरू नये.
3 Jan 2018 - 2:24 pm | अभिजीत अवलिया
ह्यात अजून काय जोडावे?
परफेक्ट प्रतिसाद.
3 Jan 2018 - 7:34 pm | स्मिता.
मूळ लेख आणि सर्व पूरक प्रतिसाद अगदी मनापासून पटले.
त्या सगळ्याचे सार वरच्या प्रतिसादाच्या पाचव्या मुद्द्यात आहे.
31 Dec 2017 - 3:39 pm | सचिन काळे
छान लिहिलंय.
31 Dec 2017 - 4:33 pm | नंदन
मनोगत भावलं. दोन्ही डॉक्टरसाहेबांचे प्रतिसादही नेमके.
4 Jan 2018 - 1:52 am | मुक्त विहारि
सुबोध खरे आणि डॉ.म्हात्रे ह्यांचे प्रतिसाद पण एकदम मस्त....
4 Jan 2018 - 4:59 pm | पुंबा
आवडलं.
म्हातारपण फार दूर आहे परंतू अशीच काहीशी फिलॉसॉफी ठेऊन जगायला आवडेल. कितपत जमेल ते ठाऊक नाही.
4 Jan 2018 - 5:24 pm | सानझरी
मुक्तक आवडलं..
सुबोध खरे आणि सुहास म्हात्रे यांचे प्रतिसादही विशेष आवडले..
4 Jan 2018 - 5:59 pm | प्राची अश्विनी
पटली.