टॉक करत डोक्यातील विचारचक्रे फिरवणारा, लोकांच्या मदतीला धावून जाणारा, आपल्या हुशारीने गुंडाना, देशद्रोह्यांना पकडून देणारा हा सहावी-सातवीत भेटलेला हा सुपरटॅलेंटेड सुपरहिरो विदाउट सुपरपॉवर पुन्हा येतोय हे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया होती अर्थातच टॉक!! नवरा देखील फाफे फॅन असल्यामुळे चित्रपट पाहायला जायचा निश्चितच होतं. मग पहिल्या दिवशीच जाऊन आलो.
आपल्याला भेटलेला बन्या आता मोठा झालाय. आत्ताच्या पिढीतल्या कोणत्याही मुलाप्रमाणे तोही मोबाइल, इंटरनेटचा पूर्णपणे वापर करतोय. मेडिकलची प्रवेश परीक्षा द्यायला तो पुण्याला भा. रा. भागवतांकडे येतो. भागवतांकडे झालेली चोरी तो एकदम फाफे स्टाईलने पकडून देतो आणि इथेच आपल्याला आपला फाफे सापडतो. बन्याच्या परीक्षेच्या वेळी एक विचित्र घटना घडते आणि शोध सुरु होते धनेश लांजेकरच्या मारेकऱ्यांचा. ह्या शोधात बन्याची पत्रकार बालमैत्रीण अबोली, छोटा चुणचुणीत मित्र भू-भू आणि स्वतः भागवत आजोबा कशी साथ देतात आणि बन्या करोडोंचा घोटाळा करण्याऱ्या आप्पा या गुंडाला कसे पकडून देतात हे पाहण्यासारखे आहे. चित्रपटाचा शेवट थोडा प्रेडिक्टेबल वाटू शकतो पण चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो.
अमेय वाघने बनेश फेणे हि मुख्य व्यक्तिरेखा अगदी सहजतेने साकारली आहे. त्याचे खरे वय यात कुठेही अडचणीचे वाटत नाही. त्याचा स्क्रीनवरील वावर अतिशय आत्मविश्वासपूर्ण आहे. पर्णनेही तिची भूमिका मनापासून केली आहे. चुणचुणीत शुभम मोरे त्याच्या भूमिकेत भाव खाऊन जातो. दिलीप प्रभावळकर हे भा.रांच्या भूमिकेत शोभून दिसतात. भा.रांना जवळून पाहता आलेले नाही म्हणूनच कि काय दिलीप प्रभावळकर हे दिलीप प्रभावळकर जास्त वाटतात. आणि आता द गिरीष कुलकर्णी.. यांनी नकारात्मक भूमिकेत असूनही आपल्या अभिनयाने आख्खा चित्रपट खाऊन टाकला आहे. कधी कधी तर बन्यावर सुद्धा जड होतो. त्यांची संवादफेक, चीड आणणारे विकट हास्य हे खासच! त्यांच्या तोंडचे संवाद एकदम कडक आहेत. एकंदरीत संवादच उत्तम आहेत. तसेच निष्कारण गाणी, नायक-नायिकेच्या प्रेमप्रकरणाचा सब-प्लॉट हे न दाखवल्यामुळे कथा एकदम वेगात सुरु राहते. बन्या आणि आप्पा ही पात्रे सोडल्यास बाकीच्या व्यक्तिरेखा तितक्याशा सशक्त वाटत नाहीत. विशेषतः भा.रांच्या व्यक्तिरेखेवरही फार कष्ट घेतलेले जाणवत नाहीत. एकदम सुरुवातीचा चिन्मयी सुमित बरोबरचा सीन थोडासा कृत्रिम वाटतो. पण नावं पडून गेल्यावर पुढचा चित्रपट एकदम वेग घेतो.
थोडक्यात, फाफे सारख्या प्रसिद्ध व्यक्तिरेखेला नव्या युगात आणण्याचं धाडस कौतुकास्पद आहे. त्यांनी बन्याला गॅझेट्स आणि इंटरनेट वापरताना दाखवल्यामुळे तो कोणी सुपरहिरो नसून आपल्यातलाच एक स्मार्ट मुलगा आहे, हि जाणीव त्याला अधिक आपलंसं करते. त्यामुळे मुलाबाळांसकट पाहावा असा चित्रपट. त्यासाठी आता एवढे वर्णन य झाल! ;)
प्रतिक्रिया
31 Oct 2017 - 4:20 am | रेवती
पहायचाय हो, पण कधी पहावा ते अजून ठरलेलं नाही.
सिनेमा पहावा असा मेसेज दिला जाणारा तिसरा रिपोर्ट आहे.
दृष्यम सिनेमाबद्दल वाचून, ऐकून पाहण्याआधी जे फीलिंग होतं तेच आत्ता आहे.
31 Oct 2017 - 1:18 pm | हर्मायनी
बघूनच टाका मग एकदाचा!
31 Oct 2017 - 1:41 pm | हेम
टॉक नव्हे... ट्टॉक! :)
31 Oct 2017 - 11:12 pm | दुर्गविहारी
आत्ताच सहकुटुंब पाहून आलो. एकदा आवर्जून पहावा असा आहे. एकदम "टॉक्क!!!!!"
9 Nov 2017 - 11:49 am | नया है वह
आजच फाफे बघून आलो. अगदी मस्त आहे. अमेय फाफेच्या भूमिकेत एकदम फिट बसला आहे. गिरीश कुलकर्णीचा खलनायक जबरदस्त!!!
9 Nov 2017 - 4:47 pm | धर्मराजमुटके
लहान मुलांबरोबर (८-१० वयोगट) पाहू शकतो काय हा चित्रपट ?
9 Nov 2017 - 7:28 pm | सिरुसेरि
नक्कीच .
13 Nov 2017 - 4:45 pm | किसन शिंदे
शुक्रवारी पाहून आलो हा चित्रपट आणि ते ही अर्थातच गिरीश कुलकर्णीच्या अभिनयासाठीच. अपेक्षेप्रमाणे आवडला चित्रपट. वेगवान कथानक आणि त्याला साजेसे पार्श्वसंगीत, जोडीला दृश्य चित्रिकरणासाठी ड्रोन कॅमेर्याचा वापर हे सगळं मस्त जमून आलंय. मराठी चित्रपटांसाठी एवढी सगळी मेहनत घेणार्या रितेश देशमुखचे यासाठी आवर्जून कौतुक करावेसे वाटते.