कपडे ही जिव्हाळ्याच्या माणसांसारखी पण अगदी चिकटून असणारी गोष्ट. त्यामुळेच की काय घरातल्या कपाटापेक्षा मनातल्या आठवणींच्या कपाटात कपड्यांनी थोडी जास्तच जागा व्यापलेली असते. त्यातला हा थोडासा अस्ताव्यस्त पण गंमतीचा कप्पा.
माझ्या सर्वात जुन्या आठवणीतले कपडे मला स्पष्टपणे आठवतात.. (ओरिजिनली) हाफ शर्ट आणि हाफ पँट -- पूर्वाश्रमीच्या फुल पँटची आमच्या शेजारच्या टेलरच्या दुकानातून निघालेली दुसरी आवृत्ती.
त्यानंतरची आठवण म्हणजे दिवाळसणाला गावी जमलेल्या सर्व भावंडांना एका रांगेत उभे करून घातलेले, टेलरने त्याच्या टेलिपॅथीने अंदाज घेऊन शिवलेले, नवीन कपडे. साम्यवादाचं अगदी छोटं घरगुती उदाहरण.
थोडंसं कळत्या परंतु तेवढ्याच अजाणत्या वयात विजोड रंग व परिमाण असलेले कपडे घालून काढलेला एखादा जुना व अतिशय दुर्मिळ फोटो (कदाचित सर्वांपासून लपवून ठेवल्यामुळे असेल) चोरून पाहताना 'मी असा कसा' या प्रश्नासहित येणारं अत्यंत प्रामाणिक हास्य बहुतेक सर्वांनी एकदा तरी अनुभवलं असेलच.
अकार्यक्षम शालेय प्रशासनाने महत्वाचं आणि त्यामुळे उगाचच लांबवलेलं, पँटची लांबी वाढवण्याचं विधेयक अनपेक्षितपणे संमत केल्यामुळे झालेला आनंद कालसापेक्ष आता 'फुल' वाटला तरी तेव्हा महत्वाचा होता.
'आम्ही सगळं कॉलेज मोजक्या कपड्यांवर पूर्ण केलं' (खरं तर मोजक्या अभ्यासावरही, पण ते मनात) असं म्हणणारी माणसं कमवायला लागताच मोजकेपणाचा मोजून-मोजून सूड घेत थोडा वेळ का होईना पण बदललेल्या वाऱ्यासोबत अस्ताव्यस्त पसरतात. आणि जबाबदारीचा चिमटा बसताच आयुष्याच्या तारेवर मोठ्या समजुतीने स्थिरावतात.
एकेकाळी पाच मिनिटात कपडे खरेदी करणारा माणूस जेव्हा एक शर्ट खरेदी करायला दोन तास घेतो त्यावेळी दुःख वेळेचं नसून आरशात दिसणाऱ्या प्रमाणाचं असतं.
प्रतिक्रिया
22 Sep 2017 - 5:46 pm | वकील साहेब
खूप छान. पण अपूर्ण वाटतय. यात अजून काहीतरी हव होत अस वाटतय.
22 Sep 2017 - 6:06 pm | गणेश.१०
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद. हो, कप्पा थोडा अस्ताव्यस्त आणि अपूर्णही आहे. अगदी आवडेल असं सुचलं तर अजून मज्जा येईल.
22 Sep 2017 - 10:38 pm | ज्योति अळवणी
मस्त... पण अजून खुलवता आला असता हा कप्पा