फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत. त्याचे हस्ताक्षर हा एक स्वतंत्र विषय होता. त्या बाबतीत त्याने आजच्या डॉक्टरांनासुद्धा मागे टाकले असते. ते अक्षर फक्त त्यालाच वाचता येत असे. एकूण काय तर तो कधीच कोणाच्याही तडाख्यात सापडालेला नव्हता.
त्याने आपल्या मुलांनाही चांगले तयार केले होते.
होता होता तो सावकार म्हातारा झाला. आता त्याला वेगळीच चिंता लागून राहिली. आपण आता एक ना एक दिवस मरणार. मेलो की आपण नक्कीच नरकात जाणार कारण आपण काहीच पुण्य केले नाही. तेव्हा स्वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे. शेवटी त्याने आपली ही समस्या त्यांच्याकडे नेहमी येणार्या भटजींकडे मांडली. आयती चालून आलेली संधी भटजी कसली सोडतात. ते म्हणाले, "तुम्ही असं करा, एक गाय ब्राम्हणाला दान करा. गाय दान केल्याने खूप पुण्य लाभते आता तुम्ही ती गाय मला दान केलीत तरी चालेल". सावकाराला ही कल्पना आवडाली. तो भटजींना म्हणाला, "आपण हे पुण्यकर्म उद्याच करुन टाकूया". भटजींना खूपच आनंद झाला. ते आपले खुषीत गाजरे खात घरी गेले. पण सावकार त्यांच्यापेक्षा सवाई होता. त्याच्याकडे गोठ्यात एक मरतुकडी गाय होती. ती दूध देत नसे त्यामुळे तिला कोणी काही खायलाही घालत नसे. दुसर्या दिवशी भटजी आले. त्यांना पाहताच सावकाराने आपल्या मुलांना गाईला घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे ते गोठ्यातून गाईला घेऊन बाहेर आले. ती 'लवथवती' गाय पाहून भटजींचे अवसानच गळले. ते सावकाराला म्हणाले, "अहो, ही गाय घेऊन मी काय करु? ही माझ्या घरापर्यंत जाताना वाटेतच मान टाकील". सावकार म्हणाला, "ते मला काही माहित नाही. तुम्ही बर्या बोलाने दान घेताय की **वर तडाखे देऊ"? भटजी करतात काय, त्यांनी नाईलाजाने ती गाय दान म्हणून घेतली आणि ते निघून गेले. त्यांच्या अंदाजाप्रमाणे वाटेतच ती गाय मेली आणि पदरमोड करुन त्यांना ते प्रेत ऊचलून गावाबाहेर टाकावे लागले. त्या सावकाराला त्याचे काही सोयरसुतक नव्हते. तो आपला गाय दान केली या समाधानात होता.
असेच काही दिवस गेले. एके दिवशी तो सावकार आजरी पडला. आजारपण वाढतच गेले. त्याच्या लक्षात आले की आपण काही या आजरपणातून वाचत नाही. आता काय करावे? त्या सावकाराच्या शेजारी एक इनामदारांचा मोठा वाडा होता. त्यांचा एक मोठा मळा होता. ती जमीन एकदम सुपीक होती. ती जमीन लाटण्याचा विचार सावकाराच्या मनात बर्याच दिवसांपसून घोळत होता. त्याने त्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पणा त्याच्या हाती काही लागले नाही. मरणशय्येवर पडलेला असतानसुद्धा त्याच्या डोक्यातून तो मळा गेलेला नव्हता. अचानक त्याला एक कल्पना सुचली. त्याने आपल्या मुलांना बोलावले आणि म्हणाला, "मी आता काही या आजारातून बरा होत नाही. तेव्हा तुम्ही असे करा, मी मेल्यावर माझे प्रेत गुपचूप रात्री त्या इनामदाराच्या मळ्यात नेऊन टाका आणि माझ्या प्रेतावर कुर्हाडीचे वार करुन ठेवा. दुसर्या दिवशी इनामदाराला सांगा की बर्या बोलाने तो मळा आमच्या नावावर करुन दे, अन्यथा आम्ही गावभर बोंब करु की या इनामदाराने आमच्या बापाला मारले. बदनमीच्या भितीने तो इनामदार ताबडतोब मळा आपल्या नावावर करुन देईल" .
असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी तो सावकार मेला. मुलांनी आधी ठरल्याप्रमाणे तंतोतंत बापाचे "क्रियाकर्म" केले आणि तो मळा आपल्या घशात घातला.
अशा रितीने मेल्यावर सुद्धा त्या सावकाराने आपला हिसका दाखवला.
इकडे मृत्यूदूत त्या सावकाराला घेऊन चित्रगुप्ताकडे गेले. चित्रगुप्ताने आपली चोपडी उघडून पाहिली. त्यात सर्व पापाच्याच नोंदी असल्यामुळे त्याने दूतांना त्या सावकाराला घेऊन नरकात जाण्यास सांगितले. पण तो सावकार काही जाण्यास तयार होईना. तो चित्रगुप्ताबरोबर हुज्जत घालू लागला. तो म्हणाला, "मी गाय दान केली आहे. त्याची नोंद तुमच्याकडे कशी नाही? तुमचे डोळे फुटले का? हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. मला तुमची तक्रार केली पहिजे". असे म्हणून तो चित्रगुप्ताबरोबर भांडू लागला. चित्रगुप्ताला हा सर्व प्रकार नवीनच होता. त्याच्यावर भ्रष्टाचारचा आरोप करणारा हा पहिलाच आत्मा होता. त्यामुळे चित्रगुप्तसुद्धा जोरजोराने भांडू लागला. त्या दोघांची अक्षरशः "बा"चा"बा"ची सुरु झाली. शेवटी हा सगळा गोंधळ यमराजांना ऐकू गेला व ते बाहेर आले. त्याबरोबर या दोघांनी आपापले गार्हाणे त्यांच्यासमोर मांडले.
ते सर्व ऐकून घेऊन यमराज सावकाराला म्हणाले, "तू जी गाय दान केली आहेस त्याबद्दल तुला एक दिवस स्वर्गाचा फेरफटका मारता येईल".
ते ऐकून सावकाराला आनंद झाला, तो यमराजांना म्हणाला, "चालेल. पण मला फिरायला काहीतरी वाहन पाहिजे.नाहीतर माझे पाय दुखतील".
यमराज हसले आणि म्हणाले, "ठीक आहे. हा माझा रेडा तू घेऊन जा".
"पण तो रेडा तुमचा आहे. तो मी सांगितलेले कसे ऐकेल"?, सावकाराचा पुन्हा प्रश्न.
त्यावर यमराज रेड्याला म्हणाले, "आजचा दिवस हा सावकार तुझा स्वामी. हा जे सांगेल ते तू ऐकायचे". त्याबरोबर रेड्याने मुंडी हलवली.
सावकार रेड्याला म्हणाला, "मी सांगेन ते तू नक्की ऐकणार ना"?
रेडा म्हणाला, "होय. पण लवकर सांगा कुठे जायचे ते".
सावकार म्हणाला, "सांगतो कुठे जायचे ते. पहिल्यांदा हे दोघे, चित्रगुप्त आणि यमराज आहेत ना त्यांच्या अंगावर चाल कर आणि त्यांच्या पोटात शिंगे खूपस".
रेडाच तो. तो चौखुर उधळला आणि त्या दोघांच्या अंगावर धावून गेला. एव्हाना यमराजांच्या लक्षात सारा प्रकार आला. पण विचार करायला वेळच नव्हता. यमराज आणि चित्रगुप्त जीव घेऊन पळत सुटले. ते दोघे पुढे आणि रेडा आणि सावकार मागे. यमराज आणि चित्रगुप्त ब्रम्हदेवांच्या पुढ्यात येऊन पोहोचले.
यमराजांनी सगळा प्रकार ब्रम्हदेवांना थोडक्यात सांगितला. ब्रम्हदेव म्हणाले,"मी सुद्धा यात काही करु शकत नाही. आपण सगळे भगवान शंकरांकडे जाऊया". एवढे होईतो रेडा तिकडे येऊन पोहोचला. "आता काय करू?", रेडा म्हणाला.
"बघतोस काय? कर तिघांवरही हल्ला. खूपस त्यांच्या पोटात शिंगे", सावकार ओरडला.
ते तिघे पळू लागले. रेडा त्यांच्या पाठीमागे लागला. ही सगळी वरात भगवान शंकरांच्या पुढ्यात येऊन पोहोचली. ब्रम्हदेवांनी झालेला सगळा घोटाळा थोडक्यात कथन केला.
भगवान शंकर म्हणाले, "आपण सगळे भगवान विष्णूंकडे जाऊया. तेच या बाबतीत काहीतरी करु शकतील".
एव्हाना तो रेडा तेथे येऊन पोहोचला होता. त्याला पाहिल्याबरोबर चौघेही पळू लागले.
सावकार रेड्याला म्हणाला, "बघतोस काय? चल त्यांच्या अंगावर".
सगळे पळत पळत भगवान विष्णूंपाशी आले. भगवान विष्णूंनी ही सगळी वरात येताना बघितली आणि चटकन आपले सुदर्शन चक्र रेड्यावर सोडले.
त्याबरोबर रेडा थांबला आणि सावकाराला म्हणाला, "आता याच्यापुढे माझे काही चालत नाही".
सावकार म्हणाला, "काही हरकत नाही. माझे काम झाले. पुढे काय करायचे ते मी बघतो".
असे म्हणून त्या सावकाराने रेड्याच्या पाठीवरुन जी उडी मारली ती थेट भगवान विष्णूंच्या पायाशी. तेथे बसून तो रडू लागला.
यमराजांच्या लक्षात आले की हा आता काहीतरी नवीन गोंधळ घालणार. म्हणून ते विष्णूंना सर्व प्रकार सांगण्याचा प्रयत्न करु लागले. त्याबरोबर सावकाराने आपला रडण्याचा आवाज वाढवला.
भगवान विष्णूंच्या पायाला मिठी मारुन तो सावकार रडत रडत म्हणाला, "भगवान, मला वाचवा. मला अभय द्या. मी संकटात आहे".
विष्णू म्हणाले, "अरे हो हो. पण झाले काय ते तर सांग".
सावकार म्हणाला, "ते काही नाही. तुम्ही मला आधी वचन द्या की तुम्ही मला तुमच्यापसून अंतर देणार नाही".
विष्णू म्हणाले, "ठीक आहे. दिले वचन. मी तुला इथून कुठेही जाऊ देणार नाही. मग तर झाले? आता तरी सांग तुझ्यावर असं कोणते संकट आले ते?"
त्याबरोबर तो सावकार मांडी घालून ठीकठाक बसला आणि म्हणाला, "ते तुम्ही यमराजांना विचारा".
विष्णूनी यमराजांकडे पाहिले. त्यांनी सर्व घडलेला प्रकार सांगितला आणि सावकाराला आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली.
ते सर्व ऐकून भगवान विष्णूंची हसता हसता पुरेवाट झाली.
भगवान विष्णू म्हणाले,"ते काही असले तरी आता तो मला शरण आला आहे. मी त्याला वचन दिले आहे. त्यामुळे तो आता इथेच माझ्याजवळ राहिल".
हे ऐकून यमराज मनातल्या मनात चरफडले. पण करतात काय?
शेवटी ते सगळेजण निघून गेले.
आणि जन्मभर लबाडी करुनसुद्धा तो सावकार स्वर्गात गेला......
प्रतिक्रिया
18 Oct 2008 - 10:26 pm | मंदार
सुंदर.........
सावकाराची हुशारी फारच वाखाणण्याजोगी होती.( म्हणजे लेखकाची हुशारी ) L)
18 Oct 2008 - 10:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चतुर सावकार पापे करुन स्वर्गात गेला, त्याला युक्तीने स्वर्गात घेऊन जाणा-या लेखकाचे कौतुक वाटते. :)
18 Oct 2008 - 11:09 pm | रेवती
मुलांना सांगतात तशी वाटली गोष्ट. तुमची कल्पनाशक्ती चांगली आहे. बर्याच गोष्टी तयार केलेल्या दिसतात.
रेवती
19 Oct 2008 - 1:26 am | प्राजु
मुलांना सांगतात तशा प्रकारची..
"कळलं का बाळा... कसा होता तो सावकार लब्बाड ते!!!".... असं शेवटी वाचायला मिळते की काय असे वाटले. ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Oct 2008 - 6:54 am | फटू
चांदोबात असतात हो अशा कथा... पण शेवट लहान मुलांच्या गोष्टीसारखा वाटला...
असो, सावकाराची युक्ती आवडली हे सांगणे न लगे...
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
19 Oct 2008 - 10:30 am | वेताळ
लाड्यालबाडी करा तुम्हाला उज्ज्वल भविष्य आहे.. ही शिकवण ह्या कथेतुन मिळते.
19 Oct 2008 - 12:32 pm | मनीषा
चांगली बोधकथा ..