हि २०१० सालातील गोष्ट आहे. मी अमेरिकेत नुकताच आलो होतो आणि त्यावेळी स्मार्टफोनचे तितकेसे प्रस्थ नव्हते आणि माझ्याकडेही स्मार्टफोन नव्हता. त्यामुळे बारीक सारीक गोष्टींसाठी गूगल करणे नसायचे. मी माझ्या रूममेट बरोबर रहात होतो आणि अमेरिकेत येऊन मला ४ दिवस झाले होते. घर दाखवताना घरमालकाने इथून १० मिनिटावर किराणा - भाजीपाला ह्यासाठीच दुकान आहे असे सांगितले होते. पहिले २ दिवस भारतातून आणलेले पदार्थ खाऊन काढले पण आज जरा गरम खायची हुक्की आली. रूममेटला कांदा बटाट्याचा रस्सा करता येत होता , तो म्हटला मस्त रस्सा आणि भात करू , तू सामान घेऊन ये . आता किराणा आणण्याची गरज होती. भारतात असताना किराणा भाजीपाला अनेक वेळा आणला होता आणि आपल्याला इंग्लिश येतं त्यामुळे किराणा आणायला काही अडचण येणार नाही असं वाटत होतं . यादी तयार केली. साधी यादी होती : कांदे, बटाटे, टोमॅटो आणि २-३ फळं. पैसे घेऊन मी त्या दुकानात पोहोचलो.
यादीमध्ये प्रथम सफरचंद घ्यायचे होते , मी लगेच फळाच्या विभागात गेलो आणि तिथे पाहतो तो काय तिथे अनेक प्रकारची सफरचंद होती. गाला सफरचंद , फुजी सफरचंद , पिंक लेडी सफरचंद , एम्पायर सफरचंद , ग्रॅनी स्मिथ सफरचंद , फॉरचून सफरचंद ... आणि सगळीच लाल होती. मला आपलं लाल सफरचंद आणि हिरवं सफरचंद एवढंच माहिती पण इथे सफरचंदाचे इतके प्रकार पाहून नक्की कोणतं घ्यायचं हा गोंधळ सुरु झाला. बरं ह्या प्रत्येक प्रकारात रेगुलर आणि ऑरगॅनिक हे आणि परत उपप्रकार ! ऑरगॅनिक घेण्याइतके पैसे मी आणले नव्हते त्यामुळे ऑरगॅनिक घेण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी माझ्याजवळ ज्या regular सफरचंदाचा ढीग होता त्यातले काही घेऊन पुढे निघालो.
पुढचं फळ संत्र , तिथे गेलो तर परत तोच प्रकार ! नेव्हल संत्र , कॅलिफोर्निया संत्र , वेलेंसिया संत्र असे प्रकार आणि हे सर्व संत्रीच बरं , मोसंबी नव्हेत ! त्यातच अगदी संत्र्यासारखं दिसणार फळ पण clementine असं लिहिलं होतं , मला काहीच समजेना आणि त्याखेरीज शेजारी ग्रेपफ्रूट म्हणून होतं , ते थोडाफार आपल्या मोसंबीसारखं दिसत होतं त्यामुळे ते बाद , पण ह्या सगळ्या मधून नक्की कोणतं संत्र घ्यायचं ? भारतात हा प्रश्न कधी पडला नव्हता कारण नुसत्या संत्र्यात इतके पर्याय असतात हेच कधी माहिती नव्हतं. वास घेऊन बघितले तर कशालाच आपल्या संत्र्यासारखा वास येत नव्हता किंवा तिथे इतकी फळं होती कि तो वास बाकीच्या वासात दबून जात होता म्हणा किंवा मी गोंधळल्यामुळे मलाच वास ओळखता येत नव्हते म्हणा .असो कारण जे काही असेल , पण परत अंदाजाने त्यातल्या त्यात जास्ती नारिंगी दिसणार फळ हेच आपल्याला हवं असलेलं संत्र असावं अशी समजूत करून घेऊन ते फळ घेतले . अरे, काय त्रास आहे यार हा ? साधी संत्री घ्यायची तरी गोंधळ! आपल्याला फळं काय घ्यायची हे पण कळत नाहीये ह्याचा राग येऊ लागला. त्यामुळे आता फळं बास, आता थेट भाज्या घेऊ असं ठरवून मी भाज्यांच्या विभागात आलो.
लिस्ट मधील पुढची गोष्ट होती बटाटा.आता मी खुश झालो कारण बटाटा आपल्याला १००% ओळखता येतो आणि त्याला potato म्हणतात हे आपल्याला माहित आहे ह्या जाणिवेने जरा बरं वाटलं आणि मग मी त्या भागात आलो आणि पाहतो तो काय ? इथेही नुसत्या बटाट्यांचे १७६० प्रकार !!! ईडाहो बटाटे , पांढरे बटाटे , सोनेरी बटाटे , लाल बटाटे , सॉल्ट बटाटे , बटर बटाटे , रुसेट बटाटे , बेबी बटाटे , मेडले बटाटे , जांभळे बटाटे , फिन्गरलिंग बटाटे , क्रीमेर बटाटे ... प्रकार संपेचनात ! आता काय करावे ? जांभळे बटाटे, लाल बटाटे वगैरे काही घ्यायचा प्रश्नच नव्हता पण उरलेल्या ह्या पर्यायांमधून काय घ्यायचं हे ठरवणं आता अधिकच कठीण झालं होतं . परत आपलं अंदाजाने त्यातल्या त्यात आपल्या भारतातल्या बटाट्यांच्या जवळ जाणारी वस्तू घेऊन मी पुढे निघालो . आपण सहज किराणा घेऊन येऊ ह्या आत्मविश्वासाला चांगलाच तडा गेला होता.
पुढचा पदार्थ टोमॅटो ... आता इथे काय बघायला मिळतंय अश्या विचाराने थोड्या साशंक मनानेच मी तिथे गेलो आणि परत तेच . बेबी टोमॅटो , रोमा टोमॅटो , बीफस्टिक टोमॅटो , स्नॅकिंग टोमॅटो , vine टोमॅटो , कॉकटेल टोमॅटो , चेरी टोमॅटो , झीमा टोमॅटो , ग्रीनहाऊस टोमॅटो , प्लम टोमॅटो , लोकली ग्रोन टोमॅटो , हॉट हाऊस टोमॅटो , कुमाटो टोमॅटो .... आणि बरेच काही .. अरे काय चाललंय काय ? साधे टोमॅटो घ्यायचेत .. मला आपलं लाल टोमॅटो आणि हिरवे टोमॅटो (कच्चे ) इतकच माहिती. ह्या एवढ्या प्रकारातून आता कोणता टोमॅटो निवडावा हा प्रश्न अभिकच भेडसावू लागला ? बर कोणाला विचारावं तर नक्की काय विचारायचं ? भारतात मिळतो तो टोमॅटो कोणता ? काही कळत नव्हते , फक्त प्रत्येकाच्या निरनिराळ्या किमती मात्र दिसत होत्या . पुन्हा अंदाजानेच टोमॅटो घेतले. माझ्याकडे असलेल्या पैशात उत्तम क्वालिटीचं आणि चवीचं काय मिळेल , आपण जे घेतलय ते कसं लागतं असेल ह्यामुळे माझा गोंधळ उडाला.
साधी यादी होती : कांदे, बटाटे, टोमॅटो आणि २-३ फळं . भारतात असताना १० मिनिटात हे मी घेऊन आलो असतो पण इथे गेले तासभर मी फिरत होतो आणि समोर वस्तू दिसत असून, इंग्लिश येत असून, खिशात पुरेसे पैसे असून आपण घेतलय हे नक्की आपल्या हवय तेच आहे का ह्याचा भरवसा नव्हता . खरंच व्यावहारिक अनुभव आणि पुस्तकी अनुभव ह्यात काय फरक आहे हे मला त्या दिवशी चांगलंच कळून चुकलं. आणि प्रत्येक गोष्टीत इतके पर्याय असणं सोयीचं कि गोंधळ वाढवणारं ? हा प्रश्न पडला.
आता झाला इतका गोंधळ पुरे झाला असे म्हणून मी बिल करायला गेलो. इथे गेल्यावर काउंटरवरील मुलीने बिल केले आणि म्हणाली " Do you want any cash back? " मी विचार केला अरे वा , काहीतरी कॅश बॅक ऑफर दिसतीये, नाकारायचा प्रश्न येतोच कुठे ? बरं झालं , इतक्या सगळ्या गोंधळानंतर हि एक गोष्ट तरी चांगली होतीये , पैसे परत देतीये हि मुलगी , पण असं विचारतीये का ही ? कोण नको म्हणेल कॅशबॅक ला ? असेल काही तरी २%, ५% कॅश बॅक ऑफर असा विचार करून मग मी म्हटलं "येस " , तिचा परत प्रश्न " How much ? " मला काहीच लक्षात येईना, मी विचार केला हि आपल्यालाच काय विचारतीये किती पाहिजेत म्हणून ? मला मस्त १००% पैसे परत मिळावे असं वाटेल पण देणार आहेत का ? जास्तीत जास्त किती पैसे देता येतील तितके द्या ना .. मग मी म्हटलं थोडा अंदाज घ्यावा "How much can I get ? " ह्यावर तिचे परत तेच " As much as you want, upto $100 " मी आधीच भाज्यांच्या निवडीमुळे गोंधळलेलो आणि त्यात हे काही तरी नवीनचं ! माझं बिल जर $२० च्या आसपास झालंय तर हि मुलगी मला $१०० कॅशबॅक का म्हणून देईल ? मग माझ्या लक्षात आलं कि हे प्रकरण आपण समजतोय तसं नाहीये , काही तरी वेगळंच आहे. मग मी तिलाच विचारलं कि नक्की हा कॅशबॅक प्रकार काय आहे ? माझ्यामागे अजून बरेच लोक बिलिंग साठी उभे होते आणि मी बराच वेळ कॅश बॅक प्रकार काय हे समजून नादात त्यांना नक्कीच वैताग दिला असणार. शेवटी मला कळले कि कॅश बॅक म्हणजे समजा तुमचे बिल $३० झाले आहे आणि तुम्ही कार्डने पैसे देणार असाल आणि तुम्हाला काही कॅश हवीये (म्हणजे कॅश साठी परत ATM मध्ये जायला नको) , तर तुम्ही त्यांना सांगू शकता कि $२० कॅश बॅक ... म्हणजे ते लोक तुमच्या कार्ड वर $५० चा चार्ज लावतात आणि तुम्हाला $२० कॅश मध्ये परत देतात ! मी मुळातच कॅश देणार असल्याने खरंतर मला तसा कॅशबॅकचा काहीच उपयोग नव्हता पण केवळ अज्ञानापोटी मी त्या काउंटरवरील मुलीचा आणि माझ्या मागे उभ्या असलेल्या अनेक माणसांचा वेळ वाया घालवून शेवटी निघालो.
त्या दुकानातील सगळ्यांच्या नजरा चुकवत, झालेला गोंधळ मागे टाकत मी जितक्या वेगाने येत येईल तितक्या वेगाने रूमवर परत आलो आणि मग किचनमध्ये जाऊन आणलेलं जे आहे ते रूममेटला दिलं . त्यानेही त्याला वाटत असलेला रस्सा बनवला आणि चव घेतल्यावर लक्षात आलं कि हा कांदा बटाटा रस्सा होण्याऐवजी वेजिटेबल सूप झालेलं आहे !! आणि सफरचंद सोडून आपण काहीच योग्य ते आणलेलं नाहीये. मग काय ? रूममेटला झालेली फजिती सांगता सांगता त्या दिवशीचा बेत रस्सा आणि भात ह्यावरून व्हेजिटेबल मेडले सूप आणि ब्रेडवर कधी गेला हेच कळलंच नाही !
प्रतिक्रिया
4 Sep 2017 - 10:08 pm | पिलीयन रायडर
मेरे दिन याद आ गये!
मी तर पहिल्यांदा गेले तेव्हा "गुणिके साठ" च्या नादात काहीच न घेता परत आले. नंतर घाबरत घाबरत 2-3 अत्यंत आवश्यक वस्तू घेतल्या. 1-2 महिने मी sruja सोबत सतत ग्रोसरीचे बिल ह्या विषयावरच बोलयचे. आता मात्र मी एकदम प्रो झालेय!
लेख आवडला. अजून किस्से येऊ द्या!
5 Sep 2017 - 12:14 am | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
5 Sep 2017 - 12:39 am | एस
अरे हा लेख लेखमालेत शोभला असता की =))
5 Sep 2017 - 12:54 am | डॉ सुहास म्हात्रे
लेखात फक्त समस्याच सांगितली आहे, त्यावर मात कशी केली हा भाग कुठे आहे ?! ;) :)
5 Sep 2017 - 1:47 am | चामुंडराय
दुकानातून जे काही खाद्य पदार्थ आणले ते वापरून जे काही तयार झाले त्यावर ताव मारून मात केलीच कि.
5 Sep 2017 - 1:46 am | रेवती
हीहीही. असे होते बर्याचजणांचे. सुदैवाने माझा आतेभाऊ या सगळ्या चुकांमधून गेला व त्याने मनाशी आपल्या प्रकारच्य स्वयंपाकासाठी भारतीय चवीच्या जवळ जाणारे प्रकार ठरवून ठेवले होते. ते त्याने अठवडाभरात माझ्या कानी घातले व कमी कन्फ्यूज झाले. बेक्ड बीन्स घेताना बेकन्स असलेले घेतले होते. हे दोनदा बेक्ड असतील असे समजून काहीतरी भारी असेल असे वाटले होते. कॅन उघडल्याबरोबर काय ते समजले.
5 Sep 2017 - 10:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
हीहीही...
"बेक्ड"चे द्विवचन "बेकन" होऊ शकते... का नाही बरे ? "ऑक्स"चे अनेकवचन "ऑक्सन" असेच होते, नाही का?! ;) =)) पळा...
5 Sep 2017 - 6:37 am | बाजीप्रभू
परदेशात आलं कि असे गोंधळ खूप होतात...
थायलंडला सुरवातीला... अश्याच एका प्रशस्त मॉलमध्ये मी "अगरबत्ती" शोधत होतो.. सापडेना.. कर्मचाऱ्याला डिस्को डान्स करूनही माझी अगरबत्ती कळेना... शेवटी कागदावर अगरबत्तीचं चित्र काढलं... दोन-तीन काड्या दाखवून धूर देखील दाखवला... तेही कळेना... शेवटी तोच कागद त्याच्या समोर ओवाळला... आणि बुद्धा-बुद्धा-बुद्धा-बुद्धा करून जप केला तेव्हा कुठे त्या पठ्ठयाला कळलं आणि "अगरबत्ती" मिळाली.
स्वित्झर्लंडमध्ये किरकोळ विक्रीला असलेलं मीट नेमकं कोणत्या प्राण्याचं आहे हे विचारण्यासाठी मी चक्क प्राण्यांचे आवाज काढले होते.
गव्हाच्या पिठाला "रुकमेल" म्हणतात हे चारपाच चुकीची पिठं घेतल्यानंतर उमगलं.
असो तुमचा अनुभव आवडला.
5 Sep 2017 - 9:44 am | आनन्दा
हा हा हा.. मी उकडीचे ओदक करायची लहराली म्हणून एक दिवस तांदळाच्या पिठासारखं दिसणारं एक पीठ आणल..
मस्त पैकी पुरण वगैरे करून झाल्यावर उकड काढायला म्हणून त्या पिठात उकळतं पाणी घातलं, आणि ते अस्सं फुगलं म्हणून सांगू.
ते लाह्यांचं पीठ होतं :)
5 Sep 2017 - 9:49 am | आनन्दा
हा अनुभव्मी भारतातल्याच एका शहरात घेतलाय. तेव्हा मी केस वाढवले होते, आणि केसांना सरळ ठेवण्यासाठी जेल लावत असे. एकदा माझी जेल संपली म्हणून एका मेडिकल शॉप मध्ये जेल आणायला गेलो.
तिथे अनेक प्रकार करून देखील त्या बाप्याला हेअर जेल म्हणजे काय ते समजेना. बराच काळ सव्यापसव्य करून झाल्यावर त्याने मला डोक्याच्या केसांना लावायला हेअर रिमूव्हर आणून दिला.
.
.
.
.
दुसर्या दिवशी हजामाकडे जाऊन केस कापून आलो. तिथे बोलायला लागत नव्हते. फक्त बोटाने काय ते दाखवायचे.
(शहर ओळखा पाहू)
5 Sep 2017 - 4:31 pm | तुषार काळभोर
रोम्बा नल्ल इरकं!
5 Sep 2017 - 11:19 pm | अभिदेश
तुमचे जास्त वाढलेले केस बघून त्याने तुम्हाला मुद्दाम हेअर रिमूव्हर आणून दिला असेल. .. :-)
6 Sep 2017 - 2:13 am | मिहिर
अगदी खरंय.
मी अमेरिकेत पहिल्यांदा किराणा दुकानात गेलो होतो तेव्हा फक्त केळी घेऊन आलो होतो, ती एकाच प्रकारची होती निदान त्या दुकानात तरी!
6 Sep 2017 - 10:14 am | पैसा
किस्सा भारी आहे!
(अजून कोणी विचारलं नाही म्हणून) आपण उसात असता का? झाइरातीचा प्रयत्न बराच बरा आहे. =))
7 Sep 2017 - 3:39 am | जुइ
क्या बात है!! अमेरिकेत नव्याने आल्यावरचे दिवस आठवले ;-) .
7 Sep 2017 - 5:09 am | रुपी
हा हा..
मस्त लिहिलंय.. तरी बरं ब्रेड, दूध, दही नव्हते तुमच्या यादीत ;)
मला तर अजूनही नेहमीपेक्षा वेगळ्या दुकानातून दूध घ्यायचं म्हटल्यावर १० वेळा बघून घ्यावं लागतं. त्यातही एक्स्पायरी डेट बघायची राहूनच जाते.