एका वेड्याची रोजनिशी.
ऑक्टोबर ३
आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले.
खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता. मला तो नेहमीच म्हणायचा, “हे बघ मित्रा तुझे डोकं जरा तपासून घे. मला वाटतं त्यात काहीतरी बिघाड झालाय. तू नेहमीच कुठल्यातरी भुताने पछाडल्यासारखा गडबडीत असतोस. शिवाय तुला एखाद्या प्रकरणाचा संक्षिप्त अहवाल दे म्हटले तर तू त्यात इतका गोंधळ घालून ठेवतोस की परमेश्वराच्या बापालाही त्यातून काही समजणार नाही याची मला खात्री आहे. पत्रावर तू कधी समास सोडत नाहीस ना तारीख किंवा क्रमांक.” नालायक लंबू साला. त्याला माझा हेवा वाटतो हेच खरं मी मोठ्या साहेबाच्या केबिनमधे बसतो ना ! शिवाय मी त्यांची पेनं दुरुस्त करून देतो म्हणून त्यांची मर्जी आहे माझ्यावर ! थोडक्यात काय मी ऑफिसला गेलोच नसतो. पण जरा उचल घ्यायची होती म्हणून गेलो.
आमचा साहेब म्हणजे एक हलकट माणूस आहे. त्याच्याकडून पगारापोटी उचल घ्यायची म्हणजे त्याचा चेहरा आकाश कोसळल्यासारखा होतो. जणू काय साल्याच्या खिशातूनच पैसे देतोय. कितीही विनंत्या करा, पाया पडा, अडचणींचा पाढा वाचा पण याला दया येईल तर शपथ. ऑफिसमधे शूर असणारा हा साहेब घरी मात्र बायकोच्या आणि स्वयंपाक करणार्या बाईच्या ताटाखालचे मांजर आहे. सार्या जगाला माहीत आहे.
बँकेत आमच्या खात्यात काम करण्यात काय अर्थ आहे हे मला अजून उमगलेले नाही. आमच्या खात्यात हिरवळच नाही. कायदा विभागाची गोष्ट वेगळी आहे. तेथे एका कोपर्यात एक अजागळ माणूस एका डुगडुगणार्या टेबलावर सतत काहीतरी खरडत असतो. समोर खरकटा कॉफीचा मग असतो. इतका घाण की त्यांच्यावर मला नेहमीच थुंकावेसे वाटते. पण साल्याचे फार्म-हाउस बघा एकदा ! कमी किमतीची भेटवस्तू स्वीकारणे तो कमीपणाचे समजतो. “ हे बाहेर कोणाला तरी द्या असे स्पष्टच सांगतो तो.” दहा हजाराच्या खाली तो कुठलीही भेट स्वीकारत नाही. पण दिसायला कसा अगदी साधा भोळा आहे. बोलणेही अगदी मृदू. मला पेन मागतानाही इतक्या अदबीने मागतो. पण कर्जदाराचे पाय त्याच्या समोर थरथर कापतात हे मी स्वत: पाहिलेय.
आमच्या ऑफिसमधे सगळे कसे व्यवस्थित असते. इतर सरकारी खात्यांच्या कार्यालयांसारखा ढिसाळ कारभार नसतो. टेबले, खुर्च्या अगदी व्यवस्थित चकचकीत असतात. आणि खरंच असे वातावरण नसते तर मी केव्हाच राजीनामा साहेबाच्या तोंडावर फेकला असता.
मी माझा जुना शर्ट चढवला व छत्री घेऊन रस्त्यावर आलो. पावसाची रिपरिप चालू होती. रस्त्यावर गर्दी नव्हती. काही बायका डोक्यावर पदर घेऊन रस्ता पार करायचा प्रयत्न करीत होत्या. थोड्याफार छत्र्या ही दिसत होत्या. ऑफिसला जाणार्यांची गडबड दिसत नव्हती.तेवढ्यात मला एक ऑफिसला जाणारा माणूस दिसला. मी मनात म्हटले, “ पुढे चालणार्या तरुणीच्या नितंबामागे धावणारा तू.... इतरांसारखाच आहेस. स्त्रिलंपट !
बाबांच्या आश्रमातही बायकांच्या मागे लागतात असे माझ्या कानावर आले आहे... काय खरं काय खोटं काय माहीत..! मी असा विचारात बुडलेला असतानाच मी एक कार एका दुकानासमोर थांबलेली पाहिली. मी ती लगेचच ओळखली. बँकेच्या डायरेक्टरची कार आणि ‘त्यातून उतरणारी ती मुलगी त्याची मुलगी असणार.’ मी मनाशी म्हटले.
मी कारण नसताना एका खांबाआड लपलो. ड्रायव्हरने दार उघडले आणि पिंजर्यातून एखादी चिमणी चिवचिवत बाहेर पडावी तशी ती डोळ्यांच्या पापण्या फडफडवत, चिवचिवत बाहेर पडली. ती चालताना मोहकपणे डावीकडे, उजवीकडे मान वेळावत पहात होती... तिला पाहताना माझ्यावर एखादी वीज पडावी अशी माझी अवस्था झाली. खलास झालो मी... पण आश्रमातील बाबांची एक शिष्या मला याहूनही सुंदर भासायची हे खरं...
पण या असल्या हवेत ही बाहेर काय करतेय? आणि ते म्हणतात सुंदर मुली आपल्या चेहर्याची काळजी घेतात... म्हणजे जाहिरातीत तरी असेच दाखवतात..
तिने अर्थातच मला ओळखले नाही. मी छत्री समोर करून स्वत:ला त्यामागे लपवले पण तेही मला जास्त वेळ करता येईना कारण छत्रीला भोके पडली होती. सध्या किती मस्त रंगीबेरंगी छत्र्या असतात नाहीतर माझी...कळकट्ट !
तिच्या छोट्या कुत्र्याला ती आत घेऊन जाऊ शकत नसल्यामुळे तो बाहेरच राहिला. मला हा कुत्रा माहीत आहे. त्याचे नाव मन्या. बहुतेक मनोहरवरून ठेवले असावे नाव. तेवढ्यात मला आवाज ऐकू आला, “मन्या कसा आहेस?” मी चमकून इकडे तिकडे पाहिले. कोण बोलले ते? दोन बायका एका छत्रीतून चालल्या होत्या. त्यातील एक म्हातारी होती तर एक तरुण. त्यांनी मला पार केले, तेवढ्यात मला परत तोच आवाज ऐकू आला, “ लाज वाटायला पाहिजे तुला मन्या.” कोण बोलतय ते.. तेवढ्यात मन्या मला त्या स्त्रियांच्या कुत्रीच्या मागे हुंगत चाललेला मला दिसला. अरे देवा... मला चढलेली तर नाही ना? दारु प्यायल्यावर हे असे भास मला नेहमीच होतात.
“ नाही.. चुकती आहेस तू मने..” मन्याने उत्तर दिलेले मला स्पष्ट ऐकू आले. “ मी भो..भो.. गुर्र... खूप आजारी होतो.” असामान्य कुत्रा ! त्याला मनुष्यप्राण्यासारखे बोलताना पाहून खरं सांगतो मी अवाकच झालो. पण जरा विचार केल्यावर मला बसलेला धक्का ओसरला. जगात अशी अनेक आश्चर्य आहेत. मधे मी इंग्लंडमधे डॉल्फिन पाण्याबाहेर डोकं काढून कुठल्यातरी भाषेत एकमेकांशी संवाद साधतात असे ऐकले होते. ती भाषा अजून शास्त्रज्ञांना उलगडली नाही. मधे तर असेही वाचले होते की टिंबक्टूमधे दोन गायी दुकानात शिरल्या आणि त्यांनी चहाची पावडर मागितली. हे जाऊ देत. पुढे मन्या काय म्हणाला ते विशेष होते,
“मने, मी मधे तुला एक पत्र लिहिले होते. टॉमीने दिले नाही का तुला?”
बाबांच्या आश्रमात प्राण्यांची भाषा समजणारे व त्याच्या आधाराने भविष्य वर्तवणारे काहीजण आहेत पण हे म्हणजे फार म्हणजे फारच भारी होते. पत्र लिहिणारा कुत्रा मला जर कोणी दाखवला तर मी माझा एका महिन्याचा पगार हारीन. गेले काही दिवस फक्त मलाच अशी विद्या प्राप्त झाली आहे. मला जे ऐकू येते ते इतरांना येत नाही याची मला खात्री आहे. केव्हापासून बाबा मला बँक सोडून आश्रमात ये म्हणून आग्रह करत आहेत पण मला बँक सोडवत नाही. कारण एकच, आश्रमाबद्दल माझ्या कानावर कधी कधी विचित्र गोष्टी पडतात.
मी विचार केला या कुत्र्याच्या मागे जाऊन याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. मी छत्री उघडली व त्या दोन बायकांच्या मागे मागे गेलो. टिळक रस्त्यावरून उजवीकडे वळल्या व कॉजवेपाशी एका मोठ्या वाड्यासमोर थांबल्या. हा वाडा मला माहीत आहे. हा पेशव्यांचे सरदार साठे यांचा वाडा. या वाड्याचा मालक अमानवी श्रीमंत आहे. त्याच्या गाड्या, त्याच्याकडे झडणार्या मेजवान्या, त्याचे स्वयंपाकी, त्याचा जेवणाचा हॉल....हे सगळे विषय चवीने चघळले जातात त्या गल्लीत. आमच्या बँकेतील काही अधिकारी तर येथे रोज संध्याकाळी पडलेले असतात म्हणे... हा साठे बाबांचा शिष्य आहे म्हणे अर्थातच मी त्याचा कधीच फायदा घेतला नाही. मला पटतच नाही ते. माझा एक मित्र तेथे नियमित सतार वाजवायला जातो...त्यामुळे मला त्या वाड्याची बरीच माहिती आहे.
त्या बायका वाड्यात दुसर्या मजल्यावर गेल्या. ठीक आहे मी कुठल्या घरात त्या गेल्या हे नीट पाहून ठेवले. ‘नंतर याचा छडा लावता येईल’ मी मनात म्हटले.
ऑक्टोबर ४
आज बुधवार. नेहमीप्रमाणे मी आज बँकेत गेलो. मी आज जरा लवकरच आलो. मला पेनं जमवायचा आणि दुरुस्त करण्याचा छंद आहे. लवकर आल्यावर मी खिशातून एक पेन काढले व ते बाथरूममधे जाऊन पाण्याखाली धरले व पाणी पुसण्यासाठी फडकं शोधू लागलो.
आमचा डायरेक्टर एक बुद्धिमान माणूस आहे. त्याची खोली पुस्तकांनी भरुन गेली आहे. ती जाडजूड अवघड विषयांवरची पुस्तके पाहूनच माझ्या सारख्या माणसाची छाती दडपून जाते. त्यात काही जर्मन व संस्कृत पुस्तकेही आहेत. त्याच्या चेहर्याकडे पहा जरा....त्याच्या डोळ्यात विद्वत्तेची झाक दिसली नाही तर माझे नाव... त्याच्या तोंडातून आजवर मी एकही फालतू शब्द बाहेर पडताना ऐकलेला नाही. फक्त जेव्हा तो माझ्या हातात एखादी फाईल देतो तेव्हा मात्र तो “ काय विचित्र हवा पडली आहे आज” हे वाक्य न विसरता उच्चारतो. याचा अर्थ मला अजून समजायचा आहे.
पण तो आमच्या कॅटलक्लासमधे मोडत नाही हेच खरं. मला माहीत आहे मी त्याला आवडतो.. आता त्याच्या मुलीलाही तसे वाटले तर... काय मूर्खपणा लावलाय..त्यावर न बोललेलं बरं. मीही काही बंगाली लेखकांची पुस्तके वाचली आहेत. किती बावळट असतात हे बंगाली. यांचा एकदा मला समाचार घेतलाच पाहिजे. मी एका कानडी लेखकाने केलेले चेंडूचे वर्णन वाचले आहे. फारच मस्त लिहिलय त्याने.
तेवढ्यात माझ्या लक्षात आले की डायरेक्टरसाहेब अजून ऑफिसमधे आलेले नाहीत. साडेबारा वाजले. मी त्यांची वाट पहात बसलो आणि साधारणतः: दीड वाजता कुठलेही पेन वर्णन करू शकणार नाही अशी घटना घडली. दार उघडले. मला वाटले साहेबच आले असणार. मी हातातील कागद घेऊन ताडकन खुर्चीतून उठलो. तेवढ्यात उघड्या दारातून ती आत आली. हो तीच ! अरे देवा... काय सुंदर साडी नेसली होती तिने. चंदनी रंगाच्या तिच्या साडीला चंदनाचा वास येत होता.
सुंदर अतिसुंदर !
तिने मला अभिवादन केले. “ बाबा अजून आले नाहीत का ?” तिचा आवाज मला एखाद्या स्वर्गीय कोकिळेसारखा भासला मला. स्वर्गीय कोकिळा... “ हे सुंदरी माझ्यावर असे नजरेचे वार करू नकोस. मला मारायचेच असेल तर तुझ्या सुकुमार हातांनीच मला खतम कर” असे मला म्हणावेसे वाटले पण प्रत्यक्षात मी म्हणालो, “ नाही ते अजून आलेले नाहीत.
तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला व पुस्तकांवर नजर फिरवली. तेवढ्यात तिचा रुमाल खाली गुळगुळीत फरशीवर पडला, का टाकला कोणास ठाऊक. मी तो उचलण्यासाठी पुढे गेलो पण घसरून नाकावर आपटलो. मी कसाबसा तो हातरूमाल उचलला. त्याच्या स्पर्शानेच माझ्या अंगावर रोमांच उठले. तिने माझे आभार मानले. माझ्याकडे पाहून ती इतकी गोड हसली की तिचे मधाळ ओठ तिच्या हास्यात विरघळले जणू. मग ती बाहेर गेली. मी स्वप्नवत अवस्थेत तेथेच एक तासभर बसलो. तेवढ्यात एका झाडूवाल्याने आत येऊन मला माझ्या तंद्रीतून जागे केले. नालायक कुठचा...‘ बुआ, साहेब बाहेर पडलेत आता तुम्ही घरी जाऊ शकता...”
मला ही आगाऊ मंडळी अगदी सहन होत नाहीत. एकदा तर एका बसमधे एकाने मला त्याच्या कळकट्ट हाताने मला तंबाखू मळून खाण्याचा आग्रह केला होता. आता त्याला कसे सांगू मी बँकेत एक अधिकारी आहे आणि घरंदाज आहे. आम्ही घरंदाज आहोत असे आमचे बाबा म्हणतात. मधे एकदा पोलीस आश्रमात आले होते, तेव्हाही तो पोलीस असेच म्हणाला होता, ‘ तुमच्यासारख्या घरंदाज माणसांकडून ही अपेक्षा नव्हती.” आता पोलीस म्हणाला म्हणजे आमचे घराणे घरंदाज असणारच... नाही का? त्याला चांगलेच खडसावेसे वाटले मला..
पण त्यावेळी मात्र मी छत्री घेऊन डायरेक्टरच्या घराकडे घाईघाईने मोर्चा वळवला. तेथे बराच वेळ ती बाहेर येईल म्हणून वाट पाहिली. नंतर घरी येऊन पलंगावर बराच वेळ पडून राहिलो. एकदम उठलो आणि एक कविता खरडली.
तुला पाहिले
जन्माची ओळख पटली
माझ्या अस्तित्वालाच अर्थ उरला नाही
कसे जगू तुझ्याशिवाय प्रिये..
नंतर आठवले की ती कविता एका प्रसिद्ध कवीच्या कवितेची भ्रष्ट नक्कल आहे. फाडून टाकली.
संध्याकाळी मी परत एकदा डायरेक्टरच्या घरावर एक चक्कर मारली. ती बाहेर येईल या आशेने मी तेथे बराच वेळ रेंगाळलो. मला फक्त तिला एकदाच पहायचे होते. पण ती काही बाहेर आली नाही.
६ नोव्हेंबर
आमच्या हेडक्लार्कचं डोकं फिरलंय. मी ऑफिसमधे गेल्यागेल्या शिपायाने त्याचा मला बोलावले आहे हा निरोप दिला. मी टाकोटाक त्याच्या केबिनमधे गेलो. गेल्यागेल्या त्याने मला फैलावर घेतले, “ तुला वेड लागलंय का? नाही तुझ्या डोक्यात महमदी कल्पनांची कारंजी थुईथुई उडायला लागली आहेत म्हणून विचारतोय.”
“ नाही..का काय झालं?”
“ तुझ्या वयाचा तरी विचार कर आणि मग त्या मुलीच्या मागे लाग. तुला काय वाटले मला काही कळत नाही? ती कुठे आणि तू कुठे? तू एक फडतूस कारकुनही नाहीस. एक मोठे शून्य आहेस तू. आणि ते सुद्धा असले की ज्याने कुठल्याही आकड्यांची किंमत वाढणार नाही. तुझी एक दमडीची किंमत नाही. एकदा जरा आरशात पहा म्हणजे कळेल. व्यंगचित्रात सुद्धा चेहरे बरे दाखवतात असा तुझा चेहरा. तुझ्या डोक्यात असले विचार येतात तरी कुठून?”
नरकात खितपत पडोत त्याची पितरे आणि तो ! त्याचा स्वत:चा चेहरा डोस चिकटवलेल्या औषधाच्या बाटली सारखा दिसतो कारण बावळट त्याचे कुरळे केस मागे वळवतो तर कधी कपाळावर ओढतो. स्वत:ला फार हुशार समजतो साला. तो माझ्यावर का डूख धरून आहे हे मला चांगलेच माहीत आहे. डायरेक्टरची माझ्यावर मर्जी बसली आहे म्हणून जळतो माझ्यावर. बाकी काही नाही. पण मी कशाला त्याची पर्वा करू ? या हेडक्लार्क नावाच्या जनावराला एवढे महत्त्व का द्यायचे? गळ्यात सोन्याची साखळी आहे म्हणून, का चमकणारे बूट घालतो म्हणून. का चांगले टाय घालतो म्हणून ? अरे मी पण काही एखाद्या फडतूस हेडक्लार्कचा मुलगा नाही. माझे घर पाहिले नाहीस अजून. महाल आहे महाल. अर्थात माझ्या बापाचा आहे पण मी तेथेच राहतो ना. थोडे दिवस थांब. माझे वय आत्ताशी बेचाळीस आहे. मी नाही तुला मागे टाकले तर माझे नाव नाही सांगणार. मीही गळ्यात सोन्याची साखळी अडकवीन, महागडे कपडे घालेन व पायात चमकणारे बूट घालेन.
पण माझ्याकडे पैसे नाहीत. काय करू ? बापाकडे रग्गड पैसा आहे पण मला हात लावून देत नाही. म्हणे मी काही करत नाही. बँकेतील नोकरी टिकवली तरी खूप आहे. काय करायची आहे असली नोकरी ? पण आश्रमात नको जायला. भीती वाटते मला आश्रमाची. असो...
थोडक्यात पैसे नाहीत ...
८ नोव्हेंबर
आज दस्तूरमधे इंग्लिश नाटकाला गेलो होतो. रशियन लेखकाचे हाउस ऑफ फूल्स हे कोणीतरी इंग्रजीमधे रुपांतर करून सादर केले होते. बरेच नट पारशी होते. कित्येक दिवसांनी पोट धरून हसलो. नाटक विनोदी आणि बोचरे आहे. मधून मधून गाणीही आहेत. व्यापारी कसे फसवतात, त्यांची मुले कशी व्यभिचारी आहेत व सभ्य माणसांबरोबर कशी उद्धट वागतात याचे चांगले चित्र उभे केले आहे. अर्थात व्यापाऱ्यांना काय नावे ठेवायची म्हणा ! आमचा बापही हेच करतो. व्यापारी मालात, पैशात फसवतात तर आमचा बाप शिष्यांच्या आत्म्यांना फसवून त्यांचे पैसे काढून घेतो. नुकतेच ऐकले की आमच्या बापाने सर्व शिष्यांना मठाची नवी इमारत बांधण्यासाठी पगाराच्या दोन टक्के रक्कम देणगी द्यावी असे आवाहन केले आहे. आणि ते मूर्ख लोक देतील याची मला खात्री आहे. आणि माझ्याकडे साधे नाटक पहायला पैसे नाहीत. बापाची जागा मिळाली तर मी रोज मठात नाटके लावेन आणि सगळ्यांना फुकट दाखवेन. पण बाप मेल्याशिवाय त्याची जागा मिळणार नाही आणि नंतरही त्याच्या शिष्यांनी दिली तर मिळणार. काहीतरी केले पाहिजे... काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे...
गंमत म्हणजे नाटकात टीकाकारांवर बोचरी टीका केली आहे... म्हणे ते लेखकांच्या फक्त चुकाच काढतात. इतक्या की लेखकांना जनतेपुढे पदर पसरून रक्षणाची भीक मागावी लागते... असे काहीतरी लिहिले होते त्यात. ही नवनाट्य चळवळीतील मंडळी कमाल लिहितात बुआ. मला त्यांची नाटके फार आवडतात. सहजा सहजी मी ती चुकवित नाही अर्थात खिशात पैसे असले तर. बँकेतील माझे सहाध्यायी अडाणी आहेत. खर्डेघाशी शिवाय त्यांना काहीही येत न आणि तिकीट काढून तर मुळीच नाही. कोणी फुकट तिकिटे ओंजळीत टाकली तर हे जाणार...
एका नटीने एक गाणे फारच सुंदर सादर केले. मला तर तिची आठवण झाली...
९ नोव्हेंबर.
आज सकाळीच आठ वाजता ऑफिसमधे गेलो. हेडक्लार्कने मी लवकर आलो होतो तरीही माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. मी पण तो या जगात नसल्यासारखा ऑफिसमधे वावरलो. मी कागदपत्रे वाचली आणि सगळी नीट संगतवार लावून ठेवली. चार वाजता मी बँक सोडली आणि मुद्दाम वाट वाकडी करून डायरेक्टरच्या घरावरून गेलो. पण तेथे कोणीच दिसले नाही. रात्रीच्या जेवणानंतर झोप न आल्यामुळे बराच वेळ बिछान्यात तळमळत पडलो.
११ नोव्हेंबर
आज डायरेक्टर साहेबांच्या केबिनमधे बसून त्यांची भारी पार्करची जुनी पेनं दुरुस्त करून दिली. सगळे हँडक्राफ्टेड होती. त्यात आमच्या बाईसाहेबांचेही एक होते. ते जरा जास्त काळजीपूर्वक हाताळले. या सगळ्यात बराच वेळ चांगला गेला.
आमच्या साहेबांना त्यांच्या टेबलावर अशी भारी पेनं ठेवायला फार आवडते. त्यांची बुद्धिमत्ता फार कुशाग्र आहे. ते नेहमीच शांत असतात पण ऑफिसमधील अगदी किरकोळ बाबी सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. आमचा बापही बँकेत कारकून होता. पण स्वामी झाल्यापासून त्यांचे पेन सुटले. पुस्तके तर ते कधीच वाचत नव्हते. आमचा बाप म्हणजे अत्यंत सामान्य बुद्धिमत्तेचा माणूस... बँकेतील कारकुनी सोडून अध्यात्मात पडला आणि गडगंज पैसा मिळवला. मला त्याचा आणि त्यांच्या शिष्यांचा तो ढोंगीपणा मुळीच आवडत नाही. आई गेल्यावर तर काय आमचा बाप आश्रमात रहायला गेला. तेथे काय रंगढंग उधळले असतील त्याने त्याला माहीत आणि त्याच्या देवाला माहीत. पण आमच्या डायरेक्टर साहेबांचे तसं नाही. त्याच्या डोक्यात डोकावून पहायला आवडेल मला. म्हणजे एवढी बुद्धी असते म्हणजे मेंदूत नक्की काय वेगळे असते हे कळेल. कापावा का त्याच मेंदू एकदा? मला एकदा त्यांच्या मित्रमंडळीत मिसळायचे आहे. कसल्या गप्पा मारतात हे पहायचे आहे कित्येकदा त्यांना विचारावे असे मला फार वाटते पण ते समोर आले की माझी जीभ घशातच अडकते...
साहेबांच्या घरी अनेक वेळा जाणे झाले पण ती मात्र कधीच भेटली नाही. बहुतेक ती नसतानाच ते मला बोलावत असावेत...नाही पण ते असे मुद्दाम नाही करणार . उमदा माणूस आहे. त्यांच्या घरात एक जादा खोली आहे आणि त्या खोलीमागे एक खोली आहे जिचा विचार केला तरी माझ्या छातीतील धडधड वाढते. आरसेमहालच आहे तो. मांडणीत उंची काचेचे सामान सुबकपणे मांडून ठेवलं आहे. पण मला महाराणींच्या कपडे बदलण्याच्या खोलीत खरा रस आहे. तेथे अनेक प्रकारची अत्तरं मांडून ठेवलेली मला पहायची आहेत. श्वास घ्यायलाही भीती वाटते अशी सुगंधी अत्तरे... पण गप्प बस जरा...
आज एक भन्नाट कल्पना डोक्यात आली. त्या दोन कुत्र्यांचे संभाषण मला आठवले. ‘चला बरं झालं. आता काय करायचंय हे स्पष्ट झालं’ मी मनाशी म्हटले. त्या दोन मूर्ख कुत्र्यांचा पत्रव्यवहार काहीतरी करून वाचण्यासाठी मिळवायला पाहिजे. कदाचित त्यात मला माझ्या बर्याच प्रश्नांची उत्तरे सापडतील. आमचा बापही असेच म्हणतो, ‘माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. पैसे फेका उत्तरे मिळवा.पण ही कुत्री मला जास्त प्रामाणिक वाटतात. तीच बरी ...
मी यापूर्वीच एकदा मन्याला एकांतात गाठले होते. ‘हे बघ मन्या आपल्याशिवाय आता येथे कोणी नाही. मी दरवाजाही बंद करून घेतो म्हणजे तुला कसलीही भीती नको. मला तुझ्या मालकिणीची सगळी माहिती दे ! मी कोणालाही सांगणार नाही.” पण त्या बदमाष कुत्र्याने शेपूट पायात घातली. मागे सरकून त्याने आपले अंग गदागदा हलवले आणि काही ऐकलेच नाही अशा अविर्भावात बाहेरचा रस्ता पकडला.
फार पूर्वीपासूनच माझे मत आहे की कुत्री माणसांपेक्षा खूपच हुशार असतात. ते बोलू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे ते हे रहस्य उघड करत नाहीत. त्यांचे सगळीकडे अगदी बारीक लक्ष असते. त्यांच्या तिखट नजरेतून काहीच सुटत नाही. उद्या काहीही झाले तरी मला नव्यापुलाजवळ मनीच्या घरी गेलेच पाहिजे. आणि जर असेल नशिबात तर मन्याने मनीला लिहिलेली सगळी पत्रे मिळतील.....
१२ नोव्हेंबर
आज दुपारी दोन वाजता मी काहीतरी करून मनीची गाठ घेण्यासाठी निघालो. मला तिला काही प्रश्न विचारायचे होते. त्या कॉजवेच्या भागातील हवेचा एक प्रकारचा दर्प मला मुळीच आवडत नाही. बहुतेक गटाराचा असावा. शिवाय प्रत्येक घरातून पेटलेल्या चुलींमुळे सगळी कडे नुसता धूर भरून राहिला होता. अगदी जीव घुसमटून टाकणारा धूर.
मी दुसर्या मजल्यावर गेलो व बेलचे बटण दाबले. एका सुंदर पण चेहर्यावर ठिपके असलेल्या तरुणीने दार उघडले. “कोण हवंय?”
“मला तुमच्या कुत्र्याशी जरा बोलायचंय.”
फारच साधी मुलगी होती ती. तिचा कुत्रा जोरजोरात भुंकत पळत तेथे आला. मला त्याला पकडायचे होते पण त्या नालायक कुत्रीने माझे नाक तिच्या दातात पकडले. तेवढ्यात मला कोपर्यात तिची झोपण्याची टोकरी दिसली. ‘हंऽऽ मला हेच पाहिजे होतं’. मी पळत तेथे गेलो. ती पालथी केली. व कागदाच्या तुकड्यांचा एक गठ्ठा बाहेर काढला. त्या कुत्रीने हे पाहिल्याबरोबर माझ्या पोटरीचा चावा घेतला. मी केलेली चोरी पहाताच ती माझ्याकडे हिंस्रपणे बघत गुरगुरली. पण माझे काम झाले होते. मी तिला म्हटले, “ त्याची आता जरुरी नाही...बाय ! बाय !”
हा सगळा प्रकार पाहून त्या मुलीला मी वेडा असल्याची खात्री पटली असणार. ती घाबरली.
मी घरी पोहोचल्यावर मला वाटले लगेचच दिवसाउजेडी ती पत्रं वाचायला बसावं कारण रात्री मला नीट दिसत नाही पण मोलकरणीने फरशी पुसायला घेतली होती. यांना हा नसता उद्योग नको त्यावेळी करायला कोण सांगतं कोण जाणे. चडफडत मी मग जरा चक्कर मारायला गेलो. चालता चालता काय घडले त्यावर विचार करू लागलो. आता मला त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी जाता येईल. कुत्री ही अत्यंत हुशार असतात. त्यांना राजकारणातले सगळे कळते. या पत्रात माल जी माहिती हवी आहे ती सगळी मिळणार याची मला खात्री आहे. विशेषतः: डायरेक्टर साहेबांच्या स्वभावाबद्दल व त्यांच्या नातेवाईकांबद्दल. शिवाय या पत्रांतून तिच्याबद्दल..... गप्प बसायला काय घेशील?
१३ नोव्हेंबर.
आता बघू. पत्रातील अक्षर तसे वाचता येतंय पण जरा कुरतडल्या सारखं दिसतंय....
प्रियतमे मने,
तुझ्या या अत्यंत सामान्य, फालतू नावाची मला सवय होणे कठीणच आहे. त्यांना तुझ्यासाठी दुसरे चांगले नाव सुचले नाही का? मनी...शीऽऽऽऽ किती बंडल आणि अतिसामान्य नाव. पण त्याच्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आपण एकमेकांना पत्रं लिहिण्याचा निर्णय घेतला ते एका अर्थाने छानच झालं असे म्हणायला हवे.
(पत्र तसे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर लिहिलंय. आमचा हेडक्लार्कही एवढे अचूक लिहू शकत नाही. लेकाचा विद्यापीठात होता म्हणे.)
आपल्या भावना, विचार आणि मतांची देवाणघेवाण करणे. मला वाटते या जगातील सगळ्यात निर्भेळ आनंद देणारी ही गोष्ट असावी.
(हंऽऽऽऽ हे वाक्य कुठल्यातरी पुस्तकातील चोरलेले आहे हे निश्चित. कुठल्या ते आता आठवत नाही.)
जरी मी आमच्या घराचा दरवाजा एकट्याने ओलांडलेला नाही तर मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. किती आनंदात आयुष्य चालले आहे माझे. माझी मालकीण, जिला तिचे वडील नूतन अशी हाक मारतात, ती माझ्या प्रेमातच पडली आहे.
( अरे लबाडा.....पण गप्प रहा....)
तिचे वडीलही मला कधी कधी प्रेमाने कुरवाळतात. मी ताज्या दुधाचा चहा आणि क्रीमची बिस्किटे खातो. होय लाडके मला तुला सांगण्यास बिलकुल लाज वाटत नाही की मला ती किचनमधे टाकून दिलेली हाडे मुळीच आवडत नाहीत. मी फक्त हाडांमध्ये मगज असलेली तित्तरची हाडे चघळतो. रिकामी हाडे मला बिलकुल आवडत नाहीत. पण मला सगळ्यात तिरस्कार कशाचा वाटत असेल तर माणसांच्या कुत्र्यांना उष्टे खायला घालण्याच्या सवयीचा. घाणेरडे.... अर्थात कधी कधी आपल्या भिडस्त स्वभावामुळे आपण ते खातो...
( हा काय बावळटपणा लावलाय...दुसरे काही लिहायला मिळाले नाही वाटतं यांना. पुढच्या पानावर कदाचित काहीतरी मिळेल...)
येथे काय चालते हे मी तुला सांगतो. आमच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे नूतन ज्याला बाबा म्हणून हाका मारते तो. फारच विचित्र माणूस आहे.
( आमच्या बापाइतका निश्चितच नसणार. पण बघुया काय विचित्रपणा करतो तो... पण आता निश्चितच काहीतरी गवसणार. मी म्हटले नाही, त्यांचे सगळीकडे बारीक लक्ष असते आणि हे कुत्रे पक्के राजकारणी असतात..
.... विचित्र माणूस. बहुतेक वेळा तो शांत असतो. क्वचितच बोलतो. पण मागच्या आठवड्यात तो एक कागद हातात घेऊन स्वत:शीच बडबडत होता, ‘मिळेल का मला ते... मिळेल का...?” दुसरा हात त्याने आकाशात पसरला होता. एकदा तर माझ्याकडे वळून ते म्हणाले, “ मन्या तुला काय वाटते. मिळेल का मला?ते काय म्हणत आहेत यातील एकही शब्द मला कळला नाही. मी त्यांच्या बुटाला शेपटी घासली व तेथून निघून गेलो. पुढच्याच आठवड्यात सकाळी बँकेचे अनेक कर्मचारी, अधिकारी आमच्या घरी आले. त्यांनी सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर जेवणे अगदी हसतखेळत झाली. मला चांगलं आठवतंय.
( हंऽऽ म्हणजे ते फारच महत्त्वाकांक्षी दिसतात..लक्षात ठेवले पाहिजे. माझी खरी महत्त्वाकांक्षा बाबांची जागा घ्यायची ही आहे पण बाबा आश्रमात पाऊल टाकून देत नाहीत. विचारले तर ‘शहाणा आहेस’ असे उत्तर देऊन गप्प करतात.)
माफ कर प्रिये..मी आता पत्र पुरे करतो.....(इ.इ.इ....) उद्याच मी हे पत्र पूर्ण करेन वचन देतो तुला...
... सांगितल्याप्रमाणे लाडके मी परत पत्र लिहायला घेतोय. आज माझी मालकीण नूतन..
( हंऽऽऽ बघुया आता काय लिहितोय तो नूतनबद्दल..)
...फारच उल्हसित दिसत होती. आज ती कँपात एका डिस्कोथेकमधे नाचायला गेली होती. ती नसताना त्यामुळेच मला शक्य झालंय. तिला नाचायला फार आवडते. पण तिला चांगले कपडे घालण्याचा फार कंटाळा येतो. नाचून एवढा कसला आनंद मिळतो हे मला अजून उमजलेले नाही. कधी कधी ती रात्री जाऊन पहाटे गुपचूप घरी येते. त्यावेळी मात्र मला गप्प रहावे लागते. तिच्या मलूल चेहर्याकडे पाहून मी सहज सांगू शकतो की तिने रात्रभर काही खाल्लेले नाही. मी तर असे न खाता राहूच शकत नाही. मला जर कोंबडी मिळाली नाही तर माझं काय होईल ते सांगता येत नाही. अंडी ठीक आहेत पण गाजरं, ढोबळी मिरची माझ्या अन्नात मला मुळीच चालत नाहीत...
(लिहिण्याची पद्धत फारच आगळीवेगळी आहे. कोणी माणसाने लिहिले नसणार हे लगेचच लक्षात येते. सुरवात तर फारच छान केली आहे पण नंतर मात्र वळणावर गेले... मी दुसरे पत्र वाचायला घेतो. यावर तारीख नाही.) (आमचे वडीलही महाराज होण्यापूर्वी आईला पत्रे लिहायचे म्हणे. नंतरही ते पत्र लिहायचे पण त्यांच्या लाडक्या शिष्येला. एक विधवा होती ती. होतीच म्हणायला पाहिजे. कारण आता ती या जगात नाही. तिचा संशयास्पद मृत्यू झाला म्हणे. त्यानंतर बहुधा आमच्या बापाने पत्रं लिहिण्याचे बंद केले ते केलेच..)
.. लाडके वसंत ऋतूचं आगमन किती आल्हाददायक असते नाही? कोणाची तरी आस लागल्यासारखे माझे हृद्य तडफडते आहे. माझ्या कानात काहीतरी गुंजन करतंय आणि मी कित्येक वेळा एका पायावर उभा राहून दाराकडे टक लावून बघत बसतो. तुला सांगायला हरकत नाही, माझे चाहते भरपूर आहे. मी बर्याच वेळा खिडकीत बसून ते जा ये करत असताना त्यांच्याकडे पहात बसतो. तुला सांगतो परमेश्वराने काय काय नमुने जन्माला घातले आहेत....! काही बावळट, पाळलेले कुत्रे, चेहर्यावरची माशी हालणार नाहीत असे कुत्रे रस्त्यावर एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसारखं चालत असतात. त्यांना वाटत असते की सार्या जगाचे डोळे त्यांच्यावरच खिळलेले आहेत. त्यांच्याकडे तर मी ढुंकूनही पहात नाही. काय पण एकेक नमुने पहायला मिळतात...
आणि समोरच्या खिडकीत एका अक्राळविक्राळ बुलडॉग असतो. एवढा मोठा की बस्स.. जर तो मागच्या पायावर उभा राहिला तर नूतनच्या वडिलांपेक्षाही कदाचित उंच होईल... अर्थात त्याला मागच्या पायावर उभे रहाता येईल की नाही ही शंकाच आहे. हा ठोंब्या अत्यंत निर्लज्ज आहे. मी त्याच्यावर गुरकावतो पण त्याला त्याचे काहीही वाटत नाही. त्याने त्याच्या कपाळावर आठ्या घातल्या तरी हरकत नाही पण तो माझ्याकडे सरळसरळ दुर्लक्ष करतो. मी जर थोडा भुंकलो तर तो जीभ बाहेर काढतो, कान पाडतो आणि परत खिडकीबाहेर नजर लावतो. रानटी ! पण लाडके मला काहीजण आवडतात बरका. तो शेजारच्या कुंपणात सरपटत शिरणारा कुत्रा मला खूपच आवडतो. त्याचे नाक किती सरळ आणि सुंदर आहे... त्याचे नावही मस्त आहे...जॉनी ..कुठल्याशा सिनेमावरून ठेवले आहे म्हणे.
( काय साला फालतूपणा चालवलाय यांनी. कशाला कागद काळे करतात कोणास ठाऊक. मला माणसांबद्दल सांगा रे. माणसांबद्दल. त्याने माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल. दिशा मिळेल. जाऊ देत . मी दुसरे पत्रच वाचतो...)
(आमचा बाप तर कागद काळे करायच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या आवाजात जादू आहे म्हणे. स्वत: वेडा आहे पण दुसर्याला वेड लावतो. शिवाय लिहिले म्हणजे पुरावा मागे राहतो. अक्कल उघडी पडते....)
... नूतन टेबलावर बसून काहीतरी भरतकाम करीत होती. आमची नूतन घर कामातही तरबेज आहे बरं का...! मी नेहमीप्रमाणे खिडकीबाहेर पहात टवाळक्या करत होतो. तेवढ्यात घरचा नोकर आला व म्हणाला, “साहेब आले आहेत..”
“ त्यांना घेऊन ये इथे...” “ मन्या, मन्या,कोण आहेत ते माहिती आहे का? ते गोरेपान गृहस्थ मोठे सरकारी अधिकारी आहेत. आणि काय त्याचे डोळे आहेत..निळेशार.. आणि मुख्य म्हणजे गारगोटी सारखे निर्जीव नाहीत तर तेजस्वी...”
नूतन पळतच तिच्या खोलीत गेली. पुढच्याच क्षणी एक उमदा तरुण आत आला. त्याने आरशात पाहून आपल्या केसांवरून हात फिरवला. खोलीवर नजर फिरवून तो तसाच उभा राहिला. मी तोंड फिरवून माझी जागा घेतली. तेवढ्यात नूतन आत आली. त्याच्याकडे बघून ती गोड हसली.
मी माझे लक्ष नाही असे भासवत खिडकीबाहेर पहात राहिलो. पण माझे कान त्यांच्या बोलण्याकडेच होते. लाडके एवढे कंटाळवाणे संभाषण मी माझ्या आयुष्यात ऐकले नसेल. काल नाचताना कोणाला जास्त झाली होती, कोणाला नाचता येत नाही, कोण नुसतेच जागेवरच जॉगींग केल्यासारखे नाचतात. कोण कसा दिसत होता आणि कोण कशी जास्त नटून आली होती... कोण एक लिना म्हणे तिचे डोळे निळे आहेत पण प्रत्यक्षात ते हिरवट आहेत....
मला कळत नाही तिला या माणसाविषयी एवढे काय प्रेम वाटते.. तो आला की अगदी खूष असते.
( काहीतरी चुकतेय इथे. या माणसाने तिला गटवणे अशक्यप्राय गोष्ट आहे. बघू पुढे काय आहे...)
हा माणूस दिसल्यावर जर तिला हसू फुटू शकते तर तिच्या वडिलांच्या केबिनमधे बसणार्या माणसाला पाहिल्यावरही तिला हसू फुटत असेल. तो तर अगदी कासवासारखा दिसतो..
(कोणाबद्दल बोलतोय तो?)
...त्याचे नाव जरा विचित्र आहे आणि तो सारखा पेनं दुरुस्त करत असतो. त्याचे केस वाळलेल्या गवताच्या पेंडीसारखे आहेत. तिचे बाबा त्याला नोकर येणार नसला की घरी बोलवतात. त्याला पाहिले की नूतनला हसूच आवरत नाही.
(खोटारडा! हलकट!मला माहिती आहे तू एक नंबरचा खोटारडा आहेस. मला माहीत आहे माझ्यावर जळतो तू. आणि शिवाय तो हेडक्लार्कही तुला सामील आहे. तो तर माझा द्वेष करतो. तो माझ्याविरुद्ध कट कारस्थाने करतो... अजून एक पत्र वाचले पाहिजे म्हणजे खरे काय ते कळेल.)
(बाबांनी आईला लिहिलेले एक पत्र मला पडताळात सापडले होते. गरीब बिचारी माझी आई. बाबांनी नुसत्या शिव्याच घातल्या होत्या तिला. पत्रावरची शाई अश्रूंनी पुसट झाली होती. काय झाले असेल बिचारीचे. फार सुंदर होती म्हणे ती. बाबा मात्र अगदीच कुरूप. मी बाबांवर गेलोय की काय? तिच्यावर पाळत ठेवायला बापाने खास माणसांची नेमणूक केली होती.)
प्रिय मने, मला माफ कर अगं बरेच दिवस तुला लिहायला वेळच मिळाला नाही. सध्या मी स्वप्नात तरंगतोय. कोणीतरी लिहिलेले आहे ना, प्रेम म्हणजे पुनर्जन्मच ! शिवाय घरात मोठी धामधूम चालू आहे. तो आता सारखा घरी येतो. नूतनचे वडीलही सध्या आनंदात आहेत. फरशी पुसणार्या बाईंना स्वत:शीच बडबडण्याची सवय आहे. त्यांच्या बडबडीतून मला कळले की लवकरच नूतनचे लग्न होणार आहे.
( मला पुढे वाचवले नाही.)
हे सगळे मोठ्या हुद्द्यांवरच्या लोकांसाठी आहे. तिला योग्य वर मिळावा अशी कोणाची इच्छा नाही. सगळा पैशाचा खेळ. मीही इंदूरचा राजा असतो तर तिला मागणी घातली असती. मग या सगळ्या लोकांची तडफड पहायला मजा आली असती. ते दोघे तर त्यांच्यावर थुंकण्याच्या लायकीचे पण नाहीत. पण काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्या मूर्ख कुत्र्याच्या पत्रांचे फाडून फाडून हजार तुकडे केले व कचरा पेटीत टाकले...
३ डिसेंबर.
हे लग्न होणे शक्यच नाही. ही अफवाच असणार. तो एक मोठा सरकारी अधिकारी असला म्हणजे माझ्यापेक्षा काय वेगळे आहे त्याच्याकडे? या अडाणी समाजात त्याला मान आहे एवढेच. तसा तर तो माझ्या बापालाही आहे आणि त्याच्यानंतर मलाही मिळणार आहे अर्थात मी ती जागा मिळवली तर. पण त्यासाठी काय करावे लागणार आहे याची मला कल्पना नाही...ठीक आहे कळेल पुढे केव्हातरी. त्याचा हुद्दा त्याला कपाळात तिसरा डोळा देत नाही ना त्याचे नाक सोन्याचे आहे. इतरांसारखेच नाक आहे त्याला. त्या नाकातून तो जेवत नाही ना खोकत. इतरांसारखा किंवा माझ्यासारखा फक्त शिंकतोच ना? मला या रहस्याचा भेद करायलाच पाहिजे. दोन माणसात हा फरक कशामुळे पडतो हे शोधायला पाहिजे.. मी फक्त एक साधा कारकून का झालो...
कदाचित मी इंदूरचा राजा असेनही फक्त एखाद्या कारकुनासारखा दिसत असेन. कदाचित मलाच मी कोण आहे हे माहीत नसेल. इतिहासात अशा कितीतरी घटना आहेत ज्यात एखादा भिकारी एकदम संस्थानिक निघतो किंवा एखादा कामगार श्रीमंत व्यापार्याचा हरवलेला मुलगा निघतो. आपले सिनेमे तर अशा गोष्टींनी खच्चून भरले आहेत. जेथे धूर आहे तेथे खाली काहीतरी पेटलेले असतेच असे म्हणतात. समजा उद्या मी एकदम इंदूरी पागोट्यात व हिर्यांचा शिरपेच घालून अवतरलो तर ती काय म्हणेल? ओवाळेल का मला? तिचे वडील, आमचे डायरेक्टर साहेब काय म्हणतील? ते महत्त्वाकांक्षी आहेत, लॉजचे सदस्य आहेत. निश्चितच ते फ्रीमॅसन आहेत. मी शोधून काढलं आहे. त्यांनी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी मला ते माहीत आहे. माझ्यासाठी फारच सोपे होते ते. आमचा बापही एका लॉजचा सदस्य आहे ना... माझा बाप व हा दोघेही प्रथम भेटणार्या माणसाशी हस्तांदोलन करताना फक्त पहिली दोन बोटे पुढे करतात. मी पाहिलंय ना.. मी एखादा संस्थानिक नाही होऊ शकणार का? बाबांना सांगितले तर ? ते परमेश्वराचे एजंट आहेत असे म्हणतात. किंवा कमीतकमी बँकेचा मॅनेजर तरी? मी एक कारकून का आहे? त्यापेक्षा जास्त काहीतरी का नाही?...
५ डिसेंबर
आज सगळी सकाळ वर्तमानपत्रे वाचण्यात घालविली. इंदूरला विचित्र गोष्टी घडत आहेत. मला काही सगळ्या समजल्या नाहीत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्या संस्थानाची गादी रिकामी आहे. गादीचा वारस शोधण्यात कारभाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय कारण दंगे सुरू झाले आहेत.
हे सगळे मला विचित्र वाटतंय. गादी रिकामी कशी काय राहू शकते? काही लोक म्हणतात की त्या गादीवर एक स्त्री बसणार आहे. एक स्त्री कशी काय गादीवर बसू शकते? अशक्य ! फक्त राजाच गादीवर बसू शकतो. ते म्हणतात की तेथे राजाच नाही पण ते कसे शक्य आहे संस्थानाला राजा नाही असे कसे होईल? राजा असेल पण कुठेतरी लपला असेल. तो तेथेच असेल पण कदाचित अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे, किंवा राजकीय अस्थिरतेमुळे किंवा दुसर्या मंत्र्यांच्या कटकारस्थानांमुळे त्याने सध्या लपण्याचे ठरवले असेल... काय माहीत... कदाचित इतरही कारणेही असतील.
८ डिसेंबर.
मी बँकेत जाणारच होतो पण विचारपूर्वक गेलो नाही. मी सतत त्या इंदूरच्या भानगडीबद्दल विचार करीत होतो. एखादी स्त्री कशी काय राज्य करू शकते हा विचार काही माझ्या मनातून जात नव्हता. याला सरकारने परवानगीच दिली नाही पाहिजे. बाकीचे संस्थानिक काय करताएत? इतर संस्थानिकांमधेही खळबळ माजली आहे. ग्वाल्हेरमधे ही बंडाळी माजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत असे म्हणतात. या सगळ्या बातम्यांनी मी हादरून गेलो. स्वयंपाक करणार्या बाईंनीही हे ओळखलंय.
“साहेब आज तुमचे कशातच लक्ष नाही.” खरं होतं तिचे. लक्ष नसल्यामुळे मी दोन काचेची भांडी जमिनीवर फेकली.
रात्रीच्या जेवणानंतर मला थोडा अशक्तपणा वाटल्यामुळे ऑफिसचे घरी आणलेले काम करायचा मूडच नव्हता. मी तसाच गादीवर तळमळत पडून राहिलो... अर्थात मनात सारखा इंदूरचे विचार येतच होते...
आमच्या आश्रमाच्या गादीचा विचार करण्यात तसा अर्थ नव्हता. बाबा अजूनही मला त्या लायक समजत नव्हते. मनाला गोंधळात टाकणारे सर्व ग्रंथ मी वाचून काढले. त्याने मी अजूनच गोंधळात पडलो. बाबांना काही विचारले तर ते म्हणतात, “ एवढा घोडा झालास पण अक्कल येत नाही अजून. ते सगळे समजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यावर बडबड करता आली म्हणजे बस्स.. ” मला ते एवढे काही पटत नाही पण वाद टाळण्यासाठी मी आपला गप्प रहातो. पण एक दिवस त्यांचा आणि माझा वाद होणार आहे हे निश्चित...
४३ एप्रिल..
आजचा दिवस विजय दिवस म्हणूनच साजरा करायला हवा. शेवटी इंदूरच्या गादीचा वारस सापडला. गादीला राजा मिळाला. तो मीच आहे. एखादी वीज पडावी तसे आजच हे माझ्या अचानक लक्षात आले. तसे मला एकदा बाबा मेले आणि मी त्यांची जागा घेतली असेही स्वप्न पडले होते. पण ते स्वप्न होते. हे अगदी सत्यात उतरले आहे.
मला हेच कळत नाही इतकी वर्षे मी स्वत:ला एक कारकून कसा काय समजत होतो... मी कारकून आहे ही मूर्खपणाची कल्पना माझ्या डोक्यात कशी काय घुसली कोणास ठाऊक. नशीब यासाठी कोणी मला वेड्यांच्या इस्पितळात टाकले नाही. आता सगळे कसे स्वच्छ झालंय. मला एक कळत नाही हे सगळे पडद्याआड कसे झाकले गेलंय.. मला वाटतंय की लोकांना वाटते की त्यांचा मेंदू हा डोक्यात असतो. पण ते सगळे खोटे आहे. अरबी समुद्रावरून वाहणार्या वार्यातच मेंदू असतो. तो जेथे जाईल तेथे वास करतो.
आज पहिल्यांदाच मी सावित्रीला मी कोण आहे हे सांगितले. मी जेव्हा तिला सांगितले की आठवा तुकोजी होळकर तुझ्यापुढे उभा आहे तेव्हा तिने कपाळावर हात बडवून घेतला. मरायचीच ती. नैसर्गिकच आहे. राजघराण्यातील माणूस तिने आजवर पाहीलाच नव्हता ना !
मी पहिल्यांदा तिला शांत केले. तिला सांगितले की माझे बूट अस्वच्छ आहेत म्हणून काही मी तिला हत्तीच्या पायी देणार नाही. बायका म्हणजे एक नंबरच्या मूर्ख असतात. भव्यदिव्य गोष्टींमधे त्यांना रसच नसतो. ती घाबरली होती कारण तिला वाटले की सगळे संस्थानिक हे तुळोजीसारखे क्रुर असतात. मी तिला समजावून सांगितले की ते दिवस आता गेले... मी काही आज बँकेत गेलो नाही. कशाला जाऊ ? मुळीच जाणार नाही. त्या न संपणार्या कागदांच्या भेंडोळ्यात माला परत अडकून पडायचे नाही...
८६ मार्च. दिवस आणि रात्रीमधे केव्हातरी...
आज मला बोलाविण्यासाठी बँकेतून शिपाई आला. कारण मी गेले तीन आठवडे बँकेत गेलोच नव्हतो. त्याच वेळी नेमका आश्रमातून बाबांचा एक भगव्या कपड्यातील शिष्यही आला. त्या दोघांची गाठ पडू नये म्हणून मला किती धडपड करावी लागली. त्या भगव्याला मला एक भांडे फेकून मारावे लागले. माझा अवतार पाहून बिचार्याने पळ काढला. पण शिपाई चांगला दांगट होता. त्याने मला धरले व निरोप सांगितला. अर्थात माझा त्याला विरोध नव्हताच. मीही गंमत म्हणून बँकेत गेलो.
आमच्या बावळट हेडक्लार्कला वाटले की मी त्याच्या पुढे लोटांगण घालीन व गयावया करत काहीतरी खोटीनाटी कारणे देईन. पण तसे काहीच झाले नाही. मी त्याच्याकडे एक अनोळखी माणूस असल्यासारखे पाहिले. माझ्या नजरेत ना राग होता ना कीव. मग मी शांतपणे माझ्या जागेवर जाऊन बसलो. जणू काही झालेच नव्हते. त्यांची धावपळ पाहण्यासाठी मला शून्यात नजर लावावी लागली. ‘जर तुम्हाला कळले की तुमच्यासमोर कोण बसलंय तर तुमची किती धावपळ उडेल याची तुम्हाला कल्पनाच नाही... हेडक्लार्कही माझ्यासमोर लोटांगण घालेल. हो ! जसा हल्ली तो डायरेक्टर साहेबांपुढे घालतो.’
त्यांनी माझ्यासमोर एक कागदांचा गठ्ठा आदळला. मला त्या सगळ्या कागदपत्रांचे सार लिहून काढायचे होते म्हणे. पण मी त्यांना साधा स्पर्शही केला नाही. वाचणे तर दूरच.
थोड्याच वेळात ऑफिसमधे गडबड उडाली. शेवटी डायरेक्टरसाहेब येत आहेत अशी कुजबुजही सुरू झाली. कित्येक कारकुनांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरा टाकल्या. ते येताना त्यांचे लक्ष जाईल अशा हालचाली केल्या पण मी साधा हललो ही नाही. सगळ्यांनी आपले कपडे नीट केले, बटणे तपासली पण मी.... अंऽऽहं. डायरेक्टरची काय एवढी तमा बाळगायची? मी तो आला म्हणून उभे रहायचे? कदापि नाही.. हा कशाचा डायरेक्टर आहे. एखाद्या बाटलीच्या बुचासारखा दिसतो सामान्य बाटलीचं सामान्य बूच... या पलीकडे काही नाही. त्यांनी माझ्यासमोर एक कागद सही साठी ठेवल्यावर मला जरा आश्चर्यच वाटले.
त्यांना वाटले मी नेहमीप्रमाणे माझी किरट्या अक्षरातील सही करेन... बरोबर आहे त्यांचे. पण मी जेथे वर डायरेक्टरसाहेब सही करतात त्याच जागेवर मोठ्या लफ्फेदार अक्षरात माझी सही ठोकली.... तुळाजी होळकर (सातवा)... त्यानंतर पसरलेला सन्नाटा तुम्ही पहायला हवा होता. मी फक्त माझा हात हवेत झाडला व म्हणालो, ‘मला कुठलाही सभारंभ नकोय.. मग मी बाहेर पडलो व सरळ डायरेक्टर साहेबांच्या घराचा रस्ता पकडला.
ते घरी नव्हतेच. त्यांच्या दरवानाने मला थांबविण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्यावर असा डाफरलो की त्याने लगेचच शरणागती पत्करली.
मी सरळ नूतनच्या ड्रेसिंग रुममधे गेलो. ती आरशासमोर बसली होती. मला पाहताच ती दचकली. तोंडावर हात ठेवून, विस्फारलेल्या डोळ्यांनी ती दोन पावले मागे सरकली. पण ती उगीचच घाबरायला नको म्हणून मी कोण आहे हे तिला सांगितले नाही.
पण मी तिला सांगितले की जगातील सर्व सुखे तिची वाट पहात आहेत. इतकी की ती त्याची कल्पनाच करू शकणार नाही. आपल्या शत्रूंनी कितीही कट कारस्थाने केली तरीही आपले मिलन होणार आहे. एवढेच बोलून मी बाहेर पडलो. किती लबाड असतात या बायका.. आता मला बायका ही काय चीज असते हे चांगलेच कळून चुकले आहे. त्या खरे प्रेम कोणावर करतात हे कोणालाच कळत नाहीए म्हणे. चूक ! मला एकट्यालाच हे कळलं आहे. त्या सैतानावर प्रेम करतात. विनोद बाजूला ठेवला तरी ही ज्ञानी माणसे त्यांची वर्णनं करतात ना ती सगळी खोटी आहेत. तिचे खरे प्रेम हे सैतानावरच असते... असते म्हणजे असते. संपलं. पुढच्या रांगेत बसलेली एखादी स्त्री मागे वळून एखाद्या पुरुषाकडे पहात असते तेव्हा तुम्हाला असे वाटण्याची शक्यता आहे की त्याच्या रांगड्या रूपाकडे पाहतेय. पण मुळीच नाही. त्या माणसा मागे दडलेल्या सैतानाकडे ती मोठ्या प्रेमाने पहात असते. त्याच्या आडून तो तिच्याकडेच पहात असतो. लक्षात घ्या. शेवटी ती त्याच्याशीच लग्न करते. खरंच त्याच्याशीच लग्न करते.
या सगळ्याच्या मुळाशी महत्त्वाकांक्षा आहे आणि त्याचे कारण आहे जिभेखाली असलेला एक फोड ज्याच्यात एक किडा लपलेला असतो. टाचणीच्या डोक्याच्या आकाराचा. आणि हे सर्व मोमीनपुर्यातील त्या न्हाव्याचे काम आहे. त्याच्या मधल्या बायकोबरोबर त्याला जगात इस्लाम धर्माचा प्रसार करायचा असतो. मी असे ऐकतो की माझ्या राज्यात आत्ताच बरीच जनता इस्लामी झाली आहे....
त्याला एकदा आमच्या आश्रमात सोडला पाहिजे. कशी धावपळ होईल आमच्या वडिलांच्या शिष्यगणाची.. विशेषतः भक्तिणींची.. आमच्या बाबांमुळेच इस्लामची स्थापना झाली आहे...माझी खात्री आहे.
आजची तारीख आठवत नाही. नाही तसे नाही... या दिवसाला तारीखच नाही.
आज मी खलिफासारखा वेष बदलून बाजारात फेरफटका मारायला गेलो. मी राजा असल्याचे एकही चिन्ह मी मागे ठेवले नव्हते कारण दरबार भरण्याआधीच जनतेने मला पहावे अशी माझी इच्छा नव्हती. अगोदर दरबारात दर्शन द्यावे आणि मग सामान्य जनतेला असेच मी ठरवले. सामान्य जनतेसमोर एकदम उभे रहायचे मला कमीपणाचे वाटले. काय माहीत जनता कशी प्रतिक्रिया देईल.. आणि शिवाय आत्ता या क्षणी माझ्याकडे होळकरी पगडीही नाही. मी एका नाटकाचे पोषाख पुरविणाऱ्या कंपनीला विचारुन पाहिले पण त्यांच्याकडे इंदूरच्या राजाचे कपडे नव्हते. गाढव लेकाचे..इंग्लडच्या राणीचे होते... काय म्हणावे याला... अजूनही आमची गुलामी गेली नाही... अर्थात आश्रमातही सगळे परमेश्वराचे गुलाम त्याच्या एजंटच्या पायावर लोटांगण घालतातच की. काय होणार या गुलांमांचे कोणास ठाऊक. मला स्वत:ला या गुलामांचा मालक होण्यास फारच आवडेल. माझ्या भगव्या कपड्यातून मी इंदूरचे कपडे शिवून घेईन. नाहीतरी ते साधेच सुती कपडे आहेत. आश्रमात गादी मिळाल्यावर मखमली लागतील.. पण शिंप्याने ते बिघडवले तर? नको त्यापेक्षा मीच ते गुपचूप घरीच शिवीन. दारे खिडक्या लावून घेईन म्हणजे कोणी बघायला नको. बेतण्यासाठी मलाच कात्री चालवावी लागणार असे दिसते. काही हरकत नाही..
मला तारीख लक्षात नाही. सैतानाने ती नीट लक्षात ठेवली असणार. कपडे आता जवळजवळ तयार झाले आहेत. मी जेव्हा ते परिधान केले तेव्हा सावित्रीच्या तोंडातून एक अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. पण मी आत्ता लगेचच दरबारात दर्शन देणार नाही. दरबारी, मंत्री संत्री अजून आलेले नाहीत. एकट्याने दरबारात जाणे काही ठीक दिसणार नाही. माझे वैभव दिसणार नाही. प्रत्येक तासाला मी त्यांची उत्कंठेने वाट पहातोय.
आश्रमात केव्हा कळवायचे हाही एक प्रश्नच आहे. बाबांची तब्येतही आजकाल ठीक नसते. मधे त्यांची अँजियोग्राफी झाली असे सावित्री सांगत होती.... म्हातारा गचकतोय की काय.. आता इंदूरची गादी मिळाल्यामुळे आश्रमाची मला गरज नाही हे त्यांना सांगावे का? गप्प बस जरा... शहाणपणा नको...
१
कारभार्यांना येण्यास एवढा का बरं उशीर झाला असेल? मला वाटते शिंद्यांनी त्यांना रस्त्यातच पकडले असेल. त्यांचा छळ केला असेल. मी कुठे आहे हे सांगण्यासाठी. आज मी पोस्ट ऑफिसमधे चौकशी करण्यासाठी जाऊन आलो. पण त्यांना कशाचीच कल्पना नव्हती. पोस्टमास्तर म्हणून एक ठोंब्या बसवलाय तिथे.
“ नाही हो ! माझे डोके खाऊ नका. येथे इंदूरचे कोणीही आलेले नाही. तुम्हाला जर त्यांना तार पाठवायची असेल तर खाइडकी क्र.३ वर जा फॉर्म भरा.”
छे! मी कशाला तार करू ? तारा तर डॉक्टरांचा कंपाऊंडर पाठवतो...
३० फेब्रुवारी. इंदूर.
चला ! एकदाचा इंदूरला पोहोचलो म्हणायचा मी. घटना कशा फटाफट घडत गेल्या. इंदूरचे काही कारभारी व आश्रमातील काही कारभारी मला न्यायला आले होते. मी अर्थातच आश्रमातील लोकांना परत पाठवून दिले. नंतर कळाले की ते मला बाबांच्या बाराव्याला न्यायला आले होते. गेले एकदाचे. वेडे कुठले. मला एकट्याला टाकून गेले. मला न्यायला त्यांनी भली मोठी गाडी पाठवली होती व पुढेमागे हत्यारी संरक्षक बसवले होते. हे नेमलेले मला आठवत नव्हते पण गर्दी झाली तर त्यांचा उपयोग होईल. म्हणून मी त्यांना परत पाठवले नाही. आजकाल सगळे रस्ते लोखंडाचे असल्यामुळे सगळीकडे फटकन पोहोचता येते. आम्ही इतक्या वेगाने गेलो की अर्ध्या तासात आम्ही इंदूरच्या वेशीवर पोहोचलो. रम्य आहे हा प्रदेश.
माझ्या किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे. शिंद्यांपासून रक्षण करायचे म्हणजे ही असली तटबंदी पाहिजेच. मी आत पाऊल टाकल्याटाकल्या मला बरेच टक्कल केलेले लोक दिसले. मी लगेचच त्यांना ओळखले. सैनिक असणार ते. नाहीतर अधिकारीही असतील.
मला हाताला धरून घेऊन जाणार्या कारभार्याने एकदम भयंकर विचित्र गोष्ट केली. त्याने मला एका खोलीत ढकलले आणि म्हणाला, “ इथे गप्प पडून रहा. जर परत इंदूर हा शब्द तरी तोंडातून काढलास तर याद राख. इंदूरलाच पाठवीन तुला कायमचा.” पण मला माहीत आहे ही एक राजाची परीक्षाच असते. सामान्य माणसांची दु:खे राजाला कळावी म्हणून त्यांना तसे काही काळ वागविले जाते असे म्हणतात. मी परत इंदूरचे नाव काढल्यावर मात्र त्याने त्याच्या हातातील दांडुक्याने माझ्या पाठीवर सणसणीत दोन रट्टे हाणले. माझा जीव कळवळला. मला रडू फुटले पण मी ते मोठ्या प्रयासाने आवरले. राजाला असे रडणे शोभत नाही. कदाचित इंदूर मधे शौर्याची अशीच परीक्षा घेत असावेत. ते सगळे गेल्यावर मी माझ्या राज्याच्या कारभाराची माहिती घ्यायची ठरविली. आश्चर्य म्हणजे माझ्या लक्षात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आली. ती म्हणजे इंदूर आणि चीन हे एकच देश आहेत. ही मूर्ख अडाणी जनता त्यांना दोन देश समजते. मी प्रत्येकाला एका कागदावर इंदूर हा शब्द लिहायला सांगणार आहे. त्याला आढळेल की तो चीन असा लिहिला गेलाय.
या सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. मला खरी काळजी उद्याची आहे. उद्या सकाळी पृथ्वी चंद्रावर बसणार आहे आणि त्यावर बाबा. ते आत्तापर्यंत चंद्रावर पोहोचलेही असतील. त्यांना सूक्ष्मात जाऊन कुठल्याही ग्रहावर जाण्याची विद्या प्राप्त आहे ना... सध्या एका इंग्रजी शास्त्रज्ञाने हे पेपरात छापले आहे पण माझ्या बाबांनी मला केव्हाच सांगितले होते. सध्या इंदूरात लागलेले शोध स्वत:च्या नावावर खपवायचे हा परदेशी शास्त्रज्ञांचा उद्योगच झाला आहे म्हणा... पण एक सांगतो चंद्र इतका ठिसूळ आणि नाजूक आहे की मला त्याची काळजी वाटते. सध्या चंद्राची दुरुस्ती नेपाळमधे करतात त्यामुळे ती काही व्यवस्थित होत नाही. अत्यंत ढिसाळ काम. ते काम एक राय नावाचा नेपाळी माणूस करतो. हा तर इतका बथ्थड डोक्याचा आहे की बस. त्याने चंद्र दुरुस्त करताना ऑलिव्ह ऑईल आणि मेण वापरल्याने पृथ्वीवर सगळीकडे घाणेरडा वास पसरलाय. सगळ्यांना नाकावर रुमाल घेउन चालावं लागतंय. म्हणून आपल्याला आजकाल आपली नाकं दिसत नाहीत कारण ती सगळी चंद्रावर गेली आहेत...
सगळं चित्र स्पष्ट आहे. पृथ्वी एवढी मोठी आहे की जेव्हा ती चंद्रावर बसेल तेव्हा सगळी नाकं चिरडली जातील. मी इतका अस्वस्थ झालो की मी लगेच बूट चढवले व बाहेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांना पृथ्वीला चंद्रावर बसण्यापासून परावृत्त करा हा आदेश द्यायचा होता मला.
मी बाहेर हॉलमधे पाऊल टाकले आणि मला त्या टकल्या पोलिसांनी घेरले. ती खरंच फार बुद्धिमान माणसं होती. मी जेव्हा त्यांना समजाऊन सांगितले, “ लोक होऽऽ आपल्याला चंद्र वाचवायला पाहिजे कारण पृथ्वी त्यावर बसणार आहे.” ते ऐकल्यावर राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे लगेच झटून कामाला लागले. काहीजण तर भिंतीवर चढून चंद्राला खाली घेण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात इंदूरचा पंतप्रधान आला. तो आल्यावर सगळ्यांची पांगापांग झाली. पण राजा असल्यामुळे मला तेथून हलता येईना. आश्चर्य म्हणजे त्याने मला परत दांडुक्याने बडवले व परत खोलीत ढकलले. इंदूरच्या मध्ययुगीन प्रथा अजूनही भक्कम आहेत म्हणायच्या...
आज मी गोंधळ घातला. माझी वही ते हिसकावून घेत होते. शेवटी पंतप्रधान म्हणाले, “त्या वहीने काय त्रास होतोय तुम्हाला? लिहितोय ना तो त्यात ? लिहू देत..
त्याच वर्षी जानेवारीत पण फेब्रुवारी नंतर येणारा.
हा इंदूर कुठल्या प्रकारचा देश आहे हेच कळत नाही. यांच्या व यांच्या दरबारी परंपरा फारच कर्मठ दिसतात. मला समजतच नाहीत त्या. आज माझ्या डोक्यावरचे सगळे केस काढण्यात आले. मी त्यांना ओरडून ओरडून सांगतोय की मला भिख्खू व्हायचे नाही. पण त्यांनी माझे ऐकलेच नाही. हे कमी होतं की काय म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर बर्फाळ पाण्याची धार धरली. मी आजवर असला अत्याचार सहन केला नव्हता. मला जवळजवळ वेड लागण्याची वेळ आली होती. पण ही परंपरा का पडली याचे उत्तर मला कोणी देऊ शकले नाही. फारच घाणेरडी परंपरा आहे.
मला आश्चर्य वाटते ते याचे की या आधीच्या राजांनी या परंपरेचे उच्चाटन कसे नाही केले त्याचे. मला तर असे वाटते आहे की मी एका धर्मवेड्या, अतिरेकी टोळक्यांच्या हातात सापडलो आहे की काय. का इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या हातात सापडलोय ? पण मला हे समजत नाही की राजा या लोकांच्या हातात कसा सापडू शकतो. बहुधा हे सगळे कारस्थान ग्वाल्हेरचे असावे. त्यांना माझी हत्याच करायची आहे. पण शिंदे सरकार, मला माहीत आहे तुम्ही इंग्रजांचे हस्तक आहात. इंग्रज अत्यंत धूर्त आहेत याचा हा अजून एक पुरावा... सगळ्या जगाला माहिती आहे इंग्रजांनी तपकीर ओढली की ग्वाल्हेरमधे शिंका येतात...
तारीख २५
आज पंतप्रधान माझ्या खोलीत आले. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकल्यावर मी खुर्चीखाली लपलो. जेव्हा त्यांना मी दिसलो नाही तेव्हा त्यांनी मला हाका मारण्यास सुरुवात केली. “ कारकुंड्याऽऽ, महाराजऽऽऽ तुळोजी महाराज..... पण मी गप्प बसलो. शेवटच्या हाकेला मी ओ देणार होतो पण मी मनाशी म्हटले, ‘साहेब मला फसवू नका. मी आता तुम्हाला माझ्या डोक्यावर पाणी ओतू देणार नाही.”
पण त्यांनी मला पाहिले होते. हातातील काठीने ढोसून त्यांनी मला बाहेर काढले. तो दंडुका फार लागतो. पण त्याचवेळी लागलेल्या एका शोधाने मला फार वेदना झाल्या नाहीत. ‘प्रत्येक कोंबड्याच्या पंखाखाली त्याचे स्वत:चे एक इंदूर असते.’ तो रागारागाने निघून गेला. जाताना मला शिक्षा करणार अशी धमकी देऊन गेला. मला त्याच्या दुर्बळतेचे हसू आले. कारण मला माहीत आहे तो एक खेळणे आहे इंग्रजांच्या हातातील....
३४ मार्च फेब्रुवारी ३४९
आता हे सहन होत नाही. देवा रे ! माझं काय करणार आहेत ते? का माझ्यावर सारखं बर्फाचं पाणी टाकतात? इतर वेळी ते माझ्याकडे लक्षही देत नाहीत. त्यांना मी दिसत नाही ना माझा आक्रोश ऐकू येतो. ते का माझा छळ करताएत? माझ्या सारख्या अत्यंत फालतू माणसाकडून त्यांना काय पाहिजे आहे तरी काय ? माझ्याकडे तर देण्यासारखे काहीच नाही.. माझे डोके ठणकतेय. इतके की सगळे जग उलथेपालथे होतं आहे की काय असे वाटतंय. मला वाचवा ! मला वाचवा कोणीतरी... इथून बाहेर काढा.. माझ्या रथाला घोडे जोडा.. घंटा बडवा, बिगूल वाजवा... आणि येथून मला बाहेर काढा. इतक्या दूर दूर घेऊन जा की पुढचे काही दिसणारच नाही.
त्या वेगातही मला आकाशात दूरवर एक तारा चमचम करताना दिसतोय. चंद्रप्रकाशात काळसर झाडे मागे पळताएत. पायाशी निळसर धुके तरंगत वर वर येतंय.. ढगात संगीत ऐकू येतंय. एका बाजूला समुद्र आहे तर एका बाजूला रांगण्याचा किल्ला. त्याच्या पलीकडे मला माझं गाव दिसतंय. ते माझं गावातलं घर तर नाही ? माझी आई खिडकीशी माझी वाट पहात थांबली असेल.
‘ आई ! आईऽऽऽ माझ्यावर दया कर. तुझ्या या दुर्दैवी मुलाला वाचव. तुझा एक अश्रू माझ्या ठणकणार्या कपाळावर पडू देत. बघ त्यांनी माझी काय अवस्था करून ठेवली आहे ते.. या अनाथ मुलाला जरा तुझ्या उराशी धर. त्याला जायला दुसरी जागा नाही गं. ते त्याच्या मागे शिकारी कुत्र्यासारखे लागलेत.
आईऽऽऽ आई गंऽऽऽ तुझ्या या वेड्या मुलावर दया कर... पण तुला हे माहीत आहे का की तुर्कस्तानच्या राजाच्या उजव्या गालावर एक मोठा तीळ आहे....
४३ एप्रिल ३५०
आता मी मस्त आहे. आज आश्रमातील मंडळी मला सोडवायला आली होती. त्यांनी काय जादू केली कोणास ठाऊक.
सगळेजण आज माझ्याशी नीट वागले.
आज कसलाही शॉक दिला नाही ना औषध.
मला घ्यायला साठे, जगताप आणि सचिन आणि बरेच लोक आले होते. न्यायला मोठी अलिशान गाडी आणली होती त्यांनी.
आश्रमात गेल्यागेल्या मी अंगावरील कपडे फाडून उघडा नागडा झालो. त्याबरोबर सगळे मला धरायला धावले. साठे सगळ्यांच्या पुढे... त्याला पाहिल्या पाहिल्या माझ्या डोक्यात एक सणक उठली. या साठ्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली.. मी मूठ आवळली आणि त्याच्या थोबाडात इतक्या जोरात हाणली की तो कोलमडत पार मागे जाऊन पडला. त्याच्या अंगावर मी धावून गेलो. आता त्याला लाथेने तुडवावा म्हणून मी पाय उचलला तेवढ्यात त्यांनी तो दोन्ही हाताने धरला व माझ्या पायावर लोटांगण घातले. इतरांना वाटले तो माझा आशीर्वाद मागतोय. मग मीही त्याला आशीर्वाद दिला....
"बघा मी म्हणत नव्हतो आपल्या महाराजांचे त्याच्यात काहीतरी आले असणार म्हणून....” साठे म्हणत होता... सगळ्यांनी एकच जयजयकार केला... मीही त्याला प्रेमाने आलिंगन दिले....
मी आकाशाकडे पाहून वर हात फेकले आणि बाबांना साद घातली,
“बाबा बघा झालो की नाही मी शहाणा..... ?”
मुळ लेखक : गोगोल निकोलाय.
स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.
या स्वैर अनुवादाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत हे कृपया लक्षात घ्यावे. याचा कुठल्याही प्रकारे वापर करण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक.
प्रतिक्रिया
15 Jun 2017 - 8:27 pm | एस
फ्रीमॅसन्सचा संदर्भ भारतीयीकरणात थोडा वेगळा वाटतो. बाकी 'द डायरी ऑफ या मॅडमॅन' चा स्वैर भावानुवाद चांगलाच उतरलाय. तुकोजी होळकर आणि होळकर-शिंदे वैर यांचे घेतलेले संदर्भ वगैरे भारीच.
16 Jun 2017 - 9:24 am | जयंत कुलकर्णी
आजही भारतात प्रत्येक शहरात फ्रिमेसन लॉज आहेत. सोलापूरला आहे. पुण्यात तर तीन आहेत. माझे स्वतःचे किती तरी मित्र फ्रिमेसन आहेत... :-)
15 Jun 2017 - 11:29 pm | मुक्त विहारि
अनुवाद मस्त झाला आहे.
एक विनंती.... बर्याच दिवसांत तुमची युद्ध-मालिका नाही वाचली.
आम्हाला काय? तुमच्या सारखे उत्तम लेख लिहिणारे मिळाले की, ज्ञानाची भिक्षा वाढा, असे म्हणत, आम्ही आमची रिकामी डो़की घेवून बसणार.
16 Jun 2017 - 8:19 am | योगेश लक्ष्मण बोरोले
मी मुळ कथा वाचली नाहीय पण तुम्ही लिहीलेली कथा भन्नाट वाटली. धन्यवाद. आता अजुन वाचेन .....
16 Jun 2017 - 9:52 am | अत्रे
तारखा अशा का लिहिल्या आहेत?
16 Jun 2017 - 3:12 pm | गामा पैलवान
16 Jun 2017 - 3:14 pm | गामा पैलवान
जयंतराव,
तुम्ही घडवून आणलेली इंदुराची सफर आवडली. इंदूर हे इंदु म्हणजे चंद्राशी संबंधित नाव आहे. मूळ अनुभवात चंद्रप्रभाव स्पष्ट जाणवतो.
आ.न.,
-गा.पै.
19 Jun 2017 - 7:21 am | जयंत कुलकर्णी
सर्वांना धन्यवाद !
19 Jun 2017 - 4:02 pm | तुषार काळभोर
खिळवून टाकलं!
23 Jun 2017 - 12:38 pm | जयंत कुलकर्णी
धन्यवाद !
27 Jun 2017 - 5:07 pm | धर्मराजमुटके
काका, काहितरी नवीन मालिका चालु करा ना ! कवितांची शीर्षके वाचून कंटाळा आला हो !
27 Jun 2017 - 8:08 pm | जयंत कुलकर्णी
हं... लिहीन लवकरच.... :-)