१. शेवटची इच्छा
"तात्या, पाणी तर वाढतच चाललंय. आता काय करायचं ?"
"चिंता करू नको. निलगिरीचं ते उंचच उंच झाड दिसतंय ना, त्यावर जाऊयात."
झाडाच्या फांद्यांनी अलगद तोललेल्या आपल्या लाकडी घरातून त्या तिघांनी आवश्यक तेवढं सामान गोळा केलं. फळे, कंदमुळे, आजूबाजूच्या पाण्याने वाहून आणलेल्या मृत मासोळ्या थैल्यांमध्ये भरल्या. बाहेर गेल्या दहा दिवसांपासून पावसाचा कहर माजला होता, विजा आकाशीचा नगारा बडवत गर्जत होत्या, सोसाट्याच्या वाऱ्याने लहानमोठ्या झाडांना तर केव्हाच उपटून फेकून दिलं होतं. त्या तिघांनी खांद्यांवर थैल्या अडकवल्या अन नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेल्या अथांग जलाशयात स्वतःला झोकून दिलं. पोहण्यात अतिशय निष्णात असूनही त्या शंभरेक मीटर अंतरावरील निलगिरीच्या झाडापर्यँत पोहोचायला त्यांना तब्बल एक तास लागला !
"हा पाऊस तर थांबता थांबत नाहीये." सह्याद्रीच्या सर्वात उंच शिखरावरील सर्वात उंच झाडावर बसलेला मंगेश म्हणाला. त्याचे मानेपर्यंत वाढलेले केस पाण्यामुळे पार विस्कटुन गेले होते.
"इतके दिवस कोसळणारा पाऊस मी अजून पाहला नाही. उन्हाळ्यातलं ते अंग जाळून टाकणारं ऊन अन पावसाळ्यातलं हे अतिभीषण रुद्रतांडव ! धैर्याची अजून किती परीक्षा पहावी निसर्गानं." वृक्ष हताश स्वरात बोलत होता. एका भक्कम फांदीच्या बेळफाट्यावर तो कसाबसा बसला होता.
"घाबरू नका पोरांनो. ईश्वराच्या मनात जे असेल तेच होणार." साठीला टेकलेल्या तात्यांनी दिलासा दिला. ते दोन्ही हातांनी झाडाची फांदी घट्ट पकडून बसले होते. वृध्दत्वाचं एकही लक्षण चेहऱ्यावर दिसत नव्हतं. तरूणाला लाजवेल अशी चपळाई, हिंमत, संयम यामुळेच ते आजतागायत जिवंत राहू शकले होते.
"निसर्ग सूड उगवतोय आपल्यावर. बरोबर आहे म्हणा त्याचं. आपल्या पूर्वजांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पर्यावरणाचा खून केला, प्रदूषण वाढवलं, फुलाफळांचे जंगल तोडून सिमेंटचे जंगलं वाढवले. मग काय होणार दुसरं. शेवटी पापं भरलीच न माणसाची. दिवसेंदिवस तापमान वाढत गेलं, हिमखंड वितळले, अख्खेच्या अख्खे देश पाण्याखाली बुडाले." बोलता बोलता तात्यांच्या डोळ्यांत आसवं गोळा झाली. पावसाच्या थेँबांनी ती चुपचाप दडवली.
"बरोबर आहे तुमचं तात्या. पूर्वजांच्या चुकीमुळेच आपल्यावर हा प्रसंग आलाय. एकेकाळी हरितसुंदर असलेल्या आपल्या वसुंधरेवर नावालासुद्धा जमीन उरली नाही." वृक्षने दूरवर क्षितीजाकडे पाहत म्हटलं. चहुबाजूंनी नजर पोहोचेल तिथपर्यंत पाणीच पाणी होतं. ढगांनी सूर्याला गिळून समस्त पृथ्वीवर मृत्यूची काळी झिलई अंथरली होती. सह्याद्रीच्या कडेकपारींमधली थंडगार बोचरी हवा,अन्नपदार्थांची भीषण टंचाई व आशेचे मावळलेले सगळे दिवे. एवढं असूनही ते तगले होते. आजूबाजूच्या हजारो किलोमीटरच्या परिसरात ते तिघेच जिवंत उरले होते !!
"पाणी तर वाढतच चाललंय. तात्या, काहीतरी करा. नाहीतर थोड्याच वेळात आपल्याला जलसमाधी मिळेल." भितीने मुरकुंडी वळालेला मंगेश आपले फांदीखाली लोँबकळणारे पाय वर उचलत म्हणाला. त्याच्या तळपायांना नुकताच खालच्या अतिविशाल पाण्याचा स्पर्श झाला होता.
गेल्या तीन दिवसांपासून ते तिघे झाडावरच बसून होते. तिथेच त्यांनी अर्धवट पोट भरलं, फांद्यांच्या आधारे कशाबशा झोपा काढल्या, आपल्या लाकडी घराला डोळ्यांसमोर बुडतांना पाहिलं.
"आपल्या हातांत काहीच नाहीये बाळांनो. जे जे शक्य होतं ते आपण केलं. पण मानवी प्रयत्नांनाही मर्यादा असतात. आता त्या सर्वज्ञ देवाजवळच प्रार्थना करूयात."
"बरोबर. आता त्याचीच एक आशा."
"हे सर्वशक्तिमान ईश्वरा, करुणाकरा, हा पाऊस थांबू दे व सगळं पाणी सरुदे. जेवढी जमीन तू आम्हाला देशील त्याच्या कणाकणावर आम्ही झाडं लावू, एकही झाड कधी तोडणार नाही. फक्त हा पाऊस थांबूदे." वृक्षने कोपरापासून हात जोडून आकाशीच्या राजाकडे साकडं घातलं. पण पावसाचा जोर कमी झाला नाही. 'ही अक्कल तुम्हाला आधी का सुचली नाही?' असंच निसर्गाला सुचवायचं असेल.
पाण्याची पातळी वाढून आता पोटापर्यंत आली होती. तिघेहीजण विविधप्रकारे देवाच्या मिन्नतवाऱ्या करून थकले होते. जुन्या आठवणी काढून त्यांनी भरपूर रडून घेतलं होतं. तिघांना आपला मृत्यू स्पष्टपणे नजरेसमोर दिसू लागला. आता पाणी छातीपर्यंत आलं.
तात्यांनी आपले दोन्ही हात पाण्याबाहेर काढले. आकाशीच्या दिशेने आपले लालभडक डोळे वळवून आसमंताला चिरत जाणाऱ्या आवाजात त्यांनी आर्जव केलं, "हे दयानीधान परमेश्वरा... आम्ही तिघांनी आयुष्यभर निसर्गाची सेवा केली, एकही झाड कधी तोडलं नाही, प्रदूषण रोखण्यासाठी कित्येक मोहिमा काढल्या, निसर्गसंवर्धनासाठी आयुष्यभर झटलो. आमची एकतरी विनंती ऐक. आम्हाला पाण्यात बुडवून मारू नको."
अन काय आश्चर्य ! गेले तेरा दिवस क्षणाचीही उसंत न घेणारा पाऊस अवघ्या पाच मिनिटांत थांबला !! बोचऱ्या हवेचा जोर कमी झाला. हळूहळू तिघांच्या गळ्यापर्यंत आलेलं पाणी पोटापर्यंत, गुढग्यापर्यंत, तळव्यापर्यंत ओसरत गेलं.
तिघाजणांनी एकमेकांकडे पाहिलं. मिट्ट काळोखात त्यांना चेहरे दिसत नव्हते. पाठीमागे कुठेतरी प्रकाशाची एक लकेर उमटली अन त्या उजेडात त्यांना एकमेकांच्या चेहऱ्यांवरील अत्यानंद स्पष्टपणे दिसला.
'हा प्रकाश कसला' हे कळायच्या आतच कानाचे पडदे फाडून टाकणारा आवाज गरजला अन विजेच्या लोळांनी निलगिरीचं ते झाड जाळून भस्मसात केलं.
-------------------------------------------
२. हॅलो कोण ?
काल रात्री मित्राने मला खेचतंच घराबाहेर काढलं. आयपीएलमधे मुंबईकडून लावलेली बेट जिंकलीय म्हणे. आपल्याला काय... फुकट भेटलं अन पटकन गिटलं. त्यातही फुकटची दारू असेल तर मग विचारूच नका. मस्त बार शोधला अन एसीत जाऊन बसलो. चार पेग मारले अन दोन तंगड्या मटकावल्या तेव्हा लक्षात आलं की मोबाईल खिशात नाहीये. पिलेली सगळी झटक्यात उतरली न भाऊ. महागडा मोबाईल होता शिवाय नानाविध विदुषींचे फोटो आणि वगैरे वगैरे होतं त्यात.
टेबलाच्या खाली, वर आजूबाजूला, काउंटरजवळ, बाथरूममधे, सगळीकडे शोधलं. मित्राने गंमत केली असेल म्हणून त्याचेही खिसे पाहिले. जंगजंग पछाडलं पण काहीच फायदा झाला नाही.
शेवटी मित्राचा मोबाईल घेऊन लावला कॉल. फोन लागेल अशी खात्री नव्हतीच कारण भामटे मोबाईल सापडला की आधी सिम तोडून फेकून देतात. पण चक्क रिंग गेल्या अन दोनच रिंगमधे कुणीतरी रिसिव्हपण केला.
"हॅलो. कोणाकडे आहे फोन ?"
पलीकडुन फक्त गब्बर स्टाईल हसण्याचा आवाज आला.
"हॅलो."
कॉल कट.
पुन्हा लावला, उचलला नाही.
परत लावला, स्विच ऑफ.
"कुठं पळणारेस बेट्या. हा पठ्ठ्या तुला सोडणार नाही." या वाक्याने सुरुवात करून मी त्या अनामिक चोराच्या नावाने शिव्यांची बरसात करू लागलो. शेवटी मालकाने लाथ मारून काढून दिलं तेव्हा बारबाहेर पडलो. मित्राने घरी आणून सोडण्याचं कर्तव्य बजावलं.
लॉक उघडून आत आलो अन लाईट लावला. निराशेने सोफ्यावर कोसळलो.
पाहतो तर काय.... समोरच्या टेबलावर
माझा मोबाईल ठेवलेला होता ! हो माझाच... जातांना मी सोडून गेलो होतो अगदी तिथेच !!
-----------------------------------------
३. वेदनांचा इतिहास
तिच्या ड्रेसची चैन मानेमागून सुरू होऊन हळूहळू खाली घसरत चाललीये. दोन बोटांच्या चिमटीत तिला पकडून मी हळूहळू खाली खेचतोय. एकमेकांमधे घुसलेल्या दातांचा विलग होतांना उमटणारा सूक्ष्म आवाज, तिच्या पाठीवर उमटणारे सूक्ष्म शहारे. ड्रेस उघडत चाललाय इंचाइंचाने. उघड होत चाललेत खांदा म्हणून मिरवणारे हाडांची दोन टोकं, पाठीवरचे जुनाट वळ, डागण्या अन चटक्यांची विकृत नक्षी.
अन...
जेव्हा तो ड्रेस पुर्णपणे गळून पडाला तेव्हा मला समजलं की ती का हसली होती मी एक साधा कारकून आहे म्हटल्यावर. का ती म्हणाली होती की मला पैसा नाही फक्त प्रेम पाहिजे.
--------------------------------------------
४. पहिले बोल
पप्पा : बाळा पप्पा म्हण
बाळ : मम्मी
पप्पा : मम्मी नाही पप्पा
बाळ : मम्मी
पप्पा : प... प्पा
बाळ : म... म्मी
पप्पा : तुझ्या मायला तुझ्या
तेवढ्यात बाळाची मम्मी घरात येते.
मम्मी : काय म्हणतंय बाळ आमचं
बाळ : तुझ्या मायला तुझ्या
मम्मी : असं म्हणू नाही बाळा. कुणी शिकवलं तुला हे ?
बाळ : पप्पा
---------------------------------------------
प्रतिक्रिया
20 May 2017 - 2:33 pm | अॅस्ट्रोनाट विनय
कथुकल्या १ , २ , ३ , ४ , ५ , ६ , कथुकल्या ७
20 May 2017 - 2:51 pm | तुषार काळभोर
दुसरी-कुणीतरी आहे तिथे
तिसरी-हडळ?
चौथी-बालकथा?
20 May 2017 - 3:14 pm | दशानन
4 था
=))
=))
मेललो!!
20 May 2017 - 3:16 pm | अभ्या..
चौथी आवडली. ;)
20 May 2017 - 3:56 pm | खेडूत
मस्त!!
20 May 2017 - 7:51 pm | टवाळ कार्टा
३री नाही समजली....बाकी ३ लय भारी
20 May 2017 - 8:47 pm | दशानन
खरं तर 3री सर्वात दर्जेदार आहे, खूप गहन अर्थ असलेली.
20 May 2017 - 11:17 pm | अॅस्ट्रोनाट विनय
बरोबर आहे. तिसरी सर्वात जास्त गहन आहे आणि दोनतीन अर्थ संभवतात.
दुसरीतही दोनतीन शक्यता आहेत. त्यातली एक विनोदी आहे.
20 May 2017 - 11:19 pm | अॅस्ट्रोनाट विनय
प्रतिसादांबद्दल आभार :)
21 May 2017 - 9:41 pm | कानडाऊ योगेशु
३ री थोडक्यात च खूप काही सांगुन जाणारी तर ४ थी भन्नाट आहे.