"लळा जिव्हाळा शब्दच मोठे"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
9 Oct 2008 - 11:16 pm

"रामभाऊ" असं न चुकता आम्हीच त्याला म्हणायचो.कुणी त्याला " रामा"म्हणायचे तर कुणी त्याला "रे,रामा "अशी साद घालायचे कुणी "रामा रे " असं पण म्हणायचे.सर्व साधारणपणे लोक त्याला "रामा" च म्हणायचे.
तर हा रामा म्हणजेच रामभाऊ गणेश माळगी,अगदी लहान असताना, त्याचे वडील माझ्या आईकडे त्याला घेऊन आले आणि
तिला म्हणाले,
"हा माझा मुलगा तुझ्याकडे ठेव,शिक्षणात त्याचं लक्ष नाही,तुझ्या हाताखाली कामाला घे,आणि दोन घांस घाल.मला आता एव्हड्या मुलांना पोसायला जमत नाही."
आणला त्यावेळा तो दहा वर्षाचा होता.आईने त्याला विचारलं,
"तू शाळेत जाणार का?"
पण तो,शाळेत जायला तयार नसल्याचं तिला दिसलं. निदान घरी काम करून पोट तरी भरील, त्याच्या बापाच्या घरी त्याची उपासमार व्हायची ती तरी होणार नाही,असें आईच्या मनात आलं.

अतिशय गरीब स्वभावाचा रामा, खूप आज्ञाधारक आणि प्रेमळ होता. आई सांगेल ती कामं निष्टेने करायचा. आईला त्याची खूप दया यायची.त्याला ती पोटभर जेवायला घालायची. पण एव्हडं जेवू घालून रामाची शरिरयष्टी दुष्काळातून आल्या सारखीच, असायची. आणि तो म्हातारा होई पर्यंत शरिर तसंच ठेवून होता.

हळू, हळू रामा आईची बाजाररहाट करायला लागला. आणि पुढे पुढे आपल्या आपणच वेळ बघून,
"आई,जरा वांयंच बाजारात जावून येतंय़ं हां!,वेंगुर्ल्यासून माशाची येष्टी येंवचों टायम झालो दिसतां"
असं आईने ऐकलं न ऐकलं असं बोलून "साधना कपडे का साबून ईस्तमाल की जिये " असं मोठं अक्षरात लिहीलेली पिशवी पाठीवर टाकून चप्पल पायातून सरकून चालू पडायचा.त्यावेळी आम्ही सावंतवाडीत राहायचो.
"दहा वांजता वेंगुर्ल्याची गाडी कशी येणार? काही तरी निमीत्त करून हा बाहेर भटकायला जातो."
असं माझे वडील कुरकुरून पुटपुटायचे.त्यावर आई म्हणायची,
"बिचाऱ्याला घरात काम काम करून कंटाळा येत असेल."
हे ऐकून वडील गप्प बसायचे.
रामा गटाराच्या बाजू, बाजूने मान खाली घालून चप्पल घसटत, घसटत बाजारा पर्यंत जावून यायचा.वाटेत काही रामाला ओळखणारे दुकानदार किंवा हॉटेलवाले गम्मत म्हणून त्याची फिरकी घ्यायचे
"रामा मासळी कसली ईलीसा?"
यावर रामाचं नेहमीचं उत्तर,
"येंगुर्ल्यासून नुकतीच गाडी सुटली, असां भाटाचो गडी सांगी होतो.बांगडे खूप रापणीत लागले हत असां ऐकलां"
असं अमळ खोटं सांगून वेळ मारून न्यायचा. घरी आल्यावर उशिर झाल्यामुळे स्वतःला गिल्टी समजून, न बोलता सर्व कामं सिरयस होवून हाता वेगळी करायचा.आईच्या हे लक्षांत येत असे पण ती आईच्या ह्रुदयाने त्याला क्षमा करायची. आणि ते त्याच्याही लक्षात यायचं. रामाच्या तोंडात अस्सल मालवणी शब्द होते.बाजारातून जावून आल्यावर काही ना काही बातम्या घरात येवून सांगायचा.
"डुबळ्याचो म्हातारो खवांचलो(वारला)"
"केसरकराचो जांवई सडोफटींग(एकटाच) आसा"
"भाटाचो पंप चॉं,चॉं करून आवाज करतां "
मधेच कधी तरी मराठी मिश्रीत मालवणी बोलायचा.
"आता तुझा बाबा येणार तुला फिरायला "होरणार"(नेणार)".
"मी हुंतलं(म्हटलं) म्हणून सांगू नका हां!"वगैरे, वगैरे.
बातम्या द्दायला त्याला खूप आवडायचं.

काही वर्षानी आम्ही जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तो पण आमच्या बरोबर मुंबईला आला.सावंतवाडी सोडण्यापुर्वी भेटेल त्याला सांगत राहिला,
"आता तुम्हाला मी गमणार(दिसणार) नाही"
आणि ऐकणारा काही तरी प्रश्न विचारणार याची अपेक्षा करीत थोडा पॉझ घ्यायचा,
"असांss कायss ? "
असा त्याला प्रश्न विचारला जाण्याची अपेक्षा असायची. विचारल्यावर म्हणायचा,
" असां काय म्हणतांss? परत परत येणां जाणां काय सोपा नाही लांबचा प्रवास आणि खर्च काय कमी येतां म्हणून सांगू.?"
असं स्वतःच्याच कल्पनेत जणू हाच खर्च करणार आहे अशा अविर्भावात त्या प्रश्न कर्त्याला जादा माहित देण्याचा प्रयत्न करायचा.
ठाण्याचा उत्तरसळला राहून रामा तिथे पण लोकात पॉप्युलर झाला.
"काय रामा कसं आहे?" असं कुणी विचारल्यावर,उत्तर द्दायचा,
"बरां आहे ! "

दहाएक वर्षानंतर माझा धाकटा भाऊ सावंतवाडीला नवीन धंदा करण्यासाठी गेला तेव्हा रामा पण त्याच्याबरोबर गेला.आतां रामाला लोक "मुबईकर " म्हणून संबोधीत होते. त्याचा त्याला गर्व वाटायचा. सुरवातील गावतल्या लोकाना आपल्या मनातल्या विचारांची भर घालून मुंबईचे मोठेपण वर्णन करून सांगायचा.
माझ्या भावाच्या फॅक्टरीत पडेल त्या कामाची त्याला मदत करायचा.आतां भावाने त्याला घरीकाम न करता फॅक्टरीत काम करण्याचे जणू प्रमोशन दिलं होतं. आल्या गेलेल्याला "बाबाची"म्हणजे माझ्या भावाची मोठेपणं सांगायचा.त्याचा स्वभाव बघून लोक त्याच्याशी प्रेमाने वागायचे.आलेल्या माणसाला न विचारताही जादा माहिती द्दायचा.माझ्या भावाला त्याला अशी संवय बरी नाही म्हणून समजावून सांगावं लागायचं.वडीलांच्या जागी तो रामाला मानायचा.

त्याच्या "बाबाची"फॅक्टरी चांगली चालली होती.पण जसं वंय होत होत गेलं तसा रामापण थकत चालला होता.
खाकी हाफपॅन्ट-शॉर्ट- आणि वर मोठ्या बटनाचा बुश शर्ट आणि पायांत जूतं-चप्पल-घालून "बरां आहे ! "म्हणून जबाब देणारा रामभाऊ रस्त्यावर कमीच दिसायचा.घरचे लोक पण त्याला काम देत नसत.बसून खायला रामाला खूप जीवावर यायचं.
आपल्या नात्याचा नाही, गोत्याचा,तरी केवळ घरातला म्हणून राहील्याने किती जिव्हाळा लावून होता.
डॉक्टर म्हणाले रामा आता दिवस नाही काढणार.त्याचं हार्ट खूपच वीक झालं आहे.हे ऐकून घरची मंडळी तो अंथरूणाला लागल्यावर अक्षरशः सेवा करीत होते.वय ऐंशी झालं होतं.आणि एक दिवस रामाने ईहलोकाची दिशा धरली.अगदी रक्ताचं माणूस जातं तसं सगळे त्याच्या पश्चात रडले.

तो गेल्याची बातमी ऐकून मला एका कवितेची आठवण आली.त्या कवितेत मी रामाच्या संदर्भात बदल करून ती लिहिली. .
मुळ कविता,
"लळा जिव्हाळा शब्दच खोटे
कोण कुणाचे नाही
राजा
कोण कुणाचे नाही"

लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

पिसे,सनतडी.काड्या जमवी
चिमणी बांधी कोटे
दाणा,दाणा आणून जगवी
जीव कोवळे छोटे
चिमणा उचलूनी नेई बाळा
जगविण्या साठी त्याते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

रक्तहि सगळे नसते
असू शकते माया
कोण कुणाचे नसून ही
अंतरी असते दया
सांगायाची नाती नसेना
प्रेम कुठे जाते
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

माणुस सुद्धा प्रेम करतो
समजून दुसरा अपुला
दुसरा ओळखी उपकाराते
देई सर्वस्व त्याला
कोण कुणाचा जोडू
पाहतो या जगती नाते
लळा जिव्हाळा शब्दच मोठे
कोण कुणासाठी जगते
राजा
कोण कुणासाठी जगते

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

नारायणी's picture

10 Oct 2008 - 12:24 am | नारायणी

सुंदर लेख. मोजक्या शब्दात रामभाउचं व्यक्तिमत्व अगदी डोळ्यासमोर आणलत.

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Oct 2008 - 12:29 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्याला लेख आवडल्याचं वाचून बरं वाटलं.
प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

चतुरंग's picture

10 Oct 2008 - 12:42 am | चतुरंग

एका डोळ्यात रामाच्या विरहाच्या दु:खाचे आणि दुसर्‍यात माया अजूनही रक्ताच्या नात्यापलीकडे जीव लावते ह्या आनंदाचे आसू दिलेत !!

चतुरंग

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Oct 2008 - 1:11 am | श्रीकृष्ण सामंत

चतुरंग
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

बेसनलाडू's picture

10 Oct 2008 - 4:39 am | बेसनलाडू

रामभाऊ शब्दशः डोळ्यांसमोर आले.
(व्यक्तिशः)बेसनलाडू

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Oct 2008 - 8:06 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

यशोधरा's picture

10 Oct 2008 - 9:43 am | यशोधरा

आवडलं हे व्यक्तीचित्रण. छान लिहिलं आहेत काका.

श्रीकृष्ण सामंत's picture

10 Oct 2008 - 11:03 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्याला हे लेखन आवडलं हे वाचून बरं वाटलं
प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

फटू's picture

11 Oct 2008 - 10:55 am | फटू

व्यक्तिचित्र अगदी छान उतरलं आहे !!!

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

श्रीकृष्ण सामंत's picture

11 Oct 2008 - 11:15 am | श्रीकृष्ण सामंत

आपल्याला व्यक्तिचित्र आवडलं हे वाचून बरं वाटलं
प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com