डाव - ४ [खो कथा]

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जनातलं, मनातलं
9 Apr 2017 - 5:12 pm

डाव - १
डाव -२
डाव- ३

सखारामच असणार तो. त्याचं हे नेहमीचंच हाय. उगा हितं तिथं कडमडायचं. नाय तर काय. आता त्यानं गावभर बोभाटा केला तर आली का नाय पंचाईत? आधीच बाबांना संशय आलाय. परवा मोबाईलचं बील बघून तडतडलेत.  मोबाईल काढून घ्यायची धमकी पण दिलीय.

सखारामचं तोंड दाबायचं  काम वस्तादनं चांगलं केलं आसतं. पण मी मास्तरासंगट होते  कळलं तर त्याचा आग्या वेताळ व्हायला वगत नाही लागणार. तसा त्याच्या डोस्क्यात किडा आलाय म्हणा. पण मी बी काय कच्ची कैरी नाय. हां.
 
विचार करता करता रुपी वाड्यावर पोचली. वाघ्यानं एकदाच "भौक" करून अंदाज घेतला. घरचंच माणूस म्हणून पुन्हा वेटुळ करून तो झोपून गेला. हळू मागलं दार ढकलून रुपी आत आली. सगळीकडं सामसूम होती. आपल्या खोलीत जाऊन रुपीनं गादीवर लोटून दिलं. तिच्यासाठी हे नेहमीचंच होतं.
 
मास्तुरडा आज लईच रंगात आला होता. पण वस्ताद पेक्षा लई बरा म्हणायचा. वस्ताद जाम दमवून टाकतो. आणि तो विक्या नुस्ता पचपचीत. मास्तुर काय, वस्ताद काय अन् विक्या काय एकजात गावंढळ. जरा वाकून ओढणी खाली पाडली की झाली यांची गळायला सुरुवात. यांच्याकडून कामं करून घेणं सोप्प हाय. फक्त एकाची  दुसऱ्याला दाद लागू नाय दिली की झालं. तेवढीच आपली पण मजा.
 
पण या कुण्णालाच उस्मानची सर नाय. उस्मान म्हणजे हिर्रो. शारूख खान पण त्याच्या फुडं नांगी टाकतो. त्या दिवशी शारुखबरोबरचा फोटो पाठवलेला. त्या खानापेक्षा उस्मानच हेंडसम वाटत होता. पण उस्मान एकदम आतल्या गाठीचा हाय. त्याच्या मनात काय शिजतंय याचा कुणाला पत्ता लागणं कठीण. त्यामुळं त्याला पटवायला लय वेळ लागला.  शेवटी व्हिरीवर फोटू काढताना मलाच आगावपणा करावा लागला.

तवा सुदा तो फेंद-या दाद्या तिथं कडमडला. एरवी दुपारनंतर व्हिरीवर चिटपाखरु नसतय. म्हणून मुद्दाम उस्मानला तिथं बोलावून घेतलेलं. सगळं चांगलं जुळत होतं तर ते येडं पोचलं तिथं. आणि बरोबर हा सखाराम. त्यांचा आवाज ऐकून आम्ही पाय-याखालच्या खोबणीत लपलो. ते ब्येसच झालं म्हणा. नायतर उस्मानच्या अंगचटीला येता आलं नसतं. 
  
ते आठवून रुपी गुर्मीत हसली. ती आपली ताकद वळकून होती. तवा किती वेळ तापवायचा आणि भाकरी कवा भाजायची ते तिला चांगलंच अवगुत होतं. शेवटी पाटलाचंच रगत. पाटील आत्ता लई संस्काराच्या नि इक्कडच्या अन् तिक्कडच्या गोष्टी बोलून -हायलाय. पण तरणा असताना जगन पाटलाच्या ब-याच भानगडी होत्या. पण गावात सगळ्यात गाजलं ते पुजा-याच्या बायकोचं प्रकरण. रंजीचा बाप कोण यावर गावातली इरसाल धेंडं अज्जून पैजा लावतात. पाटलीण मात्र बिचारी एकदम गरीब गाय. पाटलाच्या करतुबानं तर ती अजूनच कानकोंडी झाली. ती कधी वाड्याभायर पडत नसे. पडलीच तर उगा देवळात. रुपीनंतर दुसरा मुलगा व्हावा म्हणून तिनं लोकांनी जी जी सांगितली ती सगळी व्रतं करून पायली पण पुन्यांदा कूस काय उजवली न्हाय. मग तिनं देवधर्मात जे स्वतःला अडकवून घेतलं ते कायमचं. 
  
रुपीकडं आईचं रूप अन् बापाचा गूण पुरेपूर उतरला होता. आईची घुसमट अन् बापाचची दांडगाई बघून रुपी काय समजायचं ते समजली. जगात दोन टायपाची लोकं असत्यात. दादागिरी करणारी अन् ती गुमान ऐकून घेणारी. आपण पहिल्या प्रकारात जायचं हे तिनं  पक्क ठरवलं. तसंही तिला या गावात रहायचंच नव्हतं.
 
विहिरी वरचे फोटो एकदम कात्तील आले होते. उस्मानचा नंतर मेसेज पण आला की  डायरेक्टर एकदम खूश झालाय. लवकरच भेटायला बोलावलंय. म्हणजे निम्मं  काम फत्तं. डायरेक्टर वगिरं बड्या लोकांची वळख होईपर्यंत  उस्मानला पकडून ठेवलं पाहिजेल.
  
पण आईबाबा काय मुंबईला जाऊ देणार न्हाईत. हं. पण एकदा हातात खजिना आला की त्यांचं कोण ऐकून -हायलंय? हे सगळं फुडचं फुडं. आधी सखारामचा बंदोबस्त करायला पायजेल. विक्याला सांगावं का? पुढचा प्लॅन ठरवत रुपी झोपून गेली.

कथाआस्वाद

प्रतिक्रिया

Ranapratap's picture

9 Apr 2017 - 6:13 pm | Ranapratap

1 नंबर लिवलय हो तुमि

जव्हेरगंज's picture

9 Apr 2017 - 6:30 pm | जव्हेरगंज

_/\_

अॅस्ट्रोनाट विनय's picture

9 Apr 2017 - 11:21 pm | अॅस्ट्रोनाट विनय

भारी जमलय. रूपीचा pov मजा वाढवेल..

दीपक११७७'s picture

9 Apr 2017 - 11:31 pm | दीपक११७७

छान जमलंय पुढला खो कुणाले

पैसा's picture

10 Apr 2017 - 9:27 am | पैसा

मस्त चाललंय!

खतरी झालाय हा भागदेखील... आता मजा यायला सुरूवात झालिये.

कविता१९७८'s picture

10 Apr 2017 - 1:21 pm | कविता१९७८

मस्तच लिहीलयस

विनिता००२'s picture

10 Apr 2017 - 1:22 pm | विनिता००२

मस्त जमलाय हा भाग :)

५० फक्त's picture

10 Apr 2017 - 2:53 pm | ५० फक्त

जबरदस्त झालय हे सगळंच, आता उरलेल्या प्लेयरना लई रनिंग द बिटविन करावं लागणार आहे..
मज्जा आहे एकुणच
.
.
.
.
.
.
.
जाम गुन्हेगारी विचार करणारी माणसं आहेत सगळी..

सगळ्या पात्रांना मस्त ग्रे शेडमध्ये रंगवल्यामुळे प्रत्येकाला हरामीपणा करायला वाव मिळणार आहे. पुढचा भाग मजेशीर असेल.

प्राची अश्विनी's picture

12 Apr 2017 - 7:57 am | प्राची अश्विनी

धन्यवाद!

प्राची अश्विनी's picture

13 Apr 2017 - 7:21 pm | प्राची अश्विनी

पुढचा खो जव्हेरगंज यांना देत आहे.

जव्हेरगंज's picture

14 Apr 2017 - 9:52 am | जव्हेरगंज

धन्यवाद, लिहितो लवकरच.

:)

जव्हेरगंज's picture

14 Apr 2017 - 9:52 am | जव्हेरगंज

धन्यवाद, लिहितो लवकरच.

:)

किसन शिंदे's picture

14 Apr 2017 - 10:00 am | किसन शिंदे

एकदम ३६० अंशात कथा फिरवलीये या भागात. जबराट अगदी. चारही भाग एकदम वाचले आणि चांगले वाटले, पण सर्वात जास्त भारी हा भाग वाटला.

रुपीचं पात्र अगदी अनपेक्षितपणे उभं केलंय.

प्राची अश्विनी's picture

14 Apr 2017 - 4:20 pm | प्राची अश्विनी

धन्यवाद!