“या फोटोकडे एकदा काळजीपूर्वक पहा. मुलांनो, तुमच्यापैकी दोघांना आतापर्यंत मिशा चिकटवता आल्या नाहीत. व्यवस्थित खेळा, रशियाचं भविष्य तुमच्या हातांत आहे.”
रशियाच्या बर्फाळ भागातल्या त्या गुहेत काही मुलं हिटलरला स्टालिनच्या मिशा चिकटवण्याचा खेळ खेळत होती. त्यांच्या डोक्यावर रशिया अन जर्मनीच्या लष्करी विमानांचं घनघोर युद्ध सुरु होतं.
रशियाचा फ्लाइट कमांडर इगॉर सर्वाँच्याच आवडीचा होता. आतपर्यंत शत्रुंची अनेक विमानं त्यानं हा हा म्हणता नेस्तनाबूत केली होती. आतासुद्धा तो प्रचंड वेगानं शत्रुच्या विमानाकडे झेपावला. रॉकेट लॉन्चरचं तोंड जर्मन विमानाकडे वळवून तो बटण दाबणार तेवढ्यात एक मिसाईल त्याला प्रचंड वेगाने त्याच्याच रोखाने येतांना दिसलं. त्याने झटपट निर्णय घेऊन वेगाने हालचाली केल्या, दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ते रॉकेट लॉन्चर त्याच्या विमानाला घासून गेलंच. दिशादर्शक यंत्रणा क्षणात कोलमडली, विमान हेलकावे खाऊ लागलं खुप कमी वेळ होता त्याच्याकडे. त्याने आपल्या सिटखालचं Emergency Exit बटण दाबलं; पण दुर्दैव. विमान वेगाने भिरभिरत खाली जायला लागलं. त्याचं आयुष्य आता आठ वर्षांच्या स्वेतलॅनाच्या हातांत होतं.
स्वेतच्या डोळ्यांना करकचून पट्टी बांधण्यात आली. उजव्या हातात स्टालिनची मिशी घेऊन ती डाव्या हाताने हिटलरचा फोटो चाचपडू लागली. गुहेतल्या सर्वांचा श्वास रोखला गेला. स्वेतने हिटलरच्या नाकाचा बरोबर अंदाज घेतला अन मिशी चिकटवणार एवढ्यात एक बॉम्बगोळा गुहेपासून अगदी जवळ फुटला. स्वेत फोटोपासून दूर फेकली गेली. तिचे कान अन शरीर सुन्न झाले होते. तरीसुद्धा ती उठली अन जखमी पावलांनी पुढे जाऊ लागली.
दोनेक पावलं जाउन ती परत कोसळली. पण कुणीच तिला आधार द्यायला पुढे गेलं नाही. ती स्वतःच सावरली, टोंगळ्यांवर घासत कशीबशी फोटोपर्यंत जाउन पोहोचली. डोळ्यांसमोरचं सगळं अंधुक दिसत होतं. तरीसुद्धा तिने चाचपडत अंदाज घेतला अन थरथरत्या हातांनी नाकाच्या बरोबर खाली मिशी चिकटवून टाकली. गुहेत प्रचंड जल्लोष उसळला. लहान-मोठी सगळी मुलं नाचू लागली.
अन त्याचक्षणी इगॉरच्या विमानाचं Emergency Exit बटण दबलं अन तो पॅराशूटबरोबर विमानाबाहेर पडला.
जाताजाता त्याने मिसाईल लॉन्चरचं बटण दाबलं. एक रॉकेट सरळ जाऊन शत्रुविमानाच्या शेपटीत जाउन घुसलं.
“चला नेक्स्ट.कुणाचा नंबर आहे?”
साडेनऊ वर्षांचा चुणचुणित येफीम समोर आला. त्याच्या डोळ्यांना करकचून पट्टी बांधण्यात आली.
आकाशात शत्रुची विमानं आग ओकंत होती. आता मुलांना गाफील राहून चालणार नव्हतं. त्यांनी जास्तीत जास्त मिशा चिकटवायला हव्यात. कारण दूSर जर्मनीमध्ये, अशाच एखाद्या गुहेत जर्मन मुलं स्टालिनला मिशा चिकटवण्याचा खेळ खेळत असतील.
--------------------------------------------------
प्रतिक्रिया
25 Feb 2017 - 8:50 pm | वाल्मिकी
क्या बात हैं
26 Feb 2017 - 5:13 am | आदूबाळ
भारी आहे! जबर कल्पना!
एक खुसपट: बार्रबरोसा (हिटलरचा रशियावरचा हल्ला) हे मुख्यतः आर्मी ऑपरेशन होतं. त्यात विमानांच्या 'डॉग फाईट' फारशा झाल्या नाहीत. जयंतकाका जास्त सांगू शकतील.
26 Feb 2017 - 7:41 am | अॅस्ट्रोनाट विनय
Operation 'Barbarossa' - named after the all-conquering Medieval Holy Roman Emperor Frederick I - was launched on 22 June 1941. Over three and a half million German and other Axis troops attacked along a 1,800-mile front. A total of 148 divisions - 80 per cent of the German Army - were committed to the enterprise. Seventeen panzer divisions, formed into four Panzer Groups, formed the vanguard with 3,400 tanks. They were supported by 2,700 aircraft of the Luftwaffe. It was the largest invasion force to date.