पूर्वसूत्रः-
त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली.
मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!!
दोन दिवस नुसतेच गेले. तिसर्या दिवशी सकाळी मुंबईहून मुलगा आला. काम सोडून यावे लागल्यामुळे थोडासा त्रासलेला वाटला. कोचावर स्थानापन्न झाल्यावर घरातल्या कुटुंबप्रमुखाने विषयाला हात घातला.
"तुम्हाला तसदी दिल्याबद्दल सॉरी, पण इथे हिला आणि माझ्या मुलाला जरा वेगळे अनुभव येत आहेत."
"काय झालं ?" मुलाने विचारलं.
" माझ्या मुलाला वरच्या खोलीत एक आजोबा दिसले, असं तो म्हणतो. पण आम्हाला काहीच दिसलं नाही." त्यामुळे, ही जरा अस्वस्थ झालीये. इथे काही झालं होतं का ? नाही.. म्हणजे माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही, पण तरी आपलं विचारतो,
तुम्ही वडिलांचे सगळे क्रियाकर्म केले होते ना ?"
मुलगा माझ्यासारखाच होता. तो लगेच म्हणाला," नाही. माझ्या वडलांचा आणि माझ्या आजोबांचा कर्मकांडावर कधीच विश्वास नव्हता. तस्मात, माझाही नाही. वडिलांचेच काय, माझ्या आईचेही कुठलेही विधी केले नाहीत आम्ही. आमच्या घरांत देव नाहीत. आम्ही कुठल्याच घराची वास्तुशांत केली नाहीये आजवर! पण मला सांगा, तुमच्या मुलाला भास झाला ते माझे वडीलच होते असं तुम्हाला का वाटतं?"
कुटुंबप्रमुख जरा गडबडला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. कोंडी फोडण्यासाठी मुलानेच पुढाकार घेतला. त्याने त्या छोट्याला खिशातून फोटो काढून दाखवला. " हे आजोबा दिसले का तुला ?"
त्याने होकारार्थी मान हलवली. वातावरण एकदम टेन्स झाले. छोट्याची आई एकदम म्हणाली, "त्याला नका ओढू यांत, अहो, तुम्ही दुसरं घर बघायला सुरवात करा."
कुटुंबप्रमुखाने पुन्हा एकदा प्रयत्न केला, " पण मी काय म्हणतो ? तुम्ही एकदा घराची शांत करुन घ्या ना ! त्यांनाही इथे अडकून रहाण्यापेक्षा मोक्ष मिळेल."
माझा मुलगा उसळला. तो माझ्यासारखाच हार्डकोअर नास्तिक होता. " हे पहा, माझा ज्या गोष्टींवर विश्वास नाही, त्या मी करणार नाही. तुम्हाला जर त्रास होत असेल तर घर सोडू शकता." माझं घर कायम रिकामं राहिलं तरी मला पर्वा नाही."
मुलगा बॅग घेऊन उठला आणि निघून गेला. नवरा-बायको मधे बराच वेळ खुसपूस झाली. बहुतेक, अजून काही दिवस रहाण्याचा प्रयत्न करायचा, असे त्यांचे ठरले असावे. तसाही, मी त्यांना काहीच त्रास देत नव्हतो. मी पुन्हा माझ्या खोलीत जाऊन बसलो.
थोडा वेळ असाच गेला. पुन्हा हळूच दार वाजले. छोटा मुलगा परत दारात उभा होता, यावेळेस हंसत नव्हता, अंगठा तोंडात होता. मी पुन्हा त्याचे नांव विचारले. काही उत्तर मिळाले नाही. "अरे, असा तोंडात अंगठा घालू नये", ... हे आणि असं आणखी काही म्हणालो. पण मुलगा ब्लँक नजरेने पहात होता. थोड्याच वेळांत माझ्या लक्षांत आले, माझे बोलणे त्याला ऐकूच जात नव्हते. म्हणजे मी खरंच त्यांच्या जगांत नव्हतो! मला त्यांच्याशी कधीच संवाद साधता येणार नव्हता. आता खरा धक्का मला बसला होता.
मनांत विचार घोळू लागले. आपली तर, काहीच इच्छा अपुरी राहिली नाहीये. तरी आपण का मागे राहिलोय ? मुलाने पिंडदान केले असते तरी, मी काही कावळ्यांना आडकाठी केली नसती. सिनेमात दाखवतात तसे यमदूत आपल्याला न्यायला का आले नाहीत ? अरुंद बोगद्यातून वेगवान प्रवासाचा अनुभव आपल्याला का आला नाही ? त्या बोगद्याच्या दुसर्या टोकाला दिव्य प्रकाश का दिसला नाही ? दिसला असता, तर त्यालाच विचारली असती, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे! म्हणजे आत्तापर्यंत आपण जे वाचले त्या सगळ्या कल्पना होत्या! आणि त्याच कशा खर्या आहेत, हे अधिकारवाणीने तावातावाने सांगणारेही अज्ञच आहेत तर! आणि आता करायचे काय ? आपल्याला कोणी न्यायलाच आले नाही तर स्वतःहून वाट कशी सापडणार ? आणि सगळ्यांचेच आपल्यासारखे होत असते, तर आपले सगळे आप्त इथेच भेटायला हवे होते. मग ते कुठे गेले ? का त्यांना मोक्ष मिळाला ? काहीच कळेना. स्वतःचा आणि परिस्थितीचा संताप आला. रागाच्या भरांत जोरजोरात दारं खिडक्या आपटल्या.
खाली खळबळ माजली असावी. दुसर्याच दिवशी, ट्रकमधे सामान भरुन, ते सुखी कुटुंब घर सोडून गेले. त्यानंतर पुन्हा कोणी, इथे यायला धजावले नाही. मी आपला, बसलोय कोणीतरी येईल आपल्याला न्यायला, या आशेने! अरेरे, मरणानंतरही दु:ख पाठ सोडत नाही तर!!!
प्रतिक्रिया
20 Feb 2017 - 11:27 am | खेडूत
मस्त. पुभाप्र.
क्रमशः विसरले का?
20 Feb 2017 - 7:04 pm | तिमा
आता कसलं क्रमशः ? संपली कहाणी माझी.
अजूनही इतरांनी पण वेगवेगळे शेवट लिहावे, स्वागत आहे.
21 Feb 2017 - 3:41 pm | तुषार काळभोर
+१
मी पण आहे स्वागत कमिटीत!
20 Feb 2017 - 7:13 pm | जेपी
कथा आवडली.
21 Feb 2017 - 1:34 pm | एस
मला वाटतं की कथा मागच्या भागात जेव्हढी होती त्यातच जास्त मजा होती. मागच्या भागात मजेदार वाटणारी कथा ह्या भागात गंभीर झाली. त्यापेक्षा मग पहिल्या भागातच संपली असती तर किंवा ह्या भूतयोनीतल्या गमतीदार गोष्टी अजून रंगवता आल्या असत्या तर वाचकांना अजून आवडलं असतं. उदा. वपुंची ती प्रख्यात गोष्ट.
21 Feb 2017 - 2:27 pm | तिमा
मला ही गोष्ट मजेदार करायचीच नव्हती. तसे मत, पहिला भाग वाचून झाले असेल तर ते माझे अपयश आहे. कथा लिहिताना रत्नाकर मतकरी आणि वपु डोक्यांत होतेच. पण त्यांच्या कथांशी जराही साधर्म्य वाटू नये, म्हणून दुसर्या भागाचा शेवट वेगळा करण्याचा प्रयत्न केला. तरीही परखड अभिप्रायाबद्दल आपला आभारी आहे.
शिवाय, दुसरा भाग पूर्णपणे वेगळा करण्याचे स्वातंत्र्य मिपाकरांना आहेच.
21 Feb 2017 - 3:35 pm | एस
अच्छा. मग माझ्या समजण्यात गोंधळ झाला असावा. कारण मला पहिला भाग थोडासा हलकाफुलका, विनोदी अंगाचा वाटला. असो.
21 Feb 2017 - 3:00 pm | संजय पाटिल
अमिताभचा भूतनाथ आठवला..
21 Feb 2017 - 3:22 pm | श्रीगुरुजी
सर्व १० महापालिकांत व सर्व जिल्हापरीषदात शिवसेनेचा दारूण पराभव होणार आहे. शिवसेना मुंबईत तिसर्या क्रमांकावर असेल तर पुण्यात ५ व्या क्रमांकावर असेल. मुंबई, नाशिक, नागपूर व पुणे येथे भाजप प्रथम क्रमांकावर असेल. उल्हासनगर, पिंपरी-चिंचवड व ठाणे येथे राष्ट्रवादी प्रथम क्रमांकावर असेल. सोलापूरमध्ये काँग्रेस प्रथम असेल. अकोल्यात भाजप व बहुजन महासंघ यांच्यात चुरस असेल.
21 Feb 2017 - 3:23 pm | श्रीगुरुजी
सॉरी. जागा चुकली. क्षमस्व.
संमं,
कृपया हा प्रतिसाद येथून काढून टाकावा ही विनंती.
21 Feb 2017 - 3:36 pm | यशोधरा
मृत व्यक्तीच्या दृष्टीकोनातून (?!) घटनेकडे पहायचा प्रयत्न वेगळा वाटला आणि आवडला. खरेच असे होत असेल?
शेवटाला कथा किंचित आवरली असेही वाटले.
21 Feb 2017 - 3:58 pm | तिमा
गुरुजींच्या प्रतिसादामुळे उगाच मेलो, असं वाटलं!
21 Feb 2017 - 5:36 pm | संदीप डांगे
=)) =))
21 Feb 2017 - 5:49 pm | कानडाऊ योगेशु
गुरुजी बहुदा शांती करायला आले असावेत.! ;)
21 Feb 2017 - 6:26 pm | अभ्या..
आइशप्पथ तिमा, भयाण हसलो तुमचा प्रतिसाद वाचून.
.
मला तर डोळ्यासमोर एकच चित्र उभे राह्यले...
.................
अहो... भाजी वाढू का?
भाजपाच एक नंबर असणार.
आओ....कोणती वाढू?
नाशिक, सोलापूर, ठाणे, मुंबई. सगळीकडे भाजपाच.
अहो...
सेना बुडणार, उधोजी पिसाळलेत.
अहो शर्टाची बाही बुडतीय आमटीत.
मनसेचा नक्षा उतरणार यंदा.
अहो ताटाकडे बघा ना..
२४ वर्षात सेनेने काय केलेय.
जेवताय ना?
सेना नष्ट होणार, जेवण नाही आनंदोत्सव करणार आता. सेलिब्रेट करणार.
दूध आटवू का मग.............
.
(समस्त भाजपाप्रेमींनो हल्के घ्या बरे. सेलिब्रेशनसाठी शुभेच्छा)
22 Feb 2017 - 9:44 am | पैसा
पण हा अधांतरी शेवट नक्कीच नाही. या कथेला काहीतरी क्लोजर असलेच पाहिजे.
22 Feb 2017 - 12:24 pm | मार्मिक गोडसे
कथेतील लहान मुलाला पहिल्यांदा आजोबा दिसतात व त्याच्याशी बोलतातही, तेच आजोबा नंतर त्या मुलाला दिसत नाहीत आणि संपर्कही साधू शकत नाहीत. परंतू ,थोड्याच वेळात आजोबा संतापाने दारं खिडक्या आपटू लागतात . हे कसं घडतं ह्याचे स्पष्टीकरण कथेत सापडत नाही. डेमी मूरच्या 'घोस्ट' सिनेमात तिच्या नवर्याच्या भूताला 'स्पिरीट' अवस्थेत जे शक्य नसते अशा गोष्टी , उदा. भौतिक वस्तू हाताळणे किंवा आपल्या पत्नीशी व्हूपी गोल्डबर्गच्या माध्यमातून शाब्दीक संपर्क साधणे हे व्यवस्थीत दाखवले आहे. असलं काही ह्या कथेत आढळलं नाही, त्यामुळे कथा अर्धवट व बेचव वाटली.
22 Feb 2017 - 2:50 pm | तिमा
कथेत, मुलाला पहिल्यांदा आजोबा दिसतात तेंव्हा ते त्याचाशी बोलतात ते त्याला ऐकू येतं, असं म्हटलेलं नाही. फक्त मुलाचे बोलणे आजोबांना ऐकू येते. दुसर्या वेळेस भेटतात तेंव्हाही मुलाला ते दिसत असतात पण त्यांचं बोलणं ऐकू येत नाही, असं अभिप्रेत होतं. तसंच घोस्ट सिनेमाशी माझी तुलना करण्याइतकी माझी लायकी नाही.
तरीही प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कारण त्रुटी दाखवणारे फारच थोडे असतात, त्यातूनच शिकता येतं.
22 Feb 2017 - 1:43 pm | Ram ram
गुर्जी हाफ चड्डी घालतात काय?
22 Feb 2017 - 2:38 pm | श्रीगुरुजी
दुसर्या धाग्यावरचा प्रतिसाद चुकून इथे पडला आणि माझा पूर्ण पचका झाला. माझ्या अनाहूत प्रतिसादावरील मजेशीर प्रतिसाद वाचून हसायला आलं. मूळ कथेचं गांभिर्य त्यामुळे हरवलं. असो. होते कधीकधी हातून चूक.
कथेच्या दुसर्या भागाविषयी. कथा खूप छान आहे. रहस्य कल्पना चांगली आहे. परंतु कथा खूप छोटी वाटली. हीच कथा ४-५ क्रमशः भागातून जास्त खुलविता आली असती. शेवट मात्र अनपेक्षित होता.