तसे आम्ही या बंगल्यात अनेक वर्षं राहिलो आहोत. माझ्या वडिलांनी हौसेने चांगला प्रशस्त बंगला बांधला. तेंव्हापासून इथे रहाण्याची इतकी संवय लागली होती की चार दिवस कुठे गांवाला गेलो तरी आईला मी, परत कधी जायचं, असं सारखं विचारुन भंडावून सोडत असे. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर, बाहेरगांवच्या कित्येक चांगल्या ऑफर्स मी नाकारल्या आणि आमच्या गांवातच नोकरी पत्करली. पगार थोडा कमी मिळायचा, पण मला ही जागा सोडायची नव्हती. आयुष्य तसं संथगतीने पण खाऊन्-पिऊन सुखी गेले. मुलं मोठी झाली, थोरला अमेरिकेला गेला आणि धाकटा मुंबईला गेला. थोड्याच दिवसांत त्याने मुंबईतल्या धंद्यात जम बसवला. मोठा फ्लॅट घेतला. मला म्हणाला, आबा, आता आई पण नाहीये. चला की मुंबईला, मलाही सोईचे होईल. थोरला तर अमेरिकेत बोलावत होता. मी दोघांचेही ऐकले नाही. त्यांना म्हटलं," अरे, माझी तब्येत अजून धडधाकट आहे, मी एकटा राहू शकतो, मुख्य म्हणजे, या घरावर माझा जीव आहे. तुमच्याकडे आलो तर सुखांत ठेवाल मला, पण जीव रमणार नाही." दोघांनीही फार ताणून धरले नाही. मी मजेत राहू लागलो. तसा मी टेक्नोसॅव्ही का काय म्हणतात, तसा होतो. कंप्युटर, नेटसर्फिंग, गाणी ऐकणं, थोडं बागकाम आणि संध्याकाळी, समवयस्कांमधे वेळ कसा जायचा तेही कळायचे नाही. मुलं दिवसातून एकदा फोन करायची. दिवस मजेत घालवू लागलो. आजारपण कधी वाटेला आलंच नव्हतं. पण एक दिवस, घरांतच जिन्याची पायरी चुकली आणि पडलो. जवळच्याच हॉस्पिटलमधे न्यावं लागलं. डोक्याला मार लागला होता म्हणे! शुद्धीत आलो, तर मुलगा उशाशीच बसला होता. म्हणाला," आबा, आता ऐका माझं, बरं झाल्यावर चला मुंबईला. मी नुसताच हंसलो. हॉस्पिटलचे वास्तव्य तसे बरेच लांबले. मला तर, कधी एकदा घरी जातो, असं झालं होतं. शेवटी, एकदाची हॉस्पिटलमधून सुटका झाली. घरी आलो तर शेजारच्या सोसायटीत कुणीतरी गेलं होतं. गर्दी बरीच होती. आमच्या आवारातही काही लोकं उभे होते. मला फार थकवा वाटत नव्हता, पण मनाने खचलो होतो. मी सरळ खोलीत जाऊन विसावलो. मुलगा थोडावेळ शेजारी गेला असावा. नंतर तो मुंबईला निघून गेला. थोरला तर, मी शुद्धीत आलो त्याच्या दुसर्याच दिवशी परत गेला. त्याला जास्त रजा कशी मिळणार ? मी एकटाच, घरांत भुतासारखा राहू लागलो. संध्याकाळी कंटाळा आला की वरच्या खोलीतल्या बेडरुममधून, मागची बाग दिसत असे. तिथे घसरगुंडीवर, झोपाळ्यावर खेळणारी मुले पाहून छान वेळ जात असे. जेवण्याखाण्याचा काही प्रश्न नव्हता. दिवस परत छान जायला लागले.
एक दिवस, बाहेरच्या खोलीतच होतो. अचानक बाहेरचा दरवाजा उघडून मुलगा आंत आला. त्याच्याकडे एक किल्ली असायचीच. त्याच्याबरोबर आणखी दोघं होते, नवरा-बायको असावेत. मी मुलाला विचारलं सुद्धा, पण त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्या दोघांनी सगळा बंगला फिरुन बघितला. फक्त माझी खोली बघितली नाही. मुलाला विचारले," काय रे, भाड्याने देण्याचा विचार आहे की काय तुझा?" पण त्याने पुन्हा, ऐकून न ऐकल्यासारखे केले. मला जरा विचित्रच वाटलं त्याचं वागणं. तो सरळ दरवाजा बंद करुन निघून गेला. काही दिवसांनी दाराशी एक ट्रक उभा राहिला. त्यादिवशीचे ते जोडपे, आता सामानासकट आले होते. माणसांनी भराभरा घरांत सामान लावले. तो माणूस मोठ्यांदा ओरडून म्हणाला," त्या मागच्या बेडरुममधे काही ठेऊ नका रे! ती मालकांची खोली आहे. मला रागच आला होता. एकतर, माझी परवानगी न घेता, मुलाने सरळ भाड्याने जागा दिली होती. कदाचित, त्यांची मला सोबत होईल, असे वाटले असेलही त्याला. पण बोलण्याची काही पद्धत आहे की नाही? आणि हे जोडपे तर माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत होते. आल्यावर त्यांनी चहा करुन प्यायला, तोही विचारला नाही मला! मीही ठरवलं, हे आपल्या अस्तित्वाचीही दखल घेत नाहीत तर स्वतःहून त्यांच्याशी बोलायचंच नाही. आपण बरं आणि आपलं काम बरं! त्यांचे दोन तीन दिवस तर, सामान लावण्यातच गेले.
एक दिवशी, संध्याकाळी, त्याने तिला विचारले," काय होतंय ? कसला विचार करतीयेस ?"
" मला नं, हे घर बरोबर वाटत नाहीये. सारखं ,कोणीतरी माझ्याकडे टक लावून पहात आहे, असं वाटतं."
मी चपापलो. बायकांना याबाबतीत सिक्स्थ सेन्स खरा. पण मी खरंच, वाईट दृष्टीने बघितले नव्हते. आता काय वय आहे का माझे ?
" तुझ्या मनाचे खेळ आहेत सारे. मला तर काहीच जाणवलं नाहीये. पण तरीही, तुला ठीक वाटत नसेल तर आपण दुसरीकडे जाऊ."
त्यानंतर, कसाबसा एक महिना राहिले आणि सरळ सोडून गेले ते. तीन चार महिने असेच गेले. पुन्हा एक ट्रक उभा राहिला. यावेळेस, एक तरुण जोडपे आणि दोन छोटी मुले! मला तर मुलांची आवडच आहे. मी खुष झालो. पण यावेळेस सावधपणे वागायचे ठरवले. माझ्या खोलीच्या बाहेरच पडलो नाही. तेही कोणी माझ्या खोलीत आले नाहीत. बहुतेक मुलांनाही ताकीद असावी. एक दिवशी संध्याकाळी, मी मागच्या बागेतील पोरांकडे पहात उभा होतो. माझ्या खोलीचे लॅच कोणीतरी उघडत होते. मी मागे वळून पाहिले. त्यांचा छोटा मुलगा दारांत उभा होता. तो चक्क माझ्याकडेच बघून हंसत होता.
" आजोबा, तुम्ही इथेच रहाता ? "
" हो रे बाळा, काय नांव तुझं ?"
तेवढ्यांत त्याची आई त्याला शोधत आली.
" तुला सांगितलं होतं ना ? या खोलीत जायचं नाही म्हणून?"
" आई, हे आजोबा इथेच रहातात," त्याने बोट दाखवले.
त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली.
मी चुटकी वाजवली, हां, म्हणजे हा मुलगा 'श्यामलन' चे सिनेमे नक्की पहात असणार तर! अब आयेगा मझा!!!
प्रतिक्रिया
18 Feb 2017 - 12:42 pm | स्वीट टॉकर
मात्र ज्यांनी तो चित्रपट पाहिलेला नाही त्यांना अजिबात समजणार नाही.
18 Feb 2017 - 12:56 pm | चित्रगुप्त
खूपच उत्कंठावर्धक सुरुवात झालीय, पण श्यामलन' चे सिनेमे हे काय असते हे ठाऊक नाही.
18 Feb 2017 - 1:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
छान आहे कथा !
" मला नं, हे घर बरोबर वाटत नाहीये. सारखं ,कोणीतरी माझ्याकडे टक लावून पहात आहे, असं वाटतं."
इथून संशय सुरु झाला आणि पुढे तो वाढत गेला आणि...
त्याची आई, गोंधळलेल्या नजरेने , त्याला बळेच घेऊन गेली.
इथे संशय बरोबर होता पक्के झाले :)
18 Feb 2017 - 1:20 pm | एस
हाहाहा! जबरदस्त! सिक्स्थ सेन्स भारी आहे.
18 Feb 2017 - 2:20 pm | यशोधरा
लिहा पटपट पुढे!
18 Feb 2017 - 2:29 pm | सिरुसेरि
छान कथा . त्या मुलाने बहुतेक भुतनाथ पाहिला असावा .
18 Feb 2017 - 2:42 pm | तुषार काळभोर
ही मालिका चालू ठेवा...
18 Feb 2017 - 7:19 pm | जेपी
श्यामलनचा उल्लेख नसता तरी चालले असते.
कथा आवडली.
क्रमश असली तर ठिक.
18 Feb 2017 - 8:29 pm | वडाप
हिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहिहि
19 Feb 2017 - 11:24 am | तिमा
सर्वांना प्रतिसादाबद्दल आणि वाचनाबद्दल धन्यवाद. कथा लिहिताना ती क्रमशः लिहिण्याचा कोणताही विचार नव्हता. आणि समजा, पुढचा भाग लिहिला तरी तो, कितपत चांगला होईल, याविषयी मीच साशंक आहे. म्हणून मला असे सुचवावेसे वाटते की, मिपावरीलच कोणीतरी किंवा अनेकांनी याचा उत्तरार्ध लिहावा. तो याहीपेक्षा चांगला होईल, अशी मला खात्री आहे. शिवाय, एकच कल्पनेपेक्षा अनेकविध कल्पनांच्या आविष्काराचा आनंद आपल्याला सर्वांना घेता येईल. संपादकांना हे मान्य असेल, तर त्यांनीही अशी अधिकृत घोषणा करायला हरकत नाही.
19 Feb 2017 - 2:08 pm | समाधान राऊत
सहमत
22 Feb 2017 - 9:40 am | पैसा
मस्त आहे!
3 Mar 2017 - 8:49 am | एमी
मस्त :-D
3 Mar 2017 - 9:12 am | अजया
मस्त कथा!
19 Mar 2017 - 4:35 pm | मदनबाण
झकास लिहलय !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू आता है सीने में जब जब सांसें भरती हूँ, तेरे दिल की गलियों से मैं हर रोज़ गुज़रती हूँ, हवा के जैसे चलता है तू मैं रेत जैसे उडती हूँ, कौन तुझे यूँ प्यार करेगा जैसे मैं करती हूँ... :- M.S. DHONI