अस का?

mina's picture
mina in जनातलं, मनातलं
4 Oct 2008 - 6:53 pm

मित्र्-मैत्रिणी॑नो आज मी माझा एक अनुभव तुम्हाला सा॑गते..माणसाच्या आयुष्यात नोकरी मिळणे हा अत्यत महत्वाचा क्षण असतो.
अन ती मिळविण्यासाठी आपण जीवाचं रान करुन प्रयत्न करतो.तसाच प्रयत्न मी देखील करीत होते. नोकरी मिळ्ण्यासाठी प्रत्यक्ष मुलाखत नावाची अग्निपरिक्षा द्यावीच लागते.अथांत ती आपल्या बुध्दीमत्तेची चाचणी असते.ज्या पदासाठी आपण अज' केला आहे त्या पदाकरीता तुम्ही कितपत योग्य आहात ही पड्ताळणी त्यातुन केली जाते. एकदा मी एका ठिकाणी मुलाखत द्यायला गेले. संपूण' मराठी कामाशी निगडीत असलेले ते पद होते.सुरवातीला सगळ्या उपस्थित मान्यवरांना स्वतःचा परिचय स्वतःहा करुन देण्याचा टप्पा पार पडला नंतर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अचूक उत्तरे देत त्यांचे समाधान केले.तिथे एक हिंदी भाषिक मान्यवर होते.त्यांनी मला काहीच विचारले नव्हते.सगळ्यांनी प्रश्न विचारुन आपआपले समाधान करून घेतल्यावर, इतकावेळ शांत बसलेल्या हिंदी भाषिक मान्यवरांनी माझ्याकडे बघितले आणि म्हणाले "आपको हिंदी नही आती?" जी आती है..मी म्हणाले.आणि त्यांनी मला हिंदीतुन प्रश्न विचारला.. मी खर तर तेव्हा थोडे घाबरलेच होते. त्यामुळे त्यांनी विचारलेला प्रश्न पटकन मला समजला नाही.मला हिंदी येत नाही असे समजुन त्यांनी मला,मै आपको यह सवाल मराठीमें पुछता हू असे म्हणत.. तोच प्रश्न विचारला...आणि मला धक्काच बसला..त्यांची मराठी इतकी मोडकी-तोडकी होती की एकच शब्द मराठी त उच्चारतांना त्यांना खुप श्रम घ्यावे लागल्याने बाकी सव' इंग्रजी शब्द घालुन तो प्रश्न त्यांनी पूण' केला. मी थोडी हिंदी ,इंग्रजी आणि मराठी
भाषेचा वापर करुन उत्तर दिले..त्यावर त्यांची प्रतिक्रिया आपको बिलकुल हिंदी नही आती..मी सांगितले ''मला हिंदी येते.''तेव्हा माझ्या उत्तरावर उपस्थित मिश्किलपणे हसले..आणि मी मनात त्यांच्या वागणुकीवर. मी काही बोलले नाही..बाहेर आल्यावर विचार केला.. जे मला हिंदी येत नसल्यावरुन हसले,त्यां मान्यवर सरांना मराठी त येत नसतांनाही त्यांनी अशा पध्द्तीने मला हसणे कितपत योग्य आहे? मुलाखत घेणार्‍या मान्यवरांनाच मराठी जमत नसेल तर त्यांनी भाषेबाबत कोणावर अशा पध्द्तीने का हसावे? मुलाखत घेतांना मान्यवरांनी प्रश्न विचारणे हा नियमच आहे, समोरचे प्रश्न विचारणारे स्वतः त्यात परफेक्ट असणारच ही आपली पक्की खात्री असते आणि ते सत्यच आहे ; पण आपणही दुसरी भाषा बोलतांना थोडेतरी अडखळतोच .प्रत्येकालाच आपली मायबोली चांगली बोलता येते.हा विचार न करता , आपली मायबोली समोरच्याला परफेक्ट यावीच हा अट्टहास योग्य आहे का? तुम्हीच मला सांगा मी चुकीचे बोलते आहे का?

धोरणअनुभव

प्रतिक्रिया

सुक्या's picture

5 Oct 2008 - 1:52 am | सुक्या

आपली मायबोली समोरच्याला परफेक्ट यावीच हा अट्टहास योग्य आहे का?
आजाबात न्हाय. पन तुमाला जर हिंदी येत न्हाय तर तसं सांगाव तेनला. ते तुमाला हासले कारण तुमी मराठी हायसा. मराठी लोक म्हंजी "मुकी बिचारी कुनी हाका".
असो आपल्या मायबोली चा अभिमान असावा.

सुक्या (बोंबील)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Oct 2008 - 11:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते तुम्हाला हसले कारण कदाचित त्यांना स्वतःच्या मराठीचं अज्ञान झाकायचं होतं. तुम्हाला जे येतं ते त्यांना येत नाही, मराठी आणि कदाचित त्यांना जे येतं तुम्हाला येत नाही, हिंदी! आता कुणी कुणाला हसायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी तुमच्या जागी असते तर मनातच त्या माणसाला "गुण" देऊन शांत बसले असते.
प्रत्येक माणूस आपापल्या कुवतीप्रमाणे विचार करतो, आपण आपले विचार त्याच्या माथी का मारावेत? आणि आपण आपल्या कुवतीप्रमाणे समोरच्याचं मूल्यमापन करतोच ना?

अवांतरः इथे भाषिक अस्मिता वगैरे काही होतं असं मला अजिबातच वाटत नाही.

अदिती

mina's picture

5 Oct 2008 - 8:46 pm | mina

अदिती प्रत्येक माणूस आपापल्या कुवतीप्रमाणे विचार करतो, आपण आपले विचार त्याच्या माथी का मारावेत हे अगदी बरोबर आहे.माझा मुद्दा तोच आहे. भाषिक अस्मितेचा प्रश्न उपस्थित करणे हा माझा हेतु नाही.

देवदत्त's picture

5 Oct 2008 - 9:01 pm | देवदत्त

ते तुम्हाला हसले कारण कदाचित त्यांना स्वतःच्या मराठीचं अज्ञान झाकायचं होतं.
'अटॅक इस बेस्ट काईंड ऑफ डिफेन्स' असे म्हणतात त्याचाच प्रकार असेल :)

--------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

राम दादा's picture

5 Oct 2008 - 12:00 pm | राम दादा

त्या हिंदी माणसाने हसुन हे सिध्द केले कि त्याची महाराष्ट्रात रहायची लायकीच नाही....महाराष्ट्रातील मुलाखत मराठीतच घ्यायला पाहिजे..मग बघा आपण किती खणखणीत बोलतो ते..

मुलाखती घेणारे जर हिंदी लोक असतील आणि ते हिंदी लोकांचीच निवड करत असतील. तर....

मग कसे होणार महाराष्ट्रातील पोरांचे....कशी नोकरी मिळणार..???

जय महाराष्ट्र .
राम दादा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2008 - 12:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या मुलाखतीतला आपल्याला खटकलेला भाग सोडून द्या ! तिथे भाषिक अस्मिता वगैरे हा मुद्दा मला गौण वाटतो.
मुलाखत घेणारे हे सर्वज्ञ असतात, अशा एका समजामुळे जितका कचरा मुलाखत कर्त्याचा करता येईल, अडचणी निर्माण करता येतील , जीतके मुलाखतकारास दबावात ठेवता येईल तितका प्रयत्न हे मुलाखत घेणारे करत असतात. कशाच्या तरी माध्यमातून कुत्सीत हसणे,मुद्दामहुन एकमेकांच्या नजरेला नजर देवून खाणाखूणा करणे. हाही त्याचाच भाग वाटत असतो. अर्थात सर्वच असे असतात असेही नाही. ज्या पदासाठी मुलाखत घेत आहात, त्या योग्यतेचा उमेदवार आहे का ? त्याच्या चाचपणीबरोबर योग्य व्यक्तिला न्याय मिळाला पाहिजे इतकेच आम्हाला वाटते.

>>आपली मायबोली समोरच्याला परफेक्ट यावीच हा अट्टहास योग्य आहे का?
ज्या प्रांतात राहतो, त्या प्रांतात राहणा-याला तेथील बोली आलीच पाहिजे. या अट्टाहासासाठी किती मोठी (राजकीय) दंगल होता,होता राहिली, विसरला की काय ! त्यामुळे या नाजूक मुद्यावर आम्ही काही बोलणार नाही. :)

>>तुम्हीच मला सांगा मी चुकीचे बोलते आहे का?
आपण थोडेसे बरोबर बोलत आहात असे वाटते. :)

प्रमोद देव's picture

5 Oct 2008 - 12:41 pm | प्रमोद देव

हसण्याची काहीच जरूरी नाहीये . तुम्हाला तरी मराठी कुठे येतंय?... मी तुमच्या जागी असतो तर तिथल्या तिथे त्याच्या तोंडावर तसे सांगितले असते.
अहो स्वाभिमान सलामत तर नोकर्‍या पन्नास... असा बाणा असायला हवा.

तुम्हीच मला सांगा मी चुकीचे बोलते आहे का?

नाहि.. तुम्ही बोलता आहात ते चुकीचे वाटत नाहि.. मात्र... अश्या गोष्टींना मुलखतीत कसे सामोरे जावे हा वादाचा विषय आहे
मी तुम्हाला ती नोकरी हवी होती असे गृहीत धरतो आहे.
मग,
वर प्रमोदकाका म्हणतात त्याप्रमाणे, "तुमच्या जागी असतो तर तिथल्या तिथे त्याच्या तोंडावर तसे सांगितले असते." हा एक मार्ग झाला. पण मराठी माणसाने आपली अस्मिता-स्वाभिमान मुलाखतीसारख्या ठिकाणी दाखवून मिळणार्‍या चांगल्या नोकरीवर पाणी सोडावे का? पण नसे केले नाहि तर "काळ सोकावतो" :) ही भीती

माझ्यामते अश्यावेळी मी असतो तर....जर आधीच्या मुलाखतीवरून नोकरी मिळण्याची शक्यता वाटात असेल तर त्या हिंदीभाषिक मुलाखतकाराचा हुद्दा, त्याचे अधिकार याची कल्पना घेतल्याशिवाय त्या क्षणी काहिहि बोललो नसतो. मात्र ही घटना लक्षात ठेऊन पुढे कधीतरी "योग्य वेळी" त्याचा कात्रज करायलाही विसरलो नसतो :)
मात्र मुलाखत तशीही वाईट झाली असेल.. व नोकरी मिळण्याची आशा ३०% पेक्षाही कमी असेल तर मात्र प्रमोदकाका म्हणतात त्याप्रमाणे तोंडावर बोललो असतो

-(म्हटलं तर लबाड म्हटलं तर व्यवहारी) ऋषिकेश

टुकुल's picture

6 Oct 2008 - 3:55 am | टुकुल

मानल भाउ तुला.
अशावेळेस आपली गरज काय आणी निवड होण्याची शक्यता यावर ठरवुन योग्य ते उत्तर देणे योग्य..
जर निवड होण्याची शक्यता जास्त तर "तुमच्या अपेक्षे एवढी हिंदी येत नाही "बोलुन वेळ मारुन न्यावी आणी जर शक्यता कमी तर
"तुम्हाला जेव्हढी मराठी येते, त्या पेक्षा जास्त हिंदी येते" हे तोंडावर बोलुन द्याव. (आपल्याला पण हासायला मिळत मग) :-)

पुढे नोकरीच काय झाल, लागली कि नाही?

----आम्हिपण म्हटलं तर लबाड म्हटलं तर व्यवहारी, टुकुल.

मनीषा's picture

5 Oct 2008 - 3:18 pm | मनीषा

भाषा ही एक साधन आहे , त्याची शुद्धता/अचुकता या बद्दल फक्त भाषा तज्ञांनीच बोलावे (असं मला वाटतं) भाषेचा मूळ हेतु आहे communication , तो साध्य होणे महत्वाचे. (याचा अर्थ असा नाही कि भाषे बद्दल बेफिकीरी दाखवावी) एक व्यक्ती जास्तीत जास्त किती भाषा शिकु शकते? एखादी भाषा कुणा एका व्यक्तीला नीट येत नाही म्हणुन त्याला कमी लेखणे बरोबर नाही. थायलंड मधे इंग्रजी भाषा फारशी कोणालाच नीट येत नाही पण त्या बद्दल त्या लोकांना कमीपणा वाटत नाही ते जसे जमेल तसे बोलतात.. तिथे एका कॅब चालकाला विचारले कि वेगळ्या रस्त्याने जाउ शकतो तर त्याने उत्तर दिले ...can also can - can not also can पण हे अगम्य इंग्रजी मला कळले .. त्याला म्हाणयचे होते कि या रस्त्याने गेलो तरी चालेल का किंवा दूसर्‍या रस्त्याने गेलो तरी चालेल ..
पण आपल्या मायबोली बद्दल आपुलकी जरुर असावी... काही मराठी मंडळी सुद्धा मराठी बोलणार्‍या कडे हेटाळणीने बघतात.. हे बरोबर नाही .
जे मला हिंदी येत नसल्यावरुन हसले,त्यां मान्यवर सरांना मराठी त येत नसतांनाही त्यांनी अशा पध्द्तीने मला हसणे कितपत योग्य आहे?
त्यांना आपण म्हणु शकतो तुम्हाला जितके मराठी येते, त्या पेक्षा थोडे जास्त मला हिंदी येते.

प्रभाकर पेठकर's picture

5 Oct 2008 - 9:06 pm | प्रभाकर पेठकर

माझ्या इंग्रज साहेबाशी बोलताना माझी एकदा एक क्षुल्लक चुक झाली. त्याने लगेच माझी चूक दाखवून दिली. त्याचे म्हणणे असे की मी वापरलेला शब्द हा बोली भाषेतील आणि रस्त्यावर वापरण्याच्या भाषेतील होता. आपल्या ऑफिस मध्ये बॉसशी अशा भाषेत बोलत नाहीत.
मी त्याला लगेच 'सॉरी' म्हणालो, पण त्याच बरोबर त्याला हेही सांगितले की इंग्रजी ही माझी मातृभाषा नाही. त्याची मातृभाषा आहे. तरी पण मी त्याच्याशी त्याच्याच मातॄभाषेत उत्तम पैकी संवाद साधू शकत होतो. पण माझ्या मातॄभाषेत तो माझ्याशी धड २ वाक्येही बोलू शकणार नाही.
त्याने काही सेकंद विचार केला आणि हसून मला 'सॉरी' म्हणाला. पण 'टेक केअर' असाही सल्ला दिला. मीही त्याला, मला समजून घेतल्या बद्दल, 'धन्यवाद' दिले.

मुद्दा हा की समोरच्याला न घाबरता आपले विचारही स्पष्टपणे कळविले पाहिजेत.

आपण म्हणता की संपूण' मराठी कामाशी निगडीत असलेले ते पद होते, तर अशा परिस्थितीत त्या मुलाखत घेणार्‍या माणसास हा मुद्दा शांतपणे समजाऊन सांगण्यात काहीच हरकत नव्हती. नाही मिळाली नोकरी तर नाही.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

देवदत्त's picture

5 Oct 2008 - 9:20 pm | देवदत्त

समोरचे प्रश्न विचारणारे स्वतः त्यात परफेक्ट असणारच ही आपली पक्की खात्री असते आणि ते सत्यच आहे.
प्रत्येक वेळी नाही, असे वाचले होते. विचारणारा फक्त समोरच्याचा आत्मविश्वास पाहण्यासाठीही असे प्रश्न विचारू शकतो.

तुम्हाला हिंदी येते असे म्हटल्यावर ते हसले ह्यावरून नेमका उत्तर देता आले नसते. पण त्यांनी चूक दाखवली असती तर काय आहे त्याबद्दल उत्तर देणे ठिक झाले असते.

आपली मायबोली समोरच्याला परफेक्ट यावीच हा अट्टहास योग्य आहे का?
नाही.

आशुतोष राणांनी एका मुलाखतीत सांगितलेला एक प्रसंग. कोणत्या तरी देशात, अमेरिका किंवा इंग्लंडच असेल, एकाने त्यांना एक प्रश्न इंग्रजीतून विचारला, त्यावर आशुतोषनी हिंदीतून उत्तर दिले. पुढे त्या माणसाने हिंदी मधून एक प्रश्न विचारला, त्यावर आशुतोषनी इंग्रजीतून उत्तर दिले. ही वाक्ये नेमकी आठवत नाहीत पण त्या माणसाने ह्याचे कारण विचारले त्याचे उत्तर आठवते.
"पहले आपने अपनी मातृभाषा का सम्मान किया तो मैंने अपनी मातृभाषा का सम्मान किया. जब आपने मेरी मातृभाषा का सम्मान किया तो मैंने आपकी मातृभाषा का सम्मान किया."

--------------------------------------------------------------------------------------------
प्रत्येक संस्थेत (किंवा कार्यालयात) एक माणूस असा असतो ज्याला माहित आहे की काय चाललंय. त्या व्यक्तीला लगेच कामावरून काढून टाकले पाहिजे.

बी टी गॉडवीट's picture

6 Oct 2008 - 5:54 pm | बी टी गॉडवीट

मला अस वाटतं की या गोष्टीकडे तुम्ही आणि इथे वरती प्रतीक्रिया देणारे लोक चुकीच्या दृष्टिनं बघताय. मला योग्य वाटणारे काही मुद्दे खाली देतोय, बघा पटले तर...
१) तुमची मुलाखत घेणारा संपूर्ण शुद्ध मराठीत बोलणारा असता परंतू तो तुमच्या समजा कपड्यांना हसला असता तर तुम्हाला काय वाटलं असतं? पुढच्या वेळेस जाताना तुम्ही कपड्यांबाबत जास्त काळजी घ्यायचं ठरवलं असतत. हे ही थोडंसं तसंच आहे. मुलाखत घेणार्‍यानं खरं तर मुलाखत देणार्‍याला हसून त्याचा तेजोभंग करु नये. पण काही लोक वृत्तीनेच तसे असतात. आपण मुलाखतीला जाताना अशा प्रकारच्या धोक्यांचा विचार केलेला नसेल, किंवा पुढच्या वेळेस काय काळजी घ्यायची हे ठरवलं नाही तर, ही त्या माणसाची चूक नाही तर आपली चूक आहे.
२) तुमच्या लेखावरुन हे स्पष्ट होत नाही की ज्या नोकरीसाठी तुम्ही अर्ज केलायत त्या कामात हिंदी भाषेची आवश्यकता कितपत आहे. तशी जर आवश्यकता असेल आणि तुम्हाला हिंदी येत नसेल तर मुलाखत घेणार्‍याला दोष देण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
३) मायबोलीचा अभिमान जरुर असावा पण हिंदी ही आपली राष्ट्र भाषा आहे आणि निदान मुलाखतीत बोलण्याइतपत तरी ती यायला पाहिजेच.
४) कधी कधी मुलाखतीत मुद्दाम असं थोडसं हसलं जातं किंवा थोडसं टोचून (हे माझ्या मते तितकसं बरोबर नाही) बोललं जातं आणि मुलाखत देणारा कितपत डगमगतो हे बघितलं जातं. कदाचित तुमच्या बाबतीतही तसंच झालं असेल.

थोडक्यात मी मुलाखत घेणार्‍याचं कुठचंही समर्थन करत नाहीये, पण तुम्ही स्वतःची चूक आधी शोधायचा प्रयत्न केला पाहिजे अस मला वाटतं.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Oct 2008 - 7:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

३) मायबोलीचा अभिमान जरुर असावा पण हिंदी ही आपली राष्ट्र भाषा आहे आणि निदान मुलाखतीत बोलण्याइतपत तरी ती यायला पाहिजेच.
चूक! हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा नाही आहे, बावीस राष्ट्रभाषा आहेत भारतात, आणि त्यातली एक हिंदी आहे. हिंदीबरोबरच ईंग्लिशला व्यावहारिक भाषेचा दर्जा आहे.

अदिती

बी टी गॉडवीट's picture

7 Oct 2008 - 1:01 pm | बी टी गॉडवीट

चूक! हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा नाही आहे, बावीस राष्ट्रभाषा आहेत भारतात, आणि त्यातली एक हिंदी आहे.

चूक!

हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा आहे. बाकी सव्वीस (बावीस नाही) राज्यभाषा आहेत.

भारतात सरकारी कार्यालयीन कामकाजाच्या वापरासाठी भाषांचा उपयोग कसा करावा याची कायदेशीर चौकट भारतीय घटनेत, कार्यालयीन भाषा कायदा १९६३ आणि कार्यालयीन भाषा नियम १९७६ यात दिलेले आहेत. यानुसार भारतीय राज्यघटनेने हिंदीला प्राथमिक कार्यालयीन भाषेचा (primary official language) दर्जा दिलेला आहे आणि इंग्रजीला कार्यालयीन पोट भाषेचा (official subsidiary language) दर्जा दिलेला आहे. अर्थात घटनेच्या आठव्या परिशिष्टात २२ भाषांना परिशिष्टीय भाषा (sheduled languages) म्हणून दर्जा दिलेला आहे आणि याअंतर्गत या भाषांना फक्त राज्यस्तरावर official languages चा दर्जा दिलेला आहे. २००३ मध्ये घटनेत दुरुस्ती करुन बोडो, मैथिली, डोग्री आणि संथिली या ४ भाषाही या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

त्यामुळे कायदेशीरपणे हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा आहे आणि सव्वीस फक्त राज्यभाषा आहेत. आणि राष्ट्रभाषा अवगत असणे हा राष्ट्रप्रेमाचाच एक भाग आहे असं मी समजतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 3:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा आहे. बाकी सव्वीस (बावीस नाही) राज्यभाषा आहेत.

यातल्या बावीस या आहेतः
१. असमिया २. बांग्ला ३. बोडो ४. डोगरी ५. गुजराथी ६. हिंदी ७. कन्नडा ८. काश्मिरी ९. कोंकणी १०. मैथली ११. मल्याळम १२. मैते (मणिपुरी) १३. मराठी १४. नेपाळी १५. उड़ीया १६. पंजाबी १७. संस्कृत १८. संथाळी १९. सिंधी २०. तमिळ २१. तेलुगु २२. उर्दू
उरलेल्या पाच भाषा कोणत्या?

यानुसार भारतीय राज्यघटनेने हिंदीला प्राथमिक कार्यालयीन भाषेचा (primary official language) दर्जा दिलेला आहे आणि इंग्रजीला कार्यालयीन पोट भाषेचा (official subsidiary language) दर्जा दिलेला आहे....
त्यामुळे कायदेशीरपणे हिंदी ही एकमेव राष्ट्रभाषा आहे आणि सव्वीस फक्त राज्यभाषा आहेत. आणि राष्ट्रभाषा अवगत असणे हा राष्ट्रप्रेमाचाच एक भाग आहे असं मी समजतो.

आणि प्राथमिक कार्यालयीन भाषा हीच राष्ट्राची भाषा (एकप्रकारानी राष्ट्राची ओळखच) का म्हणून? मराठीत बोलायचं झालं तर हिंदीचा उल्लेख primary official language असा आहे, national language असा नाही. जसा तिरंगा हा राष्ट्रध्वज आहे आणि प्रत्येक राज्याचा वेगळा झेंडा नाही, तसं भाषेच्या बाबतीत म्हणता येणार नाही.
बाकीच्या बावीस भाषा या आठव्या परिशिष्टामुळे मान्यताप्राप्त भाषा होत नाहीत का, अगदी त्या-त्या राज्याबाहेरही? आणि मग तसं म्हणायचं झालं तर (उदाहरणार्थ) संस्कृत किंवा संथाळी भाषा बोलणार्‍यांचं वेगळं राज्यच नाही, मग त्या official languages नाहीच, हा विरोधाभास आहे.
सरकारी कार्यालयीन कामांसाठी एक किंवा फारतर दोन भाषा ठीक आहे हो, पण म्हणून नागरिकांनी एकमेकांशी बोलतानाही हिंदीच वापरावी (जो माझ्यामते प्रस्तुत मुद्दा आहे) ही एक प्रकारची अनावश्यक सक्ती वाटते.

अवांतरः चलनी नोटेवर (इंग्लीश पकडून) फक्त सतरा भाषाच का?

अभिरत भिरभि-या's picture

7 Oct 2008 - 4:39 pm | अभिरत भिरभि-या

कोणी एक भाषाच राष्ट्रभाषा असा चुकीचा समज बाळगणार्‍यांमध्ये बरेच लोक मराठी असतात हे (आपले) दुर्दैव. कोण्या एका भाषेस राष्ट्रभाषा मानले नाही तर जणु आपले देशप्रेम कमी होते हा यांचा गैरसमज !!

मराठीत न बोलता हिन्दी मधून एकमेकांशी संवाद साधणारी मुले मी आमच्या कॉलेजात पाहिली होती. ( दोन्ही मराठी !)

यांचे थोबाड फोडावे अशी इच्छा बर्‍याचदा झाली होती. "मुळात दोन माणसांनी कोणत्या भाषेत बोलावे हे त्यांचा प्राधान्यक्रम आहे" हे फसवे/ पळपुटे विधान मान्य केले तरी प्रश्न असा उरतो की साला तामिळ / बंगाली माणुस असा परभाषा धार्जिन का होत नाही ??

बी टी गॉडवीट's picture

7 Oct 2008 - 5:44 pm | बी टी गॉडवीट

तुमच्या जवळ जवळ सर्व प्रश्नांचं समाधान http://en.wikipedia.org/wiki/Official_languages_of_India या दुव्यावर होईल.
अर्थात चलनी नोटांच्या बाबतीतल्या प्रश्नाचं उत्तर मात्र काही माहित नाही. कारण नोटांचा आणि माझा संबंध तसा फारच कमी!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2008 - 5:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुमच्या जवळ जवळ सर्व प्रश्नांचं समाधान http://en.wikipedia.org/wiki/Official_languages_of_India या दुव्यावर होईल.
मी पण तिथूनच हे वाचलं आहे. कारण सरकारी वेबसाईटवर पटकन कुठेही माहिती सापडली नाही.
तिथेही बावीसच भाषा असल्याचा, हिंदी प्राथमिक कार्यालयीन भाषा असण्याचा उल्लेख आहे (राष्ट्रभाषा असा नाही), आणि म्हणून विचारलं!

अर्थात चलनी नोटांच्या बाबतीतल्या प्रश्नाचं उत्तर मात्र काही माहित नाही. कारण नोटांचा आणि माझा संबंध तसा फारच कमी!!
माझा आहे, आमच्या भाजीवाल्याला प्लास्टीकवाले पैसे चालत नाहीत! :-)

अदिती

mina's picture

8 Oct 2008 - 1:44 pm | mina

मित्रहो..मला आलेला अनुभव मी तुम्हाला सांगितला. आपण सर्वांनी त्यावर छान मत मांडली.त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.
मित्रांनो आनंदाची गोष्ट म्हणजे मला ती नोकरी भेटली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Oct 2008 - 2:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मीनातै, नोकरी मिळाल्याबद्दल!

आणि तुम्हाला नोकरी गावली, भेटली काहीही असू देत! अभिनंदन आणि त्यातले आनंदाचे भाव बदलणार नाहीत.

अवांतर: इजाभौ, शुद्धलेखनात चूका काडन्याचि मिपावर प्ररंप्रा नाय ना?

अदिती

सहज's picture

8 Oct 2008 - 2:45 pm | सहज

नोकरी मिळाल्याबद्दल अभिनंदन.

स्वगतः बघा हिंदी न येण्याचे देखील फायदे असु शकतात. :-) आता तो हिंदीभाषीक असामी दिसला की जा फाडत हिंदी. इथली मदत घ्या.

विजुभाऊ's picture

8 Oct 2008 - 1:53 pm | विजुभाऊ

नोकरी भेटली.

हे वाक्य मराठीत नोकरी मिळाली असे लिहितात
माणसे एकमेकाना कडकडुन भेटतात.
वस्तु मिळतात/ सापडतात.

विजुभाऊ...नोकरी मिळाली मला,आता ठीक आहे ना ! विजुभाऊ चुक माणसाकडूनच होते...शब्दामागच्या भावना समजुन घेणं अधिक महत्वाचं असावं !