मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब- फ्री स्टाईल रेसलिंगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना -2

दाह's picture
दाह in जनातलं, मनातलं
28 Jan 2017 - 7:18 pm

Survival Series चा दिवस उजाडला. मॉन्ट्रीयालमधल्या फॅन्समध्ये प्रचंड उत्साह होता. सर्वजण "त्या" सामन्याची वाट पाहत होते. ब्रेटच्या नावाने जयघोष करत होते. शॉनच्या नावाने "बू" करत होते. त्यातल्या काहींना ब्रेट कंपनी सोडून जात असल्याची कुणकुण लागलेली होती. असेच काही कट्टर WWF समर्थक ब्रेटला " you sold out" म्हणून खिजवत होते. सामन्याच्या सुरुवातीला शॉन मायकल्सची एंट्री झाली. नेहमीप्रमाणे त्याने कॅनडाच्या ध्वजाचा अपमान केला आणि खिल्ली उडवली. प्रेक्षक भडकले. "बूज" वाढले. आणि तितक्यात एंट्री झाली ब्रेटची. कॅनडाचा राष्ट्रध्वज हातात घेऊन ब्रेटने दमदार एंट्री केली तसा प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष सुरु झाला. प्रेक्षकांशी हात मिळवत तो रिंगमध्ये उतरला. सामन्याला सुरुवात झाली. ब्रेटला खरोखरच शॉनवर प्रचंड राग असल्याने तो जीव खाऊन लढत होता. तसतसा त्याला पाठिंबा मिळत होता. सामना रंगत चाललेला होता. पण अचानक शॉनने संधी साधून ब्रेटला शार्प शूटर नावाच्या एका डावात जखडले. आणि जखडून काही सेकंदही झाले नाहीत तोवर पंचांनी सामना संपल्याची घंटी वाजवण्याचे निर्देश दिले. पुढच्याच क्षणी घंटी वाजली. सामना संपला? कुणाला काहीच कळेना!!! पण सामना कसा संपू शकतो? ब्रेटने जमिनीवर जोरात हात आपटून पराभव स्वीकारलाच नव्हता. असं शक्यच नव्हतं कारण तो हरणार नाही असंच त्याला वाटलेलं. पण तरीही सामना संपला. संपवला गेला. क्षणाचाही विलंब न करता पंचांनी शॉन मायकल्सला विजेता घोषित केलं. त्याचं Entrance music वाजू लागलं. प्रेक्षक सुन्न होऊन तो प्रकार पाहू लागले. अजूनही नेमकं काय झालंय हे अनेकांच्या लक्षात येत नव्हतं. पण काही वेळ गेल्यावर सगळा प्रकार लक्षात आला. विन्सने ब्रेटला जाणूनबुजून हरवलेलं होतं ,तो हरला नसतानाही. योग्य संधी मिळताच ब्रेटचा काटा काढण्याचं विन्सने ठरवलं आणि केलंदेखील. आता लोकांना सगळं कळून चुकलेलं होतं. लोक दंगा, हुल्लडबाजी करायला लागले. त्यांच्याकडून शॉनला काही अपाय नको म्हणून कडक बंदोबस्तात शॉनला तिथून घेऊन जाण्यात आलं. त्याच्या नाचत, खिजवत निघून जाण्याने प्रेक्षक अजून भडकले. धक्क्यातून अजूनही न सावरलेला ब्रेट उभा राहिला आणि सर्वांसमोर चेअरमन व्हीन्सच्या अंगावर रिंगमधून थुंकला. सामानाची नासधूस केली. त्याच क्षणी WCW मध्ये जात असल्याची घोषणा केली आणि रिंग सोडली. अनेकांना प्रथम हा पटकथेचाच भाग वाटला. पण नंतर ब्रेटचा रडवेला चेहरा , राग आणि एकंदरीत वातावरणातला तणाव पाहून हे काहीतरी वेगळंच घडलंय याची जाणीव झाली.

या सर्व घटनेचे पडसाद अक्ख्या फ्री स्टाईल कुस्तीच्या जगात उमटले.यावर 'Bret Hart- Wrestling with Shadows' नावाचा एक माहितीपट निघाला. अनेकांनी व्हीन्स मॅकमनच्या या कृतीवर कडाडून टीका केली. WCW आणि WWF मधला तणाव अजून वाढला. विन्सची छिथु झाली. WWF आता पुरती खड्ड्यात जाणार असे अनेकांना वाटू लागले. पण तरीही या घटनेचा WWF ला फायदा झाला. नव्हे तर थोड्याच वर्षांत ही कंपनी यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचली.पण कशी?

विन्स हा पक्का धंदेवाईक माणूस होता. त्याच्या डोक्यात असंख्य किडे वळवळत असत. आतादेखील आपल्या होणाऱ्या नाचक्कीचा कंपनीला लाभ कसा होईल याचाच विचार त्याने सुरु केला. नाहीतरी तोचतोचपणाला जनता वैतागली होती. काहीतरी नवीन करावं असं अनेक दिवसांपासून त्याच्या मनात होतं. पण या प्रसंगाने त्याच्या डोक्याला चालना मिळाली आणि त्याने पठडीतल्या रेसलिंग ला जबरदस्त कलाटणी देण्याची योजना आखली. तिथूनच WWF च्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली जे नंतर "Attitude Era" म्हणून ओळखलं गेलं.

स्टोनकोल्ड,रॉक,केन,अंडरटेकर, ट्रिपल एच सारख्या ताज्या दमाच्या खेळाडूंना घेऊन त्याने पुन्हा नव्याने सुरुवात केली. नवी पटकथा आखण्यात आली. मांडणी करण्यात आली. सहसा कधी जास्त न दिसणारा विन्स आता नेहमी दिसू लागला पण एका वेगळ्या रुपात. खऱ्या आयुष्यातल्या सध्याच्या आपल्या खराब प्रतिमेला संपूर्ण न्याय देईल अशी एक व्यक्तिरेखा त्यानं स्वतःच निर्माण केली आणि आयुष्यभर स्वतःचं साकारली. त्या पात्राचं नाव म्हणजे "मिस्टर मॅकमन". लोकप्रिय, गुणी खेळाडूंच्या वाईटावर सतत टपलेला, त्यांच्याविरुद्ध कारस्थाने रचणारा, प्रेक्षकांची अवहेलना करून त्यांना खिजवणारा, बाईलवेडा, उद्दाम, दुष्ट,विकृत असा म्हातारा. स्वतःची हांजीहांजी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसी देणारा आणि त्याला विरोध करणाऱ्या खेळाडूंची वाट लावणारा "बॉस". आणि त्या बॉसविरुद्ध दंड थोपटून उभारलेले बंडखोर रेसलर.(जे लोक त्या काळात WWF बघत होते त्यांनीही या दुष्ट म्हाताऱ्याला रग्गड शिव्या घातल्या असतील नक्कीच)

विन्सच्या या संकल्पनेला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं. प्रेक्षक त्याचा कमालीचा द्वेष करायला लागलेच.पण त्याचबरोबर त्याच्या विरोधात लढणाऱ्या स्टोनकोल्ड, रॉक सारख्या खेळाडूंना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. रिंगमध्ये प्रत्यक्ष कंपनीच्या मालकाचीच धपाधप धुलाई करणारे हे रेसलर प्रेक्षकांसाठी हिरो ठरले. जितका विन्स मार खात गेला तितका प्रेक्षकवर्ग वाढत गेला. प्रत्येक रेसलरची एक स्वतःची अशी पंचलाईन, शैली तयार झाली. "Thats the bottom line because stone cold said so" सारखे अनेक डायलॉग लोकांना तोंडपाठ होऊ लागले. फुल राडा सुरु झाला. प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे WWF च्या टीमला हुरूप आला. आकर्षक आणि नवी स्टोरीलाईन त्याचबरोबर आक्रमक मार्केटिंग यामुळे कंपनीचा टीआरपी प्रचंड वाढला. इतका की WCW त्यासमोर हतबल झाली. बाकी अनेक पटकथांच्या संकल्पना त्याच वेळी राबवल्या गेल्या पण द बॉस विरुद्ध रेबेल्स हीच त्या सर्वांची मध्यवर्ती संकल्पना राहिली. विन्सची प्रतिमा मात्र यापुढे नेहमी व्हिलन अशीच राहिली आणि त्यानेही ती बदलण्याचा खटाटोप केला नाही.

याच काळात WWF भारतातदेखील प्रचंड लोकप्रिय झालं. कंपनीतले सगळे रेसलर जगभर ओळखले जायला लागले.
WWF चं यश इतकं प्रचंड वाढलं की 2001 मध्ये खुद्द WCW या दिवाळखोरीत निघालेल्या प्रतिस्पर्धी कंपनीलाच विन्सने विकत घेतलं. त्यांना आता कोणीच प्रतिस्पर्धी उरला नाही. WCW च्या दिग्गजांना WWF मध्ये सन्मानाने घेण्यात आलं. खुद्द WCW चा अध्यक्ष एरीक बिशॉफला देखील स्थान मिळालं. ब्रेट हार्ट मात्र त्या अगोदरच म्हणजे 2000 मधेच दुखापतीमुळे WCW मधून निवृत्त झालेला होता. त्याचं मन वळवण्याचेही विन्सने अनेकदा प्रयत्न केले ज्यात अखेर त्याला यश आलं. 2005 मध्ये ब्रेटला 'हॉल ऑफ फेम' सन्मान देऊन त्याचा यथोचित गौरव करण्यात आला. तरीदेखील शॉन आणि ब्रेट मधला तणाव निवळला नव्हता. एव्हाना शॉन मायकल्स WWE( WWF या प्राणीप्रेमी संस्थेने कोर्टात खेचल्याने कंपनीला नाव बदलावं लागलं) मधला आयकॉन सुपरस्टार बनलेला होता. आणि ब्रेट अजूनही त्याच्यावर चिडलेला होता. पण कालांतराने WWF च्या मध्यस्तीनेच दोघांच्यात समेट झाला गोष्टी सुरळीत झाल्या.

2009 मध्ये म्हणजे तब्बल बारा वर्षांनंतर शॉन आणि ब्रेट WWE Raw मध्ये आमनेसामने आले. दोघांच्यात या घटनेवर समोरासमोर खुली चर्चा झाली. पुन्हा आरोप-प्रत्यारोप झाले.आणि शेवटी हजारो टाळ्यांच्या कडकडाटात हस्तांदोलन होऊन गळाभेट झाली. यासोबतच या प्रकरणावर औपचारिकरित्या पडदा पडला.

एका मोठ्या आर्थिक संकटामधून जाणाऱ्या कंपनीने दोन खेळाडूंमधील वैयक्तिक वैमनस्यातून घडलेल्या एका वादग्रस्त घटनेचा पुरेपूर फायदा घेऊन अभूतपूर्व यश मिळवलं.

आणि आज इतकी वर्षे होऊन गेली तरी मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब ही घटना प्रत्येक WWF फॅन च्या मनात अजूनही ताजी आहे.

समाप्त.

मांडणीमाहिती

प्रतिक्रिया

दाह's picture

28 Jan 2017 - 7:40 pm | दाह

लईच थोडक्यात उरकलंत पण.

फेदरवेट साहेब's picture

28 Jan 2017 - 8:32 pm | फेदरवेट साहेब

छानच, जमले तर एक लेखमाला रॉयल रंबल अन किंग ऑफ द रिंग वर पण लिहा. तुलनेने कमी हिंसा असलेला अन फक्त प्रतिस्पर्ध्याला रिंग बाहेर फेकायचा हा प्रकार आपल्याला फार आवडत असे.

याबद्दल काहीच माहिती नव्हतं..भारीये हे ! लेख आवडलाच.. थोडक्यात आटपलात पण महत्त्वाचे सगळे मुद्दे नीट आलेत.. मजा आली वाचताना. काय काय अफवा आणि ते सगळे पत्ते वगैरे आठवले :) मजा होती सगळी . जेंव्हा मला पहिल्यांदा समजलं की हे सगळं स्क्रिप्टेड असतं तेंव्हा खुप च धक्का बसला होता. मॅच फिक्सिंग च्या वेळेला जसा हार्टब्रेक झाला होता वगैरे तसाच अगदी या WWF वेळी पण झाला होता .

ज्योति अळवणी's picture

28 Jan 2017 - 11:15 pm | ज्योति अळवणी

छान लिहिलं आहे. थोडक्यात आणि उत्कंठा वर्धक. त्याकाळात wwf बद्दल ऐकलं खूप होत पण आत्ता ते नक्की काय असत ते कळलं

प्रसन्न३००१'s picture

3 Feb 2017 - 10:37 am | प्रसन्न३००१

मोन्ट्रेल स्क्रू जॉब नंतर, जेव्हा २००५ मध्ये मंडे नाईट रॉ चा लाईव्ह इव्हेन्ट मोन्ट्रेल ला होता, तेव्हा प्रेक्षकांनी शॉन मायकेल्स रिंग मध्ये असताना 'you screwed Bret' च्या घोषणा अजूनही आठवतायत.

बाय द वे , WCW Take Over एपिसोड लक्षात आहे का ? ट्रिपल एच, शॉन मायकेल्स आणि डी-एक्स यांनी रणगाडा घेऊन WCW च्या कॉर्पोरेट ऑफिस धडक मारली होती.

जव्हेरगंज's picture

3 Feb 2017 - 8:05 pm | जव्हेरगंज

आवडला लेख!