मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब- फ्री स्टाईल रेसलिंगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना -1

दाह's picture
दाह in जनातलं, मनातलं
28 Jan 2017 - 12:25 pm

टीप- जे WWF अजिबात पाहात नाहीत त्यांना कदाचित या सर्वात रस न वाटण्याची शक्यता आहे

WWF. वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन. नव्वदच्या दशकात लहानपण-तरुणपण घालवलेल्या अनेकांना हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. मुळात अमेरिकन असणाऱ्या या फ्री स्टाईल रेसलिंग कंपनीने नव्वदीत टेलिव्हिजनवर जगभरात प्रचंड धुमाकूळ घातलेला होता. भारतातही लहान मुलं आणि तरुणांच्यात हा प्रकार लोकप्रिय होता. रॉक, स्टोनकोल्ड, केन, अंडरटेकर अशी नावं सर्वांच्या तोंडावर असायची. पोरं इतकी वेडी झालेलीे की एकमेकांशीही wwf स्टाईलने कुस्तीची तालीम चालायची. तिथल्या मूव्हस मित्रांवर मारल्या जायच्या. If you smell what the Rock is cooking सारखे डायलॉग सर्रास फेकले जायचे(त्या काळातल्या मुलांचं इंग्रजी सुधारण्यात WWF चा थोडासा वाटा आहे हे आपलं वैयक्तिक ढोबळ मत). त्यातली हिंसा, भडकपणा पाहून पालकांनी मुलांना wwf पाहण्यास सक्त मनाई करूनही लपूनछपून पाहणारे होतेच. त्यात भर म्हणजे जे आखाड्यात चाललंय त्याची कुणाला माहित नसणारी पार्श्वभूमी आणि त्यामुळे येणारं भरमसाट अफवांचं पीक(उदा. अंडरटेकर हा सातवेळा मरून जिवंत झालाय, केनचा चेहरा पूर्ण जळाल्याने तो मास्क घालतो इत्यादी). या सर्वांच्या खमंग चर्चा शाळेत, ट्युशन, खेळताना सर्वत्र रंगवल्या जायच्या. तिथल्या आखाड्यातले पंगे, हाणामाऱ्या, खुन्नस, दुश्मनी सगळं तंतोतंत खरं वाटायचं. हे सर्व केवळ एका पटकथेचा भाग आहे हे बरेच दिवस कुणाला कळायचं नाही.
साधारण 1998 ते 2004 या काळात WWF ही कंपनी यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली. पण हे यश असंच नव्हतं मिळालं. एका अनपेक्षित धक्कादायक घटनेचा परिपाक या अभूतपूर्व यशात झाला होता.

नोव्हेंम्बर 1997 मध्ये एक दिवस WWF च्या इतिहासात खरोखरीच एक अशी घटना घडली ज्यामुळे फ्रिस्टाईल रेसलिंगची पुढची सगळी समीकरणंच बदलून गेली. 'मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब' या नावाने ओळखली जाणारी ही घटना आजही WWF च्या(आताचे WWE) इतिहासातील सर्वात वादग्रस्त घटना मानली जाते.

वर्ष 1997. WWF या कंपनीची हालत आर्थिकदृष्ट्या नाजूक होत चाललेली. तोचतोचपणामुळे लोकप्रियताही घटत चाललेली. भरीस भर म्हणून WCW नावाच्या अजून एक प्रतिस्पर्धी कंपनीने मार्केटमध्ये जम बसवून मोठा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे खेचलेला. दोघांच्या या व्यावसायिक युद्धात WWF मागे पडत चाललेली होती. नवनवीन प्रकारच्या मॅचेस, मार्केटिंग फंडे, क्लृप्त्या व धक्कातंत्र
वापरून WCW ने नाकी नऊ आणलेले. WWF चा चेअरमन व्हीन्स मॅकमन या सर्व गोष्टींमुळे प्रचंड चिंतेत होता. हेही कमी होतं की काय म्हणून WCW ने अजून एक चाल खेळली. WWF चे अनेक प्रथितयश सुपरस्टार त्यांनी पैशाचे आमिष दाखवून आपल्याकडे ओढायला सुरुवात केली. त्यातलाच एक- ब्रेट "द हिटमॅन" हार्ट. त्या काळातला WWF चा सर्वात यशस्वी आणि सर्वाधिक मानधन घेणारा सुपरस्टार.

ब्रेट हार्ट त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. प्रेक्षकांचा जाम आवडता होता. जवळपास 15 वर्षांपासून तो WWF सोबत काम करत होता. कंपनीचा हुकमी एक्का होता. पण एक दिवस त्याने कंपनीला धक्का दिला. 1997 च्या नोव्हेंबर महिन्यात त्याने आपण ही कंपनी सोडून WCW मध्ये जात असल्याचा निर्णय WWF चेअरमन व्हीन्स मॅकमनला कळवला. तशी ब्रेटने 1996 पासूनच कुरकुर सुरु केलेली होती. पण व्हीन्सने वारंवार विनंती करून त्याला थांबवून ठेवलं. कंपनी सोडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे WWF ने आर्थिक कारणांमुळे त्याच्यासकट सर्वांचे बरेच मानधन थकवले होते. पण ब्रेटला ही तडजोड मंजूर होईना. त्यातच त्याला WCW कडून तगड्या मानधनाची ऑफर आली आणि त्याने ती स्वीकारली. पुढच्याच आठवड्यात म्हणजे 9 नोव्हेंम्बर 1997 रोजी WWF च्या Survival Series या स्पर्धेत( pay per view) उगवता सुपरस्टार आणि आखाड्यातला(आणि खऱ्या आयुष्यातही) त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी शॉन मायकल्स याच्यासोबत ब्रेटचा सामना होता. तो खेळून झाला की मी WWF सोडणार असं ब्रेटनं चेअरमन व्हीन्सला सांगितलं. पण हे सगळं इतकं सरळसाधं नव्हतं.

WWF च्या सामन्यांचे निकाल पूर्वनियोजित असतात. म्हणजे कोण जिंकणार, कसा जिंकणार, कोणाची surprise entry कोणत्या क्षणाला होणार, कोण दगाबाजी करणार, कोण मदतीला धावून येणार हे सगळं आधीच ठरलेलं असतं. ही सर्व कथानकं (story lines) लिहिण्यासाठी लेखक नेमलेले असतात. मोठी टीम असते. सामना होण्यापूर्वी यावर सखोल चर्चा केली जाते. रंगीत तालीम केली जाते. मूव्हस बऱ्याच अंशी खऱ्या असल्या तरी त्यात अनेक युक्त्या,चलाखी असते. हारजित अगोदरच ठरते. थोडक्यात पडद्यावर नाटक सादर करतात तसंच.

ज्यावेळी शॉनविरुद्धच्या सामन्याचं कथानक ब्रेट हार्टच्या हातात पडलं तेव्हा तो प्रचंड नाराज झाला. त्यात तो हरणार असं लिहिलेलं होतं. ब्रेट त्यावेळी चॅम्पियन होता. त्याच्याकडे चॅम्पियनशीप बेल्ट होता. कंपनी सोडून जाण्यापूर्वी तो बेल्ट परत करणं त्याला भाग होतं. त्यामुळेच शॉन त्याला हरवून नवीन चॅम्पियन बनणार हे साहजिक होतं. पण तरीही तो तयार नव्हता. याला कारण म्हणजे survival series ची स्पर्धा होणार होती मॉन्ट्रीयाल या कॅनडामधील शहरात. मूळचा कॅनडाचा असलेला ब्रेट आपल्या मायदेशात हरायला तयार नव्हता. त्याच्या कॅनेडियन फॅन्सची संख्या लक्षणीय होती. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आपल्या देशबांधवांसमोर आपला पराभव व्हावा हे त्याला मंजूर होईना. दुसरं कारण म्हणजे आपला कट्टर प्रतिस्पर्धी शॉन मायकल्सकडून हरून आपल्या इथल्या करियरची सांगता त्याला करायची नव्हती. दोघांच्या वैयक्तिक संबंधातही प्रचंड कटुता होतीच. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांच्यात अनेक शाब्दिक खटके उडत होते. पण त्याचबरोबर या सर्व गोष्टींना देशभक्तीचीही किनार होती. शॉन मायकल्सने अनेकवेळा कॅनडाची खिल्ली उडवून देशाच्या ध्वजाचा अपमानदेखील केलेला होता. त्यामुळे WWF चे कॅनेडियन फॅन्स त्याच्यावर प्रचंड चिडलेले होते. ब्रेट हार्ट म्हणजे त्यांना आपल्या राष्ट्राचा आयकॉन वाटत होता. त्यांच्यासमोर आपण शॉनकडून आपण हरू नये असं मनोमन ब्रेटला न वाटतं तर नवल. त्यानं तसं व्हीन्स मॅकमनला स्पष्ट सांगितलं,
" हे बघ, कोणत्याही परिस्थितीत जाण्यापूर्वी मी तो बेल्ट कंपनीच्या हवाली करून जाईन. तरीही मला हरवूनच तो बेल्ट तुला हवा असेल तर survival series च्या दुसऱ्या दिवशीच्या शो मध्ये मी कुणाकडूनही हरायला तयार आहे. पण शॉन मायकल्स सोडून. त्याच्याकडून मी अजिबात पराभव पत्करणार नाही काहीही झालं तरी. त्याचबरोबर मॉन्ट्रीयालमध्ये माझ्या मायदेशी मी हरणार नाही "

त्याचा हा पवित्रा पाहून व्हीन्स मॅकमन बुचकळ्यात पडला. त्याने हरप्रकारे ब्रेटला समजावलं पण ब्रेट ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर व्हीन्सने यावर तोडगा काढला. तोडगा असा की मॅच सुरु असताना शॉन मायकल्स चिटिंग करणार ज्यामुळे तो आपोआप सामन्यातून बाद होणार. त्यामुळे जरीे सामन्याचा निर्णायक निकाल लागणार नाही तरीही डिसक्वालिफिकेशन नियमानुसार ब्रेट हार्टच विजेता ठरणार. दुसऱ्या दिवशी monday night RAW या शो मध्ये ब्रेट हार्ट आपण WWF सोडून जात असल्याची अधिकृत घोषणा करेल आणि चॅम्पियनशिप बेल्ट कंपनीच्या हवाली करून निघून जाईल. ब्रेट या गोष्टीला तयार झाला. त्यानंतर शॉन , व्हीन्स, सामन्याचे पंच, इतर काही अधिकारी आणि ब्रेट यांच्या बैठका झाल्या. सामना कसा रंगवायचा याची चर्चा झाली. शॉनलाही याबद्दल फारसा आक्षेप नव्हता. पण व्हीन्स मात्र वरवरून समाधानी वाटत असला तरी तो तसा नव्हता. हे त्याला पचनी पडत नव्हतं. अर्थात त्याची स्वतःची एक बाजू होतीच. ज्या कंपनीत ब्रेट हार्टच अक्ख करियर घडलं ती तो ज्या प्रकारे सोडून जात होता हे त्याला पसंत नव्हतं. सर्वात जास्त मानधन मिळूनदेखील हार्ट कसल्याच तडजोडीला तयार नव्हता. व्हीन्सला वाटणारी दुसरी भीती म्हणजे समजा हार्टने बेल्ट परत केलाच नाही तर? यापूर्वीही अशी घटना घडली होती. WWF च्या बेल्टची WCW मध्ये उघड विटंबना केली गेलेली होती. तसं पुन्हा झालं तर WWF ब्रॅण्डची नाचक्की झाली असती. आधीच दोन्ही कंपन्यांमधली दुश्मनी दिवसेंदिवस वाढत चाललेली. दोन्ही कंपन्या आपापल्या कार्यक्रमात एकमेकांच्या खेळाडूंची उघड उघड खिल्ली उडवत असत. आव्हानं करत असत. व्हीन्सला आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीच्या हाती आणखी एक कोलीत मिळावं असं वाटत नव्हतं. त्याला जोखीम पत्करायची नव्हती. आणि ब्रेटवर आता त्याला विश्वास राहिला नव्हता.

आणि त्यातून घेतला गेला एक निर्णय. ब्रेट हार्टच्या नकळत व्हीन्सने इतर लोकांना विश्वासात घेऊन एक वादग्रस्त निर्णय घेतला. एका गुप्त बैठकीत चर्चा झाली आणि ठरलं. काहीही झालं तरी ब्रेट हरलाच पाहिजे.

मांडणीमाहिती

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

28 Jan 2017 - 12:55 pm | संजय क्षीरसागर

लिहा पुढचा भाग लवकर .

बरखा's picture

28 Jan 2017 - 1:07 pm | बरखा

त्यात भर म्हणजे जे आखाड्यात चाललंय त्याची कुणाला माहित नसणारी पार्श्वभूमी आणि त्यामुळे येणारं भरमसाट अफवांचं पीक(उदा. अंडरटेकर हा सातवेळा मरून जिवंत झालाय, केनचा चेहरा पूर्ण जळाल्याने तो मास्क घालतो इत्यादी). या सर्वांच्या खमंग चर्चा शाळेत, ट्युशन, खेळताना सर्वत्र रंगवल्या जायच्या.
अगदी खरयं..... अशाच अफवा आम्ही पण ऐकल्या होत्या.
त्याच बरोबर याचे पत्ते पण आले होते. ते खेळताना पण मजा यायची.

एस's picture

28 Jan 2017 - 1:44 pm | एस

पुभाप्र.

सामान्यनागरिक's picture

28 Jan 2017 - 2:18 pm | सामान्यनागरिक

अत्यन्त बालिश प्रकार आहे हा . .कसे बघु शकतात.?

फेदरवेट साहेब's picture

28 Jan 2017 - 3:08 pm | फेदरवेट साहेब

बालपणीच बघितला जायचा. आता प्रत्येक पोरगे/पोरगी कसं काय 'रेशीम उद्योगावरील आर्थिक संकट' वगैरे विषयांवर चर्चा करणार न?

तुषार काळभोर's picture

28 Jan 2017 - 3:24 pm | तुषार काळभोर

ठ्ठो!!

अन आमची मापं काढणारा उप-प्रतिसाद दिला नाय. म्हणुन तुम्हाला हे 'आभारप्रदर्शक गाणे' नजर करतो आहोत, कृपया स्वीकार करावे.

Ranapratap's picture

28 Jan 2017 - 6:49 pm | Ranapratap

मी अजून हि कुटुंबा समवेत हा खेळ पाहतो. मनोरंजन म्हणून ठीक वाटते. पण लहान मुलाना याबाबत सत्य सांगायला हवे.

संजय पाटिल's picture

29 Jan 2017 - 12:34 pm | संजय पाटिल

अहो, हे बघुन आम्हि भावंडं पण असेच एकमेकाला उचलून आपट, डोक्यात खुर्ची घालणे वगैरे प्रकार करायचो व मग परत आई वडिलांचा मार खायचो..

अस्वस्थामा's picture

30 Jan 2017 - 9:17 pm | अस्वस्थामा

हा हा हा.. :)
भारी लिहिलंय. @संजय पाटिल, आठवण आवडली, हा विडिओ नक्की बघा तुम्ही.

संजय पाटिल's picture

2 Feb 2017 - 3:34 pm | संजय पाटिल

असच चालयचं..

प्रसन्न३००१'s picture

2 Feb 2017 - 3:17 pm | प्रसन्न३००१

मी सुद्धा WWE अजूनही बघतो... हिंदी/मराठी सीरिअल्स मधल्या नाटकी डायलॉग्सपेक्षा कितीतरी बरं हे..... एक मात्र खरं कि जर तुम्ही बॉडी बिल्डिंग करत असाल तर WWE बघून तुम्हाला इन्स्पिरेशन नक्कीच मिळेल

बाकी कुणी काय बघावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न

उल्हास आठवले's picture

6 Mar 2017 - 2:11 pm | उल्हास आठवले

Undertaker रॉक वगैरे बरोबरच सेबल, ट्रिश, टोरी, स्टेसी इत्यादींसाठी बघणारे पण लोक्स होते(अस्मादिकांसह). आता मात्र 3/4 वर्षात पाहिलं नाही. त्यातल्या त्यात ब्रॉक आणि रँडी चांगले वाटायचे, पण रॉक, स्टोन कोल्ड, ट्रिपल एच, गोल्डबर्ग आणि dx यांची मजा आज नाही.

प्रसन्न३००१'s picture

6 Mar 2017 - 3:09 pm | प्रसन्न३००१

रॉक, स्टोन कोल्ड, ट्रिपल एच, गोल्डबर्ग आणि dx यांची मजा आज नाही.

अबसोलुटली