प्रेरणा अर्थातच. आमचा एक क्षीण प्रयत्न! म्हटलं तर विडंबन, म्हटलं तर दुसरी बाजू...
मी सध्या काय करते?
नुकत्याच आलेल्या "ती सध्या काय करते?" या चित्रपटामुळे अश्या अनेक "तीं"वरचे जोक आंतरजालावर धुमाकूळ घालत आहेत. 'तेव्हाच अमके केले असते तर आज हा प्रश्न पडलाच नसता' अशा आशयाचे कित्येक फॉरवर्ड्स कित्येकांना 'ती'च्या आठवणी व्याकूळ करुन सोडत असतील!
एवढ्या सगळ्या आठवणींत माझी आठवण आमच्या गल्लीतही कुणालाच येणार नाही, हे मी आधीच कळून चुकले. कारण खरं तर आमचं घर कुठल्या गल्लीत नव्हतंच. भर चौकात तेवीस दुकानांपैकी एक असलेल्या आमच्याच दुकानाच्या मागे आमचं घर! गरज पडलीच तरी विरजणासाठी दही आणायलाही आई मला कुठे पाठवायची नाही! असं असताना, माझ्याबाबतीत "ती सध्या काय करते?" असा प्रश्न एखाद्या मुलालाच काय एखाद्या काकूंनाही पडण्याची काहीही शक्यता नाही. एवढंच काय! अनेक वर्षांनी एखाद्या ठिकाणी गर्दीत मी दिसलेच तर 'देवा, ही अजूनही अशीच आहे का?' असा प्रश्न पडण्याची शक्यता जास्त आहे. आता माझ्याविषयी असणाऱ्या ह्या सार्वत्रिक अनास्थेचं एकमेव कारण, 'मी तेव्हा तरी अभ्यासाव्यतिरिक्त काय करायचे?' या प्रश्नाच्या उत्तरात आहे!
माझ्या लहानपणी लोकसंख्येचा उद्रेक थोडाथोडा व्हायला सुरुवात झालेली असल्यामुळे एका वर्गात 'नव्वद-शंभरच'(!) मुलं असायची. अश्यावेळी मधल्या ओळीत पहिल्याच बाकावर बसलेल्या माझ्याकडे शिक्षकांचं चांगलंच लक्ष असायचं. त्यासाठी लहानपणीपासून असलेला आईचा धाक आणि अभ्यासाकडेच लक्ष देण्याचे संस्कार ह्या दोन्ही गोष्टी कारणीभूत होत्या. त्यामुळे कर्मधर्मसंयोगाने बाईंनी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं देण्यासाठी हात वर नाही केला तरी त्या मला उत्तर द्यायला उठवत. वर्गात प्रश्नाचं उत्तर देणं हे ब्राउनी पॉईंट्स मिळवण्यासारखं असतं, पण त्याचा अप्रत्यक्ष उपयोग असला तरी प्रत्यक्ष फायदे काहीही नसतात. तर ब्राउनी पॉईंट आमच्या नशिबात होते, पण हाडांचा सापळा आणि टीव्ही न पाहताच लागलेला चष्माही होता! मग एखादा मुलगा आमच्याकडे का बघणार? आणि “मी सध्या काय करते” हा प्रश्न त्याला कसा पडणार?
तसं आमच्याही शाळेतल्या पद्धतीप्रमाणे, तिमाही-सहामाही परीक्षेचा निकाल सांगताना वर्गात त्या त्या विद्यार्थ्याला पुढे बोलावून मोठ्याने सांगायचे. इथे फेमस व्हायचा थोडाबहुत चान्स होता. पण आमचा रोल नंबर पहिलाच आणि परीक्षेतही पहिलाच!! त्यामुळे पुढे जाऊन निकाल घ्यायला गेल्यावर कॉम्प्लेक्स आल्यासारखी मुलं नजराच चुकवायची! मग तीसुद्धा संधी गेली. तसं वर्गात जोड्या लावण्याचे प्रकार भरपूर चालायचे. पण जोडी 'लावण्यायोग्य' अशीही स्वतःची ओळख मी कधी निर्माण करू शकले नाही. आणि मी स्वतः जोड्याबिड्या लावलेलं आईला कळलं असतं तर जोडी लागण्यायोग्य राहिलेही नसते. शाळेत गायन, वादन, वक्तृत्व स्पर्धा दर वर्षी असायच्या. तिथेही आमची वर्णी कधी लागली नाही. फार तर फार निबंध स्पर्धेमध्ये मला बसवायचे. (अभ्यासाठी खाली मान घालायची जी सवय लागली, ती इथेच उपयोगी पडायची). बरं शाळेत जाऊद्या, पण रस्त्याने येता-जाता एखाद्या मुलाशी नजरानजर व्हावी तर बाबाच आणायला-सोडायला यायचे (माझ्या या परिस्थितीला कारणीभूत फक्त आईच नाही बरं). परीक्षेच्या निकालानंतर नजरा चुकवणारी मुलं बाबांना बघून तर रस्ताच बदलायची! अश्या प्रकारे आमचं शालेय जीवन तर 'त्या'च्याविनाच गेलं.
भरमसाठ मार्क मिळवून मी शालेय शिक्षण पूर्ण केलं. पण मधल्या या कालखंडात जग किती बदललंय हे माझ्या ध्यानातच आलं नाही. "एक्सक्यूज मी प्लीज" म्हणत मुलांना ओलांडून जाणार्या मुलींना साळकाया-माळकाया म्हणत मी त्यांच्यापासून दहा हात लांबच राहत होते. थ्रेडींग, वॅक्सिंग करणं पाप समजून बारीक आवाजात पार्लरवालीला "तुम्हांला आवडेल तसा करा" सांगून तीन महिन्यांतून एकदा फक्त हेअरकट करत होते. (तीच मान खाली घालून बसायची सवय!), आणि वर केस कंडिशन वगैरे करण्याऐवजी माक्याचे तेल लावून फिरत होते. "फॅशन टेलर्स" कडून फॅशनेबल कपडे शिवून घेण्याऐवजी आईबरोबर जाऊन ती सांगेल तो ड्रेस घेऊन फिटींग-बिटींगच्या भानगडीत न पडता, हॅंगरवर लटकवल्यासारखा कॉलेजला घालून जात होते. एक्स्ट्रा लेक्चर अटेंड करून ब्राउनी पॉइंट्स मिळाले तरी, मुलांचा असे लेक्चर अटेंड करण्यावर विश्वास नसल्याने त्याचा प्रत्यक्ष फायदा अजूनही नव्हताच! त्यातल्या त्यात समाधान म्हणजे आख्ख्या प्रॅक्टिकलच्या बॅचला २५ जणांत मी एकटीच मुलगी. पण त्याच कारणाने बाई माझी सतत पाठराखण करायच्या. दुसरं काही सुचवायला घरात बहिणी, वहिनी, जवळपास मैत्रिणी असं कुणी नव्हतंच. शेवटी 'नजरेत येण्यासाठी' कधी लग्नसमारंभांत हजेरी, तर कधी बाजारात चकरा वाढवल्या. पण "शेजारी आई आणि नाकावर चष्मा" बघता मुलांची कायम हुलकावणीच मिळायची. उलट एखाद्या काकूच त्यांच्या मुलीचा हात धरुन तिला माझ्यासारखं "हुशार" व्हायला सांगायच्या. वर "हिच्याकडे बघूनच ही अभ्यासाशिवाय दुसरं काहीच करत नसेल हे कळतं" असं म्हणायच्या! ती मुलगीही तिच्यावर दहा मुले फिदा असल्यासारखी माझ्याकडे बघून तिरकस हसायची. कॉलेजच्या त्या चार वर्षांत एखाद्या मुलाने मदत मागितलीच तर ती जास्तीत जास्त "हा प्रोग्रॅम कसा लिहायचा?" एवढं विचारण्यापुरती असे! शेवटी माझं कॉलेजही "त्याच्या"विनाच गेलं.
अर्थात या सगळ्यासाठी इतर कोणाला दोष देऊन उपयोग नाही. पण आत्यंतिक अभ्यासूपणा, बारीक शरीरयष्टी आणि ड्रेसिंग सेन्सचा अभाव परमेश्वराने माझ्यातच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही. बरं एवढं असताना मुलांनी चुकून एकदा जरी आमच्याकडे बघितलं तर आपण निदान नजरेला नजर तरी द्यावी, तर नाही ना! लहानपणीपासूनच्या सवयीनं आपणच घाबरुन खाली पाहावं! नंतर हीच मुलं माझ्या मैत्रिणींवर लाइन मारत असलेली मी पाहिली.
या परिस्थितीत 'तो सध्या काय करतो' हा प्रश्न मला शंभर मुलांच्या बाबतीत पडत असला तरी मी सध्या काय करते असा प्रश्न एक शंभरांश मुलालाही पडणार नाही. आणि पडलाच तर त्याचे त्याच्या मनातले संभाव्य उत्तरं खालीलप्रमाणे नसावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना!
"ती सध्या काय करते?.... पुस्तकातून मान वर आली असेल ना आता तरी?"
प्रतिक्रिया
27 Jan 2017 - 8:21 am | पैसा
मस्त जमलंय!
27 Jan 2017 - 8:29 am | यशोधरा
लई म्हंजे लईच भारी!
27 Jan 2017 - 8:31 am | शलभ
मस्त लिहिलंय..:D
27 Jan 2017 - 8:56 am | एस
क्या बात है! रुपीताईंकडून अजून एक खंग्री विडंबन. पण खरेतर ही व्यथा बऱ्याच मुलामुलींची असते. प्रेमाचे मैदान मारणे शंभरातल्या चार-पाच जणांना आणि जणींनाच जमते. बाकी आपले भारतीय संस्कृतीच्या लाईफलाईनला धरून अरेंज्ड करून मोकळे होतात (की अडकतात!).
असो. तुमच्या लेखामुळे आमच्या 'अडुसष्टास बारा' (आणि त्या बारा पोरांपैकी फक्त चारपाच टाळकी रोज हजर असत.) या गुणोत्तरात असलेल्या आमच्या वर्गाची आठवण झाली. मला तो हजेरीपटावरचा अडुसष्ट हा आकडा लख्ख आठवतोय, पण अडुसष्टपैकी आठ मुलींचीसुद्धा नावे आठवत नाहीत. काय करत असतील इतक्या पोरी उर्फ महिला आता? तेव्हा हँगर असलेल्या अंग'काठ्या' आता तंबू झाल्या आहेत पण इतकं मात्र खरं. ;-) ;-) ;-)
28 Jan 2017 - 2:57 am | रुपी
अडुसष्टास बारा? मला आधी वाटलं यातल्या १२ मुली असतील! कुठल्या शाळेत होतं हे गुणोत्तर? केरळमध्ये की काय? की 'अ' तुकडी म्हणायची? ;)
आमच्या दहावी 'अ' च्या वर्गात होत्या फक्त मुली मुलांपेक्षा जास्त.. माझ्यासारख्याच अभ्यासू =) पण फार तर ६०:४० गुणोत्तर असेल.
खरं तर "डेटींग"ची संस्कृती अशा मुलांमुलींसाठी फार अन्यायकारक आहे. "अरेंज्ड" खरंच चांगली पद्धत आहे. फक्त चष्मा असलेल्यांना काही काळ काँटॅक्ट लेन्स वापराव्या लागतात ;)
मॅरेजमध्ये परिणीती झाल्यावरच्या अडचणी सगळीकडे सारख्याच :)
28 Jan 2017 - 4:08 am | एस
हाहाहा. तो आमच्या शाळेने त्या वर्षी घातलेला (आणि परत रिपीट न केलेला) असा प्रयोग होता. फक्त तेव्हढीच तुकडी केरळ झाली होती. बाकीच्या पंजाब, बिहार वगैरे होत्या! ;-) पण इतक्या पोरी म्हटल्यावर तितकाच कलकलाट असायचा. सगळे शिक्षक वैतागायचे. आणि पोरांची बाके ही भारताने तीन बाजूंनी वेढलेल्या बांगलादेशासारखी अंग चोरून असायची कुठेतरी वर्गात. आमचे इतर तुकडीमित्र जाम जळायचे आमच्यावर. पण आमची झाकली मूठ सव्वा लाखाची होती हे त्यांना काय कळणार! :-)
30 Jan 2017 - 9:55 am | संदीप डांगे
मस्त प्रतिसाद! =))
आमच्या जेजेच्या वर्गात १०० विद्यार्थी क्षमता त्यात फक्त ३० मुले. ७० मुली. रोल नंबरप्रमाणे बसायला लागायचे त्यामुळे पचास पचास कोस दूर तक निस्त्या पोरीच पोरीच... :-)
27 Jan 2017 - 8:58 am | उगा काहितरीच
ती / तो सध्या काय करते/करतो पेक्षा सध्याची/ सध्याचा ती/तो काय करते/करतो ते महत्त्वाचे ;-)
27 Jan 2017 - 8:59 am | कौशी
मस्त लिहिलंय....
27 Jan 2017 - 9:47 am | चिनार
उत्कृष्ट लेख !
ह्याला विडंबन म्हणवत नाही...
दुसरी बाजू सुरेख मांडली आहे...
धन्यवाद ! आपल्याच विचारात राहणाऱ्या आमच्यासारख्यांना आरसा दाखवलेला आहे...
27 Jan 2017 - 10:56 am | संजय पाटिल
+१
27 Jan 2017 - 9:52 am | विभावरी
सुंदर लिहीलं आहे , आवडले !
27 Jan 2017 - 11:03 am | फेदरवेट साहेब
विडंबन नाही स्वतंत्र म्हणवून घेतलेलेच बरे. मस्त जमलंय.
27 Jan 2017 - 11:05 am | प्रीत-मोहर
लोल =))
27 Jan 2017 - 12:29 pm | समीर_happy go lucky
क्या बात है, अमेझिंग !!!
पण काहीही म्हणा चिनार भाऊचा छोटासा लेख कसा भिडला होता मनाला, हा लेख त्याचे उत्तर वाटतोय कारण प्रोसिजर तशीच असली पण तरी तो "फील" miss केला मी :P
28 Jan 2017 - 6:20 am | रुपी
तुम्हाला "फील" कसा होणार? शेवटी जावे त्याच्या वंशा.. खाली प्रतिसाद बघा ना मुलींनी कसं फील केलंय =)
पण खरं आहे तुमचं, चिनार भाऊंसारखं लिहायला जमायला अजून फार वेळ लागेल :)
27 Jan 2017 - 12:35 pm | सस्नेह
मस्त जमलंय ! थोडा वेगळ्या धर्तीवर ही सहज जमून गेला असता !
27 Jan 2017 - 1:37 pm | जावई
लिहीत रावा...!
27 Jan 2017 - 1:55 pm | संजय क्षीरसागर
झकास ! लिहीत राहा.
27 Jan 2017 - 2:05 pm | स्मिता.
मज्जा आली वाचतांना!
देहयष्टी आणि चष्म्याचा मुद्दा सोडला तर माझी कथा याहून वेगळी नसल्याने लेख जास्तच भावला. असंही शाळा-कॉलेजात चारचौघींसारख्या दिसणार्या, अभ्यासू मुलींना 'स्मार्ट आणि हॅण्ड्सम' मुलं तर नाहीच नाही, तर कोणतीच मुलं भाव देत नाहीत. सगळेच २-४ सुंदर किंवा टंच मुलींच्या मागे असतात. या एकमेव कारणाकरता समस्त शाळा-कॉलेजकुमारांचा जाहिर णिषेध!! ;) =))
27 Jan 2017 - 2:10 pm | आदूबाळ
लय भारी लिहिलंय!
27 Jan 2017 - 2:46 pm | पद्मावति
=)) मस्त जमलाय लेख.
27 Jan 2017 - 3:50 pm | नीलमोहर
अगदी,
आम्हाला विचारलं होतं बुवा परीक्षेत, मागे बसलेल्या मुलाने, कासवाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात..
मी दोन मिनिटं टोटली ब्लँक, मग तो टॉरटॉइज आठवला, नशीब !!
आता कॉमर्सच्या परीक्षेत कासवाचे काय काम असा प्रश्न मला पडला, जो मी अर्थातच त्याला विचारला नाही, असो,
नेहमीच आमच्या अभ्यासूपणाचा वापर लोकांनी असा करून घेतला, तरी असो.
ते लाजाळू आणि काकूबाई लिहायचं राहिलं का ;)
28 Jan 2017 - 12:04 am | रुपी
हा हा..
ते परीक्षेत विचारण्याचं तर काय सांगावं. माझ्या मागे बसणार्या मुलाला तर विचारताना फार "इगो" आड यायचा. म्हणजे उत्तर तर हवंय, पण माझ्यावरच उपकार केल्यासारखं वागायचा. आमच्याकडे शेजारी वेगळ्या इयत्तेतल्या मुलांना बसवायचे. मग हा माझ्या मागचा त्याच्या शेजार्याला, तो माझ्या शेजार्याला, मग तो मला असं विचारणार, मग उत्तर उलट्या दिशेत त्याच्यापर्यंत पोहोचायचं, असा चौकोन पूर्ण व्हायचा. बॉलिवूडमध्ये प्रेमाचा चौकोन असतो, आमच्या आयुष्यात हा असा चौकोन होता!
लाजाळूचा विचार केला नाही, पण काकूबाई लिहायचं राहून गेलेलं खरंच लेख प्रकाशित केल्यावर आठवलं. आमच्या आईसाहेब अजूनही आम्हाला 'काकूबाईसारखी राहते' असंच म्हणतात. याला जबाबदार तीच आहे तिला कोण सांगणार? मी अजूनही तिला तेवढीच घाबरते.
27 Jan 2017 - 3:59 pm | बरखा
"पण आत्यंतिक अभ्यासूपणा, बारीक शरीरयष्टी आणि ड्रेसिंग सेन्सचा अभाव परमेश्वराने माझ्यातच का भरावा हे कोडं काही सुटता सुटत नाही."
परमेश्वरच्या नजरेत फक्त तुम्ही एकट्या नाहीत. तुमच्या या लेखामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
फक्त तुमच्या वाक्यातील 'आत्यंतिक' एवढा शब्द बाजुला केला तर बाकी माझ्यात पण काही वेगळ नाही.
27 Jan 2017 - 4:06 pm | कवितानागेश
अशा खूप मुली आल्या डोळ्यासमोर! ;)
- बॅक बेंचर टवाळ माऊ
28 Jan 2017 - 9:24 am | अजया
रुपी मस्त जमलाय लेख!
- टवाळखोर माउची कधीच खाली मान घालुन न बघितलेली मैत्रिण ;)
27 Jan 2017 - 7:19 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ही ही ह्ही!
27 Jan 2017 - 9:41 pm | सपे-पुणे-३०
मस्त लिहिलंय !
बऱ्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
27 Jan 2017 - 11:52 pm | रातराणी
खतरनाक!!
28 Jan 2017 - 1:39 am | रेवती
आवडलं सुडंबन.
28 Jan 2017 - 9:52 am | श्रीरंग_जोशी
लेख वाचून 'अशी ही बनवाबनवी' मधल्या अश्वीनी भावे यांचा चेहरा डोळ्यांपुढे आला.
तसेच शालेय व कॉलेज जीवनातली काही उदाहरणे आठवली :-) .
28 Jan 2017 - 5:03 pm | सुखोत
वा!
शाळेचे दिवस आठवले
29 Jan 2017 - 5:46 am | रुपी
सर्वांना धन्यवाद! :)
29 Jan 2017 - 7:23 pm | मित्रहो
हा लेख आणि प्रेरणा सुद्धा मस्त.
मजा आली वाचताना काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत साऱ्याच साधारणतः अशाच असतात. काय कारण आहे माहीत नाही परंतु शाळेतल्या मुली फारशा आठवत नाही. आमचा शाळेतल्या मुलामलींचा व्हाटसअॅप ग्रुप सुद्धा आहे. फोटो टाकून सुद्धा आठवत नाही ही मुलगी कधी सोबत होती. कदाचित मुलीही आमच्याबाबतीत तसाच विचार करीत असतील. बाकी तेंव्हा दहावीत असनाऱ्या आमच्या वर्गमैत्रीणींना आता मुला मुलींच्या दहावी बारावीचे टेंशन आहे.
30 Jan 2017 - 9:34 am | ज्योति अळवणी
मस्त
30 Jan 2017 - 10:16 am | संदीप डांगे
खूप सुंदर लेख! तुमच्या लेखामुळे एक मुलगी आठवलीच! अर्थात ती माझ्या वर्गात नव्हती, माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या बहिणीच्या वर्गात होती, तीची मैत्रीण. काळी-सावळी, काळ्याफ्रेमचा मोठा चष्मा. बारिक चणीची, खाली पाहून बोलणारी, दोन वेण्या वगैरे... अजिबात नोटीस केल्या जाऊ नये अशीच.
त्या दोघी दहावीला असतांना शेवटंच तिला बघितलं, नंतर मी मुंबैत आलो. नंतर साधारण तीनेक वर्षांनी तीला बघितलं तेव्हा अगदी हॉक्क! झालं मला! ;-) चष्मा नव्हता, केस सुंदर, सावळीच पण अगदी वॉव, म्हणजे काय रुप वर्णावे! तरी स्वभाव थोडासा कोषातलाच.... हुशारही होती, दहावी-बारावीला अगदी ९० टक्क्यांवर गुण काढले होते. ती दहावीला असतांना तिच्या आईचा मृत्यू झाला अचानक, त्याही स्थितीत तिच्यापेक्षा लहान मतिमंद बहिणीला सांभाळून दहावीत ९० टक्के आणि बारावीतही नव्वद टक्के काढले तिने! आय वॉज जस्ट गॉन मॅड फॉर हर! माझ्या लग्नाची बोलणी सुरु झाली तेव्हा मी तिच्याशीच लग्न करायचे आहे असा हट्ट घरी धरुन बसलो. कारण आमच्या जातीतली असल्याने घरचे आडकाठी करणार नाहीत असे वाटले होते.
पण काही कथा पूर्ण होण्यासाठी जन्म घेत नाहीत.... घरच्यांनी चक्क नकार दिला. कारण, आई गेल्यावर तिच्या वडिलांनी लगेच दुसरं लग्न केलं, तिची बहिण मतिमंद आहे, इत्यादी कारणे अप्रतिष्ठेची वाटली माझ्या घरच्यांना. त्यावेळेस खूप म्हणजे खूप प्रचंड वाईट वाटले होते मला. आजही आठवले की खूप त्रास होतो त्या गोष्टीचा.
हां, तिचे मात्र काही बिघडले नसावे, शेवटची माहिती अशी की तीने मेडिकलला अॅडमिशन घेतली व डॉक्टर होत होती...
ह्या सर्व काळात मी तिच्याशी कधी एक शब्दही बोललो नव्हतो. :-)
31 Jan 2017 - 2:59 am | रुपी
धन्यवाद.
पण काही कथा पूर्ण होण्यासाठी जन्म घेत नाहीत... >> खरं आहे!
अश्या "अधूरी कहानी" या विषयावर एखादी कथा स्पर्धा असायला पाहिजे. अगदी मनापासून लिहिलेल्या कथा वाचायला मिळतील.
31 Jan 2017 - 12:32 pm | मराठी कथालेखक
मस्त लेख वाचून मजा आली.
आमच्या शाळेत मी पण अभ्यासू , पण उंचीने जरा कमी विशेष काही पर्सनॅलिटी नाही, त्यामुळे मुलींनी कधी लक्ष दिले नाही :( खरतर भरपूर टक्के , पहिल्या तीनात क्रमांक असं असल्यावर मुली जरा भाव देतील अशी अपेक्षा, पण तसं काही व्हायचं नाही. अर्थात मलाही मुलींशी कसं बोलावं वगैरे समजत नव्हतं तेव्हा.
एखाद्या मुलीची पण अशी काही व्यथा असते हे वाचून आसूरी आनंद झाला :)
अकरावी -बारावीत एकेका वर्गात १२० विद्यार्थी...कित्येक मुलांनाही ओळखत नव्हतो, मुली तर दूर..पण तरी नाही म्हणायला एका मुलीने थोडा भाव दिला. अकरावीत प्रॅक्टिकलच्या बॅचमध्ये ती स्वतःहूनच माझी प्रॅक्टिकल पार्टनर झाली. फार सुंदर नसली तरी नीट नेटकी होती. पण पुढे विशेष काही नाही.
कॉलेज खूप दूर होते , तेव्हा बसने जाता येता मुलींशी ओळख काही शाळेतल्याच ओळखीच्या मुलींशी गप्पा असं काही घडायचं मजा यायची. यातली अजून एक गमतीची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या ग्रुप मध्ये ज्याला/जिला बसमध्ये बसायला जागा मिळेल तो/ती आपल्या उभ्या असलेल्या मित्र वा मैत्रिणीची बॅग आपल्याकडे घेणार असा अलिखित नियम (म्हणजे उभे राहणार्याचा त्रास कमी व्हावा). कधी कधी मी अशी ऑफर अनोळखी मुलींना (विद्यार्थिनी) पण देत असे, किंवा क्वचित एखाद्या अनोळखी मुलीकडून अशी मदतीची ऑफर येई. त्यातून ओळख होई. त्यावेळी मोबाईल नव्हते (माझ्या घरी लँडलाईनही नव्ह्ता) त्यामुळे कुणाचा नंबर देण्या-घेण्याचा प्रश्न नाहीच. पण रोज उत्सुकता असायची की आज कोण भेटतय /दिसतय बसला...
पुढे इंजिनिअरिंगला मेकॅनिकलची शाखा, वर्गात एक पण मुलगी नाही, जाणे येणे पण लोकल ट्रेनने त्यामुळे येता-जाताही कुणा मुलीची सोबत नाही...मग फक्त इलेक्ट्रीकल /इलेक्ट्रॉनिक्स शाखेतल्या मुली बघणे.
मैत्रीण म्हणजे काय असते हे पदव्युत्तरलाच खर्या अर्थाने कळालं !!
1 Feb 2017 - 11:32 am | पियुशा
अग्गागा !!!!! रुपडे लय भारी लिवलस !!!!!!!
आता तु सध्या मिपावर काय कर्तेस हे आवर्जुन पाहणार (वाचणार) मी ;)
1 Feb 2017 - 12:20 pm | पूर्वाविवेक
भट्टी मस्त जमली आहे.
2 Feb 2017 - 1:18 am | रुपी
धन्यवाद :)
8 Mar 2017 - 5:46 am | शेवटचा डाव
गाव मळा आडीच कि.मी. अंतरावर मळा हाय आमचा ,त्यात सतरा आठरा घर , पहिलीला आठ-दहा जन पण चौथी पर्यंत एक दोन ,एक दोन गळती होत होत दोघच राहलो ति आन मी.
सतत अभ्यास हा जणू तिचा छंद होता .अन घरच्याचंचा त्रास मला असायचा "आर ती बग किती लितीय-वाचतीय तु नुसत्या बोंबा मारत फिरतोय ".मग काय मनमारुन अभ्यास करायला बसने.मग तिचा जाम राग यायचा , पण रोजचा आडीच किमी प्रवास सोबत तोही पायी .मग काय हळु हळु एकमेकांच्या आवडी निवडी ,आपुलकी वाढत गेली . अन एक नात निर्माण झाल .हे नात बहीन भाऊ , किंवा दोन प्रेमी यांचाही पलीकडच नात सखा सखी . वर्गातल्या सर्व मुली तशा एकदम ढासु , ढ्याशींग अन ही एकदमच काकु बाई अन आपन सिनेबाहद्दर , तिला वर्गात कोढी चिडवल की लगेच रडण सुरू मग आपन तिला समजावून सांगायच .जो कोणी बोललाय त्याला माफी मागायाला लावायाची . तिला नेहमी सांगयचो जरा ढ्याशींग , स्टायलिश वागत जा , ति म्हणनार नाही बाई आपल्याला नाही आवडत. दिवस जात राहीले अन दहावीचे पेपर आले .ऊद्या पेपर अन आज माझ्या वडलानी जगाचा निरोप घेतला .मला पेपर काय देता आले नाही अन ती दहावी फस्टक्लास पास होऊन पुढील शिक्षणासाठी मुंबई ला तिच्या मावशी कडे गेली . पुढे आमची काकुबाई फॅशन डिझायनर झाली .मला मात्र अवेळ संकटाने , मोठा भाऊ या नात्याने शेती कडे वळायला लागल .लग्नाची पत्रिका घेऊन गेलो त्या वेळी ति मला ओळखु शकली नाही आणी मही तिला ओळखु शकलो नाही .