नजफगढमध्ये लहानपण गेलेल्या वीरेन्द्रला चक्क शास्त्रीय संगीत आवडायचं. दुबेबुवांच्या क्लासबाहेर तो गाणं ऐकत तासन् तास उभा रहायचा. शेवटी जाटाचं पोर वाया चाललं, म्हणून वडिलांनी त्याचा कान पकडून एका क्रिकेट प्रशिक्षकाकडे नेलं. असो. पण मुख्य मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा आहे तो त्याच्या खेळण्यातला 'सूर'जो हरवलाय त्याचा. इतका की, दुखापतींनी ग्रस्त झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यातही त्याची निवड होऊ शकली नाही.
खाली मान घालून तो गॅरी कर्स्टन गुरुजींकडे गेला. गुरुजींनी त्याला बसवून घेतलं, त्याच्या खेळाच्या जुन्या चित्रफिती दाखवल्या आणि मग नेटमध्ये घेऊन गेले. वेगवान गोलंदाजाचे ऑफ स्टंपबाहेरचे चेंडू सोडून द्यायचे आणि फिरकी गोलंदाजाचे मोहात पाडणारे फुल लेन्ग्थ किंवा हाफ व्हॉलीवरचे चेंडू केवळ तटवायचे. वीरु 'हो' म्हणला.
दुसर्या दिवशी सराव सामना होता. पियुष चावलाने उंची दिलेल्या चेंडूवर सेहवाग क्रीज सोडून पुढे आला आणि मिडविकेटला झेलबाद झाला. "तुला मी हज्जारदा सांगितलं होतं, पण ऐकू नकोस." ('सेहवाग की माँ' सेहवाग को याद आयी. तीही लहानपणी अशीच करवादायची.) डोईवरचे नसलेले केस उपटायचा प्रयत्न करत गॅरी म्हणाला. "आता काय सांगितलं, कसं सांगितलं की तू अशी चूक पुन्हा करणार नाहीस?"
योगायोगाने नव्वदी ओलांडलेले दुबेबुवा तिथे हजर होते. ते पुढे आले आणि गॅरीला म्हणाले; "आता जरी मी थकलो असलो, मैफिलीची भैरवी सुरू झालेली असली तरी एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो." पुढे होऊन ते वीरूच्या कानात काहीतरी कुजबुजले. वीरूचा एरवी थोडा मठ्ठ दिसणारा चेहरा उजळला. पुढच्या एकाही सामन्यात वीरूने ती चूक पुन्हा केली नाही.
काय म्हणाले असतील दुबेबुवा? (उत्तर आणि अवांतर दुव्यासाठी कृपया माऊसने खालील कोरा भाग निवडावा/हायलाईट करावा.)
उत्तर - फुल गेंदवा अब ना मारो
अवांतर -- मालिनीबाई राजूरकरांनी गायलेली ही भैरवी येथे ऐकता येईल.
[हाच लेख येथेही वाचता येईल.]
प्रतिक्रिया
7 Dec 2007 - 5:06 am | सर्किट (not verified)
अगदी बरोबर !! मस्त !
- सर्किट
7 Dec 2007 - 11:39 pm | आजानुकर्ण
चुकून 'लगत कलेजवा में शॉट' असे वाचले.
(फलंदाज) आजानुकर्ण तेंडुलकर
- आजानुकर्ण
8 Dec 2007 - 12:28 am | धनंजय
'लगत कलेजवा में शॉट' हे सभ्य लोकांत म्हणता येते, मुळातले वाक्य म्हणता येत नाही.
धनंजय (वय वर्षे १२-१६ मध्ये अडकलेला)
7 Dec 2007 - 7:51 am | विसोबा खेचर
मैफिलीची भैरवी सुरू झालेली असली तरी एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो." पुढे होऊन ते वीरूच्या कानात काहीतरी कुजबुजले.
नंदनशेठ, मालिनीबाईंची भैरवी आवडली....:)
आपला,
(संगीतज्ञ) तात्या.
7 Dec 2007 - 9:07 am | जुना अभिजित
ते संगिता बिंगिताबद्दल आपल्याला काही कळत नाही. कानाला आवडतं पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं ते चांगलं.
पण सेहवागला सूर सापडण्यासाठी लोक किती धडपड करत आहेत हे बघून समाधान वाटलं. हँड्-आय कोऑर्डीनेशन वर आयुष्यभर खेळता येत नाही हे त्याला कुणीतरी समजवायला हवं.
अभिजित
आरे ए येडा की खुळा तू??शाणा हो लेका.
7 Dec 2007 - 7:49 pm | मुक्तसुनीत
नंदन , तुमचा पी जे आवडला ! आणि पी जे इतकेच आवडली ती "टंग् इन चीक्" शैलीतली, नर्मविनोदाची कोपरखळी :-)
सेहेवागचा बाबतीत पु लंच्या "खिल्ली"मधल्या यशवंतराव चव्हाणांवर आधारित "एकला मी एकला" ची आणि सरवट्यांच्या अर्कचित्राची आठवण झाली !
9 Dec 2007 - 6:23 am | नंदन
मंडळी. प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
9 Dec 2007 - 9:25 am | देवदत्त
विनोद आणि कोडं आवडलं
एक संगीतज्ञ म्हणून मी 'टप्प्याचे' महत्त्व जाणतो.
संगीतज्ञ नाही म्हणून की का कोण जाणे, सुरूवातीला मला हे वाक्यच नाही कळले. आता टप्प्याचे महत्व शोधतोय. :)