पानिपतात झालेले अब्दालीचे नुकसान

shantanu Paranjpe's picture
shantanu Paranjpe in जनातलं, मनातलं
17 Jan 2017 - 11:46 am

आजच्याच तारखेला काही वर्षांपूर्वी भारत इतिहासातला एक मोठ युद्धसंग्राम झाला आणि त्याचे भारताच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाले. पण या युद्धात मराठे प्राणपणाने लढले आणि अमर झाले. गोविंदाग्रज अर्थात रा.ग.गडकरी यांनी पानिपतचे यथार्थ वर्णन केले आहे ते असे,

कौरव पांडव संगर तांडव द्वापारकाली होय अति
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती

इतिहासकार ग्रॅण्ट डफ हा मराठा सैन्याचे वर्णन करताना लिहितो की,

"The lofty and spacious tents, lined with silks and broad cloths, were surmounted by large gilded ornaments, conspicuous at a distance... Vast numbers of elephants, flags of all descriptions, the finest horses, magnificently caparisoned ... seemed to be collected from every quarter ... it was an imitation of the more becoming and tasteful array of the Mughuls in the zenith of their glory." [संदर्भ- The fall of the Mughal Empire of Hindustan- Chapter VI]

पानिपतचे युद्ध हे अद्भुत आहे. परकीय साम्राज्याने भारतावर आक्रमण करू नये म्हणून सह्याद्रीने देशासाठी केलेला त्याग असेच मी त्याचे वर्णन करेन. अब्दालीला हरवणे आणि भारतात परकीय सत्ता स्थापन होऊ ना देणे या एकाच उद्देशाने भाऊंच्या नेतृत्वाखाली सुमारे १५०० किमीचे अंतर पार करून एक लाख मराठा फौज पानिपतवर लढली. सारेच अद्भुत!! दुर्दैवाने भाऊ पडले आणि दुपारच्या प्रहरापर्यंत जिंकत आलेले युद्ध मराठ्यांनी गमावले. या युद्धात एक लाख बांगडी फुटली आणि त्याचे परिणाम पुढे भोगावे लागले.
१४ जानेवारी १७६१, अफगाणचा बादशहा अहमदशाह अब्दाली आणि मराठी फौजेचा अधिपती सदाशिवराव भाऊ यांच्यात हे युद्ध झाले आणि त्यात अब्दालीचा विजय झाला. वि.का.राजवाडे यांच्या मते या युद्धात, सदाशिवराव भाऊंच्या सैन्याचा खर्च साधारण १ कोट आला असावा. (खंड.१, टीप २८७). बखर करांच्या मते हा खर्च एकूण ३ कोट झाला असावा. अर्थात पेशव्यांना त्याचे ओझे काही फार वाटले नसावे. या युद्धात पेशव्यांचे जितके नुकसान झाले तितकेच नुकसान अब्दालीचे झाले, किंबहुना जास्तच. त्यामुळे विजय मिळवून सुद्धा त्याचा उपभोग घेण्याचे नशीब त्याच्याजवळ नव्हते.
त्याच्या या स्वारीत त्याच्या स्वताच्या सैन्याचा प्रचंड संहार झाला. पानिपतच्या शेवटच्या दिवशी सुद्धा त्याच्याकडील बरीच माणसे मारली गेली. मात्र रोहिल्यांना पुढे करून त्याने स्वतःचा बचाव केला त्यामुळे रोहिले मात्र कामास आले. एकंदरीत या त्याच्या उद्योगामुळे लाभापेक्षा नुकसानच जास्त झाले. मराठे पराभव झाल्यानंतर दिल्ली सोडून गेले आणि अब्दाली युद्धानंतर सातव्या दिवशी दिल्लीमध्ये आला. यानंतर सुमारे दीड-दोन महिने त्याचा मुक्काम दिल्लीमध्ये होता. याकाळात थोडेफार स्थिरस्थावर करायचा प्रयत्न त्याने केला. परंतु या काळात त्याचे अनेक सरदार त्याला सोडून गेले आणि तिथल्या लोकांमध्ये, “पेशवे स्वतः येऊन सर्व बंदोबस्त करतील” अशी भावना निर्माण झाली. त्यामुळे त्याला पुढचा मार्ग संकटमय वाटू लागला. “भगवतकृपेवरून श्रीमंतांचे राज्य कायम आहे,[१. २८२] याउपरी ईश्वरे दिवस उत्तम आणिले, उगवते दिवस आलेले दिसते.[६. ४१२] युद्धच आहे, जयपराजय ईश्वराधीन असते” अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. (संदर्भ- मराठी रियासत- सरदेसाई).
त्यामुळे युद्धात पराजय होऊन सुद्धा लोकांचा पाठींबा पेशव्यांना होता हे बघून अब्दालीला भारतात अजून राहणे अवघड वाटू लागले. त्यातच दोन वर्षाचा पगार चुकवावा असे म्हणून त्याच्या सैन्याने दिल्लीत बंड केले. त्यामुळे नाईलाजाने त्याने नजीबखानकडून सुमारे ४० लक्ष रुपये उधार घेतले. तो भारतात असताना अफगाण मधील त्याच्या साम्राज्यावर इराणी फौजेने हल्ला केल्याची बातमी त्याला मिळाली आणि हा प्रसिद्ध माणूस इसविसन १७६१, २२ मार्च रोजी दिल्ली सोडून निघाला. त्यामुळे हिंदुस्तानात लोडाला टेकून बसण्याची त्याची इच्छा अपुरीच राहिली.
पुढे याच सुमारास पंजाबात शिखांनी जोर धरला आणि लाहोर काबीज केले, शिखांचा पाडाव करण्यासाठी हा माणूस लाहोरला आला आणि शिखांचा पराभव त्याने केला परंतु तो गेल्यावर शिखांनी पुन्हा एकदा लाहोर जिंकून घेतले. एकाचवेळी शीख आणि मराठे हे दोन भयंकर शत्रू त्याला झेपेनासे झाले म्हणून त्याने चक्क मराठ्यांशी तहाची बोलणी सुरु केली. १७६३ मध्ये त्याचे दोन वकील महाराष्ट्रात येऊन राहिले आणि पुढे आधी जसा अंमल मराठ्यांचा होता त्याप्रमाणे राहिलं, अश्या करारावर पेशव्यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठी आणि अब्दाली यांच्यातील ‘गोडवा’ फारच वाढला! परंतु शिखांनी मात्र पंजाबातून अब्दालीचे उच्चाटन केले ते कायमचेच. तपानिपतच्या युद्धानंतर हाती काहीही न लागता हा पुरुष इसवीसन १७७२ मध्ये चमननजीक मरण पावला.

संदर्भ- १. मराठी रियासत मध्य विभाग तीन(पानिपत प्रकरण सन १७५०-६१)- गोविंद सखाराम सरदेसाई

अब्दालीने माधोसिंगला पाठवलेल्या पत्रातील सारांश वाचण्यासाठी या ब्लॉगला नक्की भेट द्या

https://shantanuparanjpe.blogspot.in/2017/01/panipatabdali.html

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

याअगोदरही इब्राहिम लोदिने इथे कमी सैन्य असताना दिल्लीच्या सुलतानाचा पराभव करून मोगल साम्राज्याची सुरुवात केली होती ना?

नरेश माने's picture

17 Jan 2017 - 3:08 pm | नरेश माने

बाबरने इब्राहिम लोदीला जो त्यावेळी दिल्लीचा सुलतान होता हरवून मुघल साम्राज्याची सुरवात केली.

ज्योति अळवणी's picture

17 Jan 2017 - 1:47 pm | ज्योति अळवणी

लेख आवडला. खरी ऐतिहासिक माहिती वाचायला आवडत. धन्यवाद

नितिन थत्ते's picture

17 Jan 2017 - 2:46 pm | नितिन थत्ते

>> परकीय साम्राज्याने भारतावर आक्रमण करू नये म्हणून सह्याद्रीने देशासाठी केलेला त्याग असेच मी त्याचे वर्णन करेन.

मी असे वाचले होते की मराठ्यांचे वायव्येकडील अतिक्रमण रोखण्यासाठी अब्दाली पानिपतास आला होता.

अब्दाली याच्या अगोदर ३ वेळा दिल्लीवर स्वर होऊन लूट करून गेला होता. पहिल्या वेळेस ठीक आहे पण २दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस पेशवाई (मराठेशाही- नाहीतर लोक ब्रिगेडी म्हणायचे ) झोपली होती का?

नरेश माने's picture

17 Jan 2017 - 3:07 pm | नरेश माने

छान माहिती.

<<<त्यामुळे मराठी आणि अब्दाली यांच्यातील ‘गोडवा’ फारच वाढला!>>>
-- हो का? कृपया काही संधर्भ मिळेल का?

गामा पैलवान's picture

17 Jan 2017 - 10:22 pm | गामा पैलवान

Panipat is a diplomatic disaster!

पेशव्यांचं सैन्य अन्नापायी अगतिक झालं होतं म्हणून लढाईस तोंड फुटलं. अशा प्रकारे ही लढाई व्हायला नको होती. भाऊ राजनीतीत कच्चे पडले.

-गा.पै.

पैसा's picture

17 Jan 2017 - 10:36 pm | पैसा

चांगली माहिती

ही लढाई होण्याचे मुख्य कारण म्हणजे पंजाब, काबुल आणि कंदहार हे मोगल बादशाहीचे सुभे होते ते अब्दाली गिळंकृत करून बसला होता. पण पंजाबात पेशव्याने चौथाईचे हक्क (म्हणजे पंजाबचे १/४ उत्पन्न) बादशाहीकडून मिळवले होते आणि त्या मोबदल्यात बादशाहीचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली होती. याच कारणासाठी रघुनाथराव आणि नंतर साबाजी शिंदे पंजाबात अमिनाबेग या सुभेदाराबरोबर वसुलीसाठी राहिलेही होते. मराठ्यांनी अजून एक प्रांत घशात घातला ही गोष्ट नजीब खान आणि मराठ्यांविरुद्धचा पक्ष याना सहन झाली नाही म्हणून त्यांनी अब्दालीला बोलावले.

अब्दालीचा हेतू मोगल बादशाही बुडवण्याचा नव्हता. त्याचे आणि मराठ्यांचे वैरही नव्हते. ते निर्माण झाले पंजाबमुळे आणि मराठ्यांच्या तंत्राने दिल्लीची बादशाही चालू नये म्हणून.

जर पंजाब सोडून देता आला असता तर भाऊसाहेब अब्दालीबरोबर तह करून जिवंत परत येऊ शकला असता. पण या अटी नजीब खानाला मान्य नव्हत्या आणि पेशव्यानेही भाऊला पंजाब न सोडण्याविषयी सांगितले होते.

लढाईत अब्दालीचे स्वतःचे सैन्य थोडे होते. त्यात नजीब खान, बाकी रोहिले, शुजा, इराणी शहावली खान (अब्दाली अफगाण दुराणी जमातीचा होता) असे अनेक बाहेरचे पक्ष होते. या सगळ्यांना लुटीत रस होता, बादशाहीच्या भानगडीत पडण्याची कुणाचीच इच्छा नव्हती.

त्यामुळे मूळ प्रश्न आर्थिक होता आणि तो अब्दालीच्या बाजूने सुटला. बादशाहीची व्यवस्था नजीब आणि अब्दालीने आपल्या मनाप्रमाणे लावली. पुढे महादजीने आपले बळ जमा करून ही परिस्थिती बदलली पण त्याला २० वर्षे लागली. हे पाहता हा मराठ्यांचा पराभव होता. अब्दालीला यश मिळाले नाही त्यामुळे तो मराठ्यांचा विजय होत नाही.

पैसा's picture

18 Jan 2017 - 12:45 pm | पैसा

तुम्ही अजून जरा जास्तवेळा लिहा!

मनो's picture

20 Jan 2017 - 3:16 am | मनो

अभ्यास करून लिहिणार्यांचे दिवस राहिले नाहीत हो. त्यामुळे सध्या २-३ नव्या गोष्टींचा शोध चालू आहे, त्यातच बहुतेक मोकळा वेळ जातो.

माझीही शॅम्पेन's picture

19 Jan 2017 - 3:57 pm | माझीही शॅम्पेन

अतिशय अभ्यास पूर्ण प्रतिसाद , पंजाब वरुन पेशवे आणि अब्दाली ह्यांच युध्ध व्हाव हे खर विचित्र वाटत आहे

ही एकाच गोष्ट नाही तर सगळे पानिपत प्रकरण हा विषय साधा नाही. त्यात अनेक परस्परविरोधी भानगडी आहेत, उदाहरणार्थ शिंदे आणि होळकर यांची आपसात असलेली चुरस (स्पर्धा). जयपूर, जोधपूर, अंबर या राजपूत घराण्यात गादीवर कोण बसणार या प्रश्नात मराठ्यांनी अनेकदा हस्तक्षेप केला. मारवाडच्या राजकारणात अनेकदा शिंदे एका बाजूला आणि होळकर दुसऱ्या विरोधी पक्षात असे झाले आहे. माधोसिंग आणि बिजेसिंग यांच्या भांडणात असेच झाले. मराठ्यांची भूमिका अगदी साधी होती. जो जास्त पैसे काबुल करील त्याच्या मदतीला जायचे. याच भानगडीतून जयाप्पा शिंदे यांच्यावर मारेकरी घालून राजस्थानात नागौर इथे त्यांचा खून झाला. या धोरणामुळे मराठ्यांना राजस्थानात मित्र उरला नाही.

रघुनाथरावाच्या स्वारीत नजीबखान मराठ्यांच्या हातात सापडला असताना त्याला मल्हारराव होळकरांनी सोडवले आणि तोच नजीबखान पुढच्या रामायणाचे कारण बनला. त्याला त्याच वेळी ठार केले असते तर इतिहास वेगळा झाला असता.

दत्ताजी १७६० साली दिल्लीत मोर्चे बांधून असताना त्याने होळकरांची वाट पहिली नाही. मल्हाररावही रेंगाळत उशिरा दिल्लीकडे गेला. दत्ताजी स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर कामे उरकू गेला. त्याचा परिणाम म्हणजे अब्दालीने दिल्लीत अनेक ठिकाणी एकदम यमुना ओलांडली. दत्ताजीस सर्व ठिकाणे एकदम रक्षिता आली नाहीत. नदीतल्या वाळूच्या बेटांवर गवतात लपून बंदूकधारी पायदळ मराठ्यांवर गोळ्या झाडात होते. त्यांच्या विरुद्ध मराठी घोडेस्वार काही करू शकले नाहीत. दत्ताजी स्वतः बुराडी घाटावर आघाडीवर गेला असता त्याला एकदम गोळी लागून ठार झाला. त्यानंतर सगळी शिंद्यांची फौज पळत सुटली. लढाई अशी झालीच नाही.

मल्हारराव होळकरांचा एकुलता एक मुलगा खंडेराव हा सुरजमल जाटाच्या कुंभेरी किल्ल्याला घातलेल्या वेढ्यात ठार झाला त्यामुळे सुरजमल जाट होळकरांचा वैरी झाला. शुजाचा बाप सफदरजंग (दिल्लीत याच्या नावाने रस्ता आहे, अयोध्येचा हा पहिला स्वतंत्र नबाब) याला मराठ्यांनी रक्षिले, पण त्याला वजिरी या परस्पर विरोधी मराठी राजकारणातून मिळू शकली नाही, त्यामुळे तो नाराज होऊन दिल्ली सोडून अयोध्येला निघून गेला. मराठ्यांच्या राजकारणात कोणतीच सुसूत्रता नव्हती, आणि ते परस्पर विरोधी गोष्टीनी भरले होते. कधी ते होळकरांच्या तंत्राने चाले, कधी शिंदे चालवीत तर कधी नारो शंकर तर कधी अंताजी माणकेश्वर. या गोष्टींमधून कळते की मराठयांना कुणी उत्तरेत सामील का झाले नाही आणि तिथे त्यांना कोणी मित्रही का उरला नाही. म्हणूनच पेशव्याच्या कुटुंबातील भाऊंची या कामगिरीवर नेमणूक झाली असावी कारण भाऊ या परस्परविरोधी पक्षांना एकत्र करून अथवा धाक दाखवून त्यांच्याकडून हे काम करून घेईल असा नानासाहेब पेशव्यास विश्वास वाटत असावा.

पैसा's picture

20 Jan 2017 - 11:05 am | पैसा

यापैकी काही गोष्टी फुटकळ इकडे तिकडे वाचल्या आहेत. पण त्याचा असा सुसूत्र परिणाम झाला हे कधी लक्षात आले नव्हते. आपण मराठ्यांच्या पराक्रमाबद्दल अभिमान बाळगतो. पण दुसर्‍याशी मिळवून घेण्याची वृत्ती नसल्याने दर वेळी घात होत आला आहे.

गामा पैलवान's picture

21 Jan 2017 - 12:58 am | गामा पैलवान

मनो,

तुमचं विश्लेषण सांगोपांग परिप्रेक्ष्य देणारे असल्याने उत्तम जमलं आहे. भाऊ पेशव्यांनी व सखाराम हरी यांना पानिपतावर सोबत चलण्याची विनंती केली होती. भाऊंचे यांसंबंधी इथे थोडी वेगळी माहिती सापडते : http://prabodhankar.org/node/245/page/0/40

आ.न.,
-गा.पै.