पैसा झाला खोटा…
मागच्या दोन महिन्यांपासून भारतभर नोटबंदीचा विषय ट्रेंडींग आहे, जवळ असलेले पैसे असे रातोरात गेलाबाजार झाले. कोणीही ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारेनसे झाले. पण मागच्या दोन वर्षाच्या काळात कामानिमित्त भारतभर(खासकरून उत्तर भारत) फिरताना मला नोटबंदी नसतानाही असले अनुभव आले होते, त्यातील काही…
लखनऊ ला जात होतो, रेल्वेने. हि माझी दुसरी फेरी होती लखनऊ ला. सगळं व्यवस्थित पॅक केले आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन निघालो. रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे मी जवळ कमीत कमी रोकड बाळगत असे. ए.टी.एम. आता बर्यापैकी स्टेशन्स वर उपलब्ध असल्यामुळे डेबिट कार्ड वापरणे मी सोयीस्कर मनात होतो. कल्याण स्टेशनवरून रात्रीची गाडी होती. रात्रभर झोपून प्रवास केला होता. सकाळी उठल्यावर फ्रेश होऊन गाडीतच नाश्ता उरकून घेतला. एव्हाना जवळचे पाणीही संपले होते आणि हाताशी असलेले मोजकेच पैसेही. अगदी सहज पुढच्या स्टेशन वर गाडी थांबली तेव्हा उतरून स्टेशनवरून ए.टी.एम. मधून पैसे काढले. पण पैसे काढताना नकळत एक चुक केली, ए.टी.एम. मध्ये रक्कम निवडताना सरसकट १००० रु. निवडले आणि मशीनने घात केला, हजाराची एक नोट मला मिळाली, पाचशेच्या दोन नोटा किवा शंभराच्याही नाहीत. एकच हजाराची नोट. तरीही मला परीस्थितीचे गांभीर्य कळले नाही. गाडी सुटायच्या आत जाऊन आपल्या जागेवर बसलो आणि प्रवासातला आवडता छंद म्हणजे वाचत बसलो. तासाभराने जेव्हा तहान लागली तेव्हा हजाराच्या नोटेने 'रंग' दाखवायला सुरुवात केली. पाणी विकानार्याने माझी हजाराची नोट सविनय परत केली आणि मला पाणी पाजण्याचे पुण्य नाकारून परत गेला. ‘गेलास उडत' म्हणत मीही त्याला भाव दिला नाही आणि पुन्हा वाचायला लागलो. मग दुसरा पाणी आणि कोल्ड ड्रिंक्स विकणारा आला, त्यानेही तेच केले. मी वीस रुपयांच्या पाण्याऐवजी पन्नास रुपयांचे कोल्ड ड्रिंक मागितले तरीही नकारघंटा सुरूच. आता मी वैतागलो कोणीही विक्रेता माझे हजार रुपये घेऊन मला कुठलीही वस्तू देईना. ‘इतनी बडी नोट खुलली कौन देगा साहब' फेम वाक्यं तोंडावर मारून एक एक निघून जात होता.
दुपार झाली तरीही मला पाणीही मिळेना. काही खायलाही घेता येत नव्हते. अन मध्ये कुठले मोठे स्टेशनही लागत नव्हते जिथे एखादं मोठं रेस्टॉरंट असेल आणि मला सुटे मिळतील. तब्बल आठ ते नऊ तास काहीही खाऊ-पिऊ शकलो नव्हतो. त्या हजाराच्या नोटेपासून सुटका लखनऊ पर्यंत झाली नव्हती. जेव्हा गाडी एका मोठ्या स्टेशनावर थांबली तेव्हा पुन्हा ए.टी.एम. मधून चारशे रुपये काढले आणि माझ्या पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लागला.
दुसरा प्रसंग अयोध्येच्या जवळ असलेलं एक खेडं, मासौधा इथला. तर इथे एक साखर कारखाना आहे. या कारखान्यात एका आठवड्याचे काम होते. या कारखान्याच्या जवळचे शहर म्हणजे फैझाबाद. या आधीच्या इथल्या माझ्या भेटीत मो फैजाबादच्या एका हॉटेल मध्ये थांबलो होतो. या वेळी मो साखर कारखान्याच्या गेस्ट हाउसमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. उद्देश एकाच की रोज फैजाबाद पासून मसौधा पर्यंत अत्यंत खराब रस्त्याने गच्च भरलेल्या गाडीतून प्रवास करण्याचे दिव्य टाळता यावे. पण गेस्ट हाउस मधले जेवण जेवणे म्हणजे सहनशक्तीचा कळस होता. आता एकच पर्याय होता तो म्हणजे रोज तिन्हीवेळचं जेवण बाहेर करणं. पहिल्या दिवशी संध्याकाळी फ्रेश होऊन एखादं चांगलं रेस्टॉरंट शोधायला निघालो आणि वास्तवाची जाणीव झाली. एवढा मोठा साखरकारखाना असलेल्या त्या गावात एकही रेस्टॉरंट(अगदी छोटंसंही) नव्हतं आणि मला गेस्ट हाउस मधल्या जेवणाची कल्पनाही करवत नव्हती.
मग रोजचा दिनक्रम ठरला, सकाळी डोळे मिटून गेस्ट हाउसचा नाश्ता पोटात ढकलायचा, दुपारसाठी आदल्याच संध्याकाळी काहीतरी खरेदी करून ठेवलेलं(बिस्किट्स/फरसाण) खायचं आणि संध्याकाळी कारखान्याच्या बाहेर पडून पोट भरेपर्यंत 'गोलगप्पे'(आपली पाणीपुरी) आणि वरून दोन तीन उकडलेली अंडी(तोपर्यंत मी अंडी म्हणजे क्वचितच खायचो) खायची आणि गेस्ट हाउस वर परतून गपगुमान झोपायचे.
या वेळीही खिश्यातील पैसे काहीही कामी आले नव्हते, माझी कितीही खर्च करायची इच्छा असली तरी मी ते करून मला हवे ते खाऊ शकत नव्हतो. परिस्थिती सुधारण्याची वाट बघण्याशिवाय हातात काही उरत नाही.
तिसरा प्रसंग दिल्लीतला. हरिद्वार वरून परतत असताना मला ऑफीस मधून कळवले गेले की येताना राजस्थानमधील माउंट अबू जवळील एका सिमेंट कारखान्याला एक ओझरती भेट द्यायची आहे. मग मी रेल्वेने न येत हरिद्वार वरून बसने दिल्लीला जायचे ठरवले. हरिद्वारमध्ये वातावरण बऱ्यापैकी उबदार असल्यामुळे दिल्लीला जायला निघताना दिल्लीचे हवामानाचे अंदाज बघितले नाही आणि तसाच निघालो. दिल्लीला बस पोचेपर्यंत रात्रीचा दीड वाजला होता नी बाहेर प्रचंड थंडी पडली होती. अगदी हाडं गोठवणारी. अबू रोडला जाणारी एखादी बस मिळते का बघायचे सोडून एखादे स्वेटरचे दुकान शोधायला लागलो. हजरत निझामुद्दीन स्टेशनाबाहेर रांगेत स्वेटरची दुकानं होती, घाइघाइतच एका दुकानात घुसलो. व्यवस्थितपणे मांडलेल्यापैकी एक हुडी निवडलं. काउंटरवर जाऊन बिल मागितलं तर ऐकलेल्या शब्दांवर विश्वास बसेना. किमान बाराशे ते पान्धाराशेच्या आसपास किंमत वाटावी अश्या त्या हुडीची किंमत त्याने फक्त दीडशे सांगितली!
‘युज्ड है क्या ये?’ - मी,
‘तो इतना सस्ता कैसे मिलेगा' - तो,
‘नाही चाहिये' म्हणत मी निघालो. स्वत:लाच हसत. थंडीमुळे मला नव्या आणि जुन्यातला फरकही काळात नव्हता.
पण लवकरच एक साक्षात्कार झाला, इथली सगळीच्या सगळी दुकानं फक्त जुनी, वापरलेली स्वेटर्स विकत होती. नव्या वस्तू विकणारी दुकानं किंवा शोरूम्स एव्हाना बंद झाली होती. खिसा गरम असतानाही मी हतबल झालो होतो. परिस्थितीपुढे गुढगे टेकत शेवटी एका दुकानातून दीडशे रुपयाच्या 'फिक्स रेट' ने एक जाडजूड स्वेटर विकत घेतलं. त्याची उब मात्र नव्या सारखीच वाटली.
आजही ते स्वेटर मी वापरतोय. खरंतर एक रात्रीपुरतं वापरू आणि घरी पोचल्यावर लगेच गावातील आदिवासी पाड्यातील एखाद्या मुलाला देऊन टाकू असं ठरवून घेतलं होतं मी पण मीच वापरतोय अजून. आकाशात उडायला लागलो कि पाय जमिनीवर आणणाऱ्या मित्राचं काम करतं ते आणि पैसाच सर्वकाही नाही याची जाणीवही.
प्रतिक्रिया
8 Jan 2017 - 4:07 pm | Ranapratap
मा झा हि असाच अनुभव कोकणातील आहे. खिशात पैसे असून उपाशी झोपायची वेळ आली.
8 Jan 2017 - 10:54 pm | एस
संस्मरणीय अनुभव आहेत. छान मांडले आहेत.
9 Jan 2017 - 7:51 pm | ज्योति अळवणी
वेगळाच अनुभव! लिहिलं देखील छान आहे